डिसेंबर २५, २०१३



सर्वांना नाताळ शुभेच्छा.

ख्रिसमस, नाताळ वर भरपूर चित्रपट आले असतील. काही वर्षे आधीपर्यंत विविध वाहिन्यांवर ख्रिसमस च्या निमित्ताने हे चित्रपट दाखवले जायचे. पण हे प्रमाण सध्या खूप कमी झाले आहे. अशाच चित्रपटांतील माझा आवडता एक चित्रपट आहे 'मिरॅकल ऑन थर्टीफोर्थ स्ट्रीट' (Miracle on 34th Street). साधारण १९९४/९५ मध्ये हा चित्रपट स्टार मूव्हीज वर पाहिला होता. वेगवेगळ्या मोठ्या दुकानांत सांताक्लॉज लहान मुलांना भेटून त्यांच्याशी बोलत असतात. त्यापैकी एका दुकानात सांताक्लॉज बनलेला माणूस दारू पिऊन आला असल्याने क्रिस किंगल ला सांताक्लॉज बनविले असते ह्यापासून क्रिस किंगलच खरा सांताक्लॉज आहे हे सिद्ध करण्यापर्यंतचा प्रवास मला आवडला.



२००६ मध्ये मी ह्या चित्रपटाची VCD ऑनलाईन खरेदी करून मागवली होती. पण तेव्हा मला ह्याच चित्रपटाच्या १९९४ मधील रिमेकची VCD मिळाली. आता रिमेक बनविताना त्यात थोडेफार बदल होत असतातच. ते बदल ठिक आहेत पण ह्यातील क्रिस किंगलच खरा सांताक्लॉज आहे हे सिद्ध करण्याकरीता जे कारण वापरले ते मला रिमेक मध्ये नाही आवडले पण मूळ १९४७ मधील चित्रपटातीलच आवडले. अजूनपर्यंतही निदान भारतात १९४७ च्या चित्रपटाची VCD/DVD मला मिळाली नाही. ती शोधण्याच्या प्रयत्नात आहे.

(चित्र स्त्रोतः IMDB)

जुलै २६, २०१३

आज आपण पाहूया, ईक्विटी लिन्क्ड् सेविंग स्किम अर्थात Equity Linked Savings Scheme (ELSS) बद्दल.

ELSS हा म्युच्युअल फंड मधील गुंतवणूकीचा प्रकार असून ह्यावर करसवलतही दिली जाते. ह्यात गुंतवलेली रक्कम ही त्या फंडच्या व्यवस्थापकाकडून आपल्या तर्फे शेअर मार्केट मध्ये गुंतविली जाते. त्यातील उतारचढावानुसार व्यवस्थापक  ह्या गुंतवणूकीवर लक्ष ठेवून मग त्यात बदल करत असतो. ह्यात मिळणारा नफा हा साधारणतः इतर गुंतवणूकींपेक्षा जास्त असू शकतो. पण शेअर बाजाराशी संलग्नित असल्याने ही गुंतवणूक खात्रीशीर नसते. नफा मिळूही शकतो अथवा गुंतविलेल्या रक्कमेवर नुकसानही होऊ शकते.
काही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक आणि ते बंद करणे ह्यातील मध्यम काळात लाभांश दिला जात असतो. तो लाभांशही करमुक्त असतो.

लाभांशावरून म्युच्युअल फंड आणि ELSS चे तीन प्रकार असतात.
१.  Dividend Payout (लाभांश परतावा) : ह्यात गुंतवणूकदाराला लाभांश स्वतःकडे मिळतो. ह्या प्रकारात त्या फंडची NAV त्या लाभांशाप्रमाणे घटली जाते.
२.  Dividend Reinvestment (लाभांश पुनर्गुंतवणूक) ह्यात गुंतवणूकदाराला मिळणारा लाभांश पुन्हा त्याच स्कीम मध्ये गुंतविले जातात. ह्या प्रकारातही त्या फंडची NAV त्या लाभांशाप्रमाणे घटली जाते. आणि ह्यात आणखी एक तोटा आहे की लाभांशाची ती रक्कम ELSS मध्ये गुंतविल्याने त्या तारखेपासून ३ वर्षांकरीता बांधली जाते.
३.  Growth: ह्या प्रकारात लाभांश दिला जात नाही. त्यामुळे ह्याचा NAV हा पहिल्या २ प्रकारांपेक्षा जास्त असतो.

मर्यादा: 
गुंतवणूकीस कमाल मर्यादा नाही. पण गुंतवणूकीवर करसवलत कमाल रू. १,००,०००/- पर्यंतच मिळते.

मुदतः
ह्यात पैसे गुंतवून ठेवण्यास मुदतीची मर्यादा नाही. परंतु गुंतवणुकीच्या तारखेपासून ३ वर्षे ही रक्कम बांधून ठेवली जाते. म्हणजेच ती रक्कम ३ वर्षे आपण काढू शकत नाही. ह्याला लॉक-इन पिरिअड म्हणतात. त्यानंतर केव्हाही रक्कम काढू शकतो.

गुंतवणूकीवर कर सवलत:
ELSS मध्ये गुंतविलेली रक्कम कलम 80C नुसार कमाल रू. १,००,०००/- पर्यंत करसवलतीस पात्र असते.

गुंतवणूकीवर कर सवलत मिळणार्‍या व्याज/लाभावर कर सवलतः
गुंतवणू़दाराला मिळालेला लाभांश हा करमुक्त असतो.

मुदतीनंतर मिळालेल्या रकमेवर कर सवलत :
  • इक्विटीमध्ये गुंतविलेल्या रकमेवर जो लाभ मिळतो तो १ वर्षानंतर घेतला असल्यास दीर्घकालीन भांडवल नफा असून Securities Transaction Tax (STT) भरलेला असल्यास हा नफा करमुक्त असतो.
  • १ वर्षाच्या आधीच रक्कम काढून घेतल्यास तो अल्पकालीन भांडवल असून त्यावर १५% दराने कर भरावा लागतो. ELSS मध्ये ठेवलेले पैशांवरील नफा त्यातील ३ वर्षांच्या बंधनामुळे आपोआपच दीर्घकालीन भांडवल नफा असतो आणि करमुक्त असतो.

जून २९, २०१३

मागील लेखनात भविष्य निर्वाह निधीबद्दल माहिती पाहिली. त्यातील गुंतवणूक ही प्राप्तीकर नियमाप्रमाणे करसवलतीस प्राप्त असते. पुढील काही लेखनात गुंतवणूकीचे असेच काही पर्याय पाहू ज्यात गुंतवणूकीवर अवलंबून करसवलत घेता येते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate - NSC)
सरकारतर्फे टपालखात्याद्वारे उपलब्ध असलेल्या बचतीच्या या योजनेत पैसे गुंतविण्याचा आणखी एक पर्याय आहे. HUF आणि Trust  वगळून इतर सर्व लोक ह्यात गुंतवणूक करू शकतात.  एखादी व्यक्ती स्वतः आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या अज्ञान मुलांच्या नावे NSC मध्ये किमान रू. १०० ठेवू शकतो. तसेच गरज पडल्यास कर्ज घेताना हे प्रमाणपत्र तारण म्हणूनही वापरता येते. ह्यावर मिळणारे व्याज करपात्र असले तरी ह्यावर स्त्रोतावर कर आकारणी अर्थात TDS आकारला जात नाही. गुंतवणूक करणार्‍याची ही जबाबदारी असेल की त्याने मिळालेले व्याज स्वतः आपल्या उत्पन्नात जोडून त्यावर कर भरावा.
ह्या बचत प्रमाणपत्रांवर मिळणारे व्याज हे दरवर्षी ठरविले जाते.

मर्यादा:
गुंतवणूकीस कमाल मर्यादा नाही.

मुदतः
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राकरीता दोन मुदतीच्या योजना आहेत.
१. पाच वर्षे: २०१३-१४ ह्या आर्थिक वर्षाकरीता व्याजाचा दर ८.५०% आहे.
२. दहा वर्षे: २०१३-१४ ह्या आर्थिक वर्षाकरीता व्याजाचा दर ८.८०% आहे.

गुंतवणूकीवर कर सवलत:
ह्यात गुंतविलेली रक्कम कलम 80C नुसार कमाल रू. १,००,०००/- पर्यंत करसवलतीस पात्र.

मिळणार्‍या व्याज/लाभावर कर सवलत :
मिळालेले व्याज करपात्र असले तरी पुन्हा गुंतविल्यामुळे त्यावर्षीच्या करमोजणीत पुन्हा कलम 80C प्रमाणे कर सवलतीस पात्र असते.

मुदतीनंतर मिळालेल्या रकमेवर कर सवलत :
  • मुदतीनंतर मिळालेले एकूण व्याज कर सवलतीस पात्र नसते. ते त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात जोडले जाऊन त्यानुसार कर मोजणी केली जाते.
ह्याबाबत अधिक माहिती टपाल खात्याच्या संकेतस्थळावर येथे मिळेल.

ज्येष्ठ नागरीक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme - SCSS)

ही योजना टपाल खात्यातर्फेच उपलब्ध असून सर्व ज्येष्ठ नागरीक ह्यात पैसे गुंतवू शकतात. साधारणतः ज्येष्ठ नागरीक ह्याअर्थी गुंतवणूकदाराचे वय ६० वर्षे किंवा जास्त असण्याची अट आहे.
परंतु स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या गुंतवणूकदारांकरीता वयाची मर्यादा ५५ वर्षे व वर अशी ठेवली आहे. पण ह्याकरीता निवृत्तीपासून एका महिन्यात ह्यात पैसे गुंतवावे लागतात.
मर्यादा:गुंतवणूकीस कमाल मर्यादा रू १५,००,०००/- (पंधरा लाख).

मुदतः पाच वर्षे. मुदतीनंतर पुन्हा ३ वर्षांकरीता मुदतवाढ घेता येते. २०१३-१४ ह्या आर्थिक वर्षापासून मिळणारे व्याज ९.२०% आहे.

गुंतवणूकीवर कर सवलत:
ह्यात गुंतविलेली रक्कम कलम 80C नुसार कमाल रू. १,००,०००/- पर्यंत करसवलतीस पात्र.
मिळणार्‍या व्याज/लाभावर कर सवलत :मिळालेले व्याज कर सवलतीस पात्र नसते. ते त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात जोडले जाऊन त्यानुसार कर मोजणी केली जाते. 

मुदतीनंतर मिळालेल्या रकमेवर कर सवलत :मुदतीनंतर मिळालेले एकूण व्याज कर सवलतीस पात्र नसते. ते त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात जोडले जाऊन त्यानुसार कर मोजणी केली जाते.
 
मिळणारे व्याज आर्थिक वर्षात १०००० पेक्षा जास्त झाल्यास त्यावर स्त्रोतावर कर आकारणी (TDS) केली जाते. 

ह्याबाबत अधिक माहिती टपाल खात्याच्या संकेतस्थळावर येथे मिळेल.

जून ०३, २०१३

काल संध्याकाळी मुंबई-ठाण्यात पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी बाजारात जाताना काळे ढग दिसले. अंदाज आला पाऊस पडणार आज. पण एवढ्या लवकर पडेल असे वाटले नव्हते.
दर पावसाळ्यात एक दृष्य नेहमी दिसते. काळे ढग, त्यासमोरून पांढरे पक्षी (बगळेच बहुधा) उडत जातात, त्यांवर सूर्यप्रकाश पडलेला असल्याने त्यांचा पांढरा रंग मस्त उठून दिसतो. हेच दृष्य कालही दिसले. कृष्णधवल :)

परत निघताना विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत होता. घरी वीज गेलेली आहे असे कळले होते.
मला हाच मुद्दा जाणून घ्यायचा आहे. पाऊस निदान(पहिला तरी) पडल्यावर घरांतील वीज का जाते?

महाविद्यालयात असताना वसतीगृहात राहतो होतो लोणी मध्ये. तिथेही हाच प्रकार पाहिला होता. बेंगलूरू ला राहत होतो तेव्हाही हाच प्रकार पाहिला होता. तिथे तसा मी जवळजवळ शहराच्या बाहेरच राहत होतो. ऑफिस घरापासून जवळच. संध्याकाळी/रात्री घरी जाताना पाऊस पडताना दिसला की आधी फोन करून मित्राला विचारायचो की आपल्या भागात वीज आहे का? नसली तर मग आरामात निघायचे, तेवढा वेळ मग ऑफिसमध्ये काम (जास्त वेळा तर टाईमपासच) करून मग निघायचे, वीज आल्यानंतर. :)

आता कालही तेच झाले तेव्हा हे सगळे आठवले आणि मी काहीही अंदाज न लावता पुन्हा तोच प्रश्न विचारतोय, "पाऊस पडल्यावर घरांतील वीज का जाते?" :)

मे २९, २०१३

असे म्हणतात की जाहिरातीवाचून उत्पादन विकणे म्हणजे एखाद्या मुलीला अंधारात डोळे मारणे.

अर्थातच ह्याच तत्वावर अर्ध्याहून अधिक जग चालत असेल, मुलीला डोळे मारणे ह्या नाही...तर जाहिरातबाजीच्या.


लहानपणापासूनच दूरदर्शन, आकाशवाणीवर (दोन्ही ढोबळ मानाने तंत्रज्ञान आणि संच म्हणा, त्यावर वेगवेगळ्या वाहिन्या नव्हत्या तेव्हा) कार्यक्रम पाहताना, ऐकताना मधे मधे जाहिरातींची सवय होती. त्यात एक संरचना होती. ठराविक वेळानंतरच जाहिराती असणार. म्हणजे कशा, तर कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आणि नंतर, किंवा थोडक्यात दोन कार्यक्रमांच्या मध्ये. शनिवार - रविवारी चित्रपट पाहताना एक मध्यांतर असायचे ते बातम्यांचे. तेव्हा पुन्हा त्या दोन प्रसारणांच्या मध्ये जाहिरात.

नंतर आले वारे चित्रपट चलचित्रफीतींचे (व्हिडिओ कॅसेट हो). त्या भाड्याने मिळायच्या, पण त्यातही चित्रपटाच्या सुरूवातीला, चित्रपटाच्या मध्येच जाहिराती सुरू झाल्या. भाड्याने कॅसेट घ्यायला गेलो की काही वेळा दुकानदार सांगायचा, ओरिजिनल प्रिंट आहे म्हणून. म्हणजेच चित्र/आवाजाचा दर्जा उत्तम आणि दुसरे म्हणजे त्यात जाहिराती नसणार.

त्यानंतर आले केबल टीव्ही. पण त्याकरीता उपग्रह वाहिन्या कारणीभूत होत्या. नुसते चित्रपट पाहण्याकरीता किंवा दाखवण्याकरीता कोणी एवढ्या वायरचे जाळे गुंतविले नसते. मग भाड्याने कॅसेट आणण्यापेक्षा केबलवर नवीन चित्रपट, किंवा जे लागतील ते पाहणे. ह्या सर्वांमध्ये जाहिरातींनी डोके वर काढायला सुरूवात केली होती.  त्यात कॅसेटमधील जाहिराती तर असायच्याच, पण मग स्थानिक दुकाने किंवा तत्सम जाहिराती येऊ लागल्या. जाहिरातींनी नंतर चालत्या कार्यक्रमाच्या पडद्यावर आक्रमण सुरू केले. खालची २० ते ३०% पट्टी जाहिरातींनी भरलेली, वरचीही थोडीशी पट्टी. त्यात प्रेक्षकांनी आपला चित्रपट शोधून पहायचा.
त्याच काळात, 'खुदा गवाह' चित्रपट सुरू होता केबलवर. इतर चित्रपटांत निदान एखादा प्रसंग किंवा दोन्-चार वाक्ये म्हटली पात्रांनी की जाहिरात दाखवायचे. पण ह्यांनी तर कहरच केला. एक वाक्य  तर सोडाच, मारामारीच्या दृष्यात एक मुक्का मारला की दाखव जाहिरात, एक लात मारली की दाखव जाहिरात.

उपग्रह वाहिन्यांनी कार्यक्रमात 'ब्रेक' सुरू केला. "मिलते है ब्रेक के बाद". असे म्हणणे आधी खेळ, स्पर्धा व तत्सम कार्यक्रमात आले. मग मालिका आणि चित्रपटांमध्येही. नंतर आपल्यालाही अंदाज यायला लागला की कार्यक्रमात आता केव्हा जाहिरात दाखवणार.

आता व्यावसायिकदृष्ट्या वाहिन्यांना आपला खर्च काढायचा म्हणजे जाहिरातीतून पैसा घेणार हे आलेच. पे चॅनल ची संकल्पना अशी ऐकली होती की त्यात ग्राहकांकडून पैसे घेतले असल्याने मग त्यात वाहिनीवर जाहिराती नसणार. पण एकंदरीत ती संकल्पनाचा मोडीत काढली गेली किंवा वाहिन्यांनी त्याला हरताळ फासला. इथे प्रेक्षकांकडून तर पैसे घेतातच पण वर जाहिरातींचा भडीमार.  तो भडीमार आता इतका झाला आहे की जाहिरातींचा कंटाळा येतो ते तर सोडाच, पण आजकाल जाहिरातींच्या मध्ये कार्यक्रम दाखवतात असे दिसायला लागले आहे. १५ मिनिट कार्यक्रम आणि १० मिनिटे जाहिरात. त्यात  त्यांचा प्राईम टाईम म्हणजे विचारायलाच नको. ते प्रमाण ५ मिनिट कार्यक्रम आणि १० मिनिटे जाहिरात असेही जाते. मग त्यांनी लोकांना आपल्या कार्यक्रम पाहण्याकरीता (खासकरून चित्रपट) वन ब्रेक मूव्ही, नो ब्रेक मूव्ही, ठराविक मिनिटांच्या जाहिराती म्हणजेच ब्रेक सुरू झाला की तेव्हाच सांगणार १ मिनिटांत परत. २ मिनिटांत परत. बरे, जाहिरात दाखवण्याकरीता चित्रपटातले प्रसंग कापतील पण जाहिराती कमी नाही करणार.

तसे म्हटले तर टेलिशॉपिंग अर्थात दूरदर्शनवर उत्पादन पाहून त्याची खरेदी फोनवरून करणे ह्याकरीताही आता नवीन वाहिन्या निघाल्यात, परंतु त्या जाहिराती इतर वाहिन्यांवरही दाखवल्या जातातच. ती ही एवढ्या प्रमाणात की B4U, Zee च्या काही चित्रपट वाहिन्या ह्यांवर तर ५ मिनिटे चित्रपट दाखवून एकच जाहिरात प्रत्येक ब्रेक मध्ये. जणू काही ती जाहिरात सतत पहायचा कंटाळा नको म्हणून मध्ये चित्रपट आहे.

तुम्ही म्हणाल मी एवढे पाल्हाळ का लावले आहे? तर TRAI ने काढलेला नवीन नियम. दूरदर्शन वाहिनीवर एका तासात १२ मिनिटांच्यावर जाहिराती दाखवण्यास निर्बंध घातले आहे. १० मिनिटे जाहिराती आणि २ मिनिटे कार्यक्रमांची जाहिरात. चांगला नियम अर्थात आपण प्रेक्षकांकरीता. खरे तर TRAI ने ह्या नियमाबद्दल २००७ मध्येच जाहीर केले होते. पण ते अंमलात आणायला एवढा वेळ का लागला ते कळत नाही. माझ्या आठवणीप्रमाणे जानेवारी २००७ मध्ये ह्याबद्दल ऐकले होते. त्यानंतर आता ऑक्टोबर २०१३ पर्यंत म्हणजे जवळपास पावणे सात वर्षांनी त्याचा वापर होईल असे दिसते. तरीही वाहिन्यांनी डिसेंबर २०१३ पर्यंतचा वेळ मागितला आहे. तेव्हा तरी ह्याचे पालन होते की नाही ते पाहू.

अजूनही एक गोष्ट तुम्ही अनुभवली असेलच. कार्यक्रम सुरू असताना मध्येच जाहिरात आली की तिचा आवाज खूप मोठा असतो. अचानक आवाज वाढल्याने कानांना त्रास होईल असा. आधी वाटायचे कार्यक्रमाचा आवाज कमी असतो आणि जाहिरातींचा मोठा म्हणून असे असेल. पण प्रत्येक कार्यक्रमात असे कसे असेल? ते मुद्दामच तसे ठेवतात असे कुठेतरी ऐकले/वाचले होते. पण ह्यामागचे नेमके कारण कळले नाही.
पण एक दिसले. अमेरिका आणि कॅनडामध्ये ह्याविरोधातही त्यांना नियम बनवावे लागले. 'जाहिरातींचा आवाज हा कार्यक्रमांच्या आवाजाएवढाच किंवा त्यापेक्षा कमी असावा'. हा नियम आपल्याकडेही लवकरात लवकर यावा अशी अपेक्षा. शक्यतोवर आता आलेल्या ह्या नवीन नियमावलीतच.

मे २७, २०१३

आत्तापर्यंत आपण कर मर्यादा, भत्त्यांवरील करसवलत ह्याबद्दल पाहिले. ह्यापुढे आपण गुंतवणूकीचे पर्याय आणि त्यांची कर संरचना ह्याबद्दल पाहूया.

भविष्य निर्वाह निधी (Provident Fund - PF)

सरकारी नियमानुसार दरमहा मूळ पगाराच्या (आणि महागाई भत्ता) १२% रक्कम कर्मचारी आणि त्याची मालक आस्थापना दोघांकडून कर्मचार्‍याच्या भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ खात्यात जमा केली जाते. ह्यातील मालक आस्थापनेकडून जमा रक्कम कर्मचार्‍याच्या पगारात धरली जात नसल्याने त्यात कर संरचनेचा प्रभाव पडत नाही, किंवा ती प्राप्ती करमुक्त असते. कर्मचार्‍याच्या पगारातून कापलेली रक्कम कलम 80C नुसार करसवलतीस पात्र असते. त्यामुळे सर्वाधिक सोप्या आणि लोकप्रिय असलेल्या कलम 80C मधील गुंतवणूकीबद्दल पर्याय शोधताना, आधी पीएफ ची रक्कम त्यातून वजा करावी व उरलेली मर्यादा इतर पर्यायांकरीता वापरावी.

मर्यादा:
  • फक्त नोकरीतून पगार मिळत असलेल्या कर्मचार्‍यांकरीता. व्यवसाय करणार्‍यांकरीता ह्याचा फायदा नाही.
  • महिन्याला (मूळ पगार + महागाई भत्ता)च्या १२% रक्कम.
  • कलम 80C नुसार करसवलत. त्यामुळे वार्षिक कमाल रू. १,००,०००/- एवढी रक्कम करसवलतीस पात्र.
मुदत:
नोकरीतून निवृत्तीपर्यंत.

गुंतवणूकीवर कर सवलत: 
  • ह्यात गुंतविलेली रक्कम कलम 80C नुसार कमाल रू. १,००,०००/- पर्यंत करसवलतीस पात्र.
मिळणार्‍या व्याज/लाभावर कर सवलत :
  • मिळणारे व्याज पुन्हा गुंतविले जात असते. ह्यावर कर लागू होत नाही.
  • मुदतपूर्व रक्कम काढल्यास कर लागत नाही, पण कमीत कमी ५ वर्षे ते खाते सुरू असले पाहिजे. दुसर्‍या शब्दांत, एखाद्या कंपनीत कमीत कमी ५ वर्षे  नोकरी केली असल्यास, नंतर जर पीएफ खात्यातून रक्कम काढल्यास त्यावर कर लागत नाही. ५ वर्षांआधी काढल्यास कर भरावा लागतो.
मुदतीनंतर मिळालेल्या रकमेवर कर सवलत :
  • मुदतीनंतर काढलेली संपूर्ण रक्कम (व्याजासहीत) करमुक्त असते.
____________________________________________________________________________

स्वेच्छा भविष्य निर्वाह निधी (Voluntary Provident Fund - VPF)

नियमांनुसार कर्मचारी आणि त्याचे मालक ह्यांना कर्मचार्‍याच्या भविष्य निर्वाह निधीत १२% रक्कम जमा करावी लागते. परंतु कर्मचार्‍याची इच्छा असल्यास तो ह्याहून अधिक रक्कम भविष्य निर्वाह निधी  मध्ये जमा करू शकतो. त्यास स्वेच्छा भविष्य निर्वाह निधी ( Voluntary Provident Fund - VPF) असे म्हणतात. VPF मध्ये गुंतवणूकीस कर्मचार्‍याचा मालक बांधिल नाही. त्यामुळे ह्यात फक्त कर्मचार्‍याच्या पगारातूनच निधी कापला जातो.

VPF चे इतर नियम PF सारखेच आहेत. फक्त ह्याची कमाल मर्यादा कर्मचार्‍याच्या मूळ पगाराच्या १००% पर्यंत एवढीच आहे. (पण १२% आधीच PF मध्ये असल्याने ८८%)
____________________________________________________________________________

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund - PPF)

भविष्य निर्वाह निधीत (PF) सर्वच व्यक्तींना पैसे गुंतविता येत नसले तरी अशीच सुविधा सर्वांकरीता 'सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी'द्वारे सरकारने उपलब्ध करून दिली आहे. ठराविक राष्ट्रीयीकृत बँकांच्या निवडक शाखांत आणि ठराविक खाजगी बँकांत किंवा ठराविक टपाल कार्यालयात एखाद्या व्यक्तीस सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे खाते उघडता येते. प्रत्येकी एकच खाते उघडण्याची परवानगी मिळते.

मर्यादा:

  • प्रत्येक आर्थिक वर्षात किमान रू. ५००/- भरून खाते सुरू ठेवावे लागते.
  • प्रत्येक आर्थिक वर्षात कमाल १२ वेळा पैसे भरता येतात.
  • प्रत्येक व्यक्तीला कमाल एकच खाते उघडता येते. परंतु गरज पडल्यास ते दुसर्‍या शाखेत किंवा बँकेत स्थानांतरीत करू शकतो. पण स्वत:च्या अज्ञान मुलांच्या नावाने अतिरिक्त खाते उघडण्यास परवानगी आहे.
मुदत:
 १५ वर्षे. त्यानंतर ५ -५ वर्षांकरीता मुदत वाढवू शकतो. पहिली १५ वर्षे किंवा मुदत वाढ घेतल्यास त्या मुदतीत खाते बंद करता येत नाही. परंतु ७व्या वर्षापासून वर्षात एकदा काही रक्कम काढता येते.

गुंतवणूकीवर कर सवलत: 

  • ह्यात गुंतविलेली रक्कम कलम 80C नुसार कमाल रू. १,००,०००/- पर्यंत करसवलतीस पात्र. ह्यात स्वत:चे खाते आणि मुलांची खाती असल्यास ती सर्व अशी सर्वांची एकूण रक्कम धरली जाते.
मिळणार्‍या व्याज/लाभावर कर सवलत :
  • मिळणारे व्याज पुन्हा गुंतविले जात असते. ह्यावर कर लागू होत नाही.
मुदतीनंतर मिळालेल्या रकमेवर कर सवलत :
  • मुदतीनंतर काढलेली संपूर्ण रक्कम (व्याजासहीत) करमुक्त असते. 
इतर मुद्दे:
  • PPF मध्ये रक्कम जमा करताना शक्य असल्यास महिन्याच्या ५ तारखेच्या आधी जमा करावेत. कारण, महिन्याची ५ तारीख किंवा शेवटची तारीख ह्यात जी शिल्लक कमी असते त्यावर व्याज मोजले जाते.
  • जरी एखाद्या व्यक्तीने वार्षिक ५०,००० किंवा इतर मोठी रक्कमही खात्यात भरायचे ठरविले असेल, परंतु काही कारणांनी ते जमले नाही, तरी निदान ५०० रू.  प्रत्येक खात्यात जमा करावे, जेणेकरून त्या खात्यावरील सुविधा बंद होणार नाहीत.
अद्यतन(३०/०५/१३):  भविष्य निर्वाह निधीचे १२% हे मूळ पगार आणि महागाई भत्ता ह्यांची एकूण बेरजेचे असतात. 

मे २३, २०१३

पगारात मिळणारे आणखी काही भत्ते, ज्यावर कर सवलत ग्राह्य धरली जाते.

वैद्यकीय खर्च भत्ता (Medical Reimbursement)
ह्या भत्त्यानुसार वैद्यकीय खर्चावर करसवलत मिळते. ह्याची सहसा आरोग्य विम्यातून मिळालेल्या परताव्याशी गल्लत होऊ शकते. ह्या भत्त्यानुसार आपण केलेला खर्च एकूण मिळकतीतून वजा केला जातो ज्यामुळे कर कमी होतो. आरोग्य विम्यात आपण केलेला खर्च विमा कंपनीकडून (त्यांच्या ठराविक मर्यादेत) परत मिळतो.

मर्यादा:

आर्थिक वर्षात कमाल रू. १५०००/- एवढ्या रकमेवर ह्या भत्त्यानुसार कर सवलत मिळते.
स्वतः, अवलंबून असलेले कुटुंबिय ह्यांच्यावरील खर्च समाविष्ट केला जाऊ शकतो.

आवश्यक कागदपत्रे:
डॉक्टरची फी, औषधांवरील खर्च, वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या ह्या सर्वांच्या पावत्या आपल्या कार्यालयात जमा केल्यानंतरच ह्याचा लाभ घेता येतो.
सहसा मूळ पावत्याच जमा कराव्या लागतात.

जेवण भत्ता (Meal Allowance)/फूड कूपन (Food Coupon)
दररोजच्या जेवणाकरीता येणारा खर्च करण्याकरीता जेवण भत्ता/फूड कूपन मिळत असल्यास त्यावर कर सवलत ग्राह्य असते.

मर्यादा:

दररोजचे प्रति जेवणाचे ५० ह्याप्रमाणे  प्रतिदिन रू. १००/-. महिन्याचे २२ कामाचे दिवस धरून प्रति महिना २२००/- एवढी रक्कम करमुक्त असते.

आवश्यक कागदपत्रे:
बहुतेक कार्यालयांत वेगवेगळ्या कंपनीचे फूड कूपन दिले जातात, किंवा मग केलेल्या खर्चाच्या पावत्या कार्यालयात जमा केल्यास हा परतावा मिळतो.

मे १५, २०१३

आता आपण पगारात मिळणारे काही भत्ते आणि त्यावर मिळणारी कर वजावट ह्याबद्दल माहिती पाहूया.

१. वाहतूक भत्ता (Conveyance Allowance): 

कर्मचार्‍याचे राहण्याचे ठिकाण आणि काम करण्याचे ठिकाण ह्यातील प्रवासाकरीता भत्ता हा वाहतूक भत्ता मानला जातो. जर पगारात दाखवला असेल तरच हा भत्ता करमुक्त म्हणून मानला जातो.

मर्यादा:
 दरमहा कमाल रू. ८००/- म्हणजेच वर्षात कमाल रू ९६००/- करमुक्त असतात.

आवश्यक कागदपत्रे:
 ह्याचा लाभ घेण्याकरीता कोणतेही कागदपत्रे, पावत्या जमा करण्याची आवश्यकता नसते.

२. घर भाडे भत्ता (House Rent Allowance):

स्वत:ची जागा नसेल आणि निवासासाठी भाडे भरत असेल अशा व्यक्तीला मिळणारा घरभाडे भत्ता करमुक्त मिळू शकतो. पण जर पगारात दाखवला असेल तरच हा भत्ता करमुक्त म्हणून मानला जातो.

मर्यादा: खालीलपैकी जी कमीत कमी रक्कम असेल ती करमुक्त असते.
अ. मूळ (बेसिक) पगाराच्या ४०% रक्कम. राहण्याचे शहर मुंबई, कोलकाता, दिल्ली व चेन्नई ह्यापैकी असल्यास ५०%.
ब. प्रत्यक्षात मिळणारा घरभाडे भत्ता
क. मूळ (बेसिक) पगाराच्या १०% रक्कमेच्या वर असलेली घरभाड्याची रक्कम. किंवा सोप्या शब्दात, घरभाडे - मूळ पगाराचे १०%
आवश्यक कागदपत्रे:
घरभाड्याची पावती आणि/किंवा घरभाडे करारनामा (Rent Agreement)अद्यतनः नवीन नियमानुसार, वार्षिक घरभाडे रू. १,००,०००/- पेक्षा जास्त असल्यास घरमालकाचा PAN देणे आवश्यक आहे.

इतर मुद्दे:
  • भत्ता घेणारी व्यक्ती जर स्वतःच्या घरात राहत असेल तर ह्याचा लाभ घेता येत नाही.
  • एखादी व्यक्ती जर आपल्या आई-वडिल, भाऊ बहिणीच्या मालकीच्या घरात राहत असेल तर त्यांना भाडे देऊनही घरभाडे भत्ता करमुक्त करता येतो.
३. सुट्टी प्रवास भत्ता (Leave Travel Allowance):
कामातून सुट्टी घेऊन कुटुंबासोबत गावी जाण्यासाठी आणि/किंवा पर्यटनाचा लाभ घेण्यासाठी कार्यालयाकडून सुट्टी आणि प्रवास भत्ता मिळतो. हा भत्ता काही मर्यादेपर्यंत करमुक्त असतो.

मर्यादा:
 कार्यालयाने ठरविल्याप्रमाणे कर्मचार्‍याच्या पगारावर अवलंबून आहे.
अ. भत्ता मिळणारी व्यक्ती आणि त्याचे कुटुंबिय (नवरा/बायको, २ मुले, आणि आई, वडील, भाऊ, बहीण जे त्यावर अवलंबून आहेत)  ह्यांच्या प्रवासाचा खर्चच ह्या भत्त्यात ग्राह्य धरला जातो.
ब. ती व्यक्ती स्वतः प्रवास करत असल्यासच ह्या भत्त्याचा करमुक्त लाभ घेता येतो.
क. भारतातील प्रवास केलेल्या कोणत्याही ठिकाणापर्यंतचे कमीत कमी अंतरापर्यंत जेवढा प्रवास खर्च लागतो तोच मोजला जातो.
ड. इकॉनॉमी दर्जाचा विमानप्रवास, प्रथम श्रेणीचा रेल्वे प्रवास आणि पहिल्या अथवा डिलक्स दर्जाच्या बसप्रवासासाठीच ही सवलत लागू करण्यात आली आहे
इ. ४ वर्षांत २ वेळा हा लाभ घेता येतो.

आवश्यक कागदपत्रे:

प्रवासाची तिकीटे, पावत्या, विमान प्रवास केला असल्यास बोर्डिंग पासही जमा केल्यानंतरच ह्याची करमुक्त मोजणी करता येते.

४. मुलांचा शिक्षण भत्ता (Children Education Allowance):
मुलांच्या शिक्षणाकरीता केलेला खर्च म्हणून हा भत्ता देण्यात येतो.
मर्यादा: प्राप्तीकर नियमांनुसार प्रत्येक व्यक्तीला २ मुलांसाठी प्रत्येकी रू. १०० प्रति महिना करमुक्त असतात.

आणखीही काही भत्ते असतात जे प्रत्येक कार्यालयानुसार ठरविले जातात जसे दूरध्वनी, पुस्तके, वाहनचालक भत्ता वगैरे. पण त्याची पूर्ण माहिती सध्या माझ्याकडे उपलब्ध नाही. 


मे ०६, २०१३




घरातील विजेच्या प्लग सॉकेटमध्ये मुलाने हात लावू नये, काही टाकू नये जेणेकरून त्याला विजेचा धक्का न लागो, म्हणून बाजारात त्यावर लावायला टोपी, झाकण शोधत होतो. शेवटी एका संकेतस्थळावर ते दिसले तर लगेच मागवले.



आज घरी सामान आल्यावर ते प्लॅस्टीकचे झाकण मस्तपैकी स्चिच सॉकेट वर लावले. त्यांनी ते काढण्याकरीता एक चावी ही दिली आहे, ज्याने ते खेचून काढावे. एवढे चांगले वाटले नाही. पण काहीतरी मिळाले.

मुलाने ते पाहिले. पलंगावर चढला. नुसत्या हातांनी ते काढून हातात घेतले. आता त्याची चावी घेऊन प्लग सॉकेट मध्ये टाकण्याचा तो प्रयत्न करत आहे. :)

चला, नवीन काहीतरी मार्ग शोधूया. ;)

मे ०४, २०१३

गेले काही वर्षे सुट्ट्या पैशांची अडचण पाहण्यात येते आहे. अर्थात ती खरी असेलही,  पण कितपत त्याचा अंदाज नाही.


काही वर्षांपूर्वी चार आण्यांची नाणी दुकानदारांनी घेणे/देणे स्वतःहून बंद केले होते. बसमध्येही वाहक प्रवाशांच्या नावाने शंख करतात की सुट्टे पैसे द्या म्हणून. पण त्यावेळी बेस्टचे वाहक ती नाणी नाकारत नव्हते. नंतर रिझर्व बँकेने २५ पैशांची नाणी अधिकृतरित्या चलनातून बंद केली आणि त्यांनी सांगितले की सर्व किंमती ५० पैशांच्या गुणांकात असावीत. पण तरीही अजूनही भरपूर गोष्टींच्या किंमती इतर पैशांमध्ये दर्शविलेल्या असतात. ह्यामुळे २५ रू. ३५ पैशाची गोष्ट २५.०० रूपये किंवा २६.०० रुपयांना विकली जाते. काही लोक रू. २५.५० ही घेत असतील. ह्यात नफा तोटा सोडून देऊ. जास्त कोणी लक्ष देत नाही. मूळ किंमतीवर विविध टक्केवारीत विविध प्रकारचे कर लागून एकूण किंमत ५० पैशांशिवाय इतर पैशांत येत असेल. असो.

भरपूर दुकानांत तर किंमतीचा आकडा सोपा करण्यासाठी दुकानदार देय किंमतीतून कराच्या टक्क्यांनी एखाद्या गोष्टीची मूळ किंमत आणि कर असे विभाजन करतात, आणि पावतीत लिहितात. हे ही ठीक आहे. ते होते अर्थात मोठ्या रकमेच्या गोष्टींसाठी.

पण एक प्रकार सुरू झाला आहे तो म्हणजे, ५० पैसे किंवा १ रू. परत द्यायच्या ऐवजी चॉकलेट, गोळ्या देणे. हा प्रकार तर एवढा वाढला आहे की काही हॉटेल, दुकानांत तर सुट्ट्या १ ते ५ रूपयांऐवजी चॉकलेट देतात आणि कारण सांगतात की सुट्टे नाहीत. मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण १-२ रूपयांऐवजी चॉकलेट दिले तर तुम्ही घ्याल का? आम्हालाही तर सुट्ट्या पैशांची अडचण होत असते. :)

असेच वेगळे मागणीदार म्हणजे रिक्षा/टॅक्सी चालक. त्यांच्याकडेही हीच अडचण असते. अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे ती खरी असतेही, पण कितपत तो एक मुद्दा आहे.

ह्या सर्वांवर शक्कल वापरून आता एअरटेल ने नवीन जाहिराती काढल्या आहेत. सुट्टा एक रूपया देण्याऐवजी मोबाईलवर व्हिडीओ/गाणी दाखवणे.
ती ग्राहकाच्या फायद्याची की दुकानदार/रिक्षा चालकांच्या, ते माहित नाही. मोबाईल कंपनीच्या फायद्याची नक्कीच.

पण दुकानदारांनी खरोखरच ही गोष्ट वापरात आणली नाही म्हणजे खूप झाले. ;)

मे ०३, २०१३

साधारणतः उत्पन्नावर मिळणारी करातील वजावट ही दोन प्रकारे असते.

१. पगारात दिलेले विशिष्ट भत्ते : वेगवेगळ्या कंपनी आपल्या नियमांनुसार, सोयीनुसार कर्मचार्‍यांना काही प्रकारचे भत्ते देत असतात. त्यातील काही भत्त्यांवर प्राप्तीकर नियमांनुसार थेट वजावट मिळते. पण ह्यातही कर्मचार्‍याने तो भत्ता त्या कारणाकरीता वापरला आहे ह्याचे पुरावे द्यावे लागतात.

उदा.
  • घरभाडे भत्ता - घर भाड्याची पावती आणि/किंवा भाडे करारनामा (Rent Agreement) सादर करावे लागते.
  • रजेच्या काळातील प्रवास भत्ता - केलेल्या प्रवासाची तिकिटे सादर केल्यानंतरच ह्या भत्त्यावर वजावट मिळते.


२. गुंतविलेल्या रक्कमेवर कर वजावट: एखाद्याने उत्पन्नातील काही रक्कम ठराविक प्रकारच्या साधनांमध्ये गुंतविल्यास त्या रकमेवर पूर्ण (किंवा ठराविक टक्क्यांनी) वजावट

उदा.
  • जीवन विम्याकरीता भरलेल्या हप्त्यावर मिळणारी वजावट
  • ५ वर्षांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतविलेल्या रक्कमेवर मिळणारी वजावट.

ह्याचप्रकारे गुंतविलेल्या रक्कमेवर, आणि त्या गुंतवणूकीवर मिळणारे उत्पन्न ह्यावर कर सूट ही तीन प्रकारांत विभागलेली आहे.
बहुतेक वेळा तुम्ही EEE(Exempt-Exempt-Exempt) किंवा EET(Exempt-Exempt-Tax) हे शब्दप्रकार ऐकले असतील. ते ह्याच सवलतीबद्दल आहेत.

१. गुंतविलेल्या रक्कमेवर कर वजावट आहे की नाही. (पहिला E/T)
२. त्या गुंतवणूकीवर मिळणारे व्याज, किंवा इतर उत्पन्न ह्यावरील कर सूट (दुसरा E/T)
३. त्या गुंतवणूकीतील पैसे पूर्ण काढल्यावर (मध्येच बंद करून किंवा मुदत संपल्यावर) मिळणार्‍या रक्कमेवरील कर सूट (तिसरा E/T)

आपण करत असलेल्या गुंतवणूकी मुख्यत्वे खालील प्रकारात येतात
Exempt-Tax-Tax
Exempt-Exempt-Tax
Exempt-Exempt-Exempt
आणि
Tax-Exempt-Exempt (प्रथमतः गुंतवणूकीवर कर सवलत नसल्याने पुढील नफा करमुक्त असण्याची शक्यता कमी दिसते, पण त्याचीही काही उदाहरणे आपण पुढील भागांत पाहू)

(क्रमशः)

मे ०२, २०१३

सर्वात प्रथम आपण उत्पन्नाचे स्त्रोत आणि त्यावरील कर मोजणी पाहू.

१. पगारातून मिळणारे उत्पन्न.
२. घर मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न.

३. व्यवसाय वा उद्योगातून मिळणारे उत्पन्न
४. भांडवली नफा
५. अन्य स्रोतांपासून मिळालेले उत्पन्न 


आर्थिक वर्षात (Financial year) म्हणजेच १ एप्रिल ते ३१ मार्च ह्या काळातील वरील सर्व स्त्रोतांतून मिळालेल्या उत्पन्नाची बेरीज केल्यावर जी संख्या मिळते ते एखाद्या व्यक्तीचे त्या आर्थिक वर्षाचे एकूण उत्पन्न म्हणून मोजले जाते.

ह्यावरील कर 
मोजणी कशी असेल?
 

कर आकारणीकरीता आयकर विभागाने वयानुसार ३ गट ठेवले आहेत.
हा तक्ता आर्थिक वर्ष २०१३-१४ करीता आहे. 

१. वय ६० वर्षांपेक्षा कमी.
एकूण उत्पन्न (रू.)
कर (%)
शिक्षण अधिभार (%)
अधिभार(%)
कर सूट (रू.)
० - २,००,०००
२,००,००१ - ५,००,०००
१०
२,०००
५,००,००१ - १०,००,०००
२०
१०,००,००१ - १,००,००,०००
३०
१,००,००,००१ पेक्षा जास्त
३०
१०



२. वय ६० वर्ष किंवा जास्त पण ८० वर्षांपेक्षा कमी .
एकूण उत्पन्न (रू.)
कर (%)
शिक्षण अधिभार (%)
अधिभार(%)
कर सूट (रू.)
० - २,५०,०००
२,५०,००१ - ५,००,०००
१०
२,०००
५,००,००१ - १०,००,०००
२०
१०,००,००१ - १,००,००,०००
३०
३ 
१,००,००,००१ पेक्षा जास्त
३०
१०

३. वय ८० वर्ष किंवा जास्त
एकूण उत्पन्न (रू.)
कर (%)
शिक्षण अधिभार(%)
अधिभार(%)
कर सूट (रू.)
० - २,००,०००
 -
२,००,००१ - ५,००,०००
-
५,००,००१ - १०,००,०००
२०
 -
१०,००,००१ - १,००,००,०००
३०
 -
१,००,००,००१ पेक्षा जास्त
३०
१०
 -


कर मोजणीची उदाहरणे:
१.
श्री. अजय - वय ४६ वर्षे.
उत्पन्न ४, ५०, ०००/-

तक्ता: १.

पहिले २ लाख - कर नाही.

बाकी उत्पन्नः ४,५०,००० - २,००,००० = २, ५०,०००.
ह्यातील सर्व उत्पन्नावर १०%  दराने कर आकारला जाईल. म्हणजेच कर = २५,०००.

एकूण कर = २५,०००/-

नवीन नियमानुसार ह्यांना २००० रू कर सूट दिली जाईल. म्हणून कराची रक्कम= २३,०००/-
शिक्षण अधिभार ३% = २३,००० x ३% = ६९०/-

भरावयाचा एकूण कर = २३,००० + ६९० = रू. २३,६९०/-

______________________________________________________________

. श्री. अजय - वय ४६ वर्षे.
उत्पन्न ७, ५०, ०००/-

तक्ता: १.

पहिले २ लाख - कर नाही.

बाकी उत्पन्नः ७,५०,००० - २,००,००० = ५, ५०,०००.
ह्यातील ३,००,००० उत्पन्नावर १०%  दराने कर आकारला जाईल. म्हणजेच कर = ३०,०००.

बाकी उत्पन्नः ५,५०,००० - ३,००,००० = २,५०,०००.
ह्यावर २० % दराने कर आकारला जाईल. म्हणजेच कर = ५०,०००

एकूण कर = ३०,०००+५०,००० = ८०,०००/-

एकूण उत्पन्न ५ लाखांच्या वर असल्याने नवीन कलम नुसार ह्यांना २००० रू कर सूट दिली जाणार नाही.

शिक्षण अधिभार ३% = ८०,००० x ३% = २४००/-

भरावयाचा एकूण कर = ८०,००० + २४००= रू. ८२,४००/-

____________________________________________________________
१. श्री. विजय - वय ६६ वर्षे.
उत्पन्न ४, ५०, ०००/-

तक्ता: 
. 

पहिले २ लाख - कर नाही. 

बाकी उत्पन्नः ४,५०,००० - २,५०,००० = २, ००,०००.
ह्यातील सर्व उत्पन्नावर १०%  दराने कर आकारला जाईल. म्हणजेच कर - २०,०००.

एकूण कर = २०,०००/-

नवीन नियमानुसार ह्यांना २००० रू कर जमा दिली जाईल. म्हणून कराची रक्कम= १८,०००/-

शिक्षण अधिभार ३% = १८,००० x ३% = ५४०/-

भरावयाचा एकूण कर = १८,००० + ५४० = रू. १८,५४०/-

__________________________________________________________
२. श्री. विजय - वय ६६ वर्षे.
उत्पन्न ७, ५०, ०००/-

तक्ता: 
२. 

पहिले २.५ लाख - कर नाही. 

बाकी उत्पन्नः ७,५०,००० - २,५०,००० = ५,००,०००.
ह्यातील २,५०,००० उत्पन्नावर १०%  दराने कर आकारला जाईल. म्हणजेच कर - २५,०००.

बाकी उत्पन्नः ५,००,००० - २,५०,००० = २,५०,०००.
ह्यावर २० % दराने कर आकारला जाईल. म्हणजेच कर - ५०,०००

एकूण कर = २५,०००+५०,००० = ७५,०००/-

एकूण उत्पन्न ५ लाखांच्या वर असल्याने नवीन नियमानुसार ह्यांना २००० रू कर सूट दिली जाणार नाही.

शिक्षण अधिभार ३% = ७५,००० x ३% = २२५०/-

भरावयाचा एकूण कर = ७५,००० + २२५०= रू. ७७,२५०/-

(क्रमशः)


इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter