सप्टेंबर २९, २०१०

धक्का बसला ना?

गेले काही महिने मटावरील बातम्यांव्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल चर्चा होत होत्या. नायिकांचे हॉट फोटो, मसालेदार बातम्या वगैरेंची रेलचेल असते अशा प्रकारे काही काही. आणि ते आहेच. मटाच्या पानावर गेले की रंगीबेरंगी चित्रे दिसतात, आणि भरपूर काही :)

पण आज आणखी काहीतरी जास्त दिसले (अमेरिकेतून पाहिले असताना). मटा वर ब्लू फिल्म ची जाहिरात. अर्थात मटा ने स्वतः ती टाकली नसेल. गूगल च्या अ‍ॅडसेन्सची कृपा ती. गूगलने कोणते निकष लावून ती जाहिरात दाखवली माहित नाही. पानावरील मजकूरावरून म्हणायचे तर मी होतो 'हसा लेको' पानावर. इतर पानांवर नाही. किंवा मग मटा ने काय प्राथामिक माहिती त्यांना दिली त्यांनाच माहिती. (गूगल  अ‍ॅडसेन्स बद्दल माहिती असणार्‍यांनी प्रकाश टाकावा ही विनंती. :)




१ २ महिन्यांपूर्वीच गूगलने, जीमेल मध्ये ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्यामध्ये सुधारणा केली असे सांगितले होते. आणि आधी माहित असल्याप्रमाणे गूगलने अजून तरी मराठी मजकूराकरीता अ‍ॅडसेन्स बनविला नव्हता. आता आला असेल तर त्यात भरपूर लोचा आहे ;) त्यामुळे माझ्या अनुदिनीकरीता तरी अ‍ॅडसेन्स दूरच राहील. (तसा त्याबद्दल विचारच नाही केला अजून)

असो. मटाची होत असलेली प्रगती आणि आता अशी जाहिरात (चुकून?) आली असली तरी मटावर तसा मजकूर येईल अशी आशा बाळगू नका. भारतातल्या नियमांप्रमाणे त्याला बंदी आहे. ;)

सप्टेंबर २८, २०१०

गेले २ दिवस 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'ची गाणी ऐकली. पुन्हा एकदम ताजेतवाने वाटायला लागले. पूर्ण ७ गाणी त्याच प्रकारे ज्या प्रकारे कॅसेट मध्ये आहेत. एकामागोमाग एक. त्याच क्रमात :)
आणि मग सिनेमाही डोळ्यांसमोर आला.

नाही. मी ह्या सिनेमाचे किंवा गाण्यांचे परीक्षण लिहिणार नाही आहे. १५ वर्षांनंतर त्या सिनेमाचे परीक्षण लिहिण्यात काय मजा नाही. मजा आहे ती हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहण्यात. इथे लिहिणार ते फक्त मनातील विचार. 

हा सिनेमा मला खूप आवडला. पहिल्यांदा पाहीला तेव्हा मधूनच पाहिला होता. तेव्हा माझे अभियांत्रिकीचे पहिले वर्ष होते. दिवाळीच्या सुट्टीत घरी आलो, तेव्हा पाहणार होतो. पण नाही जमले. पण एकदा कसातरी पोहोचलो सिनेमाला. त्यांची ट्रेन सुटते तेव्हापासूनचा पाहिला. तेव्हा काही खास वाटला नाही. पण त्यानंतर जेव्हा पूर्ण पाहिला तेव्हा आवडला. नंतर पाहत गेलो आणखी आवडत गेला. त्यानंतर १ २ वर्षात १७ वेळा चित्रपटगृहात जाऊन पाहिला. नंतर त्याची व्हीसीडी आली त्यानंतर किती वेळा पाहिला त्याची गणती नाही. :)

महाविद्यालयाच्या दुसर्‍या वर्षी हा सिनेमा त्या गावी आला. पहिल्याच दिवशी पहायला गेलो. तिकडे काय ओपन थियेटर. आत खुर्च्या नाहीत. खडी/वाळुवर बसायचे. त्या सिनेमाची लोकप्रियता माहित होती आणि आमचा आवडता सिनेमा. म्हणून भरपूर आधी जाऊन बसलो. गेलो तेव्हा पूर्ण मोकळे मैदान. पण चित्रपट सुरू होईपर्यंत एवढी गर्दी झाली की इकडे तिकडे हलायला जागा नव्हती. आणि जास्त करून आम्ही विद्यार्थीच. अभियांत्रिकी, वैद्यकिय महाविद्यालयातले. पूर्ण धमाल.

शाहरूख खान आणि काजोल चा अभिनय की राज-सिमरन ची प्रेमकथा, इतर ही भरपूर काही. चित्रपटात काय आवडले ते नेमके सांगता येणार नाही. आणि असे म्हणतात की काही आवडले तर का आवडले ते शोधत बसू नये. त्याचा फक्त आनंद घ्यावा.

गाणी तर काय मस्त. एक एक शब्द. कथानकाला धरून. ही गाणी एवढी आवडली की कुठेही ऐकली, कोणत्याही कडव्यापासून किंवा मधल्या संगीतापासून. पुढील गाणे आपोआप गुणगुणणे सुरू होते. त्यावेळी तर जर कधी मूड खराब असला तर मी फक्त ह्या चित्रपटाची गाणी लावून ठेवायचो. मग थोडया वेळात मूड मस्त. अर्थात चित्रपटाचे संवाद आणि दृष्यही सर्व पाठ होते.  एवढे की कधी जर सुरूवातीपासून सिनेमा डोळ्यांसमोर आला तर पूर्ण संपेपर्यंत एक एक दृष्य आठवणार.

आणखी एक आहे. ह्या चित्रपटानंतर काजोल मला आवडायला लागली. 'दिलवाले दुल्हनिया...' सर्वात आवडता सिनेमा आणि काजोल ही सर्वात आवडती अभिनेत्री.  अजून तरी त्यात काही बदल नाही पडला.

सिनेमा पुन्हा पहावासा वाटतोय. पण सध्या उपलब्ध नाही. पाहिन ऑनलाईन आहे का?  (पायरेटेड नाही. शिव्या नका घालू मला. राजश्री किंवा बिगफ्लिक्स वर. अधिकृत)

ह्या चित्रपटाबद्दल भरपूर लिहावेसे वाटते. पण नंतर कधीतरी...

आता पुन्हा तीच गाणी लावून ठेवतो. आणि हो, आता ह्या आठवड्यात परत भारतात येणार तर, 'घर आ जा परदेसी..' गाणे ही प्रसंगाला धरूनच आहे ;)

सप्टेंबर २३, २०१०

अयोध्या निकालाचा 'एक बाजू जिंकली' किंवा 'दुसरी पराभूत' असा निष्कर्ष काढू नकाः चिदंबरम
अयोध्या निकालानंतर शांतता राखण्याचे अमिताभचे आवाहन!
राष्ट्रवादीचे आबांना निवेदन
अयोध्येचा निकाल टाळणारी याचिका रद्द
एकगठ्ठा (बल्क) एसएमएसवर तीन दिवस बंदी
अयोध्या निकाल काळात ठाण्यात 'एसएमएस' बंदी?

एवढे सगळे सुरक्षेचे खबरदारीचे प्रयत्न चालत असताना, लोकांच्या मनातील भावना माहित असताना, आणि खास करून माध्यमांना संयमाचे आवाहन करूनही महाराष्ट्र टाईम्स ने ’असे घडले अयोध्याकांड’ असे मटा विशेष काढण्याची काही गरज होती का?

खपली काढणे, किंवा निखार्‍याला फुंकर मारून पेटवणे असलाच प्रकार वाटतो तो. आणि त्याची प्रकाशनाची तारीख आजचीच आहे. २२ सप्टें.

माझ्या मते तरी मटा ने हे विशेष लेख काढून टाकावेत.
(मटा. च्या त्या लेखावर प्रतिक्रिया टाकतच आहे. पण  छापली जाईल का शंका आहे.)

सप्टेंबर १९, २०१०

ह्याआधीचे प्रसंग येथे वाचा.

काल रात्री दरवाजा बंद करून झोपलो. सकाळी उशीरापर्यंत झोपायचे होते. पण दरवाजाचे कुलूप ठीक करायला येतील म्हणून ८:३० ला उठलो. ९:४५ पर्यंत वाट पाहिली. परंतु काही हालचाल नाही. तो पर्यंत बजेटला (कार वाले)फोन  करून परिस्थिती सांगितली. त्यांनी सांगितले, "काही हरकत नाही. तुम्ही गाडी घेऊन या. कागदपत्रांची पूर्तता करा. आम्ही गाडी बदलून देऊ." म्हटले, "चला.एक काम तर सोपे झाले."

अपार्टमेंटच्या कार्यालयाला फोन केला. पण ते म्हणतात, "तुम्ही अपार्टमेंट क्रमांक आणि फोन क्रमांक देऊन ठेवा. आम्ही तुम्हाला फोन करू." थोड्या वेळाने त्यांचा फोन आला. तो म्हणाला, "तुमचे अपार्टमेंट आमच्या अखत्यारीत नाही येत. ज्यांच्याकडून भाड्याने घेतले आहे त्यांना संपर्क करा." तो क्रमांक मिळविला. आणि त्यांना फोन केला. आता तिथली बाई म्हणाली, " आज शनिवार असल्याने शक्यता कमी आहे. पुढील व्यावसायिक दिवसात आम्ही तुमचे काम करून देऊ." मी म्हटले," ही महत्त्वाची गोष्ट आहे. कॄपया प्रयत्न करा". ती म्हणाली," ठीक आहे. मी प्रयत्न करते."

आता गंमत बघा. कुलुप बंद होत नसेल तर मी घराच्या बाहेर नाही जाऊ शकत. जर बाहेर जाताना कसे तरी बंद केले तर पुन्हा आत जाण्याची खात्री नाही. अर्धा पाऊण तास वाट पाहिली तरी काही उत्तर नाही. पुन्हा फोन केला. ती म्हणाली, " आम्ही त्यांना संदेश देऊन ठेवला आहे. त्यांच्याकडून उत्तर आले नाही अजून." पुन्हा अर्ध्या तासाने फोन केला," तेव्हा ती म्हणाली, "त्यांचा माणूस दुसर्‍या एका जागी गेला आहे. तिकडचे काम संपल्यावर तो येईल. पण त्यात कमीत कमी १ २ तास जातील." आता काय करणार? वाटच पहावी लागेल.

पण १२ च्या आसपास (म्हणजे खूप लवकर) दरवाज्यावर ठकठक झाली. बाहेर एक माणूस उभा होता. "तुमच्या दरवाज्याच्या कुलुपामध्ये अडचण आहे का?", त्याने विचारले. मी म्हटले, "हो." तो आत आला. कुलुपाशी चाळे करून काय झाले ते पाहिले. स्क्रू ड्रायव्हर काढला. स्क्रू काढून पूर्ण कुलूप बाहेर काढले. म्हणाला, " मी थोड्या वेळात येतो." बाहेर गेला. थोड्या वेळात एक नवीन कुलुप घेऊन आला. त्याला विचारले, "नवीन लावणार का?" तो म्हणाला,"हो. ह्यात नवीनच लावावे लागेल." ५ मिनिटांत कुलूप लावले. एक चावी काढून घेऊन गेला. म्हणाला," आमच्या कार्यालयात एक ठेवावी लागते."

हुश्श. एक काम तर झाले. आता गाडीचे काम. दुसरे एक काम बाकी होते. ते करून मग बजेट कडे निघालो. त्याआधी चाकांचा फोटो घेऊन ठेवला :)

पुढचे चाक:


मागचे चाक:


त्यांनी सांगितल्याप्रमाणे जास्त वेग नाही म्हणून ११ मैल ३० च्या वेगाने गेलो. जिथे नेहमी ४०-४५ चा वेग असतो. हजार्ड/पार्किंग लाईट लावून गाडी नेत होतो. आता कमी वेगाने जायचे म्हणून एकदम उजव्या रांगेतून जात होतो. पण डावीकडे वळताना पूर्ण डावीकडे यावे लागेल. नेमकी आज रस्त्यावर जास्त गर्दी. पार्किंग लाईट मधून वळणाचा संकेत कळणार नाही म्हणून तात्पुरता तो बंद करायचो. परत चालू. :)

तिकडे पोहोचल्यावर जास्त काही करावे लागले नाही. कागदपत्रांची पूर्तता करून दुसरी गाडी घेतली आणि आरामात परत निघालो.

सप्टेंबर १८, २०१०

"FLAT TIRE?"
गाडीतून (इकडील ट्रक) उतरल्या उतरल्या तो मोठ्या आवाजात म्हणाला. निलेश म्हणाला, ’हो’. मी म्हणालो," आम्हाला ते ठीक करणे जमले नाही." मग त्याने कागदपत्रे काढली व माझे नाव पत्ता लिहिण्यास सुरूवात केली.

हा प्रसंग आज रात्रीचा. संध्याकाळी निलेश आणि सुंदर सोबत अक्षयच्या घरी गणेशोत्सवानिमित्त गेलो होतो. तिकडे घरासमोर रस्त्याच्या बाजूला माझी गाडी लावली व त्यांच्या घरी गेलो. तिकडे गेल्यावेळेप्रमाणेच आरती, प्रसादाचा कार्यक्रम झाला. नंतर गप्पा मारत बसलो होतो. ९:३० च्या आसपास दुसर्‍या मित्राकडे जायचे म्हणून आम्ही परत निघालो. अक्षय इतरांना सोडायला बाहेर आला होता. त्यांच्याकडून कळले की त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता. (इकडच्या भाषेत Flat Tire)  आम्ही निरोप घेऊन निघालो.

कार मध्ये बसलो. समोरच्या दर्शकावर लिहिले होते. TIRE LOW ADD AIR. ’वा.. मजा आहे’ .निलेश ने बाहेर जाऊन पाहिले. डावीकडील मागच्या चाकातील हवा पूर्ण गेली होती. म्हटले आता काय करायचे? दुसरा मित्र ही घरी वाट पाहत होता. मग कारच्या चावीसोबत लावलेल्या माहितीपट्टीवरून बजेटचा 'रोडसाईड असिस्टंस' क्रमांकावर फोन लावला. अपघात झाला असेल तर १ दाबा, इतर मदतीकरीता २. २... फ्लॅट टायर १ दाबा, पुढे आणखी काहीतरी क्रमांक होते. माझ्या कामाचा क्रमांक लावला. समोरून एका स्त्रीने पूर्ण माहिती विचारली, अमेरिका की कॅनडा, नाव काय, कोणती गाडी, वगैरे वगैरे. माझे नाव त्यांना समजावून सांगताना नेहमीच अडचण येते. मग पत्ता विचारला. पत्त्याकरीता निलेशला फोन दिला. अर्थात पहिल्याच दिवशी गेल्याने मला तो कोणाला नीट सांगण्यासारखा माहित नव्हता. त्यांनी सांगितले की ४० मिनिटांत त्यांचा माणूस येईल. आम्ही घरी जाऊन बसलो.

तोपर्यत दुसर्‍या मित्राला सांगितले की असे असे आहे. तो म्हणाला की मग उद्या भेटुया. तिथे बोलता बोलता कळले की इथे स्टेपनी चे चाक हे इतर चाकांपेक्षा लहान असते. फक्त तात्पुरत्या सोयीकरीता बदलून मिळण्यासारखे. नवीन गोष्ट कळली. आपल्या इकडे तर सर्व चाक एकाच आकाराचे. बदलून पुन्हा प्रवासास निघा. आता तर काय टयुबलेस टायरही आलेत. जरी पंक्चर झाले तरी थोडे किमी जाऊन बदलता येतील . असो, पुन्हा आजच्या प्रसंगाकडे.

१५ मिनिटांतच कळले की बाहेर एक गाडी आली आहे. तिकडे गेलो. ट्रक मधून एक गलेलट्ठ इसम उतरला.
"FLAT TIRE?"
गाडीतून (इकडील ट्रक) उतरल्या उतरल्या तो मोठ्या आवाजात म्हणाला. निलेश म्हणाला, ’हो’. मी म्हणालो," आम्हाला ते ठीक करणे जमले नाही." मग त्याने कागदपत्रे काढली व माझे नाव पत्ता लिहिण्यास सुरूवात केली. त्यानेही नाव विचारले. शिंची कटकट. DEV पुढचा D सांगितला तर तो अडखळला. पहिला लिहिलेला की अजून एक. त्याला म्हटले, "मीच लिहून देतो." नाव लिहून दिले. पत्ता त्याने समोरील पत्रपेटीवरून पाहिला. कागद भरून झाल्यावर गाडीतून ते लहान चाक बाहेर काढले. नंतर हवा गेलेले चाक काढण्याच्या प्रयत्नास लागला. आम्ही आपल्या सवयीप्रमाणे तिकडेच उभे होतो. त्याने आम्हाला सांगितले की तुम्ही कारच्या त्या बाजूला जाऊन उभे रहा. ते चाक काढून झाल्यावर आम्ही ते चाक बघत होतो की नेमके काय झाले. अंधारात त्याच्या ट्रकचा हेडलाईट आणि भ्रमणध्वनीच्या प्रकाशात जेवढे दिसेल ते. आम्हाला शंका होती की कोणीतरी मुद्दाम आमच्या गाड्यांमधील हवा काढली आहे. तिकडून एक माणूस चालत (की जॉगिंग करत) गेला. म्हणाला ,"You got Flat Tires. That sucks." निलेश च्या निरिक्षणाप्रमाणे तो ४/५ वेळा तिकडून गेला होता. आणि आम्हाला आता वाटले की त्यानेच काहीतरी केले असणार,  त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर गाडी लावली म्हणून. पण नेमके काहीच सांगू शकत नाही. इकडे त्या टायर बदलणार्‍या माणसाने आमची आणि दुसरी हवा गेलेली कार पाहिली आणि म्हणाला होता, "तुम्ही कशावरून तरी गाडी चालवली का ज्याने टायर पंक्चर झाले? मी ही त्यावरून नेले नसेल म्हणजे बरे" :)

"Watch Out", चाक बदलून झाल्यावर त्याने सांगितले, जॅकवरून कार खाली सोडली. नंतर जॅक परत घेऊन गेला. मोठा टायर कारमध्ये त्या जागेत बसणार नाही म्हणून वरच ठेवला. नंतर गाडीचे मैल लिहून घेतले. "'५० मैल/तास' आणि '५० मैलांपेक्षा जास्त नाही', आणि त्या आधी टायर दुरूस्त करून घ्या". त्याने सूचना दिली, एका कागदावर माझी सही घेऊन निघून गेला. आम्ही सर्वांचा निरोप घेऊन निघालो. नेहमीपेक्षा हळू.  समोरच्या दर्शकावर हवेचा दाब दाखवत होते ३४, ३५ (पुढचे) आणि १, ३५ (मागचे) लहान चाकाचा हवेचा दाब नीट न मोजता आल्याने बहुधा ते १ दाखवत होते. तिथे पुन्हा बजेट चा फोन आला. काम झाले की नाही आणि कसे झाले विचारण्याकरीता. निलेश आणि सुंदरला त्यांच्या घरी सोडून मी माझ्या घराकडे परत आलो. अहाहा... काय ती वेगळी मजा. नेहमी कमीत कमी ३५/४० च्या वेगाने गाडी नेणार्‍या रस्त्यावर २०च्या वेगाने :)

घरी आलो. कुलुप उघडले. २ ३ दिवस ते उघडताना अडकत होते. कसेतरी उघडले. आत आल्यावर दरवाजा बंद केला. कुलुप लावताना अडकत होते. दरवाजा उघडून प्रयत्न केला. आता कुलूप लागले पण उघडत नव्हते. आली का पंचाईत? एका प्रसंगातून बाहेर आलो आता दुसरा. रात्रीचे ११ वाजले आणि घराचा दरवाजा बंद नाही करता येत. :) तेवढ्यात आठवले. अपार्टमेंटच्या कार्यालयात वाचले होते की कार्यालयीन वेळेनंतर महत्वाच्या कामांकरीता एक फोन क्रमांक लिहून ठेवला आहे. तो पाहण्याकरीता कार्यालयाकडे गेलो. तिथे एक सुरक्षा रक्षक दिसला. त्याला सांगितले असे असे आहे. त्याने वही आणि पेन काढला. "नाव काय?" DEV पुढच्या D ला तो ही अडखळला. पुन्हा शिंची कटकट. त्याला म्हटले, "मीच लिहून देतो. " लिहून दिल्यानंतर त्याने पुन्हा नेमके काय झाले ते विचारले. मग त्याने दुसर्‍याला फोन करून हे सांगितले. मी विचारले,"काय झाले." तर म्हणाला, "मी नुसता सुरक्षेकरीता आहे. माझ्यापेक्षा वरिष्ठ माणसाला बोलावले आहे जो व्यवस्थापनामध्ये आहे." मला पुलंच्या 'म्हैस' मधील 'आमाला पावर नाय" म्हणणारा पोलिस आठवला :)

थोड्यावेळाने तो दुसरा माणूस आला. त्याला घेऊन अपार्टमेंट पर्यंत आलो. त्याला दाखवले काय झाले ते. त्यानेही थोडया उचापती करून पाहिल्या. तो म्हणाला, " मी जेवढे करू शकेन ते करून पाहिले. आता दुरूस्त करणार्‍याला बोलावून आणतो." थोड्या वेळाने तो आला आणि म्हणाला की, " आता ११:३० झाल्याने कोणी नाही आहे. उद्या सकाळी पहिले काम हेच करू" अंदाजे वेळ विचारली  तर म्हणाला " ८ ते १०. तो पर्यंत तुम्हाला जमल्यास ते कुलूप दरवाजा बंद करता येईल असे कराव , व कुलूप लावून ठेवा. उद्या सकाळी पाहिजे तर गॅलरीत येऊन आम्हाला बोलावू शकता" म्ह्टले ठीक आहे. कसे तरी ते कुलूप दरवाजा बंद करण्याकरीता नीट केले.

आता झोप झाल्यावर उद्या सकाळी २ कामे. १. अपार्टमेंट चे कुलुप दुरुस्त करणे व २. ते हवा गेलेले चाक दुरूस्त करणे. कसे काय? ते कार भाडयाने देणार्‍या कंपनीलाच विचारेन.

ती सगळी माहिती उद्या जसे होईल तसे सांगतो :)

सप्टेंबर १३, २०१०

टुसॉन येथे निलेशच्या ओळखीतील लोकांकडे गणपती पूजेला येण्याचे आमंत्रण मिळाले. म्हटले जाऊन येऊया. गणेशपूजा तर मी करत नाही. पण येथे कसे असते ते पाहणे आणि लोकांशी ओळख करण्यासाठी काल संध्याकाळी निलेश आणि त्याच्या मित्रासोबत गेलो श्री. संकेत यांच्याकडे.  तिथे पाहिले तर गणपतीच्या भोवती सजावट करण्याचे काम सुरू होते. गणपतीची मूर्ती दिसली नाही. तसे मनात आलेच होते की येथे गणपतीच्या मूर्ती आपल्याप्रमाणे बनवून मिळण्याची किंवा आणण्याची शक्यता कमीच आहे. मित्रमंडळी हळू हळू जमा होत होतीच. आता सर्वांचीच नावे लक्षात नाही आणि येथे लिहूही शकत नाही. :) थोड्या वेळात गणपतीची मूर्ती आणि गणपती बसवता येईल असे त्याचे वाहन एक मोठा उंदीर आणण्यात आला दुसर्‍या घरातून. तेव्हा कळले की गणपतीची प्रतिस्थापना/विसर्जन करीत नाहीत. फक्त पूजा. नवीन काहीतरी पहायला मिळाले.

थोड्याच वेळात गणपतीच्या आरतीची तयारी चालू झाली. आरती लिहून असलेले कागद वाटण्यात आले. पण त्याची बहुतेकांना गरज नव्हतीच. लहानपणापासून म्हणत असलेल्या आरतीकरीता पुन्हा वाचायची गरज नाहीच म्हणा.  आरती झाल्यानंतर प्रसाद (आणि महाप्रसाद?) उकडीचे मोदक आणि रगडा पॅटिस, तिसरा पदार्थ काय होता ते नाव विचारायचे राहिले. पण तीनही चवीला मस्त एकदम. शेवयांची खीर ही होती. पण पोट भरल्याने घेतली नाही :) खाता खाता इतरांशी गप्पा मारल्या. थोड्या वेळात निरोप घेऊन परतलो.
(छायाचित्रांच्या प्रतिक्षेत आहे. लवकरच येथे लावेन)

१:३० ते १:४५ तास होतो तिकडे पण तेवढ्यावेळात जुन्या आठवणीही डोळ्यासमोर तरळून गेल्या. घरात गणपती असल्याने त्याची तयारी ४-५ दिवस आधीच सुरू व्हायची. आमची गणपतीची मूर्ती ठरलेली. मग त्याच्या भोवतीची आरास, मखर सर्वांची तयारी. थर्मॉकोल वापरून मंदिर, पाळणा वगैरे तयार केलेले. वेगवेगळे रंगीत कापडं वापरून सर्व सजवून ठेवायचे. १० दिवस गणपती. अनंत चतुर्दशीपर्यंत. शेवटच्या दिवशी घरी अनंताची, सत्यनारायणाची पूजा. दुपारी शेजारील लोक जेवायला घरी. संध्याकाळी कमीत कमी १० जण गणपती विसर्जनाला. सुरूवातीला काही वर्षे आम्ही लगेच परत यायचो. पण मग नंतर रात्री परत येताना तेथील विसर्जनाला आलेले मोठमोठे गणपती पाहत रहायचो. आम्ही गणपती विसर्जनाला अंधेरीत सात बंगल्याला जायचो. तिथेच बस स्टॉप जवळ थांबून मिरवणूकीत चाललेले गणपती पाहत बसायचो. नंतर हळू हळू चालत परत यायचं.  एक गोष्ट नेहमी आठवते. सांताक्रूझच्या बाबुभाई भवानजी की जगजीवनदास ह्यांच्या भलामोठा गणपती आम्हाला नेहमी चार बंगल्याच्या सिग्नल जवळच दिसायचा. १ २ वर्षे आम्ही विचार केला की इथेच (सात बंगल्याला) थांबून पहायचा. पण खूप वेळ वाट पाहून परत निघालो तर तो गणपती तिथेच चार बंगल्याजवळच दिसला.

घरच्या गणपतीसोबतच कॉलनीमधील सार्वजनिक गणपतीची ही तेवढीच आठवण. गणपतीच्या वर्गणीपासून इतर कार्यक्रम कोणते करावेत ह्याकरीता सुरूवातीला झालेल्या चर्चा. नंतर घरोघरी जाऊन वर्गणी जमा करणे. आमच्या घरातील सर्वच जण आणि इतर काही घरे नेहमी गणेशोत्सवाच्या सुरूवातीपासून शेवटपर्यंत सर्व गोष्टींत सहभागी. मग गणपतीच्या मखरापासून इतर सजावटीला लागणार्‍या गोष्टीत मदत करणे.  सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी. गाणी, नाटके. अर्थात ह्यात मी जास्त कधी नव्हतो, पण थोडाफार सहभाग होताच. गणपतीच्या आदल्या पूर्ण रात्रभर सजावटीकरीता जागणे, नंतर सकाळी घरातील गणपतीची तयारी. जी जवळपास २ पर्यंत व्हायची. मग परत सार्वजनिक गणपतीजवळ जाऊन गंमती करणे. रात्री ११ १२ पर्यंत कार्यक्रम. मग आम्ही आमच्या गटातील काही मंडळी २/३ वाजेपर्यंत गप्पा, अंताक्षरीमध्ये गुंग असायचो.  पुन्हा दुसर्‍या दिवशी शाळा कॉलेज करून परत हजर. ५ दिवस पूर्ण धमाल असायची. ५ दिवसांनी तो गणपती विसर्जन केल्यानंतर एकदम सुनं सुनं वाटायचं.

ह्या आठवणी नेहमीच राहतील आणि आनंद देत राहतील (हो आठवणीच म्हणा. कारण तेच तसेच दिवस अनुभव पुन्हा मिळणे कठीण.)

आता  तरी मी गणपतीपूजनात सहभागी नसतो बहुधा. पण तरीही घरी गणपती असल्याने त्याबाबतीत जेवढे शक्य जेवढे आवडेल तेवढे करतो. वडिलांच्या जन्मापासून असलेला गणपती आमच्या घरी नेहमीच येत राहिला आहे. फक्त ह्यावर्षीच खंड पडलेला दिसला. मी अमेरिकेत आणि घरातील लोक गावाला गेल्याने.

सप्टेंबर १०, २०१०

गेल्या महिन्यात मी घरच्या घरी झटपट तंदूरी चिकन बनविले ते बझ वर लिहिले तर बहुतेकांच्या शिव्या खाल्ल्या कारण नेमकी त्या दिवशी भारतात आषाढी एकादशी होती. मग नंतर काही दिवसांनी चिकन बिर्याणी (बिर्याणी म्हणण्यापेक्षा कोंबडी घातलेला मसाले भात ;) ) बनविण्याचा प्रयत्न केला. पण श्रावण सुरू झाल्याने त्याचे लिखाणही पुढे ढकलले. आज ते एकत्र पुन्हा लिहित आहे :)

घरच्या घरी झटपट तंदूरी चिकन.

साहित्य: कोंबडीची तंगडी, तिखट, हळद, मीठ आणि तेल.
कृती: तिखट, मीठ, हळद आणि तेलाची एकत्र पेस्ट करून कोंबडीच्या तंगडीवर लावा. ३५० डि.च्या वर ओवन लावून त्यात हे भाजायला ठेवा.
सर्व गोष्टींचे माप आपल्या मर्जीवर ;)





 














झटपट चिकन बिर्यानी(?)
साहित्य: वरीलच आणि आणखी थोडे.. कोंबडीची तंगडी, तिखट, मीठ, हळद, तेल, तांदूळ, कांदा, टोमॅटो, कापलेल्या भाज्या (इथे कापूनच मिळाल्यात स्टर फ्राय वेजिटेबल्स)


कृती: टोमॅटो, कांदा बारीक कापून घ्यावा. (मी जास्त बारीक कापला नाही).




कुकरमध्ये तेल गरम करण्यास ठेवावे. मग त्यात कापलेला कांदा पिवळसर होईपर्यंत तळून घ्यावा. मग तिखट, मीठ, हळद घालून एकत्र चमच्याने हलकेसे शिजेपर्यंत तळावे. 

कोंबडीची तंगडी त्यात घालून पूर्ण मसाला त्यावर नीट लागेल असे तळून घ्यावे. 

नंतर कापलेल्या भाज्या त्यात मिसळून आणखी थोडा वेळ ते मिश्रण चमच्याने हलवावे. 

नंतर त्यात तांदळाच्या दुप्पट एवढे पाणी घालून.उकळी येईपर्यंत गरम करा. कुकरचे झाकण बंद करा. २ ते ३ शिट्ट्या होईपर्यंत भात शिजू द्यावा. 

नंतर प्लेट मध्ये घालून गरम गरम चिकन बिर्याणी खाण्याची मजा घ्यावी. ;)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter