अलिबाबाची कथा आजच्या जीवनात धरली तर, आपण ह्यातील एकच असे कोणी नाही तर त्यांच्या एकत्रित केलेल्या प्रकारात येतो. आपल्याच महत्त्वाच्या गोष्टी आपण गुहेत परवलीच्या शब्दाने सांभाळून ठेवतो. पण एखाद्याला तो परवलीचा शब्द कोणाला कळला तरी नुकसान होऊ शकते. तसेच आजकाल गळ लावलेले विपत्र येतात (ज्यांना फिशिंग मेल म्हणतात) त्यातही कोणी आपला परवलीचा शब्द इतरांना सांगू शकतो. तिथेही आपण गोत्यात येऊ शकतो. त्याकरीता खबरदारी एवढीच की ते सदस्यनाम आणि परवलीचा शब्द सांभाळून ठेवणे.
आंतरजालावर आपण विविध ठिकाणी खाते उघडलेले असते. विपत्र, आंतरजालीय बँक, खरेदी, संगणक संबंधी चर्चास्थळे, सामाजिक संकेतस्थळे, वैयक्तिक संकेतस्थळे. तसेच कार्यालयातील संगणकात प्रवेश, त्यात मग त्यांची विविध प्रकारचे संकेतस्थळे, सॉफ्टवेयर... वगैरे वगैरे. आता ह्यात एकदम सुरक्षित रहावे अशा गोष्टी म्हणजे बँक, क्रेडीट कार्ड, विपत्र ह्यांची खाती आणि कार्यालयातील विविध गोष्टी. इतर ठिकाणी सहसा कुणी तुमच्या खाते आणि परवलीचा शब्दाच्या मागावर राहत नाही. आणि त्यात परवलीचा शब्द विसरलाच तर त्या ठिकाणी "परवलीचा शब्द विसरला आहात का?" पर्यायाने आपण तो जुना शब्द रद्द करून नवीन बनवू शकतो. तिथे काही बंधने नाहीत की ठराविक प्रयत्नांनंतर तुमचे खाते गोठविण्यात येईल. पण बँक आणि क्रेडीट कार्ड करीता ही बंधने असतात. (अर्थात आपल्याच सुरक्षिततेसाठी). त्यामुळे तो परवलीचा शब्द विसरणे काही वेळा अडचणीचे ठरवू शकते. कारण नवीन शब्द बँकेने बनबून द्यायला ७ दिवस जाऊ शकतात. कार्यालयातही एकवेळ ठिक आहे, तिथे संबंधित विभागाला सांगून आपण तो लगेच चालू करू शकतो.
वेगवेगळ्या ठिकाणचे सदस्यनाव व परवलीचा शब्द लक्षात ठेवणे थोडे वैतागाचे काम आहे. त्यात आजकाल मी हे शब्द विसरणे हे वाढत चालले आहे. ह्या संकेतस्थळावर हे सदस्यनाव आहे. त्याचा परवलीचा शब्द काय आहे बरे? ह्यातच काही वेळ निघून जातो. अर्थात महत्त्वाची संकेतस्थळे जसे नेहमीच्या वापरातील बँक, विपत्र खाते ह्याचे सदस्यनाम मी सहसा विसरत नाही. पण काही वेळा अडचण येते नवीन खाते उघडले तेव्हा नवीन परवलीचा शब्द दिले असले तर आणि काही वेळा नुकतेच परवलीचा शब्द बदलले असले तर. त्यामुळे एक दोन वेळा माझे खाते बंदही पडले आहे. मग पुन्हा बँकेला फोन करून तो नवीन बनविणे हे आलेच.
त्याकरीता केलेले काही प्रयत्न असे:
- काही वेळा त्या खात्याशी संबंधित परवलीचा शब्द ठेवणे जरा सोपे वाटते. पण आपल्या नावासोबत इतर खाजगी माहितीतील संदर्भ वापरणे ही धोक्याचे ठरू शकते. तरीही त्यात ठराविक साच्याप्रमाणे परवलीचा शब्द ठरविणे मी काही वर्षांपासून केले होते. पण त्यातही आता तोच तोच पणा आला असे वाटते. म्हणून तो प्रकारही बदलवला आहे.
- सगळीकडे एकच परवलीचा शब्द ठेवणेही चुकीचे. कारण एखाद्याला तो परवलीचा शब्द कळला तर मग काम संपले. तसेच तो साचाही कळला तरी अडचण.
- तसेच आंतरजालावर विविध सॉफ्टवेयर उपलब्ध आहेत परवलीचा शब्द जपून ठेवण्याचे. म्हणजे तुम्ही त्यात खाते नाव आणि परवलीचा शब्द लिहून ठेवा व ती फाईल एका वेगळ्या परवलीचा शब्दाने सुरक्षित ठेवा. ह्यातही वेगळी अडचण. जर त्या एका फाईलचा परवलीचा शब्द कोणाला कळला तर...
- माझा एक मित्र त्याचे विविध खाते क्रमांक, सदस्य नाव एका डायरीत लिहीत असे. त्याला विचारले "काय रे ह्यात परवलीचा शब्दही ठेवतोस का? तुझी डायरी एकदा पळवली पाहिजे ;) " मी हा प्रकारही आधी केला होता. डायरी पळवण्याचा नाही, सदस्यनाम आणि परवलीच्या शब्दाचा संदर्भ लिहून ठेवण्याचा. :) आता नाही करत. स्वत:ची स्मरणशक्ती चांगली आहे असे वाटून ते बंद केले.
- मध्ये अशाच एका चर्चेत मी कोणालातरी परवलीचा शब्द ठरवण्याचे थोडे प्रकार सांगितले होते.त्यातील एक म्हणजे सिनेमाचे नाव किंवा त्याची पहिली अक्षरे. ह्यांचे एकत्रित शब्द पण तेही आता नीट वाटत नाही आहेत.
आणखीही इतर नवीन प्रकार कोणी सुचवू शकतो का?
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा