डिसेंबर २८, २००९

नुकतेच श्रीकृष्ण जीवनावरील महानाट्य "संभवामी युगे युगे" पाहून आलो. त्यांच्या जाहिरातीप्रमाणेच ६ मजली रंगमंच, भरपूर नृत्य कलाकार, प्रत्यक्ष घोडे, रथ, गायी, बैलगाड्या, उंट, हत्ती ह्यांचा रंगमंचावर वावर ह्याचा अनुभव घेतला. ह्या आधी शिवाजी महाराजांच्या जीवनावरील 'जाणता राजा' ह्या नाटकात असा उपयोग केला होता. मला ते नाटक अजूनही पाहण्यास मिळाले नाही. त्यामुळे आज प्रथमच मी हे पाहिले. चांगले वाटले.

सध्या तरी एवढेच. विस्तृत कथन उद्या लिहितो.

डिसेंबर २५, २००९

नेटभेट.कॉमच्या प्रणव जोशी आणि सलिल चौधरी ह्यांनी सुरू केलेल्या नेटभेट मासिकाच्या तिसर्‍या अंकात (डिसें २००९) माझे 'क्यु.पी.एस आणि पी. आय. पी' हे लेखन समाविष्ट केले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.
माझे लेखन त्यांच्या मासिकात घेण्यासारखे वाटले ह्याचा मला आनंद वाटला. आधी स्टार माझाच्या 'ब्लॉग माझा' स्पर्धेत उल्लेख व आता अशा मासिकात प्रसिद्धी ह्याने प्रोत्साहनच मिळत आहे की मी काही ना काही (काहीही नाही ;) ) चांगले लिहित रहावे.
ह्यापुढेही नेटभेटचा हा आणि असे आणखी उपक्रम अशाप्रकारे होत रहावे आणि माझ्यासारखेच इतरांनाही प्रोत्साहन मिळावे ही सदिच्छा.

डिसेंबर २१, २००९

नुकतेच मिलिंद बोकील ह्यांचे 'शाळा' पुस्तक वाचून संपविले. गेल्या आठवड्यापासून सकाळ-संध्याकाळच्या बस प्रवासात वाचत होतो. सुंदर पुस्तक. सुंदर कथानक. मस्त अनुभव. पहिल्यांदा सुरू केल्यावर नीट वाचणे जमत नव्हते. पण नंतर वेळ मिळाला तर वाचत गेलो. हातातून पुस्तक ठेववत नव्हते.
अशाच प्रकारचा अनुभव ४ वर्षांपूर्वी 'पार्टनर' व गेल्यावर्षी 'दुनियादारी' वाचताना आला होता. पार्टनर तर एका बैठकीत वाचून काढले होते. अर्थात 'शाळा' आणि 'दुनियादारी' हे समोर घडताना बहुतेक जे पाहिले होते त्याचेच शब्दांकन होते. त्यामुळे दुनियादारी तर एका वर्षात ३/४ वेळा वाचून झाले तरी अजूनही वाचावयास घेतले तरी सारखे वाचतच रहावेसे वाटते.
पाहू, शाळेचा पण तोच अनुभव येतो का?

डिसेंबर १४, २००९

लोकप्रभामधील अल्केमिस्ट्री सदरात राजू परूळेकरांनी "सचिन (ग्लॅडिएटर) तेंडुलकर" नावाचा लेख लिहिला आणि (त्यांच्या अपेक्षेप्रमाणे) वादळ उठले. त्या लेखाच्या विरोधात भरपूर प्रतिक्रिया उमटल्या. माझीही एक त्यातलीच होती. माझ्या (आणि बहुतेकांच्या) अपेक्षेप्रमाणे, त्यांनी १८ डिसें २००९ च्या लोकप्रभामध्ये पुन्हा त्यावर लेख लिहिला.

ह्या लेखात त्यांनी त्यांच्या विरोधातील दोन प्रातिनिधीक लेखांना उत्तरे लिहिली आहेत. आता त्यावर पुन्हा किती प्रतिक्रिया उठतील माहित नाही. मी गेल्यावेळी थेट त्यांना किंवा लोकप्रभाला पत्र न पाठवता माझ्या अनुदिनीवरच लिहिले होते, म्हणून आजही पुन्हा इथेच लिहित आहे. मला काही त्यांच्याशी वाद घालायचा नाही आहे, पण हा नवीन लेख आणि संदर्भ दिलेला जुना लेख(पुन्हा) वाचला, त्यावरून जे काही वाटले तेच लिहित आहे. :)

 ह्या लेखाच्या (आतापासून 'तो' म्हणजे जुना आणि 'हा' म्हणजे नवीन लेख) सुरुवातीलाच त्यांनी म्हटले आहे की, "मुळात माझा लेख हा महाराष्ट्र धर्मावरचा नव्हता, सचिनचं मूल्यमापन करणारा नव्हता, कोणत्याही प्रकारचा राग, लोभ, प्रेम, द्वेष यापासून अलिप्त राहून राज्य संस्था आणि समाज यांच्या शोकान्त शेवटाअगोदर वेगवेगळ्या रूपात ग्लॅडिएटर्सचं अवतीर्ण होणं व सत्ताधारी व धनिकवर्गाने मूळ समस्या, समाजाच्या मानवी व प्राकृतिक आनंद व दु:खापासून दूर नेऊन बहुजनवर्गाला गंडवण्यासाठी अशा ‘खेळ्या’ ग्लॅडिएटर्सची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ करणं, ही इतिहासाची पुनरावृत्ती असते. हाच माझ्या लेखाचा विषय होता." जर तो लेख  सचिनचे मूल्यमापन करणारा नव्हता तर लेखाचे नावच चुकीचे होते असे मला वाटते. त्यावरून तर सचिनबद्दलच लिहिले आहे असेच समजले जात होते.

परूळेकरांचे "माणसं: भेटलेली, न भेटलेली" पुस्तक मी वाचले आहे. त्यांच्या 'संवाद' कार्यक्रमाचे खूप भाग मीही पाहिले आहेत. दोन्ही प्रकार मला आवडले. तरीही मला तेव्हा त्याबाबत नाही लिहावेसे वाटले. कारण तो लेख वाचताना हेच प्रतित होत होते की त्यांना मुळात सचिनला मिळणार्‍या अवास्तव प्रसिद्धीबद्दल लिहायचे होते. तर मग तो लेख सचिनच्या नावावर का खपविला? त्यात त्यांना लाज वाटते की "मराठीतल्या अनेक लेखक, कलावंत, गायक, राजकीय नेते वगैरेंनी सचिनसोबतच्या आपल्या तऱ्हेतऱ्हेच्या आठवणी लिहिलेल्या आहेत" अहो, त्यांना सचिनबद्दल लिहावेसे वाटले म्हणून त्यांनी लिहिले. "कमिशनर का कुत्ता मिला",""बिल्ली छत पर चढी" सारख्या ब्रेकिंग न्यूज देणार्‍या वाहिन्यांनी सचिनला अवास्तव प्रसिद्धी दिली ह्यात सचिनचा काय दोष?  तुम्हाला एखाद्याबद्दल चांगले वाटले ते तुम्ही लिहिता, आम्ही वाचतो. 'सचिनच्या पत्नी काय खातात काय नाही', किंवा 'सचिन चड्डीत होता तेव्हा काचा कशा फोडत होता' हे वाचणे/ऐकणे म्हणजे हुतात्म्यांचा अपमान करणे असे परूळेकरांना वाटते. पण हे सचिनने नाही कोणाला सांगितले की तुम्ही लिहा. त्यापेक्षा त्यांनी आजकालच्या माध्यमांना ह्याबाबत सांगावे की नका लिहू म्हणून. ’भगतसिंग, राजगुरू वगैरे लोक फासावर गेले ते ह्याचकरीता का?’ असे विचारताना स्वातंत्र्याचा संग्राम आणि क्रिकेट हा खेळ ह्यांची उगाच तुलना केली आहे असे वाटले. त्यापेक्षा आजकालची माध्यमे, त्या इतके लोकांचे प्राण घेणार्‍या कसाबच्या हागल्या-मुतल्याची बातमी देत असतात, कसाबला साध्या माणसापेक्षा जास्त सुविधा पुरविल्या जातात, ह्याची परूळेकरांना का लाज वाटत नाही? ह्यावरून "मग त्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्यांनी का उगाच आपले प्राण दिले?" हा प्रश्न रास्त ठरला असता.

सचिनने मुंबईच्या प्रश्नावर त्याला वाटले ते उत्तर दिले. आता तो त्याचा प्रश्न आहे. वाहिन्यांचे पत्रकार तर अशा विधानांच्याच शोधात असतात. (खूप कमी वाहिन्यांवर असा मसाला नसतो). कालच एका वाहिनीवर अभिषेक बच्चनलाही 'राज ठाकरे', 'मराठी माणूस' वर प्रश्न विचारत होते. पण अभिषेक बच्चनने त्याला उत्तर देणे टाळले. त्याच प्रकारे सचिननेही तेव्हा उत्तर टाळले असते तर बरे झाले असते असे वाटून गेले.

परूळेकरांनी सचिनच्या विरोधात जे काही ह्या लेखात लिहिले ते एक वेळ विचार करण्यासारखे आहे. पण त्यांना उगाच(?) लोकांच्या (त्यांच्या अपेक्षेप्रमाणे) वादळाला सामोरे जावे लागले. हेच जर त्यांनी पहिल्या लेखात लिहिले असते तर ते फक्त त्यांचे मत म्हणून लोकांनी जास्त प्रतिक्रिया दिल्या नसत्या. पण ते लिहिताना त्यांनी असेही म्हटले आहे की 'त्यांच्या विरोधात लिहिलेल्यांची मस्ती त्यांनी मनमोकळेपणाने वाचली'. हे म्हणजे ’आपला तो बाळ्या, दुसर्‍याचे ते कार्टे’ हा न्याय झाला. अर्थात  सचिनबद्दल 'आय माय मायसेल्फ’ प्रवृत्ती वाटत असेल तर हे त्यांचे मत आहे. त्याबद्दल मला काही नाही म्हणायचे. पण त्यांना वाटले त्याप्रमाणे जर सचिनचे एखादे वाक्य गंभीरतेने घेण्यासारखे नव्हते आणि त्यांनी गंभीरतेने घेतलेही नव्हते, मग त्याबाबत लिहावेच का? ज्याबाबत आधीच लागलेली आग विझत आहे त्यात उगाच तेल का घालावे? आणि दुसर्‍याने त्याबाबत काहीच लिहू नये असे त्यांना वाटते? :)

असो, मी काही क्रिकेटचा एवढा चाहता नाही आहे. सचिन एक चांगला खेळाडू म्हणून आवडतो. त्याने पुढे चांगले खेळत रहावे. आणि परूळेकरांनीही चांगल्या व्यक्तींबाबत लिहित रहावे/मुलाखत घेत राहावे. आम्हीही ते वाचू/पाहू. दोघांबद्दलही (सचिन तेंडुलकर आणि राजू परूळेकर) चांगले वाटल्यास सकारात्मक दाद देऊ/ न पटल्यास आपुलकीने टीका करू :)

डिसेंबर १२, २००९

मुंबईतील हॉटेल संघटनेने लागू केलेल्या नव्या नियमापासून ताटात घेतलेले अन्न टाकल्यास पाच रू. दंड आकारण्यात येणार आहे. वाढती महागाई व अन्न धान्याची कमतरता हे मुख्य कारण असल्याचे सांगत आहेत. तसेच ग्लासातील वाढलेल्या पाण्याचाही अपव्यव टा़ळण्यात येणार आहे.
(स्टार माझावरील बातमी येथे वाचा. व्हिडीयोचा नेमका दुवा मिळाला नाही. स्टार माझाच्या संकेतस्थळावर येथे ११/१२/२००९ च्या यादीमध्ये "खाऊन माजा टाकून नको!" व्हिडीयो पहायला मिळेल  तसेच मटावरील बातमी येथे वाचा)

मनात विचार आला की हे आधीपासून त्यांच्या लक्षात का येत नव्हते? असो, उशीरा का होईना लोकांना जाग येत आहे. मी तर गेले कमीत कमी ६/७ वर्षे हा नियम स्वत: पाळत आहे. ताटात घेतलेले अन्न पूर्ण संपवितोच. तसेच सोबत असलेले नातेवाईक किंवा मित्र ह्यांनाही करावयास सांगतो. खरोखरच खाऊन होत नसेल तर ते पाकिटात बांधून देण्यास सांगतो.

पाण्याचेही तसेच. तसा मी कमीच पाणी पितो (जास्त प्यावयास पाहिजे हे मान्य. सध्या तरी तो मुद्दा नाही) आणि पाहिजे तेवढेच पाणी घेतो. पण ग्लास रिकामा झाला असेल आणि पुढील वेळी जर कोणी ग्लासात पाणी वाढून देत असेल तर मला पाहिजे तेवढेच वाढायला सांगतो. काही वर्षांपूर्वी हॉटेलात पाहिले होते की अर्धा ग्लास रिकामा असला तरी वेटर तो ग्लास उचलून त्याच्या जागी पूर्ण भरलेला ग्लास ठेवत असे. मला ते पटले नव्हतेच. मित्रासोबत बोललो, तर तो म्हणाला, "काही हॉटेलमध्ये पद्धत असते. चांगली सेवा द्यायची म्हणून वाढताना पाणी सांडण्याची शक्यता असल्याने ग्लासच बदलवून द्यायचा." म्हटले ठीक आहे. तेव्हा काही म्हणालो नाही. पण आता ह्या हॉटेलवाल्यांनीही ग्लास बदलण्याची पद्धत बंद करावयाचे ठरविले आहे असे ऐकून चांगले वाटले.

तसेच फक्त हॉटेलच्या ग्राहकांनाच पाणी देण्यात येणार असून फु़कटात देण्यात येणारे पाणी बंद करणार आहेत. अर्थात त्यांना पडणारा पाण्याचा खर्चही ते कमी करू इच्छित असतील. तरीही पाण्यासारखी गरजेची गोष्ट नाकारणेही तेवढे चांगले वाटत नाही. पण प्रत्येकाचे मत वेगळे म्हणता येईल.

सध्याचा नियम म्हणजे दंड म्हणून नाही पण जनजागृती व्हावी ह्यासाठी असे पाऊल उचलले गेले असा त्यांचे म्हणणे आहे. आता जरी ग्राहकांचा त्यात सकारात्मक प्रतिसाद असला तरी किती दिवस चांगला सहभाग मिळेल? तो सारखा मिळून हॉटेलला असा नियम बनविणे गरजेचे वाटणार नाही अशीच इच्छा आहे.
पण काही हॉटेलमध्ये ताटातील, मागवलेल्या पदार्थांतील उरलेले पदार्थ बांधून देण्यास नकार करतात. अशा वेळी काय करणार?

अशाच प्रकारे विजेचा होणारा अपव्यव टाळण्यातही लोकांनी पुढाकार घेतला तर आणखी चांगले होईल असे वाटते.

डिसेंबर ०४, २००९

२००५ मध्ये आलेल्या 'डोंबिवली फास्ट' चित्रपटात एक प्रसंग आहे. कथानायक माधव आपटे आपल्या सहकार्‍यासोबत एका दुकानात थंड पेय पिण्यास गेला असतो. तिकडे तो दुकानदाराने घेतलेले जास्त २ रू परत मागतो. ते न दिल्याने माधव त्याच्या दुकानात तोडफोड करून २ रू परत घेतो.
हा झाला चित्रपटातील प्रसंग. प्रत्यक्षात ह्याच्या उलट एक घटना घडली आहे. मटा मध्ये आलेल्या बातमीनुसार परळ रेल्वे स्थानकावर बुकिंग क्लार्कने प्रवाशाला त्याचा उरलेला एक रूपया परत न देता उलट त्या प्रवाशालाच मारहाण केली.
चित्रपटात माधव आपटेनी केलेली मागणी ग्राह्य धरली तरी त्याने अवलंबिलेला मार्ग किती योग्य आहे हा वादाचा प्रश्न आहे. तसेच मटावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये मराठी विरूद्ध बिहारी हा प्रवाह आहे. मी त्या दोन्ही वादात सध्या शिरत नाही.
पण सध्या तरी ह्या बुकींग क्लार्कने केलेले कृत्य नक्कीच निंदनीय आहे. अशा माणसाला आधी लोकांनी, आणि नंतर कायद्याने शिक्षाच द्यायला पाहिजे.

साधारण २०-२१ वर्षांपूर्वी घेतलेल्या आमच्या कार टेप मध्ये एक बटण होते QPS नावाचे. त्याचे पूर्ण नाव तेव्हा तर माहित नव्हतेच. पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचा उपयोग मी शोधून काढला. एखादे गाणे सुरू असताना हे बटण दाबून ठेवून जर कॅसेट पुढे ढकलली तर त्याचा उपयोग होतो. मला साधा कॅसेट प्लेयर व ह्या कार टेप प्लेयर मधील हा फरक का ते तेव्हापासून अजून नाही कळले. साध्या टेप मध्ये जर आम्ही गाणे वाजत असतानाच कॅसेट पुढे ढकलायचा प्रयत्न केला तर मोठे लोक म्हणायचे, 'असे नाही करायचे.  त्याने कॅसेट खराब होते.' मग ह्या कार टेप मध्ये त्यांनी ही सुविधा का दिली? 

तर ह्या QPS फायदा हा की ते बटण दाबून कॅसेट पुढे ढकलली की पुढच्या गाण्याला थांबायचे. ह्यामागचे तंत्रज्ञान नंतर कळले, माझ्या माहितीनुसार ते Quick Position Search होते. पुढील मोकळी जागा मिळाली की थांबायचे. त्यामुळे एखादे गाणे नाही आवडले की लगेच पुढच्या गाण्यावर जाता येत असे. अर्थात आता सीडी/डीव्हीडी मुळे हे खूप सोपे झाले आहे, तरी तेव्हा हे चांगलेच वाटायचे. पण एकदा काहीतरी बिघाड झाल्याने तो टेप दुरूस्तीला दिला होता त्यानंतर ती सुविधा नाही वापरता आली. :(

काही वेळा वाटते हाच नाही पण असाच प्रकार सध्याच्या दूरदर्शन संचामध्ये आला तर किती चांगले होईल. एखादा कार्यक्रम पाहताना जर जाहिराती चालू झाल्या की हे बटण दाबून दुसर्‍या वाहिन्या चाळायच्या. ह्या वाहिनीवरील जाहिरात संपली की लगेच आपोआप सुरू झालेला कार्यक्रम पाहता येईल :)

बहुतेक सर्वच दूरदर्शन संचामध्ये तरी वाहिन्या बदलत राहिले तरी आपण पाहत असलेला कार्यक्रम सुरू झालेला आहे की नाही पाहण्यासाठी मध्येच ती वाहिनी लावून पहावे लागते. पण आमच्या घरी, निदान मला तरी, ह्याचा तेवढा त्रास होत नाही. कारण आमच्या संचातील पी.आय.पी (PIP) तंत्रज्ञान. जाहिरात सुरू झाली की मी लगेच लहान खिडकीत दुसर्‍या वाहिन्या चाळायला लागतो. तसेच लहान खिडकीत सध्याची वाहिनी चालू ठेवून दुसर्‍या वाहिनीवर एखादा कार्यक्रम पाहता येतो. ह्याचा फायदा क्रिकेट सामना सुरू असतानाही होतो. लहान खिडकीत क्रिडा वाहिनी सुरू ठेवायची आणि सोबत आपला आवडता कार्यक्रम पहायचा. आणि हो, एक सिनेमा तर कोणी पूर्णपणे ह्याच खिडकीत पाहू शकतो, 'पुष्पक' ;)  त्या लहान दूरदर्शन खिडकीला आवाज नाही असे नाही. पण मग त्याला हेडफोन लावून बसावे लागते. तोही प्रकार केला आहे. घरातले सर्व एखादा कार्यक्रम पाहत असले की मी माझा आवडता सिनेमा किंवा कार्यक्रम लहान खिडकीत पाहत बसायचो.

असो, पण CAS च्या नियमानंतर किंवा मग डीटीएच घेतले की मग हा फायदा नाही घेता येणार. तेव्हा फक्त मग सीडी/डीव्हीडी प्लेयर लावून ठेवता येईल त्या खिडकीत.
तो नियम येईल तेव्हा येईल. तोपर्यंत ह्याचा फायदा घेत राहू.

नोव्हेंबर ३०, २००९

आमच्या घराच्या मागे खरे तर खाडी होती. ती बुजवून त्यावर बांधकाम कधीतरी सुरू होणार हे नक्कीच. ती खाडी कधी बुजविली ते कळले नाही. पण आता तर त्या जागेवर सर्कससुद्धा उभी राहिली. गेल्या दीड महिन्यापासून म्हणजे १६ ऑक्टो. पासून ती सुरू आहे. नेहमी प्राण्यांचा आवाज ऐकू येत असे. दररोज दुपारी १ वाजल्यापासून त्यांचे संगीत सुरू होते. ते रात्री ९:३० ते ९:४० पर्यंत सुरू असते. मी बहुधा १६ वर्षांपूर्वी सर्कसला गेलो होतो. तेव्हा असे गाणी वगैरे असल्याचे मला आठवत नाही म्हणून वाटले, सर्कसवाल्यांनी मध्येच ऑर्केस्ट्रा ही सुरू केला की काय? :(

लहानपणी तर आम्ही वडिलांसोबत जात असू. मधे एकदा शेजारच्या काकांसोबत गेलो होतो. पण नंतर नाही.  इतक्या वर्षांनतर सर्कस आल्याने गेले २ आठवडे आमच्या घरातही सर्कसला जाऊ असे वारे वाहू लागले. पण मुहूर्त मिळेना. शेवटी काल संध्याकाळचा मुहूर्त मिळाला. ७ च्या खेळाला गेलो. आम्हाला वाटले होते की जास्त गर्दी नसेल. पण जाता जाता मागील संपलेल्या खेळाचे लोक परतताना दिसले, तेव्हा अंदाज आला भरपूर लोक आहेत.  साधारण ६:५५ ला आत पोहोचलो. ७:१० च्या आसपास सर्कशीचा खेळ सुरू झाला. पाहिले तर अंदाजे ४५-५० टक्के जागा भरली होती. हे ही नसे थोडके.

 


सर्वात पहिल्यांदा होता तो उंचावरून लटकून एकमेकांना झेलण्याचा खेळ. लहानपणी हे सर्व पाहिले होते तरी पुन्हा पाहण्यात मजा आली. ह्यात दाखवलेला अंधारात फक्त अतीनील प्रकाश वापरून पांढर्‍या कपड्यातील लोकांच्या उड्या पाहण्याचा प्रसंग माझ्याकरीता नवीन होता.

आता सर्व खेळ बहुधा आठवणार नाहीत तरी जे आठवतील ते सांगतो.
  • मुलींचे तोंडात दोरी पकडून उंचावर लटकत जाणे व स्वतःभोवती गिरकी घेणे.
  • दोन मुलांचे एकमेकांना उचलत, तोल सांभाळत केलेल्या कसरती
  • हत्तीचे नाचणे, क्रिकेट खेळणे, लहानशा स्टूलवर उभे राहणे
  • एका मुलीचे ५/६ रिंग फिरविणे
  • कुत्र्यांचे खेळ
  • पोपट/इतर पक्षांच्या कसरती , लहानशी सायकल चालवणे
  • मुलींचे दोरीवरून चालत जात कसरती दाखविणे, दोरीवर सायकल चालविणे
  • सायकलवरच्या कसरती
  • जीप/मोटारसायकल उडवून दाखवणे
  • एका लोखंडी गोलात ३ मोटारसायकलींचा खेळ.


मी जे घरी ऐकू येणार्‍या गाण्यांबद्दल म्हटले होते ते तिकडे प्रत्यक्षात पाहिले की, एखाद्या कसरतीच्या वेळी ते गाणे गात होते किंवा संगीत चालू होते. चला, माझा अंदाज चुकला तेच बरे. पण एक होते, एकामागोमाग त्यांचे खेळ चालू होते त्यात अडीच तास कसे संपले ते कळले नाही. आधीच्या अनुभवांप्रमाणे एकतर उंचावरून उड्या मारण्याचा खेळ किंवा वाघ/सिंहांचा खेळ शेवटचा/पहिला असतो. म्हणून मी पिंजर्‍याच्या जाळ्या लावण्याची वाट पाहत होतो. शेवटी घोषणा झाली की, '५ तलवारींच्या खतरनाक खेळानंतर आजचा खेळ संपेल'.

'अरे, वाघ/सिंह ह्यांचा पिंजर्‍यातील खेळ कुठे गेला?'

खेळ संपला, बाहेर आलो तेव्हा सर्कशीतल्या एकाला विचारले, तर कळले की वाघांचा खेळ ८/१० वर्षांपासून बंद आहे.

असो, एकंदरीत मला तरी लहानपणी सर्कसला जात असू त्या आठवणींनुसार ह्या सर्कशीत तेवढा नाही पण चांगलाच अनुभव आला.

नोव्हेंबर २८, २००९

२६ नोव्हें २००८ ला हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली एवढेच मी म्हणू शकतो. इतर काही परवा लिहू नाही शकलो. खरं तर लिहावे असे वाटलेही नव्हते. पण तरी आताही मनात सारखे येते म्हणून लिहून टाकले.

बाकी, हे का झाले, काय करायला हवे होते, न होण्याकरीता पुढे काय करायला हवे ह्याची चर्चा सर्वत्रच होत असते.
पण नेमकी पावले उचलली गेलीत का हाच प्रश्न आहे?  तसेच त्या हल्ल्यातील मृतांच्या/जखमींच्या कुटुंबियांना योग्य मदत मिळाली का? हेच सरकारला विचारू शकतो.

कसाबला जिवंत पकडून त्याच्यावर खटला दाखल केला गेला. आणि खरंतर तो खटला अजूनही चालूच आहे, ह्याचे वाईट वाटून घ्यावे की उज्ज्वल निकम ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा खटला इतर खटल्यांपेक्षा लवकर निकालात निघेल ह्याचा आनंद मानावा?
जरी कसाबला फाशीची शिक्षा सुनावली तरी त्याचीही अंमलबजावणी सारखी पुढे ढकलली गेली तर?

त्यामुळे ज्या दिवशी कसाबला फासावर लटकवले जाईल तेव्हाच ह्या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली वाहिली असे म्हणता येईल.

नोव्हेंबर २२, २००९

लोकप्रभामधील राजू परूळेकरांचे 'अल्केमिस्ट्री' वाचले. नुकत्याच चाललेल्या 'मराठी/महाराष्ट्रीय आणि सचिन' वादात त्यांनीही आपले हात धुवून घेतल्यासारखे वाटले, तेही 'सचिन' हे चलनी नाणे वापरून. वास्तविक मला त्यांचे मुद्देच पटले नाहीत. क्रिकेटविरोधात लिहायचे तर लिहा किंवा माध्यमांनी क्रिकेटला अवास्तव महत्व दिले म्हणून माध्यमांबद्दल लिहा की. उगाच सचिनला का त्यात ओढता? तुम्ही म्हणता तसे त्याने केले नसेल तरी त्याने बिघडवले काय?
असेच विचार मनात येत असताना, मराठीब्लॉग्स.नेट वर त्याच संबंधी लेख वाचले. त्यातील काही.
ह्यातील भरपूर प्रतिक्रिया पटल्या. त्यात हेरंब ह्यांचे अल्केमिस्ट् उवाच.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ !! हे जास्त.

फक्त मला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो.

परूळेकरांनी इतर दाखले देऊन सचिनने काय केले हा प्रश्न केलाय. पण त्यांनी स्वत:च्या अल्केमिस्ट्री ह्या लेखात फक्त राजकीय नेत्यांबद्दल (व एखाद दोन इतर लोक) लिहिलेय. दाखले दिलेल्या लोकांबद्दल त्यांनी स्वतः लिहिले असते तर आम्हालाही विचार करता आला असता.
पण त्यांनी माध्यमांच्या लोकांना ज्याप्रकारे दोष दिलेत त्याप्रमाणे स्वत:ही प्रसिद्ध नेत्यांवर लिहिण्यात पाने खर्च केलीत. जे इतर भरपूर ठिकाणी वाचायला मिळते त्यांच्याबद्दलच लिहून त्यांनी महाराष्ट्राकरीता काय केले? :)

नोव्हेंबर २१, २००९

स्टार माझाच्या 'ब्लॉग माझा' स्पर्धेत माझ्या अनुदिनीला उत्तेजनार्थ ब्लॉग म्हणून निवडल्याचे विपत्र काल आले. अपेक्षित नव्हते त्यामुळे आनंद झाला. आणि तो आनंद सर्वांशी वाटून घ्यावा म्हणून हे लेखन.
सर्वप्रथम सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. 'माझी अनुदिनी'ला निवडल्याबद्दल स्टार माझा समूहाचे आणि श्री. अच्युत गोडबोले ह्यांचे आभार.
ज्यांनी मला अभिनंदनाच्या प्रतिक्रिया/खरडी लिहिल्या त्यांनाही धन्यवाद.
माझ्या विचार टंकनाला सुरूवात झाली ती २००५ मध्ये मनोगत.कॉम ह्या संकेतस्थळावरून. त्यानंतर याहूच्या ३६० संकेतस्थळावर माझ्याबाबतीत लिहिणे सुरू केले. पण खर्‍या अर्थाने मला लिखाणाबद्दल प्रवृत्त केले ते मिसळपाव.कॉम ह्या संकेतस्थळाने. मग तिथेच मराठी ब्लॉग (अर्थात अनुदिनी) लिहिण्याबद्दल चालना मिळाली. काही मित्रही माझ्या अनुदिनीवर प्रतिक्रिया देत होते (लेखावरही किंवा विपत्रामध्येही). त्या सर्वांचे धन्यवाद.
जरी गेल्या काही महिन्यात माझे अनुदिनीवर लिहिणे कमी झाले असले तरी आता 'ब्लॉग माझा' ने ही माझे नाव निवडून मला उत्तेजनच दिले आहे की आणखी लिही. त्यामु़ळे इतके दिवस रेंगाळलेले काही विषय लिहायला सुरूवात करावयास हवी. :)

स्टार माझाच्या संकेतस्थळावर 'ब्लॉग माझा' चा निकाल येथे प्रकाशित केला आहे.

नोव्हेंबर ०५, २००९

  • सचिन तेंडुलकरचा १७००० धावांचा विक्रम. १४१ चेंडूत १७५ धावा. सचिनचे अभिनंदन.
  • सचिन बाद झाल्यावर भारताचा डाव गडगडला. भारत ३ धावांनी पराभूत. इतिहासाची पुनरावृत्ती.
सचिन तेंडुलकरची तुलना डॉन ब्रॅडमन ह्यांच्याशी केली जाते. हे चांगलेच आहे. दुमत नाही .पण ह्याबाबत काही वर्षांपुर्वी शिरीष कणेकरांनी वृत्तपत्रातील एका लेखात लिहिलेले वाक्य आठवले.
"असे म्हणतात की ब्रॅडमन तुमच्या संघात असताना अगदी वाईटात वाईट स्वप्न पडले तरी सामना हरल्याचे स्वप्न पडणार नाही . पण सचिनबाबत हे आपण म्हणू शकत नाही."
सचिनच्या खेळीवर माझी टीका नाही. पण संघाची साथ बहुधा मिळत नाही. त्यामुळेच त्या वाक्याची प्रचिती पुन्हा दिसली.

नोव्हेंबर ०१, २००९

खरं तर निवडणूका संपल्यानंतर राजकारणावरील माझे विचार लिहायचे नाहीत असे मी ठरवले होते. पण सध्या जे काही चालले आहे त्यावर लिहावेसेच वाटते.

२२ ऑक्टो. ०९ ला च काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी ला बहुमत मिळाल्याचे सिद्ध झाले. त्यांनी २ दिवसांत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांच्या नावाची घोषणा केली.

पण आज १० दिवस झालेत तरी शपथविधी काही झाला नाही. दोन पक्षांमध्ये कोणते खाते कोणाला मिळावे (खरं तर जास्त मलई कोणाला मिळावी) ह्यावर त्यांची चर्चा चालू आहे.
शपथविधीकरीत मंडपही बांधून तयार आहे. त्याचे दररोजचे भाडे वाया जात आहे. बहुतेक नेते मुंबई-दिल्ली वार्‍या करत आहेत.
त्यात सत्यसाईबाबांच्या दर्शनाला मुख्यमंत्री दिल्लीहून परत आलेत. नुसते दर्शन नाहीच तर स्वत:च्या सरकारी निवासस्थानावर सत्य साईबाबांना आमंत्रण (बातमी येथे आणि येथे). सत्य साईबाबांवर त्यांची श्रद्धा ह्यावर आमचा काहीच आक्षेप नाही. तुम्ही तुमच्या स्वत:च्या घरी काय करायचे ते करा. पण सरकारी निवासस्थानावर असे काही करणे चुकीचे आहे.

पण काय करणार? गेल्या १० वर्षांत जास्त काही कामे न करताही पुन्हा त्याच सरकारला निवडून आणणार्‍या जनतेचाही त्यात दोष आहेच. त्या नेत्यांना आता कळले आहे की जनतेला आपली सवय झाली आहे. आता आपण काहीही केले तरी जनता काही करणार नाही.

ह्या अशा जनतेला विचारात न घेता जनतेच्याच पैशावर सर्व काही करून नुसता वेळ आणि पैसा वाया घालवणार्‍या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा निषेध.

ह्याच पार्श्वभूमीवर नुकतेच ऐकल्या/वाचल्यानुसार शिवसेनेने घेतलेली भूमिका योग्यच आहे असे वाटते. माझ्यामते शिवसेना व मनसेने आतापासूनच विरोधी पक्षांचा दणका दाखविला पाहिजे.

ऑक्टोबर १३, २००९

साधारण एप्रिल-मे च्या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकावर गेलो होतो. बांधकाम सुरू असलेल्या सॅटीस(SATIS) च्या खालून जाताना वाटले, करत आहेत ते चांगले आहेच. पण दादर रेल्वे स्थानकासमोरील पुलाखाली फेरीवाले ज्याप्रमाणे बाजार मांडून ठेवतात तसे नको व्हायला.
आत पुन्हा ५ महिन्यांनी तिकडे गेलो तर बांधकाम पूर्ण झाले नसले तरी थोडेसे बाकी आहे. रिक्षाने जाण्यासाठी म्हणून स्थानकासमोरील रांगेत जाण्यासाठी निघालो. आत जाता जाता एका खांबावर ठा. म. पा. चा फलक दिसला: "फेरीवाल्यांना प्रवेश नाही". वाटले चांगले आहे.

पण आत गेल्यावर दिसले की फेरीवाले आहेतच.







गेल्या महिन्यात ठिकठिकाणी फलक वाचले होते की रस्त्यावरील सीडी विक्रेत्यांवर कारर्वाई केली आहे आणि त्यास बंदी आहे. तरीही पुन्हा महानगरपालिकेच्या फलकासमोरच हा विक्रेता सीडी विकत होता.

पुढे रिक्षाच्या रांगेत असताना आणखी एक फलक पाहिला. मीटरप्रमाणेच पैसे द्या. खाली हेल्पलाईन क्रमांक दिले होते. ठा. म. पा. चा. मी त्या क्रमांकावर संपर्क करून पाहिला. पण कोणी उचलला नाही. (रात्री ९ आणि रविवार. म्हणून बहुधा उचलला नसेल?)
ह्यावरून काही (पुन्हा तेच) प्रश्न पडले.
  • ह्या फेरीवाल्यांना काय तात्पुरता प्रवेश दिला होता? की रात्र म्हणून कोणी नसेल?
  • की ह्यांनी मागील रस्त्याने प्रवेश केला असेल? की दिवाळी म्हणून सूट आहे?
  • आता कोणी म्हणेल, विकू दे ना त्यांना. ते कुठे जातील? मग 'प्रवेश नाही' हा फलक कशाला लावताय?
  • मीटरप्रमाणे भाडे घेत नसेल किंवा इतर गरज असेल तेव्हाच आपण फोन करणार ना? मग त्या हेल्पलाईनवर कोणी फोन उचलत नसेल तर काय फायदा? की सर्व गोष्टींची नंतर त्यांच्या वेळात तक्रार करायची?
  • मीटरप्रमाणे पैसे घेत नसल्याची तक्रार परिवहन विभागाकडे करायची की ठा.म. पा?
असो, हे सुधारण्याची आशा बाळगावी का?
सध्या तरी मला ठाणे स्थानकासमोरील पुलाचे भविष्य दादर पुलाप्रमाणेच दिसत आहे.

ऑक्टोबर ०४, २००९

गेल्या आठवड्यात लोकप्रभामध्ये मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाबद्दल(सीडी आवृत्ती) वाचले. लगेच दुपारी ठाण्यातील दुकानांत फोन फिरविले. पण कुठेही ते उपलब्ध असण्याची शक्यता दिसली नाही. मग माझ्या पुढच्या आशास्थानावर लक्ष्य केंद्रित केले. "दादर मधील आयडियल बुक डेपो". तिकडुन ह्याची सीडी घरी आणण्यात आली.
खरंतर ह्या त्यांच्या संकेतस्थळावर ह्या सीडी शब्दकोशाची विस्तृत माहिती दिलेली आहेच. तरीही मला जसे दिसले ते मी येथे लिहीत आहे.
सीडी टाकल्यावर त्यातील EXE फाईल सूरू होते. त्यामुळे काय कसे सुरू करावे ह्याची शोधाशोध करण्याची गरज नाही. उघडलेल्या प्रोग्रॅममध्ये पहिल्याच पानावर 'मोल्सवर्थ यांची प्रस्तावना', 'मोल्सवर्थविषयी थोडेसे', 'जॉन विल्सन यांच्या नोंदी', 'प्रकाशकाचे दोन शब्द', 'हा शब्दकोश कसा वापराल' व (सीडीचा मुख्य भाग) 'शब्दकोश प्रवेश' असे दुवे आहेत.

ह्याबद्दल माहिती लोकप्रभात व त्यांच्या संकेतस्थळावर वाचलीच होती त्यामुळे थेट 'शब्दकोश प्रवेश' हा दुवा निवडला.

ह्यात पाहिजे ते अक्षर निवडून त्या अक्षरावरून सुरू होणरे शब्द ह्यांची यादी निवडता येतो.

तसेच त्या पानावर Find वर टिचकी मारून उघडलेल्या खिडकीत पाहिजे तो (त्या अक्षरावरून सुरू होणारा) शब्द शोधता येतो.

सर्च(Find) अर्थात शोधण्याची सुविधा ही चांगली आहे. खरं तर त्याशिवाय शब्द शोधणे कठीणच जाईल.
प्रकाशकांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या शब्दकोशात सुमारे ६०००० शब्द आहेत. आता मराठी भाषेची व्याप्ती शब्दांनुसार केवढी आहे त्याचा मला अंदाज नाही. परंतु ह्या शब्दकोशात असलेले भरपूर शब्द मला माहित नव्हते. (मी अजून पूर्ण अक्षरे नजरेखालून घातली नाहीत. त्यास भरपूर वेळ आहे) अर्थात मराठी शिकणार्‍यांकरीता हा खूप उपयोगाचा होईल तसेच मराठी येणार्‍यालाही एखाद्या शब्दाला इंग्रजीत काय म्हणतात हे पाहण्यासही उपयोगाचा आहे.
वरील जमेचे मुद्दे असूनही काही गोष्टींवर भर द्यावासा वाटतो. त्यांच्या सीडीच्या पुढील आवृत्तीत बहुधा ते हे बदल करतीलही.
  • काही शब्दांचे अर्थ ह्यात नसल्याचे आढळले. उदा. 'केवळ'. हा शब्द ’कांही’ ह्या शब्दाच्या अर्थात ’केवळ उपासी जाऊं नको कांही खा.’ ह्या उदाहरणात वापरला आहे. पण ’केवळ’ ह्या शब्दाचा अर्थ दिला नाही आहे.
  • शब्द शोधण्याच्या सुविधेत युनिकोड मध्ये टंकण्याकरीता एखाद्या वेगळ्या सॉफ्टवेयरची गरज असते त्याबद्दल माहिती देणे गरजेचे वाटले. तसेच त्यांनी युनिकोड फाँट कुठुन मिळेल ह्यासंबंधी संकेतस्थळांचे दुवे दिले आहेत. तरीही जर ते फाँट आणि टंकनाचे सॉफ्टवेयर त्यांनी ह्या सीडीतच दिले असते तरी चालले असते असे वाटले. (नाहीतरी ७०० पैकी ६०८ MB वापरल्याने उरलेल्या जवळपास ८०-८५ MB मध्ये ते येऊ शकते. त्या त्या संकेतस्थंळावर मी फाँट/सॉफ्टवेयर वाटण्याबद्दलची माहिती वाचली नाही आहे अजून. जर काही बंधने असतील तर मग ते वापरणार्‍यावर जबाबदारी देणेच योग्य)
  • शब्द फक्त त्याच अक्षराच्या पानावरील शब्द शोधता येतात. उदा ’अ’ च्या पानावर ’आवड’ हा शब्द सापडत नाही.
  • संगणक वापरणार्‍याला आजकाल शोध करण्याकरीता CTRL+F ची सवय झाली असते. (तो एक अविभाज्य भागच आहे म्हणा) त्याची सुविधा नाही आहे.
तरीही एकूण भरपूर शब्दांचे अर्थ, सीडी असल्याने त्याची जवळ बाळगण्यातील उपयुक्तता, अतिशय वाजवी दर (रू ७५ फक्त) आणि सर्वत्र चालत असलेल्या मराठीबद्दलच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा शब्दकोश आपल्या संग्रहात ठेवणे चांगलेच आहे.

सप्टेंबर २८, २००९

गेले काही महिने, खरं तर फेब्रुवारी ०९ पासून, आपल्याला येणार्‍या बँक किंवा विक्रेत्यांच्या मोबाईल लघु संदेशात पाठवणार्‍याच्या नावात २ ठराविक प्रकारची अक्षरे देऊन मग पाठवणार्‍याचे नाव लिहिले असते. एवढा अंदाज होता की TRAI च्या आदेशानुसार सर्व कंपन्यांना असे करणे बंधनकारक असेल. पण त्या अक्षरांचे अर्थ कळत नव्हते. मला आलेल्या संदेशांमध्ये मुख्य:त्वे TM, TA असे लिहिलेले असायचे. त्याचा मी लावलेला अर्थ TM=Telemarketing आणि TA=Transaction Alert असा होता. :D लवकरच, नंतर आलेल्या विविध संदेशांमधून, कळले की मी काढलेले अर्थ चुकीचे आहेत. पण कामात व्यग्र असल्याने नंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही.

जून मध्ये थोडाफार शोध घेतल्यावर कळले की , TRAI ने सांगितल्याप्रमाणे अयाचित व्यापारविषयक लघुसंदेशांमध्ये (Unsolicited Commercial SMS) ही दोन अक्षरे लिहिणे गरजेचे आहेत. त्या दोन अक्षरांमधील पहिले अक्षर हे संदेश पाठवणार्‍या कंपनीकरीता ठरविलेले संकेताक्षर व दुसरे अक्षर हे ते सेवा देत असलेल्या विभागाकरीता ठरलेले संकेताक्षर आहे.

आता पुन्हा लिहिण्याकरीता वेळ मिळाल्यानंतर ह्याकरीता वापरण्यात येणार्‍या दोन संकेताक्षरांची माहिती मी येथे देत आहे. ह्याचे स्त्रोत आणि अधिक/पूर्ण माहिती येथे मिळेल.

मोबाईल कंपन्यांची यादी
कंपनीसंकेताक्षर
एअरसेल लि.
एअरसेल सेल्युलर लि.
डिशनेट वायरलेस लि.
D
भारती एअरटेल लि.
भारती हेक्झाकॉम लि.
A
भारत संचार निगम लि.B
बीपीएल मोबाईल कम्युनिकेशन्स लि.
लूप टेलिकॉम प्रा. लि.
L
डेटाकॉम सोल्युशन्स प्रा. लि.C
एच एफ सी एल इन्फोटेल लि.H
आयडिया सेल्युलर लि.
आदित्य बिर्ला टेलिकॉम लि.
I
महानगर टेलिफोन निगम लि.M
रिलायंस कम्युनिकेशन्स लि.R
रिलायंस टेलिकॉम लि.E
एस. टेल लि.S
श्याम टेलिकॉम लि.Y
स्पाईस कम्युनिकेशन्स लि.P
स्वॅन टेलिकॉम प्रा. लि.W
टाटा टेलिसर्विसेस लि.
टाटा टेलिसर्विसेस (महा.) लि.
T
युनिटेक ग्रुप ऑफ कंपनीU
वोडाफोन ग्रुप ऑफ कंपनीV



विभागांची यादी
विभागसंकेताक्षर
आंध्र प्रदेशA
आसामS
बिहारB
दिल्लीD
गुजरातG
हरियाणाH
हिमाचल प्रदेशI
जम्मू आणि काश्मिरJ
कर्नाटकX
केरळL
कोलकाताK
मध्य प्रदेशY
महाराष्ट्रZ
मुंबईM
उत्तर पूर्वN
ओरिसाO
पंजाबP
राजस्थानR
तामिळनाडू (चेन्नई सह)T
उत्तर प्रदेश - पूर्वE
उत्तर प्रदेश - पश्चिमW
पश्चिम बंगालV


त्यामुळे मला आलेल्या संदेशातील TM म्हणजे T=टाटा टेलिसर्विसेस व M=मुंबई विभाग. म्हणजेच टाटा सर्विसेसच्या मुंबई विभागातून हा संदेश पाठवण्यात आला. TRAI च्या मतानुसार ह्या संकेताक्षराचा वापर करून विनाकारण संदेश पाठवणायांना आटोक्यात आणता येईल. पण मी NDNC करिता ऑगस्ट २००८ मध्येच नोंदणी केली आहे. त्यामुळे मला जे न मागता आलेले संदेश आलेत त्यांबद्दल मी जूनमध्येच तक्रार केली.

पण अजून तरी त्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. माझ्यासारखे आणखी जण असतीलच.
तसेच हे टेलिमार्केटर्स फक्त अशाप्रकारचे लघुसंदेश पाठवत नाहीत तर वेगवेगळी संकेतस्थळे वापरून, इमेल ते मोबाईल अशाप्रकारेही हे लघुसंदेश पाठवत आहेत.
ह्या गोष्टींबाबत TRAI किंवा मोबाईल कंपनी काय उत्तर देणार आहे माहित नाही.

आज नेहमीप्रमाणे दूरदर्शन(संच) वर वाहिन्यांवरील कार्यक्रम चाळत असताना ४ वाजता दूरदर्शन(आता वाहिनी) च्या राष्ट्रीय वाहिनीवर 'दशावतार' सिनेमा दाखवत असल्याचे लक्षात आले. प्रमाणपत्रावर वर्ष होते २००८. कमल हासनचा 'दशावतारम' लक्षात होता. त्यामुळे पहायचे ठरविले.
सुरूवातीलाच लिहिले होते की त्यातील animation हे पुराणातील कथांवरून घेतलेले आहे. कमल हासनच्या 'अभय' मध्ये असे अ‍ॅनिमेशन दाखविल्याचे पाहिले होते. त्यामुळे वाटले की, ते इतिहास/संदर्भ दाखविण्याकरीता थोडावेळ असेल. अर्थात दाखविलेला भाग, त्याची चित्रांची कला चांगलीच होती. पण मी कमल हासनचा सिनेमा म्हणून पाहत होतो. १ तास झाला तरी अनिमेशन काही संपतच नव्हते. म्हटले काहीतरी गोंधळ झाला असेल. त्याआधी मध्येच येऊन IMDB वर वाचले की कमल हासनच्या सिनेमाचे हिंदी नाव 'दशावतार'च आहे.
पण असो, मी तर हा अ‍ॅनिमेशन सिनेमा पाहत होतो की पुढे काहीतरी असेल. पण २ तासांनी सिनेमा संपला तेव्हा कळले की हा पूर्णपणे वेगळा सिनेमा आहे. :D

सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रावर दोन तारखा असतात: जारी करने की तारीख (Issue Date), समाप्ती की तारीख (Expiry Date)
ह्यात १० वर्षांचा फरक असतो. म्हणजेच ते प्रमाणपत्र १० वर्षांपर्यव वैध असते. ह्याच बाबतीत असेही ऐकले होते की त्या १० वर्षांत त्या सिनेमाचे नाव पुन्हा कोणी वापरू शकत नाही.
तर मग दशावतार नावाचेच २ सिनेमे तेही एकाच वर्षात, एकाच दिवशी आलेत, म्हणजे हा नियम आता बहुधा नसेलही.

आणि वाचनात आल्याप्रमाणेच विष्णूने जवळपास २० अवतार घेतले होते. त्यातील १०च वापरून ’दशावतार’ बनविला आहे. ते ही दोनही सिनेमांत. त्याचीही मला गंमत वाटली.

असो, मी पाहिलेला हा सिनेमा तसा चांगला वाटला पहायला. पुराणकथेतील माहिती पुन्हा पहायला मिळाली.

इतर कोणी दोन्हीपैकी एखादा सिनेमा पाहिला आहे का? त्याबद्दल तुमचे काय मत आहे?

सप्टेंबर २५, २००९

वर्ष २००८. पुण्यात एअरटेलचे प्रिपेड कार्ड घेउन बहिणीला मुंबईत दिले होते. पण काही कारणाने त्यावरून काही संपर्क करीता येत नव्हता. कार्डमध्ये बाकी असलेले पैसे ही पाहता येत नव्हते. कसातरी ग्राहक सेवेचा क्रमांक शोधून काढला. पण कार्ड पुण्याचे, मी ठाणे/मुंबईत. ह्या वरून त्यांनी मला भरपूर फोनाफोनी करावयास लावली. त्यातच एकाने मला ९८२००९८२०० हा नंबर दिला म्हणाला "ह्या क्रमांकावर एअरटेलला संपर्क करा." मला खात्री होती की तो क्रमांक हच/वोडाफोनचा आहे. पण त्यास माहीत नव्हते बहुधा.

माझा वरील शहाणपणा(?) व खालील सामान्य माहिती.

९८२०xxx -(मुंबई) ऑरेंज/हच/ आता वोडाफोन
९८२१xxx-(मुंबई) बीपीएल
९८१xxx -(दिल्ली )
९३xxx रिलायंस
९२xxx आयडीया
९४xxx इतर काही... वगैरे वगैरे...

वरील दोन गोष्टींवरून हे सांगायचे होते की मोबाईलच्या पहिल्या ३/४ आकड्यांवरून तो कुठला व कोणत्या कंपनीचा मोबाईल क्रमांक आहे हे लगेच कळत होते.

पण आता ३१ डिसेंबर पासून ह्या माहितीचा उपयोग बहुधा होणार नाही. कारण ह्या बातमीनुसार केंद्र सरकारने मान्य केलेल्या ग्राहकांच्या मागणीनुसार आता मोबाईल क्रमांक तोच ठेवून ग्राहकाला मोबाईल कंपनी बदलता येणार आहे. अर्थात आतापर्यंत माहित असलेली वरील माहिती आता चुकीची होणार असली तरी त्यात आपला फायदाच आहे :) माझाही सध्याचा मोबाईल क्रमांक माझ्याकडे २००२ पासून आहे. त्यामुळे मध्ये थोडाफार त्रास सहन करून मी त्याच कंपनीची सेवा वापरत होतो. आता त्यात थोडी सुधारणा झाली आहे ही जमेची बाजू.

तरीही मला पडलेले काही प्रश्न:
गेले दीड दोन वर्षे मोबाईल कंपन्या असे करण्यास होकार देत नव्हते. अजूनही ते लगेच मान्य करतील का?
जरी कंपन्यांनी ते सुरू केले तरी कितपत चांगली सुविधा मिळू शकेल?
ते लावणार असणारे चार्ज कितपत असू शकतात हे ही नंतरच कळेल. पण असे नको की तो चार्ज एवढा की त्यापेक्षा नवीन क्रमांक घेणे स्वस्त पडेल :)

अर्थात TRAI ह्यात लक्ष घालेलच.

त्यामुळे आता मी माझा मोबाईल क्रमांक तोच ठेवून आता चांगली सेवा मिळण्याची आशा बाळगतो.
तुमचे ह्या Number Portability बद्दल काय मत आहे?

मे १०, २००९

ह्या आधी:
भटकंती (ठाणे ते शेगाव)
भटकंती (शेगाव- आनंदसागर)
शनिवारी सकाळी पुन्हा मंदिरात जायचे होते दर्शनाला. साधारण ८ वाजता तयार होऊन आम्ही निघालो. विचार केला होता की दर्शन घेऊन तसेच थेट निघता येईल. म्हणून मग सर्व सामान गाडीत ठेवले व हॉटेलची खोली सोडून दिली. आम्ही असलेली जागा ही मंदिराच्या पश्चिम द्वारासमोर होती. ते द्वार सध्या दुरूस्तीकरीता बंद होते. त्याच्याच उजव्या बाजूनेही दुसरे आणखी एक प्रवेश द्वार होते. त्यातून आम्ही आत गेलो. (रात्रीही ह्याच मार्गाने गेलो होतो, पण आता थोड्या जास्त माहितीसोबत)

दर्शन घेतल्यावर आम्ही थोडा वेळ मंदिराच्या आवारात बसलो होतो. तिथेच स्वागत कक्ष, देणगी केंद्रे बनविली आहेत एका बाजूला पोथी वगैरेचे पारायण करण्याकरीताही एका हॉलमध्ये सोय केली आहे. तशाच आणखीही सोयी आहेत. मंदिराच्या आसपासच्या भागात म्हणजे खालील फोटोत दिसणार्‍या द्वारातून आत गेले की पूर्ण भागात कॅमेरा वापरण्यास बंदी होती, त्यामुळे बाहेरील भागात जमतील तशी चित्रे कॅमेर्‍यात बंदिस्त केली (अर्थात संस्थानाच्या कार्यकर्त्यांच्या परवानगीनेच). त्यामुळे गजानन महाराजांच्या मूर्तीचा फोटो वगैरे ह्यात नाही.

ह्या द्वारातून आम्ही आत आलो.

हे संस्थानाचे सभागृह,

आजूबाजूच्या आवारातही इतर लहान मंदिरे बांधलेली आहेत.




शेगाव संस्थानाचे भक्त निवास क्र १. इथेही अशाच प्रकारे इतर निवासस्थाने क्र २ ते ६ बनविली आहेत.

हे मुख्य प्रवेशद्वार (आतून). ह्या प्रवेशद्वारापर्यंत येण्याची गाडी, रिक्षा ह्यांना परवानगी आहे. ह्यापुढे चालतच जायचे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर फुल/प्रसाद व इतर साहित्याची दुकाने आहेत.



हे सर्व पाहताना एक जाणवले की मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत सगळीकडे चांगली स्वच्छता पाळली गेली आहे. असेच आनंदसागर येथेही अनुभवले होते.

मंदिरातून निघून मग आम्ही मुख्य मंदिरापासून ६/७ कि.मी अंतरावर असलेल्या नागझरी ह्या ठिकाणी जायला निघालो. तेथे जाण्याचा रस्ता जाणीव करून देत होता की आपण एखाद्या खेडेगावातून जात आहोत. लहान रस्ता, आजूबाजूला घरे. रस्त्यावरून ऊस वाहून नेणाया बैलगाड्या. एखादी गाडी समोर असली की त्याला सहज पार करून जाणे अशक्य. दोघांनीही एकमेकांकरीता रस्ता मोकळा करून द्यायचा. गावातून बाहेर निघालो तर एकदम निर्जन, ओसाड वाटणारा प्रदेश. पण शेतीकरीता वापरला जाणारा असेल असा अंदाज. रस्ता एकदम खडबडीत.


आम्ही नागझरीला पोहोचलो. तिथे गेल्यावर कळले की येथे गजानन महाराजांच्या गुरूंचे मंदिर आहे. तिथे बाहेरच मोठे प्रवेशद्वार बनविले आहे. आम्ही त्या प्रवेशद्वारातून न जाता उजवीकडील वेगळ्या रस्त्याने खालपर्यंत गाडी घेऊन गेलो व तिकडून दुसर्‍या पायर्‍या उतरलो.


आत एक पाण्याचे कुंड बनविले आहे जिथे गायीच्या तोंडातून पाण्याचा उगम आहे. पुढे मंदिराच्या वरच्या भागात एक मंदिर आहे (कोणाचे ते आठवत नाही) तिकडून खाली उतरल्यावर गुहेत आत गेल्याप्रमाणे पायर्‍या बनविल्या आहेत व तिथे गुरूंचे मंदिर आहे. (पुन्हा त्या मूर्तीचा फोटो घेण्यास मनाई)

खाली उतरल्यावर पाहिले की प्रसाद (जेवण) बनविण्याकरिता तेथे एक मोठे स्वयंपाकघर बनविले आहे. आणि दुसर्‍या खोलीत भांडी ठेवण्याची व्यवस्था आहे. तिकडची भांड्यांची मांडणी एकदम पद्धतशीर होती, ते मला एवढे वेगळे वाटले आणि आवडले की मी त्याचा फोटो घेणार होतो, पण तेथील मुख्य असलेल्या व्यक्तीने (काय संबोधन होते तेही विसरलो आता) नकार दिल्याने तो विचार सोडून दिला.

तेथून मग आम्ही अंदाजे ११:४५ ला निघालो. पुन्हा शेगावच्या मंदिराजवळ आलो. तिथे ११ ते १ महाप्रसाद मिळतो. मी रांगेत लागून तो प्रसाद घेतला, व पुढे मग जेवणाकरीता हॉटेल शोधत निघालो. शेगावच्या बाहेर निघताना एक चांगले हॉटेल दिसले. रात्री जेवलेल्या हॉटेलपेक्षा हे भरपूर चांगले होते, आणि त्याच्या थोडेच पुढे होते. त्यामुळे काल रात्री आणखी थोडा शोध घेतला असता तर बरे झाले असते असे वाटले.

असो, तिकडे जेवण करून मग आम्ही शेगावहून शिर्डीकरीता प्रस्थान केले.




मे ०२, २००९

गेले २ आठवडे 'गल्लीत गोंधळ.. दिल्लीत मुजरा' ह्या चित्रपटाच्या जाहिराती पाहत होतो. काल हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज वेळ जमून आल्याने हा सिनेमा पहावयाचे ठरविले. आज सकाळी फोनवरून सिनेमाचे तिकीट काढून ठेवले. वाटले आज शनिवार आहे, त्यात नवीन हिंदी चित्रपट आले नाहीत. म्हणून गर्दी असायची. (मराठी सिनेमाला गर्दी असते हे आता मान्य करण्यासारखे आहे.)



तिकीटखिडकीवर जाता जाता पाहिले ४ पैकी ३ पडद्यांवर मराठी चित्रपट आहेत. अर्थात हिंदी चित्रपट प्रदर्शित न होणे हे ही कारण असू शकेल, पण आनंद वाटला की मराठी सिनेमाला मल्टीप्लेक्स मध्ये पाय पसरायलाही जागा मिळाली. पण प्रेक्षागृहात शिरताक्षणी तो आनंद मावळून गेला. जेमतेम १० ते १५ टक्के खुर्च्या भरल्या होत्या. असो.(बोक्याची टक्केवारीही काढायला पाहिजे असे वाटले. तो सिनेमा बहुधा अजूनही चांगला चालत आहे.)

ह्या सिनेमाची कथा तशी काही वेगळी नाही. (मला चित्रपटाची कथा ऐकायला आणि सांगायला आवडत नाही, पण ह्यात काही खास वळणं नाहीत. चित्रपटाच्या जाहिरातीतच सर्व दिसून येते.) एका गावातील एकमेकांवर कुरघोडी करणारे दोन जण- एक आमदार, एक सरपंच. व त्या दोघांत राहून दोघांचीही कामे करत स्वतःचा फायदा करून घेणारा गावातील एक माणूस नारायण. सुरूवातीपासून आमदार टोपे (सयाजी शिंदे) आणि सरपंच डोळे (नागेश भोसले) ह्यातील एकमेकांवर वरचढ होण्याची भांडणे दाखविली आहेत. त्यात नारायण (मकरंद अनासपुरे) दोघांकडून असल्याचा आव आणत, त्यांच्यात कळ लावत, त्यात भर घालत असतो, व स्वतःचाही फायदा करून घेत असतो. पुढे एका भांडणातून नारायण ठरवितो की तो स्वतःच निवडणूकीला उभा राहणार. मग जे राजकारणी डावपेच सूरू होतात ते सर्व पुढील चित्रपटात दाखवले आहे.

संपूर्ण चित्रपटात विनोदी वातावरण कायम राहते, आणि हा विनोद हा एका पातळीवरच राहतो. ना एकदम घसरला ना एकदम उंचावला आहे. त्यामुळे ठिक आहे. बाकी नारायणाच्या नावावरून विनोद, आमदार टोपेच्या मेव्हण्याचे एकच वाक्य ३/४ म्हणणे अशा प्रकारात थोडा कंटाळा येतो. सुरूवातीला नारायण सायकलवरून उतरल्यावर पायांची जी हालचाल करतो त्यावरून असले अंगविक्षेपाचे विनोद असल्याचे खटकले होते, पण तो प्रकार २ वेळाच दाखवला आहे. एखाद्याशी बोलत असताना आमदाराचा मुलगा मध्ये मध्ये आपले बोलणे लावत असतो ते प्रसंग नेहमीचेच वाटतात पण तरीही हसवून जातात.

वेगळेपण वाटले ते नारायण जे काही करत असतो ते नेमके कशाकरीता करत असतो त्याचा अंदाज लगेच आला नाही. एखादी गोष्ट घडून जातानाच त्यामागचे कारण कळते. उदा. डोळे व टोपे दोघांनाही शेवटच्या दिवशी ४ वाजता निवडणूकीचा अर्ज का भरायला लावतो हे मला तरी लगेच कळले नाही. त्या कार्यालयात ४ वाजल्यानंतरच कळले.

चित्रपटाला तशी एक सलग कथा असल्याचे मला तरी जाणवले नाही. एकमेकांना धूळ चारणे हा मूळ हेतू समोर ठेवून त्यानुसार मग प्रसंग टाकलेले आहेत. सयाजी शिंदे व मकरंद अनासपुरे ह्यांचे काम नेहमीच्याच शैलीत आहे. नागेश भोसलेचा अभिनय मी जास्त पाहिलेला आठवत नाही. काही वर्षांपूर्वी आलेल्या 'हसरतें' मालिकेतील त्याचे काम आवडले होते. पण त्यातील युनियन लीडरचा आवेश ह्यात सरपंच असला तरी वाटला नाही. बाकी इतर पात्रे म्हणजे आमदार/सरपंचाची बायका,मुले ह्यांची ही कामे बरी वाटली. सरपंचाच्या बायकोचा (लग्नाआधीचा) प्रियकर जो महाराज बनून वावरतो त्याचेही काम चांगले वाटले. लावणी कलाकार म्हणून असलेल्या नायिकेचे कामही बरे वाटले. एक परदेशी युवती तेथे कला शिकण्यासाठी आलेली असते त्याची गरजही सुरूवातीला वाटत नाही परंतु नंतर गरज कळते. संपूर्ण चित्रपटात दिल्लीचे नाव नाही. आहे ते फक्त लावणी मध्ये व चित्रपटाच्या शेवटी. नावावरून वाटले होते की गल्लीत म्हणजे स्वतःच्या प्रांतात काही गोष्टी करण्यासाठी दिल्लीमध्ये काही ना काही कथानक घडत असेल. पण सिनेमात नुसता गावातील कुरघोडींचा गोंधळच आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना एवढा काही खास प्रभाव माझ्यावर पडला असे वाटले नाही. त्यातल्या त्यात नंतरच्या १ तासात मी हा सिनेमा पाहिला हे ही विसरून गेलो.

असो, मी ही अजूनही गोंधळलो असल्याने माझे लिखाणही तसेच वाटत असेल. पण ह्या सिनेमाबद्दल मत असे की सिनेमा तसा वाईटही नाही आणि आवर्जून पहावा असाही नाही.

मे ०१, २००९

गेला महिनाभर निवडणूकीबद्दलचे SMS येत होते. "Save Thane","Vote for XXXXX","Don't vote for XXXXX" वगैरे वगैरे. वैताग आला होता त्या SMS चा. तसेच बाकीचे जाहिरातींचे SMS ही होतेच, ज्याला आपण टेलिमार्केटींग म्हणतो त्या प्रकारचे. Do Not Disturb मध्ये नंबर नोंदवूनही हे SMS येत असल्याने तक्रार करण्यास माझ्या मोबाईल कंपनीच्या ग्राहक केंद्राला संपर्क केला. ते म्हणाले, 'पहिल्यांदा तक्रार करताना तुम्हाला लेखी तक्रार द्यावी लागेल" त्यामुळे मला त्यांच्या कार्यालयात जाणे भाग होते. वेळेअभावी ते जमले नाही. आणि निवडणुकीचे SMS म्हटले, तर वाटले ह्याची तक्रार करूनही काही फायदा होणार नाही. आणि एवीतेवी ३० एप्रिल नंतर बंद होतीलच. टेलिमार्केटिंगचे आलेत तर पाहूच.

पण आज SMS आला, "You have voted & every vote will make India Strong................. Thank You"

सर्वांनाच हा SMS गेला असेल तर एक वेळ ठीक आहे. पण ह्या लोकांनी मतदारयादीतूनही मतदान केलेल्या लोकांची नावे घेउन तर नाही ना SMS पाठवले, अशी ही पुसट शंका येऊन गेली. :)

तुम्हाला कोणालाही असे संदेश आले आहेत का?

एप्रिल ३०, २००९

'जर तुम्ही मतदान केले नसेल तर तुम्हाला सरकारला काही बोलण्याचा हक्क नाही', अशा आशयाचे वाक्य सिनेमात/इतरत्र भरपूर वेळा ऐकले होते, पटतही होते. जरी गेले काही वर्षे मी मतदान करावेच ह्या मतावर होतो तरी सध्याच्या परिस्थितीत वाटत होते की मतदान करावे की नाही?

खरंतर ह्याच्या कारणाचाही उहापोह करणे गरजेचे नाही तरीही प्रश्न पडतात ते असे:
मी मोठ्या दोन पक्षांपैकी एकाला मतदान केले तर त्या दोन्हींनी एवढा काही चांगला विकास घडवून आणला नाही. नकारात्मक गोष्टीच जास्त दिसतात. मग त्यांना का मत द्यावे?
इतर काही पक्षांना मत दिले तरी बहुमताने जिंकण्याएवढी मते त्यांना मिळणार नाही ही सध्याची तरी परिस्थिती वाटते. त्यामुळे पुन्हा एक ना धड भाराभार चिंध्या असला काही तरी प्रकार. मग त्यांना का मत द्यावे?
मत नाही द्यायचे तर मतदानाची टक्केवारी घसरणार. तरी जेवढ्यांनी मते दिली त्यावरच निवड ठरविली जाणार. त्यामुळे माझे मतदान न करणे वाया गेले. त्यामुळे कोणालातरी मतदान करावेच. 'कोणीही नाही' ह्याचा वापर अजून तरी चालू झाला नाही.



आता मतदान करायचे ठरवले तर पुन्हा कोणाला मत द्यावे? पक्षाला की माझ्या भागातील उमेदवाराला? एवढे पक्ष आहेत त्यात कोणाला? दोन पक्षांत काम होऊ शकत नाही का?
पक्षाला मत दिले पण त्यांचा माझ्या भागातील उमेदवार मला वाटतो तेवढा कार्यक्षम नसेल तर?
एखाद्या कार्यक्षम उमेदवाराला मत दिले पण तो किंवा त्याचा पक्ष निवडून नाही आला तर? पुन्हा आपल्या उपयोगाचे काही नाही झाले तर?
माझा उमेदवार निवडून आला पण त्याने नंतर पक्ष बदलला तर?

अर्थात ह्याबाबतीत जेवढा विचार करावा तेवढा कमीच. त्यापेक्षा मतदान करावेच. मग तो कोणीही असो पण त्यापैकी चांगला. कारण सध्या पर्याय नाही. मागील आठवड्यात मित्राशी बोलताना असेच विचार मनात आले. वाटले अमेरीकेत बरे आहे दोनच पक्ष आहेत (नेहमी अमेरीका/इंग्लंड ह्यांच्याशी तुलना करायची सवय झाली आहे ;) ) पण तिथेही परिस्थिती एवढी चांगली नाही असे म्हणतात. दोघेही उमेदवार चांगलेच असतील असे नाही. तेव्हाच मनात विचार आला, कोणी का असेना एकाला निवडून आणा. मग त्याच्या डोक्यावर बसून कामे करवून घ्या. तसलाच प्रकार इथे केला पाहिजे. त्यातल्या त्यात चांगला निवडा. मग तो मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा असो, नवीनच बनलेल्या पक्षाचा असो, की अपक्ष असो. कारण प्रत्येक उमेदवार आपल्याला आवडेलच असे नसते. तसेच आपण ज्याला मत दिले निवडूनच येईल ह्याची खात्री नाही. पण त्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे तो पुढे आणखी चांगले काम करण्याची अपेक्षा तर बाळगू शकतो. नाही केले तर त्यांनाही पाडण्याचा अधिकार आपल्यालाच आहे. आणि तसे म्हणायला गेलो तर ही सुद्धा एक लॉटरीच आहे.

कालपर्यंत आपल्या भागातील उमेदवारांची यादी मी येथे पाहिली. त्यात जेवढे समजेल त्यावरून आणि बातम्यांमधील त्यांच्याबाबतचे ऐकून/वाचून विचार केला आणि मी ही ह्या लॉटरीत भाग घेत सकाळीच मतदान करून आलो.

एप्रिल २१, २००९

ह्या आधीचे: भटकंती (ठाणे ते शेगाव)



शेगावला पोहोचल्यानंतर पहिले गेलो ते भक्त निवास क्र. ५ कडे. भक्त निवास क्र. ३ ते ६ हे चार बाजूंना बांधून मध्ये मोकळी जागा ठेवली आहे. तिथूनच आनंद सागर करीता शेगाव संस्थानाचा बस थांबा आहे. त्या थांब्यावर खूप मोठी रांग होती. एकंदरीत अंदाज आला होता की आनंदसागरला काहीतरी चांगले आहे. मित्राने आधीच सांगून ठेवले होते की आनंद सागर नक्की पहा म्हणून. भक्त निवासाच्या कार्यालयात गेलो तर तेथेही रांग होती(त्याची अपेक्षा होतीच). एका कार्यकर्त्याने सांगितले,'रांगेत रहा. जसजसे खोल्या रिकाम्या होतील, एकेकाला आम्ही त्या उपलब्ध करून देऊ.' कागद पाहिला. ५ क्रमांकाच्या निवासस्थानात पूर्ण वातानुकूलीत खोल्या. इतर मध्ये ३/४ लोकांकरीता मिळून सोय. काहींमध्ये खोलीतच बाथरूम, काहींना बाहेरचे. नाहीतरी १ तास गेला असताच आणि बाहेरील हॉटेलमधील खोल्यांचे भावही जवळपास तेवढेच, त्यामुळे बाहेरच खोली पाहण्याचे ठरविले. अर्धा एक तासाच्या शोधानंतर (त्यात भक्त निवास १ व २ ही आलेत. पण तिथेही जागा नव्हती)एका हॉटेलमध्ये खोली पक्की केली, सामान उतरविले व आराम केला.

आईने सांगितले, 'मी आनंदसागर बघितले आहे व तसेच तिकडे भरपूर चालणे मला जमणार नाही." ते रात्री ८ वाजेपर्यंत चालू असते व मंदीर १०:३० पर्यंत. त्यामुळे मी बायकोसोबत आनंदसागरला जायला निघालो. गाडीत बघितले तर ड्रायव्हर गाढ झोपला होता. त्याला न उठवता एक रिक्षा पकडून आम्ही निघालो तेव्हा साधारण ५ वाजत आले होते. जाताना आसपास पाहिले तर मंदिराच्या आसपास ज्याप्रकारे दुकाने/हॉटेल आहेत त्या मानाने गाव तेवढे विकसित नाही वाटले. एखाद्या लहानशा खेडेगावातच फिरत आहे असे वाटले. आनंदसागरला पोहोचता पोहोचता रस्त्यात आणखी एक भक्त निवास दिसले.



तिथून थोडेच पुढे गेल्यावर आनंद सागरचा फलक पाहिला. त्याचे आणि आसपासचे फोटो.



प्रवेश तिकिटाकरीता ३/४ खिडक्या होत्या. बहुधा मंदिरात काही दान दिल्याची पावती दिल्यास तिकीट फुकट होते. मी सध्या तरी काही दिले नसल्याने पैसे देउन तिकीट घेतले व आत गेलो. तिकिटावर पाहिले तर मी दिलेले पैसेही देणगी स्वरूपातच स्विकारले असल्याची पावती होती व प्रवेशाची तिकिटे तशीच दिली होती.



आत फिरता फिरताच पाहिले सुरूवातीलाच गोलाकार परीसरात वेगवेगळ्या संत/महापुरूषांचे पुतळे मांडून ठेवले आहेत. सर्व पाहिलेही नाहीत आणि जेवढे होते त्यातील एक हा.



एका ठिकाणी आनंदसागर मध्ये फेरफटका मारण्यासाठी एका लहानशा रेल्वेगाडीकरीता रांग पाहिली. आसपास मस्त झाडे लावली आहेत बाग बनविली आहे. त्या भव्य परिसराचे वर्णन जमत नाही आहे. ह्या काढलेल्या प्रकाशचित्रांवरून अंदाज घेता येईल. एका झाडावर हे निळे पक्षी दिसले म्हणून जवळून पाहायला गेलो (ते खोटे होते :)). त्यांचे चित्र घेत असतानाच चुक् चुक् असा आवाज आला तर पाहिले त्याच झाडाच्या दुसर्‍या फांद्यांवर ३/४ खारी फिरत होत्या.


हे मंदिर पिसाच्या मनोर्‍याप्रमाणे तिरके वाटत आहे, पण तो बहुधा माझ्या हातांचा प्रताप आहे ;)


त्याच्याच आसपास असलेले मुनीवर्य.(ह्यांचे नाव मला कळले नाही)


आसपास कुठेतरी मत्स्यालयही आहे असे फलकावर वाचले. डाव्या ठिकाणी मोठे उपहारगृह होते. त्याच फलकावर वाचले की ध्यानकेंद्रही आहे. पण त्याची बंद होण्याची वेळ ६:३० होती. कन्याकुमारीला विवेकानंदांचे स्मारक पाहिले होते. तिथल्या ध्यान केंद्राचा अनुभव होता. त्यामुळे असेल पण माझा तिकडे जाण्याकडे जास्त कल होता. पण वाटले थोडा वेळ आहे, इतर गोष्टी पाहून घेउया. एका ठिकाणी पक्षांचा मोठमोठ्याने आवाज ऐकला. काय आहे पहायला म्हणून आम्ही तिकडे जायला निघालो. तलावावरून जाणारा एक पूल बनविला होता. तिकडे जाता जाता कळले, त्यांनी ध्वनीक्षेपकावर प्राण्यांचे व पक्ष्यांचे आवाज लावून ठेवले आहेत. ते बहुधा लोकांना आकर्षित करण्याकरीता असेल पण त्याचे नेमके प्रयोजन नाही कळले. लाकडी पुलावरून पुढे गेल्यावर पाहिले तिथे लहानशे उपहार केंद्रही बनविले आहे. तसेच झाडांच्या आसपास बसण्यास व फिरण्यास जागा बनविली आहे.





तिकडुनच पाहिले ध्यानकेंद्र समोरच दिसत आहे, पण त्याकरीता तलाव पार करून जायचे आहे. वाटले बोटीने जाता येत असेल. विचारणा केली तर सांगण्यात आले की आम्ही आलो त्याच लाकडी पुलावरूनपरत जाऊन तिकडून उजवीकडे तलावाला फेरी मारून चालत जायचे आहे. तेथील चौकीदाराने सांगितले, प्रवेश ६:१५ ला बंद होतो. म्हणून मग लगेच तलावाला फेरी मारायला तयार झालो. बायकोने थोड्या वेळापूर्वी विचारले होते की ती ट्रेन नाही दिसली असून. उजवीकडे वळतानाच ती ट्रेन जाताना दिसली.


वरील फोटोतील उजवीकडे असलेल्या पूलाच्या पलिकडे आम्ही गेलो होतो. तिकडुन मागे फिरून (फोटोत घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने) डावीकडील रस्त्याने फिरत फोटोतील मध्यभागी वर असलेल्या ध्यानकेंद्रात जायचे होते. मग काय चालत निघालो दोघेही.

फिरत जाईपर्यंत १५/२० मिनिटे लागली असतील. पण आसपासचा देखावा मस्त होता. ह्या तलावाबद्दल माझ्या मित्राने सांगितले की ३०० कोटी रूपये खर्च करून हा कृत्रिम तलाव बनविला आहे. एका ठिकाणी चांगलेही वाटत होते पण त्याच वेळेला थोडेसे वाईटही वाटत होते की गावातल्या लोकांकरीता ह्याचा जास्त उपयोग होत असेल का? गावातील आणि मंदिर परिसरातील विसंगती फार खटकत होती.
तर चालत चालत आम्ही पोहोचलो ध्यानकेंद्राजवळ. तिथे पोहोचताच एका कार्यकर्त्याने आमच्या समोर फलक धरला. "ध्यानकेंद्र परिसरात शांतता राखा. मोबाईल बंद ठेवा..." येणार्‍या प्रत्येक माणसाला फलक दाखवण्याची युक्ती मला आवडली. कारण जर प्रवेशद्वाराजवळ हा फलक ठोकून ठेवला तर किती लोक तो नीट पाहतात ह्याची शंका असेल. त्यामुळे प्रत्येकाने तो पाहणे ह्यासाठी, तसेच येणार्‍याने फलक वाचून ते पाळायचा होकार दिला तरच आत प्रवेश देत असतील असे माझे मत झाले. :)


आत जाता जाता आसपासच्या परीसराचे फोटो काढले. केंद्राजवळ गेल्यावर एका कार्यकर्त्याने डावीकडे असलेल्या पायर्‍यांकडे बोट दाखविले. अर्थात आम्हाला आधी तिकडे जायचे होते. पायर्‍या चढून वर गेलो. तर मध्यभागी एक मंदिरासारखे बनवून त्यात रामकृष्ण परमहंस ह्यांचा पुतळा ठेवला होता. त्याचा फोटो काढण्यास एकाला मनाई करण्यात आली होती. मग मी प्रयत्न केला नाही ;)

खाली उतरल्यानंतर मुख्य केंद्रात जाण्याकरीता उभे राहिलो. तिथे एका कार्यकर्त्याने पुन्हा तो फलक दाखविला. मी मोबाईल फोन दाखवून खूण केली की हा बंदच आहे. आत गेल्यावर पाहिले, उजव्या बाजूला स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस ह्यांचे फोटो ठेवले होते (आणखी एक फोटो कोणाचा ते आठवत नाही) आणि त्यांवर प्रकाशझोत पाडला होता. एकदम शांत जागा. आम्ही थोडा वेळ आत बसलो. कन्याकुमारीच्या ध्यानकेंद्रात ॐ चा जप चालू होता. पण इथे पूर्ण शांतता होती. त्या शांततेत डोळे बंद करून एकाग्र होण्याचा प्रयत्न केला. तेव्हा लक्षात आले की मनात किती विचार चालू आहेत. साधारण १५ मिनिटे तिकडे मन शांत करायचा प्रयत्न केला. (पण अशा गोष्टी १५ मिनिटांत साध्य होत नाहीत. असो.) बाहेर आलो तर सूर्य नुकताच मावळत होता. थोड्यावेळ तिकडेच बसलो. चपला बूट घेण्यासाठी आलेल्या माणसांपैकी २-३ जण बूट घेतल्यावर जमीनीवर आपटून टाकत होते. वाटले ह्या लोकांना शहाणपणा नाहीच आहे. शांतता पाळायला सांगूनही स्वतःच्या मजेकरीता काहीही करतात.

तिकडून परत निघालो. आता लक्ष्य होते, संगीत कारंजे. मैसूरचे वृंदावन गार्डन व औरंगाबादमधील पैठणच्या बागेतील संगीत कारंजे पाहिले असल्याने ह्याबाबत जास्त आकर्षण नव्हते. तरी आहे तर पाहून घेऊया म्हणून तिकडे गेलो. त्याची व्यवस्था मोठी होती. कारंज्यांसमोर अर्धगोलाकृती आकारात उतरत्या हिरवळीवर बसण्याची सोय केली आहे. संगीत व कारंजे ह्यांचा जास्त मेळ दिसत नव्हता. तरी न बघण्यासारखे ते वाईट वाटले नाही.

तो कार्यक्रमही १५ मिनिटांचा होता. तो आटपून परत निघायला ७:५० झाले होते. त्यामुळे आम्ही परत जायला निघालो. रस्त्यात पाहिले सुरूवातीच्या प्रवेशाद्वारातून चंद्र दिसत आहे. तसेच पुढे एक आगळावेगळा फलक पाहिला.


बाहेर पाहिले तर मस्त गर्दी दिसत होती, बस व रिक्षा दोन्हींकरीता. आम्ही मग रिक्षाने परत आलो. परत आल्यानंतर आईसोबत मंदिरात दर्शनाला गेलो. तिकडूनच मग जेवायला बाहेरच्या हॉटेलमध्ये गेलो. ड्रायव्हर म्हणाला की तो दुपारी मंदिराजवळच्या एका हॉटेलमध्ये जेवला होता. त्याने सांगितले की जेवण एवढे चांगले नाही. पण तोपर्यंत जवळपास ११ वाजले होते. त्यामुळे हॉटेल शोधावे लागणार होते. तेव्हा आठवले की परत येताना रिक्षाचालकाने शिवाजी चौकातील एका हॉटेलमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. म्हणाला ह्या भागात सर्वात चांगले हॉटेल आहे. त्या हॉटेलचा शोध घेऊन मग तिथे जेवण केले. पण तिकडील परिस्थिती त्याने सांगितल्याएवढी चांगली नव्हती. वाटले हे जर चांगले हॉटेल आहे तर बाकीचे कसे असतील? ;)

(क्रमशः)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter