दूरदर्शन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दूरदर्शन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मे २९, २०१३

असे म्हणतात की जाहिरातीवाचून उत्पादन विकणे म्हणजे एखाद्या मुलीला अंधारात डोळे मारणे.

अर्थातच ह्याच तत्वावर अर्ध्याहून अधिक जग चालत असेल, मुलीला डोळे मारणे ह्या नाही...तर जाहिरातबाजीच्या.


लहानपणापासूनच दूरदर्शन, आकाशवाणीवर (दोन्ही ढोबळ मानाने तंत्रज्ञान आणि संच म्हणा, त्यावर वेगवेगळ्या वाहिन्या नव्हत्या तेव्हा) कार्यक्रम पाहताना, ऐकताना मधे मधे जाहिरातींची सवय होती. त्यात एक संरचना होती. ठराविक वेळानंतरच जाहिराती असणार. म्हणजे कशा, तर कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आणि नंतर, किंवा थोडक्यात दोन कार्यक्रमांच्या मध्ये. शनिवार - रविवारी चित्रपट पाहताना एक मध्यांतर असायचे ते बातम्यांचे. तेव्हा पुन्हा त्या दोन प्रसारणांच्या मध्ये जाहिरात.

नंतर आले वारे चित्रपट चलचित्रफीतींचे (व्हिडिओ कॅसेट हो). त्या भाड्याने मिळायच्या, पण त्यातही चित्रपटाच्या सुरूवातीला, चित्रपटाच्या मध्येच जाहिराती सुरू झाल्या. भाड्याने कॅसेट घ्यायला गेलो की काही वेळा दुकानदार सांगायचा, ओरिजिनल प्रिंट आहे म्हणून. म्हणजेच चित्र/आवाजाचा दर्जा उत्तम आणि दुसरे म्हणजे त्यात जाहिराती नसणार.

त्यानंतर आले केबल टीव्ही. पण त्याकरीता उपग्रह वाहिन्या कारणीभूत होत्या. नुसते चित्रपट पाहण्याकरीता किंवा दाखवण्याकरीता कोणी एवढ्या वायरचे जाळे गुंतविले नसते. मग भाड्याने कॅसेट आणण्यापेक्षा केबलवर नवीन चित्रपट, किंवा जे लागतील ते पाहणे. ह्या सर्वांमध्ये जाहिरातींनी डोके वर काढायला सुरूवात केली होती.  त्यात कॅसेटमधील जाहिराती तर असायच्याच, पण मग स्थानिक दुकाने किंवा तत्सम जाहिराती येऊ लागल्या. जाहिरातींनी नंतर चालत्या कार्यक्रमाच्या पडद्यावर आक्रमण सुरू केले. खालची २० ते ३०% पट्टी जाहिरातींनी भरलेली, वरचीही थोडीशी पट्टी. त्यात प्रेक्षकांनी आपला चित्रपट शोधून पहायचा.
त्याच काळात, 'खुदा गवाह' चित्रपट सुरू होता केबलवर. इतर चित्रपटांत निदान एखादा प्रसंग किंवा दोन्-चार वाक्ये म्हटली पात्रांनी की जाहिरात दाखवायचे. पण ह्यांनी तर कहरच केला. एक वाक्य  तर सोडाच, मारामारीच्या दृष्यात एक मुक्का मारला की दाखव जाहिरात, एक लात मारली की दाखव जाहिरात.

उपग्रह वाहिन्यांनी कार्यक्रमात 'ब्रेक' सुरू केला. "मिलते है ब्रेक के बाद". असे म्हणणे आधी खेळ, स्पर्धा व तत्सम कार्यक्रमात आले. मग मालिका आणि चित्रपटांमध्येही. नंतर आपल्यालाही अंदाज यायला लागला की कार्यक्रमात आता केव्हा जाहिरात दाखवणार.

आता व्यावसायिकदृष्ट्या वाहिन्यांना आपला खर्च काढायचा म्हणजे जाहिरातीतून पैसा घेणार हे आलेच. पे चॅनल ची संकल्पना अशी ऐकली होती की त्यात ग्राहकांकडून पैसे घेतले असल्याने मग त्यात वाहिनीवर जाहिराती नसणार. पण एकंदरीत ती संकल्पनाचा मोडीत काढली गेली किंवा वाहिन्यांनी त्याला हरताळ फासला. इथे प्रेक्षकांकडून तर पैसे घेतातच पण वर जाहिरातींचा भडीमार.  तो भडीमार आता इतका झाला आहे की जाहिरातींचा कंटाळा येतो ते तर सोडाच, पण आजकाल जाहिरातींच्या मध्ये कार्यक्रम दाखवतात असे दिसायला लागले आहे. १५ मिनिट कार्यक्रम आणि १० मिनिटे जाहिरात. त्यात  त्यांचा प्राईम टाईम म्हणजे विचारायलाच नको. ते प्रमाण ५ मिनिट कार्यक्रम आणि १० मिनिटे जाहिरात असेही जाते. मग त्यांनी लोकांना आपल्या कार्यक्रम पाहण्याकरीता (खासकरून चित्रपट) वन ब्रेक मूव्ही, नो ब्रेक मूव्ही, ठराविक मिनिटांच्या जाहिराती म्हणजेच ब्रेक सुरू झाला की तेव्हाच सांगणार १ मिनिटांत परत. २ मिनिटांत परत. बरे, जाहिरात दाखवण्याकरीता चित्रपटातले प्रसंग कापतील पण जाहिराती कमी नाही करणार.

तसे म्हटले तर टेलिशॉपिंग अर्थात दूरदर्शनवर उत्पादन पाहून त्याची खरेदी फोनवरून करणे ह्याकरीताही आता नवीन वाहिन्या निघाल्यात, परंतु त्या जाहिराती इतर वाहिन्यांवरही दाखवल्या जातातच. ती ही एवढ्या प्रमाणात की B4U, Zee च्या काही चित्रपट वाहिन्या ह्यांवर तर ५ मिनिटे चित्रपट दाखवून एकच जाहिरात प्रत्येक ब्रेक मध्ये. जणू काही ती जाहिरात सतत पहायचा कंटाळा नको म्हणून मध्ये चित्रपट आहे.

तुम्ही म्हणाल मी एवढे पाल्हाळ का लावले आहे? तर TRAI ने काढलेला नवीन नियम. दूरदर्शन वाहिनीवर एका तासात १२ मिनिटांच्यावर जाहिराती दाखवण्यास निर्बंध घातले आहे. १० मिनिटे जाहिराती आणि २ मिनिटे कार्यक्रमांची जाहिरात. चांगला नियम अर्थात आपण प्रेक्षकांकरीता. खरे तर TRAI ने ह्या नियमाबद्दल २००७ मध्येच जाहीर केले होते. पण ते अंमलात आणायला एवढा वेळ का लागला ते कळत नाही. माझ्या आठवणीप्रमाणे जानेवारी २००७ मध्ये ह्याबद्दल ऐकले होते. त्यानंतर आता ऑक्टोबर २०१३ पर्यंत म्हणजे जवळपास पावणे सात वर्षांनी त्याचा वापर होईल असे दिसते. तरीही वाहिन्यांनी डिसेंबर २०१३ पर्यंतचा वेळ मागितला आहे. तेव्हा तरी ह्याचे पालन होते की नाही ते पाहू.

अजूनही एक गोष्ट तुम्ही अनुभवली असेलच. कार्यक्रम सुरू असताना मध्येच जाहिरात आली की तिचा आवाज खूप मोठा असतो. अचानक आवाज वाढल्याने कानांना त्रास होईल असा. आधी वाटायचे कार्यक्रमाचा आवाज कमी असतो आणि जाहिरातींचा मोठा म्हणून असे असेल. पण प्रत्येक कार्यक्रमात असे कसे असेल? ते मुद्दामच तसे ठेवतात असे कुठेतरी ऐकले/वाचले होते. पण ह्यामागचे नेमके कारण कळले नाही.
पण एक दिसले. अमेरिका आणि कॅनडामध्ये ह्याविरोधातही त्यांना नियम बनवावे लागले. 'जाहिरातींचा आवाज हा कार्यक्रमांच्या आवाजाएवढाच किंवा त्यापेक्षा कमी असावा'. हा नियम आपल्याकडेही लवकरात लवकर यावा अशी अपेक्षा. शक्यतोवर आता आलेल्या ह्या नवीन नियमावलीतच.

डिसेंबर ०४, २०११




तुम्ही बोर्नविटाची नवीन जाहिरात पाहिली आहे का? दूधातून कॅल्शियम खेचण्याकरीता 'ड जीवनसत्व' लागते, जे बोर्नविटा मध्ये आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

http://www.cadburyindia.com/in/en/Brands/Pages/videoplayer.aspx?vid=1734

एक तर त्रासिक जाहिरात, तीन तीन वेळा तिचे विचारणे, "कॅल्शियम करीता काय करतेस?", हावभाव गंमतीशीर (चांगले नाही !!!)

आणि दुसरी गंमत (?) आमच्या शालेय शिक्षणातील अभ्यासाप्रमाणे जी काही माहिती आहे त्याप्रमाणे दुधात कॅल्शियम आणि  'ड जीवनसत्व' आधीपासूनच असते. मग वेगळे 'ड जीवनसत्व' कशाला?

बोर्नविटा आणि दूध कॅल्शियम करीता रस्सीखेच करायला लागले तर पिणार्‍याला ते मिळेल का? :)
हो, 'दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ' हे म्हणणे इथे लागू होऊ शकते का? ;)


जून ०१, २०११


सारेगम, अंताक्षरी सारखे सुंदर कार्यक्रम कधी काळी चालू होते. (आधीचे आठवत नाहीत ;) )


नंतर आले इंडियन आयडॉल. इंडियन आयडॉलचा पहिला भाग थोडासा बघितला होता. चांगले गायक येत होते. नंतर अनु मलिक, फराह खान आणि सोनू निगम यांनी बहुतेक स्पर्धकांची खिल्ली उडविण्यास सुरूवात केली. तो प्रकार आवडला नाही. स्पर्धकांनीही परीक्षकांना सडेतोड उत्तरे दिलीत. ते चांगले वाटले. ;)

त्या पहिल्या कार्यक्रमात अभिजीत सावंत जिंकला. नंतर जास्त कधी दिसला नाही. त्याच धर्तीवर भरपूर कार्यक्रम सुरू झाले. स्पर्धक-परीक्षक, स्पर्धक-स्पर्धक, परीक्षक-परीक्षक वाद, भांडणं सुरू झाली. तरीही बहुधा चांगले कलाकार निवडले जाऊ लागले.

नंतर प्रेक्षकांना ह्यात सामील करून घेत त्यांच्याकडून पाठवलेल्या एस एम एस वरून विजेते निवडले जाऊ लागले. प्रकार आवडला नसला तरी आपली कला सर्वांसमोर आणण्याकरीता लोकांना एक मंच मिळाला. एक काय भरपूर मिळाले.


आता आलाय 'X Factor'. प्रकार तसाच... तोच Talent Hunt. सर्वच कार्यक्रमांप्रमाणे हा ही सुरूवातीला बरा वाटतोय. पुढे कसे चालते पाहू ;)

(चित्रं आंतरजालावरून साभार)

फेब्रुवारी १७, २०११

नेहमी आपण आवडलेल्या जाहिरातींबद्दल बोलत असतो. काही वेळा जाहिराती एवढ्या चांगल्या असतात की आवडता कार्यक्रम, चित्रपट पाहत असताना मध्येच चांगली जाहिरात आली तर ती पाहण्यात मजा वाटते, जाहिराती का दाखवतात असे वाटत नाही. ;)
पण गेल्या वर्षापासून एक जाहिरात छळ करत आहे. निरमा पावडरची. मोटारीच्या चाकाने रस्त्यावरील पाणी उडत असताना ती बाई बोट दाखवून 'निरमा.. निरमा.." म्हणते. आतापर्यंत ही मला सर्वात जास्त न आवडलेली जाहिरात.



तसेच सध्या दाखवत असलेली फेविकॉलची जाहिरात. सून सासूचे पाय दाबत असते तेव्हा दोघी एकमेकींचे गुणगान गात असतात. पण नंतर मग उलट. फेविकॉलने आतापर्यंत एवढ्या पुरस्कार मिळण्यासारख्या जाहिराती बनविल्या होत्या. उलट त्यांच्या सर्वच जाहिराती आवडल्या होत्या. पण त्यांच्या ह्या नवीन जाहिरातीने पूर्ण अपेक्षाभंग केला. :(
(ह्याचा विडीयो आंतरजालावर अजून मिळाला नाही. मिळाला की त्याचा दुवा देईन)

फेब्रुवारी ०२, २०११


पुन्हा गाजावाजा करत असलेला शाहरूख खानचा 'जोर का झटका' हा कार्यक्रम एनडीटीव्ही इमॅजिनवर आज चालू झाला. त्याच्या All Out .. Total Wipe Out ह्या वाक्यावरून मला अंदाज आला होता की तो बिन्दास, डिस्ने, ए एक्स एन (AXN) वरील खेळांच्या कार्यक्रमांप्रमाणे असेल. आणि आताच त्याचे पहिले प्रक्षेपण पाहिले. तो कार्यक्रम तसाच आहे.

बायकोने विचारले "हा कार्यक्रम चालेल का?" मी म्हटले, "नाही. आणि ह्यात शाहरूख चे जास्त काम नसेल." तेव्हा आणखी एक लक्षात आले. शाहरूख खानचे कौन बनेगा करोडपती ३, क्या आप पांचवी पास से तेज है हे कार्यक्रम तर चालले नाहीत. आता हा तिसराही बहुधा चालणार नाहीच. (कधीतरी पहिल्यांदाच अशी तात्काळ समिक्षा करत आहे ;) ). पहिले दोन कार्यक्रम तरी थोडेफार पहावेसे वाटत होते. हा मी ही बहुधा पाहणार नाही.

ज्या लोकांना शाहरूख खान आवडत नाही त्यांच्या प्रतिक्रिया कशा असतील ते जाणतो. मलाही ह्याबद्दल आवर्जून लिहावे असे नव्हते. पण काहीतरी चांगले कार्यक्रम दूरदर्शन वर असावे वाटत असताना, असे कार्यक्रम सुरू झाल्याने मनात आले ते लिहून टाकले :)

(चित्र जोर का झटकाच्या संकेतस्थळावरून)

डिसेंबर १३, २०१०

आज संध्याकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर पाहिले की अमेरिकेत सलग ८६ तास दूरदर्शन पाहणार्‍या तिघा जणांची गिनिज विश्वविक्रमात नोंद करण्यात आली आहे. तसेच त्यांना १०००० डॉलर्सचे बक्षीसही देण्यात आले आहे. पण ८६ तास त्यांनी काय पाहिले त्याची बातमी मिळाली नाही.

आंतरजालावर बातम्या शोधणे आजकाल कठीण काम नाही. मी ती बातमी शोधायचा प्रयत्न केला. लगेच मिळाली ह्या दुव्यावर. एक '२४' नावाची मालिका पाहत होते ते लोक. तिच्या जाहिरातीकरीता त्या निर्मात्यांनी ही एक स्पर्धा ठेवली होती.

मनात विचार आला, मी ही एवढा वेळ दूरदर्शन पाहत असतो. आपल्या इथेही अशी स्पर्धा ठेवा की, नक्कीच जिंकेन. कारण जिथे सास बहू च्या मालिका, टुकार चित्रपट पचवायची सवय पडली आहे. (गेले काही वर्षे आमच्या घरात तरी त्या मालिका लागत नाहीत. पण चित्रपट तर आपली संस्कृती आहे, आणि चांगल्यातल्या चांगला ते वाईटातला वाईट चित्रपट पाहण्यासाठी विश्वविक्रम नक्की करू शकतो ;)) तिथे स्पर्धेकरीता असे कार्यक्रम पुन्हा पाहून घेऊ.

मग वाटले, कोणता कार्यक्रम ते जरा विचार करावा लागेल. कारण इमोशनल अत्याचार, बिग स्विच, बिग बॊस, राखी का इन्साफ वगैरे (हे मला माहित असलेले आणि डोक्यात जाणारे कार्यक्रम) असेल तर स्पर्धा जरी जिंकलो तरी त्याचा आनंद भोगता येणार नाही. कारण तिकडून थेट वेड्यांच्या इस्पितळात भरती व्हावे लागेल.

पण तेव्हाचे तेव्हा पाहू. आता तरी सलग किती तास दूरदर्शन पाहू शकतो ते मोजायला सुरूवात करू का? स्पर्धेचा बिगुल वाजला की लगोलग कार्यालयातही आठवड्याभराची सुट्टी टाकता येईल. ;)

नोव्हेंबर १७, २०१०

'बिग बॉस ४' आणि 'राखी का इंसाफ' ह्या कार्यक्रमांवर अखेर निर्बंध घालण्यात आलेत. ते कार्यक्रम रात्री ११ ते ५ ह्या वेळेत दाखविणे तसेच वृत्तवाहिन्यांना ह्या कार्यक्रमांची दृष्ये न दाखवण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.

उशीरा केलेली पण चांगली गोष्ट. मी दोन्ही कार्यक्रम पूर्ण पाहिले नाहीत. 'राखी का इंसाफ' तर पहायला सुरूवात केल्यानंतर १५ मिनिटांत बंद केले होते. लोकांवर एवढी वाईट परिस्थिती आली आहे का? मान्य आहे की एखादा वाद मिटविण्याकरीता आपण कोणीतरी तटस्थ माणूस शोधतो. त्याकरीता मग एखादा अनोळखी माणूसही निवडू शकतो. किरण बेदी ठीक आहेत हो, त्या पोलीस अधिकारी होत्या. एखादा न्यायाधिश नाही तरी त्यांचे म्हणणे ऐकू शकतो. पण न्याय देण्याकरीता राखी सावंत? आणि राखीचे बोलणे पाहून तर ती वाद मिटविण्यापेक्षा आगीत तेल ओतत आहे असेच वाटते.

तसेच 'बिग बॉस'. हा कार्यक्रम ही सूरूवातीपासून वाद निर्माण करूनच मग चित्रीकरण केले जाते असे वाटते. गेल्या मोसमातील आणि ह्या मोसमातील त्या कार्यक्रमाचे काही भाग पाहून, पाश्चिमात्य देशांचे कार्यक्रम आणले म्हणजे ते त्या प्रकारेच दाखविले जावेत म्हणून मुद्दाम त्यात ह्या गोष्टी टाकल्या जातात असे वाटते.

आज 'स्टार माझा'वर ह्याबद्दल चर्चा चालू होती. कांचन अधिकारी ह्या निर्बंधाच्या पक्षात आहेत असे दिसले. त्यांनी दिलेले मुद्दे पटतात की आपण एका ठिकाणी संस्कृती वगैरे सांगत असतो मग असे प्रकार का? कार्यक्रम असा असावा की सर्वजण पाहू शकतील वगैरे वगैरे. दुसरा एक पाहुणा, कोणीतरी शाह म्हणून होता. नक्की शब्द आठवत नाही पण त्याचे म्हणणे असे की "संस्कृती वगैरे ठीक आहे. पण आजच्या पिढीतील लोकांना जसे पाहिजे तसे आम्ही दाखवतो. आमच्यावर निर्बंध कशाला?" काहीतरी यूट्युब चे ही उदाहरण दिले की तिथे आज सर्व शिव्या असलेले व्हिडीयो ही उपलब्ध आहेत, तिथे सर्व उघडपणे असते, काही निर्बंध नाही. मला त्याला सांगावेसे वाटेल की "तुम्हाला जर वाटते की आजच्या पिढीतील लोकांना हे पटते म्हणून तुम्ही दाखवता हे एकवेळ मान्य केले तरी सर्व लोक तसे मानत नाहीत. अजूनही त्याला वेळ आहे. तुम्हाला ते कार्यक्रम तसे दाखवायचे असतील तर दाखवा, पण त्यालाही कुठे दाखवतो त्या क्षेत्राप्रमाणे मर्यादा असतील. आणि मग त्याची जशी वेळ ठरविली गेली असेल तसे दाखवा. तसेच युट्युबवरही मर्यादा आहेत. तिथेही तक्रार केली की तसे व्हिडियो काढले जातात."

ह्या दोन कार्यक्रमांसोबतच आणखी एक कार्यक्रम आहे. बिन्दास वाहिनीवरील "ईमोशनल अत्याचार". ह्या कार्यक्रमावरही अशाच प्रकारचे निर्बंध घातले जावेत, म्हणजे रात्री ११ ते ५ ही वेळ ठेवणे आणि वृत्तवाहिन्यांना ह्यांची दृश्ये दाखविणे ह्यावर बंदी आणणे, असे वाटते.


जर पाश्चिमात्य देशांत असे उघडपणे दाखवले जाते असे कोणी म्हणत असेल तर त्यांना सांगावेसे वाटेल की तिकडची गोष्ट इथे आणायची असेल तर पूर्ण प्रकारात आणा. कार्टून पासून मालिकांपासून चित्रपटांपर्यंत जे काही दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवले जाते, तो कार्यक्रम कोणत्या प्रकारचा आहे, तसेच कोणत्या वयोगटाच्या प्रेक्षकांकरीता आहे हे त्या कार्यक्रमाच्या सुरूवातीलाच वरच्या कोपर्‍यात दाखविले जाते. मग पुढे तो कार्यक्रम पाहणार्‍याची इच्छा.


आपल्या इथेही तसेच काहीतरी करूया. मग म्हणू की आता प्रेक्षकाला निर्णय घेऊ दे. काय? बरोबर?

नोव्हेंबर ११, २०१०

त्रिमिती चित्रपटांशी माझी ओळख झाली १९८५ मध्ये, ’छोटा चेतन’ द्वारे.  आईस्क्रिम घेण्याकरीता हात पुढे करणे, इतर काही प्रसंगात दचकणे वगैरे अनुभव तेव्हाच मिळाले. त्यानंतर पाहिला ’शिवा का इन्साफ’. ’सामरी’ सिनेमा भुताचा असल्याने बहुधा वडिलांनी आम्हाला तेव्हा दाखवला नाही. :)


त्यानंतर नवीन चित्रपट आले नाहीत. पण काही वर्षांनी त्रिमिती चित्रांकित गोष्टीची पुस्तके (कॉमिक्स) आलेत. एका रद्दीच्या दुकानात आम्हाला ती पुस्तके दिसली. मग काय, जमतील तेवढी पुस्तके आणून वाचण्याचा कार्यक्रम झाला. नंतर आलेली ’छोटा चेतन’ची नवीन आवृत्ती हरीश आणि उर्मिला मातोंडकरला सोबत घेऊन. चित्रपटगृहात तर नाही पहायला मिळाली, नंतर एका दूरदर्शन वाहिनीवरच पाहिली. २००३ मध्ये आलेला ’छोटा जादूगर’ सिनेमा ही पुन्हा त्रिमितीच.


खूप वर्षांनी म्हणजे साधारण १८ वर्षांनी पाहिलेला. एवढ्या काळात तो अनुभव थोडाफार विसरून गेलो होतो. पण ह्या चित्रपटाने पुन्हा मजा आली. माझ्या निरिक्षणशक्तीने त्यातील फरक ओळखायचा प्रयत्न केला होताच. आधीचे त्रिमिती चष्मे हे निळ्या आणि लाल काचांचे (प्लॅस्टिक) चे बनविलेले होते. पण हे पूर्ण राखाडी रंगाचे होते. चित्रातही बदल होताच. नेमका काय बदल झाला तो तेव्हा शोधायचा प्रयत्न केला नाही, नंतर केला. पण ती माहिती मी येथे देत नाही. विकिपिडियावर फार चांगल्या रितीने दिले आहे ते. ;)


थोडे शास्त्र आणि तांत्रिक बाजू पाहताना मी वाचलेल्या ऐकलेल्या काही गोष्टी सांगतो. आपल्या दोन्ही डोळ्यांनी मिळून आपल्याला अंदाजे २०० अंशांपर्यंतचे दष्य दिसते आणि एका डोळ्याने फक्त १२० अंशांपर्यंत दिसते. अर्थात फक्त दृष्यविस्तार नव्हे तर दोन डोळ्यांमुळे त्रिमितीचा अनुभव ही येतो. एका डोळ्याने वस्तूची लांबी आणि रूंदी (किंवा उंची) दिसते तर दुसया डोळ्यामुळे त्या वस्तूची खोली किती आहे त्याचा अंदाज येतो. त्याचा फायदाच होतो. पण ह्यातच एक उलट गोष्ट आहे. सुईत दोरा टाकताना दोन डोळ्यांनी सुईतील छिद्राचा अंदाज येत नाही त्याकरिता आपल्याला एक डोळा बंद करून द्विमितीचा उपयोग करावा लागतो.


असो, शास्त्र बाजूला ठेवून इतर भाग. त्रिमिती चित्रपटांप्रमाणेच आणखी एक प्रकार फार पहायला मिळतो, तो म्हणजे होलोग्राम. एखादे चिन्ह किंवा चित्र त्रिमितीचा आभास निर्माण करून दाखवले जाते. हा प्रकार लहानपणी वापरलेल्या पट्ट्य़ांमध्ये ही पहायला मिळाला होता. पण मुख्यत्वे, एखादी वस्तू ओरिजिनल किंवा अस्सल आहे हे ओळखण्याकरीता उत्पादक आपल्या उत्पादनावर आपले मानकचिन्ह होलोग्राममध्ये बनवून चिकटवितात. आता जर नकली उत्पादकानेही तसाच होलोग्राम बनविला असेल तर त्यामध्ये अस्सल कोणते आणि नकली कोणते हे ओळखण्यात काही वेळा गल्लत होऊ शकते असे मला वाटते. :)


गेल्या वर्षी पुन्हा ३ त्रिमिती चित्रपट पाहिले. एक पूर्ण ऍनिमेशन (Ice Age 3), दुसरा मिश्र (G Force) आणि तिसरा संपूर्ण नेहमीसारखा (Final Destination 3D). ह्यातही दाखविले जाणारे चित्र तसेच चष्मा ह्यात बदल वाटला. तसेच भरपूर चित्रपट त्रिमितीमध्ये येत आहेत असे जाहिरातींत दिसले. एका मित्राने सांगितले की ते तंत्रज्ञान विकसित केल्याने त्रिमिती चित्रपट बनविणे थोडे सोपे झाले असल्याने धडाधड त्रिमित्री चित्रपट बनत आहेत. त्याचा फायदा आपल्यालाच.


त्यानंतर चर्चा वाढलीय त्रिमिती दूरदर्शन संचाची. एका संचासोबत १ ते २ त्रिमितीदर्शक चष्मे. कारण थेट त्रिमिती आभास तर मिळू शकत नाही. त्यामुळे चित्रपटगृहाचा अनुभव घरी एवढाच फरक असेल का? इतर देशांनंतर आपल्या देशात ह्याचे आगमन नेहमीपेक्षा लवकर झाले असे वाटतेय. ह्या दिवाळीत तर काय त्रिमित्री दूरदर्शन संच आणि LED संचांची भलतीच जास्त जाहिरात होत होती. आमचा घरचा दूरदर्शन संच बिघडण्याच्या मार्गावरच आहे. त्यामुळे एकाने सल्ला दिला, थोडे थांबून 3D संचच घे. पण मला तसे वाटत नाही. कारण एक तर त्याची किंमत भरपूर जास्त आहे. इतर देशांत तरी त्रिमिती वाहिन्या बनविणे चालू झाले आहे. पण भारतात तशा वाहिन्या बनण्याला बहुधा ३/४ वर्षे जातील असे मला वाटते. पण ज्याप्रकारे दूरदर्शन संच जरा जास्त वेगात भारतात आले त्याच वेगात वाहिन्याही आल्या तर काय सांगता येत नाही. असो. पण मी तरी सध्या त्रिमिती दूरदर्शन संचाच्या मागे नाही.


आता गेल्या महिन्यापासून त्रिमिती भ्रमणध्वनीची ही जाहिरात येत आहे. त्यात वापरायचा पडदा तसेच व्हिडियो त्रिमितीमध्ये दिसेल असा त्यांचा दावा आहे. मी तरी अजून तो भ्रमणध्वनी पाहिला नाही आहे. पण त्यात बिना चष्म्याने त्रिमितीचा अनुभव मिळणे कितपत शक्य आहे अशी शंका वाटते. अर्थात होलोग्रामप्रमाणे तर असेलच किंवा त्याहीपेक्षा भरपूर जास्त. पण तंत्रज्ञानाने आघाडी घेतली असेल तर चांगलेच आहे.


असो, आता एवढे त्रिमितीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाल्याने दर्शक आणि ग्राहक ह्यांना फायदा आहेच. आणखी काय काय पुढे येते ते पाहूच.

ऑक्टोबर ११, २०१०

हम पांच, मूवर्स अँड शेकर्स, ऑफिस ऑफिस, कौन बनेगा करोडपती, तारक मेहता का उल्टा चष्मा, सजन रे झूठ मत बोलो...इतरही काही.

दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवल्या जाणार्‍या काही मालिका. काही बंद झाल्यात, काही अजून सुरू आहेत, काही पुन्हा सुरू होत आहेत. ह्या मालिका आवडल्याने मी नेहमी पहायचो, पाहतो.  सुरूवातीला प्रत्येक भाग आवर्जून पाहिला आहे. पण नंतर त्यात तोचतोचपणा येत गेला मग ते पाहणे बंद होत गेले.

हम पांचः वेगळे विनोद, सादरीकरणामुळे मजा वाटायची. नंतर त्यांचे तेच तेच प्रताप पाहून कंटाळा यायला लागला.
मूवर्स अँड शेकर्सः
शेखर सुमनचा हा कार्यक्रम ३१ डिसें १९९७ ला नववर्षाच्या स्वागताकरीता जे कार्यक्रम होतात त्यातच दाखवणार होते. पण लोकांना ते आवडल्याने दर आठवड्याला मग दररोज दाखविणे सुरू झाले. पण शेखर सुमनचे विनोदांची पातळी घसरत गेली आणि माझे पाहणे कमी होत गेले.

ऑफिस ऑफिस:
ह्यातही सुरूवातीला नवीन प्रकार, त्यांचे सादरीकरण, विनोद आणि त्यांचे काम. ह्या सर्व गोष्टींमुळे पाहत होतो. नंतर वेळ मिळणे कमी होत गेले व तोचतोचपणा वाटत राहिला.

कौन बनेगा करोडपती
: सामान्य ज्ञानाचे प्रश्न, खेळ जिंकण्याची इच्छा आणि अर्थातच अमिताभ बच्चन ह्यांमुळे पाहत होतो. हर्षवर्धन नवाथे जिंकायच्या थोडे आधीपर्यंत नेहमी पाहत राहिलो. मध्ये जाहिरात दाखवली की खेळातला पहिला करोडपती दाखवणार आहेत. ते पाहिले आणि मग कमी होत गेले. दुसरा भाग सुरूवातीला पाहिला, नंतर नाही. तिसरा भाग तर दूरदर्शन संच नव्हता म्हणून पाहणे जमले नाही. मित्राच्या घरी जेव्हा जेव्हा पाहिले तेव्हा कोणी ना कोणी सेलेब्रिटीच दाखवत होते. मग इच्छा नाही झाली.

सध्या तारक मेहता का उलटा चष्मा नेहमी पाहतो. निदान गेली दीड वर्ष. झकास कार्यक्रम. पण काही ह्या वर्षाच्या सुरूवातीपासून नुसते वेगवेगळे इव्हेंट्स दाखवत असल्याने तेवढे भाग आवर्जून पाहिले नाहीत. आता तरी चांगले वाटतेय. नंतर कळेलच.
तसेच सजन रे झूठ मत बोलो. सुरूवातीला वाटले होते की खोटं बोलणे दाखविणे किती दिवस दाखवतील. पण त्यांनी जे एक एक प्रसंग दाखवलेत त्यातून ते कसे बाहेर निघतात (खोटे बोलून) ते पाहून मजा वाटते. आणि कलाकारांचे काम छानच वाटते.

आज पुन्हा कौन बनेगा करोडपती? सुरू झाले. वेगळी वाहिनी पण सादरीकरणात काही खास फरक पडलेला दिसला नाही. चांगलेच वाटले. खेळांच्या नियमांत थोडा बदल केलाय. अर्थात प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमात केवढा फरक पडू शकेल आणि जर बदल केला असता तर तो आपल्याला आवडला असता का? कारण पुन्हा जुन्याशी तुलना सुरू होणार. तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे फक्त ९ आठवडेच हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.
पाहू लोकांना किती आवडतो आणि मलाही.

एप्रिल ०५, २०१०

'ब्लू' नावाचा सर्वात जास्त खर्च केलेला हिंदी सिनेमा चालला नाही आणि २ ते ३ महिन्यात कलर्स वाहिनीवर दाखवण्यात आला. त्यानंतर 'अजब प्रेम की गजब कहानी', अलाद्दीन वगैरे चित्रपटही फार थोड्याच दिवसांत दूरदर्शन वाहिन्यांवर दाखविण्यात आले. ह्यावरून मनात सर्वसाधारणपणे विचार येत होते की हे चित्रपट चालले नाहीत म्हणून दाखवतात का? त्यातच काल मटामध्ये हा लेख वाचला आणि हे वाचत असतानाच लहानपणापासूनचे अनुभव डोळ्यांसमोरून गेले.

साधारण ८६/८७ च्या काळापासून (आधीचे आठवत नाही) सर्व चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याची विडीयो कॅसेट (चलचित्रफीत) त्याच दिवशी सर्व विडीयो कॅसेट लायब्ररीमध्ये मिळायची (इथे मराठी भाषांतर करत नाही आहे कारण तेच नाव वापरात होते) त्याच काळात आमच्या घरात नवीन व्हीसीआर आला असल्याने जवळपास दररोजच एका चित्रपटाची कॅसेट आणली जात होती. नंतरही पाहिजे तेव्हा एखादा सिनेमा आणून पाहिला जात असे.

तेव्हा एका कॅसेटचे भाडे १० रू पडत असे. पण नंतर मागणी पुरवठा तत्त्वावर काही चित्रपटांकरीता ते वाढून १५ रू ही केले होते. मला आठवतोय तो 'गंगा जमुना सरस्वती' चित्रपट. ह्याच्या कॅसेटचे १५ रू घेतले असे सांगण्याकरीता त्या दुकानदाराने घरी एक चिट्ठी लिहून पाठवली होती. तसेच काही चित्रपटांच्या कॅसेटकरीता वेळेचे बंधन होते. ४/५ तासांत परत करणे वगैरे. 'मि. इंडिया' सिनेमाकरीताही असेच बंधन होते. नेहमीच ती कॅसेट मिळत नव्हती. एके दिवशी घरून चर्चा करून निघालो पण घेऊन आलो 'सुहाग' सिनेमा. बहिण म्हणाली, ' मि. इंडिया' ची कॅसेट लवकर पाहून परत करायची या कारणाने वडिल कार्यालयातून लवकर आले होते. पण मी घोळ घातला होता :|

ह्म्म.. कॅसेट चर्चा खूप झाली. सांगायचा मुद्दा हा की चित्रपटाची कॅसेट प्रदर्शित झाल्याच्या दिवशीच मिळायची. तरीही चित्रपटगृहांत गर्दी असायची तो भाग वेगळा. 'आंखे' सिनेमा (गोविंदाचा) चित्रपटगृहातच एवढा चालला होता तेव्हा मी आणि माझी बहीण बोलत होतो की हा सिनेमा एवढा कसा चालतोय? पण मित्राच्या घरी कॅसेटवर तो सिनेमा पाहिला, आवडला आणि कारण कळले. तसेच तेव्हा केबल हे प्रकरण नवीनच सुरू झाले होते. त्यावरही मग ते चित्रपट दाखवणे सुरू होते. त्यामुळे कॅसेट आणणे बंद नाही झाले तरी कमी झाले, केबलवर सिनेमा पाहणे सुरू झाले. पण तरीही काही चित्रपट पहायला आम्ही आवर्जून चित्रपटगृहात जायचो. त्यातच होता 'अंदाज अपना अपना'. ह्या सिनेमाची आम्ही १३ जणांनी तिकिटे काढली होती. रविवारी संध्याकाळी चित्रपट पहायला जायचे तर शनिवारी रात्री केबलवर तो चित्रपट दाखविला जात होता. पण आम्ही तेव्हा पाहणे कटाक्षाने टाळले. कारणे २. एक तर चित्रपटाची तिकिटे काढली होती आणि दुसरे म्हणजे कधीतरीच आमचा गट चित्रपट पहायला एकत्र जात होता, तिकडे जास्त मजा आली असती.

त्याच काळात मग (माझ्या माहितीप्रमाणे) 'हम आपके है कौन!' च्या वेळी राजश्री प्रॉडक्शन ने त्या चित्रपटाची चित्रफीत प्रदर्शित केली नाही व सुरूवातीला एकच प्रिंट लिबर्टी सिनेमाकरीता आणि मग नंतर फक्त २७ प्रिंट काढल्या होत्या. आणि काही चित्रपटगृहांमध्ये तिकिटांचे दरही वाढविले होते. पण तो चित्रपट तुफान चालला. हे मुख्य कारण असेल बहुधा. आणखी काय गणिते होती मला अंदाज नाही. पण सर्व चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाची चलचित्रफीत बनवून त्याच दिवशी प्रदर्शित करणे बंद केले. ते आजतागायत चालू आहे. ह्यामुळे कितपत फायदा त्यांना झाला हे तेच सांगतील पण चित्रपट चाचेगिरी (पायरसी) वाढली असे म्हणतात आणि तसे दिसत आहेच.

त्यानंतर आले मल्टिप्लेक्स. त्यांनी तर तिकिटांचे दर अवाजवी वाढवून ठेवले. पण तरीही लोकांचे चित्रपटगृहात जाणे बंद झाले नसले तरी पायरसी वाढली असे म्हणता येईल. कारण ज्या ठिकाणी ३०/४० रू बालकनीला द्यायचे तिथे ८०/१००, नंतर १५०/२०० आणि आता तर ३०० रू प्रत्येकी देण्यापेक्षा ३० ते ५० रू रस्त्यावर मिळणारी व्हिसीडी/डिव्हीडी घेणे लोकांना स्वस्त वाटणे आणि त्यांनी त्या विकत घेणे स्वाभाविक झाले.

असो, ह्या सर्वांवर तोडगा म्हणून निर्मात्यांनी मटाच्या लेखात लिहिलेला मार्ग अवलंबिला असला तरी त्यामुळे आपला (प्रेक्षकांचा) फायदा हा निश्चितच आहे असे वाटते. कारण साधारण २ महिन्यांत नवीन सिनेमा एखाद्या वाहिनीवर दाखवला जातो. त्यामुळे घरबसल्या पाहता येतो. पण त्यात व्यत्यय असतो जाहिरातींचा. जर तो व्यत्यय नको असेल तर दुसरा मार्ग आहे, व्हिसीडी/डिव्हीडी विकत घेण्याचा. चोरीची म्हणजे पायरेटेड नव्हे तर खरी (ओरिजिनल) :) कारण तो चित्रपट वाहिन्यांवर दाखवला गेला म्हणजे त्याचा व्हिडीयो प्रदर्शित झाला असे म्हणता येईल आणि मग त्याची व्यवस्थित, खरी आवृत्ती बाजारात विकत मिळते. आणि त्यात तर काय, मोझर बेयर ने अतिशय कमी किंमतीत पर्याय उपलब्ध करून दिला आहे त्याचा फायदा घेऊ. 'ब्लू', 'अजब प्रेम की गझब कहानी' आणि कालच पाहिलेला 'दे दना दन' हे चित्रपट मी दूरदर्शन वाहिन्यांवरच पाहिलेत. आणि आज नाही पाहिला तर आपल्याला तो सिनेमा पाठ होईपर्यंत त्या वाहिनीवर दिसत राहील याची सोय त्या वाहिन्या करत आहेतच की ;).

तर मग काय, आधी होत असल्याप्रमाणेच चित्रपटगृहात पाहणे आवडत असल्यास, परवडत असल्यास सिनेमा पहायला चित्रपटगृहात जा, नाही तर थोडे दिवसांनी घरी पहायला मिळेलच :)

जानेवारी ३१, २०१०

गेल्या रविवारी हरभर्‍याच्या झाडावर चढल्यानंतर आज झाडावरचा शेवटचा दिवस.

ब्लॉग माझाच्या पारितोषिक वितरणाचे चित्रीकरण गेल्या रविवारी झाले. आणि आत्ताच आलेल्या बातमीनुसार (फोन हो..) आज ३१जाने. २०१० ला रात्री ९:३० वाजता 'स्टार माझा' वर दाखवण्यात येणार आहे.

एपिसोड रेकॉर्ड करायचा प्रयत्न करेनच. झाल्यावर त्याचा दुवा ही देईन. पण थेट दूरदर्शनवर पहायला विसरू नका.

डिसेंबर ०४, २००९

साधारण २०-२१ वर्षांपूर्वी घेतलेल्या आमच्या कार टेप मध्ये एक बटण होते QPS नावाचे. त्याचे पूर्ण नाव तेव्हा तर माहित नव्हतेच. पण नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याचा उपयोग मी शोधून काढला. एखादे गाणे सुरू असताना हे बटण दाबून ठेवून जर कॅसेट पुढे ढकलली तर त्याचा उपयोग होतो. मला साधा कॅसेट प्लेयर व ह्या कार टेप प्लेयर मधील हा फरक का ते तेव्हापासून अजून नाही कळले. साध्या टेप मध्ये जर आम्ही गाणे वाजत असतानाच कॅसेट पुढे ढकलायचा प्रयत्न केला तर मोठे लोक म्हणायचे, 'असे नाही करायचे.  त्याने कॅसेट खराब होते.' मग ह्या कार टेप मध्ये त्यांनी ही सुविधा का दिली? 

तर ह्या QPS फायदा हा की ते बटण दाबून कॅसेट पुढे ढकलली की पुढच्या गाण्याला थांबायचे. ह्यामागचे तंत्रज्ञान नंतर कळले, माझ्या माहितीनुसार ते Quick Position Search होते. पुढील मोकळी जागा मिळाली की थांबायचे. त्यामुळे एखादे गाणे नाही आवडले की लगेच पुढच्या गाण्यावर जाता येत असे. अर्थात आता सीडी/डीव्हीडी मुळे हे खूप सोपे झाले आहे, तरी तेव्हा हे चांगलेच वाटायचे. पण एकदा काहीतरी बिघाड झाल्याने तो टेप दुरूस्तीला दिला होता त्यानंतर ती सुविधा नाही वापरता आली. :(

काही वेळा वाटते हाच नाही पण असाच प्रकार सध्याच्या दूरदर्शन संचामध्ये आला तर किती चांगले होईल. एखादा कार्यक्रम पाहताना जर जाहिराती चालू झाल्या की हे बटण दाबून दुसर्‍या वाहिन्या चाळायच्या. ह्या वाहिनीवरील जाहिरात संपली की लगेच आपोआप सुरू झालेला कार्यक्रम पाहता येईल :)

बहुतेक सर्वच दूरदर्शन संचामध्ये तरी वाहिन्या बदलत राहिले तरी आपण पाहत असलेला कार्यक्रम सुरू झालेला आहे की नाही पाहण्यासाठी मध्येच ती वाहिनी लावून पहावे लागते. पण आमच्या घरी, निदान मला तरी, ह्याचा तेवढा त्रास होत नाही. कारण आमच्या संचातील पी.आय.पी (PIP) तंत्रज्ञान. जाहिरात सुरू झाली की मी लगेच लहान खिडकीत दुसर्‍या वाहिन्या चाळायला लागतो. तसेच लहान खिडकीत सध्याची वाहिनी चालू ठेवून दुसर्‍या वाहिनीवर एखादा कार्यक्रम पाहता येतो. ह्याचा फायदा क्रिकेट सामना सुरू असतानाही होतो. लहान खिडकीत क्रिडा वाहिनी सुरू ठेवायची आणि सोबत आपला आवडता कार्यक्रम पहायचा. आणि हो, एक सिनेमा तर कोणी पूर्णपणे ह्याच खिडकीत पाहू शकतो, 'पुष्पक' ;)  त्या लहान दूरदर्शन खिडकीला आवाज नाही असे नाही. पण मग त्याला हेडफोन लावून बसावे लागते. तोही प्रकार केला आहे. घरातले सर्व एखादा कार्यक्रम पाहत असले की मी माझा आवडता सिनेमा किंवा कार्यक्रम लहान खिडकीत पाहत बसायचो.

असो, पण CAS च्या नियमानंतर किंवा मग डीटीएच घेतले की मग हा फायदा नाही घेता येणार. तेव्हा फक्त मग सीडी/डीव्हीडी प्लेयर लावून ठेवता येईल त्या खिडकीत.
तो नियम येईल तेव्हा येईल. तोपर्यंत ह्याचा फायदा घेत राहू.

सप्टेंबर २८, २००९

आज नेहमीप्रमाणे दूरदर्शन(संच) वर वाहिन्यांवरील कार्यक्रम चाळत असताना ४ वाजता दूरदर्शन(आता वाहिनी) च्या राष्ट्रीय वाहिनीवर 'दशावतार' सिनेमा दाखवत असल्याचे लक्षात आले. प्रमाणपत्रावर वर्ष होते २००८. कमल हासनचा 'दशावतारम' लक्षात होता. त्यामुळे पहायचे ठरविले.
सुरूवातीलाच लिहिले होते की त्यातील animation हे पुराणातील कथांवरून घेतलेले आहे. कमल हासनच्या 'अभय' मध्ये असे अ‍ॅनिमेशन दाखविल्याचे पाहिले होते. त्यामुळे वाटले की, ते इतिहास/संदर्भ दाखविण्याकरीता थोडावेळ असेल. अर्थात दाखविलेला भाग, त्याची चित्रांची कला चांगलीच होती. पण मी कमल हासनचा सिनेमा म्हणून पाहत होतो. १ तास झाला तरी अनिमेशन काही संपतच नव्हते. म्हटले काहीतरी गोंधळ झाला असेल. त्याआधी मध्येच येऊन IMDB वर वाचले की कमल हासनच्या सिनेमाचे हिंदी नाव 'दशावतार'च आहे.
पण असो, मी तर हा अ‍ॅनिमेशन सिनेमा पाहत होतो की पुढे काहीतरी असेल. पण २ तासांनी सिनेमा संपला तेव्हा कळले की हा पूर्णपणे वेगळा सिनेमा आहे. :D

सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रावर दोन तारखा असतात: जारी करने की तारीख (Issue Date), समाप्ती की तारीख (Expiry Date)
ह्यात १० वर्षांचा फरक असतो. म्हणजेच ते प्रमाणपत्र १० वर्षांपर्यव वैध असते. ह्याच बाबतीत असेही ऐकले होते की त्या १० वर्षांत त्या सिनेमाचे नाव पुन्हा कोणी वापरू शकत नाही.
तर मग दशावतार नावाचेच २ सिनेमे तेही एकाच वर्षात, एकाच दिवशी आलेत, म्हणजे हा नियम आता बहुधा नसेलही.

आणि वाचनात आल्याप्रमाणेच विष्णूने जवळपास २० अवतार घेतले होते. त्यातील १०च वापरून ’दशावतार’ बनविला आहे. ते ही दोनही सिनेमांत. त्याचीही मला गंमत वाटली.

असो, मी पाहिलेला हा सिनेमा तसा चांगला वाटला पहायला. पुराणकथेतील माहिती पुन्हा पहायला मिळाली.

इतर कोणी दोन्हीपैकी एखादा सिनेमा पाहिला आहे का? त्याबद्दल तुमचे काय मत आहे?

मार्च २७, २००९

"एक लहान मुलगा. आई सांगते, 'आज खेळणे बंद'. तो मुलगा दु:खी होऊन खिडकीबाहेर मित्रांना खेळताना पाहतो. हळूच एक वस्तू उचलून घराच्या बाहेर जातो. सर्वांपासून दूर जाऊन वडिलांना फोन लावतो. आणि सांगतो की, 'आई मला रागावली तुम्ही तिला रागवा.' ......."
ही जाहिरात बहुतेकांनी पाहिली असेलच. नसेल त्यांनी इथे पहावी.
इतक्या वर्षांत पाहिलेल्या लहान मुलांच्या जाहिरातींपैकी ही मला सर्वात जास्त आवडली. त्या लहान मुलाचा निरागस चेहरा, मित्रांना खेळताना पाहून चेहर्‍यावरचे दु:खी भाव, हळूच लपून बाहेर जाताना घेतलेली काळजी, तसेच आईने खेळायला जायची परवानगी दिल्यानंतर आईला बाबा रागावल्याचा वाटलेला आनंद आणि आपण केलेला फोन उपयोगी पडला ह्याचे आश्चर्य. सर्व वेगवेगळे भाव मला खूप आवडले. अरे हो, त्याचे पार्श्वसंगीतही छान आहे.
आणि सर्वात शेवटी सूत्रधाराचे वाक्य, 'आज एक विश्वास आहे की आपल्या लोकांपासून आपण दूर नाही.' जाहिरातीतून दाखवलेला मुलाचा विश्वास हेच सांगतो.
(पुढील वाक्य एअरटेलच्या नेटवर्क बद्दल सांगते, तो विश्वास कितपत खरा आहे तो वेगळ्या वादाचा विषय आहे ;) )
अर्थात एअरटेलच्या इतर जाहिराती ही चांगल्या होत्या. तसेच मुलांच्या इतर चांगल्या जाहिरातीही भरपूर आहेत. पण मला ही जाहिरात त्यातील आशय आणि त्या मुलामुळेच जास्त आवडली.

सप्टेंबर ११, २००८

नुकत्याच सुरू झालेल्या ’कलर्स’ वाहिनीवर नवीन चित्रपट दाखविण्याची जाहिरात बघितली (त्यावर एक-दोन चित्रपटही पाहिले), तेव्हा खूप दिवसांपासून मनात असलेले विचार पुन्हा समोर आले. हिंदी चित्रपट दाखविल्याशिवाय कोणतीही वाहिनी बहुधा तग धरू शकत नाही. जसे आम्ही वसतीगृहात राहत असताना एक मित्र खानावळीबद्दल बोलला होता की, बटाटे नसते तर ह्या मेस वाल्यांचे काय झाले असते? ;) आपल्याला ही सवय दूरदर्शनवर (वाहिनी बरं का, आधी ती एकच वाहिनी होती) हिंदी सिनेमे दाखवत होते तेव्हापासूनची. बहुधा त्यांना काही एवढी गरज नव्हती, पण लोकांची आवड म्हणून ते दाखवायचे.

त्याच आठवणीप्रमाणे, ह्या पुढच्या लिखाणात वाहिन्यांची फक्त हिंदी चित्रपटांची गरज नाही तर वाहिन्यांनी गरजेप्रमाणे काय काय बदल केलेले मला दिसले त्याचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. ह्यात कार्यक्रमांच्या दर्जाबद्दल काही विचार नाहीत. फक्त त्यांची सुरूवात काय होती व आता कसे आहेत त्याबद्दल जाणवलेले थोडेसे.

सर्वात आधी मला आठवते ते ’सब टीव्ही’. SAB अर्थात श्री अधिकारी ब्रदर्स. अधिकारी बंधूंनी आपली नवीन वाहिनी सुरू केली तेव्हा त्यावर वेगवेगळे कार्यक्रम दाखवायला सुरूवात केली होती. विनोदी, गंभीर, भावनाप्रधान. त्यांच्या स्वत:च्या एवढ्या मालिका होत्या की त्यांना वास्तविक नवीन मालिका बनवायचीच गरज नव्हती. जुन्या हिंदी मालिका पुन्हा दाखवून, मराठी मालिका हिंदीमधे अनुवाद करून आणि नवीन कार्यक्रम ही बनवून, त्यांनी ती वाहिनी सुरू ठेवली होती. नंतर त्याचा साचा बदलून सांगितले की, आम्ही फक्त विनोदी कार्यक्रमच दाखवू. ह्या एवढ्या प्रकारात चित्रपटांना त्यांनी पूर्ण वगळले होते असे नाही. हिंदी चित्रपटांतील गाणी दाखवत होते पण कधी हिंदी सिनेमा दाखविला नाही. पुढे काय झाले माहित नाही, ती वाहिनी 'सोनी'ने विकत घेतली आणि त्याचा साचा पूर्णत: बदलला. आता ती ही इतर वाहिन्यांप्रमाणेच वाटते. काही सोडून बाकी सारखेच कार्यक्रम आणि सिनेमा.

'झी स्माईल' ह्या वाहिनीच्या नावाप्रमाणेच त्यावर विनोदी कार्यक्रम असण्याची अपेक्षा होती. जेव्हा सुरू झाली तेव्हा नेमके आमच्याकडे दिसत नव्हती. मध्ये मध्ये इतर ठिकाणी पाहिली तर सुरू होते त्यावर विनोदी चित्रपट व कार्यक्रम. पण आता त्यावरही झी टीव्ही वरील आधीच दाखविलेले गैरविनोदी कार्यक्रमही दाखवतात. माझ्या माहितीप्रमाणे 'झी स्माईल' ही भारतातील पहिली २४ तास विनोदी कार्यक्रम दाखविणारी वाहिनी होती आणि बहुधा त्याच स्पर्धेत सोनीने नवीन वाहिनी न आणता आधीच चांगली चालू असलेली 'सब टीव्ही' वाहिनी आपल्याकडे वळवून घेतली. :)

'स्टार' ने आधी इंग्रजी वाहिन्याच आणल्या होत्या. पण त्यांनी जेव्हा 'स्टार प्लस' हिंदी मध्ये बदलविले तेव्हा दूरदर्शनवरील काही मालिका तिकडे वळत्या केल्या. नंतर दूरदर्शनने कांगावा केला की एकच मालिका दोन वाहिन्यांवर दाखवायची नाही. आणि म्हणून त्यांनी काही मालिका दाखविणे बंद केले. पण ते स्वत: ’सर्फ व्हील ऑफ फोर्च्य़ून ’ सोनीवर चालू असतानाही दूरदर्शनवरही दाखवत होते. ती बहुधा त्यांची गरज होती. :)

२००३ की २००४ मध्ये एका वृत्तपत्रात बातमी आली होती की ई टीव्ही चे मालक (मालकच आहेत ना ते?) श्री. रामोजी राव ह्यांनी घोषणा केली होती की ई टीव्हीच्या वाहिन्यांकरीता आम्ही कधीच शुल्क आकारणार नाही. पण फायदा दिसला म्हणून की खरंच गरज पडली म्हणून, त्यांनीही त्यांच्या वाहिन्या सशुल्क केल्या.
मी ऐकल्या/वाचल्याप्रमाणे भारतातील वाहिन्यांच्या शुल्क आकारण्याचे नियम आणि इतर काही देशांतील नियम ह्यांच्यात फरक आहे. सशुल्क वाहिनी असेल तर त्या वाहिनीवर जाहिराती दाखवता येत नाहीत. हे जर खरे असेल तर आपल्या देशात तो नियम लागू होऊ शकतो का? शकल्यास लागू व्हायला किती वर्षे वाट पहावी लागेल? ;) झाला तर खरोखरच सर्व वाहिन्यांचा चेहरामोहराच बदलून जाईल ;)

अरे हो, एक वाहिनी तर राहिलीच. ’स्टार गोल्ड’. ही चित्रपट वाहिनी सुरू केली तेव्हा त्यांची टॅगलाईन होती, "लौट आये बीते दिन". अर्थात ते जुने सिनेमे दाखविणार होते, जे त्यांनी काही काळ दाखविलेही. पण त्यांनीही शेवटी स्वत:चा साचा बदलून नवनवीन हिंदी सिनेमे दाखविणे सुरू केले.

वृत्तवाहिन्यांबद्दल काय लिहावे? बहुधा १९९७/९८ मध्ये झी टीव्ही च्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमात एकाने विचारले होते की, ’तुम्ही तुमच्या वाहिनीवर बातम्या का नाही दाखवत?’ तेव्हा त्याला उत्तर देण्यात आले होते की हे शक्य नाही आहे. पण दोन वर्षांतच त्यांनी नुसते काही वेळ बातम्या दाखविणेच सुरू नाही केले तर २४ तासाची वाहिनीच सुरू केली. आणि आज आपण तर पाहतच आहोत की किती वाहिन्या आल्या आहेत. ह्या सर्व वृत्तवाहिन्यांनीही आपला साचा नेहमी बदलवत आणला आहे. कुठवर नेतील कोणास ठाऊक :)

'सोनी' वर आधी क्रिकेट सामने दाखवित होते. पण मग त्यांनी 'मॅक्स' ही वाहिनी सुरू केली तीच क्रिकेट व हिंदी सिनेमांकरीता. त्यात तरी त्यांनी अजून बदल केला नाही. हो, पण त्यांना ती वाहिनी अपुरी पडते बहुधा. म्हणूनच 'सब टीव्ही' वरही सामने दाखविले जातात.

ह्या सर्व वाहिन्यांत काहीच वाहिन्या अजूनही जशा होत्या तशाच राहिल्यात. उदा. 'दूरदर्शन', 'डिस्कवरी'. त्यांच्या कार्यक्रम दाखविण्याच्या प्रकारात जास्त काही बदल झालेला नाही. डिस्कवरीवाल्यांना मी म्हणेन, तुम्ही बदलू नका, आणि दूरदर्शनवाल्यांना सांगेन, थोडे बदला.

गेल्या महिन्यापासून पाहत आहे की HBO वर इंग्रजी सिनेमे हिंदीत अनुवाद करून दाखवत आहेत, सोबत खाली इंग्रजी सब-टायटल्स. म्हणजे, HBO ही बदलत आहे की काय?

जुलै २७, २००८

शाहरूख खान शिक्षक असलेल्या ’क्या आप पांचवी पास से तेज हैं’ ची आज सांगता झाली.
त्याची सुरूवात आणि शेवट दोन्ही, नाही हो, एकंदरीत पूर्ण कार्यक्रम मला तरी आवडला. सुरूवात ह्यासाठी की त्यांनी केलेला प्रचार किंवा जाहिरातबाजी, आणि मुख्यत्वे काहीतरी वेगळा व माहितीदर्शक कार्यक्रम.(नाहीतर काय, त्यातील किती प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत होती?) ह्या कार्यक्रमाआधी दररोज रात्री आठ वाजता शाळेची घंटी वाजवायचे. तसेच बहुतेक काय सर्वच कार्यक्रमाच्या मध्ये त्याची जाहिरात. आणि कार्यक्रम सुरू झाला त्यादिवशी ’स्टार’ ने पहिले पाच मिनिटे त्यांच्या सर्व वाहिन्यांवर तो कार्यक्रम दाखविला होता. जेणेकरून सर्वांना कळेल की हा कार्यक्रम सुरू झाला आहे. ह्या जाहिरातबाजीबद्दल सविस्तर नंतर कधीतरी.
शेवट ह्यासाठी नाही आवडला की तो कार्यक्रम संपला. संपल्याने काही खास दु:ख किंवा आनंदही नाही झाला. तो कार्यक्रम चालू असताना बघायला तरी आवडायचे. त्यामागचे कारण मग त्यातील प्रश्न असो की शाहरूख खान असो नक्की माहीत नाही.
पण, तर आजचा भाग तरी ’लालू प्रसाद यादव’ ह्यांच्या प्रतिसादामुळे चांगला वाटला. त्यात येते त्यांची बोलण्याची शैली, लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची तर्‍हा आणि ५वी पर्यंतच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा आत्मविश्वास वगैरे सर्व. आणि सर्व उत्तरे अचूक, तपशिलासकट. त्यामु़ळे ते एक कोटी रूपये जिंकले. अर्थात एक करोड जिंकणारे ते पहिले नव्हते. ह्या आधी कॉग्निजंट कंपनीची एक मुलगी १ कोटी रुपये जिंकली होती. पण त्यात त्यातील मुलांचाही हातभार होता. पण आज एकही 'चीट' न वापरता एक करोड. :) (आता ते प्रश्न सिद्धार्थ बासूंनी कसे निवडले तो माझा प्रश्न नाही.)

असो, सध्या तरी त्याला त्यांनी अर्धविराम (किंवा स्वल्पविराम) सांगितला आहे. आताही ती शाळा पूर्ण अशी चालली नाहीच, त्यामुळे पुढे तो कार्यक्रम पुन्हा सुरू होतो की नाही ते 'स्टार' ला माहित आणि त्यामुळे पुन्हा तो कार्यक्रम किती चालतो ते......

.... बघूया.

जुलै ०८, २००८

सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते.

मग एन डी टी व्ही इमॅजिन ने नवीन 'रामायण' आणले. निर्माते जुन्या रामायणचेच. सागर आर्ट्स. त्यामुळे लोकांच्या थोडाफार अपेक्षा असतीलच. त्यात त्यांनी वेळ निवडली प्राईम टाईमची. नक्की माहित नाही पण एका ठिकाणी वाचल्याप्रमाणे, एनडीटीव्ही ला त्याचा फायदा झाला. (जरी लोक आय़ पी एलचे सामने जास्त बघत होते तरी त्यांना तेवढे नुकसान झाले नाही.)

आमच्या घरी रामायण पाहणे सुरू असते. सुरूवातीला तसे बरे वाटले. अजूनही बरेच चांगले सूरू आहे. तरीही जुन्या रामायण मालिकेसोबत तुलना होणे स्वाभाविकच आहे. त्यात स्टार उत्सव वर ती जुनी मालिका दाखवित आहेत. मग तर काय संध्याकाळी जुने रामायण, रात्री नवीन रामायण. आता ह्यात जास्त तुलना होते ती कलाकारांच्या अभिनयाची, सादरीकरणाची. नवीन रामायणात मला सुरूवातीला तरी थोडा तजेलदारपणा वाटला. नवीन वाहिनी, नवीन कलाकार, नवीन तंत्रज्ञान. ह्याचा फरक तर दिसणारच. पण ह्यात राण्यांचा पेहराव, त्यांचे थोडेफार वागणे ह्यात सांस बहू मालिकांचा प्रभाव दिसत होता. मग पुढे दिसू लागला संगणकीय प्रभाव. हे मान्य आहे की ह्यात राक्षस, बाणांचा वर्षाव वगैरे आणि भरपूर गोष्टी प्रत्यक्षात दाखवू शकत नाही, तेव्हा त्यामागे स्पेशल इफ़ेक्ट्स वापरावे लागतात. पण इतर ठिकाणी तो जिवंतपणा वाटत नाही आहे. राजा दशरथाचा महाल बाहेरून दाखविण्यात संगणकाचा वापर जास्त केला असे दिसून येते. संध्याकाळचे राजमहालाचे दृष्य पाहताना त्याची जाणीव होते. इतरही वेळा वाटते की काहीतरी कृत्रिम दाखवण्यात येत आहे.

मग सुरू झाले 9x वाहिनीवर महाभारत सुरू होण्याचे वारे. गेले २ महिने रणभूमी, गदा, धनुष्य वगैरे दाखवून महाभारतातील एक एक गोष्टी समोर आणत त्याची जाहिरात दाखवत होते. त्या जाहिराती बघतानाही जाणवत होते की ह्यात थोडी अंधाराची छटा आहे. इथेही कृत्रिमतेचा भास होत होता. म्हटले पाहूया ह्यात काय आहे ते? काल परवा ह्याची नवीन जाहिरात पाहिली तेव्हा वाटले की हे पूर्ण फिल्मी प्रकारात चित्रीत केले आहे. आज कालचे नायक/खलनायक ज्याप्रमाणे दिसतात त्याप्रमाणे ती पात्रे दिसत होती.

आज रात्री ९ वाजता महाभारत दाखविणे सुरू झाले. सुरूवातीलाच धर्मराज खेळात हरलेला दाखविला. दुर्योधन सांगतो की द्रौपदीला घेउन ये. हे सर्व पाहत असताना मला वाटले की मी संगणकावर एखादा नवीन गेम बघत आहे. तेच स्पेशल इफेक्ट्स. ह्यात प्रजा दाखविली ती पूर्णत: संगणक निर्मित. मागील महालही तसाच वाटला. मग दुशासन द्रौपदीला आणायला जाताना दाखविला. पूर्णत: कृत्रिम माणूस. चेहयावरील भाव काहीच प्रभाव पाडत नाहीत. महालातील दासी तशाच. त्याआधी बाहेर युधिष्ठिर दाखवला होता. त्याला पाहताना मला राम गोपाल वर्माच्या ’कंपनी ’ मधील चंदू (विवेक ओबेराय)ची झलक दिसली. त्यात भर पाडली ती पार्श्वसंगीताने. ’सरकार’ मधील पार्श्वसंगीत जसे आहे तसेच. मला वाटले थोड्या वेळाने ’गोविंदा गोविंदा’ही सुरू होईल व द्रौपदीला वाचवायला कृष्ण आला आहे असे दाखवतील. पण आमच्या मातोश्रींना दुसरी मालिका पहायची होती म्हणून मग वाहिनी बदलण्यात आली.

तर हे सांगण्याचा उद्देश हाच की आता पौराणिक कथा पुन्हा तयार करून दाखवत आहेत हे कौतुकास्पद आहे. पण ते पाहताना आपण रामायण/महाभारत, राम/कृष्ण पाहत आहोत हे जाणविले पाहिजे. सध्या तरी रामायणामध्ये ते थोडेभार दिसते. पण नवीन महाभारताच्या पहिल्या दहा मिनिटांतच मला वाटले की ह्यात काहीतरी कमी आहे. कितपत चांगले वाटते ते बघू.

जमल्यास थोडी आणखी वाट पाहूया. २१ जुलै पासून नवीन वाहिनी ’कलर्स’ वर श्रीकृष्णावर (की बालकृष्णावर) मालिका येत आहे. ह्याच्या जाहिरातीही सुरू आहेत. त्यात तरी हा कृत्रिमपणा जाणवत नाही. खरं काय ते मालिका सुरू झाल्यावरच कळेल.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter