गेले एक आठवड्यापासून 'अर्थ अवर' विषयी वाचत होतो. बहुतेकांनी ह्याला पाठिंबा दिलाच होता. मी ही विचार करत होतो करावे की नाही. आपल्या येथे वीज महामंडळ रोज ३-४ तास भारनियमन करत असतेच. पण त्याला कोणी "अर्थ ४ अवर्स" म्हटले नाही. ;)अर्थात एक तास वीज बंद ठेवणे जमण्यासारखे होतेच. पण नंतर जास्त लक्ष देता आले नाही. १-२ दिवसांपूर्वी आमच्या कार्यालयातूनही ह्याबाबत ईमेल पाठवून ह्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तेव्हाही थोडेफार बोलणे होऊन नंतर तो विचार बंद पडला.
अर्थ अवर आणि मी:
आज रात्री ८:२५ वाजता पुन्हा आठवण झाली. म्हटले प्रयत्न करूया. पण पूर्ण घराची वीज लगेच बंद करणे शक्य नव्हते. (मंडळाने वीज बंद केली असती तर तो भाग वेगळा. पण आपण थोडाफार स्वार्थ दाखवतोच.) म्हटले पूर्ण घर नाही तर जमेल तेवढे. लगेच संगणक बंद केला. दिवाणखान्यातील (हॉल ला दिवाणखानाच म्हणतात ना आजही?) दिवे बंद केले. पण टीव्ही बंद केला नाही. सोबत चालू होता स्वयंपाकघरातील दिवा. जेवण बनत होते हो, ते थांबविणे जीवावर आले ;) पुढे मग ९:३० वाजताच दिवे चालू केले.
अर्थ अवर आणि इतर:
वृत्तवाहिन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया/न्यूझीलंड ह्यांनी 'अर्थ अवर'ची सुरूवात केली होती त्याची दृश्ये दाखवत होते. नंतर मग स्टार न्यूज वर दाखवत होते की, थोड्याच वेळात 'अर्थ अवर' चालू होणार आहे. म्हटले बघूया, हे लोक काय करतात? वाटले हे लोक स्वतः काही करणार नाहीत पण लोकांना सांगतील. पाहिले तर स्टार न्यूज/आजतक/२४ लाईव/CNEB ह्या वाहिन्यांनी स्टुडियोमधील अनावश्यक दिवे बंद केले होते. स्टारने सांगितले की मुलांच्या परीक्षा चालू असल्याने तुम्हाला सर्व दिवे बंद करणे शक्य नसेल पण सर्व अनावश्यक दिवे बंद करावेत. बाकी वाहिन्यांना ह्याच्याबद्दल काही म्हणणे नव्हते. त्यांचे आपले निवडणुकांवरचे नेहमीचे रटाळ कार्यक्रम चालू होते. वास्तविक मला वाटले होते की ह्या वृत्त वाहिन्यांनी एक तास आपली वाहिनी बंद ठेवली असती तर त्याचा चांगला आदर्श ठेवता आला असता (आणि त्यायोगे प्रेक्षकांचीही सुटका झाली असती ;) ) जाऊ द्या, त्यांच्याही आपल्या अडचणी असतील.
सोबत एक परस्पर विरोधी गोष्ट जाणविली. मुंबईत (बहुधा बोरीवलीत) Vote For Earth म्हणून कार्यक्रम चालू होता. तेथे नाचगाणे चालू होते. पण त्यांनी भरपूर दिवे वापरले होते. आता लोकांना सांगतात की 'एक तास दिवे घालवा', स्वतःही घालवले असतील. पण तेवढीच वीज त्या कार्यक्रमात का घालवावी?
असो, मी स्वतः जेथे पूर्ण वीज बंद नाही केली तिथे त्यांना ब्रह्मज्ञान का देऊ? पण ह्या निमित्ताने सर्वांसोबत काहीतरी चांगले केल्याचा आनंदही आहे. पुढेही आणखी चांगले करायचा प्रयत्न करीन :)
मार्च २८, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा