भ्रमणध्वनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भ्रमणध्वनी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

फेब्रुवारी ०१, २०१६

सुमारे ५ वर्षांपूर्वी मी भ्रमणध्वनीच्या पेट्रोलपंपावरील वापराबद्दल लिहिले होते. त्यानंतर प्रतिक्रियेत केदार यांनी दिलेली माहिती आणि इतर ठिकाणी वाचल्याप्रमाणे भ्रमणध्वनीचा वापर केल्याने धोका नसतो असे ऐकले/वाचले. पण म्हणून मी तेथे भ्रमणध्वनी वापरणे सुरू केले नाही.


आता ५ वर्षांत काही सुधारणाही झाल्या असतील. पण तेथील पेट्रोलची वाफ आणि ठिणगी ह्यांमुळे धोका आहेच. त्यात आता क्रेडीट/डेबिट कार्डचा जास्त वापर केला जात आहे, म्हणून त्यांची यंत्रेसुद्धा तिथेच ठेवली असतात. भ्रमणध्वनीच्या बटनांमुळे ठिणगी उत्पन्न होऊ शकते तशी ह्या मशीनच्या वापरामुळेही ठिणगी उत्पन्न होऊ शकते असा एक संशय आला होता आणि आता ते यंत्र वायर ने न जोडता जीपीआरएस ह्या तंत्रज्ञानानेही (ज्याचा 2G इंटरनेट सेवेकरीता वापर केला जातो) जोडले आहेत. त्यामुळे आधी लोकांना पेट्रोलपंपावर भ्रमणध्वनी न वापरण्याकरीता ज्या गोष्टींची भीती दाखविली जात होती, त्या आता पेट्रोलपंप चालकांकडूनच वापरल्या जात आहेत असे दिसते. म्हणजेच जे काही म्हटले जात होते ते खरोखरच भ्रम होते किंवा आता सर्व लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

असो. जसे मी आधी म्हटले त्याप्रमाणे, मी पेट्रोलपंपावर भ्रमणध्वनी वापरणार नाही. निदान तसा फलक लावला असेल तोपर्यंत तरी.

मार्च २६, २०११


काही दिवसांपूर्वी मी रस्त्यावर पाहिलेल्या नगांविषयी लिहिले होते. त्यात एक होते पेट्रोलपंपासमोर फटाके लावणारे. तसाच एक प्रकार आहे भ्रमणध्वनी (मोबाईल) वापरणार्‍यांचा.

आजकाल लोकांना भ्रमणध्वनी वापरण्याची एवढी सवय झालीय की गाडी चालवताना संच वाजला आणि तो वापरला नाही तर आपला नंबर बंद करून टाकतील की काय अशी त्यांना भीती असावी बहुधा. एका हातात भ्रमणध्वनी ठेवून अर्धे लक्ष त्यात व अर्धे समोर ठेवून कार/दुचाकी चालविणारे, मान तिरकी करून कान आणि खांद्याच्या मध्ये संच अडकवून दुचाकी चालविणारे सगळीकडेच दिसतात. पेट्रोलपंपावर असतानाही रांगेत वाट पाहत फोन लावत राहणे चालूच असते. मग समोर पेट्रोलपंप चालकाने मोठा फलक लावला असेल तरी त्याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले जाते.


मी तर जमेल तेव्हा भ्रमणध्वनी संच बंद करूनच पेट्रोलपंपवर जातो. किंवा नाहीच जमले तर वापरणे टाळतो. ह्यामागची ऐकलेली कारणे म्हणजे:
  1. भ्रमणध्वनीमध्ये वापरताना त्याच्या कळफलकांमध्ये ठिणगी पडणे बहुतेक वेळा होत असते. आणि पेट्रोलपंपवर पेट्रोल/डिझेल ची वाफ तरंगत असते. त्या ठिणगीमुळे वाफ पेटू शकते.
  2. मोबाईलच्या लहरींच्या उत्सर्गामुळे पेट्रोल मध्ये आग लागू शकते.
  3. आणि त्यांनी सांगितले आहे म्हणून ;) (त्यांनी म्हणजे भ्रमणध्वनी बनविणारे आणि पेट्रोलपंप चालक)
  4. इतरही  कारणे आहेत.
ह्यातील पहिले कारण लगेच पटते. दुसर्‍या कारणाचे म्हणायचे तर मोबाईलचे एवढे टॉवर लावून ठेवले आहेत जागोजागी. त्यांतील लहरींच्या उत्सर्गाच्या आसपास तर मग एकही पेट्रोलपंप नको. पण ते कितपत जोखमीचे आहे माहित नाही.

आणि आणखी एक प्रश्न मला पडायचा, पेट्रोलपंपापासून किती अंतरापर्यंत भ्रमणध्वनी वापरायचा नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर मला गेल्या शनिवारी मिळाले, पेट्रोलपंपवरच. गाडीत हवा भरण्यासाठी पेट्रोलपंपवर गेलो होतो. तिकडे रांगेत गाडी लावून होतो. उजव्या बाजूला एक मुलगी दुचाकीवर बसून भ्रमणध्वनी वापरायचा प्रयत्न करत होती. तिला मी आठवण करून दिली की इकडे भ्रमणध्वनी वापरू नये. तिने ऐकून लगेच संच ठेवून दिला. (लगेच ऐकणारी माणसेही भेटतात हो. उगाच लोक ऐकत नाहीत असे नको म्हणायला ना? ;) )
आणखी वेळ लागणार होता. तेवढ्यात पाहिले की त्या पेट्रोलपंपाचा व्यवस्थापक (की मालक?) भ्रमणध्वनीवर बोलत उभा आहे. त्याला सांगितले, "दादा, इकडे लोकांना आपण सांगतो की पेट्रोलपंपवर मोबाईल वापरू नका आणि तुम्हीच वापरताय." तो म्हणाला," हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण म्हणूनच मी बाहेर येऊन बोलतोय." मी: " म्हणजे? कुठे बाहेर?" तेव्हा त्याने सांगितले की, "आपण पेट्रोल भरतो तिकडे वर जे छत बनविले असते त्याखाली भ्रमणध्वनी वापरणे धोक्याचे आहे. त्या भागात पेट्रोलची वाफ असते. आणि तिकडे अडचण येऊ शकते. " (त्या छताला काहीतरी नाव सांगितले ते मी विसरलो) मी म्हणालो," हो ते वाफेबद्दल माहित होते पण क्षेत्रफळाबद्दल माहित नव्हते." तो म्हणाला," तुम्ही केले ते ठीकच आहे. क्वचितच लोक असे करताना दिसतात"

माझ्या वागण्याबद्दलचे जाऊ द्या. पण ही माहिती माझ्या करीता नवीनच होती किंवा माझी आधीची माहिती बरोबर असली तरी अपूर्ण होती असेच म्हणावे लागेल. पण तरीही एक प्रश्न पडलाय, जाणकारांनी उत्तर द्यावे. पेट्रोलची (किंवा इतरही असल्याने इंधनाची) वाफ फक्त त्या क्षेत्रफळातच राहील का? ती आसपास पसरण्याची शक्यता नाही का?

डिसेंबर ०९, २०१०

साधारण २००६ पासून ऐकण्यात असलेली ’मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी’ सुविधा अखेर २५ नोव्हें २०१० पासून हरियाणामध्ये सुरू झाली. इतर भागांत ती २० जाने २०११ पासून सुरू होईल अशा बातम्या आहेत.

मी ह्या ४ वर्षांत ३ क्रमांक बदलले. पण ह्या सुविधेचा मला फायदा झाला नसता, कारण माझे शहर आणि मोबाईलचे क्षेत्र ह्यांतच बदल होत गेला. आणि सध्यातरी ह्या सेवादात्याकडून एकदम बदलूनच टाकावे अशी काही वाईट सेवा नाही. तरीही ही सुविधा नेमकी कशाप्रकारे वापरता येईल हे पहायचा प्रयत्न केला. त्यात मिळालेली चांगली माहिती तुम्हालाही सांगावी असे वाटले.


मराठीमध्ये तरी ह्याबाबतची माहिती मला मटाच्या संकेतस्थळावरच मिळाली. त्यासोबतच इतरत्र आणखी माहिती शोधायचा प्रयत्न केला.


दूरसंचार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अर्थातच सर्व सूचना/माहिती आहेच. पण बहुतेक वेळा ती आपल्यासारख्या सर्वांना समजण्यासारख्या सोप्या भाषेत नसते. पण तिकडे पाहिल्यावर भरपूर कळण्यासारखे वाटले ;).


त्या सर्व माहिती/नियम पुस्तिकांचे दुवे.

    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/87/Backgroundnote.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/87/draftregulation30june09.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/89/Regulation23sep09.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/90/Regulation20nov09.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/91/MNPRegulation_amendment28jan10.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/97/MNP_Regulation24nov10.pdf


"मलेशियामध्ये सध्या ही सेवा सुरू असून तेथे अॅक्टीव्हेशन आणि डीअॅक्टिव्हेशनमध्येच अडथळे येत आहेत. त्यामुळेच तेथे ही सेवा यशस्वी झालेली नसल्याचे टेलिकॉम क्षेत्रात ऑडिट आणि सल्लागाराची जबाबदारी पेलत असलेले केपीएमजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रोमाल शेट्टी सांगतात."
मटावरील ह्या वाक्यामुळे असे वाटले की फक्त मलेशियातच ही सुविधा सुरू आहे. पण अमेरिका आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया वगैरे देशांमध्येही सुविधा आहे असे ऐकून होते. त्यामुळे संभ्रम झाला. पण मग विकिपिडियावर त्याबाबत दिलेल्या माहितीप्रमाणे ५० पेक्षा अधिक देशांनी आधीच ही सुविधा सुरू केली आहे. विकिपिडियावर अर्थातच नेहमीप्रमाणे सुरेख माहिती दिली आहे.

त्यातूनच मग मला दुसर्‍या संकेतस्थळाचा दुवा मिळाला, जिथे भारतातील मोबाईल नंबर पोर्टेबिलीटीबाबत माहिती आणि सर्वसाधारण किंवा नेहमी पडणार्‍या प्रश्नांची  उत्तरे दिली आहेत.


मटावर तर मुद्देसूद माहिती दिलेलीच आहे. तरीही ज्या काही गोष्टी लिहिल्या नाहीत त्या म्हणजे.

    * सुविधा घेण्याकरीता PORT < NUMBER > असा एसएमएस १९०० ह्या क्रमांकावर पाठवायचा आहे. उदा. PORT 9812345678
    * जुन्या प्रिपेड कार्डची उरलेली रक्कम नवीन कार्डवर नेता येणार नाही.
    * जुन्या कंपनीचे सिम कार्ड नवीन कंपनीच्या क्रमांकावर वापरता येणार नाही. नवीन कंपनीचे सिम कार्डच वापरावे लागेल.

सुरूवातीला असे वाटत होते की पोर्टेबिलीटीचा दर एवढा नको आणि प्रक्रिया अशी किचकट नको की त्यापेक्षा ती सुविधा न घेणेच बरे. पण प्रक्रिया ही सोपी आहे आणि दूरसंचार मंत्रालयाच्या पुस्तिकेत दिल्याप्रमाणे १९ रू हा दर खालील प्रमाणे ठरविण्यात आला आहे.

तपशील
एकक
रक्कम
एकूण खर्च
दशलक्ष रू
२३२०.४७
सरासरी सेवादाता बदल (पोर्टींग)
दशलक्ष  
१२३.२६
प्रत्येक बदलाचा खर्च  
रू.
१८.८३
लायसन्स फी @१%
रू.
०.१९
प्रत्येक बदलास एकूण खर्च
रू.
१९.०२
जवळील ठोकळ संख्येत खर्च
रू.
१९.००


म्हणजे १२३ दशलक्ष क्रमांकांचे लोक स्वत:च्या सेवादात्यावर खुष नाहीत/नसतील. तरीही सेवादाता आपली सुविधा सुधारण्यास तयार नव्हते?

सध्यातरी एवढी माहिती पुरे. आपल्या भागात ही सुविधा सुरू करेपर्यंत ह्या प्रक्रियेत बदल न करोत अशी आशा. :)


नोव्हेंबर २४, २०१०

काल दुपारी भ्रमणध्वनी वाजला. पलिकडून आवाज आला, " सर, मैं xxxx बात कर रहा हूं आयडियासे. एक स्कीम के बारे में बताना है." मला तेव्हा काही बोलायची इच्छा नव्हती म्हणून "कोणतीही स्कीम नाही पाहिजे" असे म्हणालो. तो म्हणाला, "सर, स्कीम क्या हैं सुन तो लिजिये". दोन तीन दिवसांपूर्वीच जाहिरातीत पाहिल्याप्रमाणे नंबर पोर्टेबिलिटीची नवीन सुविधा देण्याबाबत असेल असे वाटले. इच्छा नव्हती, तरीही मग म्हणालो,"ठीक आहे. मराठीत सांगत असशील तर ऐकतो." त्याने अं अं केले आणि काही न बोलता फोन बंद केला.

पुन्हा मनात विचार आले, ह्या आयडिया वाल्यांचीच जाहिरात आहे "बोलने के लिये भाषा की जरूरत नहीं पडती", मग आता वापरायची होती की ती युक्ती. :)

ती जाहिरात काहीही असो, आणि कोणीतरी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रात सर्व भाषा दिल्यात असेही असेल. पण मला ती जाहिरात राज ठाकरेंना टोमणा म्हणून वापरली आहे असेच वाटत आलेय. आधीही त्यांनी अशीच जाहिरात बनविली होती. राज ठाकरेनी अमिताभ बच्चनना हिंदी मराठी भाषेवरून काही म्हटले. अभिषेक बच्चन ने आयडियाच्या जाहिरातीतून त्याला उत्तर दिले. हे म्हणजे पेप्सी, कोका कोला आणि थम्सअप सोबत स्प्राईट च्या जाहिरातबाजीप्रमाणे वाटले. पेप्सीने थप्सअपच्या जाहिरातीचे विडंबन करीत नवीन जाहिरात बनविली. मग कोकाकोलाने पेप्सीच्या जाहिरातीचे विडंबन केले. आणि मग स्प्राईटने त्या सर्वांवर वरचढ बनायचा प्रयत्न केला.

पुन्हा भाषेच्या मुद्यावर येऊ. त्यांची जाहिरात खरोखर विचार करण्यासारखी वाटते. पण मग असेही वाटते की त्यांच्या ''बोलने के लिये भाषा की जरूरत नही पडती" असे म्हणण्याचा खरंच फरक पडतो का? शेवटी भाषेने फरक पडेलच. मी इथे सध्या तरी जमेल तिथे मराठी भाषा वापरायचा प्रयत्न करत असतो. एटीएम, दुकान, फोन वगैरे वगैरे. पण इतके वर्षांपासून कोणाशी ज्या भाषेत बोलत आलोय सवयीने त्याच भाषेत बोलणे होते. आणि ती भाषा मराठी नसल्यास हिंदीच असते :)

असो,

आता शुक्रवारीच माझ्या मोबाईल वर एक कॉल आला माझ्या सेवादात्याकडून. मुंबईत नोंदणी असलेल्या क्रमांकावर मुंबईतील क्रमांक एकचा सेवा दाता बनविल्याबद्दल हे लोक गुजराती मध्ये बोलून आभार प्रदर्शित करीत होते. आता ह्यांना काय म्हणावे? पुन्हा ते ही म्हणायचे, "भाषा काय घेऊन बसलात. भावना महत्त्वाच्या." :)

जानेवारी २३, २०१०

blog.aarp.org/shaarpsession/traffic.jpg
http://www.newsandreviews.in/media/blogs/Home/mumbai%20traffic.jpg

शुक्रवारी दुपारी कार्यालयात सहकाऱ्यांसोबत बोलत होतो. पहिले प्रकाशचित्र दाखवून मी म्हणालो,"मला ह्या लोकांचा हेवा वाटतो. एवढी गर्दीची वाहतूक असूनही हे लोक किती नियमबद्ध पद्धतीने गाड्या उभ्या करतात. नाहीतर, आपल्याकडे कशीही गाडी दामटली जाते." नंतर मग नेहमीचीच चर्चा. हे असे वागतात, ते तसे वागतात.

संध्याकाळी आईचा फोन आला की माझा मावसभाऊ घरी आला आहे. मी म्हटले, "ठीक आहे मी सहा वाजता निघेन. ७:१५ पर्यंत पोहोचतो". पण कसले काय. दुपारी जी चर्चा केली तीचेच रूप समोर दिसत होते. नेहमी ज्या प्रवासाला २० मिनिटे लागतील त्याला ६०-६५ मिनिटे लागली. कारणही तेच, वाहतुकीची गर्दी. नेमके कारण कळले नाही. बहुधा मध्य रेल्वे वरील मोटरमननी केलेल्या संपामुळे वाहतुकीवर ताण वाढला असेल. पण त्या गर्दीत लोक कसेही(काही लोक कसेतरी) गाड्या चालवत होते. इकडून ही गाडी घुसव. तिकडून ती गाडी मध्येच आली. मग आमच्या वाहनचालकाचे नेहमीप्रमाणे दुसऱ्यांवर ओरडणे. घरी पोहोचायला ८ वाजले. तरी बरे, आठच वाजले. आमची गाडी पूर्व दृतगती मार्गावर गाडी येण्यास जेवढा वेळ लागला, त्यावरून तर वाटले होते की ९ वाजतील. काय पण योग(की योगायोग) असतात ना?

पण खरोखरच, नेहमीच्या ह्या वाहतुकीच्या त्रासामुळे वैताग येतो. अर्थात गाड्यांची संख्या भरमसाट वाढली हे खरे आहे. जागेची कमी आहे हे ही मान्य. पण तरीही काहीतरी शिस्त पाळायची? तीन गाड्यांच्या लेन आहेत पण त्यात चार-पाच गाड्या चालतात. दहा पंधरा वर्षांपूर्वी चंद्रपूर-नागपूर मधील आमचे नातेवाईक म्हणायचे की, मुंबईचा वाहनचालक नागपुरात गाडी नाही चालवू शकत. कारण तिकडे कशाही गाड्या चालवतात आणि तिकडचा चालक मुंबईत गाडी नाही चालवू शकत, कारण इकडे शिस्तीत गाडी चालवतात ज्याची त्याला सवय नाही. पण गेल्या ३-४ वर्षांपासून वाटते की इकडची शिस्तही गेली आहे. मी असे म्हणत नाही की सर्वच बेशिस्त आहेत. पण काही लोकांमुळे सर्वच वाट लागते.

आता काही गोष्टी बघा ना.

गेल्या आठवड्यात, कार्यालयातून निघालो. बसमध्ये गर्दी खूप. म्हणून रिक्षाने येत होतो. (मी सार्वजनिक वाहतूक वापरली नाही मान्य. पण त्यावर वाद नंतर घालू ;) ) सीप्झ पासून पुढे एल एंड टी च्या पुलापर्यंत यायला दहा मिनिटे लागायची तिकडे ३० मिनिटे लागली. गाड्या रेंगाळत पुढे चालल्या होत्या. पुढे पोहोचलो तर बघितले, एक ट्रक चालक ट्रक उभा करून कोणाची तरी वाट पाहत होता. त्यामुळे त्याच्या बाजून एकाच गाडी पुढे जाऊ शकत होती. अरे त्याला गाडी उभी करायला दुसरी जागा नव्हती का?
माझा रिक्षाचालक म्हणाला, "दोन दिवसांपूर्वीही तिकडेच कुठेतरी एक रिक्षाचालक लघुशंकेसाठी म्हणून थांबला तर त्याने रिक्षा डाव्या बाजूला नाही, उजव्या बाजूला उभी केली होती." :|

२००७ मध्ये वाशी वरून ठाण्याला येत असताना ऐरोलीजवळ वाहतुकीची कोंडी झाली होती. गाड्या एकदम हळू हळू जात होत्या. आम्ही कसे तरी तेथे पोहोचलो तर दिसले की, एक मोठा ट्रक वळण घेत होता पण नीट जमले नसल्याने तो हळू हळू प्रयत्न करत होता पण त्याच्या बाजूने इतर वाहने पुढे जायच्या प्रयत्नात कोंडी वाढवत होते. आम्ही ट्रकच्या पुढे गेलो तर पाहिले दोन वाहतूक पोलीस कोणातरी दुचाकीस्वारासोबत बोलत उभे होते. म्हटले वा, इकडे त्यांच्या मागे वाहतूक नीट चालत नाही आणि हे लोक गप्पा मारण्यात गुंग आहेत.

बरं
, ठीक आहे. वाहनात काही बिघाड झाला म्हणून गाडी बाजूला घेण्यात वेळ गेला किंवा नाही जमले तर हा घोळ होऊ शकतो. पण काही जण तर अशा गर्वात असतात की आपल्याकडे गाडी आहे म्हणजे माझ्या समोरचा रस्ता मोकळा पाहिजे. नाही तर जमेल तशी गाडी दोन तीन लेन मधून घुसवायचा प्रयत्न करणार. त्यात गाड्यांचा प्रेमालाप झाला तर आपणहून मग दुसऱ्या गाडीच्या वाहनचालकाशी गळाभेट करणार. ह्यात मागे वाहतुकीची वाट लागली आहे हे त्यांच्या गावी नसते. हम्म.. असेही ऐकले की काही टक्कर वगैरे झाली तर विम्याकरीता त्यांचे प्रतिनिधी येईपर्यंत त्या गाड्या तशाच ठेवाव्यात. तेव्हा वाहतुकीचे काय होईल असा विचार येतो.

काही लोक भ्रमणध्वनीवर गप्पा मारत गाडी चालवतात. त्यामुळे त्यांची गाडी मधल्या रस्त्यामध्ये हळू जातेय की नीट जात नाही ह्याकडे त्यांचे लक्ष नाही. पुन्हा त्यांना काही म्हटले की आपल्यालाच खत्रूड नजरेने पाहणार. वाहतूक खात्याने नियम बनवलेत की गाडी चालवताना भ्रमणध्वनी वापरायचा नाही. पण तेच ह्याकडे लक्ष देत नाहीत. पुण्यात माझ्या समोरील गाडीत एका माणूस भ्रमणध्वनीवर बोलता बोलता गाडी हळू नेत होता. नेऊ दे म्हणा हळू पण लोकांना त्रास का? कडे कडेने जा की. आणि ते ही सिग्नलच्या जवळच. तिकडे उभ्या असलेल्या दोन पोलिसांसमोरून तो निघून गेला. मग मी त्या पोलिसांना विचारले की, 'त्याला अडवले की नाही?' ते म्हणाले,'आमचे लक्ष नव्हते. तू त्याचा गाडीचा नंबर दे आम्हाला'. मी म्हटले, 'ठीक आहे. तुम्ही लक्ष नकाच देऊ. आता पुढे दिसला तर पाठवतो मी त्याला मागे.'

भरपूर ठिकाणी गाड्या उभ्या करण्यास बंदी असते. तरी काही लोक गाड्या उभ्या करून जातात. दुचाकी असली तर ती उचलून नेली जाते. पण चारचाकी असली तर त्याला भला मोठा 'जॅमर' लावला जातो. त्यांच्याकडे चारचाकी गाड्या ठेवायला जागा नसते हे मान्य. पण तिकडेच त्यांना जॅम करून वाहतूकीची कोंडी वाढली जाते असे मला वाटते. आणि रस्त्याच्या बाजूला हे लोक जेव्हा पार्किंग लाईट लावून एखाद्याची वाट पाहत उभे असतात, तेव्हाही त्यांना काहीच केले जात नाही.

अजूनही भरपूर गोष्टी आहेत ज्यामुळे ह्या वाहतुकीचा वैताग येतो. पण काय करणार, ह्यातून जावेच लागणार. पुण्याला असताना एक विचार मनात आला होता. थंड पाण्याने आंघोळ करायचे म्हटले तर आपली जी स्थिती असते, तीच नाही पण, तशीच ही स्थिती आहे. सुरुवातीचे एक दोन लोटे पाणी थंड वाटते, नकोसे वाटते. पण नंतर मग पूर्ण बादली आपण संपवितो. त्याप्रमाणेच ह्या वाहतुकीत शिरायचे म्हणजे वैताग वाटतो, पण एकदा त्यात घुसले की मग आपली गाडी अंतिम स्थानापर्यंत पोहोचवतो.

ता. क. : दोन्ही चित्रे आंतरजालावरून साभार. पहिले चित्र तेच ज्यावरून चर्चा सुरु झाली. दुसरे चित्र शोधताना कळले, माझ्यासारखेच बहुतेक लोकांनी लिहून ठेवले आहे. :)

[जमल्यास अशाच आणखी वैतागांबद्दल नंतरही लिहेन.]

सप्टेंबर २८, २००९

गेले काही महिने, खरं तर फेब्रुवारी ०९ पासून, आपल्याला येणार्‍या बँक किंवा विक्रेत्यांच्या मोबाईल लघु संदेशात पाठवणार्‍याच्या नावात २ ठराविक प्रकारची अक्षरे देऊन मग पाठवणार्‍याचे नाव लिहिले असते. एवढा अंदाज होता की TRAI च्या आदेशानुसार सर्व कंपन्यांना असे करणे बंधनकारक असेल. पण त्या अक्षरांचे अर्थ कळत नव्हते. मला आलेल्या संदेशांमध्ये मुख्य:त्वे TM, TA असे लिहिलेले असायचे. त्याचा मी लावलेला अर्थ TM=Telemarketing आणि TA=Transaction Alert असा होता. :D लवकरच, नंतर आलेल्या विविध संदेशांमधून, कळले की मी काढलेले अर्थ चुकीचे आहेत. पण कामात व्यग्र असल्याने नंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही.

जून मध्ये थोडाफार शोध घेतल्यावर कळले की , TRAI ने सांगितल्याप्रमाणे अयाचित व्यापारविषयक लघुसंदेशांमध्ये (Unsolicited Commercial SMS) ही दोन अक्षरे लिहिणे गरजेचे आहेत. त्या दोन अक्षरांमधील पहिले अक्षर हे संदेश पाठवणार्‍या कंपनीकरीता ठरविलेले संकेताक्षर व दुसरे अक्षर हे ते सेवा देत असलेल्या विभागाकरीता ठरलेले संकेताक्षर आहे.

आता पुन्हा लिहिण्याकरीता वेळ मिळाल्यानंतर ह्याकरीता वापरण्यात येणार्‍या दोन संकेताक्षरांची माहिती मी येथे देत आहे. ह्याचे स्त्रोत आणि अधिक/पूर्ण माहिती येथे मिळेल.

मोबाईल कंपन्यांची यादी
कंपनीसंकेताक्षर
एअरसेल लि.
एअरसेल सेल्युलर लि.
डिशनेट वायरलेस लि.
D
भारती एअरटेल लि.
भारती हेक्झाकॉम लि.
A
भारत संचार निगम लि.B
बीपीएल मोबाईल कम्युनिकेशन्स लि.
लूप टेलिकॉम प्रा. लि.
L
डेटाकॉम सोल्युशन्स प्रा. लि.C
एच एफ सी एल इन्फोटेल लि.H
आयडिया सेल्युलर लि.
आदित्य बिर्ला टेलिकॉम लि.
I
महानगर टेलिफोन निगम लि.M
रिलायंस कम्युनिकेशन्स लि.R
रिलायंस टेलिकॉम लि.E
एस. टेल लि.S
श्याम टेलिकॉम लि.Y
स्पाईस कम्युनिकेशन्स लि.P
स्वॅन टेलिकॉम प्रा. लि.W
टाटा टेलिसर्विसेस लि.
टाटा टेलिसर्विसेस (महा.) लि.
T
युनिटेक ग्रुप ऑफ कंपनीU
वोडाफोन ग्रुप ऑफ कंपनीV



विभागांची यादी
विभागसंकेताक्षर
आंध्र प्रदेशA
आसामS
बिहारB
दिल्लीD
गुजरातG
हरियाणाH
हिमाचल प्रदेशI
जम्मू आणि काश्मिरJ
कर्नाटकX
केरळL
कोलकाताK
मध्य प्रदेशY
महाराष्ट्रZ
मुंबईM
उत्तर पूर्वN
ओरिसाO
पंजाबP
राजस्थानR
तामिळनाडू (चेन्नई सह)T
उत्तर प्रदेश - पूर्वE
उत्तर प्रदेश - पश्चिमW
पश्चिम बंगालV


त्यामुळे मला आलेल्या संदेशातील TM म्हणजे T=टाटा टेलिसर्विसेस व M=मुंबई विभाग. म्हणजेच टाटा सर्विसेसच्या मुंबई विभागातून हा संदेश पाठवण्यात आला. TRAI च्या मतानुसार ह्या संकेताक्षराचा वापर करून विनाकारण संदेश पाठवणायांना आटोक्यात आणता येईल. पण मी NDNC करिता ऑगस्ट २००८ मध्येच नोंदणी केली आहे. त्यामुळे मला जे न मागता आलेले संदेश आलेत त्यांबद्दल मी जूनमध्येच तक्रार केली.

पण अजून तरी त्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. माझ्यासारखे आणखी जण असतीलच.
तसेच हे टेलिमार्केटर्स फक्त अशाप्रकारचे लघुसंदेश पाठवत नाहीत तर वेगवेगळी संकेतस्थळे वापरून, इमेल ते मोबाईल अशाप्रकारेही हे लघुसंदेश पाठवत आहेत.
ह्या गोष्टींबाबत TRAI किंवा मोबाईल कंपनी काय उत्तर देणार आहे माहित नाही.

सप्टेंबर २५, २००९

वर्ष २००८. पुण्यात एअरटेलचे प्रिपेड कार्ड घेउन बहिणीला मुंबईत दिले होते. पण काही कारणाने त्यावरून काही संपर्क करीता येत नव्हता. कार्डमध्ये बाकी असलेले पैसे ही पाहता येत नव्हते. कसातरी ग्राहक सेवेचा क्रमांक शोधून काढला. पण कार्ड पुण्याचे, मी ठाणे/मुंबईत. ह्या वरून त्यांनी मला भरपूर फोनाफोनी करावयास लावली. त्यातच एकाने मला ९८२००९८२०० हा नंबर दिला म्हणाला "ह्या क्रमांकावर एअरटेलला संपर्क करा." मला खात्री होती की तो क्रमांक हच/वोडाफोनचा आहे. पण त्यास माहीत नव्हते बहुधा.

माझा वरील शहाणपणा(?) व खालील सामान्य माहिती.

९८२०xxx -(मुंबई) ऑरेंज/हच/ आता वोडाफोन
९८२१xxx-(मुंबई) बीपीएल
९८१xxx -(दिल्ली )
९३xxx रिलायंस
९२xxx आयडीया
९४xxx इतर काही... वगैरे वगैरे...

वरील दोन गोष्टींवरून हे सांगायचे होते की मोबाईलच्या पहिल्या ३/४ आकड्यांवरून तो कुठला व कोणत्या कंपनीचा मोबाईल क्रमांक आहे हे लगेच कळत होते.

पण आता ३१ डिसेंबर पासून ह्या माहितीचा उपयोग बहुधा होणार नाही. कारण ह्या बातमीनुसार केंद्र सरकारने मान्य केलेल्या ग्राहकांच्या मागणीनुसार आता मोबाईल क्रमांक तोच ठेवून ग्राहकाला मोबाईल कंपनी बदलता येणार आहे. अर्थात आतापर्यंत माहित असलेली वरील माहिती आता चुकीची होणार असली तरी त्यात आपला फायदाच आहे :) माझाही सध्याचा मोबाईल क्रमांक माझ्याकडे २००२ पासून आहे. त्यामुळे मध्ये थोडाफार त्रास सहन करून मी त्याच कंपनीची सेवा वापरत होतो. आता त्यात थोडी सुधारणा झाली आहे ही जमेची बाजू.

तरीही मला पडलेले काही प्रश्न:
गेले दीड दोन वर्षे मोबाईल कंपन्या असे करण्यास होकार देत नव्हते. अजूनही ते लगेच मान्य करतील का?
जरी कंपन्यांनी ते सुरू केले तरी कितपत चांगली सुविधा मिळू शकेल?
ते लावणार असणारे चार्ज कितपत असू शकतात हे ही नंतरच कळेल. पण असे नको की तो चार्ज एवढा की त्यापेक्षा नवीन क्रमांक घेणे स्वस्त पडेल :)

अर्थात TRAI ह्यात लक्ष घालेलच.

त्यामुळे आता मी माझा मोबाईल क्रमांक तोच ठेवून आता चांगली सेवा मिळण्याची आशा बाळगतो.
तुमचे ह्या Number Portability बद्दल काय मत आहे?

मे ०१, २००९

गेला महिनाभर निवडणूकीबद्दलचे SMS येत होते. "Save Thane","Vote for XXXXX","Don't vote for XXXXX" वगैरे वगैरे. वैताग आला होता त्या SMS चा. तसेच बाकीचे जाहिरातींचे SMS ही होतेच, ज्याला आपण टेलिमार्केटींग म्हणतो त्या प्रकारचे. Do Not Disturb मध्ये नंबर नोंदवूनही हे SMS येत असल्याने तक्रार करण्यास माझ्या मोबाईल कंपनीच्या ग्राहक केंद्राला संपर्क केला. ते म्हणाले, 'पहिल्यांदा तक्रार करताना तुम्हाला लेखी तक्रार द्यावी लागेल" त्यामुळे मला त्यांच्या कार्यालयात जाणे भाग होते. वेळेअभावी ते जमले नाही. आणि निवडणुकीचे SMS म्हटले, तर वाटले ह्याची तक्रार करूनही काही फायदा होणार नाही. आणि एवीतेवी ३० एप्रिल नंतर बंद होतीलच. टेलिमार्केटिंगचे आलेत तर पाहूच.

पण आज SMS आला, "You have voted & every vote will make India Strong................. Thank You"

सर्वांनाच हा SMS गेला असेल तर एक वेळ ठीक आहे. पण ह्या लोकांनी मतदारयादीतूनही मतदान केलेल्या लोकांची नावे घेउन तर नाही ना SMS पाठवले, अशी ही पुसट शंका येऊन गेली. :)

तुम्हाला कोणालाही असे संदेश आले आहेत का?

एप्रिल २०, २००९

मागील वर्षी ऑगस्टमध्ये आमचे शेगावला जायचे ठरले होते. पण भरपूर पाऊस असल्याने जायचे टाळले होते. नंतर मला कामातून वेळ मिळत नसल्याने ह्याबाबत जास्त विचार करता आला नाही. आता १० एप्रिलला गुडफ्रायडे, शनिवार व रविवार असे ३ दिवस सुट्टी मिळत होती. त्यामुळे मग ह्यावेळी जायचे ठरविले. एक दोघांच्या सांगण्यावरून रेल्वेने जाणे सोयिस्कर पडेल असा सल्ला मिळाला. एखादी कार भाड्याने घेउन जावे असे माझे मत होते. एकच आठवडा असल्याने रेल्वेचे तिकिट मिळण्याची शक्यता नव्हतीच. तरीही रेल्वेच्या संकेतस्थळावर पाहिले तर सर्व वर्गाची तिकिटे वेटिंग लिस्ट मध्ये. तसेच प्रवास हा थेट शेगाव व येता येता शिर्डीवरून येणे असा विचार होता. त्यामुळे मग कारनेच जाणे पक्के केले. पण निघायच्या २ दिवस आधी. तोपर्यंतही काही नक्की होत नव्हते म्हणून मग जास्त कोणाशी विचारणाही करता आली नाही. उन्हाळ्यात जात असल्याने उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी आम्ही गुरूवारी रात्री निघण्याचे ठरविले. कार ज्यांच्याकडून घ्यायची त्यांना रात्रीचा प्रवास करायचा आहे ह्याची कल्पना देऊन ठेवली.

गुरूवारपर्यंत गूगल मॅप वर जायचा रस्ता पाहून ठेवला होता. गूगल मॅपची सुविधा बरी वाटली, की किती अंतरानंतर कुठे वळायचे व पुढे कसे जायचे हे वाक्यांमध्ये लिहून तसेच नकाशातही दर्शविते. (अमेरिका, इंग्लंड मध्ये राहणार्‍यांना ह्याची सवय झाली असेल, पण इथे अजून ते तितकेसे वापरले जात नाही असे वाटते. असो) ऑफिसमधून त्याचे एक प्रिंटही काढून ठेवले.(ते घ्यायला विसरलो निघताना :( ) पाहता पाहताच लक्षात आले की मोबाईलमधूनही मी गूगल मॅप वापरू शकतो. अशा गोष्टी मी सोडत नाही. लगेच ते माझ्या मोबाईलमध्ये कार्यान्वित करून घेतले. GPRS ची सुविधा आधीपासून आहेच. २ दिवस आधीच मोबाईल कंपनीला संपर्क करून रोमिंग चालू आहे व जात आहे तिकडे चालू असेल ह्या गोष्टींची खात्री करून घेतली होती, त्यात GPRS ची विचारणा होतीच.



रात्री १०:३० वाजता आम्ही प्रवासाला सुरूवात केली. ड्रायव्हरने पहिली गुगली टाकली, "शिर्डी जायचे आहे ना?" म्हटले नाही, "शेगाव". पण त्याला एवढा अंदाज होता की आम्हाला रविवार रात्रीपर्यंत परत यायचे आहे. त्यामुळे ३ दिवस आम्ही शिर्डीला काय करणार असा प्रश्न त्याला पडला होता का हा प्रश्न मी मनात येऊन सोडून दिला. त्याला सांगितले की 'शेगावला जायचे आहे'. सोबत हे ही सांगितले की '५५० किमी आहे'. उगाच त्याने नंतर अडचण नको सांगायला. पण तो काही म्हणाला नाही. आई म्हणाली, 'आधी शिर्डीला जाऊ'. मी म्हटले, 'आधी निघूया. नाशिकला पोहोचेपर्यंत आपल्याकडे ३ तास आहेत, त्या वेळेत विचार करू.' थोडक्यात, आम्ही नाशिकला प्रयाण केले.
नाशिकचा महामार्ग नेहमीपेक्षा मला कमी गर्दीचा वाटला. थोडे बरे वाटले. वाटले, पुणे महामार्गाप्रमाणे हा ही सुधारला आहे. अर्धा तासातच आम्ही पहिल्याच मतावर कायम राहिलो. आधी शेगावला जायच्या.

वास्तविक रेल्वेने जाताना मार्ग असतो, "ठाणे-नाशिक-मनमाड-चाळीसगाव-पाचोरा-जळगाव-भुसावळ-अकोला" (मधली स्थानके जाऊ द्यात ;) ) पण मला गूगलने रस्ता सांगितला तो "ठाणे-नाशिक-मालेगाव-धुळे-जळगाव-भुसावळ-अकोला". वाटले, आपण उगाच फिरून तर जाणार नाही ना? नंतर विचार केला, नाशिकमध्ये विचारता येईल. (रात्री २-३ वाजता किती लोक असू शकतात रस्ता सांगायला, ही शंका तेव्हा नव्हती आली पण आता आली). नाशिकला द्वारका पार केल्यानंतर एका चौकात खरोखरच २/३ रिक्षाचालक व इतर माणसे उभी होती. त्यांच्याकडून खात्री करून घेतली की मालेगाव-धुळ्याचाच रस्ता बरोबर आहे. पुढे एका हॉटेल मध्ये चहा घेताना ड्रायव्हर म्हणाला की आपण ८/८:३० पर्यंत पोहोचून जाऊ. पण आता मला साडे दहा तासांची खात्री नव्हती. म्हटले १० तरी वाजतील. नाशिकहून पुढे निघालो मालेगावच्या रस्त्यावर. रस्ता आतापर्यंत चांगला होता, पण मालेगाव येईपर्यंत तेवढा चांगला राहिला नाही. खड्डे खड्डे नाही, पण एकाच वेगात गाडी न नेण्यासारखा. मालेगावला केव्हा पोहोचलो आठवत नाही. ४-४:३० झाले असतील. नंतर पुढे धुळे यायच्या आधी पुन्हा मोबाईल बाहेर काढला व नेमके कुठे वळायचे आहे ते पाहून घेतले. ड्रायव्हरला म्हटले, 'ऍग्रीकल्चर कॉलेजच्या पुढे उजवीकडे वळायचे आहे.' तोपर्यंत ६ वाजत आले होते. चहा प्यायचेही ठरविले. तसा मनात विचार आला, 'आता NH3 आणि NH6 असे दोन महामार्ग भेटत आहेत तो चौक मोठा असेलच व त्याच्या आसपास धाब्यावर चहा घेता येईल. ड्रायव्हरला ही आराम करता येईल थोडा वेळ.' पण पाह्तो तो काय, जंक्शन चांगले होते, जळगावला वळायचे लगेच कळले. पण चहाकरीता एकच टपरी होती. ती लक्षात येईपर्यंत पुढे निघून गेलो. म्हटले, पुढे कुठेतरी घेऊ चहा.



साधारण अर्ध्या तासानंतर ड्रायव्हर स्वतःहूनच म्हणाला आता झोप येतेय. त्याला म्हटले, थांबव गाडी जिथे जमेल तिथे. वाटल्यास मी चालवतो. तो म्हणाला, 'तुम्ही बोलत रहा. बोलता बोलता झोप येणार नाही'. पण मला रिस्क वाटत होती. गाडीच्या टेपच्या स्पीकरची वायर निघाली होती. तो म्हणाला, 'गाणी लावूया.' त्याकरीता एका ठिकाणी गाडी थांबविली. मी पाहिले तर एका पडिक वाटणार्‍या जागेत बहुधा हॉटेलचा बोर्ड आहे. अर्थात हॉटेल नव्हते. पण तिकडे असलेल्या माणसांना विचारले तर ते म्हणाले, 'चहा मिळेल येथे.' चला, चहाची तर सोय झाली. जसा असेल तसा. तिकडेच थोडेफार पाय मोकळे केले, चहा घेतला, बैलांचे (आणि बैलांसोबत) फोटो काढले.
.
  

मला वाटले की शेगाव असेल ९०-१०० किमी. पण माझी नकाशातून अंतर मोजण्यात चूक झाली होती. नकाशावरून तर दिसत होते की फार लांब आहे पण लिखाणातील अंतराची बेरीज होती १०० किमी. पुढे एका फलकावर पाहिले, भुसावळच १०० किमी च्या वर आहे. तेव्हा लक्षात आले, शेगाव अजून २०० किमीच्या वर आहे. ४/५ तासांची निश्चिंती. :(
भुसावळ येईपर्यंत एकही हॉटेल नाही जिथे नाश्ता करता येईल. भुसावळमध्ये ही पुढे पुढे करत बाहेरच आलो. १० वाजेपर्यंत कुठेच काही नाही. मला मधे आलेली शंका बरोबर होती ते एका तेव्हाच उघडत असलेल्या हॉटेलमध्ये कळले. त्या भागात हॉटेल ११/११:३० च्या नंतरच उघडतात, तेही थेट जेवणाकरीता. मग एका ठि़काणी कचोरी, भजे व चहा घेउन नाश्ता केल्यासारखे खाल्ले.

रात्रीचे जागरण आणि आता जाणवणारे ऊन ह्यामुळे मी खामगावला पोहोचेपर्यंत थोडी झोप काढली. गूगलने सांगितल्याप्रमाणे खामगाव मध्ये तीव्र डावे वळण घ्यायचे होते. त्यानुसार मग मी एखादा चौक पाहत होतो.पण प्रत्यक्षात लोकांनी सांगितले त्याप्रमाणे खामगाव बस स्टँडपासून सरळ जायचे होते. तिथे जाऊन पाहिले तर शेगावकरीता हलकेसे डावे वळण होते व तीव्र उजवीकडचा रस्ता अकोल्याकडे जात होता. असो, पूर्ण तर चुकले नाही ना.



आता शेगाव संस्थानाचे फलक दिसू लागले होते. "सर्वात प्रथम भक्त निवास क्र. ५ मध्ये जागेची चौकशी करणे" हे फलक सर्वात जास्त दिसले. वाटले, थांबण्याची सोय झाली. असे करत अंदाजे दुपारी १२ वाजता आम्ही शेगावला पोहोचलो.

(क्रमशः)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter