मार्च २९, २०१०

एखाद्याला शिकण्यासाठी जेव्हा वसतीगृहात रहावयास जावे लागते तेव्हा घरच्या लोकांपासून दूर राहिल्याचे अर्थात वाईट वाटतेच. पण वेगळ्या एका जगात राहिल्याचा अनुभवही मिळतो. मग त्यात एकत्र राहून आणि मोठे कोणी रागवायला नसल्याने गंमती करण्यालाही मोठा वाव मिळतो. माझ्या अशाच काही गंमतीदार आठवणी इथे सांगत आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना, पहिल्या वर्षाचे वसतीगृह हे महाविद्यालयाच्याच आवारात होते. आमच्या खोलीच्या खिडकीतून महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता दिसायचा. रस्ता दिसायचा म्हणजे महाविद्यालय लांब नव्हते, समोरच होते.  त्या रस्त्यानेच समोर उजवीकडे महाविद्यालय, डावीकडे उपहारगृह (कँटीन हो).  परीक्षेच्या आधीचे अभ्यासाच्या सुट्यांचे दिवस. नगर जिल्ह्यातील उन्हाळा म्हणजे तसा कडकच. (थंडी ही तशीच कडक.)  दुपारचे जेवण झाले होते.  नंतर थोड्याफार गप्पा मारून अभ्यास करत होतो.  तेव्हा आमच्यातील एकाला गंमत करायची हुक्की आली.  बाहेर एक मुलगा महाविद्यालयाच्या दिशेने चालला होता.  'शुक शुक' आमच्या खोलीतून आवाज गेला.  बाहेरच्या त्या मुलाने मागे वळून पाहिले. कोण दिसणार आहे?  निघून गेला तो.  पुन्हा दुसर्‍या मुलावर ही तीच क्रिया. त्याचीही तशीच प्रतिक्रिया. आमचे हे काम सुरू.  काही मुले न वळताच निघून जायची.  काही वळून बघायची.  एकाची तर गंमत झाली.  तो मागे वळून बघतोय.  कोणी दिसले नाही.  ऊन येत असल्याने डोळ्यांच्यावर कपाळावर हात ठेवून पहायचा प्रयत्न करत होता.  "ए, कोण आहे रे?" शेवटी तो कंटाळून निघून गेला. मी मित्राला म्हटले, 'बस झाले'.  पण मग त्याने पुन्हा 'शुक शुक' केले.  पाहतो तर आमच्या वसतीगृहाचे सर मागे वळून पाहत होते. काही झाले नाही.  पण पुन्हा शुक शुक नाही केले कोणी.

अशीच गंमत दुसर्‍या एका मुलाने त्याच्या खोलीतून केली. मी त्याच्या खोलीत बसलो होतो. काहीतरी विषयावर बोलणे चालले होते. एवढ्यात ह्याने हाक मारली." ए ____", इथे ___ म्हणजे एका मुलाचे आडनाव. 
मी विचारले;  'काय झाले?'
हा म्हणतो, "काही नाही, गंमत."
बाहेरून आवाज आला, " कोण आहे रे?"
आम्ही काही उत्तर दिले नाही. ह्याने पुन्हा हाक मारली.  बाहेरून पुन्हा तोच प्रश्न. जवळपास अर्धा तास हीच गंमत. आम्ही शांत झालो असतो, पण तो काही विचारणे सोडत नव्हता.  कोणी ही येत असेल त्याला 'ए, तू हाक मारलीस का?' विचारत होता. शेवटपर्यंत त्याला कळले नाही कोण हाका मारत आहे ते. 

पहिल्या सत्राच्या परीक्षेच्या आधीच्या सुट्ट्यांचे दिवस. एका संध्याकाळी मी दुसर्‍या विंग मधून स्वत:च्या खोलीकडे येत होतो. आमच्या विंग मधून जोरजोरात आवाज येत होता मुलांच्या ओरडण्याचा. 'ए ए..ए ए' करत.  वाटले कोणावर तरी कोणी ओरडत असेल काही केले म्हणून.  पण खोलीपर्यंत येईपर्यंत आवाज वाढत गेला. एक एक करत सर्व खोल्यांमधून मुले बाहेर येऊन ओरडायला लागली. आता खरं तर प्रत्येक विंग मध्ये प्रत्येक मजल्यावर कोणी ना कोणी सर 'रेक्टर' म्हणून राहत असतात. पण त्यांची परत येण्याची वेळ साधारणतः जेवणाच्या नंतरचीच म्हणजे ७-८ च्या नंतरचीच धरायची.  इथे मुलांचे ओरडणे ही जेवणानंतरच सुरू झाले होते.  पण वसतीगृहात बहुधा एकही रेक्टर नव्हते.  त्यामुळे हा आवाज वाढतच गेला, आणि दोन्ही विंग मधून.  आवाज का कोणी सुरू केला काहीच माहित नाही.  काही मुलं अभ्यासाला वाचनखोलीत गेलेली होती त्यांनी रात्री आल्यानंतर सांगितले की, कॉलेजच्या आवाराच्या मुख्य द्वारापर्यंत तो आवाज येत होता.  शेवटी काही सर व सुरक्षारक्षक आले त्यानंतर तो आवाज थांबला होता.

ह्यानंतर, एका रात्री मी अभ्यास करून झोपण्याच्या तयारीत होतो. रात्रीचे २:३०-३:०० वाजले असतील. पलंगावर आडवा पडणार तोच 'ढूम्म्म्म्म्म' असा मोठ्ठ्याने आवाज झाला.  सुतळी बॉम्व फुटला होता. संडासात कोणीतरी बॉम्बला उदबत्ती लावून टाईमबॉम्ब बनवला होता. (पण अर्थातच कोणी लावला ते कळणार नव्हतेच.)  सर्व पोरं बाहेर धावत आली.  माझा खोलीतील मित्र झोपेतून उठून धावत सुटला होता.  त्याला नंतर विचारले, 'असे का', तर तो म्हणाला, स्वप्नात होता आणि अचानक आवाज आला. त्याला वाटले की वसतीगृहाची पाण्याची टाकीच फुटली की काय? 

खानावळीतील जेवण म्हणजे एक प्रकारचे दिव्यच. पहिल्या २/३ आठवड्यातच माझा खोलीमित्र म्हणाला होता की, 'हे लोक असे अर्धे कच्चे जेवण देतात. ह्याची सवय झाली तर घरी गेल्यावर चांगले, पूर्ण शिजलेले जेवण खाऊन पोटात दुखायला लागेल.'  पोळ्या तर पाहूनच वाटायचे की कणकेचा गोळा थोडासा भाजून दिलाय.  तसे पोळी गरम असली की खाल्ली जायची.  पण थंड झाली की.... त्यामुळे स्वयंपाकघरातून पोळी घेऊन कोणी वाटणारा आला की सर्व तुटून पडायचे.  मग एखाद्याला दुसरे काही घ्यायचे असेल आणि ताटात चांगली पोळी असेल तर तो मग भाजीचा रस्सा त्यावर ओतून/लावून जायचा, त्यामुळे कोणी ती पोळी उचलणार नाही.  :)

जेवणावरून आठवले.  रविवारी आम्हाला खास जेवण असायचे.  म्हणजे मांसाहारी किंवा मग शाकाहारी मध्ये ही खास पनीरची भाजी, श्रीखंड, पुरी वगैरे. आणि रात्री जेवण नसायचे.  त्यामुळे मुलांना गावात जेवायला जायला लागायचे, जे २ किमी दूर होते.  म्हणून आमच्या कॉलेजच्या कँटीन मालकाने मुलांना तिथेच रात्रीचे जेवण द्यायचा विचार केला. १५ रू त अमर्यादित.  मुलांनी त्याचा फायदा घेण्यास सूरूवात केली.  पण एकदा एका मुलाने त्या अमर्यादित थाळी मध्ये एवढे खाल्ले की पुढच्या वेळेपासून त्यांनी ते देणेच बंद केले. असेही ऐकले आहे की ह्याच मुलाने एकदा खानावळीत जेवण झाल्यानंतर, फक्त पैज लावली म्हणून एक पूर्ण घमेलाभर भात खाऊन संपवला होता.

होळीच्या वेळी आम्हाला महाविद्यालयाने सुट्टी नव्हती दिली म्हणून सर्व मुलांनी ठरवले की आपणच जायचे नाही.  त्यांनी वसतीगृहाचे मुख्य द्वारच बंद करून ठेवले जेणेकरून कोणी बाहेर जाऊ शकणार नाही.  मला आणि काही जणांना हे काही माहित नव्हते.  आम्ही ही वर्गात जाऊन बसलो होतो.  बरं, सर्व मुले त्याच वसतीगृहातच राहत होती असे नाही.  पण बाहेरून येणार्‍या मुलांनाही अंदाज आलाच होता की मुलांनी न यायचे ठरवले आहे ते.  पण कळले की कोणी येत नाही, म्हणून कोणी शिकवायला यायच्या आधीच पळून आलो. आणि खोलीवर आल्यावर मित्रांच्या शिव्या खाल्ल्या. पण त्यादिवशी कोणी वर्गात गेले नाही.

मुलांनाच त्रास देणे गंमती करणे हे तर नेहमीचेच. पण सरांनाही सोडले नाही. एक सर खूप शिस्त पाळायला सांगायचे.  मुलांना ते आवडायचे नाही.  मग एक दिवस त्या सरांच्या खोलीला सकाळी ते बाहेर यायच्या आधी बाहेरून २ कुलुपे लावून टाकली आणि त्याहूनही गंमत म्हणजे सर्व मुले त्या दिवशी वसतीगृहातून बाहेर पडली.  म्हणजे जी मुले दांड्या मारायची ती सुद्धा. (आता ती वर्गात गेली की बाहेर ते माहित नाही.)  शेवटी खानावळीतल्या मुलांना कळल्यावर त्यांनी ती कुलुपे तोडून दरवाजा उघडला.

अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तर गंमत चालतच होती.  पण शेवटी, म्हणजे पहिल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कहर केला. परीक्षा संपली. वसतीगृहातील खोली रिकामी करून द्यायची होती.  त्यामुळे सर्वजण आपआपली कपाटे साफ करत होते.  जेवढे सामान घरी घेऊन जायचे ते बॅगेत, सूटकेस मध्ये ठेवले.  जेवढे सामान पुढील वर्षाकरीता वापरायचे ते दुसर्‍या पुट्ठ्यांच्या डब्यांमध्ये वगैरे बांधून ठेवले. उरलेले म्हणजे भरलेल्या वह्या, कागदे, वर्तमान पत्रे समोरील व्हरांड्यातून खाली टाकले.  दोन्ही विंग चौकोनी आकाराच्या आहेत. त्यात मध्ये सर्व कागदे जमा झाली.  बहुतेक मुले संध्याकाळी घरी निघून गेली, उरलेले आम्ही रात्री सिनेमा पाहून नंतर गप्पा मारण्याच्या हिशोबाने दुसर्‍या दिवशी जाणार होतो.  सिनेमा पाहून आल्यानंतर गप्पा झाल्या.  सर्व जण झोपले होते.  रात्री दरवाज्यावर ठकठक झाली.  ठकठक कसली, जोरजोरात दरवाजा ठोठावणे चालले होते.  दरवाजा उघडला.  रात्रीचे ३:४५/४:०० वाजले असतील.  खानावळीतील मुलगा म्हणत होता की सर्वांना खानावळीसमोर बोलावले आहे.  बाहेर पाहिले तर धूर दिसत होता.  अंदाज आला काय झाले ते.  कोणी तरी रात्री त्या समोर फेकलेल्या कागदांवर काडी टाकली होती.  आम्ही पोहोचलो बोलावले तिकडे.    सर्व (उरलेली) मुले जमली होती. सर्वांना तातडीने बोलावले होते.  बहुतेक मुले बनियान, हाफ पँटमधेच येऊन बसले होते.  थंडीही वाजत होती.  सरांनी विचारले, 'कोणी केले हे'? माहित तर नव्हतेच आणि माहित असले तरी कोण सांगणार. मग काय, राग देऊन मग आम्हाला सांगितले, तुमचे परीक्षेचे प्रवेशपत्र जमा करून सकाळी ७ च्या आधी वसतीगृह रिकामे करा.  काय करणार? सकाळी ७/७:१५ ला सर्व वसतीगृह रिकामे झाले.  ह्यात त्या कागदं जाळण्याने वसतीगृहाचे नुकसान झाले नाही त्यामुळे हायसे वाटले.

ह्या असल्या गंमती थोड्याफार फरकाने सर्वांनी अनुभवल्या असतीलच. पण जरी बहुतेक लोक असे काही करत असतील, ऐकून माहिती असतील तरी स्वत: अनुभवलेल्या म्हणून ह्या आठवणी नेहमीच सोबत राहतील.

(हाच लेख ’हास्यगाऽऽरवा’ मध्येही प्रकाशित झाला होता)

मार्च २१, २०१०

अलिबाबा आणि चाळीस चोरांच्या कथेत, अलिबाबाला त्या चाळीस चोरांच्या गुहेचा पत्ता आणि परवलीचा शब्द कळला आणि त्याने आत जाऊन त्यातील फक्त हवे तेवढे सोने, दागिने स्वतःकरीता आणले. त्याचा भाई कासिम ह्याने गळ लावून अलिबाबाकडून त्या गुहेचा पत्ता आणि परवलीचा शब्द मिळविला. गुहेत गेल्यावर आतील खजिना पाहून तो वेडाच झाला. त्यात तो परवलीचा शब्द विसरला आणि मग त्या चोरांच्या हाती लागून स्वतःचा जीव गमावून बसला. सर्वांना माहित असलेल्या कथेचा भाग संपला.

अलिबाबाची कथा आजच्या जीवनात धरली तर, आपण ह्यातील एकच असे कोणी नाही तर त्यांच्या एकत्रित केलेल्या प्रकारात येतो. आपल्याच महत्त्वाच्या गोष्टी आपण गुहेत परवलीच्या शब्दाने सांभाळून ठेवतो. पण एखाद्याला तो परवलीचा शब्द कोणाला कळला तरी नुकसान होऊ शकते. तसेच आजकाल गळ लावलेले विपत्र येतात (ज्यांना फिशिंग मेल म्हणतात) त्यातही कोणी आपला परवलीचा शब्द इतरांना सांगू शकतो. तिथेही आपण गोत्यात येऊ शकतो. त्याकरीता खबरदारी एवढीच की ते सदस्यनाम आणि परवलीचा शब्द सांभाळून ठेवणे.

आंतरजालावर आपण विविध ठिकाणी खाते उघडलेले असते. विपत्र, आंतरजालीय बँक, खरेदी, संगणक संबंधी चर्चास्थळे, सामाजिक संकेतस्थळे, वैयक्तिक संकेतस्थळे. तसेच कार्यालयातील संगणकात प्रवेश, त्यात मग त्यांची विविध प्रकारचे संकेतस्थळे, सॉफ्टवेयर... वगैरे वगैरे. आता ह्यात एकदम सुरक्षित रहावे अशा गोष्टी म्हणजे बँक, क्रेडीट कार्ड, विपत्र ह्यांची खाती आणि कार्यालयातील विविध गोष्टी. इतर ठिकाणी सहसा कुणी तुमच्या खाते आणि परवलीचा शब्दाच्या मागावर राहत नाही. आणि त्यात परवलीचा शब्द विसरलाच तर त्या ठिकाणी "परवलीचा शब्द विसरला आहात का?" पर्यायाने आपण तो जुना शब्द रद्द करून नवीन बनवू शकतो. तिथे काही बंधने नाहीत की ठराविक प्रयत्नांनंतर तुमचे खाते गोठविण्यात येईल. पण बँक आणि क्रेडीट कार्ड करीता ही बंधने असतात. (अर्थात आपल्याच सुरक्षिततेसाठी). त्यामुळे तो परवलीचा शब्द विसरणे काही वेळा अडचणीचे ठरवू शकते. कारण नवीन शब्द बँकेने बनबून द्यायला ७ दिवस जाऊ शकतात. कार्यालयातही एकवेळ ठिक आहे, तिथे संबंधित विभागाला सांगून आपण तो लगेच चालू करू शकतो. 

वेगवेगळ्या ठिकाणचे सदस्यनाव व परवलीचा शब्द लक्षात ठेवणे थोडे वैतागाचे काम आहे. त्यात आजकाल मी हे शब्द विसरणे हे वाढत चालले आहे. ह्या संकेतस्थळावर हे सदस्यनाव आहे. त्याचा परवलीचा शब्द काय आहे बरे? ह्यातच काही वेळ निघून जातो. अर्थात महत्त्वाची संकेतस्थळे जसे नेहमीच्या वापरातील बँक, विपत्र खाते ह्याचे सदस्यनाम मी सहसा विसरत नाही. पण काही वेळा अडचण येते नवीन खाते उघडले तेव्हा नवीन परवलीचा शब्द दिले असले तर आणि काही वेळा नुकतेच परवलीचा शब्द बदलले असले तर. त्यामुळे एक दोन वेळा माझे खाते बंदही पडले आहे. मग पुन्हा बँकेला फोन करून तो नवीन बनविणे हे आलेच.
त्याकरीता केलेले काही प्रयत्न असे:
  • काही वेळा त्या खात्याशी संबंधित परवलीचा शब्द ठेवणे जरा सोपे वाटते. पण आपल्या नावासोबत इतर खाजगी माहितीतील संदर्भ वापरणे ही धोक्याचे ठरू शकते. तरीही त्यात ठराविक साच्याप्रमाणे परवलीचा शब्द ठरविणे मी काही वर्षांपासून केले होते. पण त्यातही आता तोच तोच पणा आला असे वाटते. म्हणून तो प्रकारही बदलवला आहे.
  • सगळीकडे एकच परवलीचा शब्द ठेवणेही चुकीचे. कारण एखाद्याला तो परवलीचा शब्द कळला तर मग काम संपले. तसेच तो साचाही कळला तरी अडचण.
  • तसेच आंतरजालावर विविध सॉफ्टवेयर उपलब्ध आहेत परवलीचा शब्द जपून ठेवण्याचे. म्हणजे तुम्ही त्यात खाते नाव आणि परवलीचा शब्द लिहून ठेवा व ती फाईल एका वेगळ्या परवलीचा शब्दाने सुरक्षित ठेवा. ह्यातही वेगळी अडचण. जर त्या एका फाईलचा परवलीचा शब्द कोणाला कळला तर...
  • माझा एक मित्र त्याचे विविध खाते क्रमांक, सदस्य नाव एका डायरीत लिहीत असे. त्याला विचारले "काय रे ह्यात परवलीचा शब्दही ठेवतोस का? तुझी डायरी एकदा पळवली पाहिजे ;) " मी हा प्रकारही आधी केला होता. डायरी पळवण्याचा नाही, सदस्यनाम आणि परवलीच्या शब्दाचा संदर्भ लिहून ठेवण्याचा. :) आता नाही करत. स्वत:ची स्मरणशक्ती चांगली आहे असे वाटून ते बंद केले.
  • मध्ये अशाच एका चर्चेत मी कोणालातरी परवलीचा शब्द ठरवण्याचे थोडे प्रकार सांगितले होते.त्यातील एक म्हणजे सिनेमाचे नाव किंवा त्याची पहिली अक्षरे. ह्यांचे एकत्रित शब्द पण तेही आता नीट वाटत नाही आहेत.
तर मी परवलीचा शब्द न विसरणे किंवा तो लक्षात कसा ठेवणे ह्या विचारात आहे. हे लिहित असतानाच माझी दुनिया ह्यांनी लिहिलेल्या ब्लॉगवर एक प्रकार मिळाला. तो कसा आहे हे सध्या पडताळून पाहत आहे.

आणखीही इतर नवीन प्रकार कोणी सुचवू शकतो का?

मार्च ०८, २०१०

आजही एका मुद्द्यावर संसदेत गोंधळ झाला आणि संसदेचे काम तहकूब करावे लागले. ह्या लोकांना कामे न करता गोंधळ घालणेच माहित आहे. फक्त स्वत:च्या पगारवाढीच्या प्रस्तावाला मात्र बिनविरोध पाठिंबा देतात. आणि आज तर विरोधी नाही तर सत्तेतील स.पा. आणि रा.ज.द. पक्षांनीच गोंधळ घालत विधेयकाची प्रत फाडून टाकली. (चलचित्र आणि बातमी संदर्भ सध्या मटाचा देत आहे.)

नोव्हें ०९ मध्ये ह्याच समाजवादी पार्टीच्या अबू आझमीने मराठीत शपथ नाही घेतली म्हणून गोंधळ घातला तर ४ मनसे आमदारांना निलंबित केले होते. ते विधानसभा आणि आज संसद भवन. काही असले तरी सभागृहाचा अवमान करणे दोन्हीकडे मान्य नाही असे वाटते.

ह्या पार्श्वभूमीवर त्या गोंधळ घालणार्‍या लोकांवर काँग्रेस सरकार काय कारवाई करते (बहुधा सरकार नाही करू शकत. पण शेवटी त्यांच्या मर्जीनेच सर्व चालत आहे) आणि मनसेचे आमदार ह्याबाबत काही म्हणतात का ह्याकडे सध्या लक्ष द्यावेसे वाटते.

मार्च ०१, २०१०

परवा रात्री एका वाहिनीवर जाहिरात पाहिली. एक बाई स्वतःच्या पिशवीत 'टाईड' घेऊन आहे. तिच्या बाजूला 'रिन' असलेली पिशवी ठेवून दुसरी एक बाई उभी राहते. त्यांचा नेहमीप्रमाणे संवाद. ह्यात हे आहे, ते आहे. थोड्या वेळाने शाळेच्या बसमधून दोघांची मुले उतरतात. पहिला मुलगा टाईड वालीचा. शर्ट पिवळसर दाखवला आहे. दुसरा मुलगा उतरतो, त्याचा शर्ट एकदम पांदराशुभ्र असतो. पहिल्या मुलाची आई आश्चर्यचकित होते. दुसरा मुलगा म्हणतो, "मम्मी, आँटी क्यों चौंक गयी?" ('टाईड'ची टॅग लाईन 'क्यों? चौंक गये?" आहे :) ) शेवटी सूत्रधार म्हणतो की रिन टाईडपेक्षा कसे जास्त चांगले आहे.

ह्या प्रकारे दुसर्‍या कंपनीच्या उत्पादनासोबत थेट तुलना, वर्चस्व दाखविण्याचे प्रकार इतर देशांच्या जाहिरातींमध्ये असतात हे आंतरजालावरील विडियो पाहून दिसतच होते. पण भारतात तरी पाहून नव्हते. नाही म्हणायला, कोक आणि पेप्सीच्या स्पर्धेत विडंबनात्मक जाहिराती  येत होत्या. किंवा दुसर्‍या कंपनीच्या टॅग लाईनचा वापर करून तुलना करणे दाखविले जात होते. उदा. व्हील च्या स्पर्धेत चक्र का चक्कर छोड., I wanna Dew च्या तुलनेत डोन्ट डू यहाँ, डू वहॉ. वगैरे ही पाहिले होते.
अरे हो, आत्ताच आंतरजालावर शोधल्याप्रमाणे कॉम्प्लॅन वि. हॉर्लिक्सची जाहिरात दिसली. पण त्यावरही खटला चालू होता असे वाचले.

तर आता भारतातही अशा रंगाच्या जाहिरातीही सुरू झाल्यात असे दिसते. आणि कोणकोणते रंग दिसतात ते पाहूच.

असो, आता एक न मागता दिलेला सल्ला: आजच्या रंगपंचमीनंतर रंगलेले कपडे कोणत्या कपड्यांच्या साबणाने धुवावेत हे आता थेट टीव्हीवरील तुलना पाहूनच ठरवा ;)

ह्यावरूनच आठवले.साधारण १५-१७ वर्षांच्या आधी  कॅडबरीने त्यांच्या चॉकोलेटची पाकिटे ठराविक नगात परत करणार्‍यांना काही बक्षिसे दिली होती. त्यात आम्ही घेतले होते एक साबण. त्या साबणाचा उद्देश हा की एखाद्याला तोंड धुताना हे साबण द्यायचे. ते वापरल्याने त्याच्या तोंडाला काळा रंग लागलेला दिसतो. मुलांना गंमतीकरती हे छान होते. रंगात खेळल्यानंतर आम्ही मुलांनी ह्या साबणाचा वापर केला तेव्हा लक्षात आले की साधारण साबणाने जे रंग निघत नव्हते तेही ह्या साबणाने निघत होते. तेव्हा असेच काही उत्पादन आजच्या दिवसातही उपलब्ध असेल तर पहा. :)

(आज सकाळीच हे लेखन टाकणार होतो. पण माझ्या आंतरजाल सेवा प्रदात्याने काहीतरी अडचणींमुळे संध्याकाळपर्यंत मला आंतरजालावर भटकंती करू दिली नाही. जाता जाता त्याला थोड्याफार शिव्या ;))

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter