डिसेंबर ०७, २०११गेल्या आठवड्यात मित्रासोबत 'पिझ्झा हट्' मध्ये खाण्यास गेलो होतो. (साधारणत: चायनीज आणि पिझ्झा मध्ये एक अनुभवतो की खाताना पोट भरल्यासारखे वाटते पण एक दीड तासातच भूक लागते. :) ) असो. तर तिथे बिल मागितल्यावर पाहिले तर खालील प्रमाणे होते.पदार्थः रू. ३२२.००
सेवा (१०%): रू. ३२.२०
कर (१२.५० %)  : रू १४.०९
कर (२०.० %) : रू. २८.९०
एकूण : रू. ३९७

ह्यात एकतर त्यांनी सेवा मूल्य, मूल्यवर्धित कर आणि नुसताच एक कर असे मिळून ३ प्रकारे जादा पैसे लावले होते. मी त्याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की सरकारकडून हे कर घेण्यास सांगितले आहे. पण त्याबाबत काही सबळ माहिती त्यांच्याकडे नव्हती. अर्थात ते कमी करणार नाहीतच, आणि माझ्याकडेही जास्त वेळ नव्हता, म्हणून तेवढे पैसे देऊन निघून आलो.

प्रथमदर्शनी ते १०+१२.५+२० = ४२.५% वाटत होते. म्हटले ४०/५० टक्के छुपा अधिभार? चला वॅट काढला, तरी ३०%. म्हणजे लूटालूटच.

आता पुन्हा नीट पाहिले असता, एकूण ४२ टक्के जास्त नाहीत. २३% होतात
तरी त्यांचे गणित मला कळले नाही. कोणी समजावून सांगेल का?

१४.०९ हे ह्यात कशाचे १२.५% होतात?
२८.९० हे ह्यात कशाचे २०% होतात?
आणि सर्वात मोठे गणित..
अशा खाद्यपदार्थांवर नेमके किती टक्के कर द्यायचा असतो आणि ह्यात काय काय ग्राह्य धरावे?
(बोर्नविटा वाले शास्त्रात आणि पिझ्झा हट् वाले गणितात गोंधळवत आहेत.)

डिसेंबर ०४, २०११
तुम्ही बोर्नविटाची नवीन जाहिरात पाहिली आहे का? दूधातून कॅल्शियम खेचण्याकरीता 'ड जीवनसत्व' लागते, जे बोर्नविटा मध्ये आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

http://www.cadburyindia.com/in/en/Brands/Pages/videoplayer.aspx?vid=1734

एक तर त्रासिक जाहिरात, तीन तीन वेळा तिचे विचारणे, "कॅल्शियम करीता काय करतेस?", हावभाव गंमतीशीर (चांगले नाही !!!)

आणि दुसरी गंमत (?) आमच्या शालेय शिक्षणातील अभ्यासाप्रमाणे जी काही माहिती आहे त्याप्रमाणे दुधात कॅल्शियम आणि  'ड जीवनसत्व' आधीपासूनच असते. मग वेगळे 'ड जीवनसत्व' कशाला?

बोर्नविटा आणि दूध कॅल्शियम करीता रस्सीखेच करायला लागले तर पिणार्‍याला ते मिळेल का? :)
हो, 'दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ' हे म्हणणे इथे लागू होऊ शकते का? ;)


ऑक्टोबर ०७, २०११

काल कोपिणेश्वर मंदिराच्या जवळ एका संस्थेचा देवी महोत्सव संपला, त्यानंतर देवीला घेऊन जाताना जे संगीत लावले होते त्याने छातीही धडकत होती. सुतळी बाँबपेक्षाही जास्त आवाज, म्हणजे किमान १३० डेसिबल्सच्यावरती आवाज असेल. ह्या कार्यक्रमाला बहुधा काही पोलिस अधिकारीही पाहुणे आले होते.  म्हणजे त्यांची उपस्थितीही त्याप्रकारची वाटली.

पुढे गोखले रोडवरही देवीची एक मिरवणूक येत होती, त्याचा आवाजही जबरदस्त. आणि गाणे कोणते लावले होते? तर शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला मधील "We are the Bhai" हे गाणे.

आणि ह्या लोकांकरीता आपण गर्दी, वाहतूक खोळंबा आणि इतर त्रास सहन करायचे.

धन्य ते नियम, धन्य ते नियम पालन आणि धन्य ती देवीभक्ती.

सप्टेंबर ०५, २०११


माजिवडा उड्डाणपूलापासून कल्याणकडे जाणारा महा(?)मार्ग. उजवीकडे वळल्यानंतर साधारण २०० मीटर अंतरापासूनच गाड्या खोळंबलेल्या दिसल्या. घरातून निघताना ठरवले होते की जास्त गर्दी असली तर अर्ध्या रस्त्यातूनच परत निघायचे. तसेच काहीतरी होईलसे वाटत होते. कार्यालयाच्या रस्त्यावर, घराच्या आसपास, आणि इतरत्र रस्त्यांची हालत तर पाहूनच आहे, त्यामुळे खोळंब्याचे कारण तर लक्षात आले होतेच. हळू हळू करत (पण किती ते हळू? १ मीटर जाऊन २ मिनिटे थांबायचे?) पुढे जात होतो. साकेत च्या समोरील पुलावर पोहोचेपर्यंत रस्ता एकदम चांगला तर नाहीच, पण त्या पुलाजवळ पोहोचल्यावर कळले की ह्याला रस्ता म्हणून घेण्याची लायकीच नाही. समुद्रामध्ये बोट कधी हेलकावे खात असते त्याच प्रकारे कार हेलकावे खात होती. साधारण अर्धा ते एक किलोमीटरचा रस्ता हा असाच. २ किमी चा रस्ता पार करायला १:४५ तास? टोलनाक्यावर कोणी टोल भरलाच नाही. पुढे कल्याण फाट्यापर्यंत तसा चांगला रस्ता. पुन्हा मग कल्याणमधील खड्ड्यांच्या समुद्रात शिरलो. परत येताना टोल भरणार नाही असे वाटले होते पण भरावा लागला.

ह्यावर्षी हे अतीच झालेय. की अजून बाकी आहे?. एकही रस्ता, मोठा रस्ता सोडा, गल्लीगल्लीसुद्धा नीट नाही आहे.

'अ' चे पालिकेत राज्य आहे तर 'ब' हा विरोधी पक्ष कधी तरी बोलतो. तेच 'ब' चे दुसरी कडे राज्य आहे तर 'अ' हा त्या विरुद्ध बोलतोय असे मध्ये वाचले होते. पण स्वत:च्या पालिका हद्दीत काही सुधारणा नाही. आता तर ती बोंबाबोंबही बंद आहे.

गणेशोत्सवात सगळीकडे गणपतीच्या स्वागताचे स्वत:च्या नावाचे पोस्टर लावून ठेवलेत ते ही त्याच खड्ड्यांच्या समोर. हे खड्डे आम्ही बनविलेत असे तर नाही सांगत ना ते?

केंद्र/राज्य सरकार मधील कॉंग्रेसला ला शिव्या घालूत असू पण महानगरपालिकेत तर शिवसेना आहे. ते ही तर काहीच नाही करत आहेत. नवनिर्माण करणारेही गायब झालेत. त्यामुळे जरी एकाच्या विरोधात गेलो तरी दुसऱ्याचा फायदा नाहीच. आणि हे सुद्धा फेब्रुवारी २०१२ च्या महानगरपालिका निवडणूका तोंडावर असताना. गंमत आहे ना?

भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत थोडे फार तथाकथित यश मिळाले असेल (हो तथाकथितच. ते नंतर कधीतरी) पण आधी खड्डा विरोधी मोहिम सुरु करून तिला यश मिळवून दिले पाहिजे असेच वाटते.

ऑगस्ट ३१, २०११

रिलायंस मार्ट मध्ये पाहिलेली खास किंमत.

६० रु च्या पेनची त्यांची किंमत ७० रु.


१२५ रु च्या पेनाची त्यांची किंमत १५०रु.


ईद-गणपतीनिमित्त मोठ्ठा सेल? :)

ह्याबाबत त्यांना विचारणार होतो.. पण त्यानंतर फिरता फिरता विसरून गेलो. 

ऑगस्ट १६, २०११

अण्णा हजारे, अरविंद केजरिवाल पोलिसांच्या ताब्यात

अण्णांना दिल्ली पोलिसांकडून अटक
http://www.esakal.com/esakal/20110816/5432610138584984183.htm

दडपशाहीचे राजकारण करणार्‍या हुकुमशहा काँग्रेस सरकारचा निषेध...

महात्मा गांधींच्या तत्त्वांचे पालन करण्याचा दिखावा करणारे हे लोक स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच गांधींच्या उपोषण ह्या हत्याराच्या विरोधातच बोलतात आणि दुसर्‍याच दिवशी हा प्रकार....

इतर वेळी काहीही कारणांनी अपमान वाटणार्‍यांना हा गांधींचा अपमान वाटत नाही का?

ऑगस्ट ०३, २०११


वसंत पुरूषोत्तम काळे उर्फ वपु. ह्यांची पुस्तके कधीपासून वाचायला लागलो आठवत नाही. त्यांच्या कथाकथनाबद्दलही लहानपणी जास्त माहीत नव्हते. पण जेव्हापासुन ऐकले/वाचले, त्यांचे लेखन भरपूर आवडत गेले. वेगवेगळ्या विचारसरणीच्या आपल्यासारख्या सामान्य माणसांचे दर्शन त्यांच्या लेखनातून मिळते गेले. मला कसे वाटले? अप्रतिम. आणखी शब्द पाहिजे असतील तर त्यांच्याच पुस्तकातून शोधावी लागतील ;)

त्यांचे 'वपुर्झा' पुस्तक वाचूनच वाटले की जर त्यांच्या ह्या एका पुस्ज्यात,(ज्यात त्यांच्या इतर पुस्तकांतील काहीच परिच्छेद, विचार दिलेत) जर असे चांगले लेखन आहे, तर पूर्ण साहित्य किती अफाट असेल. हळू हळू एक एक पुस्तक वाचत गेलो. तसेच संग्रही जमा करत गेलो. आजच्या घडीला त्यांची ३१ पुस्तके संग्रही आहेत. बाकीची पुस्तके ही लवकरच घेईन.

सध्या माझ्याकडे असलेली पुस्तके:
चिअर्स
भुलभुलैय्या
निमित्त
आपण सारे अर्जुन
कर्मचारी
घर हरविलेली माणसं
मायाबाजार
काही खरं काही खोटं
सखी
मोडेन पण वाकणार नाही
प्रेममयी
रंग मनाचे
हुंकार
बाई बायको आणि कॅलेंडर
वपुर्झा
चतुर्भुज
गुलमोहर
वपु यांची माणसं
वपुर्वाई

इंटिमेट
पार्टनर
संवादिनी
ऐक सखे
गोष्ट हातातली होती
ठिकरी
नवरा म्हणावा आपला
तप्तपदी
फँटसी एक प्रेयसी
रंगपंचमी
मी माणूस शोधतोय
वपु ८५

पुढील यादीतील पुस्तके:
कथा कथनाची कथा
महोत्सव
झोपाळा
माझं माझ्यापाशी
तू भ्रमत आहासी वाया
वन फॉर द रोड
दुनिया तुला विसरेल
वलय
दोस्त
सांगे वडिलांची कीर्ती
पाणपोई
स्वर
प्लेझर बॉक्स १
ही वाट एकटीची
प्लेझर बॉक्स २
का रे भुललासी

ह्यात त्यांचे एखादे पुस्तक सुटले असल्यास मला सांगावे, ते ही यादीत जोडेन. :)

जुलै २९, २०११


 गेले २ दिवस एवढा पाऊस पडतोय. सकाळी उठलो तेव्हा वाटले नव्हते की जोरात पाऊस पडत आहे. पण कार्यालयात जाता जाता जोरात पाऊस पडत होता. त्यामुळे दुचाकीवरून जातान वेगळा त्रास तर होताच. त्यात महानगरपालिकेच्या कृपेने जागोजागी खड्डे तर आहेतच. दुचाकीवरून जायचे म्हणजे आपण लोक तर डावीकडची बाजू पकडून ठेवणार. पण नेमके त्या बाजूला पाणी जमा झालेले असते. मधून जायचे म्हटले तर सांभाळूनच जावे लागते आणि पुन्हा खड्डा असला तर आणखी वैताग. आज संध्याकाळी परत येताना पुन्हा जोरात पाऊस सुरू झाला. अंधार पडलेला आणि जोरदार पाऊस.

 

मग मि. नटवरलाल चित्रपटातील शेवटच्या भागातील अमिताभच्या युक्तीप्रमाणेच जायचे ठरविले. किंवा ते करायचे म्हटले आणि मि. नटवरलाल चित्रपट आठवला असे म्हणणे जास्त बरोबर असेल.

जाणे आहे ते डावीकडूनच. पाण्यामुळे खड्डा कळला नाही तर बोंब. नटवर कसा विक्रमच्या पावलांच्या ठशांवर पाय ठेवून बाँबच्या खटक्यापर्यंत पोहोचतो... तसेच. पुढे जाणार्‍या दुचाकीच्या मागेच जायचे. पुढच्याला खड्डा लागला की आपण सावरून जायचे. मध्येच कुठले तरी व्यंगचित्र आठवले. त्यात म्हटल्याप्रमाणे "रस्त्यांवर भरपूर खड्डे झाल्याने गाड्यांकरीता उड्डाणपूल बांधलेत. पण उड्डाणपूलावरच खड्डे पडलेत आता काय?" त्याप्रमाणे आज ऐरोली आणि तीन हात नाक्यावरील पुलांवर सुद्धा खड्डे पाहिले. ते खड्डे खोल होऊन वरून एखादी दुचाकी खालील गाडीवर लँड होवो त्या आधी पाऊस तरी थांबावा आणि/किंवा महानगरपालिकेला खड्डे बुजविण्याची आठवण देवो.

जुलै २८, २०११
भारतातील पहिले आणि एकमेव मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय लोणावळ्यात आहे आहे असे ऐकले होते. पुण्याला जाताना रस्त्यावरच आहे असेही कळले. रस्त्यातच (म्हणजे एकदम रस्त्यावर नव्हे... मुंबई-पुणे रस्त्यावर. पण हो रस्त्यावरच आहे. जुन्या महामार्गावरून जातानाच दिसते) खास आडवळणात जायची गरज नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर त्याचे फलकही लावलेले पाहिले. पण लोणावळा आल्यावरही नेमके कुठे वळायचे ते नाही लिहिले त्यांनी फलकावर. माझ्या बायकोला ते ठिकाण माहीत असल्याने तिने सांगितले की लोणावळ्यातून जुन्या महामार्गावर वळू. म्हटले जाता जाता एक चक्कर मारू. पाहिले तर चक्कर मारण्याइतकेच ते लहान आहे :) प्रत्येकी १०० रू. चे तिकीट काढून आत गेलो.

आत गेल्यावर पहिलाच पुतळा एकदम मस्त वाटला. बालाजी तांबे ह्यांचा. दोन तीन जणांच्या मध्ये तो पुतळा म्हणजे खरोखरच कोणीतरी उभे आहे असे वाटत होते. म्हटले चला काहीतरी खरोखर चांगले आहे.

बाजूलाच महात्मा गांधींचा पुतळा. पंडित नेहरू. मग राजीव गांधी.डावीकडे शिवाजी महाराजांच्या पुतळयाजवळ गर्दी होती म्हणून सरळ पुढे सरकलो.
आतल्या खोलीत गेल्यावर उजवीकडे कोणाचा पुतळा ओळखता आला नाही. नाव वाचले तर छगन भुजबळ. बाहेर गांधी, नेहरू ह्यांचे पुतळे पाहून ह्यांचे पुतळे असणारच म्हणून वेगळे काही वाटले नाही. पण छगन भुजबळ ह्यांचा पुतळा पाहून लगेच म्हटले, "पूर्ण काँग्रेसप्रणित संग्रहालय आहे हे".
आणि खरोखरच भरपूर नेत्यांचेच पुतळे दिसले. तेही दक्षिण भारतातील. असो बा, पण ज्यांची नावे कधी ऐकलीही नव्हती त्यांचे पुतळे पाहून राजकारण किती प्रभावशाली आहे ते दिसले. आता प्रत्येकाचे नाव सांगत बसत नाही. जे ओळखता येतात त्यांचे नाव सांगायची गरज नाही आणि जे ओळखता येत नाहीत त्यांची नावे मलाही माहित नाहीत/आठवत नाहीत. जास्त माहिती त्यांच्या संकेतस्थळावर आहे.

तुम्हीच पहा त्याची (मी काढलेली) प्रकाशचित्रे :)लास वेगस मधील वॅक्स म्युझिअम च्या मानाने भरपूर कमी पुतळे होते. दर्जाचा मी विचार करत नाही आहे. पुतळ्याला हात लावू नये अशी सूचना आत गेल्या गेल्याच मिळाली होती. पण तिथली स्वच्छता आणि पुतळ्यांच्या आसपासची पाहून थोडासा प्रश्न पडला, की हे जास्त काळ टिकेल का?. :(
नेते लोकांचा प्रभाव पाहून थोडा हिरमुसला झालो, पण एकंदरीत पुतळे सरासरीत चांगले वाटले.  

जुलै १४, २०११

काल मुंबईमध्ये बाँबस्फोट झाले,सरकारने लगेच मोठमोठ्या शहरात हाय अलर्ट घोषित केला.


ह्याचा अर्थ काय?

माझ्या मते भारतीय हाय अलर्ट म्हणजे, सामान्य माणसाला होणार्‍या त्रासात आणि नेत्यांच्या सुरक्षेत आणखी वाढ .

नाही तर काय? बाँबस्फोटानंतर काल रात्री, आज सकाळी, पुन्हा आता रात्री मी तरी काही फरक नाही पाहिला. अंधेरी ते ठाणे ह्या रस्त्यावर कुठेही हाय अलर्टची काही चाहूल नव्हती. हो, जिथे बाँबस्फोट झाले त्या भागात वाढविली असेल सुरक्षा. त्या भागात लोकांना जाण्यास मनाई केली आहे असे ऐकले. एक तर तिकडचे पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून आणि दुसरे म्हणजे ते मंत्री लोक जातील ना त्या जागांना भेट द्यायला. मग त्यांना काही झाले तर? आणि ही वाढीव सुरक्षा फक्त २ दिवस जास्तीत जास्त १०.

अशा वेळी बहुतेक करून गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढविली जाते म्हणतात. म्हणजे आधीच लोकांना गर्दीमुळे उशीर होत असतो, त्यात सुरक्षा म्हणून करण्याच्या चाचपणीचा देखावा केला जातो असेच वाटते. तुम्ही म्हणाल, 'पुढे तिथे बाँब फुटला तर परत मी त्यांनाच शिव्या घालणार'. जर ती चाचपणी नीट होत असेल तरी झाले तर नाही शिव्या घालणार. पण आधीच म्हटल्याप्रमाणे तो मला देखावाच वाटतो. २००५ की ०६ मध्ये मुंबईत रेल्वे स्थानकांवर धातू शोधक (मेटल डिटेक्टर) यंत्रणा लावणार होते. त्याची प्राथमिक चाचणी करण्याकरीता पहिले स्थानक कोणते निवडले तर मुंबई सीएसटी. अरे, तुम्हाला चाचणी करायची आहे ना मग थेट सर्वात जास्त गर्दी असलेल्या स्थानकावर का? कमी गर्दीच्या स्थानकांवर करा ना? तिकडे गोंधळ झाला तो होणारच होता.

आणि मग समजा एखाद्याकडे आढळली बंदूक तर काय करणार? मॉलमध्ये वगैरे जेव्हा मेटल डिटेक्टर वगैरे पाहतो तेव्हा 'मॅट्रीक्स' सिनेमातील प्रसंग आठवतो. त्यात शेवटी दोघांना सुरक्षा अधिकारी विचारतो. 'काही आहे?' म्हणून. निओ लगेच जॅकेट उघडून दाखवतो, आणि धाड धाड गोळीबार सुरू.... तसेच जर खरोखरच एखादा आला तर काय फरक पडणार आहे त्या मेटल डिटेक्टरचा? आणि बहुधा प्रत्यक्षात तसे सीएसटी स्थानकावरच २००८ मध्ये कसाब आणि त्याच्या साथीदारांनी करून दाखविले.

हे जरा थेट शस्त्रास्त्रे घेऊन हल्ला करण्याबद्दल झाले .

पण आजचेच उदाहरण घ्या ना. मी वर म्हटले तसे मला रस्त्यात कुठेही सुरक्षा वाढविल्यासारखे वाटले नाही. वाढल्यासारखे सोडा, काही बदल असल्याचेही जाणवले नाही.कार्यालयाच्या संकुलात शिरताना ओळखपत्र दाखविल्याशिवाय जाऊ देणार नाही असा नियम आहे. पण माझा सहकारी सांगत होता की दुचाकीवरून आला तेव्हा त्याला ओळखपत्राबद्दल विचारले. पाऊस पडत होता म्हणून ते आत ठेवले होते. त्याला थांबविले आणि ते दाखवण्यास सांगितले. तो रेनकोट काढून खिशातून कार्ड बाहेर काढणार त्या आधीच विचारणा झाली, आहे ना? ठीक आहे जा. ओळख न दाखवता आत जाता येणं शक्य आहे.

असेच माझ्यासोबतही झाले होते. २००६ मध्ये बँगलोरच्या आयटीपीएल मध्ये बाँब असल्याचा फोन आला. त्यामुळे मग आम्हाला कार्यालयांतून बाहेर काढण्यात आले. सर्वत्र चाचणी केली. बेसमेंट मध्ये बाँब असेल अशी शक्यता होती. आम्हाला घरी पाठविण्यात आले. खरे तर तिथेही ओळखपत्र दाखविल्याशिवाय आत जाऊ देत नाहीत. पण दुसर्‍या दिवशी, दुसर्‍याच दिवशी सकाळी मी ओळखपत्र दाखविल्याशिवाय आत गेलो होतो.

वरील दोन उदाहरणांतून हेच सांगायचे आहे की इतर वेळी तर असे दुर्लक्ष देणे घडत असतेच, पण काहीतरी खरोखरच घडले आहे तरी त्यांना त्याचे गांभीर्य वाटत नव्हते.

तसेच, अजून एक. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. २००९ मध्ये अमेरिकेत जाण्याकरीता रात्री विमानतळावर पोहोचलो. आई आणि बायको Guest Areaमध्ये थांबले होते. मी चेक-इन करून त्यांच्याशी बोलायला परत आलो. प्रवासी आणि पाहुणे ह्यांच्याकरीता विभागलेल्य त्या भागात लोखंडी/स्टीलच्या खांबांचे होते. पण ते दोघे एकदम दुसर्‍या टोकाला होते. यायला वेळ लागला असता. जुन्या अनुभवाप्रमाणे बोर्डींग पास मिळाल्यावर आपण बाहेर येऊ शकत होतो. म्हणून मी तिकडील सुरक्षा पोलिसाला विचारले की, 'मी बाहेर जाऊन त्यांना भेटून येऊ का?'. तो नाही म्हणाला. तरीही त्याने वरीष्ठ अधिकार्‍यालाही माझ्यासमोर विचारले. तोही नाही म्हणाला. मी म्हटले, 'ठीक आहे. हरकत नाही. परवानगी नाही तर राहू दे. इथूनच भेटून घेऊ'. थोड्या वेळाने तो पोलिस माझ्याकडे आला व म्हणाला,"जल्दी वापस आना" मी म्हटले, 'ठीक आहे'. मी बाहेर मुख्य दरवाजातून बाहेर पडता पडता त्याने म्हटले, "वापस आने के बाद मेरे चायपानी का भी देख लेना." मी म्हटले, 'कुछ देना वगैरा है तो छोडो. नहीं जाऊंगा मै.' मग क्षणभर विचार करुन तो म्हणाला, "जाओ" मी घरच्यांना भेटून १० मिनिटांत परत आलो.

ह्या उदाहरणांत मला ते नियम चुकीचे नाही वाटले. पण जो निष्काळजीपणा दाखवला जातो त्याबद्दल राग आला म्हणा, वाईट वाटले म्हणा, विचित्र वाटले म्हणा , की फक्त दाखविण्याकरीता आहे का हे? विमानतळावरचे म्हणाल तर जर तो माणूस काही रुपयांकरीता नियम मोडू देऊ शकतो तर भरपूर रक्कम मिळाली तर गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सगळेच पोलिस तसे नसतील पण बहुतेक घटनांमध्ये तसेच झाले असू शकेल.

शितावरून भाताची परीक्षेचाच प्रकार झाला हा. पण काय करणार आजकाल तशीच परिस्थिती दिसतेय. म्हणूनच कोणी हाय अलर्ट म्हटले की वाटते.. 'हाय अलर्ट? घंटा'


जुलै १२, २०११

गेले काही दिवस पुन्हा तेच. काहीतरी मनात आलेले लगेच लिहायला घेतो, पण लिहिता लिहिता मध्येच काहीतरी काम आल्याने ते लिखाण अर्धवटच राहिले. अशा ४ ५ गोष्टी अजूनही प्रकाशित करायच्या राहिल्यात. 
पाहतो किती जमते ते.

जाता जाता: भ्रमणध्वनी मधून मराठी लेखन प्रकाशित करण्याचा हा पहिलाच प्रयत्न :-)


जून २०, २०११


आपल्यात एक म्हण आहे, 'जिस थाली में खाया उसी में छेद किया'
किंवा 'नमक हराम', किंवा 'खाल्ल्या मिठाला जागणे' वगैरे वगैरे.पण उंदरांकरीता ही म्हण/वाक्प्रचार वापरताच येणार नाही. त्यांना कुठे माहित असणार हे सर्व. अर्थात त्यांनी नेमके घरातील मीठ खाल्ले नाही. पण कारच्या खाली त्यांना जागा मिळाली न भिजण्याकरीता, किंवा कारच्या इंजिनाजवळ मिळाला तात्पुरता निवारा तर नीट राहायचे ना...
तिथल्या तारा कुरतडून तोडून टाकल्या.

नेमके पावसाळ्यात वायपर नाही चालले तर कसे होईल? लवकरात लवकर पुन्हा ते ठीक करून घ्यावे लागेल. पण किती वेळा दुरूस्ती करणार? आता हे तिसर्‍यांदा होत आहे दोन महिन्यांत.

सल्ले मिळाले, "तंबाखूच्या पुड्या ठेवा". पण किती, कुठे कुठे? आणखी काही उपाय आहेत का?

जून १६, २०११


जालरंग प्रकाशनाच्या 'ऋतू हिरवा २०११' ह्या वर्षा विशेषांकाचे आज १५ जून रोजी प्रकाशन झाले.ह्यातील 'शाळा सुरू झाली..' हे जुन्या आठवणींचे पुंजके हे मी गेल्या आठवड्यात लिहून दिले होते.

अंक आज प्रकाशित झाला आणि नेमके आजच शाळा सुरू झाल्या असल्याचे पाहिले. त्यामुळे त्या ज्या काही आठवणी लिहिल्या त्याला बरोबर शाळा सुरू होण्याच्याच दिवसाची वेळ जमून आली असेच म्हणता येईल. आज पुन्हा त्या आठवणी समोर आल्या.

आणि हो, पहिल्यांदाच मी संपादकीय ही लिहिले आहे. वाचा आणि सांगा कसा वाटला हा अंक.

जून १५, २०११

२ आठवड्यांपूर्वी म्हटल्याप्रमाणे मी DND बद्दल वैतागलो होतो. ते संदेश ही आणि ग्राहक सेवा केंद्रातील लोकांची उत्तरे ऐकूनही. त्याचीच तक्रार शेवटी मोबाईल ग्राहक सेवा केंद्राच्या वरच्या पातळीवरील कार्यालयात केली. ग्राहक सेवा केंद्राने माझ्या विपत्राला उत्तर दिले नाही असेही त्यात म्हटले होते.

लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्यांनीच संपर्क केला व सांगितले की ग्राहक सेवा केंद्रातून मिळालेल्या चुकीच्या उत्तरांबद्दल ते दिलगीर आहेत. तसेच तक्रार करण्याचा कालावधी ६ तास किंवा ३ दिवस नसून १५ दिवस आहे. आणि त्यांनी पुन्हा ते संदेश आणि क्रमांक त्यांच्याकडे पाठविण्यास सांगितले आहे.

चला, निदान काहीतरी उत्तर मिळाले.

पण मुख्य प्रश्न पुन्हा तसाच राहतो. ते संदेश पाठवणार्‍यांचे काय? तो त्रास खरोखर बंद होईल का? शक्यता कमीच वाटते ;)

जून ०७, २०११


आज चुकून राजू परूळेकरांचे २२ एप्रिलचे 'डी'टॉक्स वाचले. चुकूनच... कारण गेले कित्येक महिने मी लोकप्रभामध्ये फक्त मेतकूट हे सदरच वाचतोय. इतर एखाद दुसरा वाचा असे कोणी सांगितले तर. :)

ह्म्म तर म्हणत होतो, डीटॉक्स बद्दल. क्रिकेट: एक सोशियो पोलिटिकल अ‍ॅनेस्थेशिया. नाही घाबरू नका. इथे मी क्रिकेटबद्दल काही लिहिणार नाही आहे.
राजू परूळेकरांनी पुन्हा ग्लॅडियेटर आणि क्रिकेट ह्यांच्यातील साम्याबद्दल थोडेसे लिहिले आहे. पूर्ण लेख वाचता वाचता मला त्यांचे सचिन (ग्लॅडियेटर) तेंडुलकर हे लेखन आठवले.
आजही जवळपास दीड वर्षांनी त्याच विषयावर लेखन केले तेच लेखन पण वेगळी पात्रे घेऊन.

हेच जर त्यांनी नोव्हें. २००९ मध्ये लिहिले असते तर उगाच त्याचे स्पष्टीकरण द्यायला दुसरा लेख लिहावा लागला नसता, आणि आम्हीही इतर काही लिहिले असते. :)

माझे संबंधित लेखन:
...तरी सचिनने बिघडवले काय?
पुन्हा अल्केमिस्ट्री

जून ०४, २०११


जगभरात विविध दिन साजरे करायची फॅशन आली आहे. फक्त काही दिन थोडे महत्त्वाचे वाटतात उदा. जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन(World Anti Tobacco Day ), वसुंधरा दिन .. अरे हो तो वसुंधरा तास आहे ना? ( World Earth Hour), तत्सम आणि उद्या असलेला जागतिक पर्यावरण दिन.

आता थोड्या वेळापूर्वी एक विपत्र आले. उद्याच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माझे कार्बन फुटप्रिंट (Carbon Footprint) मोजण्याबाबत. म्हटले चला पाहूया मोजून काय, कसे असते ते. कार्बन फुटप्रिंट बाबत माहिती शोधायचा प्रयत्न केला पण ते जरा विस्तारीत रूपातच मिळाले. थोडक्यात असेच की आपण किती कार्बन पर्यावरणात सोडतो.

ह्म्म, तर त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन त्यांनी मागितलेली माहिती पुरविली. ती अशाप्रकारे.. .
 • क्षेत्र (भारतातील राज्य), 
 • घरातील सदस्य
 • एल पी जी वापर (सिलेंडर/महिना)
 • वीजवापर (kwh/महिना)
 • नैसर्गिक वायू वापर (m3/महिना)

प्रवासः
 • रिक्षा (किमी/दिन)
 • बस  (किमी/दिन)
 • खाजगी चारचाकी वाहन  (किमी/दिन)
 • खाजगी दुचाकी वाहन  (किमी/दिन)
 • टॅक्सी  (किमी/दिन)
 • ट्रेन  (किमी/महिना)
 • विमान  (किमी/वर्ष)ह्यावरून त्यांनी मोजलेल्या माझ्या सध्याच्या कार्बन पायखुणा (उगाच हा प्रतिशब्द वापरण्याची हुक्की आलीय. नेमका शब्द माहित असेल तर जरूर सांगा):


जर मी दुचाकी ऐवजी बसचा वापर केला तर कार्बन पायखुणा


निदान बहुधा पुढचे तीन महिने तरी हे कमी असेल ;)

तुम्ही कधी तुमचे कार्बन फुटप्रिंट मोजले आहेत? ते कमी करण्याकरीता काय उपाय केलेत?


जून ०३, २०११


आज पुन्हा एका नकोशा संदेशाकरीता मोबाईल कंपनीला फोन लावला. संदेश पाठवणार्‍याचे नाव (DZ-CK) असे होते. आज त्या ग्राहक सेवा केंद्राच्या व्यक्तीने सांगितले की, " असा कोणी आमच्या यादीत नाही आहे." मी म्हटले," तो कोण आहे ते तुम्ही शोधा." मग त्याने ६०/७० % संदेश माझ्याकडून वदवून घेतला. नंतर मध्येच म्हणाला," सर, आम्हाला असा कोणी संदेश पाठवणारा माहित नाही. " "तरी मी विचारतो", असे म्हणत त्याने फोनवर थोडा वेळ थांबायला सांगितले.

बस्स... २ मिनिटांनी फोन बंद करून टाकला.

ह्म्म......कामचोर माणसं :)

जून ०२, २०११

छ्या... गप्प रहायचे म्हटले तर हेच लोक छळतात.

सरकारने DND अर्थात Do Not Disturb ची सुविधा सुरु केली तेव्हा ग्राहकांना बरे वाटले होते. चला आता ह्या जाचातून सुटका. पण कॉल कमी झाले तरी संदेश येतच असतात.

आज स्पॅम मेसेज बद्दल तक्रार करायची होती.. गेल्या शनिवारीही एका संदेशाची तक्रार केली होती. ग्राहक सेवा केंद्राच्या माणासाने विचारले, "कधी आला होता संदेश? " तो संदेश आला होता त्याच्या १० दिवस आधी. तर तो म्हणतो ३ दिवसांच्या आत तक्रार करायची असते. काल एक संदेश आला त्याची आज तक्रार केली तर आता म्हणतात, 'तुम्ही ६ तासांच्या आत तक्रार करायची'.

कैच्याकै.

मी म्हटले, "पुढील वेळी मी जर १५ मिनिटांत तक्रार केली तर तुम्ही म्हणाल ' अरेरे, तो कॉल/संदेश तेव्हाच ट्रान्स्फर करायला पाहिजे होता तुम्ही' ".

आता शनिवारी पुन्हा त्यांच्या समोर जाऊनच तक्रार करावी लागेल :)

(चित्र आंतरजालावरून साभार)

जून ०१, २०११


सारेगम, अंताक्षरी सारखे सुंदर कार्यक्रम कधी काळी चालू होते. (आधीचे आठवत नाहीत ;) )


नंतर आले इंडियन आयडॉल. इंडियन आयडॉलचा पहिला भाग थोडासा बघितला होता. चांगले गायक येत होते. नंतर अनु मलिक, फराह खान आणि सोनू निगम यांनी बहुतेक स्पर्धकांची खिल्ली उडविण्यास सुरूवात केली. तो प्रकार आवडला नाही. स्पर्धकांनीही परीक्षकांना सडेतोड उत्तरे दिलीत. ते चांगले वाटले. ;)

त्या पहिल्या कार्यक्रमात अभिजीत सावंत जिंकला. नंतर जास्त कधी दिसला नाही. त्याच धर्तीवर भरपूर कार्यक्रम सुरू झाले. स्पर्धक-परीक्षक, स्पर्धक-स्पर्धक, परीक्षक-परीक्षक वाद, भांडणं सुरू झाली. तरीही बहुधा चांगले कलाकार निवडले जाऊ लागले.

नंतर प्रेक्षकांना ह्यात सामील करून घेत त्यांच्याकडून पाठवलेल्या एस एम एस वरून विजेते निवडले जाऊ लागले. प्रकार आवडला नसला तरी आपली कला सर्वांसमोर आणण्याकरीता लोकांना एक मंच मिळाला. एक काय भरपूर मिळाले.


आता आलाय 'X Factor'. प्रकार तसाच... तोच Talent Hunt. सर्वच कार्यक्रमांप्रमाणे हा ही सुरूवातीला बरा वाटतोय. पुढे कसे चालते पाहू ;)

(चित्रं आंतरजालावरून साभार)

मे २९, २०११


नाही, यूट्युब वर उपलब्ध असलेल्या ३डी चित्रफीती बनविण्याच्या कृतीबद्दल म्हणणे नाही हे. तर घरी बसून त्रिमिती (3D) चित्रपटाचा आनंद घेता येईल त्याबद्दल. :)
हो, आणि महागडा 3D दूरदर्शन संच ही घ्यायची गरज नाही.

त्रिमिती चित्रपट पाहण्याकरीता गरज काय असते? तर 3D प्रक्षेपण आणि त्याचा खास चष्मा. 3D चित्रपट बनविणार्‍यांनी आधी त्यांचे चित्रपट नेहमीच्या डीव्हीडीच्या प्रकारात देत होते. पण आता त्यांनी 2D आणि 3D अशा दोन्ही प्रकारात डीव्हीडी बनविणे सुरू केले आहे. डीव्हीडी सोबतच दोन चष्मेही मिळतात.

असेच २ चित्रपट मी विकत आणलेत.
 • Ice Age: Dawn of the Dinosaurs 
 • The Final Destination 4 तिसरा आहे उपलब्ध The Polar Express तो आणेन नंतर कधीतरी :)

दोन्ही चित्रपट २००९ मध्ये चित्रपटगृहात पाहिले होते. आणि आता ह्या डीव्हीडीवर.

दोन्ही डीव्हीडीपैकी Ice Age चा त्रिमिती दर्जा चांगला वाटला. पण Final Desination नाही. बहुधा चष्यांचाही दोष असेल. नीट पहावे लागेल.  

आणि ह्याचे २ आणि त्याचे २ असे मिळून ४ चष्मे असले तरी एकाच चित्रपटाला चारही वापरता येत नाहीत. कारण दोघांच्याही प्रणालीत थोडे वेगळेपण आहे. एकात लाल आणि निळा रंग वापरला आहे, दुसर्‍यात लाल आणि निळा. आणि लाल रंग एकात डाव्या डोळ्याला आहे दुसर्‍यात उजव्या.

हे एक सोडले तर घरी बसून 3D चित्रपट पाहणे सोपे झाले म्हणता येईल.

मे २८, २०११
कॅडबरी डेअरी मिल्क ची नवीन जाहिरात पाहिलीत?

बायको नवर्‍याला विचारते, "तू मला शेवटचे 'आय लव यू' कधी म्हणालास?" तो उठून कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेट घेऊन येतो आणि तिला देतो, "आता"....

ज्यांनी पाहिली नसेल ते येथे पाहू शकता.

सुंदर जाहिरात. मला आवडली. तसेच ती एक "खाने में क्या है?"

पण त्यांनी ''आय लव यू' म्हणण्याकरीता नवीन प्रकार आणला असे नाही म्हणता येणार ;) महाविद्यालयीन वर्षांपासून हे माहित आहे.
ह्यावरूनच आमच्या महाविद्यालयीन काळामधील साजरा केलेला Chocolate Day आठवला.

'चॉकलेट डे' साजरा करणार होते तेव्हा ठरवले होते
Eclairs म्हणजे "You are my Good Friend"
Lacto king म्हणजे "I hate you"
आणि
Dairy Milk म्हणजे "I Love You"

मी तर कोणाला डेअरी मिल्क दिले नाही की मला मिळाले नाही. आणि लॅक्टोकिंग मिळावे एवढा वाईट ही नसेन मी ;) (खरं काय असेल ना. तू मला आवडत नाहीस सांगण्याकरिता चॉकलेटचा खर्च ही का करावा? :D )

पण माझ्या एका मित्राने गंमत केली, त्याने लॅक्टोकिंग च्या कागदात एक्लेअर्स टाकून मुलांना/मुलींना दिले. त्याला काहींनी विचारले, "काय रे, मी आवडत नाही का?" तो म्हणाला,"तसे नाही. आतील चॉकलेट पहा" :)

असो ,मला ना डेअरी मिल्क मिळाले ना लॅक्टो किंग... पण एक्लेअर्स भरपूर मिळाले.

एप्रिल २६, २०११२६ एप्रिल म्हटले की मला पहिले आठवते ते १९९९ साल. वसतीगृहात आमच्या संगणकाला बंद पाडणार्‍या विषाणूचा पहिल्यांदा सक्रिय होण्याचा दिवस. त्याने जो काही गोंधळ घातला त्यावरून तो दिवस तर लक्षात तर राहिलाच पण संगणकातील विषाणू काय काय करू शकतात ह्याची प्रचिती आली. त्यानंतर जवळपास ४-५ वर्षे तरी एक खबरदारी म्हणून २६ एप्रिल ही तारीख स्वतःच्या संगणकात येऊ दिली नाही. ;)

त्या दिवसाचा आमचा अनुभव मी आधी लिहिला होता. तो ह्या दुव्यावर पुन्हा वाचता येईल.

आणि Win-CIH विषाणूबद्दल माहिती विकिपिडीयावर ह्या दुव्यावर पाहता येईल.

एप्रिल २४, २०११

वार्‍यावरची वरात - पु. ल. देशपांडेंचे हे नाटक कधीतरी दूरदर्शनवर पाहिल्याचे पुसटसे आठवते. पण त्यातील नेमके सर्व आठवत नव्हते. नंतर मग २००३ पासून पुलंच्या एक एक करत सर्व कथाकथनांच्या ध्वनीफीती संग्रहात वाढवत गेलो, त्यात ह्याचीही ध्वनीफीत होती.

'वार्‍यावरची वरात नाटकाची व्हीसीडी बाजारात उपलब्ध आहे असे कळले तेव्हा पाहिले तर त्याच्या पुनर्निर्मित (अर्थात रिमेक) नाटकाची व्हीसीडी होती ती. आधीच्या एक दोन रिमेकच्या अनुभवांमुळे मी ते घ्यायचा प्रयत्न नाही केला. (तो अनुभव काय ते पुढच्या लिखाणात सांगेन). बहुतेकांनी सांगितले होते की पुण्याच्या 'अलूरकर म्युजिक'  मध्ये मूळ नाटक मिळेल. पण तिकडून मागवणेही जमले नाही.
आत्ता गेल्या आठवड्यात आमच्या नेहमीच्या म्युजिकच्या दुकानात पाहिले की त्या मूळ नाटकाची व्हीसीडी/डीव्हीडी उपलब्ध आहे. लगेच विकत घेतली. सध्या तरी पाहणे जमले नाही पण ते नाटक पुन्हा लवकरच पाहीन.

एप्रिल १२, २०११

रामनवमी म्हटले की मला इतर गोष्टींपेक्षा जास्त आठवते ते गदिमांचे गीत रामायण, सुधीर फडकेंच्या आवाजात. १० ध्वनीफितींचा संच वडिलांनी घेऊन ठेवला होता. दरवर्षी रामनवमीला सकाळी गीत रामायण आमच्या घरी लागायचे. पण आता गेली काही वर्षे नेमाने ऐकणे कमी झाले आहे. त्यांतील सर्व गाणी तर नेमकी तर आठवत नाहीत पण गाणी लावली असली तर आठवतात त्या लयीमध्ये.

आता ध्वनीफीती तर जास्त कोणी ऐकत नाही. बाजारात तर मिळणेही बंद झालेय बहुधा. सध्या चलती आहे ती ऑडियो सीडी आणि एमपी३ ची.

गदिमांच्या ह्या संकेतस्थळावर पूर्ण गीतरामायण ध्वनी आणि लिखित रुपात उपलब्ध आहे. गेली ३/४ वर्षे ऐकले नाही आहे, आता तेच ऐकतो :)

एप्रिल ११, २०११आता कोणत्यातरी वाहिनीवर 'प्यार के काबिल' हा चित्रपट सुरू असलेला पाहिला. लहानपणी हा चित्रपट कॅसेट आणून पाहिल्याचे आठवले. तेव्हा भरपूर चित्रपट पाहिलेत. हा चित्रपट पूर्णपणे आठवत नसला तरी त्याची कथा लक्षात होतीच इतके दिवस. नवरा बायको (ऋषी कपूर-पद्मिनी कोल्हापुरे) भांडणानंतर वेगळे राहतात. त्यांच्या जुळ्या मुलींपैकी एक ऋषी कपूर कडे, एक पद्मिनी कोल्हापुरे कडे. थोड्या मोठ्या झाल्यावर एकाच शाळेत असतात. शाळेच्या सहलीमध्ये त्या ठरवून अदलाबदली करून एकमेकींच्या घरी जातात, आईला भेटायला, वडिलांना भेटायला. पुढची कथा सांगण्याची गरज वाटत नाही. :)

मग ह्याच कथेवरचे पाहिलेले इतर चित्रपट लगेच आठवतात.
दो कलियां : विश्वजीत-माला सिन्हा
प्यार के दो पल : मिथुन्-जयाप्रदा
कुछ खट्टी कुछ मिठी : ऋषी कपूर(पुन्हा) - रति अग्निहोत्री

दो कलिया बद्दल माहित नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे इतर तीन तर चालले नाहीत :)

असेच जुळ्या भावांचे किंवा बहिणींचे, थोडेसे वेगळे चित्रपट आठवत असतीलच.
राम और श्याम (दिलीप कुमार)
सीता और गीता (हेमा मालिनी)
चालबाज (श्रीदेवी)
किशन कन्हैया (अनिल कपूर)

वरील चारही चित्रपट एकाच कथेवर. पण चौघांचेही सादरीकरण वेगळ्या धाटणीचे, मस्त. आणि चारही चित्रपट भरपूर चाललेत.

इथे मी फक्त आता आठवणार्‍या हिंदी चित्रपटांचीच नावे दिली आहेत. असेच एकाच कथेवरच्या किंवा प्रेरित (चोरलेल्या?) चित्रपटांबद्दल (जे भरपूर आहेत) पुन्हा लवकरच लिहेन. तसेच मराठी आणि इंग्रजी एकत्र केल्यानंतर लांब यादी तयार होईलच :)

एप्रिल १०, २०११


भरपूर रुग्णालयात पाहिले की डॉक्टर रुग्णाच्या खाटेजवळ जाऊन त्याची तपासणी करतात. पण ते त्यांचे दाखल केलेले रूग्ण असतात आणि त्यांची माहिती डॉक्टरांना असते.

भरपूर दवाखान्यात, रूग्णालयात रुग्णाच्या नावाचा पुकारा झाला की रूग्ण त्या डॉक्टरच्या केबिनमध्ये जातात.

आज वेगळ्या प्रकारचा दवाखाना, डॉक्टर पाहिले जिथे रूग्ण दवाखान्यात वेगवेगळ्या भागात आहेत. डॉक्टरांकडे त्यांच्या नावाची नोंदवही (जी रुग्णाला दिली जाते) जमा असते, रुग्णांच्या त्या दिवसाच्या हजेरी क्रमांकाप्रमाणे.
मग डॉक्टर त्या रुग्णाच्या नावाचा पुकारा करतात आणि रुग्ण सांगतो की मी येथे आहे, आणि मग डॉक्टर रूग्णाच्या जागेकडे जातात. :)

सविस्तर माहिती, डॉक्टरांच्या पुढील भेटीनंतर. :)

शनिवारी एका कामाकरीता अंधेरी पश्चिमेला गेलो होतो. तिकडे गेलो ३-४ वर्षांनंतर. पण शाळेजवळ गेलो होतो साधारण १४ वर्षांनंतर. सर्व भाग पूर्ण बदललेला. नवीन इमारती, मेट्रोचे पूल वगैरे वगैरे. तिकडूनच मित्रांना फोन केला. दोन मित्र शाळेजवळच भेटले, एक त्याच्या घराजवळ. त्यांच्याशी गप्पा मारताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. 'शाळा'  आणि 'दुनियादारी'तील काही भाग समोर आले. :)

मित्रांची खबरबात ऐकताना खूप चांगले वाटत होते. हा इकडे काम करतो, तो तिकडे.. ह्याचे, हीचे लग्न एव्हा एव्हा झाले, ती ह्या कंपनीत काही कामाकरीता गेल्यावर भेटली वगैरे वगैरे. पण ह्या फेरीत शाळेच्या आत जाण्यास नाही जमले. मित्राने सांगितले सुट्ट्या सुरु झाल्यात आजपासूनच. :( पुढील वारीत शिक्षक/शिक्षिकेंनाही नक्कीच भेटेन.

नंतर गेलो मी राहत होतो त्या संकुलात. सरकारी संकुल. आता काही घरे आणि कार्यालय तोडून तिकडे नवीन इमारत बांधलेली पाहिली. २५/३० ओळखीच्या घरांतील फक्त दोन घरांतील व्यक्ती भेटले. इतर सर्व दुसरीकडे रहायला गेले आहेत. तिकडच्याही जुन्या आठवणी येत होत्या. संकुलाची सध्याची स्थिती पाहून वाईट वाटत होते. एक शब्द आठवला 'भकास' :(

आता शाळेतील मित्र आणि राहत्या जागेजवळील शेजार्‍यांतील काहींशी संपर्क अजूनही आहे, काहींशी नाही. पण असो. सर्वजण आपापल्या जागी समाधानात आहेत हेच चांगले. भेटी तर पुढेही होतच राहतील. फक्त ते जुने दिवस आठवणींतच.

एप्रिल ०८, २०११

आज कार्यालयात धोक्याच्या वेळी (आग वगैरे) घंटा, सूचना कशा पाळायच्या ह्याची एक ओळख झाली. (फायर ड्रिल म्हणतात ते नव्हे) आग लागल्याची घंटा किती वेळा वाजणार, त्याबाबत सूचना स्पीकरवरून झाल्यावर काय करायचे वगैरे वगैरे. अर्थात ह्या गोष्टी बहुतेक सर्वच कार्यालयांत आजकाल होत असतीलच. त्याबाबत हे लेखन नाही. पण ह्यावरून दोन वर्षांपूर्वीची एक घटना आठवली.

२००९ मध्ये अमेरिकावारीत १ सप्टे. ला फायनल डेस्टिनेशन चा चौथा त्रिमितीय (३डी) भाग पाहिला. चित्रपट अर्थातच थरारक वाटला आणि आवडलाही. पण आधीच्या २/३ भागांत विमान, रोलर कोस्टर ह्यांतील अपघातातून वाचलेले मित्र, नंतर त्यांच्यावर नियतीचा घात ह्या गोष्टींनतर हा ३डी चित्रपट जरा जास्तच क्रूर वाटला होता.

त्यानंतर चारच दिवसांनी सहकार्‍यासोबत ३ दिवसांच्या सुट्टीत (५,६,७ सप्टें)  लास वेगस ला गेलो होतो. तिथे जगातील वेगवेगळ्या प्रसिद्ध वास्तूंच्या प्रतिकृती, उंच इमारती व त्यांचा दिव्यांचा झगमगाट आणि अर्थातच तिकडचे मुख्य आकर्षण, कॅसिनो ह्यांची भेट घेतलीच. पण तिकडचे आणखी आकर्षण होते स्ट्रॅटोस्फियर टॉवरवरील सफरी (राईड्स)१०८ मजल्यांच्या वर ह्या सर्व सफरी. मी बसलो तीनही मध्ये. Insanity, X-Scream आणि Big Shot. मस्त एकदम. ह्यातील  x-scream मध्ये प्रत्येक रांगेत २ अशा ४ रांगांत लोकांना बसवितात. मग गच्चीवरून बाहेर मोकळे सोडून देतात, गुरुत्वाकर्षणाच्या भरवशावर. जसे काही आपण खालीच पडत आहोत. मग अचानक थांबवून पुन्हा मागे. आणि परत सोडून देतात.
माझा क्रमांक आल्यावर मी त्यात जाऊन बसलो. नेमकी एकदम समोरची जागा होती. म्हणजे खाली पडताना आपल्या समोर कोणी माणूस नाही, तर थेट १०८ मजले खालची जमीनच दिसणार. खेळ सुरु करणार तेवढ्यात आगीच्या धोक्याची घंटा वाजू लागली. लगेच यंत्र थांबविले व आम्हाला खाली उतरण्यास सांगितले. धोक्याची घंटा वाजतच होती. आता माझ्यासमोर ४ दिवस आधी पाहिलेला फायनल डेस्टिनेशन आठवला. समोर १०८ मजल्यावरचा कठडा, आत आगीची घंटा. म्हटले आपले फायनल डेस्टिनेशन आले जवळ :)आम्हाला सर्वांना एका ठिकाणी जमा होण्यास सांगितले. ५-१० मिनिटांनंतर आतून घोषणा झाली, "आगीचे ठिकाण शोधण्यात आले आहे. १५ मिनिटांत सर्व ठीक करण्यात येईल."

१५ मिनिटांनी  सगळे ठीक असल्याचे सांगण्यात आले.  खबरदारी म्हणून कोणालाही न बसवता त्या यंत्राची चाचणी घेण्यात आली. पुन्हा आम्हाला त्या x-scream मध्ये बसण्याची परवानगी देण्यात आली. पण ह्यावेळी मला पहिल्या रांगेत जागा न मिळता दुसर्‍या रांगेत जागा मिळाली. पहिल्या रांगेची मजा बहुधा मला मिळाली नसेल पण ते x-scream ही थरारकच वाटले.


हा अनुभव मध्ये मध्ये आठवतच असतो, तसा एवढा गंभीरही नाही. पण आज ह्या धोक्याच्या घंटेने त्याबाबत लिहावयास प्रवृत्त केलेय असे म्हणता येईल.

एप्रिल ०७, २०११

आज संध्याकाळी कार्यालयात चर्चेचा विषय निघाला होता सॅमसंगच्या नवीन वातानूकूल यंत्राबद्दल. त्यांनी 'व्हायरस डॉक्टर' नावाखाली नवीन उत्पादन बाजारात आणले आहे. त्यात H1N1 विषाणूलाही रोखता येते असा दावा केला आहे. तसेच एक पाणी गाळणी यंत्र आले होते, १ करोड विषाणूंना मारण्याचा दावा करणारे. वाटते हे किती खरे असेल? त्याच चर्चेत मी नुकतेच पाहिलेल्या दुसर्‍या औषधाबद्दलही बोलणे झाले. Ecosprin, Disprin ह्या औषधी शेड्युल एच (Schedule H) ह्या प्रकारात येतात तरीही डिस्परीन आपल्याला केव्हाही दुकानात जाऊन घेता येते. वास्तविक तसे नसायला पाहिजे कारण त्यावर लिहिल्याप्रमाणे नोंदणीकृत डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच घ्यायच्या आणि विकायच्या असतात. पण लोक तर डॉक्टरकडेही न जाता थेट औषधांच्या दुकानात जाऊन दुकानदारलाच विचारतात, ह्यावर कोणते औषध घेऊ?

योगायोगाने घरी आल्यानंतर मटावर वरील बातमी वाचली.
अँटिबायोटिक्सचा अतिवापर धोक्याचा!

सर्दी झाली , ताप आला की एखादी अॅन्टिबायोटिक्स घेणे हे आपल्या सरावाचेच झाले आहे . पटकन आराम देणारी ही औषधे तितक्याच मोठ्या प्रमाणावर घातकही असतात . यामुळेच भारताला अॅन्टिबायोटिक्सच्या अतिवापराचा धोका असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे


खरोखर आपल्याइकडे हा धोका जास्तच आहे असे आधीही बातम्यांत आले होते. हे वाचल्यानंतर संध्याकाळचे संभाषण आठवले. आंतरजालावर Schedule H ची माहिती शोधली. ह्या दुव्यावर माहिती मिळाली त्यात होते जे औषधाच्या बाटलीवर/पट्टीवर लिहिले असते. ‘Schedule H drug- Warning : To be sold by retail on the prescription of a Registered Medical Practitioner only’

सोबत असेही कळले की
In addition to the other particulars which are required to be printed or written under these Rules, the label of innermost container of the following categories of drugs and every other covering in which the container is packed shall bear a conspicuous red vertical line on the left side running throughout the body of the label which should not be less than 1mm in width and without disturbing the other conditions printed on the label under these rules, namely: — Narcotic analgestics, hypnotics, sedatives, tranquillisers, corticosteroids, hormones, hypoglycemics, antimicrobials, antiepileptics, antidepressants, anticoagulants, anti-cancer drugs and all other drugs falling under Schedules ‘G’, ‘H’, and ‘X’ whether covered or not in the above list.

लगेच घरातील औषधी काढून पाहिली बहुतेक सर्वांवर ती लाल पट्टी आहे. एक दोन सोडल्या तर. अर्थात आम्ही डॉक्टरांची चिट्ठी दाखवूनच औषधे आणतो. पण काही औषधी अशाच आणल्या जातात.त्या म्हणजे क्रोसिन, पॅरासिटोमोल, कॉम्बिफ्लॅम, बेनाड्रिल, डिस्परीन. त्यातील डिस्परीन वर Schedule H लिहिले नाही. त्यामुळे आमच्या संध्याकाळच्या संभाषणातील हा मुद्दा गैरलागू.

पण तरीही कॉम्बिफ्लॅम हे Schedule H मध्ये येते, आणि तरीही आपण ते केव्हाही जाऊन घेऊन येतो व दुकानदारही चिट्ठी न मागता देतो. बेनाड्रिलही बहुधा त्याच प्रकारात येते. पण विना इशारा दूरदर्शन वर थेट जाहिरात दाखविल्यास त्या इशार्‍याची आणि नियमाची तीव्रता कमी होते असे नाही वाटत? त्या औषधांच्या जाहिरातीसोबत डॉक्टरांच्या परवानगीशिवाय घेऊ नये असे का लिहित/सांगत नाहीत?

आणि जाता जाता पुन्हा तोच प्रश्न. H1N1 किंवा इतरही विषाणूंचा अटकाव करण्याची क्षमता त्या वातानूकूल यंत्रामध्ये खरोखरच आहे का?

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter