शुक्रवारी दुपारी कार्यालयात सहकाऱ्यांसोबत बोलत होतो. पहिले प्रकाशचित्र दाखवून मी म्हणालो,"मला ह्या लोकांचा हेवा वाटतो. एवढी गर्दीची वाहतूक असूनही हे लोक किती नियमबद्ध पद्धतीने गाड्या उभ्या करतात. नाहीतर, आपल्याकडे कशीही गाडी दामटली जाते." नंतर मग नेहमीचीच चर्चा. हे असे वागतात, ते तसे वागतात.
संध्याकाळी आईचा फोन आला की माझा मावसभाऊ घरी आला आहे. मी म्हटले, "ठीक आहे मी सहा वाजता निघेन. ७:१५ पर्यंत पोहोचतो". पण कसले काय. दुपारी जी चर्चा केली तीचेच रूप समोर दिसत होते. नेहमी ज्या प्रवासाला २० मिनिटे लागतील त्याला ६०-६५ मिनिटे लागली. कारणही तेच, वाहतुकीची गर्दी. नेमके कारण कळले नाही. बहुधा मध्य रेल्वे वरील मोटरमननी केलेल्या संपामुळे वाहतुकीवर ताण वाढला असेल. पण त्या गर्दीत लोक कसेही(काही लोक कसेतरी) गाड्या चालवत होते. इकडून ही गाडी घुसव. तिकडून ती गाडी मध्येच आली. मग आमच्या वाहनचालकाचे नेहमीप्रमाणे दुसऱ्यांवर ओरडणे. घरी पोहोचायला ८ वाजले. तरी बरे, आठच वाजले. आमची गाडी पूर्व दृतगती मार्गावर गाडी येण्यास जेवढा वेळ लागला, त्यावरून तर वाटले होते की ९ वाजतील. काय पण योग(की योगायोग) असतात ना?
पण खरोखरच, नेहमीच्या ह्या वाहतुकीच्या त्रासामुळे वैताग येतो. अर्थात गाड्यांची संख्या भरमसाट वाढली हे खरे आहे. जागेची कमी आहे हे ही मान्य. पण तरीही काहीतरी शिस्त पाळायची? तीन गाड्यांच्या लेन आहेत पण त्यात चार-पाच गाड्या चालतात. दहा पंधरा वर्षांपूर्वी चंद्रपूर-नागपूर मधील आमचे नातेवाईक म्हणायचे की, मुंबईचा वाहनचालक नागपुरात गाडी नाही चालवू शकत. कारण तिकडे कशाही गाड्या चालवतात आणि तिकडचा चालक मुंबईत गाडी नाही चालवू शकत, कारण इकडे शिस्तीत गाडी चालवतात ज्याची त्याला सवय नाही. पण गेल्या ३-४ वर्षांपासून वाटते की इकडची शिस्तही गेली आहे. मी असे म्हणत नाही की सर्वच बेशिस्त आहेत. पण काही लोकांमुळे सर्वच वाट लागते.
आता काही गोष्टी बघा ना.
गेल्या आठवड्यात, कार्यालयातून निघालो. बसमध्ये गर्दी खूप. म्हणून रिक्षाने येत होतो. (मी सार्वजनिक वाहतूक वापरली नाही मान्य. पण त्यावर वाद नंतर घालू ;) ) सीप्झ पासून पुढे एल एंड टी च्या पुलापर्यंत यायला दहा मिनिटे लागायची तिकडे ३० मिनिटे लागली. गाड्या रेंगाळत पुढे चालल्या होत्या. पुढे पोहोचलो तर बघितले, एक ट्रक चालक ट्रक उभा करून कोणाची तरी वाट पाहत होता. त्यामुळे त्याच्या बाजून एकाच गाडी पुढे जाऊ शकत होती. अरे त्याला गाडी उभी करायला दुसरी जागा नव्हती का?
माझा रिक्षाचालक म्हणाला, "दोन दिवसांपूर्वीही तिकडेच कुठेतरी एक रिक्षाचालक लघुशंकेसाठी म्हणून थांबला तर त्याने रिक्षा डाव्या बाजूला नाही, उजव्या बाजूला उभी केली होती." :|
२००७ मध्ये वाशी वरून ठाण्याला येत असताना ऐरोलीजवळ वाहतुकीची कोंडी झाली होती. गाड्या एकदम हळू हळू जात होत्या. आम्ही कसे तरी तेथे पोहोचलो तर दिसले की, एक मोठा ट्रक वळण घेत होता पण नीट जमले नसल्याने तो हळू हळू प्रयत्न करत होता पण त्याच्या बाजूने इतर वाहने पुढे जायच्या प्रयत्नात कोंडी वाढवत होते. आम्ही ट्रकच्या पुढे गेलो तर पाहिले दोन वाहतूक पोलीस कोणातरी दुचाकीस्वारासोबत बोलत उभे होते. म्हटले वा, इकडे त्यांच्या मागे वाहतूक नीट चालत नाही आणि हे लोक गप्पा मारण्यात गुंग आहेत.
बरं, ठीक आहे. वाहनात काही बिघाड झाला म्हणून गाडी बाजूला घेण्यात वेळ गेला किंवा नाही जमले तर हा घोळ होऊ शकतो. पण काही जण तर अशा गर्वात असतात की आपल्याकडे गाडी आहे म्हणजे माझ्या समोरचा रस्ता मोकळा पाहिजे. नाही तर जमेल तशी गाडी दोन तीन लेन मधून घुसवायचा प्रयत्न करणार. त्यात गाड्यांचा प्रेमालाप झाला तर आपणहून मग दुसऱ्या गाडीच्या वाहनचालकाशी गळाभेट करणार. ह्यात मागे वाहतुकीची वाट लागली आहे हे त्यांच्या गावी नसते. हम्म.. असेही ऐकले की काही टक्कर वगैरे झाली तर विम्याकरीता त्यांचे प्रतिनिधी येईपर्यंत त्या गाड्या तशाच ठेवाव्यात. तेव्हा वाहतुकीचे काय होईल असा विचार येतो.
काही लोक भ्रमणध्वनीवर गप्पा मारत गाडी चालवतात. त्यामुळे त्यांची गाडी मधल्या रस्त्यामध्ये हळू जातेय की नीट जात नाही ह्याकडे त्यांचे लक्ष नाही. पुन्हा त्यांना काही म्हटले की आपल्यालाच खत्रूड नजरेने पाहणार. वाहतूक खात्याने नियम बनवलेत की गाडी चालवताना भ्रमणध्वनी वापरायचा नाही. पण तेच ह्याकडे लक्ष देत नाहीत. पुण्यात माझ्या समोरील गाडीत एका माणूस भ्रमणध्वनीवर बोलता बोलता गाडी हळू नेत होता. नेऊ दे म्हणा हळू पण लोकांना त्रास का? कडे कडेने जा की. आणि ते ही सिग्नलच्या जवळच. तिकडे उभ्या असलेल्या दोन पोलिसांसमोरून तो निघून गेला. मग मी त्या पोलिसांना विचारले की, 'त्याला अडवले की नाही?' ते म्हणाले,'आमचे लक्ष नव्हते. तू त्याचा गाडीचा नंबर दे आम्हाला'. मी म्हटले, 'ठीक आहे. तुम्ही लक्ष नकाच देऊ. आता पुढे दिसला तर पाठवतो मी त्याला मागे.'
भरपूर ठिकाणी गाड्या उभ्या करण्यास बंदी असते. तरी काही लोक गाड्या उभ्या करून जातात. दुचाकी असली तर ती उचलून नेली जाते. पण चारचाकी असली तर त्याला भला मोठा 'जॅमर' लावला जातो. त्यांच्याकडे चारचाकी गाड्या ठेवायला जागा नसते हे मान्य. पण तिकडेच त्यांना जॅम करून वाहतूकीची कोंडी वाढली जाते असे मला वाटते. आणि रस्त्याच्या बाजूला हे लोक जेव्हा पार्किंग लाईट लावून एखाद्याची वाट पाहत उभे असतात, तेव्हाही त्यांना काहीच केले जात नाही.
अजूनही भरपूर गोष्टी आहेत ज्यामुळे ह्या वाहतुकीचा वैताग येतो. पण काय करणार, ह्यातून जावेच लागणार. पुण्याला असताना एक विचार मनात आला होता. थंड पाण्याने आंघोळ करायचे म्हटले तर आपली जी स्थिती असते, तीच नाही पण, तशीच ही स्थिती आहे. सुरुवातीचे एक दोन लोटे पाणी थंड वाटते, नकोसे वाटते. पण नंतर मग पूर्ण बादली आपण संपवितो. त्याप्रमाणेच ह्या वाहतुकीत शिरायचे म्हणजे वैताग वाटतो, पण एकदा त्यात घुसले की मग आपली गाडी अंतिम स्थानापर्यंत पोहोचवतो.
ता. क. : दोन्ही चित्रे आंतरजालावरून साभार. पहिले चित्र तेच ज्यावरून चर्चा सुरु झाली. दुसरे चित्र शोधताना कळले, माझ्यासारखेच बहुतेक लोकांनी लिहून ठेवले आहे. :)
[जमल्यास अशाच आणखी वैतागांबद्दल नंतरही लिहेन.]
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा