डिसेंबर २८, २००९

नुकतेच श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्य "संभवामी युगे युगे" पाहून आलो. त्यांच्या जाहिरातीप्रमाणेच ६ मजली रंगमंच, भरपूर नृत्य कलाकार, प्रत्यक्ष घोडे, रथ, गायी, बैलगाड्या, उंट, हत्ती ह्यांचा रंगमंचावर वावर ह्याचा अनुभव घेतला. ह्या आधी शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'जाणता राजा' ह्या नाटकात असा उपयोग केला होता. मला ते नाटक अजूनही पाहण्यास मिळाले नाही. त्यामुळे आज प्रथमच मी हे पाहिले. चांगले वाटले.

सध्या तरी एवढेच. विस्तृत कथन उद्या लिहितो.

डिसेंबर २५, २००९

नेटभेट.कॉमच्या प्रणव जोशी आणि सलिल चौधरी ह्यांनी सुरू केलेल्या नेटभेट मासिकाच्या तिसर्‍या अंकात (डिसें २००९) माझे 'क्यु.पी.एस आणि पी. आय. पी' हे लेखन समाविष्ट केले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.
माझे लेखन त्यांच्या मासिकात घेण्यासारखे वाटले ह्याचा मला आनंद वाटला. आधी स्टार माझाच्या 'ब्लॉग माझा' स्पर्धेत उल्लेख व आता अशा मासिकात प्रसिद्धी ह्याने प्रोत्साहनच मिळत आहे की मी काही ना काही (काहीही नाही ;) ) चांगले लिहित रहावे.
ह्यापुढेही नेटभेटचा हा आणि असे आणखी उपक्रम अशाप्रकारे होत रहावे आणि माझ्यासारखेच इतरांनाही प्रोत्साहन मिळावे ही सदिच्छा.

डिसेंबर २१, २००९

नुकतेच मिलिंद बोकील ह्यांचे 'शाळा' पुस्तक वाचून संपविले. गेल्या आठवड्यापासून सकाळ-संध्याकाळच्या बस प्रवासात वाचत होतो. सुंदर पुस्तक. सुंदर कथानक. मस्त अनुभव. पहिल्यांदा सुरू केल्यावर नीट वाचणे जमत नव्हते. पण नंतर वेळ मिळाला तर वाचत गेलो. हातातून पुस्तक ठेववत नव्हते.
अशाच प्रकारचा अनुभव ४ वर्षांपूर्वी 'पार्टनर' व गेल्यावर्षी 'दुनियादारी' वाचताना आला होता. पार्टनर तर एका बैठकीत वाचून काढले होते. अर्थात 'शाळा' आणि 'दुनियादारी' हे समोर घडताना बहुतेक जे पाहिले होते त्याचेच शब्दांकन होते. त्यामुळे दुनियादारी तर एका वर्षात ३/४ वेळा वाचून झाले तरी अजूनही वाचावयास घेतले तरी सारखे वाचतच रहावेसे वाटते.
पाहू, शाळेचा पण तोच अनुभव येतो का?

डिसेंबर १४, २००९

लोकप्रभामधील अल्केमिस्ट्री सदरात राजू परूळेकरांनी "सचिन (ग्लॅडिएटर) तेंडुलकर" नावाचा लेख लिहिला आणि (त्यांच्या अपेक्षेप्रमाणे) वादळ उठले. त्या लेखाच्या विरोधात भरपूर प्रतिक्रिया उमटल्या. माझीही एक त्यातलीच होती. माझ्या (आणि बहुतेकांच्या) अपेक्षेप्रमाणे, त्यांनी १८ डिसें २००९ च्या लोकप्रभामध्ये पुन्हा त्यावर लेख लिहिला.

ह्या लेखात त्यांनी त्यांच्या विरोधातील दोन प्रातिनिधीक लेखांना उत्तरे लिहिली आहेत. आता त्यावर पुन्हा किती प्रतिक्रिया उठतील माहित नाही. मी गेल्यावेळी थेट त्यांना किंवा लोकप्रभाला पत्र न पाठवता माझ्या अनुदिनीवरच लिहिले होते, म्हणून आजही पुन्हा इथेच लिहित आहे. मला काही त्यांच्याशी वाद घालायचा नाही आहे, पण हा नवीन लेख आणि संदर्भ दिलेला जुना लेख(पुन्हा) वाचला, त्यावरून जे काही वाटले तेच लिहित आहे. :)

 ह्या लेखाच्या (आतापासून 'तो' म्हणजे जुना आणि 'हा' म्हणजे नवीन लेख) सुरुवातीलाच त्यांनी म्हटले आहे की, "मुळात माझा लेख हा महाराष्ट्र धर्मावरचा नव्हता, सचिनचं मूल्यमापन करणारा नव्हता, कोणत्याही प्रकारचा राग, लोभ, प्रेम, द्वेष यापासून अलिप्त राहून राज्य संस्था आणि समाज यांच्या शोकान्त शेवटाअगोदर वेगवेगळ्या रूपात ग्लॅडिएटर्सचं अवतीर्ण होणं व सत्ताधारी व धनिकवर्गाने मूळ समस्या, समाजाच्या मानवी व प्राकृतिक आनंद व दु:खापासून दूर नेऊन बहुजनवर्गाला गंडवण्यासाठी अशा ‘खेळ्या’ ग्लॅडिएटर्सची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ करणं, ही इतिहासाची पुनरावृत्ती असते. हाच माझ्या लेखाचा विषय होता." जर तो लेख  सचिनचे मूल्यमापन करणारा नव्हता तर लेखाचे नावच चुकीचे होते असे मला वाटते. त्यावरून तर सचिनबद्दलच लिहिले आहे असेच समजले जात होते.

परूळेकरांचे "माणसं: भेटलेली, न भेटलेली" पुस्तक मी वाचले आहे. त्यांच्या 'संवाद' कार्यक्रमाचे खूप भाग मीही पाहिले आहेत. दोन्ही प्रकार मला आवडले. तरीही मला तेव्हा त्याबाबत नाही लिहावेसे वाटले. कारण तो लेख वाचताना हेच प्रतित होत होते की त्यांना मुळात सचिनला मिळणार्‍या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लिहायचे होते. तर मग तो लेख सचिनच्या नावावर का खपविला? त्यात त्यांना लाज वाटते की "मराठीतल्या अनेक लेखक, कलावंत, गायक, राजकीय नेते वगैरेंनी सचिनसोबतच्या आपल्या तऱ्हेतऱ्हेच्या आठवणी लिहिलेल्या आहेत" अहो, त्यांना सचिनबद्दल लिहावेसे वाटले म्हणून त्यांनी लिहिले. "कमिशनर का कुत्ता मिला",""बिल्ली छत पर चढी" सारख्या ब्रेकिंग न्यूज देणार्‍या वाहिन्यांनी सचिनला अवास्तव प्रसिद्धी दिली ह्यात सचिनचा काय दोष?  तुम्हाला एखाद्याबद्दल चांगले वाटले ते तुम्ही लिहिता, आम्ही वाचतो. 'सचिनच्या पत्नी काय खातात काय नाही', किंवा 'सचिन चड्डीत होता तेव्हा काचा कशा फोडत होता' हे वाचणे/ऐकणे म्हणजे हुतात्म्यांचा अपमान करणे असे परूळेकरांना वाटते. पण हे सचिनने नाही कोणाला सांगितले की तुम्ही लिहा. त्यापेक्षा त्यांनी आजकालच्या माध्यमांना ह्याबाबत सांगावे की नका लिहू म्हणून. ’भगतसिंग, राजगुरू वगैरे लोक फासावर गेले ते ह्याचकरीता का?’ असे विचारताना स्वातंत्र्याचा संग्राम आणि क्रिकेट हा खेळ ह्यांची उगाच तुलना केली आहे असे वाटले. त्यापेक्षा आजकालची माध्यमे, त्या इतके लोकांचे प्राण घेणार्‍या कसाबच्या हागल्या-मुतल्याची बातमी देत असतात, कसाबला साध्या माणसापेक्षा जास्त सुविधा पुरविल्या जातात, ह्याची परूळेकरांना का लाज वाटत नाही? ह्यावरून "मग त्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांनी का उगाच आपले प्राण दिले?" हा प्रश्न रास्त ठरला असता.

सचिनने मुंबईच्या प्रश्नावर त्याला वाटले ते उत्तर दिले. आता तो त्याचा प्रश्न आहे. वाहिन्यांचे पत्रकार तर अशा विधानांच्याच शोधात असतात. (खूप कमी वाहिन्यांवर असा मसाला नसतो). कालच एका वाहिनीवर अभिषेक बच्चनलाही 'राज ठाकरे', 'मराठी माणूस' वर प्रश्न विचारत होते. पण अभिषेक बच्चनने त्याला उत्तर देणे टाळले. त्याच प्रकारे सचिननेही तेव्हा उत्तर टाळले असते तर बरे झाले असते असे वाटून गेले.

परूळेकरांनी सचिनच्या विरोधात जे काही ह्या लेखात लिहिले ते एक वेळ विचार करण्यासारखे आहे. पण त्यांना उगाच(?) लोकांच्या (त्यांच्या अपेक्षेप्रमाणे) वादळाला सामोरे जावे लागले. हेच जर त्यांनी पहिल्या लेखात लिहिले असते तर ते फक्त त्यांचे मत म्हणून लोकांनी जास्त प्रतिक्रिया दिल्या नसत्या. पण ते लिहिताना त्यांनी असेही म्हटले आहे की 'त्यांच्या विरोधात लिहिलेल्यांची मस्ती त्यांनी मनमोकळेपणाने वाचली'. हे म्हणजे ’आपला तो बाळ्या, दुसर्‍याचे ते कार्टे’ हा न्याय झाला. अर्थात  सचिनबद्दल 'आय माय मायसेल्फ’ प्रवृत्ती वाटत असेल तर हे त्यांचे मत आहे. त्याबद्दल मला काही नाही म्हणायचे. पण त्यांना वाटले त्याप्रमाणे जर सचिनचे एखादे वाक्य गंभीरतेने घेण्यासारखे नव्हते आणि त्यांनी गंभीरतेने घेतलेही नव्हते, मग त्याबाबत लिहावेच का? ज्याबाबत आधीच लागलेली आग विझत आहे त्यात उगाच तेल का घालावे? आणि दुसर्‍याने त्याबाबत काहीच लिहू नये असे त्यांना वाटते? :)

असो, मी काही क्रिकेटचा एवढा चाहता नाही आहे. सचिन एक चांगला खेळाडू म्हणून आवडतो. त्याने पुढे चांगले खेळत रहावे. आणि परूळेकरांनीही चांगल्या व्यक्तींबाबत लिहित रहावे/मुलाखत घेत राहावे. आम्हीही ते वाचू/पाहू. दोघांबद्दलही (सचिन तेंडुलकर आणि राजू परूळेकर) चांगले वाटल्यास सकारात्मक दाद देऊ/ न पटल्यास आपुलकीने टीका करू :)

डिसेंबर १२, २००९

मुंबईतील हॉटेल संघटनेने लागू केलेल्या नव्या नियमापासून ताटात घेतलेले अन्न टाकल्यास पाच रू. दंड आकारण्यात येणार आहे. वाढती महागाई व अन्न धान्याची कमतरता हे मुख्य कारण असल्याचे सांगत आहेत. तसेच ग्लासातील वाढलेल्या पाण्याचाही अपव्यव टा़ळण्यात येणार आहे.
(स्टार माझावरील बातमी येथे वाचा. व्हिडीयोचा नेमका दुवा मिळाला नाही. स्टार माझाच्या संकेतस्थळावर येथे ११/१२/२००९ च्या यादीमध्ये "खाऊन माजा टाकून नको!" व्हिडीयो पहायला मिळेल  तसेच मटावरील बातमी येथे वाचा)

मनात विचार आला की हे आधीपासून त्यांच्या लक्षात का येत नव्हते? असो, उशीरा का होईना लोकांना जाग येत आहे. मी तर गेले कमीत कमी ६/७ वर्षे हा नियम स्वत: पाळत आहे. ताटात घेतलेले अन्न पूर्ण संपवितोच. तसेच सोबत असलेले नातेवाईक किंवा मित्र ह्यांनाही करावयास सांगतो. खरोखरच खाऊन होत नसेल तर ते पाकिटात बांधून देण्यास सांगतो.

पाण्याचेही तसेच. तसा मी कमीच पाणी पितो (जास्त प्यावयास पाहिजे हे मान्य. सध्या तरी तो मुद्दा नाही) आणि पाहिजे तेवढेच पाणी घेतो. पण ग्लास रिकामा झाला असेल आणि पुढील वेळी जर कोणी ग्लासात पाणी वाढून देत असेल तर मला पाहिजे तेवढेच वाढायला सांगतो. काही वर्षांपूर्वी हॉटेलात पाहिले होते की अर्धा ग्लास रिकामा असला तरी वेटर तो ग्लास उचलून त्याच्या जागी पूर्ण भरलेला ग्लास ठेवत असे. मला ते पटले नव्हतेच. मित्रासोबत बोललो, तर तो म्हणाला, "काही हॉटेलमध्ये पद्धत असते. चांगली सेवा द्यायची म्हणून वाढताना पाणी सांडण्याची शक्यता असल्याने ग्लासच बदलवून द्यायचा." म्हटले ठीक आहे. तेव्हा काही म्हणालो नाही. पण आता ह्या हॉटेलवाल्यांनीही ग्लास बदलण्याची पद्धत बंद करावयाचे ठरविले आहे असे ऐकून चांगले वाटले.

तसेच फक्त हॉटेलच्या ग्राहकांनाच पाणी देण्यात येणार असून फु़कटात देण्यात येणारे पाणी बंद करणार आहेत. अर्थात त्यांना पडणारा पाण्याचा खर्चही ते कमी करू इच्छित असतील. तरीही पाण्यासारखी गरजेची गोष्ट नाकारणेही तेवढे चांगले वाटत नाही. पण प्रत्येकाचे मत वेगळे म्हणता येईल.

सध्याचा नियम म्हणजे दंड म्हणून नाही पण जनजागृती व्हावी ह्यासाठी असे पाऊल उचलले गेले असा त्यांचे म्हणणे आहे. आता जरी ग्राहकांचा त्यात सकारात्मक प्रतिसाद असला तरी किती दिवस चांगला सहभाग मिळेल? तो सारखा मिळून हॉटेलला असा नियम बनविणे गरजेचे वाटणार नाही अशीच इच्छा आहे.
पण काही हॉटेलमध्ये ताटातील, मागवलेल्या पदार्थांतील उरलेले पदार्थ बांधून देण्यास नकार करतात. अशा वेळी काय करणार?

अशाच प्रकारे विजेचा होणारा अपव्यव टाळण्यातही लोकांनी पुढाकार घेतला तर आणखी चांगले होईल असे वाटते.

डिसेंबर ०४, २००९

२००५ मध्ये आलेल्या 'डोंबिवली फास्ट' चित्रपटात एक प्रसंग आहे. कथानायक माधव आपटे आपल्या सहकार्‍यासोबत एका दुकानात थंड पेय पिण्यास गेला असतो. तिकडे तो दुकानदाराने घेतलेले जास्त २ रू परत मागतो. ते न दिल्याने माधव त्याच्या दुकानात तोडफोड करून २ रू परत घेतो.
हा झाला चित्रपटातील प्रसंग. प्रत्यक्षात ह्याच्या उलट एक घटना घडली आहे. मटा मध्ये आलेल्या बातमीनुसार परळ रेल्वे स्थानकावर बुकिंग क्लार्कने प्रवाशाला त्याचा उरलेला एक रूपया परत न देता उलट त्या प्रवाशालाच मारहाण केली.
चित्रपटात माधव आपटेनी केलेली मागणी ग्राह्य धरली तरी त्याने अवलंबिलेला मार्ग किती योग्य आहे हा वादाचा प्रश्न आहे. तसेच मटावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये मराठी विरूद्ध बिहारी हा प्रवाह आहे. मी त्या दोन्ही वादात सध्या शिरत नाही.
पण सध्या तरी ह्या बुकींग क्लार्कने केलेले कृत्य नक्कीच निंदनीय आहे. अशा माणसाला आधी लोकांनी, आणि नंतर कायद्याने शिक्षाच द्यायला पाहिजे.

साधारण २०-२१ वर्षांपूर्वी घेतलेल्या आमच्या कार टेप मध्ये एक बटण होते QPS नावाचे. त्याचे पूर्ण नाव तेव्हा तर माहित नव्हतेच. पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचा उपयोग मी शोधून काढला. एखादे गाणे सुरू असताना हे बटण दाबून ठेवून जर कॅसेट पुढे ढकलली तर त्याचा उपयोग होतो. मला साधा कॅसेट प्लेयर व ह्या कार टेप प्लेयर मधील हा फरक का ते तेव्हापासून अजून नाही कळले. साध्या टेप मध्ये जर आम्ही गाणे वाजत असतानाच कॅसेट पुढे ढकलायचा प्रयत्न केला तर मोठे लोक म्हणायचे, 'असे नाही करायचे.  त्याने कॅसेट खराब होते.' मग ह्या कार टेप मध्ये त्यांनी ही सुविधा का दिली? 

तर ह्या QPS फायदा हा की ते बटण दाबून कॅसेट पुढे ढकलली की पुढच्या गाण्याला थांबायचे. ह्यामागचे तंत्रज्ञान नंतर कळले, माझ्या माहितीनुसार ते Quick Position Search होते. पुढील मोकळी जागा मिळाली की थांबायचे. त्यामुळे एखादे गाणे नाही आवडले की लगेच पुढच्या गाण्यावर जाता येत असे. अर्थात आता सीडी/डीव्हीडी मुळे हे खूप सोपे झाले आहे, तरी तेव्हा हे चांगलेच वाटायचे. पण एकदा काहीतरी बिघाड झाल्याने तो टेप दुरूस्तीला दिला होता त्यानंतर ती सुविधा नाही वापरता आली. :(

काही वेळा वाटते हाच नाही पण असाच प्रकार सध्याच्या दूरदर्शन संचामध्ये आला तर किती चांगले होईल. एखादा कार्यक्रम पाहताना जर जाहिराती चालू झाल्या की हे बटण दाबून दुसर्‍या वाहिन्या चाळायच्या. ह्या वाहिनीवरील जाहिरात संपली की लगेच आपोआप सुरू झालेला कार्यक्रम पाहता येईल :)

बहुतेक सर्वच दूरदर्शन संचामध्ये तरी वाहिन्या बदलत राहिले तरी आपण पाहत असलेला कार्यक्रम सुरू झालेला आहे की नाही पाहण्यासाठी मध्येच ती वाहिनी लावून पहावे लागते. पण आमच्या घरी, निदान मला तरी, ह्याचा तेवढा त्रास होत नाही. कारण आमच्या संचातील पी.आय.पी (PIP) तंत्रज्ञान. जाहिरात सुरू झाली की मी लगेच लहान खिडकीत दुसर्‍या वाहिन्या चाळायला लागतो. तसेच लहान खिडकीत सध्याची वाहिनी चालू ठेवून दुसर्‍या वाहिनीवर एखादा कार्यक्रम पाहता येतो. ह्याचा फायदा क्रिकेट सामना सुरू असतानाही होतो. लहान खिडकीत क्रिडा वाहिनी सुरू ठेवायची आणि सोबत आपला आवडता कार्यक्रम पहायचा. आणि हो, एक सिनेमा तर कोणी पूर्णपणे ह्याच खिडकीत पाहू शकतो, 'पुष्पक' ;)  त्या लहान दूरदर्शन खिडकीला आवाज नाही असे नाही. पण मग त्याला हेडफोन लावून बसावे लागते. तोही प्रकार केला आहे. घरातले सर्व एखादा कार्यक्रम पाहत असले की मी माझा आवडता सिनेमा किंवा कार्यक्रम लहान खिडकीत पाहत बसायचो.

असो, पण CAS च्या नियमानंतर किंवा मग डीटीएच घेतले की मग हा फायदा नाही घेता येणार. तेव्हा फक्त मग सीडी/डीव्हीडी प्लेयर लावून ठेवता येईल त्या खिडकीत.
तो नियम येईल तेव्हा येईल. तोपर्यंत ह्याचा फायदा घेत राहू.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter