एप्रिल १५, २०१०

पुढे लिहिलेले चित्रपट मी कमीत कमी २ वेळा तरी पाहिले आहेत (पहिले चार) किंवा एकदाच पाहिले असल्यास पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. त्यानुसार मी हे आवडलेले चित्रपट म्हणून सांगत आहे. ह्या चित्रपटाच्या कथानकाचा, कलाकारांच्या कलेचा दर्जा एकदम उच्च नसला तरी आवडण्यासारखाच वाटला. तसेच आता पाहिल्यास तेवढेच आवडतील का ह्याची खात्री मलाही नाही :) पण तुम्हा सर्वांसमोर ही यादी देण्यासारखे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. तसेच कथानक लिहिण्यास/वाचण्यास आवडत नसले तरी वाचकांना ह्या चित्रपटांची ढोबळ कल्पना यावी म्हणून तेही लिहिले आहे.

यूंही कभी
-एक साध्या, नेहमी लोकांना मदत करणार्‍या माणसाला देव भेटतो व जगाचे रक्षण करण्याकरीता लोकांना संदेश देण्याकरीता सांगतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात घडलेले प्रसंग ह्यात दाखवलेले आहेत.
कलाकार: कुमार भाटिया, अशोक कुमार, अर्चना पुरण सिंह, नविन निश्चल.

ऐसी भी क्या जल्दी है?
-इंग्रजी सिनेमा ’फादर ऑफ द ब्राईड’ वरून घेतलेला सिनेमा. स्वत:च्या मुलीवर अतिप्रेम करणार्‍या व अतिचिंता करणार्‍या वडिलांचे, मुलगी लग्न झाल्यावर घरातून जाईल ह्या कारणाने मुलीच्या आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात/लग्नात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे दाखवले आहे.
कलाकार: सचिन, सॄष्टी बहल, विवेक मुशरन, अर्चना पूरण सिंह

हंसते खेलते
-पृथ्वीवरील वाढते असामाजिकीकरण आणि पृथ्वीचा होणारा र्‍हास पाहून देव पृथ्वीचा संपूर्ण नाश करण्याचे ठरवतो. पण ३ देवदूत त्याला विरोध करतात. तेव्हा देव त्यांना संधी देतो की एका आठवड्यात एखादा माणूस दाखवावा जो स्वार्थ न दाखवता इतरांवर प्रेम करेल व प्रसंगी त्यागही करेल. ह्या प्रकरणी ते ३ देवदूत राहूल रॉय ला निवडतात. त्यांच्या कामात अडथळे आणतो सैतान
कलाकार: राहूल रॉय, असरानी, राकेश बेदी, अनंत महादेवन, इशरत अली.

ढूंढते रह जाओगे
-एक तरूण (अमर उपाध्याय) त्याच्या प्रेमिकेला भेटण्यासाठी ती असलेल्या मोठ्या हॉटेल मध्ये येतो. तिथे एका व्यापार्‍याने (सतीश शहा) आपल्या एका हिर्‍याचा लिलाव करायचे ठरवले असते. तो हिरा चोरण्याकरीता चोर (जावेद जाफरी), एक खुनी (नसीरूद्दीन शाह) हे ही आलेले असतात. त्यांच्यात झालेले विनोदी प्रसंग ह्यात दाखविण्यात आले आहेत.

दो लडके दोनो कडके
-दोन गरीब तरूण पैसे मिळविण्याकरीता एका श्रीमंताच्या मुलाला पळवून आणतात. पण त्यांच्या घरातच दोन चोर चोरी करायला आलेले असताना त्या मुलाला पळवून नेतात. त्यानंतरचे प्रसंग.
कलाकार: अमोल पालेकर, असरानी. बाकीचे आठवत नाहीत :)

तेरा नाम मेरा नाम
-अजीत पाल आणि (बहुधा) बबलू मुखर्जी हे दोन तरूण मित्र. एक ब्राह्मण व दुसरा इतर जातीतला. ब्राह्मण मुलाला नोकरी पाहिजे असते पण तिथे आरक्षणामुळे त्याला मिळत नाही तर दुसर्‍याचे एका मुलीवर प्रेम असते. पण तिचे वडील तो ब्राह्नण नसल्याने त्याला विरोध करतात. म्हणून दोघेही नाव बदलतात. त्यानंतरची कथा दाखविली आहे.
ह्या सिनेमाचे नाव तेव्हा मला माहित नव्हते. पण एकदा दूरदर्शनवर रात्री दाखवला होता तेव्हा पाहिला. तेव्हा बरा वाटला. त्यानंतर पाहिले की ह्याच कथेवर नंतर आशिक मस्ताने (१९९६) आणि तेरे मेरे सपने (१९९६) हे चित्रपट ही बनलेत.

इना मिना डिका (मराठी)
-प्रशांत दामलेला (इना) कुठेही,केव्हाही झोपायची सवय असते. आणि त्याने झोपताना जे छायाचित्र पाहिले असते ते तो झोपलेला असेल तोपर्यंत प्रत्यक्षात येतात. त्याची बायको आणि त्याचा मित्र अशोक सराफ (मिना) त्याला एका डॉक्टरकडे , सुधीर जोशी (डिका) घेऊन जातात. डिका त्याच्या ह्या सवयीचा आणि चमत्काराचा फायदा घेऊन पैसे कमवायचा विचार करतो. त्यानंतरचे कथानक.
नंतर ह्याच नावाचा हिंदी सिनेमाही आला होता, ऋषी कपूर, जुही चावला आणि विनोद खन्ना ह्यांचा. पण त्या चित्रपटाच्या मानाने हा मराठी चित्रपट चांगलाच वाटला ;)

ही यादी पूर्ण नाही आहे. पण सध्या एवढेच आठवत आहेत. जमल्यास पुन्हा लिहिन.
तुम्हालाही असे काही वेगळे चित्रपट आवडले आहेत का?

एप्रिल ०५, २०१०

'ब्लू' नावाचा सर्वात जास्त खर्च केलेला हिंदी सिनेमा चालला नाही आणि २ ते ३ महिन्यात कलर्स वाहिनीवर दाखवण्यात आला. त्यानंतर 'अजब प्रेम की गजब कहानी', अलाद्दीन वगैरे चित्रपटही फार थोड्याच दिवसांत दूरदर्शन वाहिन्यांवर दाखविण्यात आले. ह्यावरून मनात सर्वसाधारणपणे विचार येत होते की हे चित्रपट चालले नाहीत म्हणून दाखवतात का? त्यातच काल मटामध्ये हा लेख वाचला आणि हे वाचत असतानाच लहानपणापासूनचे अनुभव डोळ्यांसमोरून गेले.

साधारण ८६/८७ च्या काळापासून (आधीचे आठवत नाही) सर्व चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याची विडीयो कॅसेट (चलचित्रफीत) त्याच दिवशी सर्व विडीयो कॅसेट लायब्ररीमध्ये मिळायची (इथे मराठी भाषांतर करत नाही आहे कारण तेच नाव वापरात होते) त्याच काळात आमच्या घरात नवीन व्हीसीआर आला असल्याने जवळपास दररोजच एका चित्रपटाची कॅसेट आणली जात होती. नंतरही पाहिजे तेव्हा एखादा सिनेमा आणून पाहिला जात असे.

तेव्हा एका कॅसेटचे भाडे १० रू पडत असे. पण नंतर मागणी पुरवठा तत्त्वावर काही चित्रपटांकरीता ते वाढून १५ रू ही केले होते. मला आठवतोय तो 'गंगा जमुना सरस्वती' चित्रपट. ह्याच्या कॅसेटचे १५ रू घेतले असे सांगण्याकरीता त्या दुकानदाराने घरी एक चिट्ठी लिहून पाठवली होती. तसेच काही चित्रपटांच्या कॅसेटकरीता वेळेचे बंधन होते. ४/५ तासांत परत करणे वगैरे. 'मि. इंडिया' सिनेमाकरीताही असेच बंधन होते. नेहमीच ती कॅसेट मिळत नव्हती. एके दिवशी घरून चर्चा करून निघालो पण घेऊन आलो 'सुहाग' सिनेमा. बहिण म्हणाली, ' मि. इंडिया' ची कॅसेट लवकर पाहून परत करायची या कारणाने वडिल कार्यालयातून लवकर आले होते. पण मी घोळ घातला होता :|

ह्म्म.. कॅसेट चर्चा खूप झाली. सांगायचा मुद्दा हा की चित्रपटाची कॅसेट प्रदर्शित झाल्याच्या दिवशीच मिळायची. तरीही चित्रपटगृहांत गर्दी असायची तो भाग वेगळा. 'आंखे' सिनेमा (गोविंदाचा) चित्रपटगृहातच एवढा चालला होता तेव्हा मी आणि माझी बहीण बोलत होतो की हा सिनेमा एवढा कसा चालतोय? पण मित्राच्या घरी कॅसेटवर तो सिनेमा पाहिला, आवडला आणि कारण कळले. तसेच तेव्हा केबल हे प्रकरण नवीनच सुरू झाले होते. त्यावरही मग ते चित्रपट दाखवणे सुरू होते. त्यामुळे कॅसेट आणणे बंद नाही झाले तरी कमी झाले, केबलवर सिनेमा पाहणे सुरू झाले. पण तरीही काही चित्रपट पहायला आम्ही आवर्जून चित्रपटगृहात जायचो. त्यातच होता 'अंदाज अपना अपना'. ह्या सिनेमाची आम्ही १३ जणांनी तिकिटे काढली होती. रविवारी संध्याकाळी चित्रपट पहायला जायचे तर शनिवारी रात्री केबलवर तो चित्रपट दाखविला जात होता. पण आम्ही तेव्हा पाहणे कटाक्षाने टाळले. कारणे २. एक तर चित्रपटाची तिकिटे काढली होती आणि दुसरे म्हणजे कधीतरीच आमचा गट चित्रपट पहायला एकत्र जात होता, तिकडे जास्त मजा आली असती.

त्याच काळात मग (माझ्या माहितीप्रमाणे) 'हम आपके है कौन!' च्या वेळी राजश्री प्रॉडक्शन ने त्या चित्रपटाची चित्रफीत प्रदर्शित केली नाही व सुरूवातीला एकच प्रिंट लिबर्टी सिनेमाकरीता आणि मग नंतर फक्त २७ प्रिंट काढल्या होत्या. आणि काही चित्रपटगृहांमध्ये तिकिटांचे दरही वाढविले होते. पण तो चित्रपट तुफान चालला. हे मुख्य कारण असेल बहुधा. आणखी काय गणिते होती मला अंदाज नाही. पण सर्व चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाची चलचित्रफीत बनवून त्याच दिवशी प्रदर्शित करणे बंद केले. ते आजतागायत चालू आहे. ह्यामुळे कितपत फायदा त्यांना झाला हे तेच सांगतील पण चित्रपट चाचेगिरी (पायरसी) वाढली असे म्हणतात आणि तसे दिसत आहेच.

त्यानंतर आले मल्टिप्लेक्स. त्यांनी तर तिकिटांचे दर अवाजवी वाढवून ठेवले. पण तरीही लोकांचे चित्रपटगृहात जाणे बंद झाले नसले तरी पायरसी वाढली असे म्हणता येईल. कारण ज्या ठिकाणी ३०/४० रू बालकनीला द्यायचे तिथे ८०/१००, नंतर १५०/२०० आणि आता तर ३०० रू प्रत्येकी देण्यापेक्षा ३० ते ५० रू रस्त्यावर मिळणारी व्हिसीडी/डिव्हीडी घेणे लोकांना स्वस्त वाटणे आणि त्यांनी त्या विकत घेणे स्वाभाविक झाले.

असो, ह्या सर्वांवर तोडगा म्हणून निर्मात्यांनी मटाच्या लेखात लिहिलेला मार्ग अवलंबिला असला तरी त्यामुळे आपला (प्रेक्षकांचा) फायदा हा निश्चितच आहे असे वाटते. कारण साधारण २ महिन्यांत नवीन सिनेमा एखाद्या वाहिनीवर दाखवला जातो. त्यामुळे घरबसल्या पाहता येतो. पण त्यात व्यत्यय असतो जाहिरातींचा. जर तो व्यत्यय नको असेल तर दुसरा मार्ग आहे, व्हिसीडी/डिव्हीडी विकत घेण्याचा. चोरीची म्हणजे पायरेटेड नव्हे तर खरी (ओरिजिनल) :) कारण तो चित्रपट वाहिन्यांवर दाखवला गेला म्हणजे त्याचा व्हिडीयो प्रदर्शित झाला असे म्हणता येईल आणि मग त्याची व्यवस्थित, खरी आवृत्ती बाजारात विकत मिळते. आणि त्यात तर काय, मोझर बेयर ने अतिशय कमी किंमतीत पर्याय उपलब्ध करून दिला आहे त्याचा फायदा घेऊ. 'ब्लू', 'अजब प्रेम की गझब कहानी' आणि कालच पाहिलेला 'दे दना दन' हे चित्रपट मी दूरदर्शन वाहिन्यांवरच पाहिलेत. आणि आज नाही पाहिला तर आपल्याला तो सिनेमा पाठ होईपर्यंत त्या वाहिनीवर दिसत राहील याची सोय त्या वाहिन्या करत आहेतच की ;).

तर मग काय, आधी होत असल्याप्रमाणेच चित्रपटगृहात पाहणे आवडत असल्यास, परवडत असल्यास सिनेमा पहायला चित्रपटगृहात जा, नाही तर थोडे दिवसांनी घरी पहायला मिळेलच :)

एप्रिल ०१, २०१०


मराठी साहित्यसंपदा ही तशी प्राचीन. इतिहासकारांच्या मते मराठीचा वापर असणारे शिलालेख इ.स.च्या १०व्या आणि ११व्या शतकातले आहेत तर मराठीतली पहिली ग्रंथरचना १३व्या शतकातली आहे असेही म्हणतात.

गेली वर्षानुवर्षे मराठीतील बहुरंगी साहित्य कथा, कादंबरी ,कविता, संतवाणी वगैरे अनेक प्रकारातून आपल्यासमोर येत आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, गो.नी. दांडेकर, तसेच न. चिं. केळकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि वा. म. जोशी ते पु, ल देशपांडे, बाबूराव अर्नाळकर, नारायण धारप, वि वा शिरवाडकर, विंदा करंदीकर अशा अगणित साहित्यकारांनी आपल्या प्रतिभेने मराठीत दर्जेदार साहित्य दिले आहे.

भुर्जपत्र ते छापील पुस्तक असा प्रवास करत आजच्या काळात मराठी साहित्य आंतरजालीय लेखन स्वरूपातही उपलब्ध आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांकडून हे साहित्य आपल्यापर्यंत पोहोचत आहे. मराठी भाषेतील साहित्याच्या वाढीमध्ये लोकांच्या प्रतिक्रियेचा, सहभागाचा मोठा हात असतो. भरपूर लोक ह्या साहित्यसंपदेचा आनंद घेत आहेत, त्याचा वापर करीत आहेत. पण तरीही साहित्य निर्माण होते त्या प्रमाणात वाचले जात नाही असेही म्हटले जाते.

एखादे पुस्तक छापले गेले आणि उपलब्ध झाले असले तरी ते कसे आहे हे वाचल्याशिवाय समजत नाही. एखाद्याने ते वाचले असल्यास त्याच्या परिक्षणानुसार आपण ठरवू शकतो की हे पुस्तक वाचायचे आहे की नाही, घ्यायचे आहे की नाही. त्यासाठी एक तर आपण थेट त्याच्याशी संपर्क साधू शकतो किंवा त्याने लिहिलेल्या परिक्षणावरून त्याचा आढावा घेऊ शकतो.

अशा विविध पुस्तकांची ओळख करुन देण्यास, त्यांचे परिक्षण लिहिण्यास साहित्य रसिकांना एक मंच तयार करून देणे, साहित्यकार/लेखक, प्रकाशन संस्था ह्यांच्या माहितीचे संकलन करून ठेवणे, तसेच साहित्यविश्वातील घडामोडींचा मागोवा घेणे आणि त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी ह्या उद्देशाने 'साहित्य विश्व' ह्या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे.

आज दिनांक ३१ मार्च २०१० रात्री १२ वाजेपासून हे संकेतस्थळ सर्वांकरीता खुले करण्याची आम्ही घोषणा करीत आहोत.

'साहित्य विश्व' वर सध्या पुस्तक, लेखक, प्रकाशन, कार्यक्रम अशा लेखन प्रकारांची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण लेखन हे सदस्य लिखित असेल. म्हणजेच एखाद्या पुस्तकाबद्दल परीक्षण, माहिती लिहिताना पुस्तकाचे लेखक व प्रकाशन ह्यांची माहिती जर आधीच उपलब्ध नसेल तर सदस्यास ते स्वतःहून लिहिण्याची मुभा आहे.  त्यानंतर मग इतर सदस्य ह्या नवीन लेखक, प्रकाशनाच्या लेखनाचा उपयोग दुसर्‍या पुस्तकाच्या परीक्षणकरीता करू शकतो.

'साहित्य विश्व'वर मराठी साहित्यविषयक लेखनाचे आणखीही प्रकार देण्याचा मानस आहे व लवकरच ती सुविधा उपलब्ध केली जाईल.

आपला सर्वांचा सहभाग 'साहित्य विश्व' ह्या संकेतस्थळाला मिळत राहील अशी आशा आहे व  'साहित्य विश्व' वर आपणाकडील साहित्यविषयक अद्ययावत माहिती आणि पुस्तक परीक्षण लिहित राहाल अशी अपेक्षा आहे.
तसेच, शक्य असेल तेव्हा संकेतस्थळावरील त्रुटी आणि ह्यात करण्यासारखे तुम्हाला वाटत असलेले बदल निदर्शनास आणून द्यावेत ही विनंती.
धन्यवाद.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter