'ब्लू' नावाचा सर्वात जास्त खर्च केलेला हिंदी सिनेमा चालला नाही आणि २ ते ३ महिन्यात कलर्स वाहिनीवर दाखवण्यात आला. त्यानंतर 'अजब प्रेम की गजब कहानी', अलाद्दीन वगैरे चित्रपटही फार थोड्याच दिवसांत दूरदर्शन वाहिन्यांवर दाखविण्यात आले. ह्यावरून मनात सर्वसाधारणपणे विचार येत होते की हे चित्रपट चालले नाहीत म्हणून दाखवतात का? त्यातच काल मटामध्ये
हा लेख वाचला आणि हे वाचत असतानाच लहानपणापासूनचे अनुभव डोळ्यांसमोरून गेले.
साधारण ८६/८७ च्या काळापासून (आधीचे आठवत नाही) सर्व चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याची विडीयो कॅसेट (चलचित्रफीत) त्याच दिवशी सर्व विडीयो कॅसेट लायब्ररीमध्ये मिळायची (इथे मराठी भाषांतर करत नाही आहे कारण तेच नाव वापरात होते) त्याच काळात आमच्या घरात नवीन व्हीसीआर आला असल्याने जवळपास दररोजच एका चित्रपटाची कॅसेट आणली जात होती. नंतरही पाहिजे तेव्हा एखादा सिनेमा आणून पाहिला जात असे.
तेव्हा एका कॅसेटचे भाडे १० रू पडत असे. पण नंतर मागणी पुरवठा तत्त्वावर काही चित्रपटांकरीता ते वाढून १५ रू ही केले होते. मला आठवतोय तो 'गंगा जमुना सरस्वती' चित्रपट. ह्याच्या कॅसेटचे १५ रू घेतले असे सांगण्याकरीता त्या दुकानदाराने घरी एक चिट्ठी लिहून पाठवली होती. तसेच काही चित्रपटांच्या कॅसेटकरीता वेळेचे बंधन होते. ४/५ तासांत परत करणे वगैरे. 'मि. इंडिया' सिनेमाकरीताही असेच बंधन होते. नेहमीच ती कॅसेट मिळत नव्हती. एके दिवशी घरून चर्चा करून निघालो पण घेऊन आलो 'सुहाग' सिनेमा. बहिण म्हणाली, ' मि. इंडिया' ची कॅसेट लवकर पाहून परत करायची या कारणाने वडिल कार्यालयातून लवकर आले होते. पण मी घोळ घातला होता :|
ह्म्म.. कॅसेट चर्चा खूप झाली. सांगायचा मुद्दा हा की चित्रपटाची कॅसेट प्रदर्शित झाल्याच्या दिवशीच मिळायची. तरीही चित्रपटगृहांत गर्दी असायची तो भाग वेगळा. 'आंखे' सिनेमा (गोविंदाचा) चित्रपटगृहातच एवढा चालला होता तेव्हा मी आणि माझी बहीण बोलत होतो की हा सिनेमा एवढा कसा चालतोय? पण मित्राच्या घरी कॅसेटवर तो सिनेमा पाहिला, आवडला आणि कारण कळले. तसेच तेव्हा केबल हे प्रकरण नवीनच सुरू झाले होते. त्यावरही मग ते चित्रपट दाखवणे सुरू होते. त्यामुळे कॅसेट आणणे बंद नाही झाले तरी कमी झाले, केबलवर सिनेमा पाहणे सुरू झाले. पण तरीही काही चित्रपट पहायला आम्ही आवर्जून चित्रपटगृहात जायचो. त्यातच होता 'अंदाज अपना अपना'. ह्या सिनेमाची आम्ही १३ जणांनी तिकिटे काढली होती. रविवारी संध्याकाळी चित्रपट पहायला जायचे तर शनिवारी रात्री केबलवर तो चित्रपट दाखविला जात होता. पण आम्ही तेव्हा पाहणे कटाक्षाने टाळले. कारणे २. एक तर चित्रपटाची तिकिटे काढली होती आणि दुसरे म्हणजे कधीतरीच आमचा गट चित्रपट पहायला एकत्र जात होता, तिकडे जास्त मजा आली असती.
त्याच काळात मग (माझ्या माहितीप्रमाणे) 'हम आपके है कौन!' च्या वेळी राजश्री प्रॉडक्शन ने त्या चित्रपटाची चित्रफीत प्रदर्शित केली नाही व सुरूवातीला एकच प्रिंट लिबर्टी सिनेमाकरीता आणि मग नंतर फक्त २७ प्रिंट काढल्या होत्या. आणि काही चित्रपटगृहांमध्ये तिकिटांचे दरही वाढविले होते. पण तो चित्रपट तुफान चालला. हे मुख्य कारण असेल बहुधा. आणखी काय गणिते होती मला अंदाज नाही. पण सर्व चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाची चलचित्रफीत बनवून त्याच दिवशी प्रदर्शित करणे बंद केले. ते आजतागायत चालू आहे. ह्यामुळे कितपत फायदा त्यांना झाला हे तेच सांगतील पण चित्रपट चाचेगिरी (पायरसी) वाढली असे म्हणतात आणि तसे दिसत आहेच.
त्यानंतर आले मल्टिप्लेक्स. त्यांनी तर तिकिटांचे दर अवाजवी वाढवून ठेवले. पण तरीही लोकांचे चित्रपटगृहात जाणे बंद झाले नसले तरी पायरसी वाढली असे म्हणता येईल. कारण ज्या ठिकाणी ३०/४० रू बालकनीला द्यायचे तिथे ८०/१००, नंतर १५०/२०० आणि आता तर ३०० रू प्रत्येकी देण्यापेक्षा ३० ते ५० रू रस्त्यावर मिळणारी व्हिसीडी/डिव्हीडी घेणे लोकांना स्वस्त वाटणे आणि त्यांनी त्या विकत घेणे स्वाभाविक झाले.
असो, ह्या सर्वांवर तोडगा म्हणून निर्मात्यांनी मटाच्या लेखात लिहिलेला मार्ग अवलंबिला असला तरी त्यामुळे आपला (प्रेक्षकांचा) फायदा हा निश्चितच आहे असे वाटते. कारण साधारण २ महिन्यांत नवीन सिनेमा एखाद्या वाहिनीवर दाखवला जातो. त्यामुळे घरबसल्या पाहता येतो. पण त्यात व्यत्यय असतो जाहिरातींचा. जर तो व्यत्यय नको असेल तर दुसरा मार्ग आहे, व्हिसीडी/डिव्हीडी विकत घेण्याचा. चोरीची म्हणजे पायरेटेड नव्हे तर खरी (ओरिजिनल) :) कारण तो चित्रपट वाहिन्यांवर दाखवला गेला म्हणजे त्याचा व्हिडीयो प्रदर्शित झाला असे म्हणता येईल आणि मग त्याची व्यवस्थित, खरी आवृत्ती बाजारात विकत मिळते. आणि त्यात तर काय, मोझर बेयर ने अतिशय कमी किंमतीत पर्याय उपलब्ध करून दिला आहे त्याचा फायदा घेऊ. 'ब्लू', 'अजब प्रेम की गझब कहानी' आणि कालच पाहिलेला 'दे दना दन' हे चित्रपट मी दूरदर्शन वाहिन्यांवरच पाहिलेत. आणि आज नाही पाहिला तर आपल्याला तो सिनेमा पाठ होईपर्यंत त्या वाहिनीवर दिसत राहील याची सोय त्या वाहिन्या करत आहेतच की ;).
तर मग काय, आधी होत असल्याप्रमाणेच चित्रपटगृहात पाहणे आवडत असल्यास, परवडत असल्यास सिनेमा पहायला चित्रपटगृहात जा, नाही तर थोडे दिवसांनी घरी पहायला मिळेलच :)