जानेवारी २८, २०१०

देव काका, घारे काका आणि अनिकेत समुद्र ह्यांनी 'ब्लॉग माझा'च्या पारितोषिक वितरणाबद्दल आधीच लिहिले आहे. त्यामुळे पुन्हा तेच तुम्हाला वाचावयास मिळेल हे खरे, पण माझ्या दृष्टीकोनातून. (जमेल तेवढी पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न केला आहे.)

नोव्हें ०९ मध्ये 'ब्लॉग माझा'चा निकाल जाहीर झाला. त्यानंतर वेध होते पारितोषिक वितरणाचे. खरंतर सह्याद्री किंवा मुंबई दूरदर्शनवरील फोन-इन कार्यक्रमांमध्ये प्रश्न विचारून माझे नाव मी दूरदर्शनच्या पडद्यावर पाहिलेही होते, लोकांनीही माझे प्रश्न ऐकले होते. पण तो प्रकार वेगळा आणि हा वेगळा. तिथे बोलावून वाहिनीवर आपले नाव आणि स्वतःचा चेहरा दाखवणार ह्याचा आनंद होताच. पण त्यापेक्षा जास्त आकर्षण होते श्री. अच्युत गोडबोले ह्यांना भेटण्याचे. त्यांची ३ पुस्तके वाचलेली आहेत. लोकप्रभामध्ये त्यांचे उत्तम लिखाण वाचत असतो आणि मुख्य म्हणजे ते आमच्याच क्षेत्रातले तज्ञ. त्यांनी माझा ब्लॉग निवडला आणि पुन्हा त्यांच्याच हस्ते प्रमाणपत्रही मिळणार होते. मग का नाही आनंद वाटणार? आणि पहिल्यांदा होणार्‍या गोष्टीचे अप्रूप असतेच.

तसे म्हटले तर पडद्यावरील किंवा मागची हालचाल थोडीफार जवळून पाहिलीच होती. चित्रपटाचे चित्रीकरण पाहणे तर भरपूर वेळा झाले होते. पण स्वतःबद्दल म्हणायचे, तर शाळेत असताना नाटकात भाग घेतला होता. ते नाटक शाळेच्याच स्नेहसंमेलनाकरीता जी नाटके झालीत (नाटकं करतोय मधील नाटकं नव्हेत ;) ) त्यात एक होते. त्यांनतर तेच नाटक आंतरशालेय स्पर्धेतही पहिले आले होते. दोन्ही प्रयोग दिनानाथ नाट्यगृहात झाले होते. त्यायोगाने दिनानाथ नाट्यगृहाचे मेकअप रूम, विंग आतून पाहता आले. पडदा कसा हलवतात, प्रकाशयोजना कशी होते ते ही पाहण्याचा अनुभव आला. तसेच TRP च्या सॉफ्टवेअरवर काम करताना सुरूवातीला काही वाहिन्यांच्या कार्यालयातही जाण्याचा योग आला होता. त्यामुळे त्या कार्यालयाबद्दल आकर्षण कमी झाले होते. पण एखाद्या वाहिनीच्या स्टुडियोमध्ये जाऊन कॅमेर्‍यासमोर उभे राहीन असे वाटले नव्हते. 'ब्लॉग माझा' स्पर्धेमुळे ते झाले.

असो, आता हरभर्‍याच्या झाडावरून खाली उतरतो आणि पुढे वळतो.

हं.. तर बुधवारी प्रसन्न जोशींनी विपत्र पाठवून रविवारी चित्रीकरण होणार असल्याचे सांगितले. आम्हा ब्लॉगर्सपैकी कोण कुठे आहे नेमके माहित नव्हते आणि कार्यालयीन व्यापामुळे जास्त वेळ देता आला नाही. तरी देवकाकांना विचारून ठेवले. आपण महालक्ष्मी रेल्वे स्थानकावर भेटू असे सांगितले. आम्ही (मी आणि बायको) घरून निघालो १० वाजता. अंदाजाप्रमाणे ११:१० च्या आसपास महालक्ष्मीला पोहोचलो. ५-१० मिनिटांत देवकाका आले. त्यांच्यासोबत चालत-चालत स्टारच्या कार्यालयात पोहोचलो. ३ वर्षांपूर्वी काही कारणास्तव त्या भागात गेल्याने मला ते कार्यालय पाहून माहित होते. त्यामुळे जास्त शोधावे नाही लागले, पण तरीही एक गल्ली आधी चौकशी करून पुढे गेलो. तिथे पोहोचलो तर घारे काका आधीच पोहोचले होते. स्वागत कक्षातील सुरक्षारक्षकाने सांगितले की २-३ जण आधीच येऊन आत बसले आहेत. आम्हालाही आत पाठवले तेव्हा निखिल देशपांडे (राज जैन यांच्या वतीने) आणि हरीप्रसाद (छोटा डॉन) तसेच दीपक कुलकर्णी ह्यांच्याशी भेट झाली. त्यानंतर आले सलील चौधरी, नीरजा पटवर्धन, मीनानाथ धसके. अनिकेत समुद्र आणि दीपक शिंदे (दोन्ही भुंगे :) ) पुण्यावरून पोहोचले. तसेच विशेष आम्हा सर्वांना भेटायला आलेले श्री. लक्ष्मीनारायण हट्टंगडी ही तेथे आले होते. तिथेच आमच्या गप्पा सुरू झाल्या.

थोड्या वेळाने प्रसन्न जोशी तिथे आले. त्यांना नेहमी बातम्या देताना सूटात पाहिल्याने निळ्या टीशर्ट मध्ये पाहताना एकदम वेगळे वाटले. एकदम हसतमुखाने त्यांनी विचारपूस केली व सांगितले की बाकीचे लोक थोड्याच वेळात पोहोचतील. पारितोषिक वितरणाच्या उशीराचे कारण त्यांनी समजावून सांगितले तेव्हा त्यांची नेमकी अडचण कळली. काही वेळाने त्यांनी सांगितले की, 'अच्युत सर पोहोचत आहेत'. सर्वांना नीट बसून बोलता यावे म्हणून ७व्या मजल्यावरील खानपानगृहात आम्हाला नेले. तिथे त्यांनी आम्हाला पुढील कार्यक्रम सांगितला. एक झाले, घरून निघताना मला तिथे फार औपचारिकता असेल असे वाटत होते. पण प्रसन्नच्या वागण्या-बोलण्यावरून पूर्ण औपचारिकता निघून गेली व आम्ही एकदम मनमोकळेपणाने त्यांच्याशी आणि सर्वांशी बोलणे सुरू केले. तिथेच कळले की मेधा सपकाळ ह्यांच्या वतीने विक्रांत देशमुख व विजयसिंह होलाम ह्यांच्या वतीने त्यांची बहीण व मेव्हणे आले होते.

अच्युत गोडबोले थोड्या वेळात तेथे पोहोचले. ते फोनवर बोलत बोलत खुर्चीवर बसले तर आम्ही ही त्यांना गराडा घालून बसलो. आधी सर्वांची ओळख करून दिल्यानंतर सुरू झाल्या मोकळ्या, अनौपचारिक गप्पा. प्रत्येकाने स्वतःचा परिचय देऊन ब्लॉगचे विचार सांगितले, तसेच गोडबोले सरांनीही स्वत:च्या आलेल्या, पुढे येणार्‍या पुस्तकांबद्दल सांगितले आणि इतर अनुभवही. पुढे मग अल्पोपहार करताना प्रसन्ननी सांगितले की, स्टुडीयो ४५ मिनिटांकरीता मिळाला आहे त्या वेळात चित्रीकरण उरकूया. आम्ही पुन्हा खाली जाऊन बसलो. तेथे त्यांच्या एका सहकारीने आम्हाला चेहर्‍यावर टच्-अप करण्याकरीता नेऊन मग स्टुडियोच्या खोलीत नेले. आत प्रसन्न सर्व व्यवस्था करण्यात गुंतले होते. तोपर्यंत आम्ही ती कंट्रोल रूम पाहून घेतली. भरपूर दूरदर्शन संच (मी मोजायचा प्रयत्न केला नाही. ;) ) एकात वृत्तनिवेदिकेचा कॅमेर्‍यातून घेतलेला फीड, एकात निवेदक ज्यातून वाचून सांगतात त्या मोठ्या अक्षरातील सरकत्या बातम्या, एकात स्टारचा लोगो आणि बातमीची मुख्य वाक्ये (हो तीच, News Flash वाली) संगणकाद्वारे जोडलेली, एकात वृत्तनिवेदकाच्या पार्श्वभूमीवर दाखवण्यात येणारे चित्र, एकावर पूर्ण तयार झाले बाहेर जाणारे वाहिनीचे दृष्य, असे वेगवेगळे प्रकार जे ऐकून माहित होते ते प्रत्यक्षात पाहिले. आणि त्या लोकांनाही लहानशी बातमी देण्याकरिता काय काय करावे लागते ते ही दिसले. मग प्रसन्ननी त्यांच्या दुसर्‍या सहकार्‍याशी ओळख करून दिले, अश्विन. अश्विननेच मागील वेळी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते आणि ह्यावेळीही करणार होता.

आमच्या ह्या गडबडीत माझी बायको आणि विजयसिंह होलाम ह्यांची बहीण बाहेर थांबले होते. त्यांना आत येण्यासाठी विचारण्याकरीता बाहेर पडलो. काय वळणावळणातून आम्हाला आत आणले होते कळले नाही. भूलभूलैयाच वाटला. कसातरी बाहेर आलो. दोघींनी सांगितले, 'आम्ही बाहेरच थांबतो', तर पुन्हा २-३ जणांना विचारत स्टुडियोपर्यंत पोहोचलो. तोपर्यंत कार्यक्रमाच्या सुरूवातीचे चित्रीकरण झाले होते, प्रसन्ननी आम्हाला आमचा आत जाण्याचा क्रम सांगितला. त्याप्रमाणे आम्ही तयार होतो. आत अश्विन, गोडबोले सर आणि घारेकाका हे तिघे उभे होते. बाहेरून दूरदर्शन संचावर पाहून त्यांची उभे राहण्याची जागा ठरविली जात होती. थोड्याच वेळात पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम चित्रीत करण्यास सुरूवात झाली. एका मागोमाग एक आम्ही तयार राहत होतो, आत जात होतो, बाहेर येत होतो. काहीजणाचे पाहून मला नेमके काय करायचे ते कळले होते, पण खरोखरच माझी हालचाल कशी होती व बोलणे कसे होते ते मलाही आता कार्यक्रम पाहुनच कळेल. हळू हळू आम्हाला कळले की काय दाखवले जाणार आहे. (काय-काय ते आता दाखवतीलच. मी सांगत नाही ;) )

नंतर प्रसन्ननी आम्हाला बाहेरपर्यंत सोबत येऊन निरोप दिला. तिथेही बाहेर पुन्हा गप्पा सुरूच होत्या. मी एक दोन दिवस आधी घरी म्हणालो होतो की ह्या ब्रेकिंग न्यूज कल्पनेबद्दल त्यांना विचारेन. अर्थात मी ते विचारणार नव्हतो. बाहेर आल्यानंतर त्यांना सांगितले की हा अनुभव कसा होता ते. पण जित्याची खोड म्हणा, की प्रसन्नचा मोकळा स्वभाव म्हणा, मला इतके दिवस वृत्तवाहिन्यांना सांगायचे होते ते सांगून दिले की, तुमचे(वाहिन्यांचे) काही प्रकार आम्हाला आवडत नाही, पण ते फक्त स्टारकरीता नव्हते. प्रसन्नने ते ही शांतपणे ऐकून घेतले. अरे हो, आत सगळे चालले असताना प्रसन्ननी आम्हाला विचारले होते, 'तुम्हाला हे सर्व पाहून ब्लॉगकरीता नवीन विषय मिळाला असेल.' आम्ही ही संधी सोडतो होय? तिथेही गंमत करणे चालू झाले. देवकाकांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच एकदम आवडण्यासारखा माणूस. :) मलाही नंतर वाटले की उगाच म्हणालो मी वृत्तवाहिन्यांबद्दल. पण पुन्हा वाटले की, मनात होते केव्हापासून ते सांगून टाकले ते बरे झाले. त्यांनाही चांगलेच वाटेल की, आम्ही आम्हाला काय वाटते तेही सांगितले.

नंतर मग आम्ही ९ जण उरलो होतो. ठरविण्यात आले की, दादरच्या जिप्सी हॉटेलमध्ये चहा-नाश्ता करावयास जाऊ. तिथे पोहोचता पोहोचता हॉटेलसमोरच देवकाकांचा पाय मुरगळला. त्यांच्याकरीता स्प्रेचा बंदोबस्त करून मग जिप्सी हॉटेलमध्ये खानपान सेवा झाली. मी, माझी बायको, दीपक, हरिप्रसाद (छोटा डॉन ) व निखिल नंतर तिथून दादर वरून लोकल मार्गे परत आलो. लोकलमध्येही समोरासमोर बसण्यास जागा मिळाल्याने पुन्हा गप्पांना ऊत आला होता.

एकंदरीत, इतके दिवस कधी होणार म्हणणारा कार्यक्रम एकदम मस्त वातावरणात पार पडला. त्याबद्दल पुन्हा एकदा स्टारच्या चमूचे आणि खास करून प्रसन्न जोशी, गोडबोले सरांचे आभार.

अरे हो, कार्यक्रमाची नियोजित वेळ अजून ठरविली नाही आहे. ती लवकरच कळेल.

(ता.क.: आत्ताच देवकाकांच्या ब्लॉगवर वाचले की पायाचे स्नायू खूपच ताणल्या गेल्याने त्यांच्या पायाला प्लास्टर लावण्यात आले आहे. :( )

Reactions:

6 प्रतिक्रिया:

मी अत्त्यानंद म्हणाले...

देवदत्ता,मस्तच आहे तुझा वृत्तांत. जरा हटकेच आहे.

छोटा डॉन म्हणाले...

छान लिहला आहेस रे वॄत्तांत.
जराश्या वेगळ्या शैलीतला वाटला, मज्जा आली.

मला पण लिहायचे आहे खरे ह्या विषयावर पण अजुन वेळेचे गणित काही जमेना. ह्या विकांताला जमवुनच घ्यावे लागेल.
देवकाकांचाही वॄत्तांत मस्त होता.

टारझन - द एप मॅन म्हणाले...

अरे वा !! मस्तच झाला की कार्यक्रम :)
पुन्हा एकदा अभिनंदन देवदत्त !

- टारझन

देवदत्त म्हणाले...

देव काका, छोटा डॉन तुम्हाला धन्यवाद. त्या दिवशी सर्वांना भेटून खरोखरच खूप मजा आली.

टारझन, तुलाही धन्यवाद. :)

Shekhar म्हणाले...

Mitra, sahich...abhinandan tuze !!!

- Shekhar

देवदत्त म्हणाले...

धन्यवाद Shekhar :)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Subscribe

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter