शनिवारी मित्राच्या लग्नाला हैदराबादला गेलो होतो. काल सोमवारी सकाळी विमानाने परत आलो. रिक्षाने घरी जायचे म्हणून विमानतळावरील रिक्षा स्थानकावर विचारले तर ते म्हणाले की आमचा संप आहे. आता आली का पंचाईत? अर्थात जायला बस, टॅक्सी वगैरे इतर पर्याय होते. पण बसने जायचे तर घराजवळपर्यत जाता येणार नाही, व रिक्षांचा संप असला तर पुढे जाणे कठीण आणि टॅक्सीचालकांनीही येण्यास नकार दिला. पहिल्यांदा पाहिले असे की विमानतळावरून घरी जायला पर्याय शोधावे लागले. चालत चालत सेंटॉर हॉटेल समोरील मुख्य रस्त्यावर आलो. तिकडेही ३-४ रिक्षा उभे होते. त्यांना विचारले, 'संप कसला करताय?' तर एकजण म्हणाला. 'ओला (OLA) टॅक्सींविरोधात'.
हा अंदाज होताच की ओला व इतर काही खाजगी टॅक्सींनी कमी दरात प्रवास सुविधा देणे सुरू केले होते. त्याचा थेट परिणाम होता हा. त्या रिक्षाचालकाला म्हटले, 'ते टॅक्सीवाले नव्हते तेव्हा काय तुम्ही सुरळीत काम करत नव्हते. आधी इतर कारणांकरीता संप करत होते, आता कारण नाही तर हे नवीन कारण शोधले.'
मग त्यांची नेहमीचीच रड की 'युनियनमुळे आम्हाला करावे लागते'
इतर टॅक्सी ही मिळत नव्हती. तोपर्यंत एका मित्राने त्याच्या घरी जाण्याकरीता ओला टॅक्सी बोलविली होती. तो म्हणाला,'ह्यात जाऊ, आम्हाला सोडून हीच टॅक्सी पुढे घेऊन जा'. आता तोच पर्याय बरा वाटला. मग त्या रिक्षाचालकांना म्हटले की, 'तुम्ही ओला टॅक्सींविरोधात संप करताय ना? आता आम्ही तुमच्या समोरच त्याच टॅक्सीतून जाणार. तुम्ही उभे रहा संप करत.'
स्वतःची वागणूक न सुधारता दुसर्यांना अटकाव करणार्याविरोधात असेच काहीतरी केल्याने त्यांच्यात सुधारणा होते का पाहू.
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा