मार्च २९, २०१०

एखाद्याला शिकण्यासाठी जेव्हा वसतीगृहात रहावयास जावे लागते तेव्हा घरच्या लोकांपासून दूर राहिल्याचे अर्थात वाईट वाटतेच. पण वेगळ्या एका जगात राहिल्याचा अनुभवही मिळतो. मग त्यात एकत्र राहून आणि मोठे कोणी रागवायला नसल्याने गंमती करण्यालाही मोठा वाव मिळतो. माझ्या अशाच काही गंमतीदार आठवणी इथे सांगत आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयात असताना, पहिल्या वर्षाचे वसतीगृह हे महाविद्यालयाच्याच आवारात होते. आमच्या खोलीच्या खिडकीतून महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता दिसायचा. रस्ता दिसायचा म्हणजे महाविद्यालय लांब नव्हते, समोरच होते.  त्या रस्त्यानेच समोर उजवीकडे महाविद्यालय, डावीकडे उपहारगृह (कँटीन हो).  परीक्षेच्या आधीचे अभ्यासाच्या सुट्यांचे दिवस. नगर जिल्ह्यातील उन्हाळा म्हणजे तसा कडकच. (थंडी ही तशीच कडक.)  दुपारचे जेवण झाले होते.  नंतर थोड्याफार गप्पा मारून अभ्यास करत होतो.  तेव्हा आमच्यातील एकाला गंमत करायची हुक्की आली.  बाहेर एक मुलगा महाविद्यालयाच्या दिशेने चालला होता.  'शुक शुक' आमच्या खोलीतून आवाज गेला.  बाहेरच्या त्या मुलाने मागे वळून पाहिले. कोण दिसणार आहे?  निघून गेला तो.  पुन्हा दुसर्‍या मुलावर ही तीच क्रिया. त्याचीही तशीच प्रतिक्रिया. आमचे हे काम सुरू.  काही मुले न वळताच निघून जायची.  काही वळून बघायची.  एकाची तर गंमत झाली.  तो मागे वळून बघतोय.  कोणी दिसले नाही.  ऊन येत असल्याने डोळ्यांच्यावर कपाळावर हात ठेवून पहायचा प्रयत्न करत होता.  "ए, कोण आहे रे?" शेवटी तो कंटाळून निघून गेला. मी मित्राला म्हटले, 'बस झाले'.  पण मग त्याने पुन्हा 'शुक शुक' केले.  पाहतो तर आमच्या वसतीगृहाचे सर मागे वळून पाहत होते. काही झाले नाही.  पण पुन्हा शुक शुक नाही केले कोणी.

अशीच गंमत दुसर्‍या एका मुलाने त्याच्या खोलीतून केली. मी त्याच्या खोलीत बसलो होतो. काहीतरी विषयावर बोलणे चालले होते. एवढ्यात ह्याने हाक मारली." ए ____", इथे ___ म्हणजे एका मुलाचे आडनाव. 
मी विचारले;  'काय झाले?'
हा म्हणतो, "काही नाही, गंमत."
बाहेरून आवाज आला, " कोण आहे रे?"
आम्ही काही उत्तर दिले नाही. ह्याने पुन्हा हाक मारली.  बाहेरून पुन्हा तोच प्रश्न. जवळपास अर्धा तास हीच गंमत. आम्ही शांत झालो असतो, पण तो काही विचारणे सोडत नव्हता.  कोणी ही येत असेल त्याला 'ए, तू हाक मारलीस का?' विचारत होता. शेवटपर्यंत त्याला कळले नाही कोण हाका मारत आहे ते. 

पहिल्या सत्राच्या परीक्षेच्या आधीच्या सुट्ट्यांचे दिवस. एका संध्याकाळी मी दुसर्‍या विंग मधून स्वत:च्या खोलीकडे येत होतो. आमच्या विंग मधून जोरजोरात आवाज येत होता मुलांच्या ओरडण्याचा. 'ए ए..ए ए' करत.  वाटले कोणावर तरी कोणी ओरडत असेल काही केले म्हणून.  पण खोलीपर्यंत येईपर्यंत आवाज वाढत गेला. एक एक करत सर्व खोल्यांमधून मुले बाहेर येऊन ओरडायला लागली. आता खरं तर प्रत्येक विंग मध्ये प्रत्येक मजल्यावर कोणी ना कोणी सर 'रेक्टर' म्हणून राहत असतात. पण त्यांची परत येण्याची वेळ साधारणतः जेवणाच्या नंतरचीच म्हणजे ७-८ च्या नंतरचीच धरायची.  इथे मुलांचे ओरडणे ही जेवणानंतरच सुरू झाले होते.  पण वसतीगृहात बहुधा एकही रेक्टर नव्हते.  त्यामुळे हा आवाज वाढतच गेला, आणि दोन्ही विंग मधून.  आवाज का कोणी सुरू केला काहीच माहित नाही.  काही मुलं अभ्यासाला वाचनखोलीत गेलेली होती त्यांनी रात्री आल्यानंतर सांगितले की, कॉलेजच्या आवाराच्या मुख्य द्वारापर्यंत तो आवाज येत होता.  शेवटी काही सर व सुरक्षारक्षक आले त्यानंतर तो आवाज थांबला होता.

ह्यानंतर, एका रात्री मी अभ्यास करून झोपण्याच्या तयारीत होतो. रात्रीचे २:३०-३:०० वाजले असतील. पलंगावर आडवा पडणार तोच 'ढूम्म्म्म्म्म' असा मोठ्ठ्याने आवाज झाला.  सुतळी बॉम्व फुटला होता. संडासात कोणीतरी बॉम्बला उदबत्ती लावून टाईमबॉम्ब बनवला होता. (पण अर्थातच कोणी लावला ते कळणार नव्हतेच.)  सर्व पोरं बाहेर धावत आली.  माझा खोलीतील मित्र झोपेतून उठून धावत सुटला होता.  त्याला नंतर विचारले, 'असे का', तर तो म्हणाला, स्वप्नात होता आणि अचानक आवाज आला. त्याला वाटले की वसतीगृहाची पाण्याची टाकीच फुटली की काय? 

खानावळीतील जेवण म्हणजे एक प्रकारचे दिव्यच. पहिल्या २/३ आठवड्यातच माझा खोलीमित्र म्हणाला होता की, 'हे लोक असे अर्धे कच्चे जेवण देतात. ह्याची सवय झाली तर घरी गेल्यावर चांगले, पूर्ण शिजलेले जेवण खाऊन पोटात दुखायला लागेल.'  पोळ्या तर पाहूनच वाटायचे की कणकेचा गोळा थोडासा भाजून दिलाय.  तसे पोळी गरम असली की खाल्ली जायची.  पण थंड झाली की.... त्यामुळे स्वयंपाकघरातून पोळी घेऊन कोणी वाटणारा आला की सर्व तुटून पडायचे.  मग एखाद्याला दुसरे काही घ्यायचे असेल आणि ताटात चांगली पोळी असेल तर तो मग भाजीचा रस्सा त्यावर ओतून/लावून जायचा, त्यामुळे कोणी ती पोळी उचलणार नाही.  :)

जेवणावरून आठवले.  रविवारी आम्हाला खास जेवण असायचे.  म्हणजे मांसाहारी किंवा मग शाकाहारी मध्ये ही खास पनीरची भाजी, श्रीखंड, पुरी वगैरे. आणि रात्री जेवण नसायचे.  त्यामुळे मुलांना गावात जेवायला जायला लागायचे, जे २ किमी दूर होते.  म्हणून आमच्या कॉलेजच्या कँटीन मालकाने मुलांना तिथेच रात्रीचे जेवण द्यायचा विचार केला. १५ रू त अमर्यादित.  मुलांनी त्याचा फायदा घेण्यास सूरूवात केली.  पण एकदा एका मुलाने त्या अमर्यादित थाळी मध्ये एवढे खाल्ले की पुढच्या वेळेपासून त्यांनी ते देणेच बंद केले. असेही ऐकले आहे की ह्याच मुलाने एकदा खानावळीत जेवण झाल्यानंतर, फक्त पैज लावली म्हणून एक पूर्ण घमेलाभर भात खाऊन संपवला होता.

होळीच्या वेळी आम्हाला महाविद्यालयाने सुट्टी नव्हती दिली म्हणून सर्व मुलांनी ठरवले की आपणच जायचे नाही.  त्यांनी वसतीगृहाचे मुख्य द्वारच बंद करून ठेवले जेणेकरून कोणी बाहेर जाऊ शकणार नाही.  मला आणि काही जणांना हे काही माहित नव्हते.  आम्ही ही वर्गात जाऊन बसलो होतो.  बरं, सर्व मुले त्याच वसतीगृहातच राहत होती असे नाही.  पण बाहेरून येणार्‍या मुलांनाही अंदाज आलाच होता की मुलांनी न यायचे ठरवले आहे ते.  पण कळले की कोणी येत नाही, म्हणून कोणी शिकवायला यायच्या आधीच पळून आलो. आणि खोलीवर आल्यावर मित्रांच्या शिव्या खाल्ल्या. पण त्यादिवशी कोणी वर्गात गेले नाही.

मुलांनाच त्रास देणे गंमती करणे हे तर नेहमीचेच. पण सरांनाही सोडले नाही. एक सर खूप शिस्त पाळायला सांगायचे.  मुलांना ते आवडायचे नाही.  मग एक दिवस त्या सरांच्या खोलीला सकाळी ते बाहेर यायच्या आधी बाहेरून २ कुलुपे लावून टाकली आणि त्याहूनही गंमत म्हणजे सर्व मुले त्या दिवशी वसतीगृहातून बाहेर पडली.  म्हणजे जी मुले दांड्या मारायची ती सुद्धा. (आता ती वर्गात गेली की बाहेर ते माहित नाही.)  शेवटी खानावळीतल्या मुलांना कळल्यावर त्यांनी ती कुलुपे तोडून दरवाजा उघडला.

अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तर गंमत चालतच होती.  पण शेवटी, म्हणजे पहिल्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कहर केला. परीक्षा संपली. वसतीगृहातील खोली रिकामी करून द्यायची होती.  त्यामुळे सर्वजण आपआपली कपाटे साफ करत होते.  जेवढे सामान घरी घेऊन जायचे ते बॅगेत, सूटकेस मध्ये ठेवले.  जेवढे सामान पुढील वर्षाकरीता वापरायचे ते दुसर्‍या पुट्ठ्यांच्या डब्यांमध्ये वगैरे बांधून ठेवले. उरलेले म्हणजे भरलेल्या वह्या, कागदे, वर्तमान पत्रे समोरील व्हरांड्यातून खाली टाकले.  दोन्ही विंग चौकोनी आकाराच्या आहेत. त्यात मध्ये सर्व कागदे जमा झाली.  बहुतेक मुले संध्याकाळी घरी निघून गेली, उरलेले आम्ही रात्री सिनेमा पाहून नंतर गप्पा मारण्याच्या हिशोबाने दुसर्‍या दिवशी जाणार होतो.  सिनेमा पाहून आल्यानंतर गप्पा झाल्या.  सर्व जण झोपले होते.  रात्री दरवाज्यावर ठकठक झाली.  ठकठक कसली, जोरजोरात दरवाजा ठोठावणे चालले होते.  दरवाजा उघडला.  रात्रीचे ३:४५/४:०० वाजले असतील.  खानावळीतील मुलगा म्हणत होता की सर्वांना खानावळीसमोर बोलावले आहे.  बाहेर पाहिले तर धूर दिसत होता.  अंदाज आला काय झाले ते.  कोणी तरी रात्री त्या समोर फेकलेल्या कागदांवर काडी टाकली होती.  आम्ही पोहोचलो बोलावले तिकडे.    सर्व (उरलेली) मुले जमली होती. सर्वांना तातडीने बोलावले होते.  बहुतेक मुले बनियान, हाफ पँटमधेच येऊन बसले होते.  थंडीही वाजत होती.  सरांनी विचारले, 'कोणी केले हे'? माहित तर नव्हतेच आणि माहित असले तरी कोण सांगणार. मग काय, राग देऊन मग आम्हाला सांगितले, तुमचे परीक्षेचे प्रवेशपत्र जमा करून सकाळी ७ च्या आधी वसतीगृह रिकामे करा.  काय करणार? सकाळी ७/७:१५ ला सर्व वसतीगृह रिकामे झाले.  ह्यात त्या कागदं जाळण्याने वसतीगृहाचे नुकसान झाले नाही त्यामुळे हायसे वाटले.

ह्या असल्या गंमती थोड्याफार फरकाने सर्वांनी अनुभवल्या असतीलच. पण जरी बहुतेक लोक असे काही करत असतील, ऐकून माहिती असतील तरी स्वत: अनुभवलेल्या म्हणून ह्या आठवणी नेहमीच सोबत राहतील.

(हाच लेख ’हास्यगाऽऽरवा’ मध्येही प्रकाशित झाला होता)
Reactions:

2 प्रतिक्रिया:

आनंद पत्रे म्हणाले...

हे...हे...हे...वाचुन मजा आली. मी वसतीगृहात राहीलो नाही त्यामुळे हे सर्व अनुभवले नाही...

देवदत्त म्हणाले...

धन्यवाद.
एक वर्ष तरी का होईना वसतीगृहाचा अनुभव असावा असे वाटते.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter