फेब्रुवारी २६, २०११

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रातिकारक चळवळीचे आद्य क्रांतिवीर, समाजसुधारक, भाषाशुद्धी आणि लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते तसेच राजकारण, विज्ञान, साहित्य, समाजकारण, धर्म इत्यादी विविध विषयांवर विपुल लेखन करणारे प्रतिभावंत साहित्यिक वि. दा. सावरकर ह्यांची आज पुण्यतिथी.


स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांना विनम्र अभिवादन.

फेब्रुवारी २५, २०११

आज अंधेरीत दुचाकीवरून जात होतो. लहानशा रस्त्यावरून (गल्ली नाही, दोन गाड्यांएवढी रूंदी आहे त्याची) मुख्य रस्त्यावर येत होतो. उजवीकडून उलट दिशेने पोलिसांची गाडी सायरन वाजवत गेली. पुढे आलो तर मुख्य रस्त्यावर जाण्याकरीता गाड्या उभ्या होत्या त्या गर्दीत थांबलो.

डावीकडे पुढे पोलिसांची दुसरी गाडी लाल/पिवळा दिवा लावून आमच्याच गर्दीत होती. तेवढ्यात त्यांनीही सायरन वाजवायला सुरूवात केली. त्यांना पुढे जायचे होते. पण पुढे गाड्या असल्याने त्यांना जायला जमत नव्हते. मी तोपर्यंत गाड्यांमधून एकदम समोर आलो. समोर उजवीकडून डावीकडे रहदारी सुरू होती. रस्त्याच्या मध्ये एक वाहतूक पोलिस भ्रमणध्वनीवर (मोबाईल हो) बोलत उभा होता. मला वाटले तो आमच्या बाजूची वाहतूक सुरू करेल. पण नाही.

मग त्याचे बोलणे झाल्यावर तो उभा राहिला. मी हॉर्न वाजवून त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्याला वाटले, मला पुढे जायची घाई आहे म्हणून मी हॉर्न वाजवत आहे. त्याने फक्त हात दाखवून थांब म्हटले. तोपर्यंत मागे सायरन सुरूच होता. मग अर्ध्या एक मिनिटाने त्या वाहतूक पोलिसाने आमच्या बाजूच्या गाड्यांना परवानगी दिली. मी जाता जाता त्याला सांगायचा प्रयत्न केला की, "मागे पोलिसांची गाडी सायरन वाजवत होती म्हणून मी तुम्हाला सांगत होतो." त्याने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहिले. मी ही विचार केला, "जाऊ देत. कुठे त्यांच्या कामात हस्तक्षेप करायचा." आणि पुढे निघालो.

पुढील वेळी ही विचार करेन

फेब्रुवारी २२, २०११

आज सकाळी पूर्व दृतगती मार्गावरून पवईकडे जाण्यासाठी डावीकडे वळलो. ह्या मार्गावर सिग्नलला वाहतूक खोळंबा असतोच. आज तर एवढा की गाड्यांना परवानगी नसलेल्या पदपथावरही दुचाकी अडकून राहिल्या होत्या.


कहर म्हणजे एक माणूस बिचारा पदपथावरून न जाता मग रस्त्यावरून जागा काढत जात होता.

पुढे आलो सिग्नलजवळ तेव्हा वाहतूक पोलिसाने हात दाखवून आम्हाला थांबविले. त्याला पाहताच मला मॅट्रिक्स सिनेमातील निओ आठवला. वाटले, He is also the One :)
निओ ने हात दाखवून बंदुकीह्या लहानशा गोळ्याच थांबवल्या होत्या. ह्याने हात दाखवल्या की मोठ्या मोठ्या गाड्या थांबतात. :)


असेच काहीतरी पुन्हा कधीतरी.

फेब्रुवारी १८, २०११

विश्वचषकाकडे दुर्लक्ष करायला मदत करा रे. ह्या लोकांप्रमाणे माझ्याही भावना उतू जात आहेत. म्हणून न लिहायचे, बोलायचे ठरवूनही लिहावे लागतेय.

Either you love it or you hate it. But you can't ignore it. असे झालंय माझं. ;)

द्वारकानाथ संझगिरींचे लेखन म्हणून वाचायला गेलो. त्यांनी लिहिलं चांगलं नेहमीप्रमाणे, वाक्येही मस्त आहेत. पण मूळ मुद्दाच चुकीचा वाटला. १९८३ वर्ल्डकप जिंकला होता तो सावरकरांकरीताही असेलच की.
http://www.saamana.com/2011/February/18/Link/Main1.htm

आणि दुसरे हे.
हिंदुस्थानचेच नाव वर्ल्ड कपवर कोरण्यासाठी देव पाण्यात ठेवायचे की वर्ल्ड कप घेऊन आलेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास कर असे साकडे देवाला घालायचे हेच विद्यार्थ्यांना कळेनासे झाले आहे
http://www.saamana.com/2011/February/18/Link/Main2.htm
काही पण..
त्या विद्यार्थ्यांना म्हणावे, "आता परीक्षा न देता वर्ल्ड कप वर लक्ष द्यावे. वर्ल्ड कप चार वर्षांत एकदा होतो. दहावी-बारावीची परीक्षा काय ६-६ महिन्यांनी होतच असतात."

वृत्तवाहिन्या, क्रिडावाहिन्यांकडे तर मी दुर्लक्ष करू शकतो. पण जे काही आवर्जून पाहतो त्यातही ह्याबाबत काही असले तर आणखी वैताग.
आवडीची मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' पाहतोय तर त्यातही आहेच. बरं
असेल तर असू द्या पण कैच्याकै चाललंय. भारत जिंकण्यासाठी होमहवन चाललंय.
 

इतरही मालिकांमध्ये सुरु होईल, झाले असेलच. :(

फेब्रुवारी १७, २०११

आज कार्यालयातून घरी येण्यास ३५-४० मिनिटे लागली. दररोज हमखास ६० ते ७५ मिनिटे लागतात. मनात लगेच विचार आला, क्रिकेट विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा पाहण्यास तर लोक लवकर घरी गेले नसतील?


सकाळी गर्दी नसली तरी सकाळी २०-२५ मिनिटे लागतात. त्यामानाने ४० मिनिटे म्हणजे जास्तच झालीत. पण तो अतिरिक्त वेळ लागला ट्रकमुळे. त्या लोकांना रस नसेल ना क्रिकेटमध्ये.
विश्वचषकाच्या सामन्यांनाही असेच लोक लवकर घरी जाऊ देत. निदान मी थोडा उशीरा निघूनही रस्त्यात मला जास्त वेळ लागणार नाही ;)

विश्वचषकाबद्दल किंवा मुख्यत्वे क्रिकेटबद्दल माझे मत मी लवकरच लिहेन. 

नेहमी आपण आवडलेल्या जाहिरातींबद्दल बोलत असतो. काही वेळा जाहिराती एवढ्या चांगल्या असतात की आवडता कार्यक्रम, चित्रपट पाहत असताना मध्येच चांगली जाहिरात आली तर ती पाहण्यात मजा वाटते, जाहिराती का दाखवतात असे वाटत नाही. ;)
पण गेल्या वर्षापासून एक जाहिरात छळ करत आहे. निरमा पावडरची. मोटारीच्या चाकाने रस्त्यावरील पाणी उडत असताना ती बाई बोट दाखवून 'निरमा.. निरमा.." म्हणते. आतापर्यंत ही मला सर्वात जास्त न आवडलेली जाहिरात.तसेच सध्या दाखवत असलेली फेविकॉलची जाहिरात. सून सासूचे पाय दाबत असते तेव्हा दोघी एकमेकींचे गुणगान गात असतात. पण नंतर मग उलट. फेविकॉलने आतापर्यंत एवढ्या पुरस्कार मिळण्यासारख्या जाहिराती बनविल्या होत्या. उलट त्यांच्या सर्वच जाहिराती आवडल्या होत्या. पण त्यांच्या ह्या नवीन जाहिरातीने पूर्ण अपेक्षाभंग केला. :(
(ह्याचा विडीयो आंतरजालावर अजून मिळाला नाही. मिळाला की त्याचा दुवा देईन)

फेब्रुवारी ०९, २०११


गेले २ दिवस सर्दी खोकला होता. साधारणतः मला सर्दी होत नाही. कितीही थंड पिऊ दे, किंवा थंड वातावरण असू दे. तरी सर्दीचा त्रास होत नाही. खोकला होतो अधेमध्ये. खोकल्यावर घरगुती तात्पुरता उपाय म्हणजे गूळ खाणे (जे मी सहसा झोपेत खोकण्याचा त्रास होत असेल तरच घेतो), सकाळी हळदीचे दूध, किंवा इतर काही औषधं. सर्दीवर तर औषध नाही असे म्हणतात. पण तरी बाजारात त्यावर गोळ्या, बाम मिळत असतात म्हणजे असेल औषध उपलब्ध ;) सहसा मी औषध घ्यायला जात नाही. तसे तर मी डॉक्टरकडे जाणेही टाळतो. काय उठसूट ह्या गोष्टींकरीता डॉक्टरकडे जायचे. प्रकरण हाताबाहेर जात असेल तरच डॉक्टरकडची वारी. त्यामुळे बहुतेक वेळा आपल्याला माहित असलेली, जाहिरातीत पाहिलेली औषधे घेऊन प्रयत्न करतो. आणि उलट प्रकार म्हणजे सर्दी नसताना विक्स, निलगिरी तेल, झंडू बाम वगैरे तीव्र वासांच्या औषधाने मला त्रास व्हायला लागतो. सर्दी, नाक चोंदणे वगैरे. म्हणून मी त्या औषधांपासून दूरच असतो.

पण ह्यावेळी त्रास जास्त वाटला. त्यात गेले २ दिवस उशीरा घरी गेल्याने डॉक्टरकडे जाणेसुद्धा जमले नाही. त्यामुळे मग रात्री औषधांच्या दुकानातून त्यांनाच विचारून सर्दी आणि खोकल्याचे औषध घेतले. (वादाचा मुद्दा: डॉक्टरांचा सल्ला ने घेता थेट दुकानदाराकडून औषध घेणे बरोबर आहे की नाही? तो सध्या मरू दे. सांगितले ना. मी औषधच घ्यायला पाहत नाही तिथे आत्ता ह्या वादात पडायचे नाही) रात्री १-१ (सर्दीची एक, खोकल्याची एक) गोळी घेतली आणि दुपारी १-१. दुपारी ३:३०/३:४५ पासून जाणवायला लागले की खूप झोप येत आहे. ४:३० च्या आसपास लक्षात आले की गोळ्या घेतल्यांचा परिणाम हा. (म्हणूनच सकाळीही खूप झोप येत होती आणि मग कार्यालयात नेहमीपेक्षा उशिरा आलो. ते कारणही तेव्हाच कळले). आता काम संपवून घरी.

तुम्ही म्हणाल, "शीर्षकातील सर्दी झाली, खोकला झाला. दारू कुठेय? " सांगतो.

असाच प्रकार २००३/२००४ मध्ये झाला होता. मला खोकला झाला होता म्हणून रात्री औषध घेतले होतेच. सकाळी ही कार्यालयाकरीता निघताना औषध घेऊन निघालो. साधारण दोन अडीच तासांनी मस्त झोप यायला लागली. नेमके कारण कळेना. सहकार्‍यांना सांगितले की मला आता अर्धा तास काही विचारू नका. मी डुलकी घेतो. तेव्हाही डुलकी घेता घेता आठवले, की सकाळी बेनाड्रिल औषध घेतले होते. त्याने झोप येत आहे. मध्ये कधीतरी वाचले होते की बेनाड्रिल मध्ये १२ टक्के अल्कोहोल असते, बिअरपेक्षाही जास्त. म्हणूनच त्यावर लिहिले असते की हे औषध घेतल्यावर यंत्रावर, किंवा गाडी चालवायचे, किंवा इतर संवेदनशील काम करू नये. म्हणूनच मी आणि माझा एक मित्र बेनाड्रिलला आपली दारू म्हणतो. हाच प्रकार लक्षात ठेवून मी एक दोन सहलींमध्ये गप्पा/ओरड अशा गोष्टी केल्यावर रात्री झोपताना बेनाड्रिलचा डोस घ्यायचा विचार करायचो. घसाही ठिक होईल आणि झोपही मस्त लागेल. पण आता बेनाड्रिल मध्ये ५% अल्कोहोल असते. तेवढा नशा कमी :)तसेच गेल्या वर्षी जूनमध्ये खोकला झाला होता. १०/१२ दिवसांनीही कमी झाला नाही म्हणून डॉक्टरकडे गेलो. त्यांनी बेनाड्रिल नको घेऊ असे सांगितले. गुळण्या करण्याचे एक औषध दिले, आणि दुसर्‍या त्यांच्या गोळ्या. ते गुळणीचे औषध घेताना त्याला वाईनसारखा वास येतो असे वाटले आणि चवही थोडीशी तशीच लागली. गुळण्या केल्यावर जीभेचा आणि तोंडातील काही भाग बधिर झाला असे जाणवले. पण तेव्हा जास्त लक्ष दिले नाही. नंतर पाहिले तर त्या औषधात १०% अल्कोहोल आहे असे वाचले. म्हणजे मला तो वाईनचा वास बरोबर आला होता. कार्यालयात मित्रांशी ह्याबद्दल बोललो तर ते म्हणाले, "चांगले आहे रे. शनिवार-रविवारच्या दिवशी हे औषध घेऊन टुण्ण होऊन जायचे ;)" डॉक्टरांना त्याबद्दल विचारले तर ते म्हणाले,"चव तशी लागत असेल. पण बधिर नाही होणार" असो. थोडे दिवस औषध घेऊन मग खोकला गेला.

आताही खोकला/सर्दी कमी झाला आहे असे वाटते आहे. जाईल पूर्णपणे १-२ दिवसांत. नाही तर ह्या शनिवार रविवारी पुन्हा ह्या दारूचा उपभोग घेता येईल.

(सर्व चित्रे आंतरजालावरून साभार)

फेब्रुवारी ०८, २०११

असे जाणवत आहे की गेले काही महिने अनुदिनीवर आणि खासकरून बझ वर जे काही लिहिले/मत प्रदर्शन केले होते त्यात (समिक्षा म्हणण्यापेक्षा) टीका आणि वैतागच जास्त दिसत होता. अर्थात सर्व नाही. काही अपवाद वगळता (छ्या.. मी Developer होण्यापेक्षा Tester च व्हायला पाहिजे होते नाही? ;) )

नाही तरी वैताग कमी करायचाच आहे. त्यामुळे इथेही निदान १-२ महिने तशा प्रकारचे लेखन न करावे असे वाटत आहे. पण काही लेखन अर्धवट लिहून आहे, ते टाकेन लवकरच. जानेवारीपासून क्रिकेटवर टिप्पणी देणे मी बंदच केले आहे.  


इतर लेखनात वेगळे अनुभव, विचार, चित्रपटांबद्दल (माझ्या आवडीचा विषय) लिहायचा विचार आहे.


पाहू, हे कितपत शक्य होते.

(ह्याच विषयावर मी आधी ही येथे लिहिले होते. पण तो बसमध्ये/इतर गाड्यांमध्ये बसून घेतलेला अनुभव होता. आजचे लेखन आहे स्वत: गाडी चालवताना घेतलेल्या अनुभवांवरून)

शुक्रवारी
रात्री माझ्या दुचाकीवरून कार्यालयातून घरी येत होतो. तीच नेहमीची गर्दी. मुलुंड चेकनाका पार करून ठाण्यात शिरलो. जकातीसाठी ट्रक हळू हळू पुढे जात होते. मी ते रांगेत होते म्हणत नाही आहे. त्यांतून मार्ग काढत कार आणि दुचाकी जात होत्या. जकात नाका पार करून पुढे आलो. दोन रुग्णवाहिका पुढे जाण्याच्या प्रयत्नात होत्या. पण ट्रक आणि कार मधून पुढे जाणे कठीण पडत होते. त्याने शेवटी सायरन वाजवला. एक दोन गाड्यांमधुन जागा मिळाल्यावर पुढे गेले. मी ही आपला मागून जागा शोधत/काढत त्यातून पुढे आलो. पुढे तीन हात नाक्याच्या उड्डाणपुलावर पुन्हा ट्रकची गर्दी. तिकडून पूल उतरल्यावर पाहिले दोन्ही रुग्णवाहिका अजून तिकडे रस्ता मिळण्याची वाट पाहत ट्रकच्या मागे जात होत्या. नीट पाहिले तेव्हा कळले की तो ट्रक डावीकडच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उजवीकडून पुढे जात होता. पण त्यामुळे पूर्ण रस्ता बंद झाल्याचे त्याला जाणवले नाही. रुग्णवाहिकेचे चालक अधूनमधून सायरन वाजवत होते. मी मग कसातरी मार्ग काढत त्या दोन रुग्णवाहिकांच्या पुढे गेलो. त्या ट्रकचालकाच्या सहकार्‍याला म्हटले,"मागून रुग्णवाहिका येत आहे त्याला तरी जागा द्या रे. नेहमी ओव्हरटेक काय करायचे असते तुम्हाला" त्याने मागे पाहिले आणि ट्रक डावीकडे घ्यायला सांगितला. पण तोपर्यंत आम्ही पुढील उड्डाणपूलापर्यंत पोहोचलो होतो. मी पूलावर न जाता डावीकडे गेलो आणि त्या रुग्णवाहिका जागा मिळाल्याने ट्रकच्या पुढे जात आहेत असे दिसले. पुढे त्यांना किती मोकळा रस्ता मिळाला त्याचा अंदाज नाही. 

हे नेहमीचेच झाले आहे. आधी कंपनीच्या बसने यायचो तेव्हा काय त्यांच्या वेळेवर निघणे. बाकी त्या चालकाचे काम आम्हाला आमच्या ठिकाणी नेणे. पण भरपुर वेळा काम असल्याने उशीरा निघायला लागायचे तर बस चुकायची म्हणून दुचाकीने जायला सुरूवात केली. सुरूवातीला वेगळे वाटले पण नंतर कार्यालयातून घरी निघताना विचार सुरू असतो केव्हा बाहेर पडायचे? कारण गेटबाहेर निघाल्यावरच वाहतुकीचा खोळंबा सुरू झालेला असतो. लगेच समोर मोकळा रस्ता असला तरी पुढच्या सिग्नलला गर्दी असणारच. उदा. अंधेरीकडून पवईमार्गे पूर्व दृतगती मार्गावर जाताना गेल्या वर्षी पवई तलावापासून आय आय टी मुख्य द्वारापर्यंत रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा असायचा. तो रस्ता ठीक झाल्यावर वाटले की चला मार्ग मोकळा झाला. तसे नाही. आता कांजुरमार्ग/गांधीनगर जोडणीला मस्त गर्दी असायची. तशीच ह्या बाजूला  एल अँड टी चा पूल सुरू व्हायच्या आधी. आता पहावे तर कांजूरमार्ग ते पूर्व दृतगती मार्गावरचा जो पूल आहे तिथे थांबून रहावे लागते. थोडक्यात उर्जेच्या नियमाचा थोडासा प्रकार म्हटला तर ह्या सिग्नलवरून त्या सिग्नलवर
  स्थलांतरीत होत असतो.

ह्यातही लोक सरळ गाडी चालवतील तर एकवेळ समजू शकतो. पण आधीच गर्दी असेल तिथे वाकडी तिकडी गाडी चालवून गोंधळ वाढवत असतात. एका गाडीच्या मागे जायचे सोडून दोन गाड्यांच्या मधून गाडी चालवणार म्हणजे त्या दोघांमध्ये जागा मिळाली की लगेच त्यात गाडी घुसवता येईल ह्या विचाराने. त्यामुळे होते काय की एक गाडी पुढे त्याच्या मागे उजव्या बाजूला, गाडीचा डावा भाग थोडासा रांगेतून आत ठेवत काहीसे असे
--_     --
    --     --
       --
म्हणजे होते काय की मध्ये भरपूर रिकामी जागा असते पण फक्त स्वतःला पुढे जायला कधी मिळेल ह्या चढाओढीत रस्ता अडवून ठेवला आहे हे बहुतेक वेळा पाहिलेच जात नाही. (लोकलमध्ये कसे असते पहा दरवाज्यावर सर्व लोक लटकून असतात आणि सांगतात आत जागा नाही. प्रत्यक्षात आता भरपूर जागा असते) आणि हे फक्त कारचालक करतात असे नाही तर दुचाकी, रिक्षा, बस, ट्र्क सर्व चालक. मग आता जी वर मोकळी जागा आहे त्यातून मी दुचाकीवरून आरामात पुढे निघून जातो. पण त्या तिथे पोहोचण्याकरीता चक्रव्यूह पार करावे लागते. बरं त्यात पोहोचलो तरी आराम नाहीच. पुन्हा इकडून तिकडून कोण मध्ये यायचा प्रयत्न करेल सांगता येत नाही. अजून एक. साधारणपणे दुचाकीस्वार डाव्या बाजून पुढे जायच्या प्रयत्नात असतात. मग तिथे त्यांच्यात चढाओढ असते. मग मध्येच गाडी डावीकडे टाक, लगेच उजवीकडे असेही काही. आणि आता हद्द म्हणजे ह्यांनी रस्त्याच्या बाजूचे चालण्याकरीता बनविलेले पदपथ (फूटपाथ हो) सोडले नाही. बहुतेक दुचाकीस्वार त्या पदपथावरून पुढे जात असतात. मी आपला शिस्तीत रस्त्यावरुन जात असतो. लागले १० मिनिटे जास्त लागू दे.

तरी आधी रात्री थोडे उशिरा निघून कमी गर्दीत घरी जाता येईल असे वाटत असे. आता तर तिथेही अडचण. ९च्या नंतर निघालो तर ट्रकलाही परवानगी दिलेली असते. मग तेही लोक जमेल तशी गाडी हाकत असतात. आणि तुम्ही हळू जात असाल तर डाव्या बाजून जावे असे नाही, भले मी हळू जात असेन, समोरच्या ट्रकपेक्षा किंचित जास्त वेग घेऊन मला त्याच्या पुढे जायचे आहे. पण ह्या त्यांच्या प्रयत्नात मागे किती गाड्या अडकून पडल्या आहेत ते पाहत नाही. २ महिन्यांपूर्वी असेच गुजरातमध्ये जायचे होते म्हणून सकाळी ५:३० ला निघालो. पण त्या महामार्गावर एवढे ट्रक असे रस्ता अडवून जात होते की सकाळी लवकर निघून लवकर पोहोचण्याचा विचार विरुन गेला.

हं तर सुरूवात केली होती रुग्णवाहिकेवरून. रुग्णवाहिका जात असेल तर साधारणपणे आपण त्या गाडीला रस्ता द्यायचा असतो हे बहुधा कोणी लक्षात घेतच नाही. अमेरिकेत एक अनुभव आला (कोण रे ते म्हणाले, अमेरिकेत काय आता कोणीही जायला लागलेत :P ) सिग्नलवर पांढरा बारीक दिवा लावला असतो. तो तार्‍यांप्रमाणे लुकलुक करत असतो. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी, किंवा पोलिसांची गाडी जाणार असेल तर तो दिवा सुरू करतात. तेव्हा, किंवा मध्येच सायरन ऐकू येईल तेव्हा सर्व बाजूंची वाहतूक पूर्णपणे थांबते. लोक आपली गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला थांबवून ठेवतात. म्हणजे डावीकडून त्या गाड्यांना मार्ग मिळेल. तिकडे आणि इथे नेमकी तुलना करणे नाही. तसे काही करायचेही बहुधा इथे आता नेमके शक्य नाही. पण निदान त्या अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना थोडी तरी जागा मिळावी ही अपेक्षा. काही लोक तर रूग्णवाहिकेला मार्ग मिळाला तर त्यामागे रिकामी जागा असते म्हणून त्या गाडीच्या मागे आपली गाडी नेत असतात. हा प्रकार काही कळला नाही. 


सध्या तरी एवढेच. काही वेळा वाटते आधी इथे वाहन चालवायची थोडी शिस्त होती. ती बिघडत चालली आहे. तसेच मी ही नीट चालवतो असे मला वाटते. पण 'जावे त्याच्या देशा' किंवा 'When in Rome... 'ह्या प्रमाणे किंवा गर्दीश सिनेमातील मुकेश ऋषी च्या "तुम्हे जिंदा रहना है, तो मुझे मारना पडेगा" वाक्याप्रमाणे हा प्रकार असाच वाढत जाणार असेच वाटते. 


(अजून एक बाब आहे, सर्वांच्याच परिचयाची. पण ती पुढील वेळी)

फेब्रुवारी ०६, २०११

दिलेल्या पत्त्यावर नीट पोहोचणे म्हणजे एक कसरतच आहे. तरी अजूनही मोठ्या शहरांतच जाणे झाले आहे. मी इथे आधी सांगितल्याप्रमाणे मला पत्ता लवकर मिळत नसेल :) पण महामार्गावर कुठे वळून कुठे जाता येते याबाबत तरी नीट फलक लावावेत की जाणार्‍याला रस्ता नीट कळेल.आज पनवेलच्या पुढे गेलो होतो कर्नाळ्याला. पण पनवेल वरून गोवा महामार्गावर जाण्याकरीता मुख्य रस्त्यावर डोक्यावर फलक लावून ठेवला आहे, पणजीम् ->. तिकडे वळून सरळ गेलो. पुढे गेल्यावर पाहिले तर मुंबईकडे जाणारा रस्ता. मध्ये पेट्रोलपंपावर विचारून परत त्याच रस्त्यावर आलो. पुन्हा उजवीकडे वळून थोडे पुढे गेलो तर डाव्या बाजूला जो रस्ता जातो त्या कोपर्‍यात डाव्या बाजूला फलकामध्ये लिहून ठेवले आहे, <- पणजीम् (की गोवा?). अरे, गोवा हे किती मोठे/प्रसिद्ध ठिकाण आहे आणि तिकडे जाण्याचा फलक असा लहानसा आणि कोपर्‍यात? (आधी गेलो होतो त्या रस्त्यावर मुंबई/उरण वगैरे मोठ्या अक्षरात डोक्यावर लिहून ठेवले आहे)


३/४ वर्षांपुर्वी एका हिंदी वृत्तवाहिनीवर दाखवले होते की काही शहरांमध्ये हे असे फलक कसे चुकीने लावले आहेत. उदा. एका ठिकाणी जाण्याचे अंतर जर ५० किमी असेल तर पुढे काही अंतरावर तेच अंतर वाढवून ७० किमी वगैरे दाखवले होते.

तरी बरे, भरपूर ठिकाणी असे चुकलो तर पुढे जाऊन यु टर्न घेऊन परत तरी येता येईल पण काही ठिकाणी ती ही सोय नाही आहे.

फेब्रुवारी ०४, २०११

वाहने वाढलीत, गर्दी वाढली, रस्ते भरून गेले. पुढे जायची सर्वांनाच घाई.
पण म्हणून स्वत: वाहन चालवताना रूग्णवाहिकेला तरी रस्ता द्यावा असेही वाटू नये लोकांना?

(आता सविस्तर लिहिणार होतो. पण उद्या लिहितो)

फेब्रुवारी ०३, २०११

गेल्या शनिवारी पुण्याला गेलो होतो, तेव्हा संध्याकाळी शनिवारवाड्यात जाऊन आलो. इतके वर्षे त्याबद्दल ऐकले होते, आत गेलो नव्हतो. पुण्याच्या फेरीत तिकडून जाणेही होत असेल. एक वर्ष पुण्यात राहिलो तेव्हाही वाडा आतून पाहणे झाले नाही.

पण ह्यावेळी आत गेलो. वाटले थोडी नवीन माहिती मिळेल. खालून वाडा पहायला थोडे बरे वाटत होते. मोठ्या मोठ्या पायर्‍यांवरुन पहिल्या मजल्यावर गेलो. त्या पायर्‍या चढताना वाटत होते त्या काळच्या बलाढ्य आणि उंचपुर्‍या माणसांकरीताच ह्या पायर्‍या बनविल्या असतील.

वर जाऊन एका जागेवर सहज एक फोटो काढून घ्यायचा म्हणून उभे राहिलो.
पण सर्व अपेक्षा भंग पावल्या. तिथून खाली पाहिले तर दिसले की त्या जागेचे पूर्णपणे सार्वजनिक उद्यान झाले आहे. महाल/वाड्याबद्दल काही उरले आहे असे वाटतच नव्हते. मग असेच पूर्ण भिंतीवरून एक फेरी मारली. उरलेल्या वाड्याची देखरेख करणे बहुधा महानगरपालिकेला जड जात असावे.

खाली येऊन वाड्याच्या माहितीबद्दल जे काही एक दोन फलक लावले होते तेच वाचून काढले.
ते हे फलक.

फलक वाचताना एक गंमत दिसली ती आताच्या सरकारच्या निष्काळजी कारभाराचेच एक उदाहरण वाटली. एका फलकावर वाड्याचा खर्च दाखवलाय १६११० रुपये तर त्याच्या बाजूच्याच दुसर्‍या फलकावर खर्च दाखवलाय १६१२० रूपये. (तेव्हाच्या नाही म्हणत मी... आताच्या सरकारने इथेही घपला केला? २८० वर्षांपुर्वीचे १० रू म्हणजे आजचे किती? :) )

गंमत सोडा. पण इतर गोष्टीही नीट नाही वाटल्या त्या म्हणजे वाडा तर सोडा पण तिथे लावलेल्या फलकांचीही देखरेख नीट होत नाही असे वाटते. त्यावर लिहिण्यासाठी वापरण्यात आलेला काळा रंग ही उडत चालला आहे. आता ५ रू तिकिटात काय काय करणार असा प्रश्न विचारतील. तिकीटाचा दर वाढवला तर लोक येणे बंद करतील ही भीती ही असेल. पण इतिहासातील काही गोष्टींवर वाद घालून, काही कृती करून जो गोंधळ होतो त्यात जेवढा पैसा खर्च होतो तो इथे वापरा की.

असो. तुम्हाला हे लेखन त्रोटक वाटत असेल पण त्याबद्दल आणखी काही खास लिहिण्यासारखे मला आत्ता तरी वाटले नाही कारण मलाच तो वाडा पाहताना एवढी अपेक्षापूर्ती झाल्यासारखे वाटले नाही. आता मी ही धावती भेटच म्हणेन. कोणी इतिहासाची माहिती सांगत माझ्यासोबत येत असेल तर पुन्हा येईन.

जाता जाता: त्या वाड्याचे जे तिकिट आहे त्यावर सर्व हिंदी आणि इंग्रजीत लिहिले आहे. (चित्र लवकरच स्कॅन करून टाकतो येथे.)

नेहमी मराठी मराठी करण्यार्‍या तसेच इतिहासाचा बाणा सांगणार्‍या
राजकीय पक्षांनी इथेही लक्ष द्यावे की जरा.

फेब्रुवारी ०२, २०११


पुन्हा गाजावाजा करत असलेला शाहरूख खानचा 'जोर का झटका' हा कार्यक्रम एनडीटीव्ही इमॅजिनवर आज चालू झाला. त्याच्या All Out .. Total Wipe Out ह्या वाक्यावरून मला अंदाज आला होता की तो बिन्दास, डिस्ने, ए एक्स एन (AXN) वरील खेळांच्या कार्यक्रमांप्रमाणे असेल. आणि आताच त्याचे पहिले प्रक्षेपण पाहिले. तो कार्यक्रम तसाच आहे.

बायकोने विचारले "हा कार्यक्रम चालेल का?" मी म्हटले, "नाही. आणि ह्यात शाहरूख चे जास्त काम नसेल." तेव्हा आणखी एक लक्षात आले. शाहरूख खानचे कौन बनेगा करोडपती ३, क्या आप पांचवी पास से तेज है हे कार्यक्रम तर चालले नाहीत. आता हा तिसराही बहुधा चालणार नाहीच. (कधीतरी पहिल्यांदाच अशी तात्काळ समिक्षा करत आहे ;) ). पहिले दोन कार्यक्रम तरी थोडेफार पहावेसे वाटत होते. हा मी ही बहुधा पाहणार नाही.

ज्या लोकांना शाहरूख खान आवडत नाही त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतील ते जाणतो. मलाही ह्याबद्दल आवर्जून लिहावे असे नव्हते. पण काहीतरी चांगले कार्यक्रम दूरदर्शन वर असावे वाटत असताना, असे कार्यक्रम सुरू झाल्याने मनात आले ते लिहून टाकले :)

(चित्र जोर का झटकाच्या संकेतस्थळावरून)

फेब्रुवारी ०१, २०११गेले काही महिने सेवेत नसलेले 'साहित्यविश्व' संकेतस्थळ पुन्हा आपल्या सेवेत हजर झाले आहे. जुन्या सदस्यांचे खाते आणि विदा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सदस्य तेच खाते वापरून साहित्यविश्वात पुन्हा सहभागी होऊ शकतात.

संकेतस्थळ पुन्हा सुरू झाले असले तरी काही दिवस चाचणी अवस्थेत ठेवण्याचा विचार आहे. सदस्यांना विनंती आहे की त्यांना जाणवणाऱ्या अडचणीबद्दल त्यांनी vyavasthapak(at)sahityavishwa(dot)in ह्या पत्त्यावर विपत्राने कळवावे.

संकेतस्थळाचा पत्ता: www.sahityavishwa.in

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter