आंतरजाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आंतरजाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एप्रिल ०७, २०१६

आज ट्वीटर वर एक बातमी पाहिली. काँग्रेस आणि भाजपच्या आसाममधील सभेचा ३६०अंशातील फोटो.  मला त्या सभांमध्ये काही रस नाही आहे, पण ३६० अंशातील फोटो म्हणून बातमी वाचायला घेतली. खरं तर फोटो पाहिले. ते वेगवेगळ्या अंशातून फिरविताना वरून पाहत असलेल्या दृश्यातून पृथ्वीसारखा गोल दिसला आणि मनात एक विचार आला की पृथ्वीवरील लोकसंख्या ज्याप्रकारे वाढत आहे त्याप्रकारे (थोडी अतिशयोक्ती करत) अवकाशातून बघितले तर असेच दिसेल ना?






असो. असे तसे विचार सोडून पृथ्वीवर परत येऊया. बातमी वाचायची असल्यास ह्या दुव्यावर मिळेल.

एप्रिल ०१, २०१६

गूगल हे नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान आणि उत्पादने आणून लोकांना चकित करत असते आणि ते लोकांच्या फायद्याचेही असते. जसे की जीमेल, गूगल मॅप्स, अँड्रॉईड, ३६० डिग्री, जीपीएस वगैरे वगैरे.

आज गूगलने नवीन गोष्ट बाजारात आणली आहे. 'स्नूपाविजन' (SnoopaVision) 



आज दुपारी यूट्यूबवर एक नवीन बटन दिसले. त्यावर टीचकी मारल्यावर कळले की 'स्नूपाविजन' हे यूट्यूबचे नवीन तंत्रज्ञान आहे ज्यात यूट्यूबवर असलेले सर्व व्हिडीयो ते ३६० डिग्री व्हिडीओ मध्ये रुपांतरीत करणार आहेत. (३६० डिग्री व्हिडीओ बद्दल विस्तृत माहिती लवकरच देतो येथे.)


ह्यातील मी नेहमी पाहत असलेली मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही रुपांतरीत व्हायला साल २०५१ पर्यत वाट पहावी लागेल.



गंमत वाटली ना? आणखी मोठी गंमत पुढे आहे. त्यांचा स्वत:चा व्हिडीयो रुपांतरीत व्हायला साल २१६५ उजाडावे लागेल.



अर्थात... काही खास नाही. हा एप्रिल फूल चा एक नमूना गूगलकडून. 




जून १६, २०११


जालरंग प्रकाशनाच्या 'ऋतू हिरवा २०११' ह्या वर्षा विशेषांकाचे आज १५ जून रोजी प्रकाशन झाले.



ह्यातील 'शाळा सुरू झाली..' हे जुन्या आठवणींचे पुंजके हे मी गेल्या आठवड्यात लिहून दिले होते.

अंक आज प्रकाशित झाला आणि नेमके आजच शाळा सुरू झाल्या असल्याचे पाहिले. त्यामुळे त्या ज्या काही आठवणी लिहिल्या त्याला बरोबर शाळा सुरू होण्याच्याच दिवसाची वेळ जमून आली असेच म्हणता येईल. आज पुन्हा त्या आठवणी समोर आल्या.

आणि हो, पहिल्यांदाच मी संपादकीय ही लिहिले आहे. वाचा आणि सांगा कसा वाटला हा अंक.

फेब्रुवारी ०१, २०११



गेले काही महिने सेवेत नसलेले 'साहित्यविश्व' संकेतस्थळ पुन्हा आपल्या सेवेत हजर झाले आहे. जुन्या सदस्यांचे खाते आणि विदा पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सदस्य तेच खाते वापरून साहित्यविश्वात पुन्हा सहभागी होऊ शकतात.

संकेतस्थळ पुन्हा सुरू झाले असले तरी काही दिवस चाचणी अवस्थेत ठेवण्याचा विचार आहे. सदस्यांना विनंती आहे की त्यांना जाणवणाऱ्या अडचणीबद्दल त्यांनी vyavasthapak(at)sahityavishwa(dot)in ह्या पत्त्यावर विपत्राने कळवावे.

संकेतस्थळाचा पत्ता: www.sahityavishwa.in

नोव्हेंबर २१, २०१०

'स्टार माझा'च्या 'ब्लॉग माझा ३' स्पर्धेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. ह्यावेळी  परीक्षक लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) यांनी निवडले यांनी सहा विजेते आणि तीस उत्तेजनार्थ ब्लॉगर्स निवडले आहेत.

संबंधित निकाल 'स्टार माझा'च्या संकेतस्थळावर येथे पाहता येईल.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन :)

मी सर्व ब्लॉग पाहिले नाही आहेत. ह्यातील काही जणांशी आंतरजालावर आधीपासून ओळख झाली आहेच. त्यांचे ब्लॉग पाहिले होते. आता इतरजणांचेही उत्तम ब्लॉग कळले. ते ही पाहीन :)

नोव्हेंबर ०६, २०१०

एवढी वर्षे  (छापिल) दिवाळी अंक वाचायची सवय असलेल्या मराठीजनांना गेल्या २/३ वर्षांपासून आंतरजालावरही दिवाळी अंक उदयास येत असलेले पाहिले असतील. ह्यावर्षी तर त्यांची रेलचेलच दिसत आहे.

कागदी पुस्तकांतील दिवाळी अंकांची किंमत वाढतच चालली असूनही त्यांची मागणी आणि खप तसाच टिकून आहे असे मला वाटते. त्याच जोडीला आता हे आंतरजालीय (इ) दिवाळी अंक ही आहेत.

बहुतेकांना ह्या अंकाची माहिती आणि संकेतस्थळ पत्ता माहित असेलच. तरीही ज्यांना माहित नसेल त्यांच्याकरीता ती यादी येथे देत आहे.
मी तरी अजून सर्व पाहिली नाही आहेत. काही चाळली आहेत. आता वाचावयास सुरूवात करेन. जमल्यास त्यांबाबतचे मतही लिहेन :)

जाता जाता: ह्यासोबतच मी वाचण्यास घेतलेल्या छापील दिवाळी अंकांचीही यादी लिहून देतो.
  • लोकप्रभा
  • आवाज
  • मौज
  • मस्त भटकंती
  • धनंजय
  • अक्षर
तुम्ही वाचलेल्या दिवाळी अंकाबद्दलही मत कळवावे.

सप्टेंबर २९, २०१०

धक्का बसला ना?

गेले काही महिने मटावरील बातम्यांव्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल चर्चा होत होत्या. नायिकांचे हॉट फोटो, मसालेदार बातम्या वगैरेंची रेलचेल असते अशा प्रकारे काही काही. आणि ते आहेच. मटाच्या पानावर गेले की रंगीबेरंगी चित्रे दिसतात, आणि भरपूर काही :)

पण आज आणखी काहीतरी जास्त दिसले (अमेरिकेतून पाहिले असताना). मटा वर ब्लू फिल्म ची जाहिरात. अर्थात मटा ने स्वतः ती टाकली नसेल. गूगल च्या अ‍ॅडसेन्सची कृपा ती. गूगलने कोणते निकष लावून ती जाहिरात दाखवली माहित नाही. पानावरील मजकूरावरून म्हणायचे तर मी होतो 'हसा लेको' पानावर. इतर पानांवर नाही. किंवा मग मटा ने काय प्राथामिक माहिती त्यांना दिली त्यांनाच माहिती. (गूगल  अ‍ॅडसेन्स बद्दल माहिती असणार्‍यांनी प्रकाश टाकावा ही विनंती. :)




१ २ महिन्यांपूर्वीच गूगलने, जीमेल मध्ये ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्यामध्ये सुधारणा केली असे सांगितले होते. आणि आधी माहित असल्याप्रमाणे गूगलने अजून तरी मराठी मजकूराकरीता अ‍ॅडसेन्स बनविला नव्हता. आता आला असेल तर त्यात भरपूर लोचा आहे ;) त्यामुळे माझ्या अनुदिनीकरीता तरी अ‍ॅडसेन्स दूरच राहील. (तसा त्याबद्दल विचारच नाही केला अजून)

असो. मटाची होत असलेली प्रगती आणि आता अशी जाहिरात (चुकून?) आली असली तरी मटावर तसा मजकूर येईल अशी आशा बाळगू नका. भारतातल्या नियमांप्रमाणे त्याला बंदी आहे. ;)

जानेवारी १५, २०१०

संकेतस्थळावर एखादी बातमी व त्यातील शब्दांवरून जाहिराती दाखवण्यात काही काही वेळा विरोधाभास असतो. (गूगल वर Misplaced ads शोधून पहावे. - स्वतःच्या जबाबदारीवर ;) )

पण
एकाच संकेतस्थळावर बातम्यांतील शब्द विरोधाभासात असल्याचा हा नमुना :) (कसल्याही चुका काढायचा प्रयत्न नाही)
पहिल्या बातमीत संक्रांतीचा अर्थ संकट असा वापरला आहे. आणि खालीच तिसर्‍या चौकटीत संक्रात म्हणजे संकट नाही असे म्हणणारी बातमी.
खालील उदाहरणात विरोधाभास नाही आणि गंभीरता आहे. पण एकामागोमाग दोन विरुद्ध आशयाच्या बातम्या आहेत.

डिसेंबर २५, २००९

नेटभेट.कॉमच्या प्रणव जोशी आणि सलिल चौधरी ह्यांनी सुरू केलेल्या नेटभेट मासिकाच्या तिसर्‍या अंकात (डिसें २००९) माझे 'क्यु.पी.एस आणि पी. आय. पी' हे लेखन समाविष्ट केले आहे. त्याबद्दल त्यांचे आभार.
माझे लेखन त्यांच्या मासिकात घेण्यासारखे वाटले ह्याचा मला आनंद वाटला. आधी स्टार माझाच्या 'ब्लॉग माझा' स्पर्धेत उल्लेख व आता अशा मासिकात प्रसिद्धी ह्याने प्रोत्साहनच मिळत आहे की मी काही ना काही (काहीही नाही ;) ) चांगले लिहित रहावे.
ह्यापुढेही नेटभेटचा हा आणि असे आणखी उपक्रम अशाप्रकारे होत रहावे आणि माझ्यासारखेच इतरांनाही प्रोत्साहन मिळावे ही सदिच्छा.

एप्रिल २०, २००९

मागील वर्षी ऑगस्टमध्ये आमचे शेगावला जायचे ठरले होते. पण भरपूर पाऊस असल्याने जायचे टाळले होते. नंतर मला कामातून वेळ मिळत नसल्याने ह्याबाबत जास्त विचार करता आला नाही. आता १० एप्रिलला गुडफ्रायडे, शनिवार व रविवार असे ३ दिवस सुट्टी मिळत होती. त्यामुळे मग ह्यावेळी जायचे ठरविले. एक दोघांच्या सांगण्यावरून रेल्वेने जाणे सोयिस्कर पडेल असा सल्ला मिळाला. एखादी कार भाड्याने घेउन जावे असे माझे मत होते. एकच आठवडा असल्याने रेल्वेचे तिकिट मिळण्याची शक्यता नव्हतीच. तरीही रेल्वेच्या संकेतस्थळावर पाहिले तर सर्व वर्गाची तिकिटे वेटिंग लिस्ट मध्ये. तसेच प्रवास हा थेट शेगाव व येता येता शिर्डीवरून येणे असा विचार होता. त्यामुळे मग कारनेच जाणे पक्के केले. पण निघायच्या २ दिवस आधी. तोपर्यंतही काही नक्की होत नव्हते म्हणून मग जास्त कोणाशी विचारणाही करता आली नाही. उन्हाळ्यात जात असल्याने उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी आम्ही गुरूवारी रात्री निघण्याचे ठरविले. कार ज्यांच्याकडून घ्यायची त्यांना रात्रीचा प्रवास करायचा आहे ह्याची कल्पना देऊन ठेवली.

गुरूवारपर्यंत गूगल मॅप वर जायचा रस्ता पाहून ठेवला होता. गूगल मॅपची सुविधा बरी वाटली, की किती अंतरानंतर कुठे वळायचे व पुढे कसे जायचे हे वाक्यांमध्ये लिहून तसेच नकाशातही दर्शविते. (अमेरिका, इंग्लंड मध्ये राहणार्‍यांना ह्याची सवय झाली असेल, पण इथे अजून ते तितकेसे वापरले जात नाही असे वाटते. असो) ऑफिसमधून त्याचे एक प्रिंटही काढून ठेवले.(ते घ्यायला विसरलो निघताना :( ) पाहता पाहताच लक्षात आले की मोबाईलमधूनही मी गूगल मॅप वापरू शकतो. अशा गोष्टी मी सोडत नाही. लगेच ते माझ्या मोबाईलमध्ये कार्यान्वित करून घेतले. GPRS ची सुविधा आधीपासून आहेच. २ दिवस आधीच मोबाईल कंपनीला संपर्क करून रोमिंग चालू आहे व जात आहे तिकडे चालू असेल ह्या गोष्टींची खात्री करून घेतली होती, त्यात GPRS ची विचारणा होतीच.



रात्री १०:३० वाजता आम्ही प्रवासाला सुरूवात केली. ड्रायव्हरने पहिली गुगली टाकली, "शिर्डी जायचे आहे ना?" म्हटले नाही, "शेगाव". पण त्याला एवढा अंदाज होता की आम्हाला रविवार रात्रीपर्यंत परत यायचे आहे. त्यामुळे ३ दिवस आम्ही शिर्डीला काय करणार असा प्रश्न त्याला पडला होता का हा प्रश्न मी मनात येऊन सोडून दिला. त्याला सांगितले की 'शेगावला जायचे आहे'. सोबत हे ही सांगितले की '५५० किमी आहे'. उगाच त्याने नंतर अडचण नको सांगायला. पण तो काही म्हणाला नाही. आई म्हणाली, 'आधी शिर्डीला जाऊ'. मी म्हटले, 'आधी निघूया. नाशिकला पोहोचेपर्यंत आपल्याकडे ३ तास आहेत, त्या वेळेत विचार करू.' थोडक्यात, आम्ही नाशिकला प्रयाण केले.
नाशिकचा महामार्ग नेहमीपेक्षा मला कमी गर्दीचा वाटला. थोडे बरे वाटले. वाटले, पुणे महामार्गाप्रमाणे हा ही सुधारला आहे. अर्धा तासातच आम्ही पहिल्याच मतावर कायम राहिलो. आधी शेगावला जायच्या.

वास्तविक रेल्वेने जाताना मार्ग असतो, "ठाणे-नाशिक-मनमाड-चाळीसगाव-पाचोरा-जळगाव-भुसावळ-अकोला" (मधली स्थानके जाऊ द्यात ;) ) पण मला गूगलने रस्ता सांगितला तो "ठाणे-नाशिक-मालेगाव-धुळे-जळगाव-भुसावळ-अकोला". वाटले, आपण उगाच फिरून तर जाणार नाही ना? नंतर विचार केला, नाशिकमध्ये विचारता येईल. (रात्री २-३ वाजता किती लोक असू शकतात रस्ता सांगायला, ही शंका तेव्हा नव्हती आली पण आता आली). नाशिकला द्वारका पार केल्यानंतर एका चौकात खरोखरच २/३ रिक्षाचालक व इतर माणसे उभी होती. त्यांच्याकडून खात्री करून घेतली की मालेगाव-धुळ्याचाच रस्ता बरोबर आहे. पुढे एका हॉटेल मध्ये चहा घेताना ड्रायव्हर म्हणाला की आपण ८/८:३० पर्यंत पोहोचून जाऊ. पण आता मला साडे दहा तासांची खात्री नव्हती. म्हटले १० तरी वाजतील. नाशिकहून पुढे निघालो मालेगावच्या रस्त्यावर. रस्ता आतापर्यंत चांगला होता, पण मालेगाव येईपर्यंत तेवढा चांगला राहिला नाही. खड्डे खड्डे नाही, पण एकाच वेगात गाडी न नेण्यासारखा. मालेगावला केव्हा पोहोचलो आठवत नाही. ४-४:३० झाले असतील. नंतर पुढे धुळे यायच्या आधी पुन्हा मोबाईल बाहेर काढला व नेमके कुठे वळायचे आहे ते पाहून घेतले. ड्रायव्हरला म्हटले, 'ऍग्रीकल्चर कॉलेजच्या पुढे उजवीकडे वळायचे आहे.' तोपर्यंत ६ वाजत आले होते. चहा प्यायचेही ठरविले. तसा मनात विचार आला, 'आता NH3 आणि NH6 असे दोन महामार्ग भेटत आहेत तो चौक मोठा असेलच व त्याच्या आसपास धाब्यावर चहा घेता येईल. ड्रायव्हरला ही आराम करता येईल थोडा वेळ.' पण पाह्तो तो काय, जंक्शन चांगले होते, जळगावला वळायचे लगेच कळले. पण चहाकरीता एकच टपरी होती. ती लक्षात येईपर्यंत पुढे निघून गेलो. म्हटले, पुढे कुठेतरी घेऊ चहा.



साधारण अर्ध्या तासानंतर ड्रायव्हर स्वतःहूनच म्हणाला आता झोप येतेय. त्याला म्हटले, थांबव गाडी जिथे जमेल तिथे. वाटल्यास मी चालवतो. तो म्हणाला, 'तुम्ही बोलत रहा. बोलता बोलता झोप येणार नाही'. पण मला रिस्क वाटत होती. गाडीच्या टेपच्या स्पीकरची वायर निघाली होती. तो म्हणाला, 'गाणी लावूया.' त्याकरीता एका ठिकाणी गाडी थांबविली. मी पाहिले तर एका पडिक वाटणार्‍या जागेत बहुधा हॉटेलचा बोर्ड आहे. अर्थात हॉटेल नव्हते. पण तिकडे असलेल्या माणसांना विचारले तर ते म्हणाले, 'चहा मिळेल येथे.' चला, चहाची तर सोय झाली. जसा असेल तसा. तिकडेच थोडेफार पाय मोकळे केले, चहा घेतला, बैलांचे (आणि बैलांसोबत) फोटो काढले.
.
  

मला वाटले की शेगाव असेल ९०-१०० किमी. पण माझी नकाशातून अंतर मोजण्यात चूक झाली होती. नकाशावरून तर दिसत होते की फार लांब आहे पण लिखाणातील अंतराची बेरीज होती १०० किमी. पुढे एका फलकावर पाहिले, भुसावळच १०० किमी च्या वर आहे. तेव्हा लक्षात आले, शेगाव अजून २०० किमीच्या वर आहे. ४/५ तासांची निश्चिंती. :(
भुसावळ येईपर्यंत एकही हॉटेल नाही जिथे नाश्ता करता येईल. भुसावळमध्ये ही पुढे पुढे करत बाहेरच आलो. १० वाजेपर्यंत कुठेच काही नाही. मला मधे आलेली शंका बरोबर होती ते एका तेव्हाच उघडत असलेल्या हॉटेलमध्ये कळले. त्या भागात हॉटेल ११/११:३० च्या नंतरच उघडतात, तेही थेट जेवणाकरीता. मग एका ठि़काणी कचोरी, भजे व चहा घेउन नाश्ता केल्यासारखे खाल्ले.

रात्रीचे जागरण आणि आता जाणवणारे ऊन ह्यामुळे मी खामगावला पोहोचेपर्यंत थोडी झोप काढली. गूगलने सांगितल्याप्रमाणे खामगाव मध्ये तीव्र डावे वळण घ्यायचे होते. त्यानुसार मग मी एखादा चौक पाहत होतो.पण प्रत्यक्षात लोकांनी सांगितले त्याप्रमाणे खामगाव बस स्टँडपासून सरळ जायचे होते. तिथे जाऊन पाहिले तर शेगावकरीता हलकेसे डावे वळण होते व तीव्र उजवीकडचा रस्ता अकोल्याकडे जात होता. असो, पूर्ण तर चुकले नाही ना.



आता शेगाव संस्थानाचे फलक दिसू लागले होते. "सर्वात प्रथम भक्त निवास क्र. ५ मध्ये जागेची चौकशी करणे" हे फलक सर्वात जास्त दिसले. वाटले, थांबण्याची सोय झाली. असे करत अंदाजे दुपारी १२ वाजता आम्ही शेगावला पोहोचलो.

(क्रमशः)

फेब्रुवारी २७, २००९

आपणां सर्वांचा आंतरजालावर वावर खूप वाढला आहे. माहितीचा खजिना, विपत्रे, बँकेची कामे, खरेदी व इतरही फार कामांकरीता आपण आंतरजालाचा पूरेपूर फायदा घेत असतो. भरपूर वेळा आपल्याला सूचना मिळत असतात की आंतरजालावर वावरताना बँकेचे, खरेदी करण्याचे संकेतस्थळ वगैरे ठिकाणी सुरक्षितता का व कशी ठेवावी, इतर सुरक्षितता म्हणजे कोणत्याही संकेतस्थळावर स्वतःची खाजगी माहिती देताना नीट चौकशी करून घ्यावी इत्यादी इत्यादी. ह्यावर भाष्य करण्याचा किंवा सल्ला देण्याचा माझा बिलकुल विचार नाही.

माझा रोख आहे तो इतर गोष्टींवर, नुकत्याच वाचनात आलेल्या...

१.
http://infotech.indiatimes.com/News/Facebook_users_protest_new_terms/articleshow/4148601.cms
http://www.entrepreneur.com/localnews/1779412.html

ह्या बातमीप्रमाणे, काही दिवसांपूर्वी 'फेसबुक' ह्या संकेतस्थळाच्या चालकांनी आपल्या नियमात असा बदल केला होता की जेणेकरून कोणाही व्यक्तीने त्यात टाकलेले छायाचित्र, चलचित्र, लिखाण, संदेश ह्यावर फेसबुकचा अधिकार राहील. जरी सदस्याने त्याचे सदस्यत्व रद्द केले तरी त्या सर्व माहितीवर 'फेसबुक'चा अधिकार राहील.
सध्या तरी सदस्यांच्या जोरामुळे, तक्रारींमुळे फेसबुकने आपला तो नियम मागे घेतला आहे.
मी तरी 'फेसबुक' पाहिले नाही, वापरले नाही त्यामुळे त्यांच्या नियमांबद्दल जास्त माहिती नाही. पण ह्या बातमीमुळे एक जाणवले की सर्व संकेतस्थळांवर आपली खाजगी माहिती/छायाचित्रे ठेवताना पूर्ण सजग राहणे गरजेचे आहेच पण त्याबरोबर त्यांचे बदलते नियम जाणून घेणे ही तेवढेच आवश्यक आहे. भारतात फेसबुकसारखेच संकेतस्थळ 'ऑर्कूट' खूप लोकप्रिय आहे. आधीच गूगल विपत्रातील मजकूराप्रमाणे जाहिरात दाखविण्यात अग्रेसर आहे. त्यावरही आपण काळजी घेणे गरजेचे आहे.

२. http://timesofindia.indiatimes.com/India/Bloggers-can-be-nailed-for-views/articleshow/4178823.cms

दुसरी बातमी आहे ब्लॉग, अर्थात मराठीत आपण ज्याला आंतरजालीय अनुदिनी म्हणतो त्यासंबंधी. ह्या बातमीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने एका १९ वर्षाच्या मुलाने ऑर्कूटवरील एका समुदायात शिवसेनेविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याबद्दलच्या खटल्यात असे म्हटले आहे की. ब्लॉग वरील लिहिलेल्या मजकूराबद्दल तक्रार आल्यास शिक्षाही होऊ शकते. आता त्या मुलावरील खटला हा जरी ऑर्कूट मध्ये लिहिल्याबद्दल होता तरी एखाद्याने स्वतःच्या ब्लॉगवरही एखाद्याबद्दल अपमानकारक, असभ्य भाषेत मजकूर लिहिला असल्यास, त्याची तक्रार आल्यास त्याच्यावरही कारर्वाई होऊ शकते.
हे एक बरे आहे... बडी मंडळी, नेते लोक कोणाबद्दलही काहीही जाहिरपणे म्हणू शकतात, एखादा मुख्यमंत्री शहीदाचा अपमान करू शकतो. पण तेच सर्वसामान्य नागरीकाने आपल्या मनातील विचार ब्लॉगवर लिहिले तर त्याला लगेच शिक्षा होणार.
ह्याचा अर्थ माझी त्या १९ वर्षाच्या मुलाला सहमती आहे असे नाही. लो़कशाही आहे म्हणून कोणीही कोणाबद्दल काहीही लिहिणे बोलणे बरोबर नाही. पण हाच नियम सर्वांकरीता सारखा लागू होईल असे मला नाही वाटत.

मी ही कोणाबद्दल आक्षेपार्ह लिहित नाही, फक्त एखाद्याचा निर्णय आवडला नाही तर त्याविरूद्ध लिहिणे होत असते . पण ह्या निकालाचा पुढे कसा वापर गेला जाईल हे सांगता येत नाही, त्यामुळे सध्या तरी एखाद्याबद्दल लिहिताना नीट विचार करून लिहावे लागेल. कोणीही उठून तक्रार केल्यास काय घ्या? :)

असले विविध प्रकार समोर येत असताना, आता पुढे आंतरजालावर वावरताना आधीच्यापेक्षाही जास्त सजग राहावे लागेल हे नक्की.

(जाता जाता: ह्या लेखात तर काही आक्षेपार्ह नाही आहे ना?)

ऑगस्ट २५, २००८

निबंध लिहा: माझा आवडता प्राणी, शाळेचे आत्मचरित्र, वाचनाचे महत्व.
शाळेत असा प्रश्न असायचा सहामाही व वार्षिक परिक्षेला. किंवा मग पत्रलेखन. गुण १० ते १५. त्यावेळेला नेमके काय लिहावे ते माहित नसायचेच. मित्रांसोबत जास्त वेळ शाळेतील अभ्यासाचेच जास्त बोलणे व्हायचे किंवा मग खेळ , दूरदर्शनवरील कार्यक्रम, सिनेमे ह्यांच्यावर चर्चा व्हायची. पण त्यावर लिहायला कधी कोणी नाही सांगितले. त्यामुळे निबंध लिहायला मदत व्हायची निबंधावरील पुस्तकाची किंवा मार्गदर्शकाची(हो, तेव्हा मार्गदर्शक वापरणे म्हणजे थोडेफार कमीपणाचे मानले जायचे) तेही वापरावयास सुरुवात केली होती. पण त्या वाचनावर, ठरलेल्या विषयांवरच लिहिले जायचे तरीही पूर्ण गुण मिळण्याची खात्री नसायची.
तसेच नेत्यांच्या जयंती/पुण्यतिथीलाही आपण त्या त्या नेत्याबद्दल भाषण लिहून (घेउन) व त्याची तयारी करून मग व्यासपीठावर बोलायला जायचो. मग ते शाळेत असो किंवा वक्तृत्व स्पर्धेत भाग घेताना. माझ्या आठवणीप्रमाणे मी एका शाळेत जाऊन डॉ. हेडगेवारांवर भाषण केले होते. बाकी सर्व आपल्या शाळेतच. पण ते सर्व लिहिण्यातही कोणीतरी आपल्याला मदत केलेली असायचीच.

नंतर मग शाळेच्या बाहेरही थोडाफार सहभाग होऊ लागला. कॉलनीमधील गणपती उत्सवात एखाद-दुसरे एकपात्री कथन ही केले. मी ८/९ वीत असताना घरातील गणपतीची तयारी होत असताना मी व माझ्या बहिणीने गप्पा-गप्पांतच एक कथा तयार केली. ती आम्हालाच एवढी आवडली की मग आम्ही त्यावर एक अंकी नाटक लिहून काढले. मग इतरांची मदत घेऊन सार्वजनिक गणपतीत त्या नाटकाचे सादरीकरण केले.

हळू हळू (म्हणजे रखडत नाही हो, मी एक हुशार विद्यार्थी होतो :) ) वरच्या इयत्तेत गेलो, कॉलेज मध्ये गेलो तर तो अनुभव वाढत गेला. इतर पुस्तक वाचन, वर्तमान पत्रे वाचणे सुरू झाले. भरपूर लोकांची पुस्तके, कथा वाचल्या. बातम्या, सिनेमे, गावा-गावांतील अनुभव गाठीशी येत गेले. तसेच विचारशक्ती वाढत गेली. त्यामुळे मित्रांसोबत/इतर लोकांसोबत चर्चा वाढत गेल्या. वादही घालू लागलो. त्यात वेगळेपणही वाटायचे.
मग आंतरजालावरील भ्रमण सुरू झाले. कॉलेज संपल्यावर काही मित्र दूर गेले. मग त्यांच्याशी इमेलवर संपर्क चालू राहिला. स्वत:चे अनुभव त्यांना मोठ्या-मोठ्या विपत्रांतून लिहून पाठवणे चालू झाले.
आंतरजालावर भ्रमण वाढत गेले. तेव्हा मराठी संकेतस्थळेही नावारूपाला आली होती. त्यांचे सदस्यत्व घेउन वाचन चालू झाले. तिथे प्रतिक्रिया देता देता नवीन गोष्टी कळत गेल्या. मग स्वत:चेही काहीतरी लिहिणे चालू झाले. प्रतिसाद मिळत गेले तसे हुरूप आला. काही वेळा विरोधातही प्रतिक्रिया मिळाल्या. पण आता सवय झालीय. त्यामुळे आता लिहितानाच असे विषय निवडतो की ज्यात मला माहित आहे, जमल्यास वाद घालण्यासही तयारी असा ;)
आता ब्लॉगमुळे तर गेल्या वर्षापासून स्वत:च्या मनातील विचार/तक्रारी खरडणे चालू झाले.

हे सर्व आठवत असताना नुकताच पिवळा डांबिस ह्यांचा हा अग्रलेख वाचला. आणि वाटले मला वाटत असलेले विचार ह्यात आहेतच. जसा सर्वांमध्ये फरक पडला, तसा शाळेतील निबंधापासून आता थोडेफार ललित लेखनापर्यंत स्वत:हून लिहिण्याइतपत माझ्यात फरक नक्कीच पडलाय. (लोक वाचतील, नाही वाचतील तो भाग वेगळा ;) )

तेव्हा चला, आपले लिहिणे सुरूच ठेवूया. पाहू आणखी किती फरक पडतो ते :)

सप्टेंबर २७, २००६



मराठी समुदाय संगणक/तंत्रज्ञान व्यक्तीविषयक




बातम्या / वृत्तपत्रे शासन संबंधी





इतर


इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter