एप्रिल २६, २०११२६ एप्रिल म्हटले की मला पहिले आठवते ते १९९९ साल. वसतीगृहात आमच्या संगणकाला बंद पाडणार्‍या विषाणूचा पहिल्यांदा सक्रिय होण्याचा दिवस. त्याने जो काही गोंधळ घातला त्यावरून तो दिवस तर लक्षात तर राहिलाच पण संगणकातील विषाणू काय काय करू शकतात ह्याची प्रचिती आली. त्यानंतर जवळपास ४-५ वर्षे तरी एक खबरदारी म्हणून २६ एप्रिल ही तारीख स्वतःच्या संगणकात येऊ दिली नाही. ;)

त्या दिवसाचा आमचा अनुभव मी आधी लिहिला होता. तो ह्या दुव्यावर पुन्हा वाचता येईल.

आणि Win-CIH विषाणूबद्दल माहिती विकिपिडीयावर ह्या दुव्यावर पाहता येईल.

एप्रिल २४, २०११

वार्‍यावरची वरात - पु. ल. देशपांडेंचे हे नाटक कधीतरी दूरदर्शनवर पाहिल्याचे पुसटसे आठवते. पण त्यातील नेमके सर्व आठवत नव्हते. नंतर मग २००३ पासून पुलंच्या एक एक करत सर्व कथाकथनांच्या ध्वनीफीती संग्रहात वाढवत गेलो, त्यात ह्याचीही ध्वनीफीत होती.

'वार्‍यावरची वरात नाटकाची व्हीसीडी बाजारात उपलब्ध आहे असे कळले तेव्हा पाहिले तर त्याच्या पुनर्निर्मित (अर्थात रिमेक) नाटकाची व्हीसीडी होती ती. आधीच्या एक दोन रिमेकच्या अनुभवांमुळे मी ते घ्यायचा प्रयत्न नाही केला. (तो अनुभव काय ते पुढच्या लिखाणात सांगेन). बहुतेकांनी सांगितले होते की पुण्याच्या 'अलूरकर म्युजिक'  मध्ये मूळ नाटक मिळेल. पण तिकडून मागवणेही जमले नाही.
आत्ता गेल्या आठवड्यात आमच्या नेहमीच्या म्युजिकच्या दुकानात पाहिले की त्या मूळ नाटकाची व्हीसीडी/डीव्हीडी उपलब्ध आहे. लगेच विकत घेतली. सध्या तरी पाहणे जमले नाही पण ते नाटक पुन्हा लवकरच पाहीन.

एप्रिल १२, २०११

रामनवमी म्हटले की मला इतर गोष्टींपेक्षा जास्त आठवते ते गदिमांचे गीत रामायण, सुधीर फडकेंच्या आवाजात. १० ध्वनीफितींचा संच वडिलांनी घेऊन ठेवला होता. दरवर्षी रामनवमीला सकाळी गीत रामायण आमच्या घरी लागायचे. पण आता गेली काही वर्षे नेमाने ऐकणे कमी झाले आहे. त्यांतील सर्व गाणी तर नेमकी तर आठवत नाहीत पण गाणी लावली असली तर आठवतात त्या लयीमध्ये.

आता ध्वनीफीती तर जास्त कोणी ऐकत नाही. बाजारात तर मिळणेही बंद झालेय बहुधा. सध्या चलती आहे ती ऑडियो सीडी आणि एमपी३ ची.

गदिमांच्या ह्या संकेतस्थळावर पूर्ण गीतरामायण ध्वनी आणि लिखित रुपात उपलब्ध आहे. गेली ३/४ वर्षे ऐकले नाही आहे, आता तेच ऐकतो :)

एप्रिल ११, २०११आता कोणत्यातरी वाहिनीवर 'प्यार के काबिल' हा चित्रपट सुरू असलेला पाहिला. लहानपणी हा चित्रपट कॅसेट आणून पाहिल्याचे आठवले. तेव्हा भरपूर चित्रपट पाहिलेत. हा चित्रपट पूर्णपणे आठवत नसला तरी त्याची कथा लक्षात होतीच इतके दिवस. नवरा बायको (ऋषी कपूर-पद्मिनी कोल्हापुरे) भांडणानंतर वेगळे राहतात. त्यांच्या जुळ्या मुलींपैकी एक ऋषी कपूर कडे, एक पद्मिनी कोल्हापुरे कडे. थोड्या मोठ्या झाल्यावर एकाच शाळेत असतात. शाळेच्या सहलीमध्ये त्या ठरवून अदलाबदली करून एकमेकींच्या घरी जातात, आईला भेटायला, वडिलांना भेटायला. पुढची कथा सांगण्याची गरज वाटत नाही. :)

मग ह्याच कथेवरचे पाहिलेले इतर चित्रपट लगेच आठवतात.
दो कलियां : विश्वजीत-माला सिन्हा
प्यार के दो पल : मिथुन्-जयाप्रदा
कुछ खट्टी कुछ मिठी : ऋषी कपूर(पुन्हा) - रति अग्निहोत्री

दो कलिया बद्दल माहित नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे इतर तीन तर चालले नाहीत :)

असेच जुळ्या भावांचे किंवा बहिणींचे, थोडेसे वेगळे चित्रपट आठवत असतीलच.
राम और श्याम (दिलीप कुमार)
सीता और गीता (हेमा मालिनी)
चालबाज (श्रीदेवी)
किशन कन्हैया (अनिल कपूर)

वरील चारही चित्रपट एकाच कथेवर. पण चौघांचेही सादरीकरण वेगळ्या धाटणीचे, मस्त. आणि चारही चित्रपट भरपूर चाललेत.

इथे मी फक्त आता आठवणार्‍या हिंदी चित्रपटांचीच नावे दिली आहेत. असेच एकाच कथेवरच्या किंवा प्रेरित (चोरलेल्या?) चित्रपटांबद्दल (जे भरपूर आहेत) पुन्हा लवकरच लिहेन. तसेच मराठी आणि इंग्रजी एकत्र केल्यानंतर लांब यादी तयार होईलच :)

एप्रिल १०, २०११


भरपूर रुग्णालयात पाहिले की डॉक्टर रुग्णाच्या खाटेजवळ जाऊन त्याची तपासणी करतात. पण ते त्यांचे दाखल केलेले रूग्ण असतात आणि त्यांची माहिती डॉक्टरांना असते.

भरपूर दवाखान्यात, रूग्णालयात रुग्णाच्या नावाचा पुकारा झाला की रूग्ण त्या डॉक्टरच्या केबिनमध्ये जातात.

आज वेगळ्या प्रकारचा दवाखाना, डॉक्टर पाहिले जिथे रूग्ण दवाखान्यात वेगवेगळ्या भागात आहेत. डॉक्टरांकडे त्यांच्या नावाची नोंदवही (जी रुग्णाला दिली जाते) जमा असते, रुग्णांच्या त्या दिवसाच्या हजेरी क्रमांकाप्रमाणे.
मग डॉक्टर त्या रुग्णाच्या नावाचा पुकारा करतात आणि रुग्ण सांगतो की मी येथे आहे, आणि मग डॉक्टर रूग्णाच्या जागेकडे जातात. :)

सविस्तर माहिती, डॉक्टरांच्या पुढील भेटीनंतर. :)

शनिवारी एका कामाकरीता अंधेरी पश्चिमेला गेलो होतो. तिकडे गेलो ३-४ वर्षांनंतर. पण शाळेजवळ गेलो होतो साधारण १४ वर्षांनंतर. सर्व भाग पूर्ण बदललेला. नवीन इमारती, मेट्रोचे पूल वगैरे वगैरे. तिकडूनच मित्रांना फोन केला. दोन मित्र शाळेजवळच भेटले, एक त्याच्या घराजवळ. त्यांच्याशी गप्पा मारताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 'शाळा'  आणि 'दुनियादारी'तील काही भाग समोर आले. :)

मित्रांची खबरबात ऐकताना खूप चांगले वाटत होते. हा इकडे काम करतो, तो तिकडे.. ह्याचे, हीचे लग्न एव्हा एव्हा झाले, ती ह्या कंपनीत काही कामाकरीता गेल्यावर भेटली वगैरे वगैरे. पण ह्या फेरीत शाळेच्या आत जाण्यास नाही जमले. मित्राने सांगितले सुट्ट्या सुरु झाल्यात आजपासूनच. :( पुढील वारीत शिक्षक/शिक्षिकेंनाही नक्कीच भेटेन.

नंतर गेलो मी राहत होतो त्या संकुलात. सरकारी संकुल. आता काही घरे आणि कार्यालय तोडून तिकडे नवीन इमारत बांधलेली पाहिली. २५/३० ओळखीच्या घरांतील फक्त दोन घरांतील व्यक्ती भेटले. इतर सर्व दुसरीकडे रहायला गेले आहेत. तिकडच्याही जुन्या आठवणी येत होत्या. संकुलाची सध्याची स्थिती पाहून वाईट वाटत होते. एक शब्द आठवला 'भकास' :(

आता शाळेतील मित्र आणि राहत्या जागेजवळील शेजार्‍यांतील काहींशी संपर्क अजूनही आहे, काहींशी नाही. पण असो. सर्वजण आपापल्या जागी समाधानात आहेत हेच चांगले. भेटी तर पुढेही होतच राहतील. फक्त ते जुने दिवस आठवणींतच.

एप्रिल ०८, २०११

आज कार्यालयात धोक्याच्या वेळी (आग वगैरे) घंटा, सूचना कशा पाळायच्या ह्याची एक ओळख झाली. (फायर ड्रिल म्हणतात ते नव्हे) आग लागल्याची घंटा किती वेळा वाजणार, त्याबाबत सूचना स्पीकरवरून झाल्यावर काय करायचे वगैरे वगैरे. अर्थात ह्या गोष्टी बहुतेक सर्वच कार्यालयांत आजकाल होत असतीलच. त्याबाबत हे लेखन नाही. पण ह्यावरून दोन वर्षांपूर्वीची एक घटना आठवली.

२००९ मध्ये अमेरिकावारीत १ सप्टे. ला फायनल डेस्टिनेशन चा चौथा त्रिमितीय (३डी) भाग पाहिला. चित्रपट अर्थातच थरारक वाटला आणि आवडलाही. पण आधीच्या २/३ भागांत विमान, रोलर कोस्टर ह्यांतील अपघातातून वाचलेले मित्र, नंतर त्यांच्यावर नियतीचा घात ह्या गोष्टींनतर हा ३डी चित्रपट जरा जास्तच क्रूर वाटला होता.

त्यानंतर चारच दिवसांनी सहकार्‍यासोबत ३ दिवसांच्या सुट्टीत (५,६,७ सप्टें)  लास वेगस ला गेलो होतो. तिथे जगातील वेगवेगळ्या प्रसिद्ध वास्तूंच्या प्रतिकृती, उंच इमारती व त्यांचा दिव्यांचा झगमगाट आणि अर्थातच तिकडचे मुख्य आकर्षण, कॅसिनो ह्यांची भेट घेतलीच. पण तिकडचे आणखी आकर्षण होते स्ट्रॅटोस्फियर टॉवरवरील सफरी (राईड्स)१०८ मजल्यांच्या वर ह्या सर्व सफरी. मी बसलो तीनही मध्ये. Insanity, X-Scream आणि Big Shot. मस्त एकदम. ह्यातील  x-scream मध्ये प्रत्येक रांगेत २ अशा ४ रांगांत लोकांना बसवितात. मग गच्चीवरून बाहेर मोकळे सोडून देतात, गुरुत्वाकर्षणाच्या भरवशावर. जसे काही आपण खालीच पडत आहोत. मग अचानक थांबवून पुन्हा मागे. आणि परत सोडून देतात.
माझा क्रमांक आल्यावर मी त्यात जाऊन बसलो. नेमकी एकदम समोरची जागा होती. म्हणजे खाली पडताना आपल्या समोर कोणी माणूस नाही, तर थेट १०८ मजले खालची जमीनच दिसणार. खेळ सुरु करणार तेवढ्यात आगीच्या धोक्याची घंटा वाजू लागली. लगेच यंत्र थांबविले व आम्हाला खाली उतरण्यास सांगितले. धोक्याची घंटा वाजतच होती. आता माझ्यासमोर ४ दिवस आधी पाहिलेला फायनल डेस्टिनेशन आठवला. समोर १०८ मजल्यावरचा कठडा, आत आगीची घंटा. म्हटले आपले फायनल डेस्टिनेशन आले जवळ :)आम्हाला सर्वांना एका ठिकाणी जमा होण्यास सांगितले. ५-१० मिनिटांनंतर आतून घोषणा झाली, "आगीचे ठिकाण शोधण्यात आले आहे. १५ मिनिटांत सर्व ठीक करण्यात येईल."

१५ मिनिटांनी  सगळे ठीक असल्याचे सांगण्यात आले.  खबरदारी म्हणून कोणालाही न बसवता त्या यंत्राची चाचणी घेण्यात आली. पुन्हा आम्हाला त्या x-scream मध्ये बसण्याची परवानगी देण्यात आली. पण ह्यावेळी मला पहिल्या रांगेत जागा न मिळता दुसर्‍या रांगेत जागा मिळाली. पहिल्या रांगेची मजा बहुधा मला मिळाली नसेल पण ते x-scream ही थरारकच वाटले.


हा अनुभव मध्ये मध्ये आठवतच असतो, तसा एवढा गंभीरही नाही. पण आज ह्या धोक्याच्या घंटेने त्याबाबत लिहावयास प्रवृत्त केलेय असे म्हणता येईल.

एप्रिल ०७, २०११

आज संध्याकाळी कार्यालयात चर्चेचा विषय निघाला होता सॅमसंगच्या नवीन वातानूकूल यंत्राबद्दल. त्यांनी 'व्हायरस डॉक्टर' नावाखाली नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. त्यात H1N1 विषाणूलाही रोखता येते असा दावा केला आहे. तसेच एक पाणी गाळणी यंत्र आले होते, १ करोड विषाणूंना मारण्याचा दावा करणारे. वाटते हे किती खरे असेल? त्याच चर्चेत मी नुकतेच पाहिलेल्या दुसर्‍या औषधाबद्दलही बोलणे झाले. Ecosprin, Disprin ह्या औषधी शेड्युल एच (Schedule H) ह्या प्रकारात येतात तरीही डिस्परीन आपल्याला केव्हाही दुकानात जाऊन घेता येते. वास्तविक तसे नसायला पाहिजे कारण त्यावर लिहिल्याप्रमाणे नोंदणीकृत डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घ्यायच्या आणि विकायच्या असतात. पण लोक तर डॉक्टरकडेही न जाता थेट औषधांच्या दुकानात जाऊन दुकानदारलाच विचारतात, ह्यावर कोणते औषध घेऊ?

योगायोगाने घरी आल्यानंतर मटावर वरील बातमी वाचली.
अँटिबायोटिक्सचा अतिवापर धोक्याचा!

सर्दी झाली , ताप आला की एखादी अॅन्टिबायोटिक्स घेणे हे आपल्या सरावाचेच झाले आहे . पटकन आराम देणारी ही औषधे तितक्याच मोठ्या प्रमाणावर घातकही असतात . यामुळेच भारताला अॅन्टिबायोटिक्सच्या अतिवापराचा धोका असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे


खरोखर आपल्याइकडे हा धोका जास्तच आहे असे आधीही बातम्यांत आले होते. हे वाचल्यानंतर संध्याकाळचे संभाषण आठवले. आंतरजालावर Schedule H ची माहिती शोधली. ह्या दुव्यावर माहिती मिळाली त्यात होते जे औषधाच्या बाटलीवर/पट्टीवर लिहिले असते. ‘Schedule H drug- Warning : To be sold by retail on the prescription of a Registered Medical Practitioner only’

सोबत असेही कळले की
In addition to the other particulars which are required to be printed or written under these Rules, the label of innermost container of the following categories of drugs and every other covering in which the container is packed shall bear a conspicuous red vertical line on the left side running throughout the body of the label which should not be less than 1mm in width and without disturbing the other conditions printed on the label under these rules, namely: — Narcotic analgestics, hypnotics, sedatives, tranquillisers, corticosteroids, hormones, hypoglycemics, antimicrobials, antiepileptics, antidepressants, anticoagulants, anti-cancer drugs and all other drugs falling under Schedules ‘G’, ‘H’, and ‘X’ whether covered or not in the above list.

लगेच घरातील औषधी काढून पाहिली बहुतेक सर्वांवर ती लाल पट्टी आहे. एक दोन सोडल्या तर. अर्थात आम्ही डॉक्टरांची चिट्ठी दाखवूनच औषधे आणतो. पण काही औषधी अशाच आणल्या जातात.त्या म्हणजे क्रोसिन, पॅरासिटोमोल, कॉम्बिफ्लॅम, बेनाड्रिल, डिस्परीन. त्यातील डिस्परीन वर Schedule H लिहिले नाही. त्यामुळे आमच्या संध्याकाळच्या संभाषणातील हा मुद्दा गैरलागू.

पण तरीही कॉम्बिफ्लॅम हे Schedule H मध्ये येते, आणि तरीही आपण ते केव्हाही जाऊन घेऊन येतो व दुकानदारही चिट्ठी न मागता देतो. बेनाड्रिलही बहुधा त्याच प्रकारात येते. पण विना इशारा दूरदर्शन वर थेट जाहिरात दाखविल्यास त्या इशार्‍याची आणि नियमाची तीव्रता कमी होते असे नाही वाटत? त्या औषधांच्या जाहिरातीसोबत डॉक्टरांच्या परवानगीशिवाय घेऊ नये असे का लिहित/सांगत नाहीत?

आणि जाता जाता पुन्हा तोच प्रश्न. H1N1 किंवा इतरही विषाणूंचा अटकाव करण्याची क्षमता त्या वातानूकूल यंत्रामध्ये खरोखरच आहे का?

एप्रिल ०६, २०११

वर्ष पाचवीचे. पहिल्या चाचणी परीक्षेच्या आधी इंग्रजीच्या टीचरनी आम्हाला सांगितले,"जो कोणी सर्वात जास्त गुण मिळवेल त्याला माझ्याकडून एक बक्षिस मिळेल."

इंग्रजी शिकवण्यास सुरूवात झाली पाचवीपासून. मी त्या आधी थोडेफार इंग्रजी वाचायचा प्रयत्न करायचो. दुकानांवरील फलकांवरून. पण का माहित नाही आवडता विषय बनत गेला. आणि ह्या चाचणी परीक्षेत ४० पैकी ४० गुण मिळाले होते. उत्तरपत्रिका वाटताना अर्थातच सर्वांचे गुण सांगण्यात आले.  तेव्हाच टीचरनी विचारले," काय पाहिजे तुला? चॉकलेट की पुस्तक?" वर्गातील मुले-मुली म्हणायला लागले,"चॉकलेट माग" काही म्हणाले,"पुस्तक". मी विचार केला,"चॉकलेट लगेच संपून जाईल. त्यापेक्षा पुस्तक नेहमी वाचायलाही होईल आणि टिकेलही." म्हणून मग त्यांना 'पुस्तक द्या' असे सांगितले.

पुढील आठवड्यात त्यांनी मला पुस्तक आणून दिले. ते होते इंग्रजी-मराठी शब्दकोश.त्याआधी आणि नंतरही मला प्रशस्तीपत्रके आणि बक्षिसे मिळाली होती. पण हे बक्षिस नेहमीच माझ्याकरीता खास राहील. आणि जमेल तेवढे वापरातही.

एप्रिल ०४, २०११

सर्वजणांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो.


आता (एप्रिल महिन्यात) बहुतेक कार्यालयांत वार्षिक प्रगतीबद्दलच्या चर्चा, पगारवाढीकरिता, बढतीकरीता गुणांकन सुरु असेल. त्यातही सर्वांना खुश करेल असे गुणांकन मिळो (अर्थात पुढे होणारयाही) . ;)एप्रिल ०३, २०११


क्रिकेट विश्वचषक २०११ जिंकणाऱ्या भारतीय संघाचे आणि चाहत्यांचे अभिनंदन :)


एप्रिल ०२, २०११

गेल्या आठवड्यात सचिन महेश कोठारे आणि अशोक सराफ ह्यांचा आयडियाची कल्पना हा चित्रपट पाहिला. महेश कोठारे आणि सचिन ह्यांचा एकत्र चित्रपट आणि सचिन किंवा महेश कोठारे चे आधीचे चित्रपट बरे वाटायचे. म्हणून त्यांचा हा चित्रपट पहायचा होताच. पण चित्रपटगृहात जाण्याचा योग नाही जमला. मग व्हीसीडी विकत आणली. पण त्यानंतरही १ महिना नाही जमले. मध्ये एकदा लावला होता. पण रात्री उशीर झाला म्हणून आम्ही १५-२० मिनिटांतच बंद केला. पण त्या १५ मिनिटांतच कल्पना आली की ही आयडिया नवीन नाही. ह्या चित्रपटाची 'आयडियाची कल्पना' जुन्या हिंदी चित्रपटावरून घेतली आहे


मग गेल्या आठवड्यात एकदाचा लावला तो चित्रपट. नायिकेच्या गाडीने धक्का लागल्याने सचिन रुग्णालयात असतो. सचिनला रुग्णालयात ठेवल्यानंतर अशोक सराफचे फोन वर बोलणे पाहून कल्पना आली होतीच की ह्याची पुढची कथा कशी असेल. नायिकेचा भाऊ महेश कोठारे हा सांगतो की अपघात त्याच्यामुळे झाला आहे, म्हणून अशोक सराफ मेव्हण्यासोबत लहानपणी घडलेल्या घटनेचा फायदा आता पैसे उकळवायला घ्यायचा असे ठरवून खटला दाखल करतो. पुढे मग जुळे भाऊ दाखवण्याकरिता त्यांचे दुहेरी रूप दाखवणे, वगैरे वगैरे नेहमीचेच खेळ.

महेश कोठारे पोलीस कमिशनर म्हणून बरा वाटतो, आणि नेहमी प्रमाणेच त्याचे नाव महेशच दाखवलेय. सचिन घरातून पळाल्यावर महेश कोठारेची नेहमीची 'डॅम इट' म्हणण्याची पद्धत इथेही दाखवलेली आहे.

अशोक सराफने ही वकिलाची भूमिका चांगली केली आहे. चांगली म्हणण्यापेक्षा नेहमीसारखीच. काही वेळ चांगले वाटते. मग तोच जुना टिपिकल अभिनय.

सचिनला तरुण दाखवून आताच्या तरुण नायिकेसोबत नाच करणे डोक्यात जाते. त्यापेक्षा सुप्रीयालाच घेऊन काही चित्रपट काढला असता तरी चालला असता.

शेवटपर्यंत मग चित्रपट आपल्या जुन्या थाटातच. असो सांगायची गरज नाही वाटत. नंतर कधी वाटल्यास नीट परीक्षण लिहीन.

अरे हो.. तो जुना हिंदी चित्रपट सांगायचाच राहिला. संजीव कुमार, फारुख शेख, अनिता राज अभिनित लाखों की बात. त्यातील संजीव कुमारला एकदम चतुर दाखवणे, त्याच्याशी हात मिळवल्यास हाताची बोटे पुन्हा मोजून घेणे हे लहान प्रकार ही उचलले गेले आहेत.
थोडक्यात सचिन ने नवीन काही न आणता जुन्याच चित्रपटाची 'आयडियाची कल्पना' घेऊन खास काही दाखवले असे वाटले नाही.

आणखी एक मराठी चित्रपट चांगला वाटला होता. 'एक डाव धोबीपछाड'. त्या चित्रपटाची कल्पना आणि त्यांचा सर्वांचा अभिनय मस्त वाटला होता. म्हटले मराठीत असे वेगळे चांगले चित्रपट ही निघायला लागले. पण गेल्या आठवड्यात हिंदी चित्रपट पाहिला. मिथून चक्रवर्ती चा 'डॉन मुथू स्वामी'. त्याची ही तीच कथा. वाटले मराठीवरून घेतला असेल. (होते असे कधी कधी. माहेरची साडी नाही का नंतर साजन का घर म्हणून आला होता?) पण ह्या दोघांचे प्रदर्शित होण्याचे वर्ष एकच. तारीख/दिनांक माहीत नाही.

जर यांची आयडियाची कल्पना ही दुसऱ्याची आहे तर मूळ कल्पना कोणाची? म्हणजेच मूळ चित्रपट कोणता सांगाल का?


एप्रिल ०१, २०११

माझी बँक आज बहुधा एप्रिल फुल मूड मध्ये आहे. 

सकाळी लघु संदेश आला की पगाराचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत. कार्यालयातून खात्यात पैसे आल्याचे पाहिले व दुसऱ्या बँकेत पाठवायचा प्रयत्न केला. पण नाही करू दिले. 

संध्याकाळी एटीएम मधून पैसे काढायला गेलो तर माझी पैसे काढायची दिवसभराची मर्यादा ओलांडली आहे असा संदेश आला. खरे तर दिवसभरात एक रुपयाही काढला नाही.

आता थोड्या वेळापूर्वी दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढायला गेलो तर खात्यात पैसे नाहीत असे सांगितले. आणि कालचीच रक्कम दाखवली. 

आता पाहू उद्या काय दाखवते? :)


एवढी सारी विपत्र खाती, सामाजीकरण संकेतस्थळे, बँक खाते, आणि इतर संकेतस्थळे. प्रत्येकाची वेगवेगळी सदस्यनामे आणि परवलीचे शब्द. परवलीचे शब्द ठराविक काळानंतर बदलावे लागतात. मग एखादा विसरला की त्रास.


शेवटी सोपा, गावठी उपाय केला. एक्सेल शीट मध्ये सर्व अद्ययावत करून ठेवले आणि त्याला एका परवलीच्या शब्दाने सुरक्षित करून ठेवले. काही काळ तरी मनाला शांती :)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter