[आय.पी.एल चे सामने भारताबाहेर खेळावयाचे ठरविले गेले त्याच दिवशी मी हे प्रश्न माझ्या अनुदिनीवर लिहिले होते आणि ते मिसळपाव.कॉम तसेच मनोगत.कॉम वरही प्रकाशित केले होते. पण मध्येच पडलेल्या संभ्रमामुळे आणि क्रिकेट तसेच राजकारणावर लिहू नये असे वाटल्याने मी ते सर्व ठिकाणहून काढून टाकले. पुन्हा वाटले की क्रिकेट राहू द्या पण आपल्याशी निगडीत असलेल्या गोष्टींबाबत हे प्रश्न असल्याने पुन्हा माझ्या अनुदिनीवर प्रकाशित करत आहे. हे लिखाण (निदान इतर संकेतस्थळांवर) अचानक अप्रकाशित का झाले ह्या बाबत कोणास प्रश्न पडल्यास उत्तर म्हणून हे निवेदन. ज्यांनी माझ्या प्रश्नांवर प्रतिक्रिया लिहिल्या होत्या त्यांचे आभार. :) ]
नुकत्याच आलेल्या बातमीनुसार आय.पी.एल. अर्थात IPL चे T20 सामने भारताबाहेर खेळवण्याचे ठरविले आहे.ह्या मागील कारण हेच की लोकसभा निवडणुकाही त्याच काळात होत असल्याने सामन्यांच्या दरम्यान सुरक्षितता देणे पोलिसांना कठीण आहे व बहुतेक राज्य सरकार तसेच पोलिसांनी त्यास नकार दिला आहे.
ह्यावरून काही प्रश्न मला पडलेत ते असे.
१. क्रिकेटला एवढे महत्त्व का? सामने पुढे ढकलणे जमू शकले नसते का? २/३ वर्षांकरिता क्रिकेटच्या सामन्यांचे वेळापत्रक ठरविलेले असेल त्यामुळे ते कठीण आहे. पण हे सामने मुख्यत्वे भारताशीच निगडीत आहे. फक्त इतर देशांचे खेळाडूही त्यात आले आहेत, त्यामुळे निवडणुका असल्यास ते पुढे ढकलणे योग्य नाही का?
२. जर सामने आधीच ठरविले होते, तरी आपल्या निवडणुका एप्रिल-मे दरम्यान होऊ शकतात ह्याचा त्यांनी विचार केला नव्हता का? केला असल्यास सुरक्षिततेबाबतचा प्रश्न तेव्हाही विचारात असायला पाहिजे. तो आत्ताच का समोर आला? आणि मग आता सरकारला दोष का द्यावा?
३. एक कारण सांगतात की सामने रद्द केल्यास आर्थिक नुकसान होउ शकते. पण आता तर एका देशातून दुसर्या देशात सामने ठेवणार तेव्हा त्यात खर्चाचा प्रश्न नाही येत का?
४. सामन्याच्या वेळी ज्या राज्यात निवडणुका आहेत त्या खेळाडूंच्या मतदानाबाबत काय? उदा. निवडणूकीचे वेळापत्रक आणि सामन्यांचे वेळापत्रक पाहिल्यास कर्नाटक मध्ये २३ एप्रिल ला मतदान होणार आहे. त्याच दिवशी बँगलोर रॉयल चॅलेंजर्सचा सामना आहे. त्याबाबत काय? फक्त खेळाडू सोडा पण इतरही सदस्य त्यांच्या सोबत असतील त्यांच्या मतदानाचे काय? त्यांना बहुधा दुसर्या राज्यात त्या राज्याच्या मतदानाच्या दिवशी मतदानाची परवानगी देऊ शकतात का? दिली तरी हा अपवाद बरोबर आहे का? हाच अपवाद इतर खेळांकरीता मिळाला असता का?
५. आय पी एल च्या सामन्यांकरीता सुरक्षा मागणारे नेते, आताही जेथे सुरक्षिततेची नेमकी गरज आहे अशा संवेदनशील ठिकाणी पोलीस सुरक्षा वाढवून घेण्यात पुढाकार का घेत नाहीत? तसेच देशातील/राज्यातील इतर महत्वाच्या मुद्यांवर लक्ष देण्यापेक्षा क्रिकेटवर जास्त लक्ष का?
प्रश्न सध्या तरी संपले :)