नोव्हेंबर २५, २००७

६४ कला कोणत्या आहेत हो? त्यात पत्ता शोधणे ही कला ही समाविष्ट आहे का? नसल्यास करता येईल का?

का? सांगतो.
सिनेमा चालबाज:
शक्ति कपूर पहिल्यांदा शहरात येतो. तो कादर खानला एक पत्ता (अनुपम खेरचा) विचारतो. कादर खान चाकू काढून त्याच्याकडील सामान लुटून घेतो. शक्ति कपूर विचारतो, " अरे, पत्ता तर सांग". कादर खान म्हणतो," ऐसा करो, यहाँ से आगे जाओ. चौक पे बायें मुड जाना. अगले चौक से बायें मुड जाना. तो फिर आगे एक और चौक आयेगा. वहा से फिर बायें मुडना. अंत में और एक बार बाये मुडना. तुम यहॉं आओगे. तुम मुझे मिलोगे. मैं फिर तुम्हे लूट लुंगा."

हा झाला सिनेमातला गंमतीचा भाग. पण खरोखर पत्ता सांगणे आणि त्यातल्या त्यात शोधणे ही मोठी कला आहे असे मला वाटते. एखादा माणूस (मुंबईमध्ये) लोकल मधून उतरला की त्याला पहिली गोष्ट शोधावी लागते ती पूर्व कुठे आणि पश्चिम कुठे? सूर्यदर्शनाला नाही तर त्याच्याकडे पत्ता तोच असतो. मग बाहेर आल्यानंतर पूर्ण पत्ता शोधणे हे कार्य.

आपण पत्रामध्ये जो पत्ता लिहितो त्याचा एक साचा आहे असे मी पाहिले आहे. प्रथम खोली(आजकाल फ्लॅट) क्रमांक, मग मजला, मग इमारत क्रमांक/नाव, मग संकुल (कॉम्प्लेक्स), मग रस्ता , मग विभाग, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, देश. आणि पिन क्रमांक. आता ह्यातील शहर, तालुका,जिल्हा, राज्य नाही लिहिले तरी पिन क्रमांकावरून पुढील पत्ता शोधता येतो. विभाग किंवा इमारत लिहिला नसेल तर पोस्टमनच फक्त तो पत्ता शोधून काढू शकतो अशी आख्यायिका आहे आणि अनेकांचा अनुभव ही असेल. ह्यावरून पत्र तर नक्कीच पोहोचेल त्या पत्त्यावर. पण माणसाचे काय? नवीन पत्ता शोधणाऱ्याला काय माहित तो पिन क्रमांक कुठला आहे ते? ते सांगणारे खात्रीचे एकच ठिकाण म्हणजे पोस्ट ऑफिस. :) पोस्टमनच काय तो आपल्याला पत्ता सांगू शकतो. पण मग आधी पोस्ट ऒफिस शोधावे लागेल ना. रस्त्यावरील वाहतूक पोलीस ही काही वेळा मदतीला असतात.
हे सर्व करू शकतो, ते लोक उपलब्ध असताना. नसल्यास काय करावे?

आता गाडीने जाताना जर रस्ता/पत्ता विचारायचा तर रिक्षावाल्याला विचारणे सुरक्षित समजतो. तरी काही वेळा त्यांनाही ते माहीत नसते. पण पत्ता मिळतो भरपूर वेळा. एकदा असे झाले की मी पत्ता शोधत होतो बॆंकेचा. तिच्या जवळच एक हॉल होता प्रसिद्ध. मी रिक्षावाल्याला एका रस्त्यावर विचारले कुठे आहे? तो म्हणाला, हा हॉल इथे नाहीच तुम्ही चुकीच्या रस्त्यावर आलात. तेव्हा मी नीट पत्ता बघितला तर रस्त्याचे नाव वाचण्यात माझीच चूक झाली होती.

दुसरा मार्ग म्हणजे, त्या विभागात पोहोचल्यानंतर तिकडील वाण्याच्या दुकानात विचारणे. ते लोक घरी सामान पोहोचवत असतात त्यामुळे कधी कधी तर घराच्या बेलपर्यंतचा मार्ग समजावून मिळतो ;)

मुंबई मध्ये रेल्वे स्थानकावर विचारा, इकडे कसे जायचे. उदा. तिकिट खिडकीबद्दल .जर एखाद्याला वेळ असेल तर किंवा तो तिकडे जाणारा असेल तर तुम्हाला तेथपर्यंत पोहोचवेल.
इतर काही वेळा तर माणसे बेस्टच्या बस स्थानकापर्यंत सोबत करतात आणि सांगतात, ह्या क्रमांकाची बस पकडा इथून.

पुलंच्या ’असा मी असामी’ मधील पत्ता शोधण्याचा प्रसंग तर बहुतेक सर्वांना माहित असेलच :) त्याप्रमाणे चुकीच्या ठिकाणी जाऊन मागे नाही यावे लागले मला. पण हो, काही वेळा नजरचुकीने गंतव्यस्थान मागे निघून जाते. मग पुन्हा मागे फिरावे लागते.

रस्ता चुकल्याचा काही वेळा फायदा हा होतो की आपल्याला नवीन मार्ग कळतात.
१० वर्षांपुर्वी आम्ही जेव्हा ठाण्याला नवीनच रहायला गेलो. तेव्हा मी जवळपास एक-दीड महीना उशीराने गेलो होतो. बहिणीला विचारले स्टेशनची बस कुठून जाते. तिने सांगितले की, असा इकडून जा. पुढे मस्जिद दिसली की तिकडून उजवीकडे जा. मग पुन्हा डावे, उजवे. मी चूकून मस्जिद कडून डावीकडे गेलो. मग पुढे जाऊन गोंधळलो. पुढे जाऊन लोकांना विचारले तर त्यांनी सांगितले की आता इकडून असा असा जा. त्यामुळे झाले काय की, मी पोहोचलो दुसऱ्या एका बसस्थानकावर, शोधत असलेल्या बसच्या मार्गातच दोन स्थानके पुढे, जाउन पोहोचलो.
पुन्हा रात्री घरी आलो तेव्हाही गोंधळ. मला सांगितले होते की बसमधून उतरल्यावर पोलिस चौकीनंतर डावीकडे, मग उजवीकडे, मग डावीकडे, असे. पुन्हा, मी पोलिस चौकीनंतर उजवीकडे वळलो. मग सुचेना. तरी मग गल्लीतून सरळ सरळ जात पुढे बाहेर पडलो ते घराच्या संकुलासमोर. ह्यात फायदा हा झाला की मला नवीन मार्ग समजला :)

गावी गेलो तर नातेवाईकच घ्यायला आलेत बहुतेकवेळा. त्यामुळे काही अडचण नाही.

तसे, मी पत्ता हातात असल्याने सरळ तिथे पोहोचलो हेही होते भरपूर वेळा. २ वर्षांपुर्वी मित्राच्या लग्नात गेलो होतो चेन्नईला. तिकडे आमचा ग्रूप बाहेर फिरत होता. माझ्या मित्राने फोन करून कामाकरीता बोलावून घेतले. आता चेन्नई म्हणजे तमिळ भाषा. ते लोक हिंदी बोलत नाही आणि इंग्रजी नीट येत नाही असे ऐकून होतो. त्यामुळे मित्रांना आणि दुकानदारांना विचारले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे रिक्षात बसलो. रिक्षावाल्याला थोडेफार इंग्रजी येत होते. पोहोचलो हॉल वर. मित्र म्हणाला, तू इथे पहिल्यांदा आलास आणि पहिल्याच दिवशी रिक्षाने बरोबर पत्ता मिळविलास? इतर लोक नाही पोहोचत.

अशी आणखी भरपूर उदाहरणे आहेत.असो.

पत्ता सांगणे हे एक वेगळे प्रकरण.
बहुतेक वेळा मलाच पत्ता नीटसा माहित नसतो, म्हणजे सांगण्याकरीता, आणि कोणी पत्ता विचारला तर फार ओशाळल्यासारखे होते. कारण मी स्वत: तिथे जाऊ शकतो. पण इतरांना सांगण्यात अडचण येते. जेव्हा माहित असते तेव्हा तर मग मी सांगतो. तरी एक दोन वेळा असे झाले की मला वाटले पत्ता सांगितलेला माणूस नीट पोहोचेल ना?
झाले काय की बंगळूरला होतो तेव्हा एकाने एका चौकात विचारले की ITPL ला कसे जायचे? आता समोरचा रस्ता सर्व लोक वापरत असत कारण तो थोडा जवळ होता, पण डावीकडे-उजवीकडे असे करत. डावीकडचा रस्ता थोडा लांब होता पण सरळ होता, फक्त एकच उजवे वळण. त्या क्षणी विचार केला की ह्याला डावीकडून पाठवूया. नेमका पोहोचेल तरी. अर्थात त्याला तशी जाणीव करून दिली.
पुण्यात संचेतीच्या थोडे पुढे एकाने मला विचारले, "ला मेरिडीयन ला कसे जायचे?" आता मला एवढे माहित होते की डावीकडे हायवे सुरू होतो. म्हणजे ते उजवीकडेच असेल. मग त्याला सांगितले की उजवीकडे कुठेतरी आहे. मनात शंका आली जर डावीकडे नुकतेच काही नवीन झाले असेल तर हा माणूस मला भरपूर शिव्या देईल. पण मी पूढे बघितले की 'ला मेरिडियन' उजवीकडेच १-२ किमी च्या अंतरावर आहे. बहुतेक वेळा त्या रस्त्याने जाऊनही माझ्या ध्यानात नव्हते. हायसे वाटले. पण ठरविले नीट माहित असेल तरच सांगायचे.

त्यामुळे पत्ता सांगणाऱ्यांचा काही वेळा हेवा वाटतो. वाटते की ह्यांना एवढे सर्व कसे लक्षात राहते?
माझ्या जुन्या कार्यालयात एक माणुस आहे, त्याला मुंबईतील पत्ता विचारला तर तो मस्त नकाशा काढून देतो आणि नीट समजावून सांगतो. त्याने तर हे ही सांगितले होते की ह्या सिनेमाकडून पुढे डावीकडे जाऊ नकोस. तो ’तसला विभाग’ आहे. म्हणजे कोठे वळावे आणि कोठे वळू नये इतपत सखोल माहिती दिली.
तसाच एक जुना शेजारी ही. त्यालाही पत्ता विचारला की तो ही नीट नकाशा काढून द्यायचा.

पुण्यात पाट्या असतात ना? ’जोशी इथे राहतात. उगाच इकडे तिकडे विचारू नका.’ किंवा ’जोशी इथे राहत नाहीत. उगाच बेल दाबू नये.’ ह्याचा फायदा होत असेल ना भरपूर वेळा ;)
आता पुण्याचे पाटीचे वेड ठाण्यातही पोहोचलेय किंवा एखादा पुणेकरच ठाण्यात गेलाय असे वाटते. मागील आठवड्यात ठाण्यात मी एका दुकानात पाटी वाचली. "कृपया इथे पत्ते विचारू नये. पत्ते सांगितले जाणार नाहीत."

तर तात्पर्य काय, ह्या सर्वांमुळे इकडे माझ्या मित्रांनाही माहित आहे की मी कशा प्रकारे पत्ते समजतो. त्यामुळे ते ही मला समजेल अशाच प्रकार समजावून सांगतात. तेव्हा एक विनंती, पत्ता कसा शोधावा/सांगावा हे कोणी शिकवेल का?
Reactions:

2 प्रतिक्रिया:

VishaL KHAPRE म्हणाले...

Here is some help... You dont need a postman for search any more.

India Post

देवदत्त म्हणाले...

धन्यवाद.
परंतु, त्यात फक्त विभागाचे नाव मिळते. पण घराचा रस्ता कळण्यास त्याचा फायदा नाही. त्याकरीता पोस्टमन ला विचारावे लागेल असे मला वाटते ;)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter