डिसेंबर ३०, २०१०

गेल्या आठवड्यात नागपूरला जाण्याचा योग आला. साधारण ६ १/२ वर्षांनंतर फेरी होत होती, मे २००४ नंतर. स्वत:च्या कामाकरीता मामेभावासोबत त्याच्या दुचाकीवरच तिकडे भटकंती(ढोबळ मानाने) करता आली.  त्याबद्दल थोडेसे.

मी तिकडे पोहोचलो बुधवारी रात्री. ठाणे- मुंबईत तापमान २० च्या खाली जाऊन थंडी वाढली तेव्हा तिकडचे तापमान १० च्या खाली आहे असे बातम्यांमध्ये ऐकत होतो. त्यामुळे त्या तयारीनेच गेलो होतो. पण विमानातून उतरतानाच त्यांनी घोषणा केली बाहेरचे तापमान २१.५ आहे. बाहेर भाऊ भेटला, तो म्हणाला आज थंडी नेहमीपेक्षा खूप कमी आहे. माझ्या पूर्ण सहलीत तापमान वाढलेलेचे होते. आता थंडी कमी म्हणून आनंद मानावा की नागपूरची थंडी अनुभवता येणार नाही ह्याची खंत? ;)

२००१/२ मध्येच पाहिल्याप्रमाणे, ठाणे शहरानंतर तिकडे गेलेल्या टी. चंद्रशेखर ह्यांनी नागपूर शहराचा कायापालट केला होता. रस्ता रुंदीकरण ही त्यातली मोठी गोष्ट. सगळीकडे फिरताना मोठे मोठे रस्ते दिसत होते. त्यामानाने तर ह्यावेळी भरपूर बदल दिसला होता. रस्ते तर काय शहराचाच विस्तार दिसत होता.

ह्याच विस्ताराकरीता कारणीभूत असणारे एक आहे नागपूर सुधार प्रन्यास किंवा Nagpur Improvement Trust (NIT).


 पण सुधारणांच्या प्रशंसेसोबतच त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागते. कारण नागपूर महानगर पालिकेसोबतच लोकांना मालमत्तेच्या कामाकरीता ह्यांचे वेगळे नियम ही पाळावे लागतात आणि त्यांना वेगळे कर वगैरे देणेही.


तसेच पाहिलेले (NITचेच) Krazy Castle Aqua Park. पाण्यातील खेळांचे उद्यान. आतून तर नाही पाहिले, पण त्याच्यासमोरून फिरताना जमेल तसे चित्र घेण्याचा प्रयत्न केला.


ही आहे रिझर्व बँकेची इमारत.



नागपूर शहर भारताच्या केंद्रस्थानी आहे हे माहित होते. पण त्याचे एक शून्य मैलाचे स्थान आहे व तिकडे काही वास्तूही उभारली आहे हे माहित नव्हते. ह्या भटकंतीत हे ही पाहून घेतले.


ह्या शून्य मैलाच्या दगडाशेजारी आधी एक पेट्रोलपंप होते, जे ह्या चित्रात स्तंभाच्या मागे आहे. (ह्या चित्राचे स्त्रोतः विकिपिडिया)


पण ह्या जागेचे वेगळे महत्व असल्याने त्यांना ती जागा रिकामी करायला सांगून दुसर्‍या एका मोक्याच्या ठिकाणी त्या पेट्रोलपंपाला जागा देण्यात आली. आता ती मोकळी जागा अशी आहे.
 

ह्या भटकंतीत एवढेच.

अरे हो राहिलेच.
हा पहा नागपूरचा सांताक्लॉज. अजुन एक पाहिला होता, लाल ऐवजी पूर्ण राखाडी/चंदेरी रंगाचे कपडे घालून. पण त्याचे छायाचित्र नाही घेता आले.



येताना नागपूरची प्रसिद्ध हल्दीरामची संत्र्याची बर्फी आणली आहे.
 


रविवारपर्यंत संपर्क केल्यास (आणि उरली असल्यास) मिळण्याची शक्यता सांगू शकतो ;) 

डिसेंबर २९, २०१०

"लता मंगेशकर ए आर रहमान करीता पहिल्यांदा गाणार." 
’दिल से’ चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी त्या लोकांनी जाहिरात केली होती. मी आणि माझ्या मित्राची चर्चा चालू होती की लता मंगेशकर ने गाणे गायला सुरूवात केल्याच्या कितीतरी वर्षांनंतर हा संगीतकार आला. त्यात मग लता मंगेशकर ने त्याच्याकरीता गाणे गायले ह्यात एवढे काही खास नाही. (लता मंगेशकर ओ. पी. नय्यर कडे गायली नाही ही गोष्ट सोडा. ती गोष्ट घडली असती तरी बातमी झाली असती का माहित नाही.) पण चित्रपटसृष्टीत (आणि इतरत्र ही) असे पहिल्यांदा होणारी, खूप वर्षांनी होणारी गोष्ट प्रकाशझोतात आणली जाते. काही वेळा त्यात किती तथ्य असेल ते ही न पाहता. अनुराधा पौडवाल ने १९९८/९९ मध्ये कोणत्या तरी सिनेमात गाणे गायले होते तेव्हाही असेच काहीतरी म्हणत होते की अनुराधा पौडवाल १० वर्षांनी पुन्हा चित्रपटात गाणे गात आहे. पण त्या आधीच १९९७ मध्ये ’और प्यार हो गया’ चित्रपटात तिचे गाणे ऐकले होते. आता शोधले तर १९७६ ते २००८ मध्ये प्रत्येक वर्षी तिने गाणे गायलेले दिसते. त्यांना बहुधा ’टी सीरीज’च्या बाहेर १० वर्षांनंतर म्हणायचे असेल. आमिर खान आणि काजोलचा ’फना’ सिनेमा आला तेव्हा दोघे पहिल्यांदा एका चित्रपटात, एका फ्रेम मध्ये असे काही तरी चालले होते. पण त्या आधी दोघे ’इश्क’ चित्रपटात येऊन गेले होते हे ते लोक विसरले होते किंवा मग त्यांना हे दोघे नायक-नायिका जोडीत पहिल्यांदा आलेत असे म्हणायचे असेल.


असो. हे जुने झाले. आता नवीन ताजी बातमी आहे. मराठीतील दोन दिग्गज कलाकार/दिग्दर्शक पहिल्यांदा एकत्र येत आहेत, ’आयडियाची कल्पना’ ह्या नवीन चित्रपटात. ते दोघे आहेत महेश कोठारे आणि सचिन (पिळगांवकर). ही गोष्ट खरोखरच बातमीसारखी आहे असे मला तरी वाटते. गेले कित्येक वर्षे मी मराठी चित्रपटांबद्दल बोलतो तेव्हा ह्या दोघांचे नाव अर्थातच पुढे असते. त्यातच माझ्या निरीक्षणातील गोष्ट होती की महेश कोठारेच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे नेहमी असायचा आणि सचिनच्या चित्रपटात अशोक सराफ. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे अनुक्रमे सचिन आणि महेश कोठारेंच्या चित्रपटात अधून मधून असत. पण सचिन आणि महेश कोठारे हे एकमेकांच्या चित्रपटात नव्हते. आता कित्येक वर्षांनंतर महेश कोठारे सचिनच्या दिग्दर्शनाखाली त्याच्या चित्रपटात काम करणार आहे. ही माझ्याकरीता बातमीच आहे. 

तसेच ह्या चित्रपटाद्वारे आणखी एक गोष्ट पहिल्यांदा होत आहेत. ते म्हणजे गायनानंतर आता सचिनचे संगीतकार म्हणून नवीन क्षेत्रात पदार्पण.

सचिन आणि महेश कोठारेचा विषय निघालाच आहे तर आणखी एक जाणवलेली गोष्ट. सचिनच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेचे (आणि इतर सर्वजणांचेही) काम संतुलित वाटायचे. पण महेश कोठारेच्या चित्रपटात तो मोकाट सुटलेला दिसायचा. आणि बहुधा इतरही लोक. 

आता ह्या नवीन चित्रपटात पाहू कोणाचे काम कसे आहे ते आणि एकंदरीत पूर्ण चित्रपट कसा आहे ते.

(जाता जाता: आमिर खानचा पहिला चित्रपट ’कयामत से कयामत’ किंवा खरे तर ’यादों की बारात’ हा आहे. त्याच्या भावाचा, फैजल खानचा, पहिला चित्रपट कोणता? )

डिसेंबर २७, २०१०

’तीस मार ख़ान’ ह्या अक्षय कुमार अभिनित चित्रपटाबद्दल गेले काही दिवस ऐकत होतो, पाहत होतो. अक्षय कुमारचे ह्या आधीचे विनोदी चित्रपट आवडले होते ('दिवाने हुए पागल' सारखे अपवाद सोडून) त्याचे अशा चित्रपटांतील कामही आवडत होते. तसेच फराह खान चे ही ह्या आधीचे दोन चित्रपट (’मैं हू ना’ आणि ’ओम शांती ओम’) चांगले वाटले होते. म्हणून हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता होतीच. त्यात मग शनिवार २५ डिसें ला हा चित्रपट पहायची संधी मिळाली.





पण चित्रपटाच्या सुरूवातीलाच काही अंशी अपेक्षाभंगाला सुरूवात झाली. पहिल्या प्रसंगापासूनच सर्व लोकांचा म्हणजे सचिन खेडेकर, विजय पाटकर, अक्षय कुमार, अली असगर, कतरीना कैफ, अक्षय खन्ना ह्यांचा अभिनय हा नाटकीच वाटत गेला. आता नाटकी म्हणजे नाटकात पहायला मिळतो तसा नाही. तिथेही सुंदर अभिनय पहायला मिळतो. पण इथे तसला प्रकार नाही. गाणी बरी आहेत. ’शीला की जवानी’ हे बहुचर्चित गाणे मी तरी पहिल्यांदाच पाहिले. ऐकायलाच बरे वाटते. चित्रपटाची कथा तेवढी चांगली वाटली आणि पुर्वार्धापेक्षा उतरार्ध त्यामानाने चांगला आहे, थोडा वेगवान. त्यामुळे मग चित्रपट एकदम आवडला तर नाही पण कंटाळवाणा नाही वाटला. अरे हो, चित्रपटाच्या सुरूवातीचे आणि शेवटचे नामप्रदर्शन चांगले आहे.


फराह खानचा ’ओम शांती ओम’ आला तेव्हा ऐकले होते की ज्यांना ’मै हूं ना’ आवडला नसेल त्यांना ’ओम शांती ओम’ आवडेल. माझ्याकरीता तरी ’मैं हूं ना’ एकदम चांगला चित्रपट होता. ’ओम शांती ओम’ त्यापेक्षा कमी. पण ’तीस मार खान’ एकदमच कमी. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर एका तासात मी हा चित्रपट पाहिल्याचेही विसरून गेलो होतो.


माझ्याकडून तरी चित्रपटाला ५ पैकी २ ते २.५ तारे मिळतील ;)
(चित्रपटाचे चित्र indiafm.com वरून)

डिसेंबर २१, २०१०

जालरंग प्रकाशनाच्या शब्दगाऽऽरवा, हास्यगाऽऽरवा,ऋतू हिरवा, जालवाणी, दीपज्योती ह्या अंकांनंतर ’शब्दगाऽऽरवा २०१०’ ह्या हिवाळी अंकाचे प्रकाशन २० डिसें २०१० ला झाले.

ह्याचा दुवा http://hivaliank2010.blogspot.com

डिसेंबर १३, २०१०

आज संध्याकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर पाहिले की अमेरिकेत सलग ८६ तास दूरदर्शन पाहणार्‍या तिघा जणांची गिनिज विश्वविक्रमात नोंद करण्यात आली आहे. तसेच त्यांना १०००० डॉलर्सचे बक्षीसही देण्यात आले आहे. पण ८६ तास त्यांनी काय पाहिले त्याची बातमी मिळाली नाही.

आंतरजालावर बातम्या शोधणे आजकाल कठीण काम नाही. मी ती बातमी शोधायचा प्रयत्न केला. लगेच मिळाली ह्या दुव्यावर. एक '२४' नावाची मालिका पाहत होते ते लोक. तिच्या जाहिरातीकरीता त्या निर्मात्यांनी ही एक स्पर्धा ठेवली होती.

मनात विचार आला, मी ही एवढा वेळ दूरदर्शन पाहत असतो. आपल्या इथेही अशी स्पर्धा ठेवा की, नक्कीच जिंकेन. कारण जिथे सास बहू च्या मालिका, टुकार चित्रपट पचवायची सवय पडली आहे. (गेले काही वर्षे आमच्या घरात तरी त्या मालिका लागत नाहीत. पण चित्रपट तर आपली संस्कृती आहे, आणि चांगल्यातल्या चांगला ते वाईटातला वाईट चित्रपट पाहण्यासाठी विश्वविक्रम नक्की करू शकतो ;)) तिथे स्पर्धेकरीता असे कार्यक्रम पुन्हा पाहून घेऊ.

मग वाटले, कोणता कार्यक्रम ते जरा विचार करावा लागेल. कारण इमोशनल अत्याचार, बिग स्विच, बिग बॊस, राखी का इन्साफ वगैरे (हे मला माहित असलेले आणि डोक्यात जाणारे कार्यक्रम) असेल तर स्पर्धा जरी जिंकलो तरी त्याचा आनंद भोगता येणार नाही. कारण तिकडून थेट वेड्यांच्या इस्पितळात भरती व्हावे लागेल.

पण तेव्हाचे तेव्हा पाहू. आता तरी सलग किती तास दूरदर्शन पाहू शकतो ते मोजायला सुरूवात करू का? स्पर्धेचा बिगुल वाजला की लगोलग कार्यालयातही आठवड्याभराची सुट्टी टाकता येईल. ;)

डिसेंबर ०९, २०१०

साधारण २००६ पासून ऐकण्यात असलेली ’मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी’ सुविधा अखेर २५ नोव्हें २०१० पासून हरियाणामध्ये सुरू झाली. इतर भागांत ती २० जाने २०११ पासून सुरू होईल अशा बातम्या आहेत.

मी ह्या ४ वर्षांत ३ क्रमांक बदलले. पण ह्या सुविधेचा मला फायदा झाला नसता, कारण माझे शहर आणि मोबाईलचे क्षेत्र ह्यांतच बदल होत गेला. आणि सध्यातरी ह्या सेवादात्याकडून एकदम बदलूनच टाकावे अशी काही वाईट सेवा नाही. तरीही ही सुविधा नेमकी कशाप्रकारे वापरता येईल हे पहायचा प्रयत्न केला. त्यात मिळालेली चांगली माहिती तुम्हालाही सांगावी असे वाटले.


मराठीमध्ये तरी ह्याबाबतची माहिती मला मटाच्या संकेतस्थळावरच मिळाली. त्यासोबतच इतरत्र आणखी माहिती शोधायचा प्रयत्न केला.


दूरसंचार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अर्थातच सर्व सूचना/माहिती आहेच. पण बहुतेक वेळा ती आपल्यासारख्या सर्वांना समजण्यासारख्या सोप्या भाषेत नसते. पण तिकडे पाहिल्यावर भरपूर कळण्यासारखे वाटले ;).


त्या सर्व माहिती/नियम पुस्तिकांचे दुवे.

    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/87/Backgroundnote.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/87/draftregulation30june09.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/89/Regulation23sep09.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/90/Regulation20nov09.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/91/MNPRegulation_amendment28jan10.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/97/MNP_Regulation24nov10.pdf


"मलेशियामध्ये सध्या ही सेवा सुरू असून तेथे अॅक्टीव्हेशन आणि डीअॅक्टिव्हेशनमध्येच अडथळे येत आहेत. त्यामुळेच तेथे ही सेवा यशस्वी झालेली नसल्याचे टेलिकॉम क्षेत्रात ऑडिट आणि सल्लागाराची जबाबदारी पेलत असलेले केपीएमजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रोमाल शेट्टी सांगतात."
मटावरील ह्या वाक्यामुळे असे वाटले की फक्त मलेशियातच ही सुविधा सुरू आहे. पण अमेरिका आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया वगैरे देशांमध्येही सुविधा आहे असे ऐकून होते. त्यामुळे संभ्रम झाला. पण मग विकिपिडियावर त्याबाबत दिलेल्या माहितीप्रमाणे ५० पेक्षा अधिक देशांनी आधीच ही सुविधा सुरू केली आहे. विकिपिडियावर अर्थातच नेहमीप्रमाणे सुरेख माहिती दिली आहे.

त्यातूनच मग मला दुसर्‍या संकेतस्थळाचा दुवा मिळाला, जिथे भारतातील मोबाईल नंबर पोर्टेबिलीटीबाबत माहिती आणि सर्वसाधारण किंवा नेहमी पडणार्‍या प्रश्नांची  उत्तरे दिली आहेत.


मटावर तर मुद्देसूद माहिती दिलेलीच आहे. तरीही ज्या काही गोष्टी लिहिल्या नाहीत त्या म्हणजे.

    * सुविधा घेण्याकरीता PORT < NUMBER > असा एसएमएस १९०० ह्या क्रमांकावर पाठवायचा आहे. उदा. PORT 9812345678
    * जुन्या प्रिपेड कार्डची उरलेली रक्कम नवीन कार्डवर नेता येणार नाही.
    * जुन्या कंपनीचे सिम कार्ड नवीन कंपनीच्या क्रमांकावर वापरता येणार नाही. नवीन कंपनीचे सिम कार्डच वापरावे लागेल.

सुरूवातीला असे वाटत होते की पोर्टेबिलीटीचा दर एवढा नको आणि प्रक्रिया अशी किचकट नको की त्यापेक्षा ती सुविधा न घेणेच बरे. पण प्रक्रिया ही सोपी आहे आणि दूरसंचार मंत्रालयाच्या पुस्तिकेत दिल्याप्रमाणे १९ रू हा दर खालील प्रमाणे ठरविण्यात आला आहे.

तपशील
एकक
रक्कम
एकूण खर्च
दशलक्ष रू
२३२०.४७
सरासरी सेवादाता बदल (पोर्टींग)
दशलक्ष  
१२३.२६
प्रत्येक बदलाचा खर्च  
रू.
१८.८३
लायसन्स फी @१%
रू.
०.१९
प्रत्येक बदलास एकूण खर्च
रू.
१९.०२
जवळील ठोकळ संख्येत खर्च
रू.
१९.००


म्हणजे १२३ दशलक्ष क्रमांकांचे लोक स्वत:च्या सेवादात्यावर खुष नाहीत/नसतील. तरीही सेवादाता आपली सुविधा सुधारण्यास तयार नव्हते?

सध्यातरी एवढी माहिती पुरे. आपल्या भागात ही सुविधा सुरू करेपर्यंत ह्या प्रक्रियेत बदल न करोत अशी आशा. :)


डिसेंबर ०४, २०१०

संध्याकाळी 'मैने प्यार किया' चित्रपटातील अंताक्षरी पाहता पाहता ’रूक जा ओ जानेवाली’ गाण्याबद्दल एक आठवले.
हे गाणे राज कपूर दारूच्या बाटलीकरीता गातो की नूतनकरीता? ते पाहण्याकरता युट्युब वर गाणे शोधले आणि लावले. दिसले ते तर दारूची बाटली घेऊनच, नूतन इतरत्र फिरत होती :).
कोणाला ह्याबद्दल माहित आहे का?

हे गाणे संपल्यावर बाजूला इतर गाण्यांचे दुवे दिसले.

मुकेशचे ’ये मेरा दिवानापन है’ 
मग ’चलो इक बार फिरसे अजनबी बन जाये
मग त्यातच आठवले ’तेरी जुल्फोंसे जुदाई तो नहीं मांगी थी
त्यानंतर ’तेरे घर के सामने इक घर बनाऊंगा
मग ’मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम
त्यावरून ’मेरे मेहबूब कयामत होगी’ ...

एक एक मस्त गाणी...सर्वच आवडती. एकामागोमाग एक ऐकता येतील पण आंतरजालावरील अमर्याद संग्रहात गेलो तर त्याच नादात अख्खी रात्र जाईल.
त्यापेक्षा रेडिओ लावावा किंवा घरातील जुन्या गाण्यांच्या कॅसेट काढून लावाव्यात असा विचार आला. (जुना हा शब्द सापेक्ष आहे)


तर ऐकतो माझा संग्रह उघडून.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter