वैताग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वैताग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मार्च २९, २०१६


आज सकाळी दुचाकीने ऑफिसला जात होतो. पवईतील पिझ्झा हट् च्या सिग्नलजवळ पोहोचलो तेव्हा पाहिले ४ सेकंद बाकी होते, म्हणून गाडी न थांबवता सरळ गेलो. मी उजव्या बाजूला होतो. डाव्या बाजूला जी एकेरी मार्गिका आहे तिकडून बस नेहमीच उजवीकडच्या मार्गिकेत येत असतात. आजही एक बस तशीच आली, पण ती बस एकदम वेगात होती, सिग्नल बंद होत आला म्हणून असेल. माझ्या पुढे एका दुचाकीवर एक मुलगा, त्याच्या मागे मुलगी. त्यांच्या एकदम जवळ बस जात होती. त्या दोघांनी त्याच्याकडे हात दाखवत त्याला चूक सांगायचा प्रयत्न केला. ते पुढे निघून गेले. मागोमाग मी.

पाहिले तर तो चालक मोबाईलवर बोलत बस चालवत होता. पुढे सुवर्ण मंदिराच्या वळणावर मी आलो, तेव्हा त्या बसचालकाने त्या वळणावरही एकदम वेगात बस उजवीकडे वळविली, मी एकदम त्या बसजवळ. माझा वेग जास्त असता तर ठोकलोच असतो त्याला. मी ओरडलो तसे त्याने बस हळू केली. मी त्या बसच्या समोर बाइक उभी केली व त्याला रागावू लागलो. चालक म्हणाला 'मी बरोबर चाललोय, तूच उजवीकडे जागा सोडून इकडे आलास.' मी म्हणालो, 'मी सरळ चाललो होतो, तूच एकतर मोबाईलवर बोलत आणि वेगात हे वळण घेतलेस. मागच्या सिग्नललाही.'

ह्यात इतर बसमधील एक प्रवासी खिडकीत आला व मला दोष द्यायला लागला की मी उजवीकडे गाडी घ्यायला पाहिजे होती. मी म्हटले, 'तो मोबाइलवर बोलत, बस एवढ्या वेगात चालवतोय ते ही वळणावर आणि चूक माझी का? मग तुम्हीच भोगा पुढे काही झाले तर'


असाच एक अनुभव बँगलोरमध्ये होतो तेव्हाही आला होता. तेव्हा मी बाहेर गाडी चालवत नव्हतो तर त्याच बसमध्ये होतो आणि चालक मोबाईलवर बोलत बस चालवत होता, जोरात ब्रेक दाबणे पुन्हा वेगात नेणे वगैरे. तेव्हाही मी तक्रार केली तेव्हा लोक मलाच म्हणाले की 'तू त्याला काही बोलू नकोस.'

ह्यावरून एक नक्की.. लोकांना कोणी मोबाईलवर बोलत गाडी चालवत असल्यास काही आक्षेप नाही, उलट त्याला कोणी बोलल्यास ते ही चालत नाही. आणि स्वत:च्या जीवाचीही चिंता नाही.

मी आधीपासूनच गाडी चालवताना बसपासून दूर असायचो, आता तर बहुधा त्यालाच विचारावे लागेल, 'बाबा रे, मी तुझ्या बसच्या जवळून चूकून गेलो तर चालेल का?'

फेब्रुवारी १६, २०१६


शनिवारी मित्राच्या लग्नाला हैदराबादला गेलो होतो. काल सोमवारी सकाळी विमानाने परत आलो. रिक्षाने घरी जायचे म्हणून विमानतळावरील रिक्षा स्थानकावर विचारले तर ते म्हणाले की आमचा संप आहे. आता आली का पंचाईत? अर्थात जायला बस, टॅक्सी वगैरे इतर पर्याय होते. पण बसने जायचे तर घराजवळपर्यत जाता येणार नाही, व रिक्षांचा संप असला तर पुढे जाणे कठीण आणि टॅक्सीचालकांनीही येण्यास नकार दिला. पहिल्यांदा पाहिले असे की विमानतळावरून घरी जायला पर्याय शोधावे लागले. चालत चालत सेंटॉर हॉटेल समोरील मुख्य रस्त्यावर आलो. तिकडेही ३-४ रिक्षा उभे होते. त्यांना विचारले, 'संप कसला करताय?' तर एकजण म्हणाला. 'ओला (OLA) टॅक्सींविरोधात'.

हा अंदाज होताच की ओला व इतर काही खाजगी टॅक्सींनी कमी दरात प्रवास सुविधा देणे सुरू केले होते. त्याचा थेट परिणाम होता हा. त्या रिक्षाचालकाला म्हटले, 'ते टॅक्सीवाले नव्हते तेव्हा काय तुम्ही सुरळीत काम करत नव्हते. आधी इतर कारणांकरीता संप करत होते, आता कारण नाही तर हे नवीन कारण शोधले.'
मग त्यांची नेहमीचीच रड की 'युनियनमुळे आम्हाला करावे लागते'

इतर टॅक्सी ही मिळत नव्हती. तोपर्यंत एका मित्राने त्याच्या घरी जाण्याकरीता ओला टॅक्सी बोलविली होती. तो म्हणाला,'ह्यात जाऊ, आम्हाला सोडून हीच टॅक्सी पुढे घेऊन जा'. आता तोच पर्याय बरा वाटला. मग त्या रिक्षाचालकांना म्हटले की, 'तुम्ही ओला टॅक्सींविरोधात संप करताय ना? आता आम्ही तुमच्या समोरच त्याच टॅक्सीतून जाणार. तुम्ही उभे रहा संप करत.'

स्वतःची वागणूक न सुधारता दुसर्‍यांना अटकाव करणार्‍याविरोधात असेच काहीतरी केल्याने त्यांच्यात सुधारणा होते का पाहू.  

डिसेंबर ०४, २०११




तुम्ही बोर्नविटाची नवीन जाहिरात पाहिली आहे का? दूधातून कॅल्शियम खेचण्याकरीता 'ड जीवनसत्व' लागते, जे बोर्नविटा मध्ये आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

http://www.cadburyindia.com/in/en/Brands/Pages/videoplayer.aspx?vid=1734

एक तर त्रासिक जाहिरात, तीन तीन वेळा तिचे विचारणे, "कॅल्शियम करीता काय करतेस?", हावभाव गंमतीशीर (चांगले नाही !!!)

आणि दुसरी गंमत (?) आमच्या शालेय शिक्षणातील अभ्यासाप्रमाणे जी काही माहिती आहे त्याप्रमाणे दुधात कॅल्शियम आणि  'ड जीवनसत्व' आधीपासूनच असते. मग वेगळे 'ड जीवनसत्व' कशाला?

बोर्नविटा आणि दूध कॅल्शियम करीता रस्सीखेच करायला लागले तर पिणार्‍याला ते मिळेल का? :)
हो, 'दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ' हे म्हणणे इथे लागू होऊ शकते का? ;)


ऑक्टोबर ०७, २०११

काल कोपिणेश्वर मंदिराच्या जवळ एका संस्थेचा देवी महोत्सव संपला, त्यानंतर देवीला घेऊन जाताना जे संगीत लावले होते त्याने छातीही धडकत होती. सुतळी बाँबपेक्षाही जास्त आवाज, म्हणजे किमान १३० डेसिबल्सच्यावरती आवाज असेल. ह्या कार्यक्रमाला बहुधा काही पोलिस अधिकारीही पाहुणे आले होते.  म्हणजे त्यांची उपस्थितीही त्याप्रकारची वाटली.

पुढे गोखले रोडवरही देवीची एक मिरवणूक येत होती, त्याचा आवाजही जबरदस्त. आणि गाणे कोणते लावले होते? तर शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला मधील "We are the Bhai" हे गाणे.

आणि ह्या लोकांकरीता आपण गर्दी, वाहतूक खोळंबा आणि इतर त्रास सहन करायचे.

धन्य ते नियम, धन्य ते नियम पालन आणि धन्य ती देवीभक्ती.

जून २०, २०११


आपल्यात एक म्हण आहे, 'जिस थाली में खाया उसी में छेद किया'
किंवा 'नमक हराम', किंवा 'खाल्ल्या मिठाला जागणे' वगैरे वगैरे.



पण उंदरांकरीता ही म्हण/वाक्प्रचार वापरताच येणार नाही. त्यांना कुठे माहित असणार हे सर्व. अर्थात त्यांनी नेमके घरातील मीठ खाल्ले नाही. पण कारच्या खाली त्यांना जागा मिळाली न भिजण्याकरीता, किंवा कारच्या इंजिनाजवळ मिळाला तात्पुरता निवारा तर नीट राहायचे ना...
तिथल्या तारा कुरतडून तोडून टाकल्या.

नेमके पावसाळ्यात वायपर नाही चालले तर कसे होईल? लवकरात लवकर पुन्हा ते ठीक करून घ्यावे लागेल. पण किती वेळा दुरूस्ती करणार? आता हे तिसर्‍यांदा होत आहे दोन महिन्यांत.

सल्ले मिळाले, "तंबाखूच्या पुड्या ठेवा". पण किती, कुठे कुठे? आणखी काही उपाय आहेत का?

जून १५, २०११

२ आठवड्यांपूर्वी म्हटल्याप्रमाणे मी DND बद्दल वैतागलो होतो. ते संदेश ही आणि ग्राहक सेवा केंद्रातील लोकांची उत्तरे ऐकूनही. त्याचीच तक्रार शेवटी मोबाईल ग्राहक सेवा केंद्राच्या वरच्या पातळीवरील कार्यालयात केली. ग्राहक सेवा केंद्राने माझ्या विपत्राला उत्तर दिले नाही असेही त्यात म्हटले होते.

लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्यांनीच संपर्क केला व सांगितले की ग्राहक सेवा केंद्रातून मिळालेल्या चुकीच्या उत्तरांबद्दल ते दिलगीर आहेत. तसेच तक्रार करण्याचा कालावधी ६ तास किंवा ३ दिवस नसून १५ दिवस आहे. आणि त्यांनी पुन्हा ते संदेश आणि क्रमांक त्यांच्याकडे पाठविण्यास सांगितले आहे.

चला, निदान काहीतरी उत्तर मिळाले.

पण मुख्य प्रश्न पुन्हा तसाच राहतो. ते संदेश पाठवणार्‍यांचे काय? तो त्रास खरोखर बंद होईल का? शक्यता कमीच वाटते ;)

जून ०३, २०११


आज पुन्हा एका नकोशा संदेशाकरीता मोबाईल कंपनीला फोन लावला. संदेश पाठवणार्‍याचे नाव (DZ-CK) असे होते. आज त्या ग्राहक सेवा केंद्राच्या व्यक्तीने सांगितले की, " असा कोणी आमच्या यादीत नाही आहे." मी म्हटले," तो कोण आहे ते तुम्ही शोधा." मग त्याने ६०/७० % संदेश माझ्याकडून वदवून घेतला. नंतर मध्येच म्हणाला," सर, आम्हाला असा कोणी संदेश पाठवणारा माहित नाही. " "तरी मी विचारतो", असे म्हणत त्याने फोनवर थोडा वेळ थांबायला सांगितले.

बस्स... २ मिनिटांनी फोन बंद करून टाकला.

ह्म्म......कामचोर माणसं :)

जून ०२, २०११

छ्या... गप्प रहायचे म्हटले तर हेच लोक छळतात.

सरकारने DND अर्थात Do Not Disturb ची सुविधा सुरु केली तेव्हा ग्राहकांना बरे वाटले होते. चला आता ह्या जाचातून सुटका. पण कॉल कमी झाले तरी संदेश येतच असतात.

आज स्पॅम मेसेज बद्दल तक्रार करायची होती.. गेल्या शनिवारीही एका संदेशाची तक्रार केली होती. ग्राहक सेवा केंद्राच्या माणासाने विचारले, "कधी आला होता संदेश? " तो संदेश आला होता त्याच्या १० दिवस आधी. तर तो म्हणतो ३ दिवसांच्या आत तक्रार करायची असते. काल एक संदेश आला त्याची आज तक्रार केली तर आता म्हणतात, 'तुम्ही ६ तासांच्या आत तक्रार करायची'.

कैच्याकै.

मी म्हटले, "पुढील वेळी मी जर १५ मिनिटांत तक्रार केली तर तुम्ही म्हणाल ' अरेरे, तो कॉल/संदेश तेव्हाच ट्रान्स्फर करायला पाहिजे होता तुम्ही' ".

आता शनिवारी पुन्हा त्यांच्या समोर जाऊनच तक्रार करावी लागेल :)

(चित्र आंतरजालावरून साभार)

मार्च २८, २०११

रेल्वेत मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यास बंदी
 
आज ही बातमी वाचली. लगेच मनात विचार आला, उपनगरी गाड्यांमध्ये जे भिकारी मोठमोठ्याने गाणे ओरडत असतात (ओरडतच हो, नीट थोडी असतात. एखादाच क्वचित) त्यांच्यावरही हा नियम लागू करतील का? ह्या सर्व गोष्टी आपल्याकरीताच असतात.

ह्यावरूनच ५/६ वर्षांपुर्वीचा प्रसंग आठवला. दादर-ठाणे प्रवास दुसर्‍या वर्गातून करत होतो. एक ८/१० वर्षांचा मुलगा आला, गाणं ओरडत आणि हात पसरून. लोक बोलत होते, "काय रे हा वैताग?" असे नेहमीच म्हणतात. त्या दिवशी मी ही जास्तच वैतागलेलो होतो. उठलो आणि त्या मुलाला रागावून सांगितले, "इथे आवाज बंद पाहिजे". तो भांबावून गप्प झाला. नंतर दुसर्‍या दरवाज्यात जाऊन पुन्हा सुरू केले. मी तिकडे जाऊन पुन्हा त्याला म्हणालो,"इथे आवाज नाही पाहिजे". तो एकदम गप्प झाला. सर्व लोक आमच्याकडे पाहत होते. तो मुलगा पाच एक मिनिटे शांत राहिला व नंतर लोकांसमोर जाऊन हात पसरू लागला. काही लोकांनी त्याला पैसे दिले.

मी ह्या प्रसंगात बरोबर केले, चूक केले माहित नाही, ते जाणण्याची इच्छाही नाही. पण प्रसंगामुळे त्या मुलाला देणार नसतील त्यांनीही बहुधा त्याला पैसे दिले असे अजूनही वाटते. माझा रेल्वे प्रवास अगदीच बंद झाला आहे, त्यामुळे पुन्हा अशा वेळी काय केले असते ठाऊक नाही. पण अजूनही भिकारी डब्यात आल्यावर नुसते तोंड वाकडे करणे, हे आत का येतात असे लोक अजूनही म्हणतात, की त्यांना डब्याबाहेर काढतात, की त्यांना पैसे देतात ?.

असो. मूळ मुद्याकडे. तर आता
रेल्वेमध्ये मोठ्या आवाजात गाणी अथवा संगीत ऐकण्यास आणि वाजवण्यास बंदी आहे. पाहू ह्या नियमाचे पालन कसे केले जाते आणि दंड केल्यास कोणाकोणास केला जातो ते.

फेब्रुवारी ०८, २०११

असे जाणवत आहे की गेले काही महिने अनुदिनीवर आणि खासकरून बझ वर जे काही लिहिले/मत प्रदर्शन केले होते त्यात (समिक्षा म्हणण्यापेक्षा) टीका आणि वैतागच जास्त दिसत होता. अर्थात सर्व नाही. काही अपवाद वगळता (छ्या.. मी Developer होण्यापेक्षा Tester च व्हायला पाहिजे होते नाही? ;) )

नाही तरी वैताग कमी करायचाच आहे. त्यामुळे इथेही निदान १-२ महिने तशा प्रकारचे लेखन न करावे असे वाटत आहे. पण काही लेखन अर्धवट लिहून आहे, ते टाकेन लवकरच. जानेवारीपासून क्रिकेटवर टिप्पणी देणे मी बंदच केले आहे.  


इतर लेखनात वेगळे अनुभव, विचार, चित्रपटांबद्दल (माझ्या आवडीचा विषय) लिहायचा विचार आहे.


पाहू, हे कितपत शक्य होते.

(ह्याच विषयावर मी आधी ही येथे लिहिले होते. पण तो बसमध्ये/इतर गाड्यांमध्ये बसून घेतलेला अनुभव होता. आजचे लेखन आहे स्वत: गाडी चालवताना घेतलेल्या अनुभवांवरून)

शुक्रवारी
रात्री माझ्या दुचाकीवरून कार्यालयातून घरी येत होतो. तीच नेहमीची गर्दी. मुलुंड चेकनाका पार करून ठाण्यात शिरलो. जकातीसाठी ट्रक हळू हळू पुढे जात होते. मी ते रांगेत होते म्हणत नाही आहे. त्यांतून मार्ग काढत कार आणि दुचाकी जात होत्या. जकात नाका पार करून पुढे आलो. दोन रुग्णवाहिका पुढे जाण्याच्या प्रयत्नात होत्या. पण ट्रक आणि कार मधून पुढे जाणे कठीण पडत होते. त्याने शेवटी सायरन वाजवला. एक दोन गाड्यांमधुन जागा मिळाल्यावर पुढे गेले. मी ही आपला मागून जागा शोधत/काढत त्यातून पुढे आलो. पुढे तीन हात नाक्याच्या उड्डाणपुलावर पुन्हा ट्रकची गर्दी. तिकडून पूल उतरल्यावर पाहिले दोन्ही रुग्णवाहिका अजून तिकडे रस्ता मिळण्याची वाट पाहत ट्रकच्या मागे जात होत्या. नीट पाहिले तेव्हा कळले की तो ट्रक डावीकडच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात उजवीकडून पुढे जात होता. पण त्यामुळे पूर्ण रस्ता बंद झाल्याचे त्याला जाणवले नाही. रुग्णवाहिकेचे चालक अधूनमधून सायरन वाजवत होते. मी मग कसातरी मार्ग काढत त्या दोन रुग्णवाहिकांच्या पुढे गेलो. त्या ट्रकचालकाच्या सहकार्‍याला म्हटले,"मागून रुग्णवाहिका येत आहे त्याला तरी जागा द्या रे. नेहमी ओव्हरटेक काय करायचे असते तुम्हाला" त्याने मागे पाहिले आणि ट्रक डावीकडे घ्यायला सांगितला. पण तोपर्यंत आम्ही पुढील उड्डाणपूलापर्यंत पोहोचलो होतो. मी पूलावर न जाता डावीकडे गेलो आणि त्या रुग्णवाहिका जागा मिळाल्याने ट्रकच्या पुढे जात आहेत असे दिसले. पुढे त्यांना किती मोकळा रस्ता मिळाला त्याचा अंदाज नाही. 

हे नेहमीचेच झाले आहे. आधी कंपनीच्या बसने यायचो तेव्हा काय त्यांच्या वेळेवर निघणे. बाकी त्या चालकाचे काम आम्हाला आमच्या ठिकाणी नेणे. पण भरपुर वेळा काम असल्याने उशीरा निघायला लागायचे तर बस चुकायची म्हणून दुचाकीने जायला सुरूवात केली. सुरूवातीला वेगळे वाटले पण नंतर कार्यालयातून घरी निघताना विचार सुरू असतो केव्हा बाहेर पडायचे? कारण गेटबाहेर निघाल्यावरच वाहतुकीचा खोळंबा सुरू झालेला असतो. लगेच समोर मोकळा रस्ता असला तरी पुढच्या सिग्नलला गर्दी असणारच. उदा. अंधेरीकडून पवईमार्गे पूर्व दृतगती मार्गावर जाताना गेल्या वर्षी पवई तलावापासून आय आय टी मुख्य द्वारापर्यंत रस्त्याच्या कामामुळे वाहतुकीचा खोळंबा असायचा. तो रस्ता ठीक झाल्यावर वाटले की चला मार्ग मोकळा झाला. तसे नाही. आता कांजुरमार्ग/गांधीनगर जोडणीला मस्त गर्दी असायची. तशीच ह्या बाजूला  एल अँड टी चा पूल सुरू व्हायच्या आधी. आता पहावे तर कांजूरमार्ग ते पूर्व दृतगती मार्गावरचा जो पूल आहे तिथे थांबून रहावे लागते. थोडक्यात उर्जेच्या नियमाचा थोडासा प्रकार म्हटला तर ह्या सिग्नलवरून त्या सिग्नलवर
  स्थलांतरीत होत असतो.

ह्यातही लोक सरळ गाडी चालवतील तर एकवेळ समजू शकतो. पण आधीच गर्दी असेल तिथे वाकडी तिकडी गाडी चालवून गोंधळ वाढवत असतात. एका गाडीच्या मागे जायचे सोडून दोन गाड्यांच्या मधून गाडी चालवणार म्हणजे त्या दोघांमध्ये जागा मिळाली की लगेच त्यात गाडी घुसवता येईल ह्या विचाराने. त्यामुळे होते काय की एक गाडी पुढे त्याच्या मागे उजव्या बाजूला, गाडीचा डावा भाग थोडासा रांगेतून आत ठेवत काहीसे असे
--_     --
    --     --
       --
म्हणजे होते काय की मध्ये भरपूर रिकामी जागा असते पण फक्त स्वतःला पुढे जायला कधी मिळेल ह्या चढाओढीत रस्ता अडवून ठेवला आहे हे बहुतेक वेळा पाहिलेच जात नाही. (लोकलमध्ये कसे असते पहा दरवाज्यावर सर्व लोक लटकून असतात आणि सांगतात आत जागा नाही. प्रत्यक्षात आता भरपूर जागा असते) आणि हे फक्त कारचालक करतात असे नाही तर दुचाकी, रिक्षा, बस, ट्र्क सर्व चालक. मग आता जी वर मोकळी जागा आहे त्यातून मी दुचाकीवरून आरामात पुढे निघून जातो. पण त्या तिथे पोहोचण्याकरीता चक्रव्यूह पार करावे लागते. बरं त्यात पोहोचलो तरी आराम नाहीच. पुन्हा इकडून तिकडून कोण मध्ये यायचा प्रयत्न करेल सांगता येत नाही. अजून एक. साधारणपणे दुचाकीस्वार डाव्या बाजून पुढे जायच्या प्रयत्नात असतात. मग तिथे त्यांच्यात चढाओढ असते. मग मध्येच गाडी डावीकडे टाक, लगेच उजवीकडे असेही काही. आणि आता हद्द म्हणजे ह्यांनी रस्त्याच्या बाजूचे चालण्याकरीता बनविलेले पदपथ (फूटपाथ हो) सोडले नाही. बहुतेक दुचाकीस्वार त्या पदपथावरून पुढे जात असतात. मी आपला शिस्तीत रस्त्यावरुन जात असतो. लागले १० मिनिटे जास्त लागू दे.

तरी आधी रात्री थोडे उशिरा निघून कमी गर्दीत घरी जाता येईल असे वाटत असे. आता तर तिथेही अडचण. ९च्या नंतर निघालो तर ट्रकलाही परवानगी दिलेली असते. मग तेही लोक जमेल तशी गाडी हाकत असतात. आणि तुम्ही हळू जात असाल तर डाव्या बाजून जावे असे नाही, भले मी हळू जात असेन, समोरच्या ट्रकपेक्षा किंचित जास्त वेग घेऊन मला त्याच्या पुढे जायचे आहे. पण ह्या त्यांच्या प्रयत्नात मागे किती गाड्या अडकून पडल्या आहेत ते पाहत नाही. २ महिन्यांपूर्वी असेच गुजरातमध्ये जायचे होते म्हणून सकाळी ५:३० ला निघालो. पण त्या महामार्गावर एवढे ट्रक असे रस्ता अडवून जात होते की सकाळी लवकर निघून लवकर पोहोचण्याचा विचार विरुन गेला.

हं तर सुरूवात केली होती रुग्णवाहिकेवरून. रुग्णवाहिका जात असेल तर साधारणपणे आपण त्या गाडीला रस्ता द्यायचा असतो हे बहुधा कोणी लक्षात घेतच नाही. अमेरिकेत एक अनुभव आला (कोण रे ते म्हणाले, अमेरिकेत काय आता कोणीही जायला लागलेत :P ) सिग्नलवर पांढरा बारीक दिवा लावला असतो. तो तार्‍यांप्रमाणे लुकलुक करत असतो. रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी, किंवा पोलिसांची गाडी जाणार असेल तर तो दिवा सुरू करतात. तेव्हा, किंवा मध्येच सायरन ऐकू येईल तेव्हा सर्व बाजूंची वाहतूक पूर्णपणे थांबते. लोक आपली गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला थांबवून ठेवतात. म्हणजे डावीकडून त्या गाड्यांना मार्ग मिळेल. तिकडे आणि इथे नेमकी तुलना करणे नाही. तसे काही करायचेही बहुधा इथे आता नेमके शक्य नाही. पण निदान त्या अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांना थोडी तरी जागा मिळावी ही अपेक्षा. काही लोक तर रूग्णवाहिकेला मार्ग मिळाला तर त्यामागे रिकामी जागा असते म्हणून त्या गाडीच्या मागे आपली गाडी नेत असतात. हा प्रकार काही कळला नाही. 


सध्या तरी एवढेच. काही वेळा वाटते आधी इथे वाहन चालवायची थोडी शिस्त होती. ती बिघडत चालली आहे. तसेच मी ही नीट चालवतो असे मला वाटते. पण 'जावे त्याच्या देशा' किंवा 'When in Rome... 'ह्या प्रमाणे किंवा गर्दीश सिनेमातील मुकेश ऋषी च्या "तुम्हे जिंदा रहना है, तो मुझे मारना पडेगा" वाक्याप्रमाणे हा प्रकार असाच वाढत जाणार असेच वाटते. 


(अजून एक बाब आहे, सर्वांच्याच परिचयाची. पण ती पुढील वेळी)

जानेवारी २३, २०१०

blog.aarp.org/shaarpsession/traffic.jpg
http://www.newsandreviews.in/media/blogs/Home/mumbai%20traffic.jpg

शुक्रवारी दुपारी कार्यालयात सहकाऱ्यांसोबत बोलत होतो. पहिले प्रकाशचित्र दाखवून मी म्हणालो,"मला ह्या लोकांचा हेवा वाटतो. एवढी गर्दीची वाहतूक असूनही हे लोक किती नियमबद्ध पद्धतीने गाड्या उभ्या करतात. नाहीतर, आपल्याकडे कशीही गाडी दामटली जाते." नंतर मग नेहमीचीच चर्चा. हे असे वागतात, ते तसे वागतात.

संध्याकाळी आईचा फोन आला की माझा मावसभाऊ घरी आला आहे. मी म्हटले, "ठीक आहे मी सहा वाजता निघेन. ७:१५ पर्यंत पोहोचतो". पण कसले काय. दुपारी जी चर्चा केली तीचेच रूप समोर दिसत होते. नेहमी ज्या प्रवासाला २० मिनिटे लागतील त्याला ६०-६५ मिनिटे लागली. कारणही तेच, वाहतुकीची गर्दी. नेमके कारण कळले नाही. बहुधा मध्य रेल्वे वरील मोटरमननी केलेल्या संपामुळे वाहतुकीवर ताण वाढला असेल. पण त्या गर्दीत लोक कसेही(काही लोक कसेतरी) गाड्या चालवत होते. इकडून ही गाडी घुसव. तिकडून ती गाडी मध्येच आली. मग आमच्या वाहनचालकाचे नेहमीप्रमाणे दुसऱ्यांवर ओरडणे. घरी पोहोचायला ८ वाजले. तरी बरे, आठच वाजले. आमची गाडी पूर्व दृतगती मार्गावर गाडी येण्यास जेवढा वेळ लागला, त्यावरून तर वाटले होते की ९ वाजतील. काय पण योग(की योगायोग) असतात ना?

पण खरोखरच, नेहमीच्या ह्या वाहतुकीच्या त्रासामुळे वैताग येतो. अर्थात गाड्यांची संख्या भरमसाट वाढली हे खरे आहे. जागेची कमी आहे हे ही मान्य. पण तरीही काहीतरी शिस्त पाळायची? तीन गाड्यांच्या लेन आहेत पण त्यात चार-पाच गाड्या चालतात. दहा पंधरा वर्षांपूर्वी चंद्रपूर-नागपूर मधील आमचे नातेवाईक म्हणायचे की, मुंबईचा वाहनचालक नागपुरात गाडी नाही चालवू शकत. कारण तिकडे कशाही गाड्या चालवतात आणि तिकडचा चालक मुंबईत गाडी नाही चालवू शकत, कारण इकडे शिस्तीत गाडी चालवतात ज्याची त्याला सवय नाही. पण गेल्या ३-४ वर्षांपासून वाटते की इकडची शिस्तही गेली आहे. मी असे म्हणत नाही की सर्वच बेशिस्त आहेत. पण काही लोकांमुळे सर्वच वाट लागते.

आता काही गोष्टी बघा ना.

गेल्या आठवड्यात, कार्यालयातून निघालो. बसमध्ये गर्दी खूप. म्हणून रिक्षाने येत होतो. (मी सार्वजनिक वाहतूक वापरली नाही मान्य. पण त्यावर वाद नंतर घालू ;) ) सीप्झ पासून पुढे एल एंड टी च्या पुलापर्यंत यायला दहा मिनिटे लागायची तिकडे ३० मिनिटे लागली. गाड्या रेंगाळत पुढे चालल्या होत्या. पुढे पोहोचलो तर बघितले, एक ट्रक चालक ट्रक उभा करून कोणाची तरी वाट पाहत होता. त्यामुळे त्याच्या बाजून एकाच गाडी पुढे जाऊ शकत होती. अरे त्याला गाडी उभी करायला दुसरी जागा नव्हती का?
माझा रिक्षाचालक म्हणाला, "दोन दिवसांपूर्वीही तिकडेच कुठेतरी एक रिक्षाचालक लघुशंकेसाठी म्हणून थांबला तर त्याने रिक्षा डाव्या बाजूला नाही, उजव्या बाजूला उभी केली होती." :|

२००७ मध्ये वाशी वरून ठाण्याला येत असताना ऐरोलीजवळ वाहतुकीची कोंडी झाली होती. गाड्या एकदम हळू हळू जात होत्या. आम्ही कसे तरी तेथे पोहोचलो तर दिसले की, एक मोठा ट्रक वळण घेत होता पण नीट जमले नसल्याने तो हळू हळू प्रयत्न करत होता पण त्याच्या बाजूने इतर वाहने पुढे जायच्या प्रयत्नात कोंडी वाढवत होते. आम्ही ट्रकच्या पुढे गेलो तर पाहिले दोन वाहतूक पोलीस कोणातरी दुचाकीस्वारासोबत बोलत उभे होते. म्हटले वा, इकडे त्यांच्या मागे वाहतूक नीट चालत नाही आणि हे लोक गप्पा मारण्यात गुंग आहेत.

बरं
, ठीक आहे. वाहनात काही बिघाड झाला म्हणून गाडी बाजूला घेण्यात वेळ गेला किंवा नाही जमले तर हा घोळ होऊ शकतो. पण काही जण तर अशा गर्वात असतात की आपल्याकडे गाडी आहे म्हणजे माझ्या समोरचा रस्ता मोकळा पाहिजे. नाही तर जमेल तशी गाडी दोन तीन लेन मधून घुसवायचा प्रयत्न करणार. त्यात गाड्यांचा प्रेमालाप झाला तर आपणहून मग दुसऱ्या गाडीच्या वाहनचालकाशी गळाभेट करणार. ह्यात मागे वाहतुकीची वाट लागली आहे हे त्यांच्या गावी नसते. हम्म.. असेही ऐकले की काही टक्कर वगैरे झाली तर विम्याकरीता त्यांचे प्रतिनिधी येईपर्यंत त्या गाड्या तशाच ठेवाव्यात. तेव्हा वाहतुकीचे काय होईल असा विचार येतो.

काही लोक भ्रमणध्वनीवर गप्पा मारत गाडी चालवतात. त्यामुळे त्यांची गाडी मधल्या रस्त्यामध्ये हळू जातेय की नीट जात नाही ह्याकडे त्यांचे लक्ष नाही. पुन्हा त्यांना काही म्हटले की आपल्यालाच खत्रूड नजरेने पाहणार. वाहतूक खात्याने नियम बनवलेत की गाडी चालवताना भ्रमणध्वनी वापरायचा नाही. पण तेच ह्याकडे लक्ष देत नाहीत. पुण्यात माझ्या समोरील गाडीत एका माणूस भ्रमणध्वनीवर बोलता बोलता गाडी हळू नेत होता. नेऊ दे म्हणा हळू पण लोकांना त्रास का? कडे कडेने जा की. आणि ते ही सिग्नलच्या जवळच. तिकडे उभ्या असलेल्या दोन पोलिसांसमोरून तो निघून गेला. मग मी त्या पोलिसांना विचारले की, 'त्याला अडवले की नाही?' ते म्हणाले,'आमचे लक्ष नव्हते. तू त्याचा गाडीचा नंबर दे आम्हाला'. मी म्हटले, 'ठीक आहे. तुम्ही लक्ष नकाच देऊ. आता पुढे दिसला तर पाठवतो मी त्याला मागे.'

भरपूर ठिकाणी गाड्या उभ्या करण्यास बंदी असते. तरी काही लोक गाड्या उभ्या करून जातात. दुचाकी असली तर ती उचलून नेली जाते. पण चारचाकी असली तर त्याला भला मोठा 'जॅमर' लावला जातो. त्यांच्याकडे चारचाकी गाड्या ठेवायला जागा नसते हे मान्य. पण तिकडेच त्यांना जॅम करून वाहतूकीची कोंडी वाढली जाते असे मला वाटते. आणि रस्त्याच्या बाजूला हे लोक जेव्हा पार्किंग लाईट लावून एखाद्याची वाट पाहत उभे असतात, तेव्हाही त्यांना काहीच केले जात नाही.

अजूनही भरपूर गोष्टी आहेत ज्यामुळे ह्या वाहतुकीचा वैताग येतो. पण काय करणार, ह्यातून जावेच लागणार. पुण्याला असताना एक विचार मनात आला होता. थंड पाण्याने आंघोळ करायचे म्हटले तर आपली जी स्थिती असते, तीच नाही पण, तशीच ही स्थिती आहे. सुरुवातीचे एक दोन लोटे पाणी थंड वाटते, नकोसे वाटते. पण नंतर मग पूर्ण बादली आपण संपवितो. त्याप्रमाणेच ह्या वाहतुकीत शिरायचे म्हणजे वैताग वाटतो, पण एकदा त्यात घुसले की मग आपली गाडी अंतिम स्थानापर्यंत पोहोचवतो.

ता. क. : दोन्ही चित्रे आंतरजालावरून साभार. पहिले चित्र तेच ज्यावरून चर्चा सुरु झाली. दुसरे चित्र शोधताना कळले, माझ्यासारखेच बहुतेक लोकांनी लिहून ठेवले आहे. :)

[जमल्यास अशाच आणखी वैतागांबद्दल नंतरही लिहेन.]

ऑक्टोबर ०६, २००८

काल पुन्हा आईच्या खोलीत पाणी पाणी झाले. वॉशिंग मशिनचा पाण्याचा पाईप सैल झाल्याने तिथून सगळे पाणी खोलीत पसरले. बरं, मशीन बाथरूमच्या दरवाज्याजवळच आहे. तर पाणी बाथरूममध्ये जाण्यापेक्षा नेमके उलट्या दिशेला खोलीभर पसरले. काय पण ते बांधकाम. स्वयंपाकघरात मोरी तुंबली की पाणी तिकडून दिवाणखान्यापर्यंत. अरे, काय चाललंय काय? असा वैताग येतो ना...
२००२ मध्ये स्वयंपाकघर आणि हॉलचे नूतनीकरणाचे काम केले, तेव्हा करणारा कंत्राटदार म्हणाला होता, 'अगदी Zero Level ठेवू. पाणी पडले की तिकडेच थांबेल.' कसले काय. काम करायच्या आधीपेक्षा आता पाणी अधिक लवकर बाहेर येते. तीच गत आतील दोन्ही खोल्यांची.
बरं, त्याचेही म्हणणे काही अंशी ठीक असेल, की बिल्डरने लेवल नीट नाही ठेवला. जर थोड्यावेळापुरते मानले बरोबर, तरी तुम्हाला आधीच एवढी फुशारकी मारायची गरज नव्हती असे वाटते.

असो, आपण आता काय करणार? नसता म्हणाला 'Zero Level' तर काय केले असते? फक्त पाणी गळणार नाही ह्याची काळजी घ्यायची.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter