नेहमीप्रमाणे काल ऑफिसला दुचाकीने जात होतो. मुलुंड टोलनाक्यावर सर्वात डाव्या बाजूने दुचाकी आणि रिक्षांना जाण्याकरीता जो मार्ग दिलेला आहे, दररोज तिथे भरपूर गर्दी असते. सर्वच चालकांना आपली गाडी पुढे दामटायची असते. मग काही लोक चारचाकींकरीता (किंवा खरं तर इतर सर्व गाड्यांकरिता) असलेल्या रांगेतून आपली गाडी पुढे नेतात. पुढे वाहतूक पोलिस उभे असतात पण ते सहसा ट्रक, टेम्पो ह्यांना थांबवून त्यांची कामे करीत असतात. पण काल खाकी वर्दीधारी पोलिसही प्रत्येक मार्गिकेसमोर उभे होते. वाटले, 'वा, चांगले आहे. कोणीतरी येत असेल.'
मी सहसा इतर मार्गिकेमधून जात नाही. पण गर्दी पहिल्या रांगेत खुपच ओढाताण वाटली म्हणून दुसर्या रांगेतून गाडी पुढे घेतली तर नेमके मला पोलिसांनी थांबविले. मग नेहमीचेच सोपस्कार (लायसन्स, गाडीची कागदे) झाल्यावर मी विचारले.
पूर्ण संभाषण देत नाही, त्याचा गोषवारा.
मी : "मला नक्की का थांबविले ते तर सांगा. पुढील वेळी लक्षात ठेवेन :)..."
पो : "काय राव, तुम्हालाही सर्व समजवावे लागेल का?..."
मी : मी ह्या रांगेतून नेहमी येत नाही, आज आलो म्हणून अडविले. पण मग इतरांनाही अडवा की..."
त्यांचे म्हणणे होते की एकालाच सगळे जमत नाही.
मग आणखी थोडी चर्चा करून मी पुढे निघालो.
ऑफिस मध्ये आल्यावर सहकार्याशी बोलताना कळले की वाहतूक विभागाचा सुरक्षा सप्ताह सुरू आहे. मग सगळी गोष्ट लक्षात आली.
संध्याकाळी घरी जाताना त्याच टोलनाक्यावर पाहिले तर आमच्या (म्हणजे दुचाकी/रिक्षाच्या) रांगेला अडवून बेस्टची बस त्यांच्या पहिल्या रांगेत घुसत होती.
आता ह्या लोकांना पोलिसांनी का थांबवले नाही हा प्रश्न विचारावासा वाटला, पण नाही विचारला.
(प्रकाशचित्र आंतरजालावरून साभार)
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा