एप्रिल ३०, २०१३


आज खूप दिवसांनी नवीन पट्टयावर Italian Leather असे कोरलेले वाचले आणि काहीसे जुने आठवले.

२००१ मध्ये मी आणि माझा मित्र मस्जिद येथे गेलो होतो, नोकरीच्या निमित्ताने. माझ्या मित्राला नवीन पट्टा विकत घ्यायचा होता. दुकानदाराने वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे दाखवायला सुरूवात केली. बहुतेक सर्वांवर 'Genuine Leather' , 'Original Leather' असे लिहिले होते. मी विचारले, "हे खरोखरच चामड्याचे पट्टे आहेत का?" दुकानदार म्हणाला, " हो, छापलंय पहा." खरा चामड्याचा पट्टा किंवा पिशव्या बॅग ओळखणे तसे मला जमत नव्हते. कधी काळी कोणी सांगितले होते की खर्‍या चामड्याला एक वेगळा वास येत असतो त्यावरून ओळखावे. पण त्या गोष्टींचा वास कसा असतो ते तर माहित असावे. (तीच गोष्ट हापूस आंब्यांचीही. माहीतगार लोक सांगतात की हापूस आंबा वासावरून ओळखता येतो. पण खरा वास कुठे माहित आहे ;) ) त्यावरून तर ओळखता आले नाही. माझा मित्र म्हणाला, "त्याला चामड्याचा पट्टा नको आहे. ते चामडे वापरत नाहीत." दुकानदाराने काही पट्टे काढून दाखवले. पण त्यावरही 'Genuine Leather' लिहिलेले दिसले. त्याला विचारले तर म्हणाला, "तसे लिहून ठेवतात". मग पुढे बोलता बोलता तोच म्हणाला की कोणी चामड्याचा पट्टा मागितला तर त्याकरीता हे छापून ठेवले आहे की.

थोडक्यात त्या दुकानात कोणते चामड्याचे पट्टे होते आणि कोणते नव्हते ते कळले नाही. परंतु हे कळले की असे छापून ठेवून हातात काहीही सोपवले जाते.



आता आंतरजालावर चित्र शोधता शोधता हे एक संकेतस्थळ मिळाले, त्यावर "How do you know if a leather is genuine leather?" असा दुवा होता. पण त्यावरील माहितीही त्रोटक, अपुरी वाटली. नेमकं सांगायचं तर नेमकं काहीच कळलं नाही ;)

कोणी सांगू शकेल का की 'Genuine Leather' कसे ओळखणार?

एप्रिल २६, २०१३



मांस, मछली अण्डा छोडो, शाकाहार से नाता जोडो - जय गुरूदेव
दररोज बसमधून जाताना पूर्व दृतगती महामार्गावरून अंधेरी-पवईकडे वळल्यावर भिंती रंगवलेल्या दिसतात अशाप्रकारच्या मजकुरांनी. जवळपास सगळ्याच भिंतीवर हा मजकूर आहे.





कोण हे गुरूदेव? नवीन बाबा आलेत का? :) आजकाल हे साधू, बाबा लोक ज्याप्रकारे टिपण्ण्या करत आहेत त्यात अजून कोणी हात धुऊन घेणारे?

आम्हाला 'गुरूदेव' नावाचा चित्रपटच माहित आहे.

एप्रिल २२, २०१३


गेल्या वर्षी मा़झ्या पारपत्राचे  (पासपोर्ट हो) नवीनीकरण केले. ह्याआधी माझे व घरातील इतरांचे पासपोर्ट बनविले तेव्हा अर्ज भरून थेट पासपोर्ट कार्यालयात जमा केला होता. पण गेल्यावर्षी तिथे थेट जाण्याआधी त्यांच्या संकेतस्थळावर नोंदणी करून पुढील कार्यवाही हा भाग माझ्याकरीता नवीन होता. तेव्हाच्या कार्यपद्धतीप्रमाणे आधी ऑनलाईन अर्ज भरणे, भेटीची वेळ निश्चित करणे हे होते. मग मार्चच्या शेवटी शेवटी (बहुधा २३ तारीख होती) अर्ज भरून १० एप्रिल ची तारीख घेतली. सकाळी १०ची वेळ ठरविली तर वाटले की ९:३०-९:४५ ला निघून तिकडे पोहोचता येईल. पण एक अंदाज चुकला होता की तीच वेळ आणखीही भरपूर लोकांनी निवडली असेल, त्यामुळे पासपोर्ट कार्यालयात पोहोचलो तर तिथे जाऊन टोकन घेणे आले. माझा क्रमांक २३५. म्हटले, 'वा.. आता पाहू किती वेळ लागतो." त्यातही आधीच्या दिवसाचे उरलेले टोकन क्रमांक संपविणे त्याच्या यादीत होते. त्यामुळे माझा क्रमांक हा भरपूर मागे जाणार होता. मला फक्त नवीनीकरण करायचे होते म्हणून जुना पासपोर्ट, लग्नाचे प्रमाणपत्र ह्याच गोष्टी देणे गरजेचे होते असे संकेतस्थळावरील माहितीवरून कळले होते. पण साधारण २ तासांनी कळले की पासपोर्ट मध्ये व्हिसा असल्याने पासपोर्टच्या सर्वच्या सर्व ३६ पानांची छायाप्रत घेणेही क्रमप्राप्त होते. ते ही दोन प्रती. ते काम संपवून आलो. त्याकरीता कार्यालयाच्या बाहेर जावे लागले. हीच माहिती ते संकेतस्थळावरही देऊ शकत होते पण दिली नव्हती. ह्या वेळात एकदम बाहेर नाही  पण त्यांच्या इमारतीतही छत असलेल्या पण बाजूनी मोकळ्या असलेल्या जागेत आपल्या क्रमांकाची वाट पाहत लोक उभे होते. मस्त उकडत होते. साधारण १:४५-१:५० ला माझा क्रमांक फलकावर झळकला. पण आत गेलो तर त्यांची जेवणाची वेळ झाली होती. तोपर्यंत इतरत्र लोकांच्या गोष्टी ऐकत थांबलो. २:१०-२:१५ ला खिडकी सुरू झाली. माझा क्रमांक आला तेव्हा जास्त वेळ लागला नाही. सर्व कागदपत्रे तयारच होती. व्हिसा आहे असे कळल्यावर पासपोर्टवर Cancelled चा शिक्का मारून परत देण्यात आला. 'पत्त्यात बदल नसल्याने पोलिस तपासणीची गरज नाही व पासपोर्ट ३०-३५ दिवसांत येईल', असे सांगितले. साधारण ३० दिवसांत माझा नवीन पासपोर्ट माझ्या हातात आला.

ह्यावेळी माझ्या मुलाचे पारपत्र बनविण्याकरीता कार्य हाती घेतले. गेल्यावर्षी माझे पारपत्र आल्यानंतर मुलाचे काम करायचे होते. आधीच्या अनुभवाप्रमाणे साधारण १२-१५ दिवसांनतरची तारीख मिळते असा अंदाज धरून माझ्या कार्यालयात सांगितले होते की मला त्याप्रमाणे सुट्टी घ्यावी लागेल.  पण कार्यालयीन कामामुळे वेळ मिळाला नाही. दरम्यान, पासपोर्टच्या संकेतस्थळावर माहिती वाचली की जुन्या पासपोर्ट कार्यालयात नवीन अर्ज स्विकारत नाहीत. त्याकरीता नवीन सुरू केलेल्या 'पासपोर्ट सेवा केंद्रात' अर्ज द्यावा लागेल. ठाण्यातील 'पासेकें' शोधले ते जुन्या कार्यालयाच्या थोडे पुढेच आहे.

सध्या कामाचा व्याप कमी झाल्याने आधी हे काम संपविण्याचे ठरविले. संकेतस्थळावरून माहिती काढली ती अशी-
१. पासपोर्टची अर्ज फी वाढली आहे. मुलांकरीता आधी रू. ६००/- होती ती आता रू. १०००/- झाली आहे. १८ वर्षांवरील लोकांकरीता १००० रू. वरून १५०० रू. केली आहे.
२. महानगरपालिकेकडून दिलेला मुलाच्या जन्माचा दाखला.
३. आई-वडिलांचा पासपोर्ट असल्यास, आणि एकमेकांच्या पासपोर्टमध्ये नाव नोंदले असल्यास मुलाच्या पासपोर्टकरीता इतर प्रमाणपत्रांची/दाखल्यांची गरज नाही.
४. आई-वडिलांची सही असलेले प्रमाणपत्र.
५. अरे हो, छायाचित्र (वास्तविक प्रकाशचित्र ;) ) राहिले. सर्वांचे छायाचित्र आता 'पासेकें'वरच काढतात. पण ४ वर्षांखालील मुलांचे छायाचित्र सोबत घेऊन जायचे आहे. ह्याआधी त्याचे माप ३५मिमि x ३५मिमि होते ते आता ३५मिमि x ४५मिमि केले आहे.

गेल्या वर्षीपेक्षा नवीन एक गोष्ट होती की आता पासपोर्टच्या संकेतस्थळावर एक नवीन खाते उघडून त्यातूनच पासपोर्टचे अर्ज देणे गरजेचे होते. त्याबाबत माहिती काढण्याकरीता त्यांच्या सेवा केंद्राला फोन केला. तेव्हा त्यांनी माहिती दिली की मुलाच्या नावानेच खाते उघडावे लागेल. पण तो माहिती भरू शकणार नाही म्हणून मग मी ते वापरू शकतो. :D मग तिला कळले की मुलाचे वय फक्त १ वर्ष आहे तर माहिती दिली की ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही, मी थेट पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊ शकतो. दरम्यान १-२ दिवसांचा खंड पडला. मग ज्या दिवशी जायचे ठरले त्या दिवशी सुट्टी तर नाही ना ह्याची खात्री करण्याकरीता त्याच्या आदल्या दिवशी पुन्हा फोन केला. तेव्हा माहिती मिळाली की लहान मुले, ज्येष्ठ नागरिक ह्यांना तारीख ठरवून ठेवण्याची गरज नाही. ते थेट जाऊ शकतात पण त्याकरीता संकेतस्थळावर अर्ज भरावा लागेल आणि तो अर्ज दिल्याच्या २४ तासांनंतरच जाऊ शकतो. मी अजूनही संकेतस्थळावर अर्ज दिला नव्हता. त्यामुळे माझा जायचा दिवस एक दिवसाने पुढे ढकलला. खाते बनवून अर्ज भरला. शेजार्‍यांची माहितीही (दोन व्यक्तींची साक्ष? म्हणून ) भरली.

४ एप्रिल ला सकाळी ९:१५ च्या आसपास निघालो. पासपोर्ट सेवा केंद्राच्या द्वारापाशीच सुरक्षारक्षकाने विचारले, "कोणाचा पासपोर्ट?", मुलाचा असे सांगितल्यावर कुठे आहे असे विचारले. मागून येण्यार्‍या बायको आणि मुलाकडे बोट दाखवले. त्याने अर्जाच्या प्रतीवर वेळ लिहिली ९:३५. आणि सांगितले,"मुलासोबत तुम्ही दोघेच जाऊ शकता".
आत गेल्यावर पाहिले, डावीकडे छायाप्रत (झेरॉक्स) काढण्याकरीता खिडकी, पुढे  संगणक होते आपल्या वापराकरीता. उजवीकडे ३-४ रांगा. त्यात पहिली रांग लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांकरीता. तिथे रांगेत लागून अर्जाची प्रत दिली. त्याने बारकोड स्कॅनरने माहिती उघडली. सर्व कागदपत्रे (प्रती आणि मूळ) मागितले. चाचणी करून प्रती घेतल्या. एका कागदी फाईल मध्ये लावून दिले आणि टोकन क्रमांक दिला. (वेळ अंदाजे ५ मिनिटे.)

तिकडून दुसर्‍या भागात गेलो. काऊंटर A. बसण्याकरीता खुर्च्या आणि समोर टोकन क्रमांक दाखविण्याकरीता टीव्ही फलक. आमचा टोकन क्रमांक - खिडकी क्रमांक लगेच लागला. खरं तर त्या खिडक्या नाहीतच. वेगवेगळे बसण्याच्या चौकटी. टेबलवर संगणक, एक स्क्रीन आपल्याक्डे एक त्यांच्याकडे. समोरच कॅमेरा ठेवला. त्या कर्मचारीने सांगितले मुलाला घेऊन समोर बसा. अनिता त्याला घेऊन बसली. मी दुसर्‍या खुर्चीवर. मला वाटले पुन्हा छायाचित्र घेतात की काय म्हणून त्याचे केस ठीक करायला लागलो. त्यावेळेत त्या महिला कर्मचारीने अर्जावरील बारकोडने माहिती उघडली. आम्हाला विचारले, "माहिती बरोबर आहे का ते पहा". आमच्या पत्यात एक ओळ टाकायची होती जी संकेतस्थळावरील अर्जात जागा कमी असल्याने देता येत नव्हती. ती भरायला सांगितली. ते अद्ययावत केल्यावर मग तिने शिक्याकरीता वापरणार्‍या शाईच्या डब्यावर मुलाचा अंगठा लावला. त्यानेही एकदम आरामात हात दिला. पण मग जेव्हा अर्जावर अंगठा लावायला त्याचा हात पुढे घेतला तर तो रडायला लागला. :) एक पिटुकला अंगठ्याचा ठसा अर्जावर घेउन मग सर्व कागद पत्रे, छायाचित्रही स्कॅनरवर ठेवून त्यांची प्रतिमा घेण्यात आली आणि ते आमच्या फाईलनंबरपुढे जोडण्यात आले. तिथेच अर्जाची फी घेतली गेली व त्याची पावती दिली. (वेळ अंदाजे १० मिनिटे.)

मग आला पुढचा कार्यविभाग - कागदपत्रांची पडताळणी (Verification) काऊंटर B : इथेही जास्त वेळ थांबावे लागले नाही. आमचा क्रमांक आल्यावर त्यांनी सर्व मूळ कागदपत्रे मागितली. प्रत्येकासमोर पडताळणीची खूण केली व संगणकात माहिती अद्ययावत करून आम्हाला जायला सांगितले. (वेळ अंदाजे ५ मिनिटे.)

पुढील कार्यविभाग - पासपोर्ट मान्यता (Passport Granting) काऊंटर C: इथे तुलनेने जरा जास्त वेळ लागला. साधारण १०-१५ मिनिटे. पण आमचा क्रमांक आल्यावर तिथेही त्यांनी फक्त सर्व कागदपत्रे पाहिली, आणि संगणकात माहिती अद्ययावत करून सांगितले, 'जाऊ शकता'. मी विचारले, "पासपोर्ट अर्जाची पावती हीच का?" तर त्यांनी सांगितले, "नाही. Exit काऊंटर वर हे द्या व पावती घ्या." पासपोर्ट साधारणतः १५ दिवसांत मिळेल असे सांगितले. (वेळ अंदाजे १० मिनिटे.)

पुढील खिडकी: Exit काऊंटर. ते कुठे आहे तेच दिसले नाही. मग बाहेर जाणार्‍या दरवाज्याच्या बाजूला वर त्याचा एक फलक दिसला . तिकडे जाऊन अर्ज भरल्याची पावती घेतली.

बाहेर निघताना त्यांनी पूर्ण प्रक्रियेवरील आमचा प्रतिसाद कसा आहे ह्याबाबत माहिती भरून द्यायला सांगितली (Feedback Form ) आणि मगच बाहेर पाठवले.

गेल्या वर्षातील पासपोर्ट कार्यालयातील अनुभव पाहिला तर पासपोर्ट सेवा केंद्रावरील अनुभव हा फारच वेगळा आणि सुखावणारा होता. अर्थात, मुलाचा पासपोर्ट असल्याने त्यात कमी वेळ लागला. आम्ही ४० मिनिटांत बाहेर होतो. आमच्यापैकी इतरांचा पासपोर्ट असल्यास बहुधा २-३ तास लागलेही असते. पण एकंदरीत त्यांनी एकूण प्रक्रियेत केलेला बदल हा चांगलाच वाटला.

थोडे त्यांच्या संकेतस्थळाविषयी - http://www.passportindia.gov.in
पासपोर्ट सेवेचे संकेतस्थळ वापरास चांगले वाटले. माहिती शोधण्यास जास्त श्रम लागले नाहीत. नवीन पासपोर्ट अर्ज करण्यास जी काही पाने उघडतात ती भरण्यास मला काही खास अडचण वाटली नाही. एक सोडून,जी मी आधी सांगितली आहे. आमचा पत्ता पूर्ण लिहिता आला नाही. त्याकरीता मग पासपोर्ट सेवा केंद्रावर अद्यतन करावे लागले. अर्जासोबत दिले जाणारे कागदपत्र आपण स्वतःच जोडू शकतो.

काही उणीवा:

१. नवीन खाते बनविताना, मी ईमेल पत्त्यात एक अक्षर चुकीचे टाकले. त्यामुळे मला validation email मिळाला नाही. वापरलेल्या सदस्यनावाने प्रवेश करायचा प्रयत्न केला तर लिहून आले की खाते अजून सुरू झालेले नाही. विपत्रात पाठवलेल्या दुव्यावर टिचकी मारून खाते सुरू करावे लागेल. (हे सगळे इंग्रजीत होते मी मराठीत भाषांतर करून लिहिले आहे :) ) त्यामुळे मग पुन्हा एक नवीन सदस्यनावाने खाते बनविले. ह्यावेळी ईमेल पत्ता दिला नाही. तर खाते लगेच सुरू झाले होते.
२. अर्ज भरता भरता मध्येच 'खाजगी विमा कंपनीला आपली माहिती द्यावी का जेणेकेरून ते आपल्याशी विम्याकरीता संपर्क करू शकतील' अशी विचारणा करणारी जाहिरात दाखविली गेली. हे मला तितकेसे पटले नाही. आपली माहिती त्यांना देऊन मग ते आपल्याला संपर्क करतील ह्यात DNC चा ही भंग होणार होता.
३. व्हिसा असल्यास कोणकोणत्या पानांच्या प्रती लागतात ह्याची माहिती मला मिळाली नाही.
४. संकेतस्थळावरच लिहिल्याप्रमाणे पोलिस पडताळणी नसल्यास तिसर्‍या दिवशी पासपोर्ट पाठवला जाईल अशी माहिती वाचली. पण सेवा केंद्रात मिळालेल्या माहितीप्रमाणे १५ दिवस लागणार होते.

जाता जाता:
पासपोर्टकरीता सेवा केंद्रात जाऊन आलो त्याच दिवशी खरे तर मी हे लिहिण्यास सुरूवात केली होती. पण काही कारणांमुळे वेळ लागत गेला. त्यात मग संकेतस्थळावर माहिती वाचली पासपोर्टची घपाई झालेली आहे आणि तो रवाना केल्यावर sms किंवा email पाठविण्यात येईल. म्हणून वाट पाहत बसलो की पासपोर्ट हातात आल्यावर पूर्ण कालावधी मोजून हे लिखाण अनुदिनीवर टाकेन. पण सध्याच्या माहितीप्रमाणे पासपोर्ट शुक्रवारी स्पीडपोस्ट ने पाठवला आहे परंतु अजून हाती पडला नाही तसे पोस्टाच्या संकेतस्थळावर त्याची माहिती उपलब्ध नाही. म्हणून वाटले जेवढे मनात आले तेवढे लिहून टाकूया.


अद्यतन :- आज २३ एप्रिल ला पासपोर्ट घरी आला. म्हणजे एकूण १९ दिवसांचा कालावधी. सांगितल्यापेक्षा जास्त वेळ लागला. पण एकंदरीत चांगली सुविधा.


एप्रिल १८, २०१३


कडकडीत ठाणे बंदला हिंसक वळण

अनधिकृत बांधकाम कारवाई विरोधात ठाणे बंद

ठाणेकर वेठीला!

शिळफाट्याला इमारत कोसळल्यानंतर अनधिकृत असलेल्या इमारतींवर कारवाई करण्याचे ठाणे महानगर पालिकेने ठरविले. त्याला सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग इतर पक्षांनी विरोध केला. ह्या विरोधाबद्दल ह्या पक्षांकडून ठाण्यात आज बंद पाळण्यात येत आहे. ह्यात शिवसेनाही सामिल आहे.

ह्याबद्दल काय बोलणार? पण साधेसुधे प्रश्न पडतात ते असे...

१. अनधिकृत बांधकाम जेव्हा उभारले जात असते तेव्हा कोणी लक्ष का घालत नाही? ते काय एखादे भातुकलीच्या खेळातील घर नसते, नजरेत न पडायला.
२. अनधिकृत बांधकाम असले तरी ते त्या इमारतीप्रमाणे तकलादू असेलच असे नाही. मग ती इमारत कोसळली हे कारण धरून आत्ताच ही कारवाई कशी?
३. दुसर्‍या प्रश्नावरून अनधिकृत बांधकाम अधिकृत करावे का असा मुद्दा येतो तो योग्य आहे का?
४. बंद पुकारला असल्यास त्याने आम्हा लोकांना त्रास का द्यावा, जबरदस्तीने बंद करून तुमचे म्हणणे मान्य होते का?
५. आणि ठाणे महानगरपालिका शिवसेनेच्या हातात असून त्यांच्याच कारवाईविरोधात  तोच पक्ष ह्या बंद मध्ये सामिल आहे, ह्यावरून नक्की काय सूचित होते?

एप्रिल १६, २०१३


सीएनबीसी आवाजच्या माहितीनुसार फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (एफडीए) रिवाईटल आणि स्लिम टी ह्या उत्पादनांची चौकशी करीत आहे आणि त्यांना त्याचे वैज्ञानिक पुरावे मागितले आहेत. जर का त्यात काही खोटेपणा आढळला तर त्यांना दंड लावण्यात येईल.

 

चला, हे चांगले होईल की ह्यामुळे चुकीचे, अवास्तव परिणाम दाखवून आपला माल विकणार्‍या लोकांवर ह्याने वचक बसण्याची शक्यता आहे. पण त्यांना आकारण्यात येणारा दंड फक्त १० लाख रूपये? फार कमी वाटतो.
आधीही त्यांनी म्हणे खाद्यतेल बनविणार्‍या कंपन्यांनाही अशीच कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.
अशाच प्रकारच्या दुसर्‍या जाहिराती म्हणजे:



१.  'शुभ धन वर्षा' : आपले आर्थिक संकट दूर करून अमर्यादीत धनसंपदा देते. अशाप्रकारे धन मिळत असेल तर आयकर खात्यानेही ह्यांची चौकशी केली पाहिजे की एवढा पैसा येतो कुठून?



२. 'नजर सुरक्षा चक्र': जाहिरातीतच दाखवल्याप्रमाणे एखाद्या माणसाची नजर लागणारे किरण ह्या कवचाद्वारे दूर ठेवले जातात. अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही ह्यात लक्ष घातले पाहिजे.

तुम्हाला काय वाटते? :)  

एप्रिल १५, २०१३


आजकाल प्रत्येक ठिकाणी निधर्मी राज्य वगैरे शब्द भरपूर वेळा ऐकायला मिळते. खरं तर त्याचा अर्थ राजकारणी लोक आणि वृत्तमाध्यमं ह्यांनी जात-धर्म ह्यावर अवलंबून ठेवला आहे.

मी सहज मोल्सवर्थच्या मराठी-इंग्रजी शब्दकोषात अर्थ पहायचे म्हणून शोधले तर तो शब्दच त्या शब्दकोषात नाही.

काही महिन्यांपूर्वी, वपुंच्या 'टेकाडे भाऊजी' ह्या आकाशवाणीवर पूर्वी प्रसारीत झालेल्या मालिकेची MP3 सीडी दुकानात मिळाली. त्यात ह्या शब्दाचा वेगळा अर्थ ऐकायला मिळाला.

- शांततेने पार पाडू शकणार्‍या गोष्टींना वाकडं वळण लावण्याकरीता काही विध्वंसप्रेमी टपलेली आहेत हे काय कमी वेळा सिद्ध झालंय? पुढार्‍यांची आणि पक्षाची बदनामी, चार गुंडशाही लोकांचा फायदा, शहराचं नुकसान आणि निरपराधांचा गोळीबारात मृत्यू इक्वल टू कोणतंही आंदोलन.
.....
- प्रत्येकानं आपापला धर्म सोडायचा आणि जातीवरून दंगली पेटवायच्या.
- ते ही निधर्मी राज्याच्या नावाखाली.
- मी सांगते, निधर्मी राज्य हा शब्दच फसवा आहे.
- मुळीच नाही, ह्याचा विचारच कुणी आत्तापर्यंत केला नाही. ह्या शब्दाचा अर्थ फार निराळा आहे. अरे, प्रत्येकाने आपापला धर्म पाळायचा म्हणजे कर्तव्य. धर्म म्हणजे कर्तव्य. नोकराने नोकराचा धर्म. व्यापार्‍याने व्यापार्‍याचा, विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचा. प्रत्येकाने आपला धर्म पाळला की सगळ्या राष्ट्राचा धर्म एकच होतो.

निधर्मी राज्य म्हणजे काय त्याचा हा अर्थ मला तरी पटला ;)

एप्रिल १२, २०१३

पुन्हा आपले तेच. नुसती चालढकल. गेल्या ऑगस्टनंतर एकही टंकन नाही. तसे तर गेल्या वर्षभरात फक्त ६ च वेळा लिखाण झाले. अर्थात कार्यालयीन कामामुळे वेळ मिळाला नाही म्हणून अनुदिनीने एक झोप काढली.


आता थोडा वेळ मिळतो आहे तर पुन्हा गाडी रूळावर आणण्याचा प्रयत्न करतो. सध्या तरी मनात ३/४ विषय चाललेत. ते म्हणजे:
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट सेवा केंद्राचा अनुभव
  • सोने 
  • एक लेखमाला आपल्या आर्थिक गुंतवणूक आणि त्यांच्या करप्रणालीची.
  • आणि हो…. अनुदिनीचा अवतार/चेहरा बदलणे :)
 ह्यावर लवकरात लवकर लिहिण्यास सुरूवात करण्याचे लक्ष्य ठेवत आहे.


इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter