एप्रिल २१, २००९

ह्या आधीचे: भटकंती (ठाणे ते शेगाव)शेगावला पोहोचल्यानंतर पहिले गेलो ते भक्त निवास क्र. ५ कडे. भक्त निवास क्र. ३ ते ६ हे चार बाजूंना बांधून मध्ये मोकळी जागा ठेवली आहे. तिथूनच आनंद सागर करीता शेगाव संस्थानाचा बस थांबा आहे. त्या थांब्यावर खूप मोठी रांग होती. एकंदरीत अंदाज आला होता की आनंदसागरला काहीतरी चांगले आहे. मित्राने आधीच सांगून ठेवले होते की आनंद सागर नक्की पहा म्हणून. भक्त निवासाच्या कार्यालयात गेलो तर तेथेही रांग होती(त्याची अपेक्षा होतीच). एका कार्यकर्त्याने सांगितले,'रांगेत रहा. जसजसे खोल्या रिकाम्या होतील, एकेकाला आम्ही त्या उपलब्ध करून देऊ.' कागद पाहिला. ५ क्रमांकाच्या निवासस्थानात पूर्ण वातानुकूलीत खोल्या. इतर मध्ये ३/४ लोकांकरीता मिळून सोय. काहींमध्ये खोलीतच बाथरूम, काहींना बाहेरचे. नाहीतरी १ तास गेला असताच आणि बाहेरील हॉटेलमधील खोल्यांचे भावही जवळपास तेवढेच, त्यामुळे बाहेरच खोली पाहण्याचे ठरविले. अर्धा एक तासाच्या शोधानंतर (त्यात भक्त निवास १ व २ ही आलेत. पण तिथेही जागा नव्हती)एका हॉटेलमध्ये खोली पक्की केली, सामान उतरविले व आराम केला.

आईने सांगितले, 'मी आनंदसागर बघितले आहे व तसेच तिकडे भरपूर चालणे मला जमणार नाही." ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू असते व मंदीर १०:३० पर्यंत. त्यामुळे मी बायकोसोबत आनंदसागरला जायला निघालो. गाडीत बघितले तर ड्रायव्हर गाढ झोपला होता. त्याला न उठवता एक रिक्षा पकडून आम्ही निघालो तेव्हा साधारण ५ वाजत आले होते. जाताना आसपास पाहिले तर मंदिराच्या आसपास ज्याप्रकारे दुकाने/हॉटेल आहेत त्या मानाने गाव तेवढे विकसित नाही वाटले. एखाद्या लहानशा खेडेगावातच फिरत आहे असे वाटले. आनंदसागरला पोहोचता पोहोचता रस्त्यात आणखी एक भक्त निवास दिसले.तिथून थोडेच पुढे गेल्यावर आनंद सागरचा फलक पाहिला. त्याचे आणि आसपासचे फोटो.प्रवेश तिकिटाकरीता ३/४ खिडक्या होत्या. बहुधा मंदिरात काही दान दिल्याची पावती दिल्यास तिकीट फुकट होते. मी सध्या तरी काही दिले नसल्याने पैसे देउन तिकीट घेतले व आत गेलो. तिकिटावर पाहिले तर मी दिलेले पैसेही देणगी स्वरूपातच स्विकारले असल्याची पावती होती व प्रवेशाची तिकिटे तशीच दिली होती.आत फिरता फिरताच पाहिले सुरूवातीलाच गोलाकार परीसरात वेगवेगळ्या संत/महापुरूषांचे पुतळे मांडून ठेवले आहेत. सर्व पाहिलेही नाहीत आणि जेवढे होते त्यातील एक हा.एका ठिकाणी आनंदसागर मध्ये फेरफटका मारण्यासाठी एका लहानशा रेल्वेगाडीकरीता रांग पाहिली. आसपास मस्त झाडे लावली आहेत बाग बनविली आहे. त्या भव्य परिसराचे वर्णन जमत नाही आहे. ह्या काढलेल्या प्रकाशचित्रांवरून अंदाज घेता येईल. एका झाडावर हे निळे पक्षी दिसले म्हणून जवळून पाहायला गेलो (ते खोटे होते :)). त्यांचे चित्र घेत असतानाच चुक् चुक् असा आवाज आला तर पाहिले त्याच झाडाच्या दुसर्‍या फांद्यांवर ३/४ खारी फिरत होत्या.


हे मंदिर पिसाच्या मनोर्‍याप्रमाणे तिरके वाटत आहे, पण तो बहुधा माझ्या हातांचा प्रताप आहे ;)


त्याच्याच आसपास असलेले मुनीवर्य.(ह्यांचे नाव मला कळले नाही)


आसपास कुठेतरी मत्स्यालयही आहे असे फलकावर वाचले. डाव्या ठिकाणी मोठे उपहारगृह होते. त्याच फलकावर वाचले की ध्यानकेंद्रही आहे. पण त्याची बंद होण्याची वेळ ६:३० होती. कन्याकुमारीला विवेकानंदांचे स्मारक पाहिले होते. तिथल्या ध्यान केंद्राचा अनुभव होता. त्यामुळे असेल पण माझा तिकडे जाण्याकडे जास्त कल होता. पण वाटले थोडा वेळ आहे, इतर गोष्टी पाहून घेउया. एका ठिकाणी पक्षांचा मोठमोठ्याने आवाज ऐकला. काय आहे पहायला म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो. तलावावरून जाणारा एक पूल बनविला होता. तिकडे जाता जाता कळले, त्यांनी ध्वनीक्षेपकावर प्राण्यांचे व पक्ष्यांचे आवाज लावून ठेवले आहेत. ते बहुधा लोकांना आकर्षित करण्याकरीता असेल पण त्याचे नेमके प्रयोजन नाही कळले. लाकडी पुलावरून पुढे गेल्यावर पाहिले तिथे लहानशे उपहार केंद्रही बनविले आहे. तसेच झाडांच्या आसपास बसण्यास व फिरण्यास जागा बनविली आहे.

तिकडुनच पाहिले ध्यानकेंद्र समोरच दिसत आहे, पण त्याकरीता तलाव पार करून जायचे आहे. वाटले बोटीने जाता येत असेल. विचारणा केली तर सांगण्यात आले की आम्ही आलो त्याच लाकडी पुलावरूनपरत जाऊन तिकडून उजवीकडे तलावाला फेरी मारून चालत जायचे आहे. तेथील चौकीदाराने सांगितले, प्रवेश ६:१५ ला बंद होतो. म्हणून मग लगेच तलावाला फेरी मारायला तयार झालो. बायकोने थोड्या वेळापूर्वी विचारले होते की ती ट्रेन नाही दिसली असून. उजवीकडे वळतानाच ती ट्रेन जाताना दिसली.


वरील फोटोतील उजवीकडे असलेल्या पूलाच्या पलिकडे आम्ही गेलो होतो. तिकडुन मागे फिरून (फोटोत घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने) डावीकडील रस्त्याने फिरत फोटोतील मध्यभागी वर असलेल्या ध्यानकेंद्रात जायचे होते. मग काय चालत निघालो दोघेही.

फिरत जाईपर्यंत १५/२० मिनिटे लागली असतील. पण आसपासचा देखावा मस्त होता. ह्या तलावाबद्दल माझ्या मित्राने सांगितले की ३०० कोटी रूपये खर्च करून हा कृत्रिम तलाव बनविला आहे. एका ठिकाणी चांगलेही वाटत होते पण त्याच वेळेला थोडेसे वाईटही वाटत होते की गावातल्या लोकांकरीता ह्याचा जास्त उपयोग होत असेल का? गावातील आणि मंदिर परिसरातील विसंगती फार खटकत होती.
तर चालत चालत आम्ही पोहोचलो ध्यानकेंद्राजवळ. तिथे पोहोचताच एका कार्यकर्त्याने आमच्या समोर फलक धरला. "ध्यानकेंद्र परिसरात शांतता राखा. मोबाईल बंद ठेवा..." येणार्‍या प्रत्येक माणसाला फलक दाखवण्याची युक्ती मला आवडली. कारण जर प्रवेशद्वाराजवळ हा फलक ठोकून ठेवला तर किती लोक तो नीट पाहतात ह्याची शंका असेल. त्यामुळे प्रत्येकाने तो पाहणे ह्यासाठी, तसेच येणार्‍याने फलक वाचून ते पाळायचा होकार दिला तरच आत प्रवेश देत असतील असे माझे मत झाले. :)


आत जाता जाता आसपासच्या परीसराचे फोटो काढले. केंद्राजवळ गेल्यावर एका कार्यकर्त्याने डावीकडे असलेल्या पायर्‍यांकडे बोट दाखविले. अर्थात आम्हाला आधी तिकडे जायचे होते. पायर्‍या चढून वर गेलो. तर मध्यभागी एक मंदिरासारखे बनवून त्यात रामकृष्ण परमहंस ह्यांचा पुतळा ठेवला होता. त्याचा फोटो काढण्यास एकाला मनाई करण्यात आली होती. मग मी प्रयत्न केला नाही ;)

खाली उतरल्यानंतर मुख्य केंद्रात जाण्याकरीता उभे राहिलो. तिथे एका कार्यकर्त्याने पुन्हा तो फलक दाखविला. मी मोबाईल फोन दाखवून खूण केली की हा बंदच आहे. आत गेल्यावर पाहिले, उजव्या बाजूला स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस ह्यांचे फोटो ठेवले होते (आणखी एक फोटो कोणाचा ते आठवत नाही) आणि त्यांवर प्रकाशझोत पाडला होता. एकदम शांत जागा. आम्ही थोडा वेळ आत बसलो. कन्याकुमारीच्या ध्यानकेंद्रात ॐ चा जप चालू होता. पण इथे पूर्ण शांतता होती. त्या शांततेत डोळे बंद करून एकाग्र होण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आले की मनात किती विचार चालू आहेत. साधारण १५ मिनिटे तिकडे मन शांत करायचा प्रयत्न केला. (पण अशा गोष्टी १५ मिनिटांत साध्य होत नाहीत. असो.) बाहेर आलो तर सूर्य नुकताच मावळत होता. थोड्यावेळ तिकडेच बसलो. चपला बूट घेण्यासाठी आलेल्या माणसांपैकी २-३ जण बूट घेतल्यावर जमीनीवर आपटून टाकत होते. वाटले ह्या लोकांना शहाणपणा नाहीच आहे. शांतता पाळायला सांगूनही स्वतःच्या मजेकरीता काहीही करतात.

तिकडून परत निघालो. आता लक्ष्य होते, संगीत कारंजे. मैसूरचे वृंदावन गार्डन व औरंगाबादमधील पैठणच्या बागेतील संगीत कारंजे पाहिले असल्याने ह्याबाबत जास्त आकर्षण नव्हते. तरी आहे तर पाहून घेऊया म्हणून तिकडे गेलो. त्याची व्यवस्था मोठी होती. कारंज्यांसमोर अर्धगोलाकृती आकारात उतरत्या हिरवळीवर बसण्याची सोय केली आहे. संगीत व कारंजे ह्यांचा जास्त मेळ दिसत नव्हता. तरी न बघण्यासारखे ते वाईट वाटले नाही.

तो कार्यक्रमही १५ मिनिटांचा होता. तो आटपून परत निघायला ७:५० झाले होते. त्यामुळे आम्ही परत जायला निघालो. रस्त्यात पाहिले सुरूवातीच्या प्रवेशाद्वारातून चंद्र दिसत आहे. तसेच पुढे एक आगळावेगळा फलक पाहिला.


बाहेर पाहिले तर मस्त गर्दी दिसत होती, बस व रिक्षा दोन्हींकरीता. आम्ही मग रिक्षाने परत आलो. परत आल्यानंतर आईसोबत मंदिरात दर्शनाला गेलो. तिकडूनच मग जेवायला बाहेरच्या हॉटेलमध्ये गेलो. ड्रायव्हर म्हणाला की तो दुपारी मंदिराजवळच्या एका हॉटेलमध्ये जेवला होता. त्याने सांगितले की जेवण एवढे चांगले नाही. पण तोपर्यंत जवळपास ११ वाजले होते. त्यामुळे हॉटेल शोधावे लागणार होते. तेव्हा आठवले की परत येताना रिक्षाचालकाने शिवाजी चौकातील एका हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. म्हणाला ह्या भागात सर्वात चांगले हॉटेल आहे. त्या हॉटेलचा शोध घेऊन मग तिथे जेवण केले. पण तिकडील परिस्थिती त्याने सांगितल्याएवढी चांगली नव्हती. वाटले हे जर चांगले हॉटेल आहे तर बाकीचे कसे असतील? ;)

(क्रमशः)
Reactions:

3 प्रतिक्रिया:

bhaanasa म्हणाले...

जवळ जवळ बारा-तेरा वर्षांपूर्वी मी ट्रेनने शेगावला गेले होते. त्यानंतर झालेले बदल आपल्या सविस्तर वर्णनामुळे दिसले व कळले. धन्यवाद.

Mangesh म्हणाले...

हॉटेल रूम रेट्स का नाही लिहिले ?......पुन्हा प्रवास वर्णन लिहिताना विसरू नका.

अनामित म्हणाले...

पुढचा भाग लिहिलाच नाहिय का ?

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter