जानेवारी २६, २०११

आज प्रजासत्ताक दिन. आज त्याचा आनंद आपण साजरा करणार.
पण काल एका दिवसभरातील ह्या बातम्या वाचल्या ऐकल्या तर वाटते काय चालले आहे देशात. खरंच प्रजेची सत्ता आहे का आपल्या देशात? तसे म्हणायला प्रजेचीच सत्ता आहे पण ती सामान्य प्रजा नाही तर फक्त ’त्यां’च्या मर्जीतील प्रजा. ते कोण सांगायची गरज वाटत नाही. सर्वांनाच माहित आहे.
ह्या एकाच दिवसात घडलेल्या गोष्टी आहेत. २५ जाने २०११. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी. वास्तविक त्या कधीही घडल्या असत्या तरी त्यांची तीव्रता तेवढीच राहीली असती. पण एक दिवस आधीच घडलेल्या असल्याने प्रजासत्ताकावर मोठे प्रश्नचिन्ह दिसतेय. पहिली गोष्ट तशी लहान वाटते, पण हळू हळू अशाच गोष्टींची शेवटच्या गोष्टीमध्ये परिणती व्हावयास वेळ लागणार नाही अशीच भीती वाटते. प्रश्न हा ही पडतो की जर अधिकार्‍यांवर हल्ले होऊ शकतात तर आपण सामान्य लोकांचे काय?

अजून एक घटना: आरूषीच्या वडिलांवर हल्ला

कोणत्याही गोष्टी बदलायच्या असतील तर लहान गोष्टींपासून सुरूवात करावी लागते. समजा लहान गोष्ट घेतली की रिक्षाचालकांच्या मनमानीचा आपण काही विरोध करायला गेलो तर त्यांच्यापुढेही एकदोघांचे काही चालत नाही. तिथे मोठा गट पाहिजे किंवा एकत्रित दबाव. पण इथेही आजकाल भीती वाढत चाललीय. काही महिन्यांपुर्वी कागदपत्रे मागणार्‍या एका वाहतूक पोलिसाला मारल्याची घटना घडली होती. त्यामुळे सामान्य माणूस ह्यातही विरोध करण्याआधी विचार करायला लागतो, मी त्या फंदात का पडू?

सरकारमध्ये असणारे नेते आणि मंत्री ह्यांबाबत तर आता काही बोलायलाच उरले नाही. काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणतात, "तुम्ही तिरंगा फडकवला आणि काही झाले तर आम्ही जबाबदार नाही".
कसाब आणि अफजल गुरू ह्यांबाबत अजून निर्णय घेण्यात वेळ लागतो. त्यांना काही कमी पडणार नाही ह्याची खात्री केली जाते.
प्रधानमंत्री, अर्थ मंत्री म्हणतात की काळा पैसा असणार्‍यांची नावे सांगणार नाही.
नारायण राणेंनी मोठ्या आवेशात सांगितले होते की "किती मंत्र्यांचे अतिरेक्यांशी संबंध आहेत ते मला माहित आहे आणि मी ती नावे उघड करेन" अजून ती नावे समोर आली नाहीत की कोणी त्याचा पाठपुरावा केला नाही.
२ वर्षांपूर्वी दिल्लीतील बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री शीला दिक्षित म्हणाल्या होत्या की "मुलींनी/स्त्रियांनी रात्री बाहेर पडायला नाही पाहिजे"
सीबीआय तर काय एक एक प्रकरण पुरावे नसल्याच्या कारणाने बंदच करीत चालले आहेत.

ही काही ठळक उदाहरणे आहेत. हे असे जर मुख्य, जबाबदार नेते जर जबाबदारी झटकायला लागले तर वरील गोष्टी होतच राहणार आणि आपण फक्त प्रजासताक दिनाचे, स्वातंत्र्य दिवसाचे गुणगाण गायचे का?

मला इथे काय करावे हे सांगायचे नाही आहे. कारण ते सुचत नाहीच आहे आता. सध्या फक्त प्रश्नच आहेत. की हे कधीपर्यंत चालणार? आपण कसे ते थांबवायचे?

प्रजासताक दिनाबद्दल माहिती शोधताना काही लेख दिसले. विचार करण्यासारखे.

जानेवारी २१, २०११

नग म्हणजेच नमुना किंवा Item.

इथे मी सांगणार आहे दररोजच्या प्रवासात मला रस्त्यात दिसलेल्या काही नग माणसांबद्दल.
आधीच सांगतो की इंग्रजीतील एक म्हण आहे. "Anyone who drives faster than you is a maniac. Anyone who drives slower is an idiot." त्या म्हणीप्रमाणे मलाही कोणी इडियट ठरवत असेल. पण सध्या मुद्दा वेगाचा नाही इतर गोष्टींचा आहे.

पूर्व दृतगती मार्गावर ऐरोलीच्या पूलावर चढताना एका दुचाकीवर दोघे जण जात होते. मी त्यांच्या बाजूने जाणार एवढ्यात त्यातील मागे बसलेल्या माणसाने एकदम दोन्ही हात आडवे वर केले. काय कसले माप सांगत होता समोरच्याला की टायटॅनिकची नक्कल करत होता माहीत नाही. पण एकदम समोर हात आल्याने मी दचकलो आणि त्याला ’काय करतोस’ असा इशारा करून पुढे गेलो.

त्याच दिवशी पुढे आय. आय. टी च्या प्रवेशद्वाराच्या थोडे आधी पाहिले तर वाहनांच्या गर्दीतून डाव्या बाजूच्या दोन्ही रांगांतून गाड्या पुढे गेल्या. पण एकदम उजव्या रांगेत एकामागोमाग एक चार पाच गाड्या उभ्याच होत्या, आणि सगळे डावीकडे वळण्याच्या तयारीत. पुढे गेल्यावर पाहिले की सर्वात पुढच्या गाडीतील माणसाने गाडी उभी करून ठेवली होती. कारण काय तर त्याच्या गाडीतील चालकाच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या माणसाला तिथे उतरायचे होते. उतरायचे असेल हे मान्य. पण रस्त्याच्या मध्ये आणि ते ही गाडी एकदम उजवीकडे ठेवून डावीकडून उतरायचे? थोडे पुढे २/३ गाड्यांएवढ्या अंतरावर गेला असता तर सिग्नलवर ही थांबता आले असते की.

आज सकाळी पाहिले की माझ्या समोरील दुचाकीस्वार डावा हात खालच्या दिशेला सरळ ठेवून तर्जनी आणि एका बोटाची डावीकडे उजवीकडे अशी हालचाल करत होता. मला वाटले त्याला डावीकडे जायचे असेल म्हणून जागा दिली. तरी ती हालचाल चालूच. मग नीट पाहिले तर हेल्मेटच्या आत हँड्स फ्री लावून तो मोबाईल वर कोणाशी तरी बोलत होता आणि त्या नादात हाताची हालचाल करत होता.

असाच एक नमुना पाहिला होता गेल्या महिन्यात नागपूरमध्ये. भावासोबत दुचाकीवरून घरी जात होतो. डावीकडे लग्नाची वरात चालली होती. त्यात फटाके लावत होते. बॉम्ब, पाऊस लावत होते ते ठीक. पण ते नेमके पेट्रोल पंपाच्या समोरील आत जाण्याच्या रस्त्यावर. पुढे काही झाले असते तर काय असे वाटत होते.

हे नग/नमुने असले काही ना काही करतच राहतील. पण त्यामुळे इतरांना त्रास होतो हे तरी पहावे त्यांनी. किंवा नाहीच. कारण ते नगच आहेत.

जानेवारी १८, २०११

सद्य कंपनीत ३ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांनी माझ्या घरी पुष्पगुच्छ पाठविला.


चांगले वाटते असे काही मिळाले की :)

जानेवारी ०७, २०११

गेले काही दिवस कडाक्याची थंडी पडली आहे. आता मुंबई-ठाण्यात २० च्या खाली तापमान म्हणजे ती कडाक्याचीच थंडी असते. :) पुन्हा कपाटातील स्वेटर/जॅकेट बाहेर आलेत. ह्या थंड हवेत सकाळी लवकर उठायचा कंटाळा तर येतोच, पण नंतर दुचाकी हाकत कार्यालयात जाणेही आलेच. ऊन असेल तर थोडे बरे असते. नाही तर मग थंडी ची हुडहुडी :)

कार्यालयातही वातानुकूलन यंत्राची येणारी हवा माझ्या डोक्यावरच. त्यामुळे तिथेही आराम नाही. मग दिवसभर स्वेटर/जॅकेट घालून बसावे लागते. तरी यावेळी बहुधा त्यांनी त्या यंत्राची हवा कमी थंड ठेवली आहे. गेल्या वर्षी तर काश्मीर मध्ये गेल्यासारखे वाटत होते. आणि वातानुकूलनाचे यंत्र बंद करायला सांगू शकत नाही. कारण तो मध्यवर्ती वातानुकूलनाचा भाग असल्याने इतरांना त्रास होऊ शकतो. एकंदरीत घरी/बाहेर नुसती थंडी.

आता तुम्हाला वाटेल मी एवढा बाऊ करत आहे का थंडीचा. नाही, तसे नाही. बाऊ नाही. आणि ही थंडी सहन करण्यापलीकडची आहे असेही नाही. ह्यापेक्षा जास्त थंडीचा अनुभव घेतला आहे. मजा घेतली आहे. तो आनंद वेगळा. पण बहुधा त्या त्या भागातील सरासरीपेक्षा तापमान खाली गेले की मला थंडी वाजायला लागते ;) आणि थंडी वाढली म्हटले की वेगवेगळ्या शहरातील थंडी अनुभवली ते आठवते.

लहानपणी, मुंबईत राहत होतो तेव्हा म्हणजे ९१/९२ मधील असेल. तापमान १८ अंश. से पर्यंत गेले होते. त्या काळी तर ती थंडी खूपच होती. थंडीत शरीराला हलकासा मार ही फार जोरात जाणवतो. त्या दिवशी संध्याकाळी क्रिकेट खेळताना मांडीवर बॉल लागल्यावर त्वचेची भरपूर आग होत तर होतीच पण जे वळ उठले होते ते आताही आठवतात. मग अंधार पडल्यावर आम्ही २/३ मित्र गप्पा मारत मारत काटक्या/लाकडे गोळा करून ठेवायचो. त्यानंतर मग मस्त शेकोटी करायची. घरून बटाटे आणून त्या शेकोटीत टाकायचे. जेवणाच्या आधीपर्यंत ते बटाटे मग तिखट-मीठ लावून खायचे. धुराचा वास असलेले, भाजलेले बटाटे मस्तच लागायचे. गंमत म्हणून एक दिवस आम्ही त्यात कांदा भाजण्याकरिता टाकला. लिबलिबीत झालेला तो कांदा काढून चव घेतली. नंतर कधी त्याला हात लावला नाही. :)

त्याच काळात मी आई वडिलांसोबत कलकत्त्याला गेलो होतो. डिसेंबरच्या महिन्यात. त्यातच मग २ दिवस दार्जिलिंगची सहल. एवढ्या थंडीचा अनुभव पहिल्यांदाच घेत होतो. पलंगावरील जाडी जाडी दुलई/रजई ही एवढी थंड होती की असे वाटायचे ओली आहे की काय. छतावर पाहिले तर पंखाच नाही. आता मला काय पंखा नको होता.
पण मुंबईत राहणार्‍या मुलाला एखाद्या घरात/हॉटेलमध्ये पंखा दिसला नाही तर नवल वाटणारच. पण तेव्हाच लक्षात आले की येथे पंख्याची गरजच नाही. त्यानंतर एका पहाटे टायगर हिल नावाच्या ठिकाणावर सूर्योदय पाहण्यास गेलो होतो. इतर वेळी थंडी जास्त होती. पण त्या उंच ठिकाणावर तर माझ्याकरिता आतापर्यंतचा उच्चांक होता. बोटांचे टोक थंडीने एवढे दुखायला लागले की माझ्या डोळ्यातून पाणीच आले होते. पण नंतर मग लालबुंद सूर्याचा गोळा पाहिल्यावर सर्व काही ठीक झाले आणि मग सूर्याच्या तापाने थंडीही कमी वाटायला लागली. पुन्हा मुंबईला आल्यावर नेहमीचे तापमान.

त्यानंतर मग थंडी पाहिली (पाहिली म्हणजे अनुभवली. थंडी डोळ्यांनीही पाहिली नाही कधी आणि कानांनी ऐकलीही नाही ;) ) ती नगर जिल्ह्याची. अभियांत्रिकी महाविद्यालयात होतो तेव्हा. पहिल्या वर्षाच्या पहिल्या सत्राची परीक्षा चालू होती, तेव्हाच तापमान कमी झाल्याचे जाणवत होते. पण मग दुसर्‍या सत्राकरीता सुट्टीनंतर परत गेलो तेव्हा तिकडचा खरा हिवाळा जाणवला.


मग डिसें २००१ मध्ये गेलो होतो दिल्ली-हरिद्वार-सिमला-मनालीच्या सहलीला. तिकडचे तापमान तर नेहमीच कमी असते हे ऐकूनच होतो. पण मग स्वत: फिरायला जाणार म्हणून मग दररोज त्या शहरांचे तापमान वृत्तवाहिन्यांवर नीट पाहणे सुरू झाले. गंमत आहे ना. एखादी गोष्ट आपण नेहमी पाहतो पण लक्षात येत नाही किंवा लक्ष देत नाही. पण त्या गोष्टीशी काही संबंध आला की मग नेहमी ती जाणवायला लागते. आधी कधी ते तापमान एवढे कमी असल्याचे लक्षात ठेवले नाही पण आता ५/६/७ अंशही खूप कमी वाटायला लागले. त्याच दिवसांत अजून एक गोष्ट पाहिली. दिल्ली आणि पुणे दोन दूरची शहरे, पण त्यांचे तापमान नेहमी एकमेकांच्या जवळचे. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यातही.

दिल्लीला ५/६ अंश.से तापमानात फिरणे झाले. एखाद्या भागात नवीन असताना थंडी/गरमी जास्तच वाटते. पण मग त्याची सवय होऊन जाते. तिथेही तेच झाले. हरिद्वारला त्या थंडीत रात्री जेवणानंतर हॉटेलमध्ये परत येताना एका ठिकाणी लहानश्या मडक्यामध्ये गरम जाड सायीचे दूध पिण्यास खूप मस्त वाटले होते. आजही ते आठवून थंडीत गरम गरम दूध प्यायची इच्छा होत असते. शिमल्याला त्यापेक्षा जास्त थंडी आणि मनालीला आणखी जास्त थंडी. आमचे स्वेटर, मग हातमोजे, मग कानटोपी अशा एक एक गोष्टी वाढतच होत्या. पण आमचा सहल मार्गदर्शक तर स्वेटरशिवाय, आपण नेहमी घालतो तेवढ्याच कपड्यांत फिरत होता. तो म्हणाल्याप्रमाणे त्याला आता त्याचीही सवय झाली होती.

तिथे असताना मधल्या एका दिवशी जवळील कुलुजवळील मनीकर्ण म्हणून एका ठिकाणी गेलो होतो. तिकडे गरम पाण्याचे कुंड आहेत असे सांगण्यात आले होते. आम्ही ७-८ जण जीप भाड्याने घेऊन तिकडे गेलो. बाजूला बर्फाचे पाणी झालेली थंड नदी वाहत होती आणि आत गुहेतील कुंडात ९६ अंश से. पर्यंत तापमानाचे गरम पाणी. वेगळाच चमत्कार का? शास्त्रीय दृष्ट्या नाही. पण असो. ते नंतर कधीतरी पाहू. ह्याच गरम पाण्यात ते लोक भात शिजवायला ठेवायचे. इंधनाचा खर्च कमी झाला. :)
नंतर मग मनालीजवळील रोहतांग येथे बर्फ असलेल्या ठिकाणी गेलो होतो. आयुष्यात मी पहिल्यांदा बर्फात जाणार होतो. जाताना वाटले होते की बर्फात आपला निभाव लागेल का? :)  पण तिकडे गेल्यावर पाहिले की बर्फ आधीच पडून गेला होता. वर आकाशात सूर्य तळपत होता. त्यामुळे खाली बर्फात उभे असूनही आम्हाला एवढी थंडी वाटत नव्हती. तो होता गुरुवार. शनिवारी दुपारी आम्हाला परत निघायचे होते. मध्ये वाटले की बर्फ पाहिला, आता बर्फ पडताना, म्हणजे खूप ऐकलेला 'स्नो-फॉल', पाहायला मिळाला तर किती मजा येईल. आमची ती इच्छाही पूर्ण झाली. शनिवारी सकाळी. हॉटेलमधून सकाळी बाहेर पडलो खरेदी करण्याकरिता. तेव्हा ढगाळ वातावरण होते. थेंब थेंब पाऊसही पडायला लागला होता. आमच्या मार्गदर्शकाने सांगितले की असाच पाऊस पडत राहिला तर मग ह्या थेंबांचेच बर्फ होऊन पडायला लागेल. दुकानात गोष्टींची खरेदी केली. बाहेर येऊन पाहिले तर रस्त्यावर सगळीकडे नुसता बर्फ साचला आहे आणि वरून बर्फाचा पाऊस पडत आहे. पहिल्यांदा पाहिलेला हिमवर्षाव. बर्फाचा आनंद घेऊ म्हणत सर्व बाहेरच उभे होते. तेथे थोडी गंमत केल्यावर मग परत जाणे भाग होते, कारण दिल्लीकरिता निघायचे होते. आता त्या बर्फात आमच्या हॉटेलपर्यंतच्या चढ्या रस्त्यावर बस वर जाणे कठीण होते. मग लहान जिप्सी कार मागवण्यात आल्या. वर जाता जाता पाहिले, बर्फात गाडी चालवणेही कठीण काम आहे. एक मारुती ८०० बहुधा, वर चढत तर नव्हतीच पण ब्रेक दाबून ठेवूनही बर्फावरून हळूहळू घसरत खाली येत होती. कशीतरी त्यांनी ती बाजूला नेली. जेवण झाल्यावर पुन्हा हॉटेलसमोरील जागेत एकमेकांवर बर्फ फेकण्याचा कार्यक्रम साजरा केला. मग हॉटेलमधून सामान लहान गाड्यांमध्ये चढविले. आणि खाली असलेल्या बसमध्ये आणून ठेवले. ह्या सगळ्या प्रकारात आमचा मार्गदर्शक नेहमीच्या साध्या कपड्यांतच होता आणि त्यातल्या त्यात त्याला गाडीत जागा न मिळाल्याने तो एवढ्या बर्फात गाडीच्या टपावर बसून आला होता. धन्य तो माणूस.

तिकडून परतताना पाहिले सगळीकडे नुसता बर्फ होता, जमिनीवर, झाडांवर, आणि वरून खाली पडणारा. सगळीकडे नुसते पांढरे पांढरे दृश्य. वाहतुकीला अडथळा येतच होता. तेव्हा वाटले की आपल्याला बर्फाचा पाऊस पाहण्याचा अनुभव एकदम योग्य वेळी मिळाला आहे, कारण आम्ही जर शुक्रवारी परत निघालो असतो तर बर्फ पडताना पाहायला मिळाला नसता आणि जर रविवारी परत निघायचे असते तर ह्या एवढ्या हिमवर्षावानंतर आम्हाला परत जायला मिळणे कठीण होते.


२००३ मध्ये आम्ही गेलो होतो अमरनाथ यात्रेला. तिकडे पुन्हा तेच १३००० फूट उंचावर थंडी तर असणारच, वर हवाही विरळ. त्यामुळे तिकडे जाण्याआधी पूर्ण वैद्यकीय तपासणी करून मगच जाता येते. जम्मू, पहलगाम वगैरे ठिकाणची थंडी आता काही जास्त वाटत नव्हती.
पण अमरनाथच्या गुहेपर्यंत जाण्यास दीड दिवस, परत येण्यास दीड दिवस आणि थंडी तर वाढणारच. त्यानुसार आम्ही आपले नेहमीप्रमाणे दररोजचे कपडे अदलून बदलून जरी घालायचे म्हटले तरी ३ जोड कपड्यांचे घेऊन ठेवले. वर जायचे म्हटले तर एवढे सामान घेऊन चढता येणार नव्हते. मग पिट्ठू ला घेतले. सामान उचलण्याकरिता जे लोक आपल्यासोबत येतात त्यांना ते पिट्ठू म्हणतात. ग्लेशियर म्हणजेच गोठलेली नदी वगैरे वरून जाताना वेगळा अनुभव तर येत होताच पण थंडीचाही. संध्याकाळी सरकारने ठरवून ठेवलेल्या ठिकाणांवर खाण्याची आणि तंबूमध्ये झोपण्याची सोय केली होती. त्या थंडीत घरात झोपणेही कठीण पण आम्ही तंबूत झोपलो होतो. आणि जिथे खाताना हातमोजे काढण्यास जीवावर येत होते, तिकडे कपडे बदलणे तर विसराच. पूर्ण ३ दिवस त्याच कपड्यांवर काढले होते. पण मला एक जाणवले. तिकडे हवा विरळ असून, थंडी असून नाकाला झोंबणे एवढेच अनुभवले. पण इतर काही त्रास वाटला नाही. त्यामुळे मग ह्या तापमानाला आपण स्थिरावू शकतो असे वाटले.

त्यानंतर मग अनुभव आला बँगलोर किंवा मग बंगलुरू. आता मनालीचा बर्फ आणि अमरनाथचे कमी तापमान पाहिल्यावर बँगलोरला काही त्रास नाही व्हायला पाहिजे. ते तर होतेच. त्रास नाही वाटला. पण आपण मुंबईच्या तापमानाला स्थिरावलेले. त्यापेक्षा कमी तापमान हे थंड वाटणारच. बँगलोर नंतर मग पुण्याचीही थंडी अनुभवली. पण ते काही आता एवढे लिहिण्यासारखे खास वाटत नाही.

पुण्याला असताना पहिल्यांदा अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली. तीही थेट शिकागो जवळील मिलवॉकी शहरात नेमक्या थंडीच्या मोसमात. तिकडे जाण्याच्या आधी अर्थातच हवामानाबद्दल चौकशी करून घेतली होती. सहकार्‍याने तापमान सांगितले -१७ अंश. से. छान. उणे तापमान आधी अनुभवले होते पण -५ वगैरे. आता -१७ म्हणजे नवीन परीक्षा? परीक्षा म्हणण्यापेक्षा अनुभवच म्हणू :)

आमच्याकरिता अमेरिकेचे प्रवेश ठिकाण होते मिनियापोलीस (याचे लिखाण/उच्चार चुकले असल्यास तुम्ही स्वत:च दुरुस्त करून घ्यावे ;) )  तिथे आमची व सर्व सामानाची तपासणी/चौकशी झाल्यावर देशांतर्गतगत विमानात सामान पाठवण्याकरिता एका विमानतळ सुंदरीला (हवाई सुंदरीच्या धर्तीवर)  विचारून हलत्या पट्ट्यावर सामान ठेवले. माझ्या सहकार्‍याने शंका उपस्थित केली की, "आपले सामान बरोबर येईल ना? कारण बहुधा तिला आपण काय विचारले ते कळले नाही". पण तोपर्यंत सामान आत निघून गेले होते, म्हणून काही करता येणे शक्य नव्हते. 
आम्ही दुपारी साधारण ४ ४:१५ ला मिलवॉकी ला पोहोचलो. विमानतळावर सामानाच्या पट्ट्यावर आमचे सामान येण्याची वाट पाहू लागलो. सर्व बॅगा, सामान संपले, पट्टाही थांबला. पण आमचे सामान आले नव्हते. माझ्या सहकार्‍याची शंका खरी ठरली. आम्ही चौकशी केल्यावर आम्हाला सांगितले की, "तुमचे सामान आले नसेल तर पुढील विमानाने येईल. ते आम्ही तुमच्या घरी/हॉटेल मध्ये पोहोचवून देऊ. टॅक्सी ने आम्ही हॉटेल मध्ये पोहोचलो.  टॅक्सीमध्ये बसतानाच थंडीचा अंदाज आला होता. रस्त्यात पाहिले सगळीकडे नुसता बर्फ साचलेला. हॉटेलमधून आम्ही ताजेतवाने होऊन मग जेवणाकरिता बाहेर निघालो. सामान तर नव्हतेच. स्वागत कक्षातील मुलीला खाण्याच्या जागेबद्दल विचारले तर तिने सांगितले की ह्या भागातील मॉल/दुकाने वगैरे ७ वाजताच बंद होतात. आम्ही घड्याळात पाहिले तर पावणे सात वाजत होते. म्हटले पण आता जावे तर लागेलच.

माझ्या मित्राने आधीच सांगून ठेवले होते की सामान उशिरा येणे वगैरे होऊ शकते, तेव्हा स्वत:सोबतच्या बॅग मध्ये काही कपडे व महत्त्वाचे सामान घेऊन ठेव. त्यामुळे मी कार्यालयात घालण्याच्या कपड्यांची एक जोडी, कॉट्सवूल वगैरे स्वत:सोबत घेऊन ठेवले होते. हॉटेल मधून बाहेर निघताना कॉट्सवूल घालूनच होतो. पण माझ्या सहकार्‍याने त्याच्याकडे जास्त सामान ठेवले नव्हते. त्याला एका स्वेटर वरच भागवावे लागले. त्या थंडीत बाहेर हॉटेल शोधताना नाकी नऊ आले होते. सगळे काही बंद. साधारण एक किलोमीटर च्या अंतरावर एक हॉटेल दिसले. हुश्श. आता जाऊन बसलो. थंडी पासून थोडा आराम.

आम्ही बसल्यावर एक मुलगी तरातरा चालत आली. तिने काय खाणार असे विचारले. तिला आधी पाणी मागितले (छ्या.. ह्या लोकांत आदरातिथ्यच नाही.) तर ती दोन ग्लास भरून बर्फ घातलेले पाणी घेऊन आली. मनात म्हटले," बाई, बाहेरची थंडी कमी आहे का आता त्यात हे थंडगार पाणी प्यायचे?" तिला माझ्या सहकार्‍याने सांगितले की, "थंड नाही गरम पाणी दे". ती थोड्या वेळाने खरोखरचे गरम पाणी घेऊन आली. दुसरा प्रकार मी उटीला पाहिला होता. कोणत्याही हॉटेलमध्ये गेले तरी कोमट पाणी प्यायला देणार. मग त्यांना सांगावे लागते की साधे पाणी द्या. पण पहिला प्रकार बहुधा अमेरिकेतच पाहायला मिळेल. एवढ्या थंडीत बर्फ घालून थंड पाणी? तिला मी सांगितले की, " हे नाही, साधे पाणी दे" मग ती साधे पाणी घेऊन आली. अर्थात ते ही त्या तापमानामुळे थंडच होते पण चालण्यासारखे होते. बाकी मग आम्ही जे उपलब्ध होते त्यात समजण्यासारखे पदार्थ मागवून खाल्ले व परत आलो. रात्री स्वागत कक्षामध्ये सांगून ठेवले की आमचे सामान येणार आहे. ते म्हणाले की आम्ही ते आमच्याकडे ठेवून तुम्ही सकाळी घ्या. आमच्या सुदैवाने रात्रीच ते सामान आले होते व आम्हाला ते दुसर्‍या दिवशी सकाळी मिळाले.

पहिले एक दोन दिवस तर गटागटाने ये जा करत असल्याने टॅक्सी करून आलो. पण मग बसने जाणे होते. त्यामुळे एक दिवस निघण्याआधी कोणती बस, वेळ वगैरे विचारून संध्याकाळी निघालो . आम्हाला वाटले आता बस येईल, आता येईल. पण आमची वेळ चुकली होती. आम्ही बस गेल्याच्या पाच मिनिटानंतर बस थांब्यावर पोहोचलो होतो.  त्या थंडगार हवेत हाल होत आहेत असे वाटले.  शेवटी अर्धा पाऊण तास वाट पाहून आम्ही विचार केला की टॅक्सी ने जाऊ. तेवढ्यात बस आली. मिल्वॉकीला मी १३ दिवस असेन पण फक्त दोनच दिवस बिना-बर्फाचे गेले. इतर दिवस तर बर्फच बर्फ चोहीकडे.  शनिवारी सकाळी परत निघायचे विमान पकडायचे होते. म्हणून रात्री सामान भरत होतो. रात्री पुन्हा जोरदार हिमवर्षाव चालू झाला. सकाळपर्यंत भरपूर बर्फ जमा झाला होता. इतर दिवस काही वाटले नव्हते एवढा बर्फ पडत होता तरी. पण आता वाटले की असाच बर्फ पडत राहिला तर परत जाण्याची अडचण. रस्ते बंद झाले तर काय. पण सकाळी बर्फ हटविणारी गाडी आली. तिने गाड्यांचा रस्ता मोकळा करून ठेवला. हुश्श.

हे सर्व झाले माझे अनुभव. पण जे ऐकून आहे त्याप्रमाणे तर बहुतेक शहरांत तापमानाचा फरक खूपच असतो. नागपूर, दिल्ली येथील थंडीतील ५ अंश तापमान ते उन्हाळ्यात ४०/४५ अंशापर्यंत तापमान जाते. म्हणजे त्या शहराच्या तापमानात ३५/४० अंशांचा फरक पडतो. ह्याउलट मुंबई मध्ये १८ ते ३८ म्हणजे २० चा. पण माझ्या माहितीतले नुकतेच ऐकलेले म्हणजे सायबेरिया देशात तापमान हिवाळ्यात -३८ पर्यंत जाते तर उन्हाळ्यात +४० पर्यंत जाते म्हणजे तापमानाचा फरक ७८ अंशाचा?

आपल्या सवयीप्रमाणे २० अंशांचा फरक परवडला. त्याचीच मजा घेत राहू :)

(हीच थंडी आधी शब्दगारवा २०१० वर पडली होती :) )

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter