ऑगस्ट १४, २०१२

नवी मुंबईमध्ये प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घालण्यात आल्याची बातमी काल रात्री वाचली.
चांगला उपक्रम. अर्थात त्यामागील कारणामुळे. राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी.


पण आम्हाला एक प्रश्न पडतो आणि सुचवावेसे वाटते की असे नियम सणासुदींच्या, दिनांच्या २/३ दिवस आधीच का आणले जातात? ते आधीच का नाही कार्यान्वित करत? आता त्या झेंड्यांच्या उत्पादकांनी झेंडे वितरकांना देऊन दुकाना-दुकानातून आणि रस्त्यांवरून विकले गेलेही असतील आणि आज उद्याही विकले जातील. विक्रेता म्हणेल मी आत्ता हे झेंडे न विकून माझे नुकसान का करून घेऊ? वितरक आणि उत्पादक ही तेच म्हणतील.

अशीच गोष्ट गणेश मूर्तींबाबतही. पर्यावरणाच्या रक्षणाकरीता प्लास्टर ऑफ पॅरिस पेक्षा शाडू मातीच्या मूर्ती बनवाव्यात असे आवाहन आणि नियमही गणेशोत्सवाच्या १० दिवस आधीपासून लोकांपर्यंत येतील. पण जर अशा मूर्ती ३-३ महिने आधीपासून बनविल्या जातात तर तेव्हाच असे आवाहन का केले जात नाही? तेव्हाही विक्रेता हेच म्हणेल मी आत्ता ही मूर्ती न विकून माझे नुकसान का करून घेऊ? 

ऑगस्ट १०, २०१२

आज गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव.


दहीहंडी फोडणार्‍या गोविंदांवर पाणी ओतण्याची प्रथा वर्षांपासून चालत आहे. पण गेले काही वर्षे तर पाण्याचे टँकर मागवून त्यातून ह्या लोकांवर पाणी टाकणे अशी नवीन प्रथा मोठ्या लोकांनी सुरू केली. हा जरा विचित्रच प्रकार. कित्येक गावांत लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि इथे अशा प्रकारे पाणी वाया घालविले जाते हे पटतच नाही. तरी ह्यावर्षी मुंबईमधील पथके ह्याबाबत जनजागृती करत 'पाणी वाया घालवू नका' असा संदेश देत आहेत असे वाचले (दुवा येथे पहा). चांगले आहे. असेच लोकांनी सर्वत्र करावे अशी मागणी आणि आशा.

अर्थात जर पाऊस पडत असेल तर अशा प्रकारे वाया जाणारे पाणी वाचवता येईलच. पण पाऊसच जास्त पडत नाही मग लोकांना असले मार्ग सुचतात. तरी आता कार्यालयात शिरता शिरता जोरात पाऊस पडणार असल्याची लक्षणे आकाशात दिसली. ५ मिनिटे जोरात पाऊसही पडला. आजच्या दिवस तरी भरपूर पाऊस पडो अशी अपेक्षा.


ऑगस्ट ०९, २०१२

रक्तदान जीवनदान. आपण दिलेले रक्त कोणाला तरी उपयोगी पडते आणि आपल्याला काहीच नुकसान होत नाही, कारण २० ते ५० दिवसांत दिलेले रक्त भरून येते.

लहानपणापासून ही माहिती होती. पण स्वतः रक्त कधी दिले नाही. आधीही २/३ वेळा कार्यालयीन शिबिरात अशी संधी चालून आली होती, पण प्रत्येक वेळी नेमके त्याच दिवसांत मी आजारी असल्याने किंवा इतर काही कारणांनी औषधे घेतली असल्याने मला ते पुढे ढकलण्यास सांगितले गेले.

आज ती संधी पुन्हा चालून आली. ह्यावेळी असा काही त्रास नसल्याने पहिल्यांदा रक्तदान करण्याचा आनंद घेतला.

जून ११, २०१२

'एकट्याने खाल्ले तर शेण, सर्वांनी मिळून खाल्ले तर श्रावणी' अशी काहीशी एक म्हण आहे.

अशीच समजूत आजकाल वाहनचालकांनी करून घेतली आहे असेच दिसते. सिग्नलला लाल दिवा असला तरी सर्वांनी मिळून गाड्या हाकल्या तर काही हरकत नाही. सर्वांनी केले म्हणजे नियम तोडला नाही' असा विचार सर्वांचा असावा.

असो बुवा. माझे त्याबद्दल काही म्हणणे नाही (सध्यातरी ;))

ह्यावरून कधीतरी आधी वाचलेला विनोद उगाच आठवतो. खरं तर इंग्रजी भाषेत होता, त्याची खास मजा त्याच शब्दांत येते. पण सध्या भाषांतर करण्यासारखे वाटले म्हणून.

एका मोठ्या रस्त्यावर एक वाहनचालक आपली गाडी भरधाव वेगाने चालवत होता. वेगमर्यादेचे उल्लंघन करून. पण त्याला एवढी चिंता नव्हती कारण त्या रस्त्यावर बहुतेक सर्वच त्याच वेगात जात होते.
पण पुढे एका ठिकाणी पोलिसाने त्याला अडविले आणि वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याचा दंड भरण्यास सांगितले.
हा माणूस म्हणाला, "पण मी एकटाच का? इतरही सर्व नियम मोडून गाडी चालवत आहेत."
त्यावर तो पोलिस म्हणाला, "तू कधी मासे पकडायला गेला आहेस का?"
चालकः "हो"
पोलिसः "तुला पाहिजे असलेले सर्वच मासे गळाला लागतात असे थोडेच आहे?"


आता आपण शेण खातोय की श्रावणी, की गळाला लागलेला मासा बनतोय, ह्याचा विचार ज्याने त्याने करावा. :)

मे २४, २०१२




पुन्हा ती (पेट्रोल) दरवाढ...
पुन्हा लोकांचा तो राग...
पुन्हा विरोधकांचा तो निषेध...
पुन्हा आपले तेच तेच जुने विनोद विपत्रातून, फेसबुकमधून फिरविणे...
पुन्हा ती कणभर कमी केलेली वाढ...
पुन्हा ते लोकांचे सरकारला मत न देण्याचा विचार...
पुन्हा ते सर्वांचे इतर गोष्टींप्रमाणे सवय करून घेणे...
पुन्हा ते सर्व सोसत जगणे...
...
...
...
पुन्हा ती (पेट्रोल) दरवाढ..............................................................

(चित्र आंतरजालावरून साभार)

मार्च २३, २०१२


त्या अनोळखी झाडाला चैत्रपालवी फुटली होती. कुणीही आपल्याकडे पाहत नाही हे ठाऊक असूनही चैत्र आल्याची वार्ता सांगत ते झाड उभं होतं. माझ्याखेरीज त्या उभ्या आणि वाहत्या गर्दीतली एकही मान उंचावली नव्हती. तरीही हे झाड नवी पालवी दाखवत सांगत होतं, अरे, नवं वर्ष म्हणजे नवी पालवी! नवी पालवी म्हणजे नव्या आशा. नव्या वर्षाचं स्वागत म्हणजे नव्या आशांचं स्वागत. साखर स्वस्त होणार, मुलांना हव्या त्या शाळेत सक्तीच्या देणगीशिवाय प्रवेश मिळणार, आपल्या चाळीतील सगळ्या उपवर मुलींची लग्नं बिनहुंड्यात जमणार, वरळी सी फेसवर फ्लॅट देणारे चिक्कार सासरे भेटणार; अशा वैयक्तिक आशांपासून ते सत्तेवरच्या पक्षाचं राज्य कोसळून आपल्या पक्षाचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही; ह्या पराभूत पक्षांना युगानुयुगं पडणाऱ्या चिरंजीव भ्रमाचं स्वागत. आजचा दिवस हा असल्या नाना प्रकारच्या स्वप्नांच्या स्वागताचा आहे. नव्या वर्षाचं नवंपण ह्या असल्या जुन्या गळून गेलेल्या पानांच्या जागी नवी पालवी फुटणाऱ्या दृढ विश्वासात आहे. मनाच्या काचेवर गेल्या वर्षातल्या निराशांची धरलेली काजळी नव्या वर्षाच्या पाडव्याच्या दिवशी पुसून टाकली पाहिजे. दिवस दिवसांसारखेच असतात, पण एकाच स्त्रीनं आज हे नेसावं, उद्या ते नेसावं, आज ही फुलं माळावीत, उद्या ती फुलं माळावीत आणि कालच्यापेक्षा आज आपलं आपल्यालाच निराळं वाटून घ्यावं; तसंच दिवसांनाही आज पाडवा म्हणून नटवावं, उद्या दसरा म्हणून, परवा दिवाळी म्हणून. आपण आपल्या त्याच खोलीतली खाट एकदा इकडे आणि एकदा तिकडे ठेवून खोली निराळी करतो, तसं तेचतेच दिवस निराळे करणं आपल्या हातात आहे. फक्त झाडांना फुटते, तशी नवी पालवी  मनाला फुटली पाहिजे.
- गाठोडं (पु. ल. देशपांडे)

सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter