मला राजकारणातील जास्त कळत नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही माहीत आहे त्यावरून पुढील विवेचन..
शेतकर्यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको असे शरद पवार म्हणाले. (पहा बातमी)
स्वत:ला काही करणे जमले नाही किंवा काही करायचे नसले तर अशी विधाने बाहेर निघतात का?
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकर्याला खरंच भाव मिळत असल्याचे त्यांना दिसत आहे का? मला नाही तसे वाटत. शेतकर्यांना कमी भाव मिळतो. तो माल बाहेर ग्राहकापर्यंत येता येता त्याचा भाव खूप वाढतो असेच दिसते. शेतकर्यांना भाव मिळत असल्याने महागाई वाढत असल्यास, इतके वर्षे महागाई वाढत असल्याचे दिसत आहे त्यात मग शेतकरी हलाखीचे जीवन का जगत आहेत?
हो, अवेळी पावसाने शेतीत नुकसान झाले त्यामुळे अन्यधान्याची कमी हे एक कारण आहेच. पण महागाई वाढण्यास इतर कारणे नाहीत का? सरकारी खात्याने ज्या धाडी टाकल्या त्यात साठेखोरांनी करोडो रुपयांचे धान्य साठवून ठेवण्यात आल्याचे दिसले त्याबाबत त्यांचे काहीच म्हणणे नाही का?
दोन वर्षांपुर्वी MRP अर्थात सामानाच्या अधिकतम मूल्याचे नियम धाब्यावर बसवून जे अवाजवी मूल्य आकारण्यात येत होते त्याबाबत श्री शरद पवार ह्यांच्याकडे विचारणा केली गेली त्यांनी त्याबाबत कारर्वाई करण्यात येईल असे सांगितले होते. थोड्याच दिवसांत ह्याबाबत काहीच केले गेले नसल्याने त्यांना विचारले असता त्यांनी "असे काही झाले असल्याची मला माहीती नाही" असे सांगितले (संदर्भ: मी आवाज वाहिनीवर त्यांच्या दोन्ही प्रतिक्रिया बघितल्या होत्या.)
आता त्यांनी हे वाक्य म्हणणे म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती होणार असेच दिसते. म्हणजे आधी काही तरी एक सांगणे. नंतर असे काही घडलेच नाही असे सांगणे.
लोकांच्या भूकेचा प्रश्न सोडविणारा भूकेकंगाल होता कामा नये ह्यासाठी जर महागाई वाढत असेल तर माझे महागाई विरोधात काही म्हणणे नाही. शेतकरीच काय पण कोणीही भुकेने त्रासला जाऊ नये असे मलाही वाटते. परंतु मग राज्यकर्त्यांनी ह्याबाबत खरोखरच काय घडत आहे त्याचे लोकांसमोर नीट निवेदन करावे.
खरोखर काय कारणे आहेत ते कळावे असे मलाही वाटते.
एप्रिल २०, २००८
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा