'जर तुम्ही मतदान केले नसेल तर तुम्हाला सरकारला काही बोलण्याचा हक्क नाही', अशा आशयाचे वाक्य सिनेमात/इतरत्र भरपूर वेळा ऐकले होते, पटतही होते. जरी गेले काही वर्षे मी मतदान करावेच ह्या मतावर होतो तरी सध्याच्या परिस्थितीत वाटत होते की मतदान करावे की नाही?
खरंतर ह्याच्या कारणाचाही उहापोह करणे गरजेचे नाही तरीही प्रश्न पडतात ते असे:
मी मोठ्या दोन पक्षांपैकी एकाला मतदान केले तर त्या दोन्हींनी एवढा काही चांगला विकास घडवून आणला नाही. नकारात्मक गोष्टीच जास्त दिसतात. मग त्यांना का मत द्यावे?
इतर काही पक्षांना मत दिले तरी बहुमताने जिंकण्याएवढी मते त्यांना मिळणार नाही ही सध्याची तरी परिस्थिती वाटते. त्यामुळे पुन्हा एक ना धड भाराभार चिंध्या असला काही तरी प्रकार. मग त्यांना का मत द्यावे?
मत नाही द्यायचे तर मतदानाची टक्केवारी घसरणार. तरी जेवढ्यांनी मते दिली त्यावरच निवड ठरविली जाणार. त्यामुळे माझे मतदान न करणे वाया गेले. त्यामुळे कोणालातरी मतदान करावेच. 'कोणीही नाही' ह्याचा वापर अजून तरी चालू झाला नाही.
आता मतदान करायचे ठरवले तर पुन्हा कोणाला मत द्यावे? पक्षाला की माझ्या भागातील उमेदवाराला? एवढे पक्ष आहेत त्यात कोणाला? दोन पक्षांत काम होऊ शकत नाही का?
पक्षाला मत दिले पण त्यांचा माझ्या भागातील उमेदवार मला वाटतो तेवढा कार्यक्षम नसेल तर?
एखाद्या कार्यक्षम उमेदवाराला मत दिले पण तो किंवा त्याचा पक्ष निवडून नाही आला तर? पुन्हा आपल्या उपयोगाचे काही नाही झाले तर?
माझा उमेदवार निवडून आला पण त्याने नंतर पक्ष बदलला तर?
अर्थात ह्याबाबतीत जेवढा विचार करावा तेवढा कमीच. त्यापेक्षा मतदान करावेच. मग तो कोणीही असो पण त्यापैकी चांगला. कारण सध्या पर्याय नाही. मागील आठवड्यात मित्राशी बोलताना असेच विचार मनात आले. वाटले अमेरीकेत बरे आहे दोनच पक्ष आहेत (नेहमी अमेरीका/इंग्लंड ह्यांच्याशी तुलना करायची सवय झाली आहे ;) ) पण तिथेही परिस्थिती एवढी चांगली नाही असे म्हणतात. दोघेही उमेदवार चांगलेच असतील असे नाही. तेव्हाच मनात विचार आला, कोणी का असेना एकाला निवडून आणा. मग त्याच्या डोक्यावर बसून कामे करवून घ्या. तसलाच प्रकार इथे केला पाहिजे. त्यातल्या त्यात चांगला निवडा. मग तो मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा असो, नवीनच बनलेल्या पक्षाचा असो, की अपक्ष असो. कारण प्रत्येक उमेदवार आपल्याला आवडेलच असे नसते. तसेच आपण ज्याला मत दिले निवडूनच येईल ह्याची खात्री नाही. पण त्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे तो पुढे आणखी चांगले काम करण्याची अपेक्षा तर बाळगू शकतो. नाही केले तर त्यांनाही पाडण्याचा अधिकार आपल्यालाच आहे. आणि तसे म्हणायला गेलो तर ही सुद्धा एक लॉटरीच आहे.
कालपर्यंत आपल्या भागातील उमेदवारांची यादी मी येथे पाहिली. त्यात जेवढे समजेल त्यावरून आणि बातम्यांमधील त्यांच्याबाबतचे ऐकून/वाचून विचार केला आणि मी ही ह्या लॉटरीत भाग घेत सकाळीच मतदान करून आलो.
एप्रिल ३०, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा