मार्च २९, २००९

If anything can go wrong, it will - Murphy's Law.
तुम्हाला सर्वांना मर्फीचे नियम माहित असतीलच. त्याच धर्तीवर मी एका नियमाची प्रचिती गेल्या १ वर्षापासून घेत आहे. त्याबाबत थोडेसे.

सकाळी कार्यालयात जाण्याकरीता कार्यालयाची बस वापरतो. आता त्या थांब्यापर्यंत घरापासून चालत जाण्याचा कंटाळा तर आहेच, पण सकाळी सकाळी काही कारणाने उशीर झाला, तर आहे ती एकच बस सुटायची आणि मग BEST च्या बसमध्ये जाण्याने पुन्हा उशीर व्हायचा. म्हणून मग स्कूटरने आमच्या बसच्या Pick-up point पर्यंत जातो. तिथे उड्डाणपुलाखाली स्कूटर लावून मग बसने पुढे जायचे. आणि संध्याकाळी बसने तिथपर्यंत येऊन स्कूटरने पुन्हा घरी परत.

ह्यात परत निघताना काय होते की, मला परत येण्याकरीता रस्ता ओलांडून सर्व्हिस रोडवर यावे लागते. पण त्यावेळेला जर उड्डाणपुलाच्या दुसर्‍या बाजूने येणार्‍या गाड्यांना हिरवा सिग्नल मिळून गाड्यांची वर्दळ सुरू झाली तर कमीत कमी १० मिनिटे तरी थांबावे लागते रस्ता ओलांडण्याकरीता. आता मी आमच्या बसमधून उतरून स्कूटरपर्यंत येईपर्यंत जरी ओलांडायच्या रस्त्यावर वर्दळ नसली तरी नेमके बाहेर पडताना तो दिवा हिरवा होतो आणि मला थांबावे लागते. मी काही वेळा लवकर बाहेर पडायचा प्रयत्न ही केला, पण जमले नाही. तसेच काही वेळा तर तो रस्ता मोकळा दिसल्याने स्कूटर पुसणे ही वगळले (बसायची सीट झटकून). पण व्यर्थ. तो दिवा/सिग्नल नेमका मी बाहेर निघायच्या थोडा आधी हिरवा होतो. आणि माझा रस्ता बंद. फार कमी, म्हणजे हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या वेळा मी लगेच बाहेर पडलो असेन.

ह्यावरूनच मला मग नवीन नियम सुचला.
"तुमचा रस्ता ओलांडायची आणि गाड्यांना हिरवा सिग्नल मिळायची वेळ ही जास्तीत जास्त वेळा एकच असते." ;)

मार्च २८, २००९

गेले एक आठवड्यापासून 'अर्थ अवर' विषयी वाचत होतो. बहुतेकांनी ह्याला पाठिंबा दिलाच होता. मी ही विचार करत होतो करावे की नाही. आपल्या येथे वीज महामंडळ रोज ३-४ तास भारनियमन करत असतेच. पण त्याला कोणी "अर्थ ४ अवर्स" म्हटले नाही. ;)अर्थात एक तास वीज बंद ठेवणे जमण्यासारखे होतेच. पण नंतर जास्त लक्ष देता आले नाही. १-२ दिवसांपूर्वी आमच्या कार्यालयातूनही ह्याबाबत ईमेल पाठवून ह्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तेव्हाही थोडेफार बोलणे होऊन नंतर तो विचार बंद पडला.

अर्थ अवर आणि मी:
आज रात्री ८:२५ वाजता पुन्हा आठवण झाली. म्हटले प्रयत्न करूया. पण पूर्ण घराची वीज लगेच बंद करणे शक्य नव्हते. (मंडळाने वीज बंद केली असती तर तो भाग वेगळा. पण आपण थोडाफार स्वार्थ दाखवतोच.) म्हटले पूर्ण घर नाही तर जमेल तेवढे. लगेच संगणक बंद केला. दिवाणखान्यातील (हॉल ला दिवाणखानाच म्हणतात ना आजही?) दिवे बंद केले. पण टीव्ही बंद केला नाही. सोबत चालू होता स्वयंपाकघरातील दिवा. जेवण बनत होते हो, ते थांबविणे जीवावर आले ;) पुढे मग ९:३० वाजताच दिवे चालू केले.

अर्थ अवर आणि इतर:
वृत्तवाहिन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया/न्यूझीलंड ह्यांनी 'अर्थ अवर'ची सुरूवात केली होती त्याची दृश्ये दाखवत होते. नंतर मग स्टार न्यूज वर दाखवत होते की, थोड्याच वेळात 'अर्थ अवर' चालू होणार आहे. म्हटले बघूया, हे लोक काय करतात? वाटले हे लोक स्वतः काही करणार नाहीत पण लोकांना सांगतील. पाहिले तर स्टार न्यूज/आजतक/२४ लाईव/CNEB ह्या वाहिन्यांनी स्टुडियोमधील अनावश्यक दिवे बंद केले होते. स्टारने सांगितले की मुलांच्या परीक्षा चालू असल्याने तुम्हाला सर्व दिवे बंद करणे शक्य नसेल पण सर्व अनावश्यक दिवे बंद करावेत. बाकी वाहिन्यांना ह्याच्याबद्दल काही म्हणणे नव्हते. त्यांचे आपले निवडणुकांवरचे नेहमीचे रटाळ कार्यक्रम चालू होते. वास्तविक मला वाटले होते की ह्या वृत्त वाहिन्यांनी एक तास आपली वाहिनी बंद ठेवली असती तर त्याचा चांगला आदर्श ठेवता आला असता (आणि त्यायोगे प्रेक्षकांचीही सुटका झाली असती ;) ) जाऊ द्या, त्यांच्याही आपल्या अडचणी असतील.

सोबत एक परस्पर विरोधी गोष्ट जाणविली. मुंबईत (बहुधा बोरीवलीत) Vote For Earth म्हणून कार्यक्रम चालू होता. तेथे नाचगाणे चालू होते. पण त्यांनी भरपूर दिवे वापरले होते. आता लोकांना सांगतात की 'एक तास दिवे घालवा', स्वतःही घालवले असतील. पण तेवढीच वीज त्या कार्यक्रमात का घालवावी?

असो, मी स्वतः जेथे पूर्ण वीज बंद नाही केली तिथे त्यांना ब्रह्मज्ञान का देऊ? पण ह्या निमित्ताने सर्वांसोबत काहीतरी चांगले केल्याचा आनंदही आहे. पुढेही आणखी चांगले करायचा प्रयत्न करीन :)

मार्च २७, २००९

"एक लहान मुलगा. आई सांगते, 'आज खेळणे बंद'. तो मुलगा दु:खी होऊन खिडकीबाहेर मित्रांना खेळताना पाहतो. हळूच एक वस्तू उचलून घराच्या बाहेर जातो. सर्वांपासून दूर जाऊन वडिलांना फोन लावतो. आणि सांगतो की, 'आई मला रागावली तुम्ही तिला रागवा.' ......."
ही जाहिरात बहुतेकांनी पाहिली असेलच. नसेल त्यांनी इथे पहावी.
इतक्या वर्षांत पाहिलेल्या लहान मुलांच्या जाहिरातींपैकी ही मला सर्वात जास्त आवडली. त्या लहान मुलाचा निरागस चेहरा, मित्रांना खेळताना पाहून चेहर्‍यावरचे दु:खी भाव, हळूच लपून बाहेर जाताना घेतलेली काळजी, तसेच आईने खेळायला जायची परवानगी दिल्यानंतर आईला बाबा रागावल्याचा वाटलेला आनंद आणि आपण केलेला फोन उपयोगी पडला ह्याचे आश्चर्य. सर्व वेगवेगळे भाव मला खूप आवडले. अरे हो, त्याचे पार्श्वसंगीतही छान आहे.
आणि सर्वात शेवटी सूत्रधाराचे वाक्य, 'आज एक विश्वास आहे की आपल्या लोकांपासून आपण दूर नाही.' जाहिरातीतून दाखवलेला मुलाचा विश्वास हेच सांगतो.
(पुढील वाक्य एअरटेलच्या नेटवर्क बद्दल सांगते, तो विश्वास कितपत खरा आहे तो वेगळ्या वादाचा विषय आहे ;) )
अर्थात एअरटेलच्या इतर जाहिराती ही चांगल्या होत्या. तसेच मुलांच्या इतर चांगल्या जाहिरातीही भरपूर आहेत. पण मला ही जाहिरात त्यातील आशय आणि त्या मुलामुळेच जास्त आवडली.

मार्च २२, २००९

[आय.पी.एल चे सामने भारताबाहेर खेळावयाचे ठरविले गेले त्याच दिवशी मी हे प्रश्न माझ्या अनुदिनीवर लिहिले होते आणि ते मिसळपाव.कॉम तसेच मनोगत.कॉम वरही प्रकाशित केले होते. पण मध्येच पडलेल्या संभ्रमामुळे आणि क्रिकेट तसेच राजकारणावर लिहू नये असे वाटल्याने मी ते सर्व ठिकाणहून काढून टाकले. पुन्हा वाटले की क्रिकेट राहू द्या पण आपल्याशी निगडीत असलेल्या गोष्टींबाबत हे प्रश्न असल्याने पुन्हा माझ्या अनुदिनीवर प्रकाशित करत आहे.  हे लिखाण (निदान इतर संकेतस्थळांवर) अचानक अप्रकाशित का झाले ह्या बाबत कोणास प्रश्न पडल्यास उत्तर म्हणून हे निवेदन. ज्यांनी माझ्या प्रश्नांवर प्रतिक्रिया लिहिल्या होत्या त्यांचे आभार. :) ]
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार आय.पी.एल. अर्थात IPL चे T20 सामने भारताबाहेर खेळवण्याचे ठरविले आहे.
ह्या मागील कारण हेच की लोकसभा निवडणुकाही त्याच काळात होत असल्याने सामन्यांच्या दरम्यान सुरक्षितता देणे पोलिसांना कठीण आहे व बहुतेक राज्य सरकार तसेच पोलिसांनी त्यास नकार दिला आहे.

ह्यावरून काही प्रश्न मला पडलेत ते असे.
१. क्रिकेटला एवढे महत्त्व का? सामने पुढे ढकलणे जमू शकले नसते का? २/३ वर्षांकरिता क्रिकेटच्या सामन्यांचे वेळापत्रक ठरविलेले असेल त्यामुळे ते कठीण आहे. पण हे सामने मुख्यत्वे भारताशीच निगडीत आहे. फक्त इतर देशांचे खेळाडूही त्यात आले आहेत, त्यामुळे निवडणुका असल्यास ते पुढे ढकलणे योग्य नाही का?
२. जर सामने आधीच ठरविले होते, तरी आपल्या निवडणुका एप्रिल-मे दरम्यान होऊ शकतात ह्याचा त्यांनी विचार केला नव्हता का? केला असल्यास सुरक्षिततेबाबतचा प्रश्न तेव्हाही विचारात असायला पाहिजे. तो आत्ताच का समोर आला? आणि मग आता सरकारला दोष का द्यावा?
३. एक कारण सांगतात की सामने रद्द केल्यास आर्थिक नुकसान होउ शकते. पण आता तर एका देशातून दुसर्‍या देशात सामने ठेवणार तेव्हा त्यात खर्चाचा प्रश्न नाही येत का?
४. सामन्याच्या वेळी ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या खेळाडूंच्या मतदानाबाबत काय? उदा. निवडणूकीचे वेळापत्रक आणि सामन्यांचे वेळापत्रक पाहिल्यास कर्नाटक मध्ये २३ एप्रिल ला मतदान होणार आहे. त्याच दिवशी बँगलोर रॉयल चॅलेंजर्सचा सामना आहे. त्याबाबत काय? फक्त खेळाडू सोडा पण इतरही सदस्य त्यांच्या सोबत असतील त्यांच्या मतदानाचे काय? त्यांना बहुधा दुसर्‍या राज्यात त्या राज्याच्या मतदानाच्या दिवशी मतदानाची परवानगी देऊ शकतात का? दिली तरी हा अपवाद बरोबर आहे का? हाच अपवाद इतर खेळांकरीता मिळाला असता का?
५. आय पी एल च्या सामन्यांकरीता सुरक्षा मागणारे नेते, आताही जेथे सुरक्षिततेची नेमकी गरज आहे अशा संवेदनशील ठिकाणी पोलीस सुरक्षा वाढवून घेण्यात पुढाकार का घेत नाहीत? तसेच देशातील/राज्यातील इतर महत्वाच्या मुद्यांवर लक्ष देण्यापेक्षा क्रिकेटवर जास्त लक्ष का?

प्रश्न सध्या तरी संपले :)

मार्च २१, २००९

दोन आठवड्यांपूर्वी रेडियो मिर्ची वर किशोर कुमारचे 'पडोसन' चित्रपटातील 'मेरे सामने वाली..' हे गाणे ऐकले. पण खास गोष्ट म्हणजे ते गाणे दुख:द छटेचे आहे. सिनेमात किंवा कॅसेटमध्येही ते गाणे कधी पहायला/ऐकायला मिळाले नाही. आंतरजालावर मिळालेल्या माहितीनुसार ते गाणे प्रदर्शित झाले नव्हते. पण ते गाणे ऐकण्यास जरूर मिळाले.

मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है|
अफसोस ये है के वोह हमसे कुछ उखडा उखडा रहता है|
पहले तो हवा उन जुल्फों से खुशबू भी चुराकर लाती थी|
भूले से कभी उडती उडती आवाज भी आ जाती थी|
आवाज से भी महरूम हुए, इस बात का दुखडा रहता है|
मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है|


हे गाणे जर सिनेमात असते तर कोणत्या प्रसंगात असते असा मी विचार करत होतो. घरातील चर्चेनुसार 'भोला' (सुनील दत्त) ला गुंडानी मारल्यावर नंतर असेल. पण मला असेही वाटले की 'बिंदू'(सायरा बानू) जेव्हा मास्टरजीसोबत (मेहमूद) लग्न करण्याचे ठरवते तेव्हा. पण गाण्याचे शब्द आणि प्रसंगांचा ताळमेळ जमला नाही.

म्हटले तुम्हाला विचारू.
तुमच्या मते हे गाणे सिनेमात कुठे असू शकले असते व ह्या गाण्याबद्दल इतर, म्हणजे ध्वनीमुद्रित झाले होते तर सिनेमात किंवा कॅसेटमध्येही का नाही आले वगैरे वगैरे, माहिती मिळू शकेल का?

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter