नोव्हेंबर २४, २०१०

काल दुपारी भ्रमणध्वनी वाजला. पलिकडून आवाज आला, " सर, मैं xxxx बात कर रहा हूं आयडियासे. एक स्कीम के बारे में बताना है." मला तेव्हा काही बोलायची इच्छा नव्हती म्हणून "कोणतीही स्कीम नाही पाहिजे" असे म्हणालो. तो म्हणाला, "सर, स्कीम क्या हैं सुन तो लिजिये". दोन तीन दिवसांपूर्वीच जाहिरातीत पाहिल्याप्रमाणे नंबर पोर्टेबिलिटीची नवीन सुविधा देण्याबाबत असेल असे वाटले. इच्छा नव्हती, तरीही मग म्हणालो,"ठीक आहे. मराठीत सांगत असशील तर ऐकतो." त्याने अं अं केले आणि काही न बोलता फोन बंद केला.

पुन्हा मनात विचार आले, ह्या आयडिया वाल्यांचीच जाहिरात आहे "बोलने के लिये भाषा की जरूरत नहीं पडती", मग आता वापरायची होती की ती युक्ती. :)

ती जाहिरात काहीही असो, आणि कोणीतरी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रात सर्व भाषा दिल्यात असेही असेल. पण मला ती जाहिरात राज ठाकरेंना टोमणा म्हणून वापरली आहे असेच वाटत आलेय. आधीही त्यांनी अशीच जाहिरात बनविली होती. राज ठाकरेनी अमिताभ बच्चनना हिंदी मराठी भाषेवरून काही म्हटले. अभिषेक बच्चन ने आयडियाच्या जाहिरातीतून त्याला उत्तर दिले. हे म्हणजे पेप्सी, कोका कोला आणि थम्सअप सोबत स्प्राईट च्या जाहिरातबाजीप्रमाणे वाटले. पेप्सीने थप्सअपच्या जाहिरातीचे विडंबन करीत नवीन जाहिरात बनविली. मग कोकाकोलाने पेप्सीच्या जाहिरातीचे विडंबन केले. आणि मग स्प्राईटने त्या सर्वांवर वरचढ बनायचा प्रयत्न केला.

पुन्हा भाषेच्या मुद्यावर येऊ. त्यांची जाहिरात खरोखर विचार करण्यासारखी वाटते. पण मग असेही वाटते की त्यांच्या ''बोलने के लिये भाषा की जरूरत नही पडती" असे म्हणण्याचा खरंच फरक पडतो का? शेवटी भाषेने फरक पडेलच. मी इथे सध्या तरी जमेल तिथे मराठी भाषा वापरायचा प्रयत्न करत असतो. एटीएम, दुकान, फोन वगैरे वगैरे. पण इतके वर्षांपासून कोणाशी ज्या भाषेत बोलत आलोय सवयीने त्याच भाषेत बोलणे होते. आणि ती भाषा मराठी नसल्यास हिंदीच असते :)

असो,

आता शुक्रवारीच माझ्या मोबाईल वर एक कॉल आला माझ्या सेवादात्याकडून. मुंबईत नोंदणी असलेल्या क्रमांकावर मुंबईतील क्रमांक एकचा सेवा दाता बनविल्याबद्दल हे लोक गुजराती मध्ये बोलून आभार प्रदर्शित करीत होते. आता ह्यांना काय म्हणावे? पुन्हा ते ही म्हणायचे, "भाषा काय घेऊन बसलात. भावना महत्त्वाच्या." :)

नोव्हेंबर २२, २०१०

CBFC कडून दिलेल्या जाणार्‍या चित्रपटाच्या प्रमाणपत्राची वैधता १० वर्षे असे माहित होते. आणि कुठे तरी ऐकल्याप्रमाणे त्या १० वर्षांत त्याच नावाचा दुसरा चित्रपट बनू शकत नाही. पण गेल्या १०-१५ वर्षांत मग तशीच नावे वापरून पुढे काहीतरी ओळ जोडण्याची प्रथा चालू झाली.

असो. तो माझा आजचा विषय नाही. माझा विषय आहेत एकाच कलाकाराने काम केलेले एकाच नावाचे दोन चित्रपट. मग त्यात दहा वर्षेही गेली असतील किंवा जास्त ही.

त्यातील काही नावे म्हणजे:


'संतान' -
कलाकार जितेंद्र. जुना चित्रपट आला होता १९७६ मध्ये. आणि त्यानंतर १९९३ मध्ये. पहिल्या चित्रपटात जितेंद्रनेच संतान साकार केला होता. दुसर्‍या चित्रपटात दिपक तिजोरीने आणि जितेंद्र ने त्याच्या वडिलांची भुमिका केली होती.

'दिवार'
-  कलाकार अमिताभ बच्चन. पहिला आला होता १९७५ मध्ये. सह कलाकार शशी कपूर (भाऊ). दुसरा २००४ मध्ये. सह कलाकार अक्षय खन्ना (मुलगा).

'बरसात'
- कलाकार बॉबी देओल. पहिला चित्रपट आला होता १९९५ मध्ये. ग्रीक देवतेच्या पुतळ्याप्रमाणे दिसणारा बॉबी देओल (असे मी ’गुप्त’ चित्रपटाच्या परीक्षाणात वाचले होते :) ) नंतर फार चमकला नाही, पण त्याचे चित्रपट मधे मधे येत राहिले. २००५ मध्ये  त्याच्या पुन्हा 'बरसात' नावाच्या चित्रपटाचे नाव पाहिले तेव्हा वाटले होते, की ह्याचा पहिला आणि शेवटचा दोन्ही चित्रपट एकाच नावाचे असतील की काय? ;) पण तसे झाले नाही.


मला सध्या तरी आठवत असलेल्या तीन चित्रपटांची ही नावे. तुम्हाला आणखी माहीत असल्यास जरूर सांगा. तेवढीच आपल्या गंमतीशीर ज्ञानात थोडी भर :)


जाता जाता- १९९९ मध्ये आलेल्या 'संघर्ष' ह्या सिनेमात अमन वर्मा ह्या कलाकाराने काम केले होते. त्याचे नाव चित्रपटात दुसरेच होते. पण अक्षय कुमारचे नाव त्या चित्रपटात अमन वर्माच होते. हा योगायोग होता का?

नोव्हेंबर २१, २०१०

'स्टार माझा'च्या 'ब्लॉग माझा ३' स्पर्धेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. ह्यावेळी  परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांनी निवडले यांनी सहा विजेते आणि तीस उत्तेजनार्थ ब्लॉगर्स निवडले आहेत.

संबंधित निकाल 'स्टार माझा'च्या संकेतस्थळावर येथे पाहता येईल.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन :)

मी सर्व ब्लॉग पाहिले नाही आहेत. ह्यातील काही जणांशी आंतरजालावर आधीपासून ओळख झाली आहेच. त्यांचे ब्लॉग पाहिले होते. आता इतरजणांचेही उत्तम ब्लॉग कळले. ते ही पाहीन :)

नोव्हेंबर १७, २०१०

'बिग बॉस ४' आणि 'राखी का इंसाफ' ह्या कार्यक्रमांवर अखेर निर्बंध घालण्यात आलेत. ते कार्यक्रम रात्री ११ ते ५ ह्या वेळेत दाखविणे तसेच वृत्तवाहिन्यांना ह्या कार्यक्रमांची दृष्ये न दाखवण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.

उशीरा केलेली पण चांगली गोष्ट. मी दोन्ही कार्यक्रम पूर्ण पाहिले नाहीत. 'राखी का इंसाफ' तर पहायला सुरूवात केल्यानंतर १५ मिनिटांत बंद केले होते. लोकांवर एवढी वाईट परिस्थिती आली आहे का? मान्य आहे की एखादा वाद मिटविण्याकरीता आपण कोणीतरी तटस्थ माणूस शोधतो. त्याकरीता मग एखादा अनोळखी माणूसही निवडू शकतो. किरण बेदी ठीक आहेत हो, त्या पोलीस अधिकारी होत्या. एखादा न्यायाधिश नाही तरी त्यांचे म्हणणे ऐकू शकतो. पण न्याय देण्याकरीता राखी सावंत? आणि राखीचे बोलणे पाहून तर ती वाद मिटविण्यापेक्षा आगीत तेल ओतत आहे असेच वाटते.

तसेच 'बिग बॉस'. हा कार्यक्रम ही सूरूवातीपासून वाद निर्माण करूनच मग चित्रीकरण केले जाते असे वाटते. गेल्या मोसमातील आणि ह्या मोसमातील त्या कार्यक्रमाचे काही भाग पाहून, पाश्चिमात्य देशांचे कार्यक्रम आणले म्हणजे ते त्या प्रकारेच दाखविले जावेत म्हणून मुद्दाम त्यात ह्या गोष्टी टाकल्या जातात असे वाटते.

आज 'स्टार माझा'वर ह्याबद्दल चर्चा चालू होती. कांचन अधिकारी ह्या निर्बंधाच्या पक्षात आहेत असे दिसले. त्यांनी दिलेले मुद्दे पटतात की आपण एका ठिकाणी संस्कृती वगैरे सांगत असतो मग असे प्रकार का? कार्यक्रम असा असावा की सर्वजण पाहू शकतील वगैरे वगैरे. दुसरा एक पाहुणा, कोणीतरी शाह म्हणून होता. नक्की शब्द आठवत नाही पण त्याचे म्हणणे असे की "संस्कृती वगैरे ठीक आहे. पण आजच्या पिढीतील लोकांना जसे पाहिजे तसे आम्ही दाखवतो. आमच्यावर निर्बंध कशाला?" काहीतरी यूट्युब चे ही उदाहरण दिले की तिथे आज सर्व शिव्या असलेले व्हिडीयो ही उपलब्ध आहेत, तिथे सर्व उघडपणे असते, काही निर्बंध नाही. मला त्याला सांगावेसे वाटेल की "तुम्हाला जर वाटते की आजच्या पिढीतील लोकांना हे पटते म्हणून तुम्ही दाखवता हे एकवेळ मान्य केले तरी सर्व लोक तसे मानत नाहीत. अजूनही त्याला वेळ आहे. तुम्हाला ते कार्यक्रम तसे दाखवायचे असतील तर दाखवा, पण त्यालाही कुठे दाखवतो त्या क्षेत्राप्रमाणे मर्यादा असतील. आणि मग त्याची जशी वेळ ठरविली गेली असेल तसे दाखवा. तसेच युट्युबवरही मर्यादा आहेत. तिथेही तक्रार केली की तसे व्हिडियो काढले जातात."

ह्या दोन कार्यक्रमांसोबतच आणखी एक कार्यक्रम आहे. बिन्दास वाहिनीवरील "ईमोशनल अत्याचार". ह्या कार्यक्रमावरही अशाच प्रकारचे निर्बंध घातले जावेत, म्हणजे रात्री ११ ते ५ ही वेळ ठेवणे आणि वृत्तवाहिन्यांना ह्यांची दृश्ये दाखविणे ह्यावर बंदी आणणे, असे वाटते.


जर पाश्चिमात्य देशांत असे उघडपणे दाखवले जाते असे कोणी म्हणत असेल तर त्यांना सांगावेसे वाटेल की तिकडची गोष्ट इथे आणायची असेल तर पूर्ण प्रकारात आणा. कार्टून पासून मालिकांपासून चित्रपटांपर्यंत जे काही दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवले जाते, तो कार्यक्रम कोणत्या प्रकारचा आहे, तसेच कोणत्या वयोगटाच्या प्रेक्षकांकरीता आहे हे त्या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच वरच्या कोपर्‍यात दाखविले जाते. मग पुढे तो कार्यक्रम पाहणार्‍याची इच्छा.


आपल्या इथेही तसेच काहीतरी करूया. मग म्हणू की आता प्रेक्षकाला निर्णय घेऊ दे. काय? बरोबर?

नोव्हेंबर १४, २०१०

'गोलमाल', 'चष्मेबद्दूर', 'चुपके चुपके': मजेदार, विनोदी चित्रपट. भरपूर वेळा पाहिलेले. त्यांचा व्हिसीडी संच घेतला होता. आता नाही आहे.

 

मग दुकानात 'गोलमाल', 'चष्मे बद्दूर', 'चुपके चुपके' ह्यासोबतच 'खट्टा-मिठा' हा चित्रपट मिळून चार चित्रपटांचा डिव्हीडी संच असलेला पाहिला. तो घ्यायचे ठरवले.


पण मग परवा नवीन काय आले आहे हे पाहण्यास दुकानात गेलो तिथे हा १२ विनोदी चित्रपटांचा नवीन संच दिसला "फूलटू कॉमेडी".


ह्यात होते:
'गोलमाल', 'चष्मे बद्दूर', 'चुपके चुपके',
'बावर्ची', 'सत्ते पे सत्ता',
'हेराफेरी', 'फिर हेराफेरी',
'नो एंट्री', 'हलचल', 'आवारा पागल दिवाना',
'धमाल', 'अजब प्रेम की गजब कहानी'

शेवटच्या ३ पैकी 'आवारा पागल दिवाना', 'धमाल', 'अजब प्रेम की गजब कहानी'. ह्यातील आवारा पागल दिवाना कधी तरी पूर्ण पाहिला होता. चांगला वाटला. पण एकदम नाही. 'धमाल', 'अजब प्रेम की गजब कहानी' मी पूर्ण पाहिलेले नाहीत. पाहताना बरे वाटले. चांगले आहेत असे ऐकले होते. पण बाकीचे ९ चित्रपट भरपूर वेळा पाहिलेले आणि आवडलेले. त्यांच्याबाबतीत तर काही म्हणालयाच नको. त्यामुळे रू. ९९९/- किंमतीच्या मानाने १२ चित्रपटांचा हा संच वाजवी दरात मिळतोय असे वाटले. लगेच खरेदी केला. (आणि कोणाला घ्यायचा असेल तर शेमारू च्या संकेतस्थळावरूनही मागवू शकता. किंमतही कमी. मला नंतर कळले :( )

कंटाळा आला की आता ह्यातील एखादा चित्रपट काढून पाहता येईल. :)


('नॉन स्टॉप कॉमेडी' आणि 'कॉमेडी क्लब'ची चित्रे शेमारू च्या संकेतस्थळावरून साभार.)

नोव्हेंबर ११, २०१०

त्रिमिती चित्रपटांशी माझी ओळख झाली १९८५ मध्ये, ’छोटा चेतन’ द्वारे.  आईस्क्रिम घेण्याकरीता हात पुढे करणे, इतर काही प्रसंगात दचकणे वगैरे अनुभव तेव्हाच मिळाले. त्यानंतर पाहिला ’शिवा का इन्साफ’. ’सामरी’ सिनेमा भुताचा असल्याने बहुधा वडिलांनी आम्हाला तेव्हा दाखवला नाही. :)


त्यानंतर नवीन चित्रपट आले नाहीत. पण काही वर्षांनी त्रिमिती चित्रांकित गोष्टीची पुस्तके (कॉमिक्स) आलेत. एका रद्दीच्या दुकानात आम्हाला ती पुस्तके दिसली. मग काय, जमतील तेवढी पुस्तके आणून वाचण्याचा कार्यक्रम झाला. नंतर आलेली ’छोटा चेतन’ची नवीन आवृत्ती हरीश आणि उर्मिला मातोंडकरला सोबत घेऊन. चित्रपटगृहात तर नाही पहायला मिळाली, नंतर एका दूरदर्शन वाहिनीवरच पाहिली. २००३ मध्ये आलेला ’छोटा जादूगर’ सिनेमा ही पुन्हा त्रिमितीच.


खूप वर्षांनी म्हणजे साधारण १८ वर्षांनी पाहिलेला. एवढ्या काळात तो अनुभव थोडाफार विसरून गेलो होतो. पण ह्या चित्रपटाने पुन्हा मजा आली. माझ्या निरिक्षणशक्तीने त्यातील फरक ओळखायचा प्रयत्न केला होताच. आधीचे त्रिमिती चष्मे हे निळ्या आणि लाल काचांचे (प्लॅस्टिक) चे बनविलेले होते. पण हे पूर्ण राखाडी रंगाचे होते. चित्रातही बदल होताच. नेमका काय बदल झाला तो तेव्हा शोधायचा प्रयत्न केला नाही, नंतर केला. पण ती माहिती मी येथे देत नाही. विकिपिडियावर फार चांगल्या रितीने दिले आहे ते. ;)


थोडे शास्त्र आणि तांत्रिक बाजू पाहताना मी वाचलेल्या ऐकलेल्या काही गोष्टी सांगतो. आपल्या दोन्ही डोळ्यांनी मिळून आपल्याला अंदाजे २०० अंशांपर्यंतचे दष्य दिसते आणि एका डोळ्याने फक्त १२० अंशांपर्यंत दिसते. अर्थात फक्त दृष्यविस्तार नव्हे तर दोन डोळ्यांमुळे त्रिमितीचा अनुभव ही येतो. एका डोळ्याने वस्तूची लांबी आणि रूंदी (किंवा उंची) दिसते तर दुसया डोळ्यामुळे त्या वस्तूची खोली किती आहे त्याचा अंदाज येतो. त्याचा फायदाच होतो. पण ह्यातच एक उलट गोष्ट आहे. सुईत दोरा टाकताना दोन डोळ्यांनी सुईतील छिद्राचा अंदाज येत नाही त्याकरिता आपल्याला एक डोळा बंद करून द्विमितीचा उपयोग करावा लागतो.


असो, शास्त्र बाजूला ठेवून इतर भाग. त्रिमिती चित्रपटांप्रमाणेच आणखी एक प्रकार फार पहायला मिळतो, तो म्हणजे होलोग्राम. एखादे चिन्ह किंवा चित्र त्रिमितीचा आभास निर्माण करून दाखवले जाते. हा प्रकार लहानपणी वापरलेल्या पट्ट्य़ांमध्ये ही पहायला मिळाला होता. पण मुख्यत्वे, एखादी वस्तू ओरिजिनल किंवा अस्सल आहे हे ओळखण्याकरीता उत्पादक आपल्या उत्पादनावर आपले मानकचिन्ह होलोग्राममध्ये बनवून चिकटवितात. आता जर नकली उत्पादकानेही तसाच होलोग्राम बनविला असेल तर त्यामध्ये अस्सल कोणते आणि नकली कोणते हे ओळखण्यात काही वेळा गल्लत होऊ शकते असे मला वाटते. :)


गेल्या वर्षी पुन्हा ३ त्रिमिती चित्रपट पाहिले. एक पूर्ण ऍनिमेशन (Ice Age 3), दुसरा मिश्र (G Force) आणि तिसरा संपूर्ण नेहमीसारखा (Final Destination 3D). ह्यातही दाखविले जाणारे चित्र तसेच चष्मा ह्यात बदल वाटला. तसेच भरपूर चित्रपट त्रिमितीमध्ये येत आहेत असे जाहिरातींत दिसले. एका मित्राने सांगितले की ते तंत्रज्ञान विकसित केल्याने त्रिमिती चित्रपट बनविणे थोडे सोपे झाले असल्याने धडाधड त्रिमित्री चित्रपट बनत आहेत. त्याचा फायदा आपल्यालाच.


त्यानंतर चर्चा वाढलीय त्रिमिती दूरदर्शन संचाची. एका संचासोबत १ ते २ त्रिमितीदर्शक चष्मे. कारण थेट त्रिमिती आभास तर मिळू शकत नाही. त्यामुळे चित्रपटगृहाचा अनुभव घरी एवढाच फरक असेल का? इतर देशांनंतर आपल्या देशात ह्याचे आगमन नेहमीपेक्षा लवकर झाले असे वाटतेय. ह्या दिवाळीत तर काय त्रिमित्री दूरदर्शन संच आणि LED संचांची भलतीच जास्त जाहिरात होत होती. आमचा घरचा दूरदर्शन संच बिघडण्याच्या मार्गावरच आहे. त्यामुळे एकाने सल्ला दिला, थोडे थांबून 3D संचच घे. पण मला तसे वाटत नाही. कारण एक तर त्याची किंमत भरपूर जास्त आहे. इतर देशांत तरी त्रिमिती वाहिन्या बनविणे चालू झाले आहे. पण भारतात तशा वाहिन्या बनण्याला बहुधा ३/४ वर्षे जातील असे मला वाटते. पण ज्याप्रकारे दूरदर्शन संच जरा जास्त वेगात भारतात आले त्याच वेगात वाहिन्याही आल्या तर काय सांगता येत नाही. असो. पण मी तरी सध्या त्रिमिती दूरदर्शन संचाच्या मागे नाही.


आता गेल्या महिन्यापासून त्रिमिती भ्रमणध्वनीची ही जाहिरात येत आहे. त्यात वापरायचा पडदा तसेच व्हिडियो त्रिमितीमध्ये दिसेल असा त्यांचा दावा आहे. मी तरी अजून तो भ्रमणध्वनी पाहिला नाही आहे. पण त्यात बिना चष्म्याने त्रिमितीचा अनुभव मिळणे कितपत शक्य आहे अशी शंका वाटते. अर्थात होलोग्रामप्रमाणे तर असेलच किंवा त्याहीपेक्षा भरपूर जास्त. पण तंत्रज्ञानाने आघाडी घेतली असेल तर चांगलेच आहे.


असो, आता एवढे त्रिमितीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाल्याने दर्शक आणि ग्राहक ह्यांना फायदा आहेच. आणखी काय काय पुढे येते ते पाहूच.

नोव्हेंबर ०६, २०१०

एवढी वर्षे  (छापिल) दिवाळी अंक वाचायची सवय असलेल्या मराठीजनांना गेल्या २/३ वर्षांपासून आंतरजालावरही दिवाळी अंक उदयास येत असलेले पाहिले असतील. ह्यावर्षी तर त्यांची रेलचेलच दिसत आहे.

कागदी पुस्तकांतील दिवाळी अंकांची किंमत वाढतच चालली असूनही त्यांची मागणी आणि खप तसाच टिकून आहे असे मला वाटते. त्याच जोडीला आता हे आंतरजालीय (इ) दिवाळी अंक ही आहेत.

बहुतेकांना ह्या अंकाची माहिती आणि संकेतस्थळ पत्ता माहित असेलच. तरीही ज्यांना माहित नसेल त्यांच्याकरीता ती यादी येथे देत आहे.
मी तरी अजून सर्व पाहिली नाही आहेत. काही चाळली आहेत. आता वाचावयास सुरूवात करेन. जमल्यास त्यांबाबतचे मतही लिहेन :)

जाता जाता: ह्यासोबतच मी वाचण्यास घेतलेल्या छापील दिवाळी अंकांचीही यादी लिहून देतो.
  • लोकप्रभा
  • आवाज
  • मौज
  • मस्त भटकंती
  • धनंजय
  • अक्षर
तुम्ही वाचलेल्या दिवाळी अंकाबद्दलही मत कळवावे.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter