डिसेंबर १५, २००८

माझ्या नाणेपुराण आणि नोटापुराणातील ज्ञानात थोडीशी भर टाकत आज मी ठाण्यातील ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या इंग्लिश मीडियम हायस्कूलमधे दुर्मिळ नाण्यांचं प्रदर्शन पाहण्यास गेलो होतो. तिथे दिसले की आपल्या तसेच दुसर्‍या देशांतील जुनी(काही सध्याचीही) नाणीही ठेवली आहेत. कधीतरी एखाद्या किल्ल्यात किंवा राजवाड्यात फिरताना त्यांच्या संग्रहालयात जुनी नाणी पहावयास मिळाली होती. पण इथे तर त्यांचा सुकाळ होता. प्रत्येक नाणे हातात घेउन पाहता येत होते. तसेच इतर नोटाही तिथे प्रदर्शनास ठेवल्या होत्या. तेवढ्यात एकाने विचारले, 'हे कितीला?' त्याला उत्तर मिळाले, '२५० रू'. म्हणजे ती नाणी आणि नोटा विकण्यासही ठेवले होते. त्यावरून मला व्हीटी/चर्चगेट येथे जुनी नाणी विकणारे लोक आठवले. वाटले त्यांत आणि ह्यात काहीतरी फरक असेल.

प्रदर्शन पाहता पाहता लक्षात आले की त्या लोकांनी भरपूर देशांची नाणी/नोटा/पोस्टाची तिकिटे/प्राचीन वस्तू प्रदर्शन व विक्रीस ठेवले होते. तिथेच आपले २५ पैशांचे स्टीलचे नाणेही दिसले. किंमत १० रू. म्हटले, ’वा. ही नाणी अजूनही चलनात असतानाही ह्यांची किंमत एवढी.’ जाउ द्या. मुद्दा तो नाही.

पुढे पाहता पाहता शिवकालीन, मुघलकालीन नाणी पहावयास मिळाली. त्यांचे हे नमुने. मोबाईलमधील कॅमेरा मधून घेतल्याने चित्रे एवढी स्पष्ट नाहीत. (चित्र ४ हे ठशाचे आहे)




तसेच खादी ग्रामोद्योगने काढलेले काही भेट कूपन ही पाहावयास मिळाले. त्यावर लिहिल्याप्रमाणे, खादी ग्रामोद्योगच्या दुकानात ते कूपन देऊन वस्तू मिळत असे. नेमके आठवत नाही पण त्यांनी बहुधा तो काळ १९५० ते ६० सांगितला (स्वातंत्र्योत्तर होता एवढे नक्की). तसेच पुढे जवाहरलाल नेहरू स्मारक कोषातील पाच व पंचवीस रूपयांची नोटही पाहण्यास मिळाली. त्याचा उपयोग विचारता तोच, भेट कूपन सारखाच पण फक्त राजस्थान मध्येच.







पुढे काही तक्ते दिसले. त्यांची टिपण्णी करत बसण्यापेक्षा मी ते तक्ते सरळ मोबाईलमध्ये छापून घेतले, घरी निवांत वाचेन असा विचार करत. तेच हे तक्ते.






एक चक्कर मारून आल्यानंतर आतील रांगेत नाण्यांची व्याख्या लिहिलेली दिसली. ती इंग्रजीत असल्याने तशीच इथे लिहित आहे.
Metal, when used to facilitate exchange of good is Currency.
Currency when used according to specific weight, standards is Money.
Money stamped with a device is a Coin.

त्याच्या बाजूला पाहिले तर आतापर्यंत चलनात आलेली भारतीय नाणी ठेवली होती. मी चौकशी केली की १० रूपयांचे नाणे आहे का? त्यावर श्री. श्रीकृष्ण पारनाईक ह्यांनी सांगितले की पुढे ठेवली आहेत. तेव्हा त्यांच्या कडून माहिती काढतच माझी शंका दूर केली की, बाहेरील रांगेत जे लोक नाणी/नोटा विकत आहेत त्यांना ती नाणी जमवून विकण्याकरीता त्यांच्याकडे परवानगी आहे. पण आतील रांगेत लावलेली नाणी/नोटा हे ’शिवराई’ गटाचे ५ सदस्य श्री.पारनाईक, श्री.शिरवाडकर, श्री. निजसुरे, श्री.वैद्य आणि श्री.सोहनी ह्यांनी आपल्या छंदाकरीता जमा केली आहेत व लोकांना त्याची माहिती मिळण्याकरीता ते जागोजागी प्रदर्शन लावत असतात. श्री.पारनाईक ह्यांनी सांगितल्याप्रमाणे गेले ६५ वर्षे ते हा छंद जोपासत आहे. खरंच, ७६ ह्या वयात अजूनही त्याच जोमाने नाणी/नोटा जमा करणे व ते लोकांपर्यंत पोहोचविणे हा छंद वेगळाच.





आज शेवटचा दिवस आणि माझ्याकडे जास्त वेळ नसल्याने पूर्ण प्रदर्शन नीट पाहता आले नाही, तसेच मोबाईल मधील बॅटरी ही संपत आल्याने कॅमेरा वापरता येत नव्हता. त्यामुळे जेवढी जमली तेवढी नाण्यांची व माहितीची छायाचित्रे काढली व इथेही लावत आहे (अर्थात त्यांच्या तोंडी परवानगीनेच). त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बहुधा पुढील आठवड्यातही हे प्रदर्शन पुन्हा भरविण्यात येणार आहे.

इतिहासकालीन नाण्यांची माहिती पाहिजे असेल तर हे प्रदर्शन पाहणे हे नक्कीच.

ऑक्टोबर ०६, २००८

काल पुन्हा आईच्या खोलीत पाणी पाणी झाले. वॉशिंग मशिनचा पाण्याचा पाईप सैल झाल्याने तिथून सगळे पाणी खोलीत पसरले. बरं, मशीन बाथरूमच्या दरवाज्याजवळच आहे. तर पाणी बाथरूममध्ये जाण्यापेक्षा नेमके उलट्या दिशेला खोलीभर पसरले. काय पण ते बांधकाम. स्वयंपाकघरात मोरी तुंबली की पाणी तिकडून दिवाणखान्यापर्यंत. अरे, काय चाललंय काय? असा वैताग येतो ना...
२००२ मध्ये स्वयंपाकघर आणि हॉलचे नूतनीकरणाचे काम केले, तेव्हा करणारा कंत्राटदार म्हणाला होता, 'अगदी Zero Level ठेवू. पाणी पडले की तिकडेच थांबेल.' कसले काय. काम करायच्या आधीपेक्षा आता पाणी अधिक लवकर बाहेर येते. तीच गत आतील दोन्ही खोल्यांची.
बरं, त्याचेही म्हणणे काही अंशी ठीक असेल, की बिल्डरने लेवल नीट नाही ठेवला. जर थोड्यावेळापुरते मानले बरोबर, तरी तुम्हाला आधीच एवढी फुशारकी मारायची गरज नव्हती असे वाटते.

असो, आपण आता काय करणार? नसता म्हणाला 'Zero Level' तर काय केले असते? फक्त पाणी गळणार नाही ह्याची काळजी घ्यायची.

ऑक्टोबर ०४, २००८

ही माझी स्कूटर. वेस्पा १५०.



जेव्हापासूनच्या गोष्टी आठवू शकतो, आठवतात त्यापैकी ही एक. लहानपणापासून ह्यावर फूटबोर्डवर उभा राहून, मागील सीट वर बसून बाबांसोबत फिरलो.

वडिलांच्या बदलीमुळे ह्या स्कूटरनेही वेगवेगळ्या शहरात संचार केला. माझ्या वडिलांना मदत केली. नागपूर-भंडारा-ठाणे-भिवंडी-अंधेरी. वडिलांनी मस्त वापर केला गाडीचा. पण त्यांच्या निधनानंतर बंदच पडून होती. नंतर एक वर्षांनी आम्ही ती चालण्याइतपत नीट करून घेतली.

१९९५ मध्ये मी ह्या स्कूटरवर पहिल्यांदा चालवण्याकरीता बसलो. त्यावेळी अंधेरीत राहताना तेथील मित्रांनी दुचाकी शिकण्यास मदत केली ती ह्याच स्कूटरवर. त्याआधी एका मित्राने त्याच्या कायनेटीक होंडा वर एक प्रात्यक्षिक दिले होते. पण ते जुजबी. फक्त एक दोन वेळा. बाकी सर्व ह्याच स्कूटरवर. तेव्हाच अभियांत्रिकीत प्रवेश घेतल्याने मग घरापासून दूर रहावे लागले होते. त्यामुळे नीट सराव नाही झाला. पण जेव्हा कधी घरी येईल तेव्हा स्कूटर बाहेर काढून शिकणे चालूच होते. १९९६ मध्ये आम्ही रहायला आलो ठाण्याला. पण तेव्हा ही सोबत आणली नव्हती. शेजारीच राहणार्‍या एका मित्राला आईने ह्या स्कूटरला रंगरंगोटी करावयास त्याच्या ओळखीच्या मेकॅनिककडे द्यायला सांगितले होते. त्यानंतर ती त्याच्याच कडे होती. शेवटी १९९७ मध्ये त्याच्याकडून आणली मस्त रंगवून डागडुजी केलेली गाडी. तोपर्यंत मी ही चालविणे शिकलो होतोच. मग शिकाऊ परवाना घेऊन तयारी चालू केली. परंतु पक्का परवाना काढायला जायला वेळच नाही मिळाला. त्यामुळे पहिला परवाना तर तसाच वाया गेला. मग दुसरा शिकाऊ परवाना काढला तेव्हा कार चालविणेही शिकत होतोच. मग दोन्ही पक्के परवाने एकत्रच घेतले. मग तर काय काहीही काम असले की स्कूटरवरूनच बाहेर जाणे होत होते. मित्राकडे, बाजारात, नुसते फिरणे :D

कॉलेजला होतो तेव्हा विचार केला होता की शेवटच्या वर्षी स्कूटर घेउन जाईन तिकडे. घरून परवानगीही घ्यायची होती. पण स्कूटरच्या कागदांचा गोंधळ होता. आणि ही गाडी नागपूरवरून इतर ठिकाणी नेल्यानंतर त्याची नोंदणीच नव्हती केली. मग १९९९ मध्ये माझ्या आतेभावाकडून नागपूरवरून त्या कागदपत्राची पूर्तता करून गाडी माझ्या नावावर करून घेतली व ती कागदे इकडे आल्यावर ठाण्यातील RTO मध्ये काय ती फी भरून सर्व गोंधळ संपविला. नंतर ह्या स्कूटरची अद्ययावत नोंदणी वही परत घेताना मी विचारले, ’आणखी काही करायचे आहे का?’ तेव्हा मला उत्तर मिळाले, ’आता इकडे यायची गरज नाही.’ मी ऐकले होते की काही तरी One Time Tax असतो गाड्यांचा. नोंदणी वहीत पाहिले तर तो ही भरला होता. त्यामुळे मग जास्त काही विचार नाही केला आणि बिनधास्त स्कूटरवर हुंदडणे चालू झाले. एवढे करूनही कॉलेजकडे गाडी नेणे जमले नाही. :(

तेव्हा तरी ठाण्यातच गाडी चालविणे होत होते. मग हळू हळू ठाण्याच्या परिघाच्या बाहेरही नेणे चालू झाले. इकडे मुलुंड, मग पवईच्या आयआयटी कॉलेजपर्यंत, तिकडे बेलापूरपर्यंत. नंतर कार्यालयात जायला लागल्यापासून दररोज सकाळी स्टेशन पर्यंत स्कूटरवर जाणे. तिकडे गाडी लावून मग लोकलने दादरला ऑफिस. संध्याकाळी परत आल्यानंतर बस-रिक्षाची कटकट नव्हती. मग एक दोन वेळा दादरपर्यंतही ही स्कूटर नेली.
तुम्ही म्हणाल, आता स्कूटरच आहे ती. एवढ्या ठिकाणांपर्यंत नेली तर एवढे काय? अहो, ह्यात मुद्दा आहे की ह्या गाडीकडे पाहून लोकांचा पहिला प्रश्न असतो, 'केव्हाची ही गाडी?' माझे उत्तर असते, '१९७१'. माझ्यापेक्षाही वयाने भरपूर मोठी आहे ही स्कूटर. त्यामुळेच कधीही कुठे ती न्यायची म्हटले तर भरपूर लोकांना प्रश्न पडतो की ही गाडी जाईल का? बाकी गाडीमध्ये काही अडचण नाही हो. (काय ते 'टचवूड' म्हणतात ते ही करतो आता ;) ) मध्ये २/३ वेळा रस्त्यातच बंद पडली होती तेव्हा तिकडे जवळच असलेल्या मेकॅनिककडे ठेवून मग घरी आलो होतो. पण अर्थात त्यात चुकी माझीच होती. नीट काळजी नाही घेतली तर असे त्रास होणारच. माझे वडील तर दर रविवारी स्कूटर उघडून साफ करायचे. पण मला काही ते जमत नाही. तरीही मेकॅनिकला सांगून दर ३/४ महिन्यांनी डागडुजी करून घेतो. बाकी वडील वापरायचे त्यापेक्षा मी गाडीची वाटच लावली आहे.:(



तर ह्याच सर्व परिस्थितीत म्हणजे लोक गाडीच्या चालण्यावरून शंका घेत असताना, मी गेल्या वर्षी ही स्कूटर पुण्याला नेण्याचे ठरविले. कागदपत्रांची पूर्तता बरोबर आहे की नाही हे कोणाला नीट माहित असेल असा प्रश्न आल्याने मग मी थेट रस्त्यावर चौकात उभे असलेल्या वाहतूक पोलिसांनाच त्याबद्दल विचारले. ते म्हणाले, RC बुक, PUC व विमा एवढेच पाहिजे, आणि काय तो कर भरलेला असला पाहिजे. महाराष्ट्रातच गाडी असल्याने ’ना हरकत प्रमाणपत्रा’ची भानगड नाही. मित्रांसोबत ह्याबाबत बोललो की मी नेतोय गाडी पुण्याला, ते ही स्वत: चालवत. तेव्हा एक मित्र बोललाही की 'स्वत: नको नेऊस म्हणून. घाटात पहिल्या गेअर मध्ये ही त्रास होऊ शकतो.' पण मी जिद्दीला पेटलो तेव्हा त्यानेच रस्त्याची नीट माहिती दिली व सांगितले की मध्ये गाडी घाटात चढली नाही तर काही Towing वाले असतात त्यांना सांगायचे, ते गाडी उचलून आणून देतील. त्याच्या दुसर्‍या दिवशी मी सकाळी ७ ते ११ असा ४ तास प्रवास करत माझी ही स्कूटर पुण्य़ापर्यंत पोहोचविली. घाटात पहिल्याच काय दुसर्‍या गेअर मध्येही नीट चालली. तेव्हा मग लक्षात आले, ह्या गाडी अजूनही पुढे मला साथ देईल. मग एक वर्ष पुण्याचीही रपेट ह्या स्कूटरवरून केली. तिथेही मित्रांचे म्हणणे होतेच, 'किती जुनी ही गाडी' :)

आता गेले २/३ महिने आणखी एक प्रश्न समोर आला, १५ वर्षांवरील गाडीची नोंदणी दर ५ वर्षानी पुन्हा करावी लागते. ह्याबाबत मला माहित नव्हते. २ आठवड्यांपुर्वी गाडीचे सर्व कागदपत्रे पुन्हा नीट जमा केली व क्षेत्रिय वाहतूक कार्यालयात जाऊन त्यांच्यासमोर कागदपत्रे ठेवली व विचारले की साहेब, ह्यात काय काय करावे लागेल. तेव्हा त्यांनी सांगितले की 'काही नाही. गाडी अधिकार्‍याकडून तपासून घ्या व १६० रू भरून पुनर्नोंदणी करून घ्या'. दुपारी त्यांनी सांगितलेल्या दुसर्‍या कार्यालयात गेलो. तेव्हा कळले की २ वाजता अर्ज व फी भरणे बंद होते. मला शनिवार शिवाय बाकी दिवस वेळ नसल्याने पुन्हा २ आठवडे थांबणे आले. दरम्यान कळले की गाडीची स्थितीही चांगली पाहिजे. त्यामुळे मग काल मेकॅनिककडे घेउन गेलो. त्याला सांगितले की 'असे असे आहे, बघ काही करायचे बाकी आहे का?' त्याकडून दिव्यांची डागडुजी करून घेतली. तो म्हणाला की 'बहुधा १६० रूपयांमध्ये होणार नाही. ७००/७५० रू जातील'. मी म्हटले, 'जेवढे आहेत तेवढे, बघुया.' :) सकाळी अर्जात वाचले की Chassis क्रमांक ही ते तपासतात. आता वाहन नोंदणी वहीत त्याची नोंद होती त्यामुळे अर्जात लिहायला त्रास नाही झाला. पण अधिकारी ते तपासणार म्हणजे? त्या मेकॅनिककडे गेलो. तो नव्हता. त्याच्याच दुकानातील दुसर्‍या व्यक्तीने सांगितले की एवढ्या जुन्या गाडीचा पत्रा सडल्याने तो क्रमांक आतापर्यत निघूनही गेला असेल. म्हटले आता आली का पंचाईत? शेवटी काय निकाल लागायचा तो लागू दे म्हणून गाडी घेउन गेलो. तिकडे अधिकार्‍यांकडे सांगायला गेलो की ,'साहेब, गाडीच्या नोंदणीचे नूतनीकरण करायचे आहे'. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, 'chassis क्रमांक दिसतो का?' :( म्हणालो, 'नक्की माहित नाही.' ते म्हणाले, 'आधी ते पाहून ये'. गाडीकडे गेलो. शोधायचा प्रयत्न केला. त्या माझ्या ओळखीच्या मेकॅनिकला फोन केला. तो म्हणाला की, 'डीकीच्या खाली साफ करून बघ, तिथे असेल'. नाही मिळाला. तेव्हा मग तिकडच्या एका एजंटला मदत मागितली. त्याने सांगितले की 'हा इथे आहे, नीट साफ केला की दिसेल'. झाले काम. पुन्हा गेलो. अधिकारी म्हणाले फी भरून ये. फी भरली. एका अधिकार्‍याने पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे ३०+१००= १३० व दंडाचे १००. कारण १९९९ नंतर २००४ मध्ये मी नूतनीकरण करायचे होते ते नाही केले. ह्या गाडी तपासणार्‍या अधिकार्‍यांकडे गेलो ते म्हणाले, १३० नाही १६० रू. पुन्हा जादा ३० रू भरून आलो. मग पाहिले तर चेसिस क्रमांकाचा पेन्सिलीने ठसा अर्जावर उमटवायचा आहे. तो उमटविला. शेवटी त्यांनी पूर्ण तपासून स्कूटरच्या नोंदणीच्या नूतनीकरणावर सही व शिक्का मारला. हुश्श्श्श्श. आता पाच वर्षे चिंता नाही. फक्त गाडी नीट ठेवणे,चालविणे व PUC दर सहा महिन्यांनी करत रहायचे.



अजूनही भरपूर लोक, मित्र म्हणत असतात, ’विकून टाक ही स्कूटर आता.’ पण मी म्हणतो, ’चालू आहे नीट, २५ ते ३० चा एवरेज देते आणि मला कुठे लांब न्यायची आहे?’ आणि आज जे गाडीचे नूतनीकरण झाले त्यावरून तर मी हाच विचार करतोय जोपर्यंत ही माझी स्कूटर नीट चालतेय तोपर्यंत तरी चालवत रहायचे.

चल मेरी वेस्पा :)

सप्टेंबर २८, २००८

प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर ह्यांचे काल निधन झाले. माझ्या आवडत्या गायकांपैकी एक.

गेले काही वर्षे त्यांच्याबद्दल जास्त काही ऐकण्यात येत नव्हते.
मध्ये कधी तरी त्यांचा एक अल्बम आला होता, पण पंजाबी गाण्यांचा.
आणि नुकताच त्यांना लता मंगेशकर पुरस्कार घोषित करण्यात आला होता.

त्यांची मला जास्त आवडलेली गाणी:
हिंदी-
तुम अगर साथ देने का वादा करो..
बीते हुए लम्हों की कसक साथ तो होगी..
दिल की ये आरजू थी कोई..
तेरे प्यार का आसरा चाहता हूं..
किसी पत्थर की मूरत से
निले गगन के तले
मेरे देश की धरती
हैं प्रीत जहा की रीत सदा..
चलो इक बार फिर से अजनबी बन जाये हम दोनो..
ना मुंह छुपा के जियो..

मराठी-
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा
सूर तेच छेडीता, गीत उमटले नवे
तसे दादा कोंडकेंची भरपूर गाणी.

ह्या एका दमदार आवाजाच्या गायकाला माझी श्रद्धांजली.

सप्टेंबर २१, २००८

'बॉम्बब्लास्ट' सिनेमा पाहताना त्यातील एक दृष्य. बॉम्बस्फोटानंतर जखमी/मृत व्यक्तीच्या देहांकडे पाहताना रोनित रॉयला उलटी होते. माझा एक मित्र म्हणाला,"खरं तर पोलिसांना हे नको व्हायला." त्यावर दुसरा मित्र म्हणाला,"का? तो ही माणूसच आहे." आधीचे आठवत नाही पण तेव्हापासून असले काही प्रसंग पाहिले/ऐकले की पोलिसांबद्दल,डॉक्टरांबद्दल विचार मनात येतात, 'असं सारखं सारखं बघून त्यांच्या संवेदनावर फरक तर नसेल ना पडत?'

'अब तक छप्पन' किंवा तत्सम सिनेमे पाहताना माझ्या बहिणीचे वाक्य आठवते. ती ही म्हणाली की नेहमी आपण असे पाहले तर नंतर आपल्याला त्याची सवय होऊन जाईल. आज काल तेच अनुभवायला मिळतंय. आधी खरे तर एखाद्याला मारताना दाखवत नव्हते. पण हळू हळू त्याची सुरूवात झाली. तेव्हा सिनेमात नुसते गोळी मारली किंवा चाकू खुपसला तरी पाहण्यार्‍या एखाद्याच्या तोंडून 'ईईईई' निघायचे, पण आता नेहमी खून, गोळ्या मारणे वगैरे पाहून त्याबाबत लोकांना बाबत जास्त काही वाटत नाही.

घरी चिकन करायचे म्हटले तर मी कोंबडी आणायला जातो तेव्हा त्यांना मारताना कधी पाहत नाही. फक्त ते तुकडे समोरच करून देतात ते दिसते. ह्यावरूनच 'बाकी शून्य' मधील जय सरदेसाईचा स्वत: कोंबडी कापण्याचा प्रकार आठवला. त्यालाही सुरूवातीला ते विचित्र वाटते, नंतर तो सराईताप्रमाणे ते करतो. त्याचप्रकारे मलाही बहुधा त्याची आता सवय झाली आहे. पण जेव्हा मी एखाद्याला
लहान मुलाला तिथे आणलेले पाहतो तेव्हा त्यांना लगेच सांगतो की लहान मुलांना तिथे आणू नका. ते आपण थोडं फार थांबवू शकतो पण टीव्हीवर जे सर्रास दाखवले जाते त्यावर अजून तरी जास्त काही थांबविणे होत नाही. दोन आठवड्यांपुर्वी एक मित्र आला होता माझ्या घरी त्याच्या बायको आणि मुलासोबत. तेव्हा एका वाहिनीवर असेच काही तरी चालू होते, माझ्या लक्षात येऊन लगेच कार्टून चॅनल लावला. खरं तर त्यातही आजकाल काय दाखवतात मला माहित नाही. तरीही 'अभय सिनेमातील वाक्य आठवते, कमल हासन(अभय) ला कोणीतरी विचारतो की तुला हे लोकांना मारण्याचे प्रकार कसे सुचतात, त्यावर तो म्हणतो की 'कार्टून चॅनल मधून'. बापरे, म्हणजे मुलांची त्यातूनही सुटका नाही का?

मी वर म्हणालो की मला ही बहुधा त्याची सवय झाली असेल. कारण ३/४ वर्षापुर्वी AXN वर Fear Factor मध्ये एका मुलीला Bowling मध्ये १० पिन पडायच्या राहतात म्हणून तेवढेच म्हणजे १० जिवंत Beetles खायला सांगितले होते. तेव्हा तो प्रसंग पाहताना का माहित नाही पण मला मजा वाटली होती. :(
एक प्रश्न पडतो, मी मांसभक्षण करतो म्हणजे त्याबाबत संवेदनशील असणे विसंगत आहे का?

असो, टीव्ही वर तर आता सिनेमेच सोडा पण एखाद्या अतिरेक्यांशी एन्काऊंटरचे ही थेट प्रक्षेपण दाखवतात. अर्थात तिकडे प्रत्यक्षात काय होते हे दिसते, पण त्याचा वाईट परिणाम नको व्हायला.
त्यातल्या त्यात परवा जेव्हा दिल्ली मधील अतिरेक्यांच्या एन्काऊंटरचे थेट प्रक्षेपण दाखवले होते त्यानंतर एका वाहिनीवर, बहुधा IBN7 वर, एक रिपोर्टर सांगत होता की तिथे एका लहान मुलाने ते सर्व पाहिल्याच्या धक्क्यात होता. तर हा रिपोर्टर त्या मुलाला विचारत होता की 'उस बारे में कुछ बताओ'.

वरील सर्व आणि जर त्या ५/६ वर्षाच्या मुलाला त्या गोळीबाराबद्दल विचारले जात असेल तर आता वाटते की खरंच आपल्या संवेदना बोथट होत चालल्या आहेत का?

सप्टेंबर ११, २००८

नुकत्याच सुरू झालेल्या ’कलर्स’ वाहिनीवर नवीन चित्रपट दाखविण्याची जाहिरात बघितली (त्यावर एक-दोन चित्रपटही पाहिले), तेव्हा खूप दिवसांपासून मनात असलेले विचार पुन्हा समोर आले. हिंदी चित्रपट दाखविल्याशिवाय कोणतीही वाहिनी बहुधा तग धरू शकत नाही. जसे आम्ही वसतीगृहात राहत असताना एक मित्र खानावळीबद्दल बोलला होता की, बटाटे नसते तर ह्या मेस वाल्यांचे काय झाले असते? ;) आपल्याला ही सवय दूरदर्शनवर (वाहिनी बरं का, आधी ती एकच वाहिनी होती) हिंदी सिनेमे दाखवत होते तेव्हापासूनची. बहुधा त्यांना काही एवढी गरज नव्हती, पण लोकांची आवड म्हणून ते दाखवायचे.

त्याच आठवणीप्रमाणे, ह्या पुढच्या लिखाणात वाहिन्यांची फक्त हिंदी चित्रपटांची गरज नाही तर वाहिन्यांनी गरजेप्रमाणे काय काय बदल केलेले मला दिसले त्याचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. ह्यात कार्यक्रमांच्या दर्जाबद्दल काही विचार नाहीत. फक्त त्यांची सुरूवात काय होती व आता कसे आहेत त्याबद्दल जाणवलेले थोडेसे.

सर्वात आधी मला आठवते ते ’सब टीव्ही’. SAB अर्थात श्री अधिकारी ब्रदर्स. अधिकारी बंधूंनी आपली नवीन वाहिनी सुरू केली तेव्हा त्यावर वेगवेगळे कार्यक्रम दाखवायला सुरूवात केली होती. विनोदी, गंभीर, भावनाप्रधान. त्यांच्या स्वत:च्या एवढ्या मालिका होत्या की त्यांना वास्तविक नवीन मालिका बनवायचीच गरज नव्हती. जुन्या हिंदी मालिका पुन्हा दाखवून, मराठी मालिका हिंदीमधे अनुवाद करून आणि नवीन कार्यक्रम ही बनवून, त्यांनी ती वाहिनी सुरू ठेवली होती. नंतर त्याचा साचा बदलून सांगितले की, आम्ही फक्त विनोदी कार्यक्रमच दाखवू. ह्या एवढ्या प्रकारात चित्रपटांना त्यांनी पूर्ण वगळले होते असे नाही. हिंदी चित्रपटांतील गाणी दाखवत होते पण कधी हिंदी सिनेमा दाखविला नाही. पुढे काय झाले माहित नाही, ती वाहिनी 'सोनी'ने विकत घेतली आणि त्याचा साचा पूर्णत: बदलला. आता ती ही इतर वाहिन्यांप्रमाणेच वाटते. काही सोडून बाकी सारखेच कार्यक्रम आणि सिनेमा.

'झी स्माईल' ह्या वाहिनीच्या नावाप्रमाणेच त्यावर विनोदी कार्यक्रम असण्याची अपेक्षा होती. जेव्हा सुरू झाली तेव्हा नेमके आमच्याकडे दिसत नव्हती. मध्ये मध्ये इतर ठिकाणी पाहिली तर सुरू होते त्यावर विनोदी चित्रपट व कार्यक्रम. पण आता त्यावरही झी टीव्ही वरील आधीच दाखविलेले गैरविनोदी कार्यक्रमही दाखवतात. माझ्या माहितीप्रमाणे 'झी स्माईल' ही भारतातील पहिली २४ तास विनोदी कार्यक्रम दाखविणारी वाहिनी होती आणि बहुधा त्याच स्पर्धेत सोनीने नवीन वाहिनी न आणता आधीच चांगली चालू असलेली 'सब टीव्ही' वाहिनी आपल्याकडे वळवून घेतली. :)

'स्टार' ने आधी इंग्रजी वाहिन्याच आणल्या होत्या. पण त्यांनी जेव्हा 'स्टार प्लस' हिंदी मध्ये बदलविले तेव्हा दूरदर्शनवरील काही मालिका तिकडे वळत्या केल्या. नंतर दूरदर्शनने कांगावा केला की एकच मालिका दोन वाहिन्यांवर दाखवायची नाही. आणि म्हणून त्यांनी काही मालिका दाखविणे बंद केले. पण ते स्वत: ’सर्फ व्हील ऑफ फोर्च्य़ून ’ सोनीवर चालू असतानाही दूरदर्शनवरही दाखवत होते. ती बहुधा त्यांची गरज होती. :)

२००३ की २००४ मध्ये एका वृत्तपत्रात बातमी आली होती की ई टीव्ही चे मालक (मालकच आहेत ना ते?) श्री. रामोजी राव ह्यांनी घोषणा केली होती की ई टीव्हीच्या वाहिन्यांकरीता आम्ही कधीच शुल्क आकारणार नाही. पण फायदा दिसला म्हणून की खरंच गरज पडली म्हणून, त्यांनीही त्यांच्या वाहिन्या सशुल्क केल्या.
मी ऐकल्या/वाचल्याप्रमाणे भारतातील वाहिन्यांच्या शुल्क आकारण्याचे नियम आणि इतर काही देशांतील नियम ह्यांच्यात फरक आहे. सशुल्क वाहिनी असेल तर त्या वाहिनीवर जाहिराती दाखवता येत नाहीत. हे जर खरे असेल तर आपल्या देशात तो नियम लागू होऊ शकतो का? शकल्यास लागू व्हायला किती वर्षे वाट पहावी लागेल? ;) झाला तर खरोखरच सर्व वाहिन्यांचा चेहरामोहराच बदलून जाईल ;)

अरे हो, एक वाहिनी तर राहिलीच. ’स्टार गोल्ड’. ही चित्रपट वाहिनी सुरू केली तेव्हा त्यांची टॅगलाईन होती, "लौट आये बीते दिन". अर्थात ते जुने सिनेमे दाखविणार होते, जे त्यांनी काही काळ दाखविलेही. पण त्यांनीही शेवटी स्वत:चा साचा बदलून नवनवीन हिंदी सिनेमे दाखविणे सुरू केले.

वृत्तवाहिन्यांबद्दल काय लिहावे? बहुधा १९९७/९८ मध्ये झी टीव्ही च्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमात एकाने विचारले होते की, ’तुम्ही तुमच्या वाहिनीवर बातम्या का नाही दाखवत?’ तेव्हा त्याला उत्तर देण्यात आले होते की हे शक्य नाही आहे. पण दोन वर्षांतच त्यांनी नुसते काही वेळ बातम्या दाखविणेच सुरू नाही केले तर २४ तासाची वाहिनीच सुरू केली. आणि आज आपण तर पाहतच आहोत की किती वाहिन्या आल्या आहेत. ह्या सर्व वृत्तवाहिन्यांनीही आपला साचा नेहमी बदलवत आणला आहे. कुठवर नेतील कोणास ठाऊक :)

'सोनी' वर आधी क्रिकेट सामने दाखवित होते. पण मग त्यांनी 'मॅक्स' ही वाहिनी सुरू केली तीच क्रिकेट व हिंदी सिनेमांकरीता. त्यात तरी त्यांनी अजून बदल केला नाही. हो, पण त्यांना ती वाहिनी अपुरी पडते बहुधा. म्हणूनच 'सब टीव्ही' वरही सामने दाखविले जातात.

ह्या सर्व वाहिन्यांत काहीच वाहिन्या अजूनही जशा होत्या तशाच राहिल्यात. उदा. 'दूरदर्शन', 'डिस्कवरी'. त्यांच्या कार्यक्रम दाखविण्याच्या प्रकारात जास्त काही बदल झालेला नाही. डिस्कवरीवाल्यांना मी म्हणेन, तुम्ही बदलू नका, आणि दूरदर्शनवाल्यांना सांगेन, थोडे बदला.

गेल्या महिन्यापासून पाहत आहे की HBO वर इंग्रजी सिनेमे हिंदीत अनुवाद करून दाखवत आहेत, सोबत खाली इंग्रजी सब-टायटल्स. म्हणजे, HBO ही बदलत आहे की काय?

ऑगस्ट २७, २००८

'फूंक' चित्रपट थियेटर मध्ये एकट्याने बघणार्‍याला रामगोपाल वर्माने ५ लाख रूपये देण्याचे आव्हान दिले होते असे वाचण्यात आले.

अशीच एक पैज एका इंग्रजी सिनेमाकरीता ठेवली होती असे लहानपणी ऐकले होते. तो कोणता सिनेमा त्याचे नाव आठवत नाही. त्यावेळीही सिनेमागृहाच्या बाहेर एक ऍम्बुलन्स ठेवली होती असेही सांगण्यात आले होते. आणखी एक चित्रपट, बहुधा 'The Exorcist'. ह्या सिनेमाबद्दलही असे ऐकले होते की हा सिनेमा बनवून झाल्यानंतर पाहताना ९ जण भीतीने मेलेत. त्यामुळे त्या सिनेमाच्या मूळ प्रिंट्स जाळून टाकल्या गेल्या व त्याच कथेवर नवीन सिनेमा पुन्हा त्याच नावाने बनविण्यात आला.

आमच्या लहानपणी भूताचे सिनेमे पाहताना जरी भीती वाटत नसली तरी रात्री झोपताना थोडीफार भीती वाटायचीच. तशात कधी कधी माझी बहिणही मुद्दाम घाबरवत असे. घरीच व्हीडीओ प्लेयर असल्याने सुट्ट्यांमध्ये तर सिनेमे आणून पाहणे चालूच होते. भूताचे हिंदी चित्रपटही भरपूर पाहिलेत. काही वेळा आम्ही व्हीडीओ लायब्ररीत जाऊन भूताचे इंग्रजी सिनेमे देण्याची खास मागणी करत असू. जरी स्वत:हून भूताच्या सिनेमाची कॅसेट मागितली तरी एक-दोन चित्रपट आम्ही पूर्ण न पाहताच परतही केले होते. सुरूवातीला हे सर्व सिनेमे पाहताना भीती वाटायची. पण काही सिनेमात भूताचे(की राक्षस?) रूप पाहून काही वेळा हसूही येत असे. 'तहखाना' सिनेमात तर शेवटच्या मारामारीच्या वेळी भूत कोणाला तरी पायाने मारताना दाखविले तेव्हा त्याने कॅनवासचे बूट घातले असल्याचे आम्हाला वाटले होते. :) नुकताच येउन गेलेला ’भूलभूलैय्या’ सिनेमा प्रियदर्शनचे दिग्दर्शन, अक्षय कुमार व परेश रावल ह्यांचा सहभाग असल्याने बहुधा लोकांनी त्याला सुरूवातीपासूनच विनोदी सिनेमा गृहित धरला होता.

'फूंक' सिनेमा किती थरारक आहेत हे तर सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल, पण त्याकरीता सिनेमागृहात जाणे जमेल की नाही अंदाज नाही. मला वाटते की अशा प्रकारचे सिनेमे सिनेमागृहात पाहण्यातच जास्त मजा येते. मोठा पडदा, मध्येच दचकवण्याकरीता टाकलेला चढा आवाज ह्याने थोडेसे भयप्रद वातावरण तयारच असते. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की असले चित्रपट चित्रपटगृहात जाउनच पहावेत.
आता भीती वगैरे काही वाटत नाही. पण सिनेमांतील काही प्रसंग जे पाहून खरोखरच भीती वाटली होती ते म्हणजे,
'वीराना': ह्यातील कारमध्ये बसलेल्या भूताचे पाय उलटे फिरविताना दाखविले होते. तो प्रसंग नंतरही काही दिवस मला घाबरवत होता.
'गहराई': एकदा रात्री दूरदर्शनवर दाखविला होता. तेव्हा मी सिनेमा पाहता पाहताच झोपी गेलो होतो. मध्येच जाग आली तेव्हा बहुधा पद्मिनी कोल्हापुरेच्या सिनेमातील दुहेरी आवाजाच्या प्रसंगामुळे भीती वाटली होती.
'राज' ह्या सिनेमात बिपाशा बसूला भूत प्रथम जेव्हा आरशात दिसलेले दाखविले तो प्रसंग भयप्रद वाटला होता.
'भूत' सिनेमात उर्मिला रात्री पाणी प्यायला जाते. परत येताना ती जेव्हा पायर्‍या चढून परत जाते त्यावेळी अचानक समोर भूत दाखविले तेव्हा खरोखरच दचकलो होतो.
लहानपणी ड्रॅकुलाचा कुठलासा इंग्रजी सिनेमा आणला होता. त्यात थोड्या सुरूवातीनंतर ड्रॅकुला जेव्हा शवपेटीचे झाकण उघडतो, तो प्रसंग पाहून तेव्हा का कोण जाणे आम्हाला एवढी भीती वाटली होती की आम्ही तो सिनेमा तेव्हाच बंद केला होता.

तुम्हालाही असे काही सिनेमे आठवतात का ज्यात, निदान तो सिनेमा पाहताना तरी, भीती किंवा कमीत कमी दचकणे तरी अनुभवले असेल?

ऑगस्ट २५, २००८

निबंध लिहा: माझा आवडता प्राणी, शाळेचे आत्मचरित्र, वाचनाचे महत्व.
शाळेत असा प्रश्न असायचा सहामाही व वार्षिक परिक्षेला. किंवा मग पत्रलेखन. गुण १० ते १५. त्यावेळेला नेमके काय लिहावे ते माहित नसायचेच. मित्रांसोबत जास्त वेळ शाळेतील अभ्यासाचेच जास्त बोलणे व्हायचे किंवा मग खेळ , दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमे ह्यांच्यावर चर्चा व्हायची. पण त्यावर लिहायला कधी कोणी नाही सांगितले. त्यामुळे निबंध लिहायला मदत व्हायची निबंधावरील पुस्तकाची किंवा मार्गदर्शकाची(हो, तेव्हा मार्गदर्शक वापरणे म्हणजे थोडेफार कमीपणाचे मानले जायचे) तेही वापरावयास सुरुवात केली होती. पण त्या वाचनावर, ठरलेल्या विषयांवरच लिहिले जायचे तरीही पूर्ण गुण मिळण्याची खात्री नसायची.
तसेच नेत्यांच्या जयंती/पुण्यतिथीलाही आपण त्या त्या नेत्याबद्दल भाषण लिहून (घेउन) व त्याची तयारी करून मग व्यासपीठावर बोलायला जायचो. मग ते शाळेत असो किंवा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना. माझ्या आठवणीप्रमाणे मी एका शाळेत जाऊन डॉ. हेडगेवारांवर भाषण केले होते. बाकी सर्व आपल्या शाळेतच. पण ते सर्व लिहिण्यातही कोणीतरी आपल्याला मदत केलेली असायचीच.

नंतर मग शाळेच्या बाहेरही थोडाफार सहभाग होऊ लागला. कॉलनीमधील गणपती उत्सवात एखाद-दुसरे एकपात्री कथन ही केले. मी ८/९ वीत असताना घरातील गणपतीची तयारी होत असताना मी व माझ्या बहिणीने गप्पा-गप्पांतच एक कथा तयार केली. ती आम्हालाच एवढी आवडली की मग आम्ही त्यावर एक अंकी नाटक लिहून काढले. मग इतरांची मदत घेऊन सार्वजनिक गणपतीत त्या नाटकाचे सादरीकरण केले.

हळू हळू (म्हणजे रखडत नाही हो, मी एक हुशार विद्यार्थी होतो :) ) वरच्या इयत्तेत गेलो, कॉलेज मध्ये गेलो तर तो अनुभव वाढत गेला. इतर पुस्तक वाचन, वर्तमान पत्रे वाचणे सुरू झाले. भरपूर लोकांची पुस्तके, कथा वाचल्या. बातम्या, सिनेमे, गावा-गावांतील अनुभव गाठीशी येत गेले. तसेच विचारशक्ती वाढत गेली. त्यामुळे मित्रांसोबत/इतर लोकांसोबत चर्चा वाढत गेल्या. वादही घालू लागलो. त्यात वेगळेपणही वाटायचे.
मग आंतरजालावरील भ्रमण सुरू झाले. कॉलेज संपल्यावर काही मित्र दूर गेले. मग त्यांच्याशी इमेलवर संपर्क चालू राहिला. स्वत:चे अनुभव त्यांना मोठ्या-मोठ्या विपत्रांतून लिहून पाठवणे चालू झाले.
आंतरजालावर भ्रमण वाढत गेले. तेव्हा मराठी संकेतस्थळेही नावारूपाला आली होती. त्यांचे सदस्यत्व घेउन वाचन चालू झाले. तिथे प्रतिक्रिया देता देता नवीन गोष्टी कळत गेल्या. मग स्वत:चेही काहीतरी लिहिणे चालू झाले. प्रतिसाद मिळत गेले तसे हुरूप आला. काही वेळा विरोधातही प्रतिक्रिया मिळाल्या. पण आता सवय झालीय. त्यामुळे आता लिहितानाच असे विषय निवडतो की ज्यात मला माहित आहे, जमल्यास वाद घालण्यासही तयारी असा ;)
आता ब्लॉगमुळे तर गेल्या वर्षापासून स्वत:च्या मनातील विचार/तक्रारी खरडणे चालू झाले.

हे सर्व आठवत असताना नुकताच पिवळा डांबिस ह्यांचा हा अग्रलेख वाचला. आणि वाटले मला वाटत असलेले विचार ह्यात आहेतच. जसा सर्वांमध्ये फरक पडला, तसा शाळेतील निबंधापासून आता थोडेफार ललित लेखनापर्यंत स्वत:हून लिहिण्याइतपत माझ्यात फरक नक्कीच पडलाय. (लोक वाचतील, नाही वाचतील तो भाग वेगळा ;) )

तेव्हा चला, आपले लिहिणे सुरूच ठेवूया. पाहू आणखी किती फरक पडतो ते :)

ऑगस्ट २३, २००८

पुन्हा महावितरणाने सांगितले की पुणे, ठाणे आणि नवी मुंबईत वीज भारनियमन अटळ आहे.

ह्या वर्षाच्या सुरूवातीला त्यांनी सांगितले होते की 'पुणे पॅटर्न' मध्ये युनिटमागे जास्त पैसे दिल्यास पुणेकरांना भारनियमन सोसावे लागणार नाही. त्याला बहुतेकांनी पाठिंबा दिला. त्यामुळे पुण्यात जास्त पैसे आकारून नियमित वीज देणे सुरू झाले(नक्की ना? चू. भू. द्या. घ्या.) हाच 'पॅटर्न' मग त्यांनी ठाणे, नवी मुंबईकरीता वापरला. त्यामुळे अखंडित वीज पुरवठा मिळेल असे वाटून जास्त कोणी ह्या विरोधात गेले नाही.

मग पाऊस कमी पडल्याने वीज अपुरी असल्याचे कारण पुढे करून पुन्हा तीनही ठिकाणी भारनियमन सुरू केले. तर गेल्या महिनाभरात जोरदार पाऊस झाल्याने तो तोटा भरून निघाला असे म्हणून भारनियमन बंद केले.
आता नवीन कारण आहे की, 'आम्हाला वीज नियमित नाही मिळत म्हणून आम्ही भारनियमन टाळू शकत नाही.'

ह्या सर्वात वाढविलेला दराबद्दल त्यांचे काही म्हणणे नाही व भारनियमन असूनही आपल्याला येणारे विजेचे बिलही तेवढेच असते, ह्याबाबतही काही विधाने नाहीत.
मग मला आधी वाटलेले विचार पुन्हा समोर येतात, 'नुसते वीज दर वाढविण्याला लोकांना विरोध केला असता, त्यामुळे आम्ही अखंडित वीज देऊ असे सांगून वितरणाने दर वाढविले आणि नंतर इतर कारणे देऊन पुन्हा भारनियमन चालू ठेवले.'

आजकाल वीजेचा वापर आपण नीट केला पाहिजे हे मान्य आहे. तसे करण्याचे आमचेही प्रयत्न चालू आहेत. पण मुळात सर्वत्र वीजेचा तुटवडा असताना, एकाला वीज वाचवायला सांगून दुसयाला जास्त दराने वीजपुरवठा करणे व त्यात अखंडित वीज अवाजवी वापरणांर्‍यावर बंधने कमी ठेवणे किंवा न ठेवणे ह्यातून तर कोणाचाच फायदा होणार नाही.

ह्याकरीता आपण व महावितरणाने नक्की काय केले पाहिजे? ह्यामागील नेमके व्यवस्थापन कसे आहे व कसे असावे हे समजू शकेल का?

ऑगस्ट ०६, २००८

रात्री घरी परत येत असताना घराजवळील एका रस्त्यावर एक लहान मुलगा रस्ता पार करत मस्त लकेर घ्यावी तसा आव आणून गात होता,
"बिना दूध की चाय बना लो,
शक्कर मत डालो...
सबसे आगे होंगे हिंदुस्तानी"
पुढे आणखी काही म्हणून मी ऐकत राहिलो पण काही ऐकायला नाही आले कारण तो मुलगा रस्ता ओलांडून पलिकडे गेला होता व मी ही पुढे निघून आलो होतो.
मनात विचार आला की लहान मुले काय काय गात असतात. बहुधा ९५-९६ मध्ये माझा एक भाचा गात होता, "तू तू तू तू तारा, चलते का नऊ ते बारा"
पुढे हाच प्रकार अनु मलिक ने खरोखरच वापरला होता जुडवा मधील गाण्यात, "टन टना टन टन टारा, चलती है क्या नौ से बारा"
तेव्हा वरील प्रकारातील मुलाने गायलेली ओळ एखाद्या सिनेमातीला गाण्यातही येण्याची शक्यता नाकारता येत नाही :)
खरोखरच ते गाणे असल्यास आणखी माहिती घेण्यास इच्छुक आहे.
(ता. क. ’सबसे आगे होंगे हिंदुस्तानी’ ही ओळ तर मुकुल आनंदच्या अर्धवट राहिलेल्या ’दस’ सिनेमातील गाण्याची आहे. तेव्हा गरजूंनी पहिल्या ओळींना हात लावावा ;) )

जुलै ३१, २००८

मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली. गेल्या काही वर्षांत लहान दोन अक्षरी नावाचेही भरपूर सिनेमे येत गेले. सध्या तर इंग्रजी नावाच्या हिंदी सिनेमांचेही चलन आहे.

तरीही ह्या सर्वात ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ जास्त लक्षात राहतात. नुसते चांगले आणि लांब नावाचे सिनेमे म्हणून नव्हे, तर त्यांच्या लांबीमुळे सुद्धा. हिंदी (व मराठीही) सिनेमाची लांबी साधारणत: २:३० तास असते व इंग्रजी सिनेमे १:३० ते २:०० तासांचे असायचे. पण ह्याला अपवाद असणारे हे दोन सिनेमे. हम आपके हैं कौन - ३:४५ तास, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे - ३:१५ तास. आणखी काही अपवाद म्हणजे संगम (४ तास), शोले (३:३० तास) व लगान(३:४५). मुख्य म्हणजे हे सर्व सिनेमे तुफान चाललेत. पण म्हणून प्रत्येकाने मोठ्या लांबीचे सिनेमे बनविण्याचा प्रघात नाही आला.

आणखी एक प्रकार जो इंग्रजी सिनेमांतून आला. सिक्वेल. सिनेमाचा पुढील भाग काढणे. ’नगीना-निगाहें’, ’वास्तव-हथियार’, ’स्टाईल-एक्सक्यूज मी’. नुकतेच आलेले ’हेराफेरी- फिर हेराफेरी’ आणि ’सरकार-सरकार राज’. मी ऐकल्याप्रमाणे एन चंद्राने ’स्टाईल-एक्सक्यूज मी’ सोबत तिसरा सिनेमा काढणार आहेत. तसेच ’फिर हेराफेरी’ ही शेवटी असा अडकवून ठेवला आहे की त्यातून पुढे कथा चालू करू शकतात. २००२ मध्ये आलेल्या ’आंखे’चे ही दोन शेवट आहेत. जेणेकरून अर्धवट ठेवलेल्या प्रसंगापासून पुढील सिनेमा चालू करता येईल.

तरी आता लहान लांबीचे सिनेमे बनविणे हे ही जरा फॅशनमध्ये आहे.१:३० तास ते २ तासाचे. तरी हे सर्व एकाच कथेची लांबी होती हो. त्यात मग नवीन प्रकाराची भर घातली राम गोपाल वर्माने. सिनेमा ’डरना मना हैं’. ह्यात वापरल्या सहा कथा. तीन कथालेखक, एक दिग्दर्शक. मग त्याला छेद दिला त्यानेच. ’डरना जरूरी है’. सहा कथा, सात दिग्दर्शक. पण त्या प्रकारातही जास्त कोणी हात मारायचा प्रयत्न नाही केला. ह्यामागचे कारण बहुधा असेल की ते चालले नाहीत. तरी ह्याच प्रकारात मागील वर्षी आला ’दस कहानियां’. १०-१२ मिनिटांच्या कथा. हा सिनेमा मी परवा पाहिला टीव्ही वर. पूर्ण नाही पहायला मिळाला. पण एक फायदा आहे. वेगवेगळ्या कथा असल्याने पुन्हा पाहताना कुठल्याही कथेपासून सुरूवात करू शकतो. ;)

असो, हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे आज एका वाहिनीवर नवीन हिंदी सिनेमाची माहिती पाहिली. ’मुंबई कटींग’ नावाचा नवीन सिनेमा येणार आहे. त्यात ११ लघुकथा आहेत. ११ दिग्दर्शक. जवळपास १० मिनिटांची एक कथा, म्हणजे ११० मिनिटे म्हटले तर चित्रपटगृहात जास्तीत जास्त २ तास.

चला पाहूया, हा सिनेमा काय बदल घडवून आणतो ते.

जुलै २७, २००८

शाहरूख खान शिक्षक असलेल्या ’क्या आप पांचवी पास से तेज हैं’ ची आज सांगता झाली.
त्याची सुरूवात आणि शेवट दोन्ही, नाही हो, एकंदरीत पूर्ण कार्यक्रम मला तरी आवडला. सुरूवात ह्यासाठी की त्यांनी केलेला प्रचार किंवा जाहिरातबाजी, आणि मुख्यत्वे काहीतरी वेगळा व माहितीदर्शक कार्यक्रम.(नाहीतर काय, त्यातील किती प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत होती?) ह्या कार्यक्रमाआधी दररोज रात्री आठ वाजता शाळेची घंटी वाजवायचे. तसेच बहुतेक काय सर्वच कार्यक्रमाच्या मध्ये त्याची जाहिरात. आणि कार्यक्रम सुरू झाला त्यादिवशी ’स्टार’ ने पहिले पाच मिनिटे त्यांच्या सर्व वाहिन्यांवर तो कार्यक्रम दाखविला होता. जेणेकरून सर्वांना कळेल की हा कार्यक्रम सुरू झाला आहे. ह्या जाहिरातबाजीबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.
शेवट ह्यासाठी नाही आवडला की तो कार्यक्रम संपला. संपल्याने काही खास दु:ख किंवा आनंदही नाही झाला. तो कार्यक्रम चालू असताना बघायला तरी आवडायचे. त्यामागचे कारण मग त्यातील प्रश्न असो की शाहरूख खान असो नक्की माहीत नाही.
पण, तर आजचा भाग तरी ’लालू प्रसाद यादव’ ह्यांच्या प्रतिसादामुळे चांगला वाटला. त्यात येते त्यांची बोलण्याची शैली, लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची तर्‍हा आणि ५वी पर्यंतच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा आत्मविश्वास वगैरे सर्व. आणि सर्व उत्तरे अचूक, तपशिलासकट. त्यामु़ळे ते एक कोटी रूपये जिंकले. अर्थात एक करोड जिंकणारे ते पहिले नव्हते. ह्या आधी कॉग्निजंट कंपनीची एक मुलगी १ कोटी रुपये जिंकली होती. पण त्यात त्यातील मुलांचाही हातभार होता. पण आज एकही 'चीट' न वापरता एक करोड. :) (आता ते प्रश्न सिद्धार्थ बासूंनी कसे निवडले तो माझा प्रश्न नाही.)

असो, सध्या तरी त्याला त्यांनी अर्धविराम (किंवा स्वल्पविराम) सांगितला आहे. आताही ती शाळा पूर्ण अशी चालली नाहीच, त्यामुळे पुढे तो कार्यक्रम पुन्हा सुरू होतो की नाही ते 'स्टार' ला माहित आणि त्यामुळे पुन्हा तो कार्यक्रम किती चालतो ते......

.... बघूया.

जुलै २१, २००८

गेले १५-२० दिवस चर्चेत असलेल्या श्री. मनमोहन सिंग ह्यांच्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाची कृती आज सुरू झाली. आत्ता रात्रीचे ८ वाजत आले आहेत तरीही बहुतेक सर्व (?) पक्षाचे खासदार संसदेत उपस्थित राहून चर्चा करीत आहेत. जेव्हा स्वत:च्या भवितव्याची चिंता ग्रासू लागली तेव्हा हे सर्व लोक जमा आहेत. मग तसाच देशाच्या भवितव्याचा विचार करून जर दररोज त्यांची उपस्थिती राहिली व काही चांगले कार्य केले तर ह्या सर्व ठरावांची गरजच भासणार नाही असे वाटते.
पण बहुधा आज व उद्याच ही परिस्थिती दिसेल. नंतर आताचे सरकार पडो की राहो, नंतर मात्र पुन्हा तेच. जमेल तेवढ्या वेळा एखादा गोष्टीचा मुद्दा बनवून तेच सभात्याग करणे, व इतर वेळी देशातील जनतेला वेठीला धरणे.
आपण मात्र महागाई, भारनियमन, पाणी कपात वगैरेला तोंड देत पहायचे की हेच सरकार राहते की दुसरे येते आणि मग त्याचा आपल्या रोजच्या जीवनावर काय परिणाम होतो?

असे म्हणतात की इतिहासाची पुनरावृत्ती होत असते , त्याचेच उदाहरण का हे? आजकाल हा इतिहास फार लहान काळाचा झाला आहे, नाही?

जुलै १४, २००८

"अरे भैय्या, दुसरी नोट दो. यह नही चलेगी." "चल जायेगी साब, नही चली तो बाद में मुझे वापस कर देना."

मुंबईच काय, भारतातील बहुतेक शहरात चालणारा संवाद. कारण काय तर नोट बहुतेक वेळा थोडी फाटलेली असते, किंवा जुनी झालेली असते. आणि काय करणार? आपल्यालाच धास्ती असते की ती नोट जर दुसर्‍या कोणी घेतली नाही तर तेवढ्या रूपयांचा फटका बसायचा. ह्या आणि अशा आणखी इतर प्रकारात आपल्याला नोटांचे हाताळणे का चांगले ठेवावे हे कळते :) काही वर्षांपूर्वी नागपूरात तर पूर्णपणे फाटलेल्या, जीर्ण होत चाललेल्या नोटाही वापरात ठेवल्या होत्या लोकांनी. ती नोट एका प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकून त्यासोबत आपल्या नावाचा कागद ठेवायचे व झाल्या चलनी नोटा वापरण्यालायक.

ह्यावरूनच एक मार्मिक विनोद आठवला. एक कागद एका नोटेला म्हणाला, "तुझ्या आणि माझ्यात फरक काय? तू आणि मी दोघेही कागदाचेच तर आहोत." त्यावर नोट म्हणाली, "हो, पण मी आयुष्यात कधी कचर्‍याचा डबा नाही बघितला."
काय गंमत आहे ना? चलनी नोटांची किंमत कमी होत नाही ते असे.

बाकी नोटांचे काय हो, ते ही एक वचनपत्र असते ना? धनादेशाप्रमाणे. "मैं धारक को xx रूपये अदा करने का वचन देता हूं.", असे लिहून रिजर्व बँकेचे गव्हर्नर ग्वाही देतात की ह्या कागदाची ही किंमत आहे. अर्थात हे १ रू.च्या वरील नोटांकरीता असते. एक रुपयाच्या नोटेवर तशी ग्वाही नसते. खरे तर एक रुपयाच्या नोटेवर भारत सरकार लिहिले असून त्यावर अर्थखात्याच्या सचिवांची सही असते. इतर सर्व नोटांवर रिझर्व बँकेचे नाव असून त्यावर बँकेच्या गव्हर्नरची सही असते आणि त्याची हमी देते केंद्र सरकार (केंद्रीय सरकार द्वारा प्रत्याभूत/Guaranteed by the Central Government). आणि म्हणूनच एक रूपयाची नोट हे आपले खरे चलन म्हटले जाते असे ऐकले होते.

भारतात नोटा किती प्रकारच्या छापतात? त्याची माहिती येथे मिळेल. सध्या आपण १०, २०, ५०, १००, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा वापरतो. १, २ व ५ रू. च्या नोटांची छपाई बंद झाली असली तरी त्या नोटा चलनातून बाद नाही झाल्यात अजून.
अरेच्च्या, काय हो? सरकारने/बँकानी सर्व जुन्या नोटा घेणे बंद केले नाही ना अजून. काही सांगता येत नाही बुवा. कधी काळी सरकारने १००० ते १०००० (५००० व १०००० च्या ही नोटा चलनात होत्या हे मला माहितच नव्हते)च्या नोटा काळाबाजार रोखण्यासाठी बंद केल्या होत्या. त्याप्रमाणे आताही बंद करू शकतात. तर, ह्या सर्व जुन्या नोटा बंद होण्याच्या आधी चलनात काढून, किंवा कमीत कमी बँकेत परत करून आपण आपले(आणि सरकारचेही) नुकसान कमी करू शकतो. बहुधा माझ्याकडे आहेत थोड्या जमविलेल्या नोटा. पाहतो, त्यात किती जुन्या नोटा आहेत ते.

आता मुद्दा निघालाच आहे तर सुरूवातीला थोडे मोठ्या नोटांविषयी.
सध्याच्या काळात मोठ्या म्हणजे ५०० व १००० च्या नोटा. फार पुर्वी ५०, १०० ची नोटही मोठी मानली जात होती. तर त्यांचा फायदा हा की कमी नोटांमध्ये जास्त पैसे खिशात/बॅगेत/कपाटात राहू शकतात. पँटच्या खिशातील चोरकप्प्यातही. तसे आजकाल तर ५०० व १००० च्या नोटा सहज मिळतात. पण आधी तसे नव्हते. कॉलेज मध्ये असताना माझ्या मित्राने त्याच्या एका नातेवाईकांचा अनुभव सांगितला होता. त्यावेळी ५०० च्या नोटा एवढ्या प्रचलित नव्हत्या. त्यांना दीड लाख रूपये घेऊन मोटारसायकलवर एका गावातून दुसर्‍या गावात जायचे होते. त्यांना तशी धास्ती वाटत होतीच. त्यामुळे एका बँकेत जाऊन त्यांनी मॅनेजरला आपली अडचण सांगितली व ५०० च्या नोटांची ३ बंडले घेऊन एक खिशात व दोन पायांच्या मोजात दोन अशी बंडले ठेऊन थोड्या कमी भीतीत प्रवास केला.
काही वर्षांपुर्वी हर्षद मेहतानी सांगितल्याप्रमाणे त्याने नरसिंह रावांना जे १ करोड रुपये एका सूटकेस मध्ये दिले ते ५० आणि १०० च्या नोटांमध्ये होते. त्यावेळी ५०० व १००० च्या नोटा असत्या तर ती बॅग किती लहान झाली असती नाही? ;)
खरे तर सर्व नोटांवर जुन्या नोटांवर अशोकस्तंभाच्या खाली ’सत्यमेव जयते’ लिहिलेले असायचे. पण मी पाहिलेल्या काही ५० व बहुधा १०० च्या नोटांवर फक्त अशोकस्तंभ होते, सत्यमेव जयते नाही. ह्याच ५० व १०० च्या नोटा हर्षद मेहतानी वापरल्या होत्या का?
आता सर्व नोटांवर महात्मा गांधींचे चित्र असते. मला नेहमी प्रश्न पडायचा फक्त महात्मा गांधीच का हो? बाकी नेते का नाहीत? पण आता वाटते ते ही बरे आहे नाहीतर पुन्हा आमच्या नेत्याचे चित्र ठेवा म्हणून लोक आंदोलन करतील. आणि पुन्हा आपले नुकसान. पण एक वाईट वाटते, की मग एक ५०० किंवा १००० रूपयांच्या नोटेचा उल्लेख 'एक गांधी खर्चावा लागेल' असा लोक करतात. निदान आधी १०० रू.च्या नोटेला हरी पत्ती किंवा हिरवी नोट म्हणायचे. त्यावरून खर्च जास्त आहे हा अंदाज यायचा.

बरं, ह्या मोठ्या नोटा वापरायचे म्हणजे ज्या अडचणी येतात त्या पहा.
मोठ्या नोटा असल्या तर त्यांचे आकारमान लहान होते. म्हणून मोठी रक्कम बाळगताना असतानाची धास्ती वगळून इतर पाहूया.
सर्वात पहिली अडचण म्हणजे.. आठवा, तबू व ॠषी कपूरचा 'पहला पहला प्यार' सिनेमा. तबू नेहमी ५०० ची नोट समोर करत असते. त्यामुळे नेहमी ॠषी कपूरलाच पैसे भरावे लागतात. तसेच संजीव कुमारचा कुठलासा सिनेमा होता, त्यातही त्याच्याकडे सुट्टे नसल्याने नायिकेला प्रत्येक ठिकाणी पैसे भरावे लागतात. हाच प्रसंग मग फिर हेराफेरी ह्या सिनेमातही उचलला होता.
हं, तर पहिली अडचण सुट्टे पैसे मिळण्याची. त्यामुळे मी आपला बाजारात जाताना बहुतेक वेळा सुट्टे किंवा वेगळ्या शब्दांत म्हणायचे तर १० ते १०० रू.च्या नोटा ठेवतो. ५०० किंवा १००० ची नोट दिसली की लोक विचारतात, "सुट्टे नाहीत का हो?". आधी हीच गत १०० च्या नोटेची होती. रिक्षा वाल्यांना ५० किंवा १०० ची नोट दिली तर हीच अडचण. मग त्या नोटेचे सुट्टे करण्याकरीता खटपट. कोणीच सुट्टे नाही देत म्हटले तर मग नाइलाजाने काहीतरी खरेदी करावे लागते. पण काही लोकांना जास्त खटपट करावी लागत नाही. मी बहुधा अकरावीत असेन तेव्हाची गोष्ट. एका किराणा मालाच्या दुकानात मी काहीतरी खरेदी करायला गेलो होतो. तसे ते आमचे नेहमीचे दुकान. आमच्या कॉलनीत बहुतेकांच्या घरी त्याच दुकानातून सामान यायचे. पण मी जास्त कधी अशा मोठ्या नोटांचा प्रश्न त्यांना पडू दिला नाही. तर, तिथे माझ्या शेजारी राहणारा एक मुलगा आला. त्याने २ रुपयाची काही वस्तू घेतली. दुकानदाराला ५०० ची नोट देऊ का विचारले आणि त्या दुकानदाराने त्याला ४९८ रूपये परत केले. त्यावेळी मला त्याचे आश्चर्य वाटले होते. तरीही मी कधी तेवढा प्रयत्न नाही केला. असो, मी तर बहुतेक वेळा रिक्षा मध्ये बसल्यावर लगेच विचारतो, की बाबारे तुझ्याकडे १०० रू.चे सुट्टे असतील ना? उगाच नंतर मला (व काही वेळा त्यालाही अडचण) नको.
तसे म्हणायला गेलो तर लहान नोटा वापरताना उलट परिस्थिती ही असते. खिशात सुट्टे असले की लवकर संपतात, आणि त्यांचा हिशोबही लागत नाही. हॉस्टेलमध्ये असताना ह्याची पहिल्यांदा प्रचिती आली. १०० ची नोट असली की आपण विचार करतो की ही नोट मोडायची गरज नाही. जेवढे पैसे आहेत त्यात भागवून घेऊ. त्यामुळे पैसेही जास्त खर्च होत नाहीत. एकदा का ही नोट मोडली की मग उरलेले पैसे ही लवकर संपतील. म्हणून बँकेतून, किंवा इतरांकडून पैसे घेताना सांगायचो की, 'मला १० च्या नोटा देऊ नका. ५०/१०० च्या द्या.'

(माझी) दुसरी अडचण. खिशातील पाकिटात ह्या नोटा ठेवायचे म्हणजे तेवढे मोठे पाकिट पाहिजे. त्यामुळे नवीन पाकिट घेताना ५०० (व आता १०००) ची नोट ठेवून बघतो. आधी नाणी ठेवायला जागा (कप्पा) आहे का तेही बघायचो. पण नंतर नाण्यांमुळे पाकिटही जाड आणि जड वाटायला लागले तर तो नाद सोडून दिला. आजकाल तर पाकिट घेताना हे ही बघतो की ह्यात क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड ठेवायलाही किती जागा आहे.
तुम्ही म्हणाल की "नेहमी नोट मावेल असे पाकिट का घ्यायचे? नोट घडी करून ठेवायची ना मग?" अहो, पण जर नोट न दुमडताच चांगली ठेवता येत असेल तर का नाही? खरे तर आधी आम्हाला एक सवय होती, बाजारात जाताना आईने पैसे दिले की त्या नोटेची मस्त घडी पाडायचो. का ते माहित नाही. पण हळू हळू पण तेव्हा लवकरच ती सवय सुटली. बरे झाले सुटली ते. नाही तर उगाच आता अपराध्यासारखे वाटायचे की सरकार एवढे सांगते आहे की नोटा खराब नका करू आणि आपण सर्रास त्या कशाही वापरतो.

तिसरी आणि मोठी अडचण आहे ती फक्त माझी किंवा तुमची अशी एकट्या दुकट्याची नाही तर सर्वांचीच म्हणजे जनतेची,बँकांची तसेच सरकारची ही आहे. ती म्हणजे नकली नोटा. नुसते देशाबाहेरील काही लोक नाही तर भारतातील अंतर्गत शत्रूही नकली नोटा बाजारात आणून गोंधळ घालण्याच्या व स्वत:च्या फायद्याच्या प्रयत्नात असतात. त्यामुळे मोठ्या नोटा घेताना लोक पडताळून पाहतात. भरपूर लोक तर ती नोट कोणी दिली त्याचा फोन नंबर नोटेवर लिहून ठेवतात. तरी बरे, आता नोटा लवकर गहाळ होऊ नयेत म्हणून रिझर्व बँकेनेच नोटांवर लिहिणे, स्टॅपलरच्या पिना वापरणे ह्यावर बंदी घातली आहे. नाहीतर बहुतेक नोटांवर टेलिफोन डायरी झाली असती :)
ठाण्याला पासपोर्ट कार्यालयाजवळ जे महाराष्ट्र वीज वितरणाचे कार्यालय आहे तिथे तळ मजल्यावर बिल वसूली केंद्र आहे. तिथे मी सूचना वाचली होती की "५०० च्या नोटेवर ग्राहकाने आपला दूरध्वनी क्रमांक लिहून ठेवावा". स्वत: सरकारचीच खाती ह्याचे पालन करत नसेल तर काय म्हणावे.

आणि एक आहे हो, बहुतेक लोक ही नोट दिसली की पडताळून पाहण्याकरीता प्रकाशात धरून पाहतात. सर्वांनाच त्यात किती कळते ही शंका आहे. मला एवढे माहित होते की जुन्या नोटांमध्ये एक चांदीची तार असायची, ती नोटेत आहे की नाही हे लोक पहायचे. तसे ती तार काढण्याचे प्रकार बहुतेक लोक करायचे. मी ही १ २ वेळा तसा सफल प्रयत्न केला आहे (लहानपणी. उगाच आता माझ्यावर संशय नको). शासनाला किंवा लोकांना फसविण्याकरीता नाही, तर असे करता येते का ते पाहण्यासाठी. ती नोट व तार मी सांभाळून ठेवली होती, आता नाही मिळत :(. पण आता तेही नाही. सरकारने तशी तार ठेवलीच नाही. पण एक ’RBI भारत’ लिहिलेली चांदीची वेगळीच चपटी तार गूंफून ठेवली आहे.

हं, तर ही खरी नोट कशी ओळखायची? त्याकरीताही सरकारने माहितीपत्रके काढली आहेत. आता एवढे सर्व आपण नेहमीच पडताळून पाहत नाही. मला माहित असलेल्या गोष्टी म्हणजे ती चांदीची तार, नोटेच्या डाव्या बाजूला असलेले त्रिकोण, चौकोन. त्या भूमीतीय आकृत्या थोड्याशा उंच राहतील अशा छापल्या असतात. जेणेकरून दृष्टीने अधू असलेल्या लोकांना त्या
आकारांच्या स्पर्शाने ती नोट कोणती आहे ते ओळखता येईल. मी दादर-ठाणे लोकल मध्ये एका अंध पुस्तक विक्रेत्याची नोट कोणती आहे ते ओळखण्याची वेगळीच कला पाहिली. त्याने ह्या आकारांचा उपयोग केला की नाही माहित नाही पण त्याने नोटेची लांबी-रूंदी मोजून ती नोट १० ची आहे की २० ची ते पडताळले होते.
माझ्या एका मित्राने नकली नोट ओळखायची एक शक्कल लढविली. खरे तर तसे काही नव्हते पण उगाच गंमत म्हणून. काय तर, ती नोट गोळा केल्यासारखी केली व टेबलावर आपटली. उचलून म्हणाला "चष्मा फुटला असेल तर ही नकली नोट आहे, नाहीतर असली नोट."
गंमती करायला तर तशा भरपूर आहेत. ते नाही का, एखादी नोट दोरा बांधून ठेवून रस्त्यावर ठेवायची. कोणी ती उचलायला गेले तर तो दोर्‍याने ती नोट ओढायची वगैरे वगैरे.

आता नोट नेमकी कशी छापतात ते मला माहित नाही. पण सिनेमात तर हे लोक नकली नोटा छापण्याकरीता उसाचा रस काढायच्या यंत्रासारखे यंत्र किंवा मग लोखंडी ठसा वापरतात. आपला हिरो मग त्या ठशाची विल्हेवाट लावण्याकरीता मारामारीही करतो.
ह्यावरून आठवले. एक माणूस नकली नोटा छापत असतो. तो एकदा १५ रू. नोट छापतो. पण नंतर त्याला कळते की १५ रू. ची नोट काही चलनात नाही. तरीही तो प्रयत्न करतो. एका पानवाल्याकडे जातो. त्याला म्हणतो ’मला १५ रू.नोटेचे सुट्टे पाहिजे आहे.’ पानवाला म्हणतो, ’सुट्टे मिळतील पण मी एक रूपया कमी देईन.’ हा माणूस विचार करतो, '१४ तर १४ रू. नोट तर चालते आहे.' तो म्हणतो ’दे मला १४ रू.’ तर पानवाला त्याला ७ रू च्या दोन नोटा परत करतो.

बरं, नोटा सांभाळून ठेवणे हे ही एक वेगळेच काम. आधी तर मला सवय होती की नोटा वरच्या खिशात ठेवायचो. अर्थात १०० च्या वगैरे नाही पण ५, १० , २० च्या. खरं तर दहावी/ बारावी पर्यंत तेव्हा एवढ्या मोठ्या नोटा जवळ बाळगायचोच नाही ;) जर नेमके माहित असेल ह्यांची गरज आहे तरच. एकदा लोकलमधून कॉलेजला जात होतो. तेव्हा दरवाज्यात लटकून उभा होतो. पाहतो तर बाजूच्या माणसाने अलगदपणे बोटांनी माझ्या खिशातील नोटा काढायचा प्रयत्न केला होता. माझ्या नेमके लक्षात आले आणि मी त्याच्यावर रागावलो.
तसेच काही वेळा खिशात नोटा राहिल्या तर त्या शर्ट पँट सोबत धुवायलाही जातात. आधी हाताने कपडे धुतले तर त्या नोटेची पार वाट लागून जायची. आता तसे नाही. धुलाई यंत्रामध्ये कपडे धुताना जर नोट राहीलीच तर ती फक्त ओली होते, थोडीशी खराब होते. मग बाहेर काढून ती सुकवायची. किंवा मग इस्त्री करायची. नोटेला इस्त्री केली की किती मस्त कडक होते ना ती :). अर्थात त्याला नवीन कोर्‍या नोटेची सर नसते तो भाग वेगळा.
आणखी थोडे वेगळे प्रकार म्हणजे, नोट पुस्तकात ठेवायची सवय. त्यामुळे भरपूर वेळा एखाद्याला पुस्तक दिले तर त्या नोटा सोबत जाण्याची भीती. माझ्या एका मैत्रीणीने तर एकदा घरातील रद्दी कागदे फाडताना एका वहीतील दहा रूपयांची नोटही चूकून फाडली होती. :( त्यामुळे मग मी नोटा फक्त खिशातील पाकीटात ठेवणे सुरू केले. तरी आता पुन्हा खिशात पैसे ठेवायला लागलोय. बदलायला पाहिजे ती सवय. :|

तुम्ही नोटा घेतल्यावर कशा प्रकारे मोजता हो? डाव्या हातात बंडल पकडून उजव्या हाताच्या अंगठा व मधल्या बोटाने एक एक नोट वेगळी करून डाव्या हाताच्या अंगठा व तर्जनीने डाव्या हातात घेत मोजायची की डाव्या हातात पूर्ण बंडल पकडून एक एक नोट उजव्या हातात हस्तांतरीत करायची? की आणि काही? काहीही असो, सर्वच पद्धतीत नेमक्या नोटा मोजताना दमछाक होतेच. काही वेळा नोटा चिकटलेल्या असल्यामुळे गोंधळ होऊन जास्त नोट जाण्याची भीती. अशा परिस्थितीत आपल्याला एखादी नोट जास्त आली की खूष व्हायचे आणि आपल्या हातून एखादी नोट जास्त गेली की दु:खी व्हायचे. आपण नेहमी बँकेतून नोटा घेताना नीट मोजून घेतोच. एकदा आम्हाला दहाच्या नोटांच्या बंडलात २ नोटा जास्त आल्या. आम्ही लगेच त्या रोखपालाला सांगितले. नाहीतर काय हो? आपल्याला एखादी नोट कमी आली की आपण लगेच तक्रार करतो, मग त्यांनी चुकून जास्त नोटा दिल्या तर सांगायला नको? आता तरी बँकांकडे नोटा मोजायचे यंत्र आले आहे. त्यामुळे ह्यातील चुका नगण्य झाल्या आहेत. नगण्य ह्याकरीता म्हणालो कारण मी स्वत: ह्या यंत्रांनीही एखादी नोट कमी मोजल्याचे पाहिले आहे. त्यामुळे एटीएम मशीनमधून एखादी नोट जास्त मिळाल्याचे (५०० किंवा १००० हं, कारण आजकाल ह्याच नोटा जास्त मिळतात एटीएम मधून) स्वप्नही आपण पाहू शकतो.

असो, माझे नोटापुराण एवढेच. पण पुन्हा कोणी समारंभात नोटांचा हार बनवून किंवा दहीहंडी वगैरे ठिकाणी नोटा लटकावून ठेवत असेल तर तक्रार करण्यासोबत हे नोटापुराण त्याला ऐकवायचेही विसरू नका. ;)

(आमचे नाणेपुराण येथे वाचता येईल)

जुलै ०८, २००८

सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते.

मग एन डी टी व्ही इमॅजिन ने नवीन 'रामायण' आणले. निर्माते जुन्या रामायणचेच. सागर आर्ट्स. त्यामुळे लोकांच्या थोडाफार अपेक्षा असतीलच. त्यात त्यांनी वेळ निवडली प्राईम टाईमची. नक्की माहित नाही पण एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे, एनडीटीव्ही ला त्याचा फायदा झाला. (जरी लोक आय़ पी एलचे सामने जास्त बघत होते तरी त्यांना तेवढे नुकसान झाले नाही.)

आमच्या घरी रामायण पाहणे सुरू असते. सुरूवातीला तसे बरे वाटले. अजूनही बरेच चांगले सूरू आहे. तरीही जुन्या रामायण मालिकेसोबत तुलना होणे स्वाभाविकच आहे. त्यात स्टार उत्सव वर ती जुनी मालिका दाखवित आहेत. मग तर काय संध्याकाळी जुने रामायण, रात्री नवीन रामायण. आता ह्यात जास्त तुलना होते ती कलाकारांच्या अभिनयाची, सादरीकरणाची. नवीन रामायणात मला सुरूवातीला तरी थोडा तजेलदारपणा वाटला. नवीन वाहिनी, नवीन कलाकार, नवीन तंत्रज्ञान. ह्याचा फरक तर दिसणारच. पण ह्यात राण्यांचा पेहराव, त्यांचे थोडेफार वागणे ह्यात सांस बहू मालिकांचा प्रभाव दिसत होता. मग पुढे दिसू लागला संगणकीय प्रभाव. हे मान्य आहे की ह्यात राक्षस, बाणांचा वर्षाव वगैरे आणि भरपूर गोष्टी प्रत्यक्षात दाखवू शकत नाही, तेव्हा त्यामागे स्पेशल इफ़ेक्ट्स वापरावे लागतात. पण इतर ठिकाणी तो जिवंतपणा वाटत नाही आहे. राजा दशरथाचा महाल बाहेरून दाखविण्यात संगणकाचा वापर जास्त केला असे दिसून येते. संध्याकाळचे राजमहालाचे दृष्य पाहताना त्याची जाणीव होते. इतरही वेळा वाटते की काहीतरी कृत्रिम दाखवण्यात येत आहे.

मग सुरू झाले 9x वाहिनीवर महाभारत सुरू होण्याचे वारे. गेले २ महिने रणभूमी, गदा, धनुष्य वगैरे दाखवून महाभारतातील एक एक गोष्टी समोर आणत त्याची जाहिरात दाखवत होते. त्या जाहिराती बघतानाही जाणवत होते की ह्यात थोडी अंधाराची छटा आहे. इथेही कृत्रिमतेचा भास होत होता. म्हटले पाहूया ह्यात काय आहे ते? काल परवा ह्याची नवीन जाहिरात पाहिली तेव्हा वाटले की हे पूर्ण फिल्मी प्रकारात चित्रीत केले आहे. आज कालचे नायक/खलनायक ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे ती पात्रे दिसत होती.

आज रात्री ९ वाजता महाभारत दाखविणे सुरू झाले. सुरूवातीलाच धर्मराज खेळात हरलेला दाखविला. दुर्योधन सांगतो की द्रौपदीला घेउन ये. हे सर्व पाहत असताना मला वाटले की मी संगणकावर एखादा नवीन गेम बघत आहे. तेच स्पेशल इफेक्ट्स. ह्यात प्रजा दाखविली ती पूर्णत: संगणक निर्मित. मागील महालही तसाच वाटला. मग दुशासन द्रौपदीला आणायला जाताना दाखविला. पूर्णत: कृत्रिम माणूस. चेहयावरील भाव काहीच प्रभाव पाडत नाहीत. महालातील दासी तशाच. त्याआधी बाहेर युधिष्ठिर दाखवला होता. त्याला पाहताना मला राम गोपाल वर्माच्या ’कंपनी ’ मधील चंदू (विवेक ओबेराय)ची झलक दिसली. त्यात भर पाडली ती पार्श्वसंगीताने. ’सरकार’ मधील पार्श्वसंगीत जसे आहे तसेच. मला वाटले थोड्या वेळाने ’गोविंदा गोविंदा’ही सुरू होईल व द्रौपदीला वाचवायला कृष्ण आला आहे असे दाखवतील. पण आमच्या मातोश्रींना दुसरी मालिका पहायची होती म्हणून मग वाहिनी बदलण्यात आली.

तर हे सांगण्याचा उद्देश हाच की आता पौराणिक कथा पुन्हा तयार करून दाखवत आहेत हे कौतुकास्पद आहे. पण ते पाहताना आपण रामायण/महाभारत, राम/कृष्ण पाहत आहोत हे जाणविले पाहिजे. सध्या तरी रामायणामध्ये ते थोडेभार दिसते. पण नवीन महाभारताच्या पहिल्या दहा मिनिटांतच मला वाटले की ह्यात काहीतरी कमी आहे. कितपत चांगले वाटते ते बघू.

जमल्यास थोडी आणखी वाट पाहूया. २१ जुलै पासून नवीन वाहिनी ’कलर्स’ वर श्रीकृष्णावर (की बालकृष्णावर) मालिका येत आहे. ह्याच्या जाहिरातीही सुरू आहेत. त्यात तरी हा कृत्रिमपणा जाणवत नाही. खरं काय ते मालिका सुरू झाल्यावरच कळेल.

मे १९, २००८

नाही, हे कुसुमाग्रजांच्या लिखाणाचे किंवा त्यांच्या कवितांचे अवलोकन नाही, तर त्यांच्या कवितांवर जो एक संच काढला आहे त्याचे अवलोकन आहे.
महाराष्ट्र टाईम्स व टाईम्स म्युझिक ह्यांनी सादर केलेला "’वि.वा’ कुसुमाग्रज" हा संच मी मागवला. विचार केला एरवी कविता वाचणे जास्त होत नाही. गाणी/कथा ऐकण्याची सवय आहे तर ह्याचा फायदा करून घ्यावा. नोंदणी करून ठेवली. ३० एप्रिलला मला दिल्लीहून फोन आला तुमची ऑर्डर नक्की करण्याकरीता हा फोन आहे. तुम्हाला २५०+२५ रू.द्यावे लागतील. जर कॅश ऑन डिलिवरी पाहिजे असेल आणखी २० रू. म्हणजे एकूण २९५ रू. मी विचारले 'असे तुम्ही जाहिरातीत का नाही लिहिले?' मला काही उत्तर नाही मिळाले. तिने पत्ता विचारला तेवढयात फोन बंद झाला. तरी दुसर्‍या दिवशी त्यांचा पुन्हा फोन आला तेव्हा मी ती नोंदणी नक्की केली.
आता मंगळवारी घरी तो संच पोहोचवण्यात आला. कार्यालयातून घरी आल्यावर पाहिले ते पाकिट. ह्या टाईम्स वाल्यांचे CD पाठवणे मला आवडते. चांगली बांधणी असते सामानाची. उघडून पाहिले तर दोन ऑडीयो सीडी व एक व्हिडीओ सीडी प्लॅस्टीक मध्ये घालून तीन कप्प्यात लावून दिल्या आहेत. ह्म्म.. थोडा हिरमोड झाला, कारण टाईम्स वरील विश्वास पूर्ण सार्थ नाही झाला. जाऊ द्या, आज काल पैसे वाचवण्याकरीता सर्वच कंपन्या काही ना काही करत आहेत.
तर काय काय आहे ह्या संचामध्ये?
सुरूवातीला कुसुमाग्रजांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्काराचे प्रमाणपत्र दिले आहे. पुढील पानावर कुसुमाग्रजांबद्दल गुलजार ह्यांचे शब्द, कुसुमाग्रजांना मिळालेले पद्मभूषण सम्मानपत्र आणि सर्वांत आत सीडी.
सीडी १
कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात.
१. प्रस्तावना
२. मराठी माती
३. थेंब
४. पृथ्वीचे प्रेमगीत
५. पाऊल चिन्हे
६. जा जरा पूर्वेकडे
७. मार्ग
८. कोलंबसाचे गर्वगीत
९. नाते
१०. याचक
११. नाही (काही बोलायचे आहे..)
१२. तृणाचे पाते
१३. स्वप्नाची समाप्ती
१४. यौवन
१५. अहि-नकूल
१६. हा चंद्र
१७. म्हातारा म्हणतोय
१८. कोकिळा
१९. राजहंस माझा
२०. वार्ता
२१. काही छोट्या कविता
देणं
डाव
छंद
यमक दुष्काळी
सीडी २
कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात.
१. मुलांसाठी कविता
श्रावण
आजोबांचे गाणे
ते म्हणतात (गवताचं पातं..)
२. क्रांतीचा जयजयकार
३. अखेर कमाई
४. प्रेमयोग श्रीकृष्णाचा
५. स्मृती
६. आगगाडी आणि जमीन
७. प्रेम म्हणजे
८. दिवे
९. प्रार्थना
१०. संत
११. येणं जाणं
१२. राजा आला
१३. शर्त
१४. झोपेन माताजी
१५. आनंदलोक
१६. गाभारा
१७. कणा
गुलजार ह्यांनी केलेला हिंदी अनुवाद त्यांच्याच आवाजात..
१८. रीढ (कणा)
१९. गर्भग्रह (गाभारा)
२०. रद्दी
शिरवाडकरांच्या कविता सर्वांनी वाचल्या असतील, त्यामुळे त्याबद्दल लिहिणे गरजेचे नाही असे वाटते.
व्हिडीओ सीडी मध्ये सोनाली कुलकर्णीने केलेले निवेदन आहे. शिरवाडकरांच्या साहित्याबद्दलची माहिती ह्यात सांगितली आहे. सोनाली कुलकर्णीच्या बोलण्याच्या शैलीत ते निवेदन फार चांगले वाटले.
पुढे आहे ’विश्वनाथ : एक शिंपी’ ह्या कुसुमाग्रजांच्या कथेचे लघुचित्रपटात केलेले रूपांतर. मुख्य कलाकार: निळू फुले, लीलाधर कांबळी व जनार्दन लवंगारे. निळू फुलेंनी आपल्या अभिनयाचा जोर दाखवलाच आहे. लीलाधर कांबळीचा सहअभिनय नेहमीप्रमाणेच प्रमाणशीर. जनार्दन लवंगारेंना मी फक्त नाटकांत व सह्याद्री दूरदर्शन वरील कार्यक्रमातच पाहिले होते. त्यांचा ह्या लघुपटातील प्रवेश छान आहे. एका गावातील शिंप्याच्या जीवनातील हे २२ मिनिटांचे चित्रीकरण त्याची परिस्थिती नेमके दाखवते व त्याची पुढील जिद्दही.
सर्वात शेवटी आहे, सचिन खेडेकरनी केलेले ’सतारीचे बोल’ ह्या कथेचे वाचन. आता ह्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाचनच म्हणता येईल, कारण ते सादरीकरण मला तरी एवढे प्रभावी नाही वाटले. आता आपल्यासमोर पु.ल. देशपांडे, व. पु. काळे, द. मा. मिरासदार ह्यांचे कथाकथन समोर असल्याने सचिन खेडेकरचे ते कथाकथन कमी प्रतीचे वाटणे साहजिकच आहे, पण खरं तर सचिन खेडेकरचे पुस्तक पकडण्याची पद्धत, वाचताना समोर बघण्याची शैली आणि थोडा फार बोलण्याचा ढंग हे सर्व जरा खटकते. मध्ये तर एकदा पान उलटताना त्याने अशी नजर केली की लहान मुलांसमोर आपण जादूच्या पेटीतून काहीतरी खास वस्तू बाहेर काढतो आहे. अर्थात ’सतारीचे बोल’ ही कथा चांगली आहे. दिवसभरात वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे देत शेवटी दिवसाखेर सतारीचे बोल कानावर आल्यावर मास्तरांचे मनातील सारे दु:ख विरघळून जाते, हे ह्या कथेत सांगितले आहे.
ह्या संचाबद्दल महाराष्ट्र टाईम्स वर दिलेल्या जाहिरातीत त्यांनी लिहिले आहे की कुसुमाग्रजांच्या सगळ्या कविता त्यांच्याच आवाजात. हे थोडेसे दिशाभूल करणारे वाटते. कारण ह्यात एकूण ४३ कविता आहेत. 'कुसुमावली' ह्या संकेतस्थळावर त्यांच्या इतरही काही कविता आहेत. आता मी काही म्हणतोय कारण ह्या संचातील काही कविता तिथेही नाहीत. त्यामुळे कुसुमाग्रजांच्या एकूण कविता किती हे नक्की नाही, आणि ह्या संचात त्यांच्या सगळ्या कविता नाहीत.
असो, व्हिडीओ सीडी जरी नेहमी वापरात नाही आली तरी कुसुमाग्रजांच्या कविता त्यांच्याच आवाजात ऐकण्याकरीता ऑडीओ सीडी तर नेहमीच लावू शकतो. त्यामुळे एकंदरीत घरात ठेवायला पाहिजे असा संच आहे. आणि माझ्या मते थोड्या दिवसांत हा संच दुकानातही मिळू लागेलच.

मे १४, २००८

२००५ च्या दिवाळीच्या नंतरचे दिवस. दक्षिण रेल्वेचा एक डबा. आमच्या समोर दरवाज्यापासून तिसर्‍या कंपार्टमेंट मध्ये ते ४ मित्र पत्ते कुटत, गाणी गात प्रवासाची मजा घेत चालले होते. बदाम सात, रमी, झब्बू जे आठवतील ते पत्त्यांचे खेळ चालले होते. आजूबाजूचे ही ३/४ जण त्यांना सामिल झाले. मस्त गट बनला होता त्यांचा. कार्यालयातील गंमतीजमती, विनोद सांगण्यात जो तो वरचढ व्हायच्या प्रयत्नात. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर उद्या पुन्हा कामावर रूजू व्हायचे म्हणून थोडा कंटाळाही आलेला दिसत होता त्यांच्या बोलण्यात. तरी आता परतीच्या प्रवासात घरून आणलेल्या दिवाळीच्या फराळावर मध्ये मध्ये हात मारणे चालू होते. एकंदरीत तरूणाईची मजा चालली होती म्हणा ना.

अशा गंमतीत, थोड्याफार कंटाळ्यात संध्याकाळचे ७/७:३० वाजले असतील. आमच्या २र्‍या वर्गाच्या स्लीपर डब्यात गर्दी वाढत चाललेली. इकडून तिकडे फिरायला जागा नाही. डब्यात ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे लोक बसलेले. लोकांची कुजबुज वाढू लागली. "अरे, ही लोकं जनरल डब्यातील तिकिटे काढून ह्या डब्यात का आलीत?","कोणी काही बोलत का नाही?","आपले सामान कसे सांभाळून ठेवणार आता." वगैरे वगैरे.
संध्याकाळचे खाणे खाऊन झाल्यावर ते सर्व मित्र गप्पा मारत बसले होते. पुन्हा लोकांची कुजबुज ऐकू आली. तेवढ्यात एक स्टेशन आले. आणखी लोक आत चढू लागले.

अचानक, त्याला काय वाटले कोणास ठाउक. तो तडक उठला. त्याच्या जवळ खाली बसलेल्या माणसांना म्हणाला,"तिकिट दाखवा". त्यांनी जनरल डब्याचे तिकिट दाखवल्यावर तो म्हणाला, "हा डबा रिजर्वेशन वाल्यांचा आहे. ज्यांचे कोणाचे रिजर्वेशन नाही त्यांनी इथून बाहेर जावे". कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही. तेव्हा त्याने डब्याच्या दरवाज्याजवळ असणार्‍यांना बाहेर जाण्यास सांगितले. कोणी ऐकत नसल्याचे दिसल्यावर तो मित्रांना म्हणाला की "मी पोलिसांना बोलावत आहे." तिकडून तो उतरून बाहेर गेला. बहुधा रेल्वे पोलिसांना शोधायला. पण का कुणास ठाऊक परत आला. त्याने आपल्या मित्रांना सांगितले," ह्या लोकांना बाहेर जायला सांगा, मी आता खूप रागात आहे."

पुन्हा तो मागे गेला. त्याच्या बसण्याच्या जागेपासून दरवाज्यापर्यंत जेवढे साध्या तिकिटावरचे लोक खाली बसले होते, त्यांना एक एक करून बाहेर जाण्यास सांगू लागला. आम्ही बाकीचे लोक, त्याचे मित्र बघतच राहिले हा काय करत आहे म्हणून. आम्ही कोणी त्याला अडवायचा प्रयत्न केला नाही. पण त्याचे मित्र तयारीत होते की काही धांदल होऊ नये, पुढे त्यांनीही हातभार लावला. ते ही आरडाओरडा करत मग लोकांना बाहेर काढू लागले. एक माणूस म्हणाला, "अरे, राहू दे आम्हाला." पण तो कोणाचे ऐकत नव्हता. दरवाज्यापर्यंतची जागा हळू हळू रिकामी होऊ लागली. लोक उतरून दुसर्‍या डब्यात चढू लागले. तो संडासाच्या जवळ गेला. तिकडे दोन डब्यांना जोडण्याची जी जागा होती तिथल्या लोकांना म्हणाला, "एक तर दरवाज्याच्या ह्या बाजूला रहा किंवा त्या बाजूला." एक दोन जण ह्या डब्यात आले तर म्हणाला, "इथे यायचे तर खाली उतरावे लागेल." ते लोक लगेच डब्यांच्या जोडणीवरून दुसर्‍या डब्याकडे गेले. तिकडील सर्व जागा रिकामी झाल्यावर त्याने ते पत्र्याचे शटर खाली ओढून बंद केले. डब्याच्या त्या बाजूचे दोन्ही दरवाजे बंद केले. व डब्याच्या दुसर्‍या बाजूकडे जाऊ लागला. तिकडे आधीच सर्व रिकामे झाले होते. त्याने लोकांना विचारले, "तो दरवाजा बंद आहे का?" उत्तर मिळाले," हो, ते शटर ही बंद केले आहे."

मग डब्यातील इतर लोकांना तो म्हणाला," तुम्हाला त्या लोकांना बाहेर काढायला काय झाले होते." वास्तविक आमच्या त्या दुसर्‍या कंपार्टमेंट मध्येही लोक म्हणत होते की त्यांना रिजर्वेशनच्या डब्यात जागा नाही द्यायला पाहिजे. त्यांना बाहेर काढल्यावर सर्वांना थोडे बरे वाटले होते.
आम्हाला वाटले "चला, एक कार्यकर्ता मिळाला", आणि मग डबा शांत झाला.

पण नंतर वाटत होते, त्याने जे केले ते किती बरोबर होते?
नव्हती तेव्हा जागा म्हणून आलेत लोक रिजर्वेशनच्या डब्यात. गर्दीच्या दिवसांत करायचे सहन थोडे. आम्ही नव्हतो का सहन करत? त्याच्या सोबतीचे कोणी त्यांत असते तर त्याने हे केले असते का?
जर त्या लोकांनी मारामारी सुरू केली असती तर ? कारण आजकाल मारामारी व्हायला लहानशे कारणही पुरेशे असते.
पुन्हा तो होता रेल्वेमध्ये, स्वत:च्या घरापासून/राहत्या जागेपासून दूर. का घ्यायची ही जोखीम?

असो, ही होती मी पाहिलेली एक क्रांती. एका क्षणात झालेली. एक क्षण चाललेली.

मे ११, २००८

नुकतेच मटामध्ये भारत सरकारच्या टांकसाळीची जाहिरात पाहिली की, "पहिल्या स्वातंत्र्य युद्धाची १५० वर्षे" च्या स्मृतीत १०० रू ची नाणी इच्छुकांना विकण्यासाठी नोंदणी सुरू आहे. त्यांच्या संकेतस्थळावरही अशीच काही १०० रुपयांची नाणी उपलब्ध आहेत. अर्थात ही नाणी चलनात नसतील हे ही त्यांनी नमूद केले आहे. मी ती नाणी घेण्याची शक्यता नाही. पण ते वाचून मी पाहिलेली वेगवेगळी नाणी व त्यांचे वापर डोळ्यासमोर येऊन गेले.

नुकतेच चलनात आलेले नवीन नाणे म्हणजे ५ रू चे स्टीलचे नाणे. ५० पैशाच्या नाण्यासारखेच वाटणारे. त्यामुळे ५० पैसे समजून ५ रू जाण्याची शक्यता जास्त म्हणून भरपूर लोकांनी सरकारकडे ते नाणे बदलण्याची विनंती केली असे वाचले होते. असा प्रकार आधीही झाला होता जेव्हा २ रू चे स्टीलचे नवीन नाणे काढले होते. मीही १ रू समजूनच ते एकाला देणार होतो. पण तेवढ्यात लक्षात आले, आणि जमा करून ठेवले. आणखी मागे जावे तर १ रू, ५० पैसे, २५ पैसे व १० पैशाची स्टीलची नाणी चलनात आली होती. नाण्यांचे ते सर्व प्रकार दिसतात घरी आताही. स्टीलच्या नाण्यांचे एक बरे आहे ती लोहचुंबकाला चिकटतात त्यामुळे एखाद्या लोहचुंबकावर भरपूर सुट्टे पैसे साठवून ठेवता येतात.

कधी काळी जुनी नाणी जमा करायचाही छंद लागला होता. पण जास्त काळ टिकला नाही. असो, जे छंदिष्ट आहेत ते बरोबर करतात जमा. इतिहासकालीन नाणी, वेगवेगळ्या देशांची नाणी आणि काय काय?
लहानपणी माझ्या आईने ५ पैशाची भरपूर नाणी जमा केली होती. त्यांचे एक जहाज बनवायचे होते म्हणून. पण ते ही काही झाले नाही. वेळेवर ती चलनात काढून टाकली म्हणून बरे, नाहीतर नुकसान झाले असते. ते झाले जुने. २/३ वर्षांपुर्वी मला सवय लागली होती, ऑफिसमधून घरी आल्यावर खिशातील नाणी ड्रॉवर मध्ये टाकायची. मग कधी वेळेवर उपयोगी पडायची.मी माझ्या बहिणीलाही सांगितले होते, 'पाहिजे तेव्हा काढून घे, पण किती जमा झाले मोजायचे नाही.' नंतर मुंबईबाहेर असल्याने त्यात खंड पडला. पण तो घरातील ड्रॉवरमध्ये नाणी जमा होण्यात. मी जिथे रहायचो तिथे हे सुट्टे पैसे एकत्र ठेवणे सुरूच होते. आता २ महिन्यांपुर्वी जेव्हा साफसफाई करताना पूर्ण ड्रॉवर रिकामे केले तेव्हा पाहिले भरपूर नाणी जमा झाली होती, १०० ते ११० रुपये. पण त्यातही थोडे नुकसान हे की २५ पैशांची नाणीही आहेत जी आता कोणी घेत नाही. जरी रिझर्व बँकेने बंद नाही केलीत, (हो, छापणे बंद केले) तरी लोकांनी ती बाद केलीत चलनातून. मधेच ऐकले होते की, बेस्ट चे वाहक घेतात ती नाणी. बघेन प्रयत्न करून.
ह्यावरून आठवले, माझ्यासारखेच किती लोकांनी घरी नाणी जमा करून ठेवली असतील. ज्यातील काही नाण्यांचा उपयोग आता होत नसेल. त्यामुळे आपले व सोबत देशाचेही नुकसान झालेच. तरी ह्यावर मार्ग आहे की बँकेने ती नाणी परत घेतली तर हे टळू शकेल. पण जी नाणी आपण देवाच्या नावाने नदीत/विहिरीत टाकतो ते पैसे तर गेल्यातच जमा आहेत. काही वर्षांपुर्वी त्याबद्दल ही पेपरमध्ये लेख वाचला होता. आधीच नास्तिक त्यात हा लेख वाचल्याने, दुसर्‍यांना नदीत पैसे टाकायला परावृत्त करू लागलो ;)

बरे, नाण्यांचा इतर उपयोग काय?
सर्वात पहिले समोर दिसते ते नाणे उडविणे. TOSS अर्थात नाणेफेकीत कोणाचा कौल लागतो ते पाहण्यासाठी. शोलेमधील ते प्रसिद्ध नाणे सर्वांना माहित असेलच. किंवा मग अंदाज अपना अपना मधील "चित मैं जिता, पट तू हारा". ह्यातील चित म्हणजे छापा की काटा? Head की Tails? आधी बरे होते, छापा की काटा ठरवण्याकरीता नाण्याची किंमत अर्थात आकडे लिहिले ते काटा व अशोकस्तंभाचे चिन्ह असलेला भाग म्हणजे छापा. पण नंतर ती स्टीलची नाणी आल्यानंतर ते बदलून गेले. पण नंतर कधी छाप काट करण्याकरता काय वापरले आठवत नाही.

तसेच दिव्यात वात नीट रहावी म्हणूनही सर्वात पहिले आपण खिशातील नाणेच बाहेर काढतो.

इतर नाण्यांबद्दल आता नक्की अंदाज नाही, पण १ रुपयाचे नाणे भलतेच उपयोगात आणले गेले सगळीकडे. सार्वजनिक टेलिफोन, वजन करायचे यंत्र, भेट देण्याची पाकिटे. बरं, ह्यातील भेट देण्याच्या पाकिटात १ रूपयाचे नाणे चिकटवून ठेवणे गेल्या ४/५ वर्षात चालू झाले असेल पण टेलिफोन मध्ये ह्याचा वापर फार जुना आहे. अर्थात त्या यंत्रांना हे कळत नसेल की टाकण्यात आलेले नाणे हे खरोखरीचे नाणेच आहे की लोखंडाचा तुकडा, म्हणून तर एक रुपयासारख्या एखाद्या लोखंडाच्या चकतीचा वापरही करण्यात येत होता. किंवा मग खरोखरीच एक रुपयाच्या नाण्याला छिद्र पाडून त्याला दोरा बांधून ते त्या यंत्रात टाकायचे व आतील खटका पडला की ते नाणे परत वर ओढून घ्यायचे असले प्रकार ही लोकांनी केल्याचे मी ऐकले आहे.

अरे हो, आणखी आठवले. माझी फजीतीच म्हणा. लहानपणी वजन करायच्या यंत्रात मी सहज गंमत म्हणून २५ पैशाचे नाणे टाकले ते तिकिट देणार्‍या वाटीत परत आले. मग मी ५० पैशाचे नाणे टाकले. ते ही परत आले. उचापतीत मग मी खिशातील २ रुपयाचे नाणे टाकले तर त्या नालायक यंत्राने ते नाणे आत घेतले. :( तेव्हा केलेले वजन २ रुपयांना पडले. त्यामुळे माझे वजन कमी झाले होते का ते आठवत नाही. पण खिशातील पैशांचे वजन असेही कमी होऊ शकते हे कळले :D
आता तर वजन/उंची/ तसेच वजन-उंची ह्यांचा समतोल आहे की नाही ते सांगणारे (Body Mass Index) यंत्रही आले आहे, जे मागते ५ रुपयांचे नाणे. ह्यावर काही मी तसे करून पाहणार नाही ;)

गेल्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मित्राकडे गेलो होतो तिथे त्यांनी घरातील ठराविक नाणी पूजेत ठेवण्यास काढली होती. त्यात मी कधी न ऐकलेले १० रू चे नाणे पाहिले. बहुधा हे नाणे ही चलनात आले नव्हते.

असो, माझे नाणेपुराण एवढेच.

रिझर्व बँकेच्या ह्या संकेतस्थळावर भारतीय गणराज्यातील नाण्यांची यादी आहे. त्यात हे १० रुपयाचे नाणे नाही. तसेच १२/१५ वर्षांपुर्वी काढलेली ५ रुपयांची नाणी ही त्यात नाहीत. कोणास आठवतेय का ते नाणे? मोठ्या आकाराचे व मागे श्रीमती इंदिरा गांधीचे चित्र असलेले? तसेच आणि काही नाणी माहीत आहेत का जी रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावरही नमूद नाहीत?

एप्रिल २०, २००८

मला राजकारणातील जास्त कळत नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही माहीत आहे त्यावरून पुढील विवेचन..

शेतकर्‍यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको असे शरद पवार म्हणाले. (पहा बातमी)

स्वत:ला काही करणे जमले नाही किंवा काही करायचे नसले तर अशी विधाने बाहेर निघतात का?

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकर्‍याला खरंच भाव मिळत असल्याचे त्यांना दिसत आहे का? मला नाही तसे वाटत. शेतकर्‍यांना कमी भाव मिळतो. तो माल बाहेर ग्राहकापर्यंत येता येता त्याचा भाव खूप वाढतो असेच दिसते. शेतकर्‍यांना भाव मिळत असल्याने महागाई वाढत असल्यास, इतके वर्षे महागाई वाढत असल्याचे दिसत आहे त्यात मग शेतकरी हलाखीचे जीवन का जगत आहेत?
हो, अवेळी पावसाने शेतीत नुकसान झाले त्यामुळे अन्यधान्याची कमी हे एक कारण आहेच. पण महागाई वाढण्यास इतर कारणे नाहीत का? सरकारी खात्याने ज्या धाडी टाकल्या त्यात साठेखोरांनी करोडो रुपयांचे धान्य साठवून ठेवण्यात आल्याचे दिसले त्याबाबत त्यांचे काहीच म्हणणे नाही का?

दोन वर्षांपुर्वी MRP अर्थात सामानाच्या अधिकतम मूल्याचे नियम धाब्यावर बसवून जे अवाजवी मूल्य आकारण्यात येत होते त्याबाबत श्री शरद पवार ह्यांच्याकडे विचारणा केली गेली त्यांनी त्याबाबत कारर्वाई करण्यात येईल असे सांगितले होते. थोड्याच दिवसांत ह्याबाबत काहीच केले गेले नसल्याने त्यांना विचारले असता त्यांनी "असे काही झाले असल्याची मला माहीती नाही" असे सांगितले (संदर्भ: मी आवाज वाहिनीवर त्यांच्या दोन्ही प्रतिक्रिया बघितल्या होत्या.)

आता त्यांनी हे वाक्य म्हणणे म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती होणार असेच दिसते. म्हणजे आधी काही तरी एक सांगणे. नंतर असे काही घडलेच नाही असे सांगणे.

लोकांच्या भूकेचा प्रश्न सोडविणारा भूकेकंगाल होता कामा नये ह्यासाठी जर महागाई वाढत असेल तर माझे महागाई विरोधात काही म्हणणे नाही. शेतकरीच काय पण कोणीही भुकेने त्रासला जाऊ नये असे मलाही वाटते. परंतु मग राज्यकर्त्यांनी ह्याबाबत खरोखरच काय घडत आहे त्याचे लोकांसमोर नीट निवेदन करावे.

खरोखर काय कारणे आहेत ते कळावे असे मलाही वाटते.

एप्रिल ११, २००८

गेल्या वर्षी एक चांगला विचार कुठल्याशा विपत्रातून (अर्थात ढकलपत्रातून) आला.
एक माणूस आपल्या मुलीसोबत बाजारात गेलेला असतो. गर्दीत तो मुलीला म्हणतो, "तू माझे बोट किंवा हात पकडून ठेव, म्हणजे गर्दीत तू हरवणार नाहीस. माझ्या सोबतच राहशील." ह्यावर मुलगी म्हणते, "नको बाबा, त्यापेक्षा तुम्ही माझा हात पकडून ठेवा. गर्दीत माझा हात सुटू शकतो. तुम्ही पकडलेला हात नाही सुटणार."

खरोखरच चांगला विचार.

तेव्हाच हात धरण्यावरून मला हा विनोद आठवला,

एकदा एक माणूस रस्त्यावरून चालता चालता एका खड्ड्यात पडतो.(कसा? माहीत नाही बुवा ;)) त्याला वर काढण्याकरीता लोक म्हणतात,"तुमचा हात द्या. आम्ही तुम्हाला वर ओढतो."
तो माणूस काही केल्या हात समोर करत नाही. लोक म्हणतात "काय झाले ह्याला?"
तेवढ्यात दुसरा एक माणूस पुढे येतो आणि म्हणतो," अरे हा माणूस एकदम कंजूस आहे. कोणाला काही देत नाही." आणि मग त्या माणसाकडे पाहून बोलतो,"अहो, माझा हात घ्या. त्याला धरून वर या".
लगेच तो (कंजूस) माणूस पुढे होऊन ह्याचा हात पकडतो.

वाटले, हात धरण्यावर थोडे लिहू. पण खूप विचार करूनही ते शब्दात बाहेर आले नाही. मग विचार केला, एकाच गोष्टीवरून दोन वेगळे विचार मनात येतात ते लिहूया. म्हणून हा प्रयत्न...
थोडे असे, थोडे तसे.

महाविद्यालयात असताना एका मित्राने पुढील सांगितले होते. आता कुत्र्या-मांजरांचे विचार त्याला कोणी सांगितले हे मी त्याला नाही विचारले, तुम्ही मला नका विचारू ;)
कुत्र्याला जेव्हा आपण काही खायला देतो तेव्हा तो विचार करतो, "हा माणूस मला खायला देतोय. हा नक्कीच महान/देव आहे."
मांजरीला जेव्हा आपण काही खायला देतो तेव्हा ती विचार करते, "हा माणूस मला खायला देतोय. म्हणजे मी नक्कीच कोणीतरी महान/देव आहे."

२/३ दिवसांपूर्वी ’स्टार माझा’ पाहताना हे मनात आले.
बाजारात कांदे, बटाटे महाग झालेत. मॉल मध्ये स्वस्त मिळत आहेत. आपण मॉल मध्येच जाऊन घेतले पाहिजे. आपले पैसे वाचतील.(सर्वसामान्यांचा विचार)
बाजारात कांदे, बटाटे महाग झालेत. मॉल मध्ये स्वस्त मिळत आहेत. त्यांनी नक्कीच साठा करून ठेवला असेल. त्यांची चौकशी करायला पाहिजे. (सरकार आणि वृत्तवाहिन्यांचा विचार)

बघूया, आणखी काही असे विचार आठवतात का?

एप्रिल ०६, २००८

ह्या आधीचे लेख इथे वाचावेत.
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - २

खुशिया बांटने से बढती है, दुख बांटने से कम होता है.
हेराफेरी मधील हे वाक्य. परेश रावल अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ला सांगत असतो. नेहमीच्या जीवनात उपयोगी पडेल किंवा पडत आलेले असे हे.

दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, गोली गोली पे लिखा है मरने वाले का नाम
जलजला (की झलझला?) ह्या सिनेमातील वाक्य डॅनीच्या तोंडी आहे. हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हापासून हे वाक्य लक्षात राहिले आहे. (खरे तर तेव्हा एकदाच पाहिला आहे हा चित्रपट. बाकी २ वर्षापूर्वी चालू होता कुठल्याशा वाहिनीवर, पण नाही पहायला मिळाला.)

मै तुम्हे भुल जाऊ यह हो नही सकता और तुम मुझे भुल जाओ यह मैं होने नही दूंगा
सुनील शेट्टी शिल्पा शेट्टीला म्हणतो, धडकन सिनेमात. ह्याच्या गाण्यांची कॅसेट ऐकताना त्यात गाण्यांच्या आधीची वाक्येही ठेवली होती. (हा प्रकार जुन्या सिनेमांच्या गाण्यांच्या कॅसेट मध्ये पहायला मिळायचा. आता मध्ये पुन्हा वापरला गेला होता.) त्यानंतर सिनेमा पहाताना कळले की ह्यात सुनील शेट्टीची ऍक्टींग एकदम तीव्र आहे.

ऐ राहुल, मुझसे दोस्ती करोगे?
कुछ कुछ होता है सिनेमात राणी मुखर्जी शाहरूख खानला म्हणते. सिनेमात तो प्रसंग दाखविला नाही आहे पण सुरूवातीला शाहरूख खानला हे वाक्य आठवते असे दाखविले आहे. तसे म्हणायला गेले तर ह्या सिनेमातील एकूण एक वाक्ये त्यावेळी पाठ होती. (अगदी पार्श्वसंगितासोबत, त्याबद्दल नंतर कधीतरी). हे वाक्य वेगळ्या कारणाने लक्षात आहे अजून.वसतीगृहात असताना एका मुलाला, राहूल नाव त्याचे, सहज विचारले, फिल्मी स्टाईल मध्ये. "ऐ राहुल, मुझसे दोस्ती करोगे?". तो बहुधा आधीच कसल्या तरी रागात होता, रागात ’नाही’ म्हणून निघून गेला. :)

"नौकरी मिली?" "नही.. आपको?"
स्टाईल सिनेमात प्रिंसिपल दाखविलेला नट, स्वत:ची नोकरी गेल्यावर चंटू बंटू कडे मदत मागायला जातो. रात्री घरी आल्यावर जेवताना तो आपल्या मुलाला विचारतो की नोकरी मिळाली का? तेव्हा त्याचा मुलगा 'नाही' म्हणतो आणि त्याला विचारतो की 'तुम्हाला मिळाली का?' पूर्ण सिनेमा विनोदी असूनही हे ह्या एका वाक्याने इथे आणखी धमाल वाटते.

गाय ने दिवार पे चढके गोबर कैसे किया?
तकदीरवाला सिनेमात असरानीने चित्रगुप्त चे काम केलेले आहे. एका घरासमोर राहून तो काहीतरी न्याहाळत असतो तेव्हा त्या घरातील मुलगी पोलिसांना बोलाविते. तेव्हा असरानी पोलिसाला (बहुधा अनुपम खेरला) हे विचारतो.

T O to, D O do तो फिर G O गू क्यू नही होता.
चुपके चुपके सिनेमात धर्मेंद्र चे ओम प्रकाशला हे विचारणे सर्वांनाच लक्षात असेल.

"काहे मारा उसको?" "आप से मिलना था." "यह कोई तरीका हुआ मिलने का?"
नाना पाटेकर च्या माणसाला मारले म्हणून तो अजय देवगणला जाब विचारतो. तेव्हा अजय देवगण सांगतो की नाना पाटेकरला भेटायचे होते. त्यावर नाना पाटेकरचा प्रश्न. ही काय पद्धत आहे का भेटण्याची? सिनेमा तसा थोडाफार गंभीर होता. त्यात हे वाक्य विनोदी मजा देउन गेले. :D सिनेमा: अपहरण

मार्च २५, २००८

काल ऐकले होते,आज वृत्तपत्रात वाचले की, बोरिवली, घोडबंदर रोड, भांडुप, मुलुंड, घाटकोपर, नाहूर आदी परिसरातील सुमारे १०० एकर जमीन 'खासगी वनजमीन' म्हणून घोषित केली गेली आहे. त्यामुळे तिथे राहणायांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे. खरेच आहे, गेले अनेक वर्षे स्वत:चे ,कर्जाचे पैसे घेऊन घर विकत घेतल्यावर ह्या निर्णयाने धक्का बसणारच.

२ वर्षांपूर्वी दिल्लीमध्येही हेच झाले होते. महानगरपालिकेने रहिवाशी संकुलात (की परिसरात) दुकानांना परवानगी दिली मग न्यायालयाने त्यावर आक्षेप घेऊन दुकाने बंद केली.

सरकारी नियम आणि मग त्यात कोर्टाचे हस्तक्षेप किंवा सरकारने न्यायालयात जाणे किंवा एखाद्याने सरकार विरुद्ध न्यायालयात जाणे हे गेले २/३ वर्षे जास्त वाचण्यात,ऐकण्यात येतेय. एका ठिकाणी सरकार, महानगरपालिका एखाद्या गोष्टीला परवानगी देते मग न्यायालयाच्या आदेशावरून त्या गोष्टीला अवैध मानण्यात येते.
ह्या गोष्टी आपण नेहमीच्याच धरायच्या का आता? सरकारनेच परवानगी दिली होती ना बांधकामाला? मग त्याविरोधात असा निर्णय का घेण्यात यावा?

मटामधील बातमीप्रमाणे
'सरकारच्या विविध खात्यांनी जरी या जागेवरील व्यावसायिक विकासाला परवानगी दिली असली तरी ती वैध ठरवणे वनखात्यावर बंधनकारक नाही,' असा युक्तिवाद सरकारच्या वतीने ऍडवोकेट जनरल रवी कदम यांनी केला. कोर्टाने तो मान्य केला.

म्हणजे सरकारी निर्णयाला/परवानगीला काही महत्वच नाही का? की सरकार फक्त नावापुरते आहे? अर्थात इथे एक खात्री करावी लागते की खरोखरच बिल्डर्सनी परवानगी घेतली होती का? जर नसेल तर मग एवढी घरे बांधली जाईपर्यंत सरकार काय मुहूर्त बघत होते त्याच्यावर बंदी आणण्याचा?
ह्याबाबत सामान्य नागरिकांना कोणी समजावून सांगेल का?

आणखी एक आहे, जे जाहिररित्या अनधिकृत आहे त्या झोपडपट्ट्यांना सरकार अधिकृत करत आहे, परंतु सरकारी परवानगीनंतर बांधलेली घरे/दुकाने अनधिकृत ठरवत आहे.

ह्यातून आता एक प्रकारची वेगळीच भीती वाटते. संपूर्ण देशातील घरे सरकारी/महानगरपालिका/नगरपालिकेच्या परवानगीनंतरच बांधली गेली आहेत. मग हळू हळू न्यायालय संपूर्ण देशातील जमीन परत तर नाही ना घेणार?

मार्च २२, २००८

लहानपणी आम्ही ऐकलेले, गायलेले हे खेळगीत. आता त्यातील पूर्ण शब्द आठवत नाहीत. त्या जागा मी रिकाम्या ठेवल्या आहेत. कुणास आठवल्यास पूर्ण करण्यास मदत करावी.
(नवीन काही असल्यासही चालेल. :) )


दुपारचा वाजला एक
आईने केला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले दोन
बाबांचा आला फोन
फोनवर बोलण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले तीन
ताईची हरवली पिन
पिन शोधण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

दुपारचे वाजले चार
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले पाच
दादाने फोडली काच
काच वेचण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले सहा
आईने केला चहा
चहा पिण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

संध्याकाळचे वाजले सात
आईने केला भात
भात खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले आठ
ताईने फोडला माठ
पाणी पुसण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले नऊ
बाबांनी आणला खाऊ
खाऊ खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले दहा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

रात्रीचे वाजले अकरा
_ _ _ _ _ _
_ _ _ _ एक तास गेला
मी नाही अभ्यास केला

लेखक/कवी: अनामिक

जानेवारी १४, २००८

काही वर्षांपूर्वी टाटा मोटर्सने इंडिका बाजारात आणली. ती गाडी मारूती ८००, सँट्रो प्रमाणे तुफान चालली की नाही हे आठवत नाही. परंतु इंडिकाही भरपूर लोकांच्या पसंतीस पडली. मी काही जास्त गाड्या अनुभवल्या आहेत असे नाही परंतु मलाही इंडिकाच आवडतेय. कोणती गाडी घेणार विचारले तर मी प्रथम इंडिकाच म्हणतो.
त्याच्या कामगिरीचा एक पैलू असाही आहे, की इंडीकाने जी इंडीकॅब आणली तिचा भाड्याने गाडी देणारे, आजकालच्या कंपन्यांमध्ये असलेली कॅब सर्विस, टॅक्सी सर्विस ह्यांनी जास्त वापर सुरू केला. त्यामुळे पांढरी इंडिका दिसली की लोक म्हणतात कॅब आहे.

तसेच जेव्हा मारुतीने स्विफ्ट गाडी बाजारात आणली तेव्हा तिचा आकार बघून मला एवढी खास नाही वाटली. मनात आले, आपल्याकडे गाडी आहे म्हणण्यात जी (थोडीथोडकी का असेना) शान वाटावी ती ह्या गाडीत वाटत नाही. अर्थात हे माझे मत आहे. लोकांचे म्हणणे होते की ही गाडी मस्त आहे. (हळू हळू मग त्यातील नकारात्मक गोष्टीही समोर आल्यात ही बाब ह्या लेखात नको.)

आता हे लिहिण्यामागचे प्रयोजन हे की नुकतीच टाटांनी त्यांची (एक) लाखांची गाडी आणली. त्यावरून बहुतेक लोकांचे स्वत:कडे कार असण्याचे स्वप्न पुर्ण होईल. मी ही माझ्या मित्राला म्हणालो, "चला, आता पैसे जमा करायला लागूया."

पण आज सकाळी सामना मध्ये बातमी वाचली की रिक्षा आणि नॅनो च्या किंमतीत, मायलेज मध्ये फारसा फरक नसल्याने व नॅनोमध्ये रिक्षापेक्षा जास्त जागा असल्याने रिक्षा संघटना टाटा नॅनो प्रवासी वाहतूकीस वापरण्याची परवानगी मिळण्याची मागणी करणार आहेत. (सध्या सामनावर बातमीचा दुवा मिळत नाही आहे)

हे वाचून मनात आले, जर ती परवानगी मिळाली तर जरी एखाद्याला स्वत:कडे कार असण्याची कामना पूरी होईल, पण वरील उदाहरणांप्रमाणे त्याच्या(माझ्याही) तथाकथित कार असण्याच्या गर्वाला त्याने धक्का जरूर बसेल.

जानेवारी ०८, २००८

WorldPersonalities

वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू?

मी ओळखलेले:

महात्मा गांधी
चार्ली चॅपलीन
बीथोवन
हिटलर
सद्दाम हुसैन
बिल क्लिंटन
ब्रुसली
अल्बर्ट आईन्स्टाईन
अब्राहम लिंकन
यासर अराफात
मेरीलीन मॉन्ऱो
जॉर्ज बुश

आणखी जमल्यास लिहीन पुढे...
(चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter