जानेवारी ३१, २०१०

गेल्या रविवारी हरभर्‍याच्या झाडावर चढल्यानंतर आज झाडावरचा शेवटचा दिवस.

ब्लॉग माझाच्या पारितोषिक वितरणाचे चित्रीकरण गेल्या रविवारी झाले. आणि आत्ताच आलेल्या बातमीनुसार (फोन हो..) आज ३१जाने. २०१० ला रात्री ९:३० वाजता 'स्टार माझा' वर दाखवण्यात येणार आहे.

एपिसोड रेकॉर्ड करायचा प्रयत्न करेनच. झाल्यावर त्याचा दुवा ही देईन. पण थेट दूरदर्शनवर पहायला विसरू नका.

जानेवारी २८, २०१०

देव काका, घारे काका आणि अनिकेत समुद्र ह्यांनी 'ब्लॉग माझा'च्या पारितोषिक वितरणाबद्दल आधीच लिहिले आहे. त्यामुळे पुन्हा तेच तुम्हाला वाचावयास मिळेल हे खरे, पण माझ्या दृष्टीकोनातून. (जमेल तेवढी पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न केला आहे.)

नोव्हें ०९ मध्ये 'ब्लॉग माझा'चा निकाल जाहीर झाला. त्यानंतर वेध होते पारितोषिक वितरणाचे. खरंतर सह्याद्री किंवा मुंबई दूरदर्शनवरील फोन-इन कार्यक्रमांमध्ये प्रश्न विचारून माझे नाव मी दूरदर्शनच्या पडद्यावर पाहिलेही होते, लोकांनीही माझे प्रश्न ऐकले होते. पण तो प्रकार वेगळा आणि हा वेगळा. तिथे बोलावून वाहिनीवर आपले नाव आणि स्वतःचा चेहरा दाखवणार ह्याचा आनंद होताच. पण त्यापेक्षा जास्त आकर्षण होते श्री. अच्युत गोडबोले ह्यांना भेटण्याचे. त्यांची ३ पुस्तके वाचलेली आहेत. लोकप्रभामध्ये त्यांचे उत्तम लिखाण वाचत असतो आणि मुख्य म्हणजे ते आमच्याच क्षेत्रातले तज्ञ. त्यांनी माझा ब्लॉग निवडला आणि पुन्हा त्यांच्याच हस्ते प्रमाणपत्रही मिळणार होते. मग का नाही आनंद वाटणार? आणि पहिल्यांदा होणार्‍या गोष्टीचे अप्रूप असतेच.

तसे म्हटले तर पडद्यावरील किंवा मागची हालचाल थोडीफार जवळून पाहिलीच होती. चित्रपटाचे चित्रीकरण पाहणे तर भरपूर वेळा झाले होते. पण स्वतःबद्दल म्हणायचे, तर शाळेत असताना नाटकात भाग घेतला होता. ते नाटक शाळेच्याच स्नेहसंमेलनाकरीता जी नाटके झालीत (नाटकं करतोय मधील नाटकं नव्हेत ;) ) त्यात एक होते. त्यांनतर तेच नाटक आंतरशालेय स्पर्धेतही पहिले आले होते. दोन्ही प्रयोग दिनानाथ नाट्यगृहात झाले होते. त्यायोगाने दिनानाथ नाट्यगृहाचे मेकअप रूम, विंग आतून पाहता आले. पडदा कसा हलवतात, प्रकाशयोजना कशी होते ते ही पाहण्याचा अनुभव आला. तसेच TRP च्या सॉफ्टवेअरवर काम करताना सुरूवातीला काही वाहिन्यांच्या कार्यालयातही जाण्याचा योग आला होता. त्यामुळे त्या कार्यालयाबद्दल आकर्षण कमी झाले होते. पण एखाद्या वाहिनीच्या स्टुडियोमध्ये जाऊन कॅमेर्‍यासमोर उभे राहीन असे वाटले नव्हते. 'ब्लॉग माझा' स्पर्धेमुळे ते झाले.

असो, आता हरभर्‍याच्या झाडावरून खाली उतरतो आणि पुढे वळतो.

हं.. तर बुधवारी प्रसन्न जोशींनी विपत्र पाठवून रविवारी चित्रीकरण होणार असल्याचे सांगितले. आम्हा ब्लॉगर्सपैकी कोण कुठे आहे नेमके माहित नव्हते आणि कार्यालयीन व्यापामुळे जास्त वेळ देता आला नाही. तरी देवकाकांना विचारून ठेवले. आपण महालक्ष्मी रेल्वे स्थानकावर भेटू असे सांगितले. आम्ही (मी आणि बायको) घरून निघालो १० वाजता. अंदाजाप्रमाणे ११:१० च्या आसपास महालक्ष्मीला पोहोचलो. ५-१० मिनिटांत देवकाका आले. त्यांच्यासोबत चालत-चालत स्टारच्या कार्यालयात पोहोचलो. ३ वर्षांपूर्वी काही कारणास्तव त्या भागात गेल्याने मला ते कार्यालय पाहून माहित होते. त्यामुळे जास्त शोधावे नाही लागले, पण तरीही एक गल्ली आधी चौकशी करून पुढे गेलो. तिथे पोहोचलो तर घारे काका आधीच पोहोचले होते. स्वागत कक्षातील सुरक्षारक्षकाने सांगितले की २-३ जण आधीच येऊन आत बसले आहेत. आम्हालाही आत पाठवले तेव्हा निखिल देशपांडे (राज जैन यांच्या वतीने) आणि हरीप्रसाद (छोटा डॉन) तसेच दीपक कुलकर्णी ह्यांच्याशी भेट झाली. त्यानंतर आले सलील चौधरी, नीरजा पटवर्धन, मीनानाथ धसके. अनिकेत समुद्र आणि दीपक शिंदे (दोन्ही भुंगे :) ) पुण्यावरून पोहोचले. तसेच विशेष आम्हा सर्वांना भेटायला आलेले श्री. लक्ष्मीनारायण हट्टंगडी ही तेथे आले होते. तिथेच आमच्या गप्पा सुरू झाल्या.

थोड्या वेळाने प्रसन्न जोशी तिथे आले. त्यांना नेहमी बातम्या देताना सूटात पाहिल्याने निळ्या टीशर्ट मध्ये पाहताना एकदम वेगळे वाटले. एकदम हसतमुखाने त्यांनी विचारपूस केली व सांगितले की बाकीचे लोक थोड्याच वेळात पोहोचतील. पारितोषिक वितरणाच्या उशीराचे कारण त्यांनी समजावून सांगितले तेव्हा त्यांची नेमकी अडचण कळली. काही वेळाने त्यांनी सांगितले की, 'अच्युत सर पोहोचत आहेत'. सर्वांना नीट बसून बोलता यावे म्हणून ७व्या मजल्यावरील खानपानगृहात आम्हाला नेले. तिथे त्यांनी आम्हाला पुढील कार्यक्रम सांगितला. एक झाले, घरून निघताना मला तिथे फार औपचारिकता असेल असे वाटत होते. पण प्रसन्नच्या वागण्या-बोलण्यावरून पूर्ण औपचारिकता निघून गेली व आम्ही एकदम मनमोकळेपणाने त्यांच्याशी आणि सर्वांशी बोलणे सुरू केले. तिथेच कळले की मेधा सपकाळ ह्यांच्या वतीने विक्रांत देशमुख व विजयसिंह होलाम ह्यांच्या वतीने त्यांची बहीण व मेव्हणे आले होते.

अच्युत गोडबोले थोड्या वेळात तेथे पोहोचले. ते फोनवर बोलत बोलत खुर्चीवर बसले तर आम्ही ही त्यांना गराडा घालून बसलो. आधी सर्वांची ओळख करून दिल्यानंतर सुरू झाल्या मोकळ्या, अनौपचारिक गप्पा. प्रत्येकाने स्वतःचा परिचय देऊन ब्लॉगचे विचार सांगितले, तसेच गोडबोले सरांनीही स्वत:च्या आलेल्या, पुढे येणार्‍या पुस्तकांबद्दल सांगितले आणि इतर अनुभवही. पुढे मग अल्पोपहार करताना प्रसन्ननी सांगितले की, स्टुडीयो ४५ मिनिटांकरीता मिळाला आहे त्या वेळात चित्रीकरण उरकूया. आम्ही पुन्हा खाली जाऊन बसलो. तेथे त्यांच्या एका सहकारीने आम्हाला चेहर्‍यावर टच्-अप करण्याकरीता नेऊन मग स्टुडियोच्या खोलीत नेले. आत प्रसन्न सर्व व्यवस्था करण्यात गुंतले होते. तोपर्यंत आम्ही ती कंट्रोल रूम पाहून घेतली. भरपूर दूरदर्शन संच (मी मोजायचा प्रयत्न केला नाही. ;) ) एकात वृत्तनिवेदिकेचा कॅमेर्‍यातून घेतलेला फीड, एकात निवेदक ज्यातून वाचून सांगतात त्या मोठ्या अक्षरातील सरकत्या बातम्या, एकात स्टारचा लोगो आणि बातमीची मुख्य वाक्ये (हो तीच, News Flash वाली) संगणकाद्वारे जोडलेली, एकात वृत्तनिवेदकाच्या पार्श्वभूमीवर दाखवण्यात येणारे चित्र, एकावर पूर्ण तयार झाले बाहेर जाणारे वाहिनीचे दृष्य, असे वेगवेगळे प्रकार जे ऐकून माहित होते ते प्रत्यक्षात पाहिले. आणि त्या लोकांनाही लहानशी बातमी देण्याकरिता काय काय करावे लागते ते ही दिसले. मग प्रसन्ननी त्यांच्या दुसर्‍या सहकार्‍याशी ओळख करून दिले, अश्विन. अश्विननेच मागील वेळी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते आणि ह्यावेळीही करणार होता.

आमच्या ह्या गडबडीत माझी बायको आणि विजयसिंह होलाम ह्यांची बहीण बाहेर थांबले होते. त्यांना आत येण्यासाठी विचारण्याकरीता बाहेर पडलो. काय वळणावळणातून आम्हाला आत आणले होते कळले नाही. भूलभूलैयाच वाटला. कसातरी बाहेर आलो. दोघींनी सांगितले, 'आम्ही बाहेरच थांबतो', तर पुन्हा २-३ जणांना विचारत स्टुडियोपर्यंत पोहोचलो. तोपर्यंत कार्यक्रमाच्या सुरूवातीचे चित्रीकरण झाले होते, प्रसन्ननी आम्हाला आमचा आत जाण्याचा क्रम सांगितला. त्याप्रमाणे आम्ही तयार होतो. आत अश्विन, गोडबोले सर आणि घारेकाका हे तिघे उभे होते. बाहेरून दूरदर्शन संचावर पाहून त्यांची उभे राहण्याची जागा ठरविली जात होती. थोड्याच वेळात पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम चित्रीत करण्यास सुरूवात झाली. एका मागोमाग एक आम्ही तयार राहत होतो, आत जात होतो, बाहेर येत होतो. काहीजणाचे पाहून मला नेमके काय करायचे ते कळले होते, पण खरोखरच माझी हालचाल कशी होती व बोलणे कसे होते ते मलाही आता कार्यक्रम पाहुनच कळेल. हळू हळू आम्हाला कळले की काय दाखवले जाणार आहे. (काय-काय ते आता दाखवतीलच. मी सांगत नाही ;) )

नंतर प्रसन्ननी आम्हाला बाहेरपर्यंत सोबत येऊन निरोप दिला. तिथेही बाहेर पुन्हा गप्पा सुरूच होत्या. मी एक दोन दिवस आधी घरी म्हणालो होतो की ह्या ब्रेकिंग न्यूज कल्पनेबद्दल त्यांना विचारेन. अर्थात मी ते विचारणार नव्हतो. बाहेर आल्यानंतर त्यांना सांगितले की हा अनुभव कसा होता ते. पण जित्याची खोड म्हणा, की प्रसन्नचा मोकळा स्वभाव म्हणा, मला इतके दिवस वृत्तवाहिन्यांना सांगायचे होते ते सांगून दिले की, तुमचे(वाहिन्यांचे) काही प्रकार आम्हाला आवडत नाही, पण ते फक्त स्टारकरीता नव्हते. प्रसन्नने ते ही शांतपणे ऐकून घेतले. अरे हो, आत सगळे चालले असताना प्रसन्ननी आम्हाला विचारले होते, 'तुम्हाला हे सर्व पाहून ब्लॉगकरीता नवीन विषय मिळाला असेल.' आम्ही ही संधी सोडतो होय? तिथेही गंमत करणे चालू झाले. देवकाकांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच एकदम आवडण्यासारखा माणूस. :) मलाही नंतर वाटले की उगाच म्हणालो मी वृत्तवाहिन्यांबद्दल. पण पुन्हा वाटले की, मनात होते केव्हापासून ते सांगून टाकले ते बरे झाले. त्यांनाही चांगलेच वाटेल की, आम्ही आम्हाला काय वाटते तेही सांगितले.

नंतर मग आम्ही ९ जण उरलो होतो. ठरविण्यात आले की, दादरच्या जिप्सी हॉटेलमध्ये चहा-नाश्ता करावयास जाऊ. तिथे पोहोचता पोहोचता हॉटेलसमोरच देवकाकांचा पाय मुरगळला. त्यांच्याकरीता स्प्रेचा बंदोबस्त करून मग जिप्सी हॉटेलमध्ये खानपान सेवा झाली. मी, माझी बायको, दीपक, हरिप्रसाद (छोटा डॉन ) व निखिल नंतर तिथून दादर वरून लोकल मार्गे परत आलो. लोकलमध्येही समोरासमोर बसण्यास जागा मिळाल्याने पुन्हा गप्पांना ऊत आला होता.

एकंदरीत, इतके दिवस कधी होणार म्हणणारा कार्यक्रम एकदम मस्त वातावरणात पार पडला. त्याबद्दल पुन्हा एकदा स्टारच्या चमूचे आणि खास करून प्रसन्न जोशी, गोडबोले सरांचे आभार.

अरे हो, कार्यक्रमाची नियोजित वेळ अजून ठरविली नाही आहे. ती लवकरच कळेल.

(ता.क.: आत्ताच देवकाकांच्या ब्लॉगवर वाचले की पायाचे स्नायू खूपच ताणल्या गेल्याने त्यांच्या पायाला प्लास्टर लावण्यात आले आहे. :( )


जानेवारी २३, २०१०

blog.aarp.org/shaarpsession/traffic.jpg
http://www.newsandreviews.in/media/blogs/Home/mumbai%20traffic.jpg

शुक्रवारी दुपारी कार्यालयात सहकाऱ्यांसोबत बोलत होतो. पहिले प्रकाशचित्र दाखवून मी म्हणालो,"मला ह्या लोकांचा हेवा वाटतो. एवढी गर्दीची वाहतूक असूनही हे लोक किती नियमबद्ध पद्धतीने गाड्या उभ्या करतात. नाहीतर, आपल्याकडे कशीही गाडी दामटली जाते." नंतर मग नेहमीचीच चर्चा. हे असे वागतात, ते तसे वागतात.

संध्याकाळी आईचा फोन आला की माझा मावसभाऊ घरी आला आहे. मी म्हटले, "ठीक आहे मी सहा वाजता निघेन. ७:१५ पर्यंत पोहोचतो". पण कसले काय. दुपारी जी चर्चा केली तीचेच रूप समोर दिसत होते. नेहमी ज्या प्रवासाला २० मिनिटे लागतील त्याला ६०-६५ मिनिटे लागली. कारणही तेच, वाहतुकीची गर्दी. नेमके कारण कळले नाही. बहुधा मध्य रेल्वे वरील मोटरमननी केलेल्या संपामुळे वाहतुकीवर ताण वाढला असेल. पण त्या गर्दीत लोक कसेही(काही लोक कसेतरी) गाड्या चालवत होते. इकडून ही गाडी घुसव. तिकडून ती गाडी मध्येच आली. मग आमच्या वाहनचालकाचे नेहमीप्रमाणे दुसऱ्यांवर ओरडणे. घरी पोहोचायला ८ वाजले. तरी बरे, आठच वाजले. आमची गाडी पूर्व दृतगती मार्गावर गाडी येण्यास जेवढा वेळ लागला, त्यावरून तर वाटले होते की ९ वाजतील. काय पण योग(की योगायोग) असतात ना?

पण खरोखरच, नेहमीच्या ह्या वाहतुकीच्या त्रासामुळे वैताग येतो. अर्थात गाड्यांची संख्या भरमसाट वाढली हे खरे आहे. जागेची कमी आहे हे ही मान्य. पण तरीही काहीतरी शिस्त पाळायची? तीन गाड्यांच्या लेन आहेत पण त्यात चार-पाच गाड्या चालतात. दहा पंधरा वर्षांपूर्वी चंद्रपूर-नागपूर मधील आमचे नातेवाईक म्हणायचे की, मुंबईचा वाहनचालक नागपुरात गाडी नाही चालवू शकत. कारण तिकडे कशाही गाड्या चालवतात आणि तिकडचा चालक मुंबईत गाडी नाही चालवू शकत, कारण इकडे शिस्तीत गाडी चालवतात ज्याची त्याला सवय नाही. पण गेल्या ३-४ वर्षांपासून वाटते की इकडची शिस्तही गेली आहे. मी असे म्हणत नाही की सर्वच बेशिस्त आहेत. पण काही लोकांमुळे सर्वच वाट लागते.

आता काही गोष्टी बघा ना.

गेल्या आठवड्यात, कार्यालयातून निघालो. बसमध्ये गर्दी खूप. म्हणून रिक्षाने येत होतो. (मी सार्वजनिक वाहतूक वापरली नाही मान्य. पण त्यावर वाद नंतर घालू ;) ) सीप्झ पासून पुढे एल एंड टी च्या पुलापर्यंत यायला दहा मिनिटे लागायची तिकडे ३० मिनिटे लागली. गाड्या रेंगाळत पुढे चालल्या होत्या. पुढे पोहोचलो तर बघितले, एक ट्रक चालक ट्रक उभा करून कोणाची तरी वाट पाहत होता. त्यामुळे त्याच्या बाजून एकाच गाडी पुढे जाऊ शकत होती. अरे त्याला गाडी उभी करायला दुसरी जागा नव्हती का?
माझा रिक्षाचालक म्हणाला, "दोन दिवसांपूर्वीही तिकडेच कुठेतरी एक रिक्षाचालक लघुशंकेसाठी म्हणून थांबला तर त्याने रिक्षा डाव्या बाजूला नाही, उजव्या बाजूला उभी केली होती." :|

२००७ मध्ये वाशी वरून ठाण्याला येत असताना ऐरोलीजवळ वाहतुकीची कोंडी झाली होती. गाड्या एकदम हळू हळू जात होत्या. आम्ही कसे तरी तेथे पोहोचलो तर दिसले की, एक मोठा ट्रक वळण घेत होता पण नीट जमले नसल्याने तो हळू हळू प्रयत्न करत होता पण त्याच्या बाजूने इतर वाहने पुढे जायच्या प्रयत्नात कोंडी वाढवत होते. आम्ही ट्रकच्या पुढे गेलो तर पाहिले दोन वाहतूक पोलीस कोणातरी दुचाकीस्वारासोबत बोलत उभे होते. म्हटले वा, इकडे त्यांच्या मागे वाहतूक नीट चालत नाही आणि हे लोक गप्पा मारण्यात गुंग आहेत.

बरं
, ठीक आहे. वाहनात काही बिघाड झाला म्हणून गाडी बाजूला घेण्यात वेळ गेला किंवा नाही जमले तर हा घोळ होऊ शकतो. पण काही जण तर अशा गर्वात असतात की आपल्याकडे गाडी आहे म्हणजे माझ्या समोरचा रस्ता मोकळा पाहिजे. नाही तर जमेल तशी गाडी दोन तीन लेन मधून घुसवायचा प्रयत्न करणार. त्यात गाड्यांचा प्रेमालाप झाला तर आपणहून मग दुसऱ्या गाडीच्या वाहनचालकाशी गळाभेट करणार. ह्यात मागे वाहतुकीची वाट लागली आहे हे त्यांच्या गावी नसते. हम्म.. असेही ऐकले की काही टक्कर वगैरे झाली तर विम्याकरीता त्यांचे प्रतिनिधी येईपर्यंत त्या गाड्या तशाच ठेवाव्यात. तेव्हा वाहतुकीचे काय होईल असा विचार येतो.

काही लोक भ्रमणध्वनीवर गप्पा मारत गाडी चालवतात. त्यामुळे त्यांची गाडी मधल्या रस्त्यामध्ये हळू जातेय की नीट जात नाही ह्याकडे त्यांचे लक्ष नाही. पुन्हा त्यांना काही म्हटले की आपल्यालाच खत्रूड नजरेने पाहणार. वाहतूक खात्याने नियम बनवलेत की गाडी चालवताना भ्रमणध्वनी वापरायचा नाही. पण तेच ह्याकडे लक्ष देत नाहीत. पुण्यात माझ्या समोरील गाडीत एका माणूस भ्रमणध्वनीवर बोलता बोलता गाडी हळू नेत होता. नेऊ दे म्हणा हळू पण लोकांना त्रास का? कडे कडेने जा की. आणि ते ही सिग्नलच्या जवळच. तिकडे उभ्या असलेल्या दोन पोलिसांसमोरून तो निघून गेला. मग मी त्या पोलिसांना विचारले की, 'त्याला अडवले की नाही?' ते म्हणाले,'आमचे लक्ष नव्हते. तू त्याचा गाडीचा नंबर दे आम्हाला'. मी म्हटले, 'ठीक आहे. तुम्ही लक्ष नकाच देऊ. आता पुढे दिसला तर पाठवतो मी त्याला मागे.'

भरपूर ठिकाणी गाड्या उभ्या करण्यास बंदी असते. तरी काही लोक गाड्या उभ्या करून जातात. दुचाकी असली तर ती उचलून नेली जाते. पण चारचाकी असली तर त्याला भला मोठा 'जॅमर' लावला जातो. त्यांच्याकडे चारचाकी गाड्या ठेवायला जागा नसते हे मान्य. पण तिकडेच त्यांना जॅम करून वाहतूकीची कोंडी वाढली जाते असे मला वाटते. आणि रस्त्याच्या बाजूला हे लोक जेव्हा पार्किंग लाईट लावून एखाद्याची वाट पाहत उभे असतात, तेव्हाही त्यांना काहीच केले जात नाही.

अजूनही भरपूर गोष्टी आहेत ज्यामुळे ह्या वाहतुकीचा वैताग येतो. पण काय करणार, ह्यातून जावेच लागणार. पुण्याला असताना एक विचार मनात आला होता. थंड पाण्याने आंघोळ करायचे म्हटले तर आपली जी स्थिती असते, तीच नाही पण, तशीच ही स्थिती आहे. सुरुवातीचे एक दोन लोटे पाणी थंड वाटते, नकोसे वाटते. पण नंतर मग पूर्ण बादली आपण संपवितो. त्याप्रमाणेच ह्या वाहतुकीत शिरायचे म्हणजे वैताग वाटतो, पण एकदा त्यात घुसले की मग आपली गाडी अंतिम स्थानापर्यंत पोहोचवतो.

ता. क. : दोन्ही चित्रे आंतरजालावरून साभार. पहिले चित्र तेच ज्यावरून चर्चा सुरु झाली. दुसरे चित्र शोधताना कळले, माझ्यासारखेच बहुतेक लोकांनी लिहून ठेवले आहे. :)

[जमल्यास अशाच आणखी वैतागांबद्दल नंतरही लिहेन.]

जानेवारी १६, २०१०

लाफ्टर चॅलेंज नंतर प्रसिद्ध झालेला विनोदी कलाकार सुनील पाल ह्याने दिग्दर्शित व निर्माण केलेला 'भावनाओं को समझो' नावाचा सिनेमा काल प्रदर्शित झाला. हा सिनेमा मी अजून पाहिलेला नाही. ह्या सिनेमाबद्दल मला माहितही नव्हते. पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ह्या सब टीव्ही वरील विनोदी मालिकेत सुनील पाल पाहुणा कलाकार म्हणून आल्यानंतर कळले. त्या मालिकेत खरं तर सिनेमाची जाहिरात करावी हाच उद्देश होता.
असो, तर हे लिहिण्यामागचे कारण असे की आताच एका वृत्तवाहिनीवर पाहिल्याप्रमाणे ह्या सिनेमाचे नाव 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये घेण्यात आले आहे. ५१ स्टँड-अप कॉमेडियन ह्यांनी एकाच सिनेमात भूमिका केल्याने ह्या सिनेमाच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. त्या सिनेमामागील सर्व कलाकार व सहकार्‍यांचे अभिनंदन. पण एरवी कुठल्याही लहान गोष्टीला उचलून धरणार्‍या वृत्तवाहिन्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केले असे दिसतेय. फक्त एक-दोन वृत्तवाहिन्यांनीच ह्याची दखल घेतली म्हणून खंत वाटली. पण बहुधा सिनेमाच्या चमूने सिनेमाची किती जाहिरात केली असेल ह्यावरही हे थोडेफार अवलंबून आहेच.

आता हा सिनेमा कधी पहावा ह्याचा विचार चालू आहे। सुनील पाल, राजू श्रीवास्तव, जॉनी लीवर ह्यांनी सादर केलेले विनोद आधी आवडायचे। त्यामुळे त्यांचा एक विनोदी सिनेमा, तसेच आता ह्या विक्रमामुळे पहावा असे वाटते। पण लाफ्टर चॅलेंज नंतर ह्या लोकांनी सादर केलेले तेच तेच, किंवा त्याच प्रकारचे विनोद, तसेच २००७ मध्ये आलेल्या ह्या कलाकारांची भूमिका असलेला 'जर्नी -बॉम्बे टू गोवा' सिनेमा (थोडासा) पाहिल्यानंतर आता हा सिनेमा आवर्जून पहायला जावे असे सध्या तरी वाटत नाही.

जानेवारी १५, २०१०

संकेतस्थळावर एखादी बातमी व त्यातील शब्दांवरून जाहिराती दाखवण्यात काही काही वेळा विरोधाभास असतो. (गूगल वर Misplaced ads शोधून पहावे. - स्वतःच्या जबाबदारीवर ;) )

पण
एकाच संकेतस्थळावर बातम्यांतील शब्द विरोधाभासात असल्याचा हा नमुना :) (कसल्याही चुका काढायचा प्रयत्न नाही)
पहिल्या बातमीत संक्रांतीचा अर्थ संकट असा वापरला आहे. आणि खालीच तिसर्‍या चौकटीत संक्रात म्हणजे संकट नाही असे म्हणणारी बातमी.
खालील उदाहरणात विरोधाभास नाही आणि गंभीरता आहे. पण एकामागोमाग दोन विरुद्ध आशयाच्या बातम्या आहेत.

जानेवारी १०, २०१०

अपेक्षेप्रमाणे 'शिक्षणाच्या आयचा घो' सिनेमाच्या नावावर वाद उठला. मराठा महासंघाने त्या नावावर आक्षेप घेतला आहे. गेल्या आठवड्यात उठलेला "झेंडा" सिनेमाचा वाद आणि आता हा. जमेल ते पक्ष , संघटना आता समोर येऊन आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करत आहेत. ( मराठा महासंघाची पत्रकार परिषद सध्या चालू आहे त्यात तर त्यांचेच वाक्य आहे की सिनेमा प्रदर्शित झाला तर आम्ही आमची ताकद दाखवू.)
साध्या विचारांत तरी मला हे कळत नाही की नेमका सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच हे वाद का उठतात? (सिनेमाच्या पथ्यावर पाडण्यासाठीही असू शकतात हे तर भरपूर वेळा दिसतेच. पण इथे ती शक्यता आहे का?)

आता 'झेंडा' सिनेमाचे एक वेळ मानू शकतो की त्यातील दृश्यांवर किंवा त्या व्यक्तिरेखेवर त्यांचा आक्षेप आहे, ते सर्व सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळू शकतात, काही वेळा सिनेमाच्या प्रोमो मधूनही. पण सध्या तरी हा सिनेमा अजून प्रदर्शित झाला नाही आणि प्रोमोमध्ये तरी काही आक्षेपार्ह संवाद वगैरे दाखविले नाहीत. मग 'स्वाभिमान' ने सिनेमा न पाहताच त्यावर आक्षेप कसा नोंदवला?

आणि 'शिक्षणाच्या आयचा घो' ह्या सिनेमाबद्दल म्हणायचे, तर ह्या नावाचा सिनेमा येणार आहे हे ३ महिने आधीपासूनच आपल्याला माहीत होते. ते नाव वाचून मी तेव्हाच मित्रांना म्हणालो होतो की ह्यावर ही वाद उठणार. मग त्या मराठी महासंघाला ३ महिने काहीच माहीत नव्हते का? आधीच का नाही तक्रार आली?

आणि सरकारचे तर काय म्हणावे? नेहमीप्रमाणे बघ्याचीच भूमिका घेणार. कोणी कायदा हातात घेतला तर आम्ही पाहून घेऊ म्हणतात. त्याआधीच का नाही काही करत?

असो, आपण तर काय सिनेमा पहायला मिळेल त्यानंतरच ठरवू काय चांगले आणि काय वाईट ते.

जानेवारी ०९, २०१०

गेल्या आठवड्यात मी पाहिलेल्या 'संभवामि युगे युगे' नाटकाबद्दल लिहिणार होतो. मस्तपैकी लिहायला सुरुवातही केली होती. जवळपास ७० /७५ टक्के लिहून ठेवले होते. पण कार्यालयातील कामात वेळ लागल्याने घरी येण्यास उशीर होत गेला आणि नंतर सुट्टीत फक्त आराम करावासा वाटला. तसेच काही लिहिणेही जमले नाही. आज संध्याकाळी पुढे लिहावयास सुरुवात केली. पण संगणकात थोडी अडचण निर्माण झाली, त्यामुळे कित्येक दिवसांपासून लांबविलेले संगणकाचे काम करण्यास घेतलं तर त्याने माझा जुना विदा(डेटा) उडवून टाकला. आणि आता सध्यातरी मला ते पुन्हा लिहायची एवढी इच्छा वाटत नाही :(
चालढकल करत २ आठवडे अनुदिनीवर काहीच लिहिले गेले नाही. असो, पुन्हा नवीन काही लिहिण्याचा प्रयत्न करेन.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter