अनुभव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अनुभव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मार्च २९, २०१६


आज सकाळी दुचाकीने ऑफिसला जात होतो. पवईतील पिझ्झा हट् च्या सिग्नलजवळ पोहोचलो तेव्हा पाहिले ४ सेकंद बाकी होते, म्हणून गाडी न थांबवता सरळ गेलो. मी उजव्या बाजूला होतो. डाव्या बाजूला जी एकेरी मार्गिका आहे तिकडून बस नेहमीच उजवीकडच्या मार्गिकेत येत असतात. आजही एक बस तशीच आली, पण ती बस एकदम वेगात होती, सिग्नल बंद होत आला म्हणून असेल. माझ्या पुढे एका दुचाकीवर एक मुलगा, त्याच्या मागे मुलगी. त्यांच्या एकदम जवळ बस जात होती. त्या दोघांनी त्याच्याकडे हात दाखवत त्याला चूक सांगायचा प्रयत्न केला. ते पुढे निघून गेले. मागोमाग मी.

पाहिले तर तो चालक मोबाईलवर बोलत बस चालवत होता. पुढे सुवर्ण मंदिराच्या वळणावर मी आलो, तेव्हा त्या बसचालकाने त्या वळणावरही एकदम वेगात बस उजवीकडे वळविली, मी एकदम त्या बसजवळ. माझा वेग जास्त असता तर ठोकलोच असतो त्याला. मी ओरडलो तसे त्याने बस हळू केली. मी त्या बसच्या समोर बाइक उभी केली व त्याला रागावू लागलो. चालक म्हणाला 'मी बरोबर चाललोय, तूच उजवीकडे जागा सोडून इकडे आलास.' मी म्हणालो, 'मी सरळ चाललो होतो, तूच एकतर मोबाईलवर बोलत आणि वेगात हे वळण घेतलेस. मागच्या सिग्नललाही.'

ह्यात इतर बसमधील एक प्रवासी खिडकीत आला व मला दोष द्यायला लागला की मी उजवीकडे गाडी घ्यायला पाहिजे होती. मी म्हटले, 'तो मोबाइलवर बोलत, बस एवढ्या वेगात चालवतोय ते ही वळणावर आणि चूक माझी का? मग तुम्हीच भोगा पुढे काही झाले तर'


असाच एक अनुभव बँगलोरमध्ये होतो तेव्हाही आला होता. तेव्हा मी बाहेर गाडी चालवत नव्हतो तर त्याच बसमध्ये होतो आणि चालक मोबाईलवर बोलत बस चालवत होता, जोरात ब्रेक दाबणे पुन्हा वेगात नेणे वगैरे. तेव्हाही मी तक्रार केली तेव्हा लोक मलाच म्हणाले की 'तू त्याला काही बोलू नकोस.'

ह्यावरून एक नक्की.. लोकांना कोणी मोबाईलवर बोलत गाडी चालवत असल्यास काही आक्षेप नाही, उलट त्याला कोणी बोलल्यास ते ही चालत नाही. आणि स्वत:च्या जीवाचीही चिंता नाही.

मी आधीपासूनच गाडी चालवताना बसपासून दूर असायचो, आता तर बहुधा त्यालाच विचारावे लागेल, 'बाबा रे, मी तुझ्या बसच्या जवळून चूकून गेलो तर चालेल का?'

मार्च १७, २०१६


दरवर्षीप्रमाणे पुन्हा 'पृथ्वीकरिता एक तास' अर्थात 'अर्थ अवर' ची चाहूल लागली आहे. १९ मार्च रोजी रात्री ८:३० ते ९:३० दरम्यान आपण वीजेची उपकरणे बंद करून वीज वाचवावी जी पृथ्वीकरीता उपयोगी पडेल असा त्यामागील हेतू आहे.

२००९ मी ही हे पाळून त्याबद्दल येथे लिहिले होते. मधली वर्षे त्याबद्दल जास्त रस दाखविला गेला होता की नाही सध्या आठवत नाही.

आता ह्या वर्षीही त्याबद्दल बोलले जात आहे. कार्यालयातही ह्याबाबत ईमेल येत आहेत. कंपनीच्या अंतर्गत संकेतस्थळावरही त्याबद्दलची चर्चा सुरू आहे. विविध देशांतील आमची कार्यालये हे पाळतील असे म्हटले आहे. भारतातील कार्यालयातही हे पाळले जाईल. अर्थात शनिवारी कार्यालयीन सुट्टी असल्याने त्याचा एवढा प्रभाव पडेल असे वाटत नाही. पण तरीही चांगले आहे. निदान खाजगी कंपन्या, इतर काही देशांतील काही लोक ते पाळतील असा अंदाज आहे.

पण भारतात इतर ठिकाणी ह्याचा प्रभाव किती असेल? मला तरी शंका आहे. लोकांच्या एकूण हेतूबद्दल नाही. काही लोक पाळत असतील हे, जरी सर्व नाही. पण शंका येण्याचे दुसरे मोठे कारण आहे की, १९ मार्चला संध्याकाळी ७:३० वाजता टी२० विश्वचषकाचा भारत वि. पाकिस्तान सामना आहे. आता भारत-पाकिस्तान सामना म्हटला की आधीच लोकांना उत्साह आलेला असतो, त्यात विश्वचषकाचा सामना. मग घरात तर काय बाहेरही वीज बंद होणार नाही. बहुधा जास्त टीव्ही व प्रोजेक्टर वापरले जातील.

म्हणजेच ह्यावेळी भारतात तरी अर्थ अवर ला जास्त पाठिंबा मिळणार नाही असे वाटते.

फेब्रुवारी १६, २०१६


शनिवारी मित्राच्या लग्नाला हैदराबादला गेलो होतो. काल सोमवारी सकाळी विमानाने परत आलो. रिक्षाने घरी जायचे म्हणून विमानतळावरील रिक्षा स्थानकावर विचारले तर ते म्हणाले की आमचा संप आहे. आता आली का पंचाईत? अर्थात जायला बस, टॅक्सी वगैरे इतर पर्याय होते. पण बसने जायचे तर घराजवळपर्यत जाता येणार नाही, व रिक्षांचा संप असला तर पुढे जाणे कठीण आणि टॅक्सीचालकांनीही येण्यास नकार दिला. पहिल्यांदा पाहिले असे की विमानतळावरून घरी जायला पर्याय शोधावे लागले. चालत चालत सेंटॉर हॉटेल समोरील मुख्य रस्त्यावर आलो. तिकडेही ३-४ रिक्षा उभे होते. त्यांना विचारले, 'संप कसला करताय?' तर एकजण म्हणाला. 'ओला (OLA) टॅक्सींविरोधात'.

हा अंदाज होताच की ओला व इतर काही खाजगी टॅक्सींनी कमी दरात प्रवास सुविधा देणे सुरू केले होते. त्याचा थेट परिणाम होता हा. त्या रिक्षाचालकाला म्हटले, 'ते टॅक्सीवाले नव्हते तेव्हा काय तुम्ही सुरळीत काम करत नव्हते. आधी इतर कारणांकरीता संप करत होते, आता कारण नाही तर हे नवीन कारण शोधले.'
मग त्यांची नेहमीचीच रड की 'युनियनमुळे आम्हाला करावे लागते'

इतर टॅक्सी ही मिळत नव्हती. तोपर्यंत एका मित्राने त्याच्या घरी जाण्याकरीता ओला टॅक्सी बोलविली होती. तो म्हणाला,'ह्यात जाऊ, आम्हाला सोडून हीच टॅक्सी पुढे घेऊन जा'. आता तोच पर्याय बरा वाटला. मग त्या रिक्षाचालकांना म्हटले की, 'तुम्ही ओला टॅक्सींविरोधात संप करताय ना? आता आम्ही तुमच्या समोरच त्याच टॅक्सीतून जाणार. तुम्ही उभे रहा संप करत.'

स्वतःची वागणूक न सुधारता दुसर्‍यांना अटकाव करणार्‍याविरोधात असेच काहीतरी केल्याने त्यांच्यात सुधारणा होते का पाहू.  

फेब्रुवारी ०१, २०१६

सुमारे ५ वर्षांपूर्वी मी भ्रमणध्वनीच्या पेट्रोलपंपावरील वापराबद्दल लिहिले होते. त्यानंतर प्रतिक्रियेत केदार यांनी दिलेली माहिती आणि इतर ठिकाणी वाचल्याप्रमाणे भ्रमणध्वनीचा वापर केल्याने धोका नसतो असे ऐकले/वाचले. पण म्हणून मी तेथे भ्रमणध्वनी वापरणे सुरू केले नाही.


आता ५ वर्षांत काही सुधारणाही झाल्या असतील. पण तेथील पेट्रोलची वाफ आणि ठिणगी ह्यांमुळे धोका आहेच. त्यात आता क्रेडीट/डेबिट कार्डचा जास्त वापर केला जात आहे, म्हणून त्यांची यंत्रेसुद्धा तिथेच ठेवली असतात. भ्रमणध्वनीच्या बटनांमुळे ठिणगी उत्पन्न होऊ शकते तशी ह्या मशीनच्या वापरामुळेही ठिणगी उत्पन्न होऊ शकते असा एक संशय आला होता आणि आता ते यंत्र वायर ने न जोडता जीपीआरएस ह्या तंत्रज्ञानानेही (ज्याचा 2G इंटरनेट सेवेकरीता वापर केला जातो) जोडले आहेत. त्यामुळे आधी लोकांना पेट्रोलपंपावर भ्रमणध्वनी न वापरण्याकरीता ज्या गोष्टींची भीती दाखविली जात होती, त्या आता पेट्रोलपंप चालकांकडूनच वापरल्या जात आहेत असे दिसते. म्हणजेच जे काही म्हटले जात होते ते खरोखरच भ्रम होते किंवा आता सर्व लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

असो. जसे मी आधी म्हटले त्याप्रमाणे, मी पेट्रोलपंपावर भ्रमणध्वनी वापरणार नाही. निदान तसा फलक लावला असेल तोपर्यंत तरी.

जानेवारी २४, २०१६

गेल्या काही वर्षांत ५० रूपयांची नोट मिळणे बंद झाले होते असे मी अनुभवले. तुम्हालाही अनुभव आला होता का?
एटीएम मध्ये तर १०० रूपयांपेक्षा कमीच्या नोटा मिळत नाहीत हे कारण असेल. पण दुकानांतूनही पैसे परत मिळाले की १०० किंवा मग २०, १० च्या नोटाच परत मिळायच्या. अर्थात रिझर्व बँकेने ह्यावर निर्बंध आणले नाहीत. पण जसे २५ पैशांच्या नाण्यांचे झाले होते तसा काहीसा प्रकार होता का अशीही मला शंका आली होती. रिझर्व बँकेने २५ पैशाची नाणी बंद केली नव्हती, पण दुकानात, बसमध्ये ही नाणी वापरणे बंद झाले होते. आता तीच गत ५० पैशांच्या नाण्याचीही होत आहे असे दिसते.




५० रुपयांची किंमत अर्थातच त्या नाण्यांप्रकारे कमी नाही. खरं तर असेही वाचले ऐकले आहे की अर्थशास्त्राप्रमाणे भारतातील चलनात कमाल ५० रुपयांचीच नोट असायला पाहीजे. पण सरकारने आपले काही मुद्दे वापरून १००, ५००, १०००च्या नोटा वापरात ठेवल्या आहेत तो भाग सध्या वगळू.

तर ५० रुपयांची नोट मिळणे बंद झाले होते. मग दोन वर्षांपूर्वी रिझर्व बँकेने २००५ च्या आधीच्या सर्व किंमतींच्या नोटा चलनातून बाद करण्याचे ठरविले व नागरिकांना विनंतीवजा सूचना केली की त्यांनी २००५च्या आधीच्या नोटा बँकामध्ये देऊन नवीन नोटा घ्याव्यात. पण लोकांनी नेहमीप्रमाणे ती सूचना गंभीरतेने घेतली नाही. रिझर्व बँकेला त्याची मुदत तर वाढवावी लागलीच, पण बहुतेक लोकांनी सर्व जुन्या नोटा बँकांना न देता त्या बाहेर वापरायला सुरूवात केली. त्यातच ह्या ५० च्या नोटा बाहेर आल्या असे दिसतेय. २००५च्या आधीच्या आणि नंतरच्याही.

आता २००५ आधीच्या नोटा तर कमी दिसत आहेत. पण निदान ५० रू च्या नोटा पुन्हा वापरायला मिळत आहेत हे चांगले झाले.

जाता जाता: तसे तर ५रूपयाच्या नोटाही फार कमी दिसत आहेत. त्याही बंद झाल्यात का? :)

(चित्र स्त्रोत: विकिपिडीया)

जानेवारी १३, २०१६

नेहमीप्रमाणे काल ऑफिसला दुचाकीने जात होतो. मुलुंड टोलनाक्यावर सर्वात डाव्या बाजूने दुचाकी आणि रिक्षांना जाण्याकरीता जो मार्ग दिलेला आहे, दररोज तिथे भरपूर गर्दी असते. सर्वच चालकांना आपली गाडी पुढे दामटायची असते. मग काही लोक चारचाकींकरीता (किंवा खरं तर इतर सर्व गाड्यांकरिता) असलेल्या रांगेतून आपली गाडी पुढे नेतात. पुढे वाहतूक पोलिस उभे असतात पण ते सहसा ट्रक, टेम्पो ह्यांना थांबवून त्यांची कामे करीत असतात. पण काल खाकी वर्दीधारी पोलिसही प्रत्येक मार्गिकेसमोर उभे होते. वाटले, 'वा, चांगले आहे. कोणीतरी येत असेल.'

मी सहसा इतर मार्गिकेमधून जात नाही. पण गर्दी पहिल्या रांगेत खुपच ओढाताण वाटली म्हणून दुसर्‍या रांगेतून गाडी पुढे घेतली तर नेमके मला पोलिसांनी थांबविले. मग नेहमीचेच सोपस्कार (लायसन्स, गाडीची कागदे) झाल्यावर मी विचारले.


पूर्ण संभाषण देत नाही, त्याचा गोषवारा.


मी : "मला नक्की का थांबविले ते तर सांगा. पुढील वेळी लक्षात ठेवेन :)..."

पो : "काय राव, तुम्हालाही सर्व समजवावे लागेल का?..."
मी : मी ह्या रांगेतून नेहमी येत नाही, आज आलो म्हणून अडविले. पण मग इतरांनाही अडवा की..."
त्यांचे म्हणणे होते की एकालाच सगळे जमत नाही.


मग  आणखी थोडी चर्चा करून मी पुढे निघालो.


ऑफिस मध्ये आल्यावर सहकार्‍याशी बोलताना कळले की वाहतूक विभागाचा सुरक्षा सप्ताह सुरू आहे. मग सगळी गोष्ट लक्षात आली.


संध्याकाळी घरी जाताना त्याच टोलनाक्यावर पाहिले तर आमच्या (म्हणजे दुचाकी/रिक्षाच्या) रांगेला अडवून बेस्टची बस त्यांच्या पहिल्या रांगेत घुसत होती.

आता ह्या लोकांना पोलिसांनी का थांबवले नाही हा प्रश्न विचारावासा वाटला, पण नाही विचारला.

(प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार)


फेब्रुवारी १९, २०१५


दररोज दुचाकीने ऑफिसला जाताना एक गोष्ट जाणवली. लहान (दुचाकी) गाड्या छोट्याशा जागेतून निघून पुढे जाऊ शकतात. ते लोक फुटपाथवरून जातात हा भाग सध्या सोडून द्या.  पण कार, ट्रक, बस अशा मोठ्या गाड्या जेव्हा आपली गाडी जाऊ शकत नाही तरी समोरील जागा अडवून उभे राहतात.

अशावेळी मोठ्या गाड्यांनी आपला अहंकार :) बाजूला ठेवून थोडीशी जागा दिली, तर लहान गाड्या आपल्या प्रवासाच्या ठिकाणावर लवकर पोहोचू शकतात.

हीच गोष्ट जीवनातील इतर गोष्टींनाही लागू होते, नाही का?

(प्रकाशचित्रः आंतरजालावरून साभार)


जानेवारी १८, २०१४


केंद्र सरकारने २०१२ मध्ये घरगुती गॅस सिलेंडरवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ग्राहकांना बाजारभावाप्रमाणे गॅस सिलेंडर घ्यावे लागतील हे समोर आल्यानंतर भरपूर विरोध झाला. मग केंद्र सरकारने त्यावर ६ सिलेंडरची सवलत दिली. पण फक्त काँग्रेसशासित राज्यांमध्येच. मग कालांतराने तो आकडा ९ केला. मला तेव्हाचा सिलेंडरचा बाजार भाव माहित नाही पण जानेवारीआधी तो रू.१०२५ असा काहीसा होता. आणि अनुदानीत सिलेंडरची किंमत रू. ४४५. आता विनाअनुदान सिलेंडरची किंमत आहे रू.१२७५.
ठाणे मुंबई मध्ये डिसेंबरपर्यंत ग्राहकांना आधार संलग्नित बँक खाते क्रमांक गॅस वितरकाकडे देण्यास सांगितले जेणेकरून ग्राहकांना अनुदानाची रक्कम थेट बँक खात्यात मिळेल. थोडेफार चांगले आहे.

मग गोलमाल कुठे दिसला मला?

सर्वात प्रथम अनुदान बंद करण्याचा निर्णय. गॅस कंपन्यांना त्यांचा लाभ मिळावा व ते त्यांच्या मर्जीप्रमाणे भाव ठरवू शकतील. पण विरोधानंतर त्यात बदल केला. ह्यात विरोध अपेक्षित नव्हता का? होता तरी मग त्यात पूर्ण राजकारणच होते का?

आता ग्राहकांना मिळणारे अनुदान. अनुदानीत सिलेंडरची किंमत ४४५ रू. पण आधार संलग्नित केल्यापासून पहिल्या ९ सिलेंडरची जी काही किंमत असेल ती ग्राहकाने वितरकाला द्यायची. त्याच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होतील. एक तर आधी जे घोटाळे समोर आलेत त्यामुळे पैशांच्या बाबतीतील सरकारी योजनांबाबत आधीच मी साशंक आहे. त्यामुळे जरी हे पैसे आता खात्यात जमा होत आहेत तरी ते नीट आहे का आणि पुढे नीट चालेल का हा प्रश्न आहे. चालले नीट तर मला आनंदच आहे.

चला खात्यात तर पैसे जमा झाले. पण किती? रू. ४३५. वितरकाला दिले १२७५. म्हणजे आम्हाला द्यावे लागले एकूण रू. ८४०.
अरे हो, एक राहिलेच. खात्यात मिळणारे हे पैसे करमुक्त असतील की ते ही आर्थिक मिळकत म्हणून त्यावर कर लावावा ह्यावर विचार सुरू आहे. म्हणजे सिलेंडर आणखी महाग.

ह्या सर्वामुळे आधार संलग्नित करून सिलेंडरचा दर तर जवळपास दुप्पट झाला. मग ह्यात ९ सिलेंडर अनुदानीत मिळतील हा मुद्दा कुठे येतो?

जून ०३, २०१३

काल संध्याकाळी मुंबई-ठाण्यात पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी बाजारात जाताना काळे ढग दिसले. अंदाज आला पाऊस पडणार आज. पण एवढ्या लवकर पडेल असे वाटले नव्हते.
दर पावसाळ्यात एक दृष्य नेहमी दिसते. काळे ढग, त्यासमोरून पांढरे पक्षी (बगळेच बहुधा) उडत जातात, त्यांवर सूर्यप्रकाश पडलेला असल्याने त्यांचा पांढरा रंग मस्त उठून दिसतो. हेच दृष्य कालही दिसले. कृष्णधवल :)

परत निघताना विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत होता. घरी वीज गेलेली आहे असे कळले होते.
मला हाच मुद्दा जाणून घ्यायचा आहे. पाऊस निदान(पहिला तरी) पडल्यावर घरांतील वीज का जाते?

महाविद्यालयात असताना वसतीगृहात राहतो होतो लोणी मध्ये. तिथेही हाच प्रकार पाहिला होता. बेंगलूरू ला राहत होतो तेव्हाही हाच प्रकार पाहिला होता. तिथे तसा मी जवळजवळ शहराच्या बाहेरच राहत होतो. ऑफिस घरापासून जवळच. संध्याकाळी/रात्री घरी जाताना पाऊस पडताना दिसला की आधी फोन करून मित्राला विचारायचो की आपल्या भागात वीज आहे का? नसली तर मग आरामात निघायचे, तेवढा वेळ मग ऑफिसमध्ये काम (जास्त वेळा तर टाईमपासच) करून मग निघायचे, वीज आल्यानंतर. :)

आता कालही तेच झाले तेव्हा हे सगळे आठवले आणि मी काहीही अंदाज न लावता पुन्हा तोच प्रश्न विचारतोय, "पाऊस पडल्यावर घरांतील वीज का जाते?" :)

मे २९, २०१३

असे म्हणतात की जाहिरातीवाचून उत्पादन विकणे म्हणजे एखाद्या मुलीला अंधारात डोळे मारणे.

अर्थातच ह्याच तत्वावर अर्ध्याहून अधिक जग चालत असेल, मुलीला डोळे मारणे ह्या नाही...तर जाहिरातबाजीच्या.


लहानपणापासूनच दूरदर्शन, आकाशवाणीवर (दोन्ही ढोबळ मानाने तंत्रज्ञान आणि संच म्हणा, त्यावर वेगवेगळ्या वाहिन्या नव्हत्या तेव्हा) कार्यक्रम पाहताना, ऐकताना मधे मधे जाहिरातींची सवय होती. त्यात एक संरचना होती. ठराविक वेळानंतरच जाहिराती असणार. म्हणजे कशा, तर कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आणि नंतर, किंवा थोडक्यात दोन कार्यक्रमांच्या मध्ये. शनिवार - रविवारी चित्रपट पाहताना एक मध्यांतर असायचे ते बातम्यांचे. तेव्हा पुन्हा त्या दोन प्रसारणांच्या मध्ये जाहिरात.

नंतर आले वारे चित्रपट चलचित्रफीतींचे (व्हिडिओ कॅसेट हो). त्या भाड्याने मिळायच्या, पण त्यातही चित्रपटाच्या सुरूवातीला, चित्रपटाच्या मध्येच जाहिराती सुरू झाल्या. भाड्याने कॅसेट घ्यायला गेलो की काही वेळा दुकानदार सांगायचा, ओरिजिनल प्रिंट आहे म्हणून. म्हणजेच चित्र/आवाजाचा दर्जा उत्तम आणि दुसरे म्हणजे त्यात जाहिराती नसणार.

त्यानंतर आले केबल टीव्ही. पण त्याकरीता उपग्रह वाहिन्या कारणीभूत होत्या. नुसते चित्रपट पाहण्याकरीता किंवा दाखवण्याकरीता कोणी एवढ्या वायरचे जाळे गुंतविले नसते. मग भाड्याने कॅसेट आणण्यापेक्षा केबलवर नवीन चित्रपट, किंवा जे लागतील ते पाहणे. ह्या सर्वांमध्ये जाहिरातींनी डोके वर काढायला सुरूवात केली होती.  त्यात कॅसेटमधील जाहिराती तर असायच्याच, पण मग स्थानिक दुकाने किंवा तत्सम जाहिराती येऊ लागल्या. जाहिरातींनी नंतर चालत्या कार्यक्रमाच्या पडद्यावर आक्रमण सुरू केले. खालची २० ते ३०% पट्टी जाहिरातींनी भरलेली, वरचीही थोडीशी पट्टी. त्यात प्रेक्षकांनी आपला चित्रपट शोधून पहायचा.
त्याच काळात, 'खुदा गवाह' चित्रपट सुरू होता केबलवर. इतर चित्रपटांत निदान एखादा प्रसंग किंवा दोन्-चार वाक्ये म्हटली पात्रांनी की जाहिरात दाखवायचे. पण ह्यांनी तर कहरच केला. एक वाक्य  तर सोडाच, मारामारीच्या दृष्यात एक मुक्का मारला की दाखव जाहिरात, एक लात मारली की दाखव जाहिरात.

उपग्रह वाहिन्यांनी कार्यक्रमात 'ब्रेक' सुरू केला. "मिलते है ब्रेक के बाद". असे म्हणणे आधी खेळ, स्पर्धा व तत्सम कार्यक्रमात आले. मग मालिका आणि चित्रपटांमध्येही. नंतर आपल्यालाही अंदाज यायला लागला की कार्यक्रमात आता केव्हा जाहिरात दाखवणार.

आता व्यावसायिकदृष्ट्या वाहिन्यांना आपला खर्च काढायचा म्हणजे जाहिरातीतून पैसा घेणार हे आलेच. पे चॅनल ची संकल्पना अशी ऐकली होती की त्यात ग्राहकांकडून पैसे घेतले असल्याने मग त्यात वाहिनीवर जाहिराती नसणार. पण एकंदरीत ती संकल्पनाचा मोडीत काढली गेली किंवा वाहिन्यांनी त्याला हरताळ फासला. इथे प्रेक्षकांकडून तर पैसे घेतातच पण वर जाहिरातींचा भडीमार.  तो भडीमार आता इतका झाला आहे की जाहिरातींचा कंटाळा येतो ते तर सोडाच, पण आजकाल जाहिरातींच्या मध्ये कार्यक्रम दाखवतात असे दिसायला लागले आहे. १५ मिनिट कार्यक्रम आणि १० मिनिटे जाहिरात. त्यात  त्यांचा प्राईम टाईम म्हणजे विचारायलाच नको. ते प्रमाण ५ मिनिट कार्यक्रम आणि १० मिनिटे जाहिरात असेही जाते. मग त्यांनी लोकांना आपल्या कार्यक्रम पाहण्याकरीता (खासकरून चित्रपट) वन ब्रेक मूव्ही, नो ब्रेक मूव्ही, ठराविक मिनिटांच्या जाहिराती म्हणजेच ब्रेक सुरू झाला की तेव्हाच सांगणार १ मिनिटांत परत. २ मिनिटांत परत. बरे, जाहिरात दाखवण्याकरीता चित्रपटातले प्रसंग कापतील पण जाहिराती कमी नाही करणार.

तसे म्हटले तर टेलिशॉपिंग अर्थात दूरदर्शनवर उत्पादन पाहून त्याची खरेदी फोनवरून करणे ह्याकरीताही आता नवीन वाहिन्या निघाल्यात, परंतु त्या जाहिराती इतर वाहिन्यांवरही दाखवल्या जातातच. ती ही एवढ्या प्रमाणात की B4U, Zee च्या काही चित्रपट वाहिन्या ह्यांवर तर ५ मिनिटे चित्रपट दाखवून एकच जाहिरात प्रत्येक ब्रेक मध्ये. जणू काही ती जाहिरात सतत पहायचा कंटाळा नको म्हणून मध्ये चित्रपट आहे.

तुम्ही म्हणाल मी एवढे पाल्हाळ का लावले आहे? तर TRAI ने काढलेला नवीन नियम. दूरदर्शन वाहिनीवर एका तासात १२ मिनिटांच्यावर जाहिराती दाखवण्यास निर्बंध घातले आहे. १० मिनिटे जाहिराती आणि २ मिनिटे कार्यक्रमांची जाहिरात. चांगला नियम अर्थात आपण प्रेक्षकांकरीता. खरे तर TRAI ने ह्या नियमाबद्दल २००७ मध्येच जाहीर केले होते. पण ते अंमलात आणायला एवढा वेळ का लागला ते कळत नाही. माझ्या आठवणीप्रमाणे जानेवारी २००७ मध्ये ह्याबद्दल ऐकले होते. त्यानंतर आता ऑक्टोबर २०१३ पर्यंत म्हणजे जवळपास पावणे सात वर्षांनी त्याचा वापर होईल असे दिसते. तरीही वाहिन्यांनी डिसेंबर २०१३ पर्यंतचा वेळ मागितला आहे. तेव्हा तरी ह्याचे पालन होते की नाही ते पाहू.

अजूनही एक गोष्ट तुम्ही अनुभवली असेलच. कार्यक्रम सुरू असताना मध्येच जाहिरात आली की तिचा आवाज खूप मोठा असतो. अचानक आवाज वाढल्याने कानांना त्रास होईल असा. आधी वाटायचे कार्यक्रमाचा आवाज कमी असतो आणि जाहिरातींचा मोठा म्हणून असे असेल. पण प्रत्येक कार्यक्रमात असे कसे असेल? ते मुद्दामच तसे ठेवतात असे कुठेतरी ऐकले/वाचले होते. पण ह्यामागचे नेमके कारण कळले नाही.
पण एक दिसले. अमेरिका आणि कॅनडामध्ये ह्याविरोधातही त्यांना नियम बनवावे लागले. 'जाहिरातींचा आवाज हा कार्यक्रमांच्या आवाजाएवढाच किंवा त्यापेक्षा कमी असावा'. हा नियम आपल्याकडेही लवकरात लवकर यावा अशी अपेक्षा. शक्यतोवर आता आलेल्या ह्या नवीन नियमावलीतच.

मे ०६, २०१३




घरातील विजेच्या प्लग सॉकेटमध्ये मुलाने हात लावू नये, काही टाकू नये जेणेकरून त्याला विजेचा धक्का न लागो, म्हणून बाजारात त्यावर लावायला टोपी, झाकण शोधत होतो. शेवटी एका संकेतस्थळावर ते दिसले तर लगेच मागवले.



आज घरी सामान आल्यावर ते प्लॅस्टीकचे झाकण मस्तपैकी स्चिच सॉकेट वर लावले. त्यांनी ते काढण्याकरीता एक चावी ही दिली आहे, ज्याने ते खेचून काढावे. एवढे चांगले वाटले नाही. पण काहीतरी मिळाले.

मुलाने ते पाहिले. पलंगावर चढला. नुसत्या हातांनी ते काढून हातात घेतले. आता त्याची चावी घेऊन प्लग सॉकेट मध्ये टाकण्याचा तो प्रयत्न करत आहे. :)

चला, नवीन काहीतरी मार्ग शोधूया. ;)

मे ०४, २०१३

गेले काही वर्षे सुट्ट्या पैशांची अडचण पाहण्यात येते आहे. अर्थात ती खरी असेलही,  पण कितपत त्याचा अंदाज नाही.


काही वर्षांपूर्वी चार आण्यांची नाणी दुकानदारांनी घेणे/देणे स्वतःहून बंद केले होते. बसमध्येही वाहक प्रवाशांच्या नावाने शंख करतात की सुट्टे पैसे द्या म्हणून. पण त्यावेळी बेस्टचे वाहक ती नाणी नाकारत नव्हते. नंतर रिझर्व बँकेने २५ पैशांची नाणी अधिकृतरित्या चलनातून बंद केली आणि त्यांनी सांगितले की सर्व किंमती ५० पैशांच्या गुणांकात असावीत. पण तरीही अजूनही भरपूर गोष्टींच्या किंमती इतर पैशांमध्ये दर्शविलेल्या असतात. ह्यामुळे २५ रू. ३५ पैशाची गोष्ट २५.०० रूपये किंवा २६.०० रुपयांना विकली जाते. काही लोक रू. २५.५० ही घेत असतील. ह्यात नफा तोटा सोडून देऊ. जास्त कोणी लक्ष देत नाही. मूळ किंमतीवर विविध टक्केवारीत विविध प्रकारचे कर लागून एकूण किंमत ५० पैशांशिवाय इतर पैशांत येत असेल. असो.

भरपूर दुकानांत तर किंमतीचा आकडा सोपा करण्यासाठी दुकानदार देय किंमतीतून कराच्या टक्क्यांनी एखाद्या गोष्टीची मूळ किंमत आणि कर असे विभाजन करतात, आणि पावतीत लिहितात. हे ही ठीक आहे. ते होते अर्थात मोठ्या रकमेच्या गोष्टींसाठी.

पण एक प्रकार सुरू झाला आहे तो म्हणजे, ५० पैसे किंवा १ रू. परत द्यायच्या ऐवजी चॉकलेट, गोळ्या देणे. हा प्रकार तर एवढा वाढला आहे की काही हॉटेल, दुकानांत तर सुट्ट्या १ ते ५ रूपयांऐवजी चॉकलेट देतात आणि कारण सांगतात की सुट्टे नाहीत. मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण १-२ रूपयांऐवजी चॉकलेट दिले तर तुम्ही घ्याल का? आम्हालाही तर सुट्ट्या पैशांची अडचण होत असते. :)

असेच वेगळे मागणीदार म्हणजे रिक्षा/टॅक्सी चालक. त्यांच्याकडेही हीच अडचण असते. अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे ती खरी असतेही, पण कितपत तो एक मुद्दा आहे.

ह्या सर्वांवर शक्कल वापरून आता एअरटेल ने नवीन जाहिराती काढल्या आहेत. सुट्टा एक रूपया देण्याऐवजी मोबाईलवर व्हिडीओ/गाणी दाखवणे.
ती ग्राहकाच्या फायद्याची की दुकानदार/रिक्षा चालकांच्या, ते माहित नाही. मोबाईल कंपनीच्या फायद्याची नक्कीच.

पण दुकानदारांनी खरोखरच ही गोष्ट वापरात आणली नाही म्हणजे खूप झाले. ;)

एप्रिल ३०, २०१३


आज खूप दिवसांनी नवीन पट्टयावर Italian Leather असे कोरलेले वाचले आणि काहीसे जुने आठवले.

२००१ मध्ये मी आणि माझा मित्र मस्जिद येथे गेलो होतो, नोकरीच्या निमित्ताने. माझ्या मित्राला नवीन पट्टा विकत घ्यायचा होता. दुकानदाराने वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे दाखवायला सुरूवात केली. बहुतेक सर्वांवर 'Genuine Leather' , 'Original Leather' असे लिहिले होते. मी विचारले, "हे खरोखरच चामड्याचे पट्टे आहेत का?" दुकानदार म्हणाला, " हो, छापलंय पहा." खरा चामड्याचा पट्टा किंवा पिशव्या बॅग ओळखणे तसे मला जमत नव्हते. कधी काळी कोणी सांगितले होते की खर्‍या चामड्याला एक वेगळा वास येत असतो त्यावरून ओळखावे. पण त्या गोष्टींचा वास कसा असतो ते तर माहित असावे. (तीच गोष्ट हापूस आंब्यांचीही. माहीतगार लोक सांगतात की हापूस आंबा वासावरून ओळखता येतो. पण खरा वास कुठे माहित आहे ;) ) त्यावरून तर ओळखता आले नाही. माझा मित्र म्हणाला, "त्याला चामड्याचा पट्टा नको आहे. ते चामडे वापरत नाहीत." दुकानदाराने काही पट्टे काढून दाखवले. पण त्यावरही 'Genuine Leather' लिहिलेले दिसले. त्याला विचारले तर म्हणाला, "तसे लिहून ठेवतात". मग पुढे बोलता बोलता तोच म्हणाला की कोणी चामड्याचा पट्टा मागितला तर त्याकरीता हे छापून ठेवले आहे की.

थोडक्यात त्या दुकानात कोणते चामड्याचे पट्टे होते आणि कोणते नव्हते ते कळले नाही. परंतु हे कळले की असे छापून ठेवून हातात काहीही सोपवले जाते.



आता आंतरजालावर चित्र शोधता शोधता हे एक संकेतस्थळ मिळाले, त्यावर "How do you know if a leather is genuine leather?" असा दुवा होता. पण त्यावरील माहितीही त्रोटक, अपुरी वाटली. नेमकं सांगायचं तर नेमकं काहीच कळलं नाही ;)

कोणी सांगू शकेल का की 'Genuine Leather' कसे ओळखणार?

एप्रिल २२, २०१३


गेल्या वर्षी मा़झ्या पारपत्राचे  (पासपोर्ट हो) नवीनीकरण केले. ह्याआधी माझे व घरातील इतरांचे पासपोर्ट बनविले तेव्हा अर्ज भरून थेट पासपोर्ट कार्यालयात जमा केला होता. पण गेल्यावर्षी तिथे थेट जाण्याआधी त्यांच्या संकेतस्थळावर नोंदणी करून पुढील कार्यवाही हा भाग माझ्याकरीता नवीन होता. तेव्हाच्या कार्यपद्धतीप्रमाणे आधी ऑनलाईन अर्ज भरणे, भेटीची वेळ निश्चित करणे हे होते. मग मार्चच्या शेवटी शेवटी (बहुधा २३ तारीख होती) अर्ज भरून १० एप्रिल ची तारीख घेतली. सकाळी १०ची वेळ ठरविली तर वाटले की ९:३०-९:४५ ला निघून तिकडे पोहोचता येईल. पण एक अंदाज चुकला होता की तीच वेळ आणखीही भरपूर लोकांनी निवडली असेल, त्यामुळे पासपोर्ट कार्यालयात पोहोचलो तर तिथे जाऊन टोकन घेणे आले. माझा क्रमांक २३५. म्हटले, 'वा.. आता पाहू किती वेळ लागतो." त्यातही आधीच्या दिवसाचे उरलेले टोकन क्रमांक संपविणे त्याच्या यादीत होते. त्यामुळे माझा क्रमांक हा भरपूर मागे जाणार होता. मला फक्त नवीनीकरण करायचे होते म्हणून जुना पासपोर्ट, लग्नाचे प्रमाणपत्र ह्याच गोष्टी देणे गरजेचे होते असे संकेतस्थळावरील माहितीवरून कळले होते. पण साधारण २ तासांनी कळले की पासपोर्ट मध्ये व्हिसा असल्याने पासपोर्टच्या सर्वच्या सर्व ३६ पानांची छायाप्रत घेणेही क्रमप्राप्त होते. ते ही दोन प्रती. ते काम संपवून आलो. त्याकरीता कार्यालयाच्या बाहेर जावे लागले. हीच माहिती ते संकेतस्थळावरही देऊ शकत होते पण दिली नव्हती. ह्या वेळात एकदम बाहेर नाही  पण त्यांच्या इमारतीतही छत असलेल्या पण बाजूनी मोकळ्या असलेल्या जागेत आपल्या क्रमांकाची वाट पाहत लोक उभे होते. मस्त उकडत होते. साधारण १:४५-१:५० ला माझा क्रमांक फलकावर झळकला. पण आत गेलो तर त्यांची जेवणाची वेळ झाली होती. तोपर्यंत इतरत्र लोकांच्या गोष्टी ऐकत थांबलो. २:१०-२:१५ ला खिडकी सुरू झाली. माझा क्रमांक आला तेव्हा जास्त वेळ लागला नाही. सर्व कागदपत्रे तयारच होती. व्हिसा आहे असे कळल्यावर पासपोर्टवर Cancelled चा शिक्का मारून परत देण्यात आला. 'पत्त्यात बदल नसल्याने पोलिस तपासणीची गरज नाही व पासपोर्ट ३०-३५ दिवसांत येईल', असे सांगितले. साधारण ३० दिवसांत माझा नवीन पासपोर्ट माझ्या हातात आला.

ह्यावेळी माझ्या मुलाचे पारपत्र बनविण्याकरीता कार्य हाती घेतले. गेल्यावर्षी माझे पारपत्र आल्यानंतर मुलाचे काम करायचे होते. आधीच्या अनुभवाप्रमाणे साधारण १२-१५ दिवसांनतरची तारीख मिळते असा अंदाज धरून माझ्या कार्यालयात सांगितले होते की मला त्याप्रमाणे सुट्टी घ्यावी लागेल.  पण कार्यालयीन कामामुळे वेळ मिळाला नाही. दरम्यान, पासपोर्टच्या संकेतस्थळावर माहिती वाचली की जुन्या पासपोर्ट कार्यालयात नवीन अर्ज स्विकारत नाहीत. त्याकरीता नवीन सुरू केलेल्या 'पासपोर्ट सेवा केंद्रात' अर्ज द्यावा लागेल. ठाण्यातील 'पासेकें' शोधले ते जुन्या कार्यालयाच्या थोडे पुढेच आहे.

सध्या कामाचा व्याप कमी झाल्याने आधी हे काम संपविण्याचे ठरविले. संकेतस्थळावरून माहिती काढली ती अशी-
१. पासपोर्टची अर्ज फी वाढली आहे. मुलांकरीता आधी रू. ६००/- होती ती आता रू. १०००/- झाली आहे. १८ वर्षांवरील लोकांकरीता १००० रू. वरून १५०० रू. केली आहे.
२. महानगरपालिकेकडून दिलेला मुलाच्या जन्माचा दाखला.
३. आई-वडिलांचा पासपोर्ट असल्यास, आणि एकमेकांच्या पासपोर्टमध्ये नाव नोंदले असल्यास मुलाच्या पासपोर्टकरीता इतर प्रमाणपत्रांची/दाखल्यांची गरज नाही.
४. आई-वडिलांची सही असलेले प्रमाणपत्र.
५. अरे हो, छायाचित्र (वास्तविक प्रकाशचित्र ;) ) राहिले. सर्वांचे छायाचित्र आता 'पासेकें'वरच काढतात. पण ४ वर्षांखालील मुलांचे छायाचित्र सोबत घेऊन जायचे आहे. ह्याआधी त्याचे माप ३५मिमि x ३५मिमि होते ते आता ३५मिमि x ४५मिमि केले आहे.

गेल्या वर्षीपेक्षा नवीन एक गोष्ट होती की आता पासपोर्टच्या संकेतस्थळावर एक नवीन खाते उघडून त्यातूनच पासपोर्टचे अर्ज देणे गरजेचे होते. त्याबाबत माहिती काढण्याकरीता त्यांच्या सेवा केंद्राला फोन केला. तेव्हा त्यांनी माहिती दिली की मुलाच्या नावानेच खाते उघडावे लागेल. पण तो माहिती भरू शकणार नाही म्हणून मग मी ते वापरू शकतो. :D मग तिला कळले की मुलाचे वय फक्त १ वर्ष आहे तर माहिती दिली की ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही, मी थेट पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊ शकतो. दरम्यान १-२ दिवसांचा खंड पडला. मग ज्या दिवशी जायचे ठरले त्या दिवशी सुट्टी तर नाही ना ह्याची खात्री करण्याकरीता त्याच्या आदल्या दिवशी पुन्हा फोन केला. तेव्हा माहिती मिळाली की लहान मुले, ज्येष्ठ नागरिक ह्यांना तारीख ठरवून ठेवण्याची गरज नाही. ते थेट जाऊ शकतात पण त्याकरीता संकेतस्थळावर अर्ज भरावा लागेल आणि तो अर्ज दिल्याच्या २४ तासांनंतरच जाऊ शकतो. मी अजूनही संकेतस्थळावर अर्ज दिला नव्हता. त्यामुळे माझा जायचा दिवस एक दिवसाने पुढे ढकलला. खाते बनवून अर्ज भरला. शेजार्‍यांची माहितीही (दोन व्यक्तींची साक्ष? म्हणून ) भरली.

४ एप्रिल ला सकाळी ९:१५ च्या आसपास निघालो. पासपोर्ट सेवा केंद्राच्या द्वारापाशीच सुरक्षारक्षकाने विचारले, "कोणाचा पासपोर्ट?", मुलाचा असे सांगितल्यावर कुठे आहे असे विचारले. मागून येण्यार्‍या बायको आणि मुलाकडे बोट दाखवले. त्याने अर्जाच्या प्रतीवर वेळ लिहिली ९:३५. आणि सांगितले,"मुलासोबत तुम्ही दोघेच जाऊ शकता".
आत गेल्यावर पाहिले, डावीकडे छायाप्रत (झेरॉक्स) काढण्याकरीता खिडकी, पुढे  संगणक होते आपल्या वापराकरीता. उजवीकडे ३-४ रांगा. त्यात पहिली रांग लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांकरीता. तिथे रांगेत लागून अर्जाची प्रत दिली. त्याने बारकोड स्कॅनरने माहिती उघडली. सर्व कागदपत्रे (प्रती आणि मूळ) मागितले. चाचणी करून प्रती घेतल्या. एका कागदी फाईल मध्ये लावून दिले आणि टोकन क्रमांक दिला. (वेळ अंदाजे ५ मिनिटे.)

तिकडून दुसर्‍या भागात गेलो. काऊंटर A. बसण्याकरीता खुर्च्या आणि समोर टोकन क्रमांक दाखविण्याकरीता टीव्ही फलक. आमचा टोकन क्रमांक - खिडकी क्रमांक लगेच लागला. खरं तर त्या खिडक्या नाहीतच. वेगवेगळे बसण्याच्या चौकटी. टेबलवर संगणक, एक स्क्रीन आपल्याक्डे एक त्यांच्याकडे. समोरच कॅमेरा ठेवला. त्या कर्मचारीने सांगितले मुलाला घेऊन समोर बसा. अनिता त्याला घेऊन बसली. मी दुसर्‍या खुर्चीवर. मला वाटले पुन्हा छायाचित्र घेतात की काय म्हणून त्याचे केस ठीक करायला लागलो. त्यावेळेत त्या महिला कर्मचारीने अर्जावरील बारकोडने माहिती उघडली. आम्हाला विचारले, "माहिती बरोबर आहे का ते पहा". आमच्या पत्यात एक ओळ टाकायची होती जी संकेतस्थळावरील अर्जात जागा कमी असल्याने देता येत नव्हती. ती भरायला सांगितली. ते अद्ययावत केल्यावर मग तिने शिक्याकरीता वापरणार्‍या शाईच्या डब्यावर मुलाचा अंगठा लावला. त्यानेही एकदम आरामात हात दिला. पण मग जेव्हा अर्जावर अंगठा लावायला त्याचा हात पुढे घेतला तर तो रडायला लागला. :) एक पिटुकला अंगठ्याचा ठसा अर्जावर घेउन मग सर्व कागद पत्रे, छायाचित्रही स्कॅनरवर ठेवून त्यांची प्रतिमा घेण्यात आली आणि ते आमच्या फाईलनंबरपुढे जोडण्यात आले. तिथेच अर्जाची फी घेतली गेली व त्याची पावती दिली. (वेळ अंदाजे १० मिनिटे.)

मग आला पुढचा कार्यविभाग - कागदपत्रांची पडताळणी (Verification) काऊंटर B : इथेही जास्त वेळ थांबावे लागले नाही. आमचा क्रमांक आल्यावर त्यांनी सर्व मूळ कागदपत्रे मागितली. प्रत्येकासमोर पडताळणीची खूण केली व संगणकात माहिती अद्ययावत करून आम्हाला जायला सांगितले. (वेळ अंदाजे ५ मिनिटे.)

पुढील कार्यविभाग - पासपोर्ट मान्यता (Passport Granting) काऊंटर C: इथे तुलनेने जरा जास्त वेळ लागला. साधारण १०-१५ मिनिटे. पण आमचा क्रमांक आल्यावर तिथेही त्यांनी फक्त सर्व कागदपत्रे पाहिली, आणि संगणकात माहिती अद्ययावत करून सांगितले, 'जाऊ शकता'. मी विचारले, "पासपोर्ट अर्जाची पावती हीच का?" तर त्यांनी सांगितले, "नाही. Exit काऊंटर वर हे द्या व पावती घ्या." पासपोर्ट साधारणतः १५ दिवसांत मिळेल असे सांगितले. (वेळ अंदाजे १० मिनिटे.)

पुढील खिडकी: Exit काऊंटर. ते कुठे आहे तेच दिसले नाही. मग बाहेर जाणार्‍या दरवाज्याच्या बाजूला वर त्याचा एक फलक दिसला . तिकडे जाऊन अर्ज भरल्याची पावती घेतली.

बाहेर निघताना त्यांनी पूर्ण प्रक्रियेवरील आमचा प्रतिसाद कसा आहे ह्याबाबत माहिती भरून द्यायला सांगितली (Feedback Form ) आणि मगच बाहेर पाठवले.

गेल्या वर्षातील पासपोर्ट कार्यालयातील अनुभव पाहिला तर पासपोर्ट सेवा केंद्रावरील अनुभव हा फारच वेगळा आणि सुखावणारा होता. अर्थात, मुलाचा पासपोर्ट असल्याने त्यात कमी वेळ लागला. आम्ही ४० मिनिटांत बाहेर होतो. आमच्यापैकी इतरांचा पासपोर्ट असल्यास बहुधा २-३ तास लागलेही असते. पण एकंदरीत त्यांनी एकूण प्रक्रियेत केलेला बदल हा चांगलाच वाटला.

थोडे त्यांच्या संकेतस्थळाविषयी - http://www.passportindia.gov.in
पासपोर्ट सेवेचे संकेतस्थळ वापरास चांगले वाटले. माहिती शोधण्यास जास्त श्रम लागले नाहीत. नवीन पासपोर्ट अर्ज करण्यास जी काही पाने उघडतात ती भरण्यास मला काही खास अडचण वाटली नाही. एक सोडून,जी मी आधी सांगितली आहे. आमचा पत्ता पूर्ण लिहिता आला नाही. त्याकरीता मग पासपोर्ट सेवा केंद्रावर अद्यतन करावे लागले. अर्जासोबत दिले जाणारे कागदपत्र आपण स्वतःच जोडू शकतो.

काही उणीवा:

१. नवीन खाते बनविताना, मी ईमेल पत्त्यात एक अक्षर चुकीचे टाकले. त्यामुळे मला validation email मिळाला नाही. वापरलेल्या सदस्यनावाने प्रवेश करायचा प्रयत्न केला तर लिहून आले की खाते अजून सुरू झालेले नाही. विपत्रात पाठवलेल्या दुव्यावर टिचकी मारून खाते सुरू करावे लागेल. (हे सगळे इंग्रजीत होते मी मराठीत भाषांतर करून लिहिले आहे :) ) त्यामुळे मग पुन्हा एक नवीन सदस्यनावाने खाते बनविले. ह्यावेळी ईमेल पत्ता दिला नाही. तर खाते लगेच सुरू झाले होते.
२. अर्ज भरता भरता मध्येच 'खाजगी विमा कंपनीला आपली माहिती द्यावी का जेणेकेरून ते आपल्याशी विम्याकरीता संपर्क करू शकतील' अशी विचारणा करणारी जाहिरात दाखविली गेली. हे मला तितकेसे पटले नाही. आपली माहिती त्यांना देऊन मग ते आपल्याला संपर्क करतील ह्यात DNC चा ही भंग होणार होता.
३. व्हिसा असल्यास कोणकोणत्या पानांच्या प्रती लागतात ह्याची माहिती मला मिळाली नाही.
४. संकेतस्थळावरच लिहिल्याप्रमाणे पोलिस पडताळणी नसल्यास तिसर्‍या दिवशी पासपोर्ट पाठवला जाईल अशी माहिती वाचली. पण सेवा केंद्रात मिळालेल्या माहितीप्रमाणे १५ दिवस लागणार होते.

जाता जाता:
पासपोर्टकरीता सेवा केंद्रात जाऊन आलो त्याच दिवशी खरे तर मी हे लिहिण्यास सुरूवात केली होती. पण काही कारणांमुळे वेळ लागत गेला. त्यात मग संकेतस्थळावर माहिती वाचली पासपोर्टची घपाई झालेली आहे आणि तो रवाना केल्यावर sms किंवा email पाठविण्यात येईल. म्हणून वाट पाहत बसलो की पासपोर्ट हातात आल्यावर पूर्ण कालावधी मोजून हे लिखाण अनुदिनीवर टाकेन. पण सध्याच्या माहितीप्रमाणे पासपोर्ट शुक्रवारी स्पीडपोस्ट ने पाठवला आहे परंतु अजून हाती पडला नाही तसे पोस्टाच्या संकेतस्थळावर त्याची माहिती उपलब्ध नाही. म्हणून वाटले जेवढे मनात आले तेवढे लिहून टाकूया.


अद्यतन :- आज २३ एप्रिल ला पासपोर्ट घरी आला. म्हणजे एकूण १९ दिवसांचा कालावधी. सांगितल्यापेक्षा जास्त वेळ लागला. पण एकंदरीत चांगली सुविधा.


ऑगस्ट ०९, २०१२

रक्तदान जीवनदान. आपण दिलेले रक्त कोणाला तरी उपयोगी पडते आणि आपल्याला काहीच नुकसान होत नाही, कारण २० ते ५० दिवसांत दिलेले रक्त भरून येते.

लहानपणापासून ही माहिती होती. पण स्वतः रक्त कधी दिले नाही. आधीही २/३ वेळा कार्यालयीन शिबिरात अशी संधी चालून आली होती, पण प्रत्येक वेळी नेमके त्याच दिवसांत मी आजारी असल्याने किंवा इतर काही कारणांनी औषधे घेतली असल्याने मला ते पुढे ढकलण्यास सांगितले गेले.

आज ती संधी पुन्हा चालून आली. ह्यावेळी असा काही त्रास नसल्याने पहिल्यांदा रक्तदान करण्याचा आनंद घेतला.

ऑक्टोबर ०७, २०११

काल कोपिणेश्वर मंदिराच्या जवळ एका संस्थेचा देवी महोत्सव संपला, त्यानंतर देवीला घेऊन जाताना जे संगीत लावले होते त्याने छातीही धडकत होती. सुतळी बाँबपेक्षाही जास्त आवाज, म्हणजे किमान १३० डेसिबल्सच्यावरती आवाज असेल. ह्या कार्यक्रमाला बहुधा काही पोलिस अधिकारीही पाहुणे आले होते.  म्हणजे त्यांची उपस्थितीही त्याप्रकारची वाटली.

पुढे गोखले रोडवरही देवीची एक मिरवणूक येत होती, त्याचा आवाजही जबरदस्त. आणि गाणे कोणते लावले होते? तर शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला मधील "We are the Bhai" हे गाणे.

आणि ह्या लोकांकरीता आपण गर्दी, वाहतूक खोळंबा आणि इतर त्रास सहन करायचे.

धन्य ते नियम, धन्य ते नियम पालन आणि धन्य ती देवीभक्ती.

सप्टेंबर ०५, २०११


माजिवडा उड्डाणपूलापासून कल्याणकडे जाणारा महा(?)मार्ग. उजवीकडे वळल्यानंतर साधारण २०० मीटर अंतरापासूनच गाड्या खोळंबलेल्या दिसल्या. घरातून निघताना ठरवले होते की जास्त गर्दी असली तर अर्ध्या रस्त्यातूनच परत निघायचे. तसेच काहीतरी होईलसे वाटत होते. कार्यालयाच्या रस्त्यावर, घराच्या आसपास, आणि इतरत्र रस्त्यांची हालत तर पाहूनच आहे, त्यामुळे खोळंब्याचे कारण तर लक्षात आले होतेच. हळू हळू करत (पण किती ते हळू? १ मीटर जाऊन २ मिनिटे थांबायचे?) पुढे जात होतो. साकेत च्या समोरील पुलावर पोहोचेपर्यंत रस्ता एकदम चांगला तर नाहीच, पण त्या पुलाजवळ पोहोचल्यावर कळले की ह्याला रस्ता म्हणून घेण्याची लायकीच नाही. समुद्रामध्ये बोट कधी हेलकावे खात असते त्याच प्रकारे कार हेलकावे खात होती. साधारण अर्धा ते एक किलोमीटरचा रस्ता हा असाच. २ किमी चा रस्ता पार करायला १:४५ तास? टोलनाक्यावर कोणी टोल भरलाच नाही. पुढे कल्याण फाट्यापर्यंत तसा चांगला रस्ता. पुन्हा मग कल्याणमधील खड्ड्यांच्या समुद्रात शिरलो. परत येताना टोल भरणार नाही असे वाटले होते पण भरावा लागला.

ह्यावर्षी हे अतीच झालेय. की अजून बाकी आहे?. एकही रस्ता, मोठा रस्ता सोडा, गल्लीगल्लीसुद्धा नीट नाही आहे.

'अ' चे पालिकेत राज्य आहे तर 'ब' हा विरोधी पक्ष कधी तरी बोलतो. तेच 'ब' चे दुसरी कडे राज्य आहे तर 'अ' हा त्या विरुद्ध बोलतोय असे मध्ये वाचले होते. पण स्वत:च्या पालिका हद्दीत काही सुधारणा नाही. आता तर ती बोंबाबोंबही बंद आहे.

गणेशोत्सवात सगळीकडे गणपतीच्या स्वागताचे स्वत:च्या नावाचे पोस्टर लावून ठेवलेत ते ही त्याच खड्ड्यांच्या समोर. हे खड्डे आम्ही बनविलेत असे तर नाही सांगत ना ते?

केंद्र/राज्य सरकार मधील कॉंग्रेसला ला शिव्या घालूत असू पण महानगरपालिकेत तर शिवसेना आहे. ते ही तर काहीच नाही करत आहेत. नवनिर्माण करणारेही गायब झालेत. त्यामुळे जरी एकाच्या विरोधात गेलो तरी दुसऱ्याचा फायदा नाहीच. आणि हे सुद्धा फेब्रुवारी २०१२ च्या महानगरपालिका निवडणूका तोंडावर असताना. गंमत आहे ना?

भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत थोडे फार तथाकथित यश मिळाले असेल (हो तथाकथितच. ते नंतर कधीतरी) पण आधी खड्डा विरोधी मोहिम सुरु करून तिला यश मिळवून दिले पाहिजे असेच वाटते.

ऑगस्ट ३१, २०११

रिलायंस मार्ट मध्ये पाहिलेली खास किंमत.

६० रु च्या पेनची त्यांची किंमत ७० रु.


१२५ रु च्या पेनाची त्यांची किंमत १५०रु.


ईद-गणपतीनिमित्त मोठ्ठा सेल? :)

ह्याबाबत त्यांना विचारणार होतो.. पण त्यानंतर फिरता फिरता विसरून गेलो. 

जुलै २९, २०११


 गेले २ दिवस एवढा पाऊस पडतोय. सकाळी उठलो तेव्हा वाटले नव्हते की जोरात पाऊस पडत आहे. पण कार्यालयात जाता जाता जोरात पाऊस पडत होता. त्यामुळे दुचाकीवरून जातान वेगळा त्रास तर होताच. त्यात महानगरपालिकेच्या कृपेने जागोजागी खड्डे तर आहेतच. दुचाकीवरून जायचे म्हणजे आपण लोक तर डावीकडची बाजू पकडून ठेवणार. पण नेमके त्या बाजूला पाणी जमा झालेले असते. मधून जायचे म्हटले तर सांभाळूनच जावे लागते आणि पुन्हा खड्डा असला तर आणखी वैताग. आज संध्याकाळी परत येताना पुन्हा जोरात पाऊस सुरू झाला. अंधार पडलेला आणि जोरदार पाऊस.

 

मग मि. नटवरलाल चित्रपटातील शेवटच्या भागातील अमिताभच्या युक्तीप्रमाणेच जायचे ठरविले. किंवा ते करायचे म्हटले आणि मि. नटवरलाल चित्रपट आठवला असे म्हणणे जास्त बरोबर असेल.

जाणे आहे ते डावीकडूनच. पाण्यामुळे खड्डा कळला नाही तर बोंब. नटवर कसा विक्रमच्या पावलांच्या ठशांवर पाय ठेवून बाँबच्या खटक्यापर्यंत पोहोचतो... तसेच. पुढे जाणार्‍या दुचाकीच्या मागेच जायचे. पुढच्याला खड्डा लागला की आपण सावरून जायचे. मध्येच कुठले तरी व्यंगचित्र आठवले. त्यात म्हटल्याप्रमाणे "रस्त्यांवर भरपूर खड्डे झाल्याने गाड्यांकरीता उड्डाणपूल बांधलेत. पण उड्डाणपूलावरच खड्डे पडलेत आता काय?" त्याप्रमाणे आज ऐरोली आणि तीन हात नाक्यावरील पुलांवर सुद्धा खड्डे पाहिले. ते खड्डे खोल होऊन वरून एखादी दुचाकी खालील गाडीवर लँड होवो त्या आधी पाऊस तरी थांबावा आणि/किंवा महानगरपालिकेला खड्डे बुजविण्याची आठवण देवो.

जुलै १४, २०११

काल मुंबईमध्ये बाँबस्फोट झाले,सरकारने लगेच मोठमोठ्या शहरात हाय अलर्ट घोषित केला.


ह्याचा अर्थ काय?

माझ्या मते भारतीय हाय अलर्ट म्हणजे, सामान्य माणसाला होणार्‍या त्रासात आणि नेत्यांच्या सुरक्षेत आणखी वाढ .

नाही तर काय? बाँबस्फोटानंतर काल रात्री, आज सकाळी, पुन्हा आता रात्री मी तरी काही फरक नाही पाहिला. अंधेरी ते ठाणे ह्या रस्त्यावर कुठेही हाय अलर्टची काही चाहूल नव्हती. हो, जिथे बाँबस्फोट झाले त्या भागात वाढविली असेल सुरक्षा. त्या भागात लोकांना जाण्यास मनाई केली आहे असे ऐकले. एक तर तिकडचे पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून आणि दुसरे म्हणजे ते मंत्री लोक जातील ना त्या जागांना भेट द्यायला. मग त्यांना काही झाले तर? आणि ही वाढीव सुरक्षा फक्त २ दिवस जास्तीत जास्त १०.

अशा वेळी बहुतेक करून गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढविली जाते म्हणतात. म्हणजे आधीच लोकांना गर्दीमुळे उशीर होत असतो, त्यात सुरक्षा म्हणून करण्याच्या चाचपणीचा देखावा केला जातो असेच वाटते. तुम्ही म्हणाल, 'पुढे तिथे बाँब फुटला तर परत मी त्यांनाच शिव्या घालणार'. जर ती चाचपणी नीट होत असेल तरी झाले तर नाही शिव्या घालणार. पण आधीच म्हटल्याप्रमाणे तो मला देखावाच वाटतो. २००५ की ०६ मध्ये मुंबईत रेल्वे स्थानकांवर धातू शोधक (मेटल डिटेक्टर) यंत्रणा लावणार होते. त्याची प्राथमिक चाचणी करण्याकरीता पहिले स्थानक कोणते निवडले तर मुंबई सीएसटी. अरे, तुम्हाला चाचणी करायची आहे ना मग थेट सर्वात जास्त गर्दी असलेल्या स्थानकावर का? कमी गर्दीच्या स्थानकांवर करा ना? तिकडे गोंधळ झाला तो होणारच होता.

आणि मग समजा एखाद्याकडे आढळली बंदूक तर काय करणार? मॉलमध्ये वगैरे जेव्हा मेटल डिटेक्टर वगैरे पाहतो तेव्हा 'मॅट्रीक्स' सिनेमातील प्रसंग आठवतो. त्यात शेवटी दोघांना सुरक्षा अधिकारी विचारतो. 'काही आहे?' म्हणून. निओ लगेच जॅकेट उघडून दाखवतो, आणि धाड धाड गोळीबार सुरू.... तसेच जर खरोखरच एखादा आला तर काय फरक पडणार आहे त्या मेटल डिटेक्टरचा? आणि बहुधा प्रत्यक्षात तसे सीएसटी स्थानकावरच २००८ मध्ये कसाब आणि त्याच्या साथीदारांनी करून दाखविले.

हे जरा थेट शस्त्रास्त्रे घेऊन हल्ला करण्याबद्दल झाले .

पण आजचेच उदाहरण घ्या ना. मी वर म्हटले तसे मला रस्त्यात कुठेही सुरक्षा वाढविल्यासारखे वाटले नाही. वाढल्यासारखे सोडा, काही बदल असल्याचेही जाणवले नाही.कार्यालयाच्या संकुलात शिरताना ओळखपत्र दाखविल्याशिवाय जाऊ देणार नाही असा नियम आहे. पण माझा सहकारी सांगत होता की दुचाकीवरून आला तेव्हा त्याला ओळखपत्राबद्दल विचारले. पाऊस पडत होता म्हणून ते आत ठेवले होते. त्याला थांबविले आणि ते दाखवण्यास सांगितले. तो रेनकोट काढून खिशातून कार्ड बाहेर काढणार त्या आधीच विचारणा झाली, आहे ना? ठीक आहे जा. ओळख न दाखवता आत जाता येणं शक्य आहे.

असेच माझ्यासोबतही झाले होते. २००६ मध्ये बँगलोरच्या आयटीपीएल मध्ये बाँब असल्याचा फोन आला. त्यामुळे मग आम्हाला कार्यालयांतून बाहेर काढण्यात आले. सर्वत्र चाचणी केली. बेसमेंट मध्ये बाँब असेल अशी शक्यता होती. आम्हाला घरी पाठविण्यात आले. खरे तर तिथेही ओळखपत्र दाखविल्याशिवाय आत जाऊ देत नाहीत. पण दुसर्‍या दिवशी, दुसर्‍याच दिवशी सकाळी मी ओळखपत्र दाखविल्याशिवाय आत गेलो होतो.

वरील दोन उदाहरणांतून हेच सांगायचे आहे की इतर वेळी तर असे दुर्लक्ष देणे घडत असतेच, पण काहीतरी खरोखरच घडले आहे तरी त्यांना त्याचे गांभीर्य वाटत नव्हते.

तसेच, अजून एक. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. २००९ मध्ये अमेरिकेत जाण्याकरीता रात्री विमानतळावर पोहोचलो. आई आणि बायको Guest Areaमध्ये थांबले होते. मी चेक-इन करून त्यांच्याशी बोलायला परत आलो. प्रवासी आणि पाहुणे ह्यांच्याकरीता विभागलेल्य त्या भागात लोखंडी/स्टीलच्या खांबांचे होते. पण ते दोघे एकदम दुसर्‍या टोकाला होते. यायला वेळ लागला असता. जुन्या अनुभवाप्रमाणे बोर्डींग पास मिळाल्यावर आपण बाहेर येऊ शकत होतो. म्हणून मी तिकडील सुरक्षा पोलिसाला विचारले की, 'मी बाहेर जाऊन त्यांना भेटून येऊ का?'. तो नाही म्हणाला. तरीही त्याने वरीष्ठ अधिकार्‍यालाही माझ्यासमोर विचारले. तोही नाही म्हणाला. मी म्हटले, 'ठीक आहे. हरकत नाही. परवानगी नाही तर राहू दे. इथूनच भेटून घेऊ'. थोड्या वेळाने तो पोलिस माझ्याकडे आला व म्हणाला,"जल्दी वापस आना" मी म्हटले, 'ठीक आहे'. मी बाहेर मुख्य दरवाजातून बाहेर पडता पडता त्याने म्हटले, "वापस आने के बाद मेरे चायपानी का भी देख लेना." मी म्हटले, 'कुछ देना वगैरा है तो छोडो. नहीं जाऊंगा मै.' मग क्षणभर विचार करुन तो म्हणाला, "जाओ" मी घरच्यांना भेटून १० मिनिटांत परत आलो.

ह्या उदाहरणांत मला ते नियम चुकीचे नाही वाटले. पण जो निष्काळजीपणा दाखवला जातो त्याबद्दल राग आला म्हणा, वाईट वाटले म्हणा, विचित्र वाटले म्हणा , की फक्त दाखविण्याकरीता आहे का हे? विमानतळावरचे म्हणाल तर जर तो माणूस काही रुपयांकरीता नियम मोडू देऊ शकतो तर भरपूर रक्कम मिळाली तर गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सगळेच पोलिस तसे नसतील पण बहुतेक घटनांमध्ये तसेच झाले असू शकेल.

शितावरून भाताची परीक्षेचाच प्रकार झाला हा. पण काय करणार आजकाल तशीच परिस्थिती दिसतेय. म्हणूनच कोणी हाय अलर्ट म्हटले की वाटते.. 'हाय अलर्ट? घंटा'


इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter