हिंदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हिंदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

डिसेंबर २९, २०१०

"लता मंगेशकर ए आर रहमान करीता पहिल्यांदा गाणार." 
’दिल से’ चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधी त्या लोकांनी जाहिरात केली होती. मी आणि माझ्या मित्राची चर्चा चालू होती की लता मंगेशकर ने गाणे गायला सुरूवात केल्याच्या कितीतरी वर्षांनंतर हा संगीतकार आला. त्यात मग लता मंगेशकर ने त्याच्याकरीता गाणे गायले ह्यात एवढे काही खास नाही. (लता मंगेशकर ओ. पी. नय्यर कडे गायली नाही ही गोष्ट सोडा. ती गोष्ट घडली असती तरी बातमी झाली असती का माहित नाही.) पण चित्रपटसृष्टीत (आणि इतरत्र ही) असे पहिल्यांदा होणारी, खूप वर्षांनी होणारी गोष्ट प्रकाशझोतात आणली जाते. काही वेळा त्यात किती तथ्य असेल ते ही न पाहता. अनुराधा पौडवाल ने १९९८/९९ मध्ये कोणत्या तरी सिनेमात गाणे गायले होते तेव्हाही असेच काहीतरी म्हणत होते की अनुराधा पौडवाल १० वर्षांनी पुन्हा चित्रपटात गाणे गात आहे. पण त्या आधीच १९९७ मध्ये ’और प्यार हो गया’ चित्रपटात तिचे गाणे ऐकले होते. आता शोधले तर १९७६ ते २००८ मध्ये प्रत्येक वर्षी तिने गाणे गायलेले दिसते. त्यांना बहुधा ’टी सीरीज’च्या बाहेर १० वर्षांनंतर म्हणायचे असेल. आमिर खान आणि काजोलचा ’फना’ सिनेमा आला तेव्हा दोघे पहिल्यांदा एका चित्रपटात, एका फ्रेम मध्ये असे काही तरी चालले होते. पण त्या आधी दोघे ’इश्क’ चित्रपटात येऊन गेले होते हे ते लोक विसरले होते किंवा मग त्यांना हे दोघे नायक-नायिका जोडीत पहिल्यांदा आलेत असे म्हणायचे असेल.


असो. हे जुने झाले. आता नवीन ताजी बातमी आहे. मराठीतील दोन दिग्गज कलाकार/दिग्दर्शक पहिल्यांदा एकत्र येत आहेत, ’आयडियाची कल्पना’ ह्या नवीन चित्रपटात. ते दोघे आहेत महेश कोठारे आणि सचिन (पिळगांवकर). ही गोष्ट खरोखरच बातमीसारखी आहे असे मला तरी वाटते. गेले कित्येक वर्षे मी मराठी चित्रपटांबद्दल बोलतो तेव्हा ह्या दोघांचे नाव अर्थातच पुढे असते. त्यातच माझ्या निरीक्षणातील गोष्ट होती की महेश कोठारेच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे नेहमी असायचा आणि सचिनच्या चित्रपटात अशोक सराफ. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे अनुक्रमे सचिन आणि महेश कोठारेंच्या चित्रपटात अधून मधून असत. पण सचिन आणि महेश कोठारे हे एकमेकांच्या चित्रपटात नव्हते. आता कित्येक वर्षांनंतर महेश कोठारे सचिनच्या दिग्दर्शनाखाली त्याच्या चित्रपटात काम करणार आहे. ही माझ्याकरीता बातमीच आहे. 

तसेच ह्या चित्रपटाद्वारे आणखी एक गोष्ट पहिल्यांदा होत आहेत. ते म्हणजे गायनानंतर आता सचिनचे संगीतकार म्हणून नवीन क्षेत्रात पदार्पण.

सचिन आणि महेश कोठारेचा विषय निघालाच आहे तर आणखी एक जाणवलेली गोष्ट. सचिनच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डेचे (आणि इतर सर्वजणांचेही) काम संतुलित वाटायचे. पण महेश कोठारेच्या चित्रपटात तो मोकाट सुटलेला दिसायचा. आणि बहुधा इतरही लोक. 

आता ह्या नवीन चित्रपटात पाहू कोणाचे काम कसे आहे ते आणि एकंदरीत पूर्ण चित्रपट कसा आहे ते.

(जाता जाता: आमिर खानचा पहिला चित्रपट ’कयामत से कयामत’ किंवा खरे तर ’यादों की बारात’ हा आहे. त्याच्या भावाचा, फैजल खानचा, पहिला चित्रपट कोणता? )

डिसेंबर २७, २०१०

’तीस मार ख़ान’ ह्या अक्षय कुमार अभिनित चित्रपटाबद्दल गेले काही दिवस ऐकत होतो, पाहत होतो. अक्षय कुमारचे ह्या आधीचे विनोदी चित्रपट आवडले होते ('दिवाने हुए पागल' सारखे अपवाद सोडून) त्याचे अशा चित्रपटांतील कामही आवडत होते. तसेच फराह खान चे ही ह्या आधीचे दोन चित्रपट (’मैं हू ना’ आणि ’ओम शांती ओम’) चांगले वाटले होते. म्हणून हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता होतीच. त्यात मग शनिवार २५ डिसें ला हा चित्रपट पहायची संधी मिळाली.





पण चित्रपटाच्या सुरूवातीलाच काही अंशी अपेक्षाभंगाला सुरूवात झाली. पहिल्या प्रसंगापासूनच सर्व लोकांचा म्हणजे सचिन खेडेकर, विजय पाटकर, अक्षय कुमार, अली असगर, कतरीना कैफ, अक्षय खन्ना ह्यांचा अभिनय हा नाटकीच वाटत गेला. आता नाटकी म्हणजे नाटकात पहायला मिळतो तसा नाही. तिथेही सुंदर अभिनय पहायला मिळतो. पण इथे तसला प्रकार नाही. गाणी बरी आहेत. ’शीला की जवानी’ हे बहुचर्चित गाणे मी तरी पहिल्यांदाच पाहिले. ऐकायलाच बरे वाटते. चित्रपटाची कथा तेवढी चांगली वाटली आणि पुर्वार्धापेक्षा उतरार्ध त्यामानाने चांगला आहे, थोडा वेगवान. त्यामुळे मग चित्रपट एकदम आवडला तर नाही पण कंटाळवाणा नाही वाटला. अरे हो, चित्रपटाच्या सुरूवातीचे आणि शेवटचे नामप्रदर्शन चांगले आहे.


फराह खानचा ’ओम शांती ओम’ आला तेव्हा ऐकले होते की ज्यांना ’मै हूं ना’ आवडला नसेल त्यांना ’ओम शांती ओम’ आवडेल. माझ्याकरीता तरी ’मैं हूं ना’ एकदम चांगला चित्रपट होता. ’ओम शांती ओम’ त्यापेक्षा कमी. पण ’तीस मार खान’ एकदमच कमी. चित्रपटगृहातून बाहेर पडल्यावर एका तासात मी हा चित्रपट पाहिल्याचेही विसरून गेलो होतो.


माझ्याकडून तरी चित्रपटाला ५ पैकी २ ते २.५ तारे मिळतील ;)
(चित्रपटाचे चित्र indiafm.com वरून)

नोव्हेंबर १४, २०१०

'गोलमाल', 'चष्मेबद्दूर', 'चुपके चुपके': मजेदार, विनोदी चित्रपट. भरपूर वेळा पाहिलेले. त्यांचा व्हिसीडी संच घेतला होता. आता नाही आहे.

 

मग दुकानात 'गोलमाल', 'चष्मे बद्दूर', 'चुपके चुपके' ह्यासोबतच 'खट्टा-मिठा' हा चित्रपट मिळून चार चित्रपटांचा डिव्हीडी संच असलेला पाहिला. तो घ्यायचे ठरवले.


पण मग परवा नवीन काय आले आहे हे पाहण्यास दुकानात गेलो तिथे हा १२ विनोदी चित्रपटांचा नवीन संच दिसला "फूलटू कॉमेडी".


ह्यात होते:
'गोलमाल', 'चष्मे बद्दूर', 'चुपके चुपके',
'बावर्ची', 'सत्ते पे सत्ता',
'हेराफेरी', 'फिर हेराफेरी',
'नो एंट्री', 'हलचल', 'आवारा पागल दिवाना',
'धमाल', 'अजब प्रेम की गजब कहानी'

शेवटच्या ३ पैकी 'आवारा पागल दिवाना', 'धमाल', 'अजब प्रेम की गजब कहानी'. ह्यातील आवारा पागल दिवाना कधी तरी पूर्ण पाहिला होता. चांगला वाटला. पण एकदम नाही. 'धमाल', 'अजब प्रेम की गजब कहानी' मी पूर्ण पाहिलेले नाहीत. पाहताना बरे वाटले. चांगले आहेत असे ऐकले होते. पण बाकीचे ९ चित्रपट भरपूर वेळा पाहिलेले आणि आवडलेले. त्यांच्याबाबतीत तर काही म्हणालयाच नको. त्यामुळे रू. ९९९/- किंमतीच्या मानाने १२ चित्रपटांचा हा संच वाजवी दरात मिळतोय असे वाटले. लगेच खरेदी केला. (आणि कोणाला घ्यायचा असेल तर शेमारू च्या संकेतस्थळावरूनही मागवू शकता. किंमतही कमी. मला नंतर कळले :( )

कंटाळा आला की आता ह्यातील एखादा चित्रपट काढून पाहता येईल. :)


('नॉन स्टॉप कॉमेडी' आणि 'कॉमेडी क्लब'ची चित्रे शेमारू च्या संकेतस्थळावरून साभार.)

एप्रिल १५, २०१०

पुढे लिहिलेले चित्रपट मी कमीत कमी २ वेळा तरी पाहिले आहेत (पहिले चार) किंवा एकदाच पाहिले असल्यास पुन्हा पाहण्याची इच्छा आहे. त्यानुसार मी हे आवडलेले चित्रपट म्हणून सांगत आहे. ह्या चित्रपटाच्या कथानकाचा, कलाकारांच्या कलेचा दर्जा एकदम उच्च नसला तरी आवडण्यासारखाच वाटला. तसेच आता पाहिल्यास तेवढेच आवडतील का ह्याची खात्री मलाही नाही :) पण तुम्हा सर्वांसमोर ही यादी देण्यासारखे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. तसेच कथानक लिहिण्यास/वाचण्यास आवडत नसले तरी वाचकांना ह्या चित्रपटांची ढोबळ कल्पना यावी म्हणून तेही लिहिले आहे.

यूंही कभी
-एक साध्या, नेहमी लोकांना मदत करणार्‍या माणसाला देव भेटतो व जगाचे रक्षण करण्याकरीता लोकांना संदेश देण्याकरीता सांगतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात घडलेले प्रसंग ह्यात दाखवलेले आहेत.
कलाकार: कुमार भाटिया, अशोक कुमार, अर्चना पुरण सिंह, नविन निश्चल.

ऐसी भी क्या जल्दी है?
-इंग्रजी सिनेमा ’फादर ऑफ द ब्राईड’ वरून घेतलेला सिनेमा. स्वत:च्या मुलीवर अतिप्रेम करणार्‍या व अतिचिंता करणार्‍या वडिलांचे, मुलगी लग्न झाल्यावर घरातून जाईल ह्या कारणाने मुलीच्या आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमात/लग्नात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणे दाखवले आहे.
कलाकार: सचिन, सॄष्टी बहल, विवेक मुशरन, अर्चना पूरण सिंह

हंसते खेलते
-पृथ्वीवरील वाढते असामाजिकीकरण आणि पृथ्वीचा होणारा र्‍हास पाहून देव पृथ्वीचा संपूर्ण नाश करण्याचे ठरवतो. पण ३ देवदूत त्याला विरोध करतात. तेव्हा देव त्यांना संधी देतो की एका आठवड्यात एखादा माणूस दाखवावा जो स्वार्थ न दाखवता इतरांवर प्रेम करेल व प्रसंगी त्यागही करेल. ह्या प्रकरणी ते ३ देवदूत राहूल रॉय ला निवडतात. त्यांच्या कामात अडथळे आणतो सैतान
कलाकार: राहूल रॉय, असरानी, राकेश बेदी, अनंत महादेवन, इशरत अली.

ढूंढते रह जाओगे
-एक तरूण (अमर उपाध्याय) त्याच्या प्रेमिकेला भेटण्यासाठी ती असलेल्या मोठ्या हॉटेल मध्ये येतो. तिथे एका व्यापार्‍याने (सतीश शहा) आपल्या एका हिर्‍याचा लिलाव करायचे ठरवले असते. तो हिरा चोरण्याकरीता चोर (जावेद जाफरी), एक खुनी (नसीरूद्दीन शाह) हे ही आलेले असतात. त्यांच्यात झालेले विनोदी प्रसंग ह्यात दाखविण्यात आले आहेत.

दो लडके दोनो कडके
-दोन गरीब तरूण पैसे मिळविण्याकरीता एका श्रीमंताच्या मुलाला पळवून आणतात. पण त्यांच्या घरातच दोन चोर चोरी करायला आलेले असताना त्या मुलाला पळवून नेतात. त्यानंतरचे प्रसंग.
कलाकार: अमोल पालेकर, असरानी. बाकीचे आठवत नाहीत :)

तेरा नाम मेरा नाम
-अजीत पाल आणि (बहुधा) बबलू मुखर्जी हे दोन तरूण मित्र. एक ब्राह्मण व दुसरा इतर जातीतला. ब्राह्मण मुलाला नोकरी पाहिजे असते पण तिथे आरक्षणामुळे त्याला मिळत नाही तर दुसर्‍याचे एका मुलीवर प्रेम असते. पण तिचे वडील तो ब्राह्नण नसल्याने त्याला विरोध करतात. म्हणून दोघेही नाव बदलतात. त्यानंतरची कथा दाखविली आहे.
ह्या सिनेमाचे नाव तेव्हा मला माहित नव्हते. पण एकदा दूरदर्शनवर रात्री दाखवला होता तेव्हा पाहिला. तेव्हा बरा वाटला. त्यानंतर पाहिले की ह्याच कथेवर नंतर आशिक मस्ताने (१९९६) आणि तेरे मेरे सपने (१९९६) हे चित्रपट ही बनलेत.

इना मिना डिका (मराठी)
-प्रशांत दामलेला (इना) कुठेही,केव्हाही झोपायची सवय असते. आणि त्याने झोपताना जे छायाचित्र पाहिले असते ते तो झोपलेला असेल तोपर्यंत प्रत्यक्षात येतात. त्याची बायको आणि त्याचा मित्र अशोक सराफ (मिना) त्याला एका डॉक्टरकडे , सुधीर जोशी (डिका) घेऊन जातात. डिका त्याच्या ह्या सवयीचा आणि चमत्काराचा फायदा घेऊन पैसे कमवायचा विचार करतो. त्यानंतरचे कथानक.
नंतर ह्याच नावाचा हिंदी सिनेमाही आला होता, ऋषी कपूर, जुही चावला आणि विनोद खन्ना ह्यांचा. पण त्या चित्रपटाच्या मानाने हा मराठी चित्रपट चांगलाच वाटला ;)

ही यादी पूर्ण नाही आहे. पण सध्या एवढेच आठवत आहेत. जमल्यास पुन्हा लिहिन.
तुम्हालाही असे काही वेगळे चित्रपट आवडले आहेत का?

जानेवारी १६, २०१०

लाफ्टर चॅलेंज नंतर प्रसिद्ध झालेला विनोदी कलाकार सुनील पाल ह्याने दिग्दर्शित व निर्माण केलेला 'भावनाओं को समझो' नावाचा सिनेमा काल प्रदर्शित झाला. हा सिनेमा मी अजून पाहिलेला नाही. ह्या सिनेमाबद्दल मला माहितही नव्हते. पण 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ह्या सब टीव्ही वरील विनोदी मालिकेत सुनील पाल पाहुणा कलाकार म्हणून आल्यानंतर कळले. त्या मालिकेत खरं तर सिनेमाची जाहिरात करावी हाच उद्देश होता.
असो, तर हे लिहिण्यामागचे कारण असे की आताच एका वृत्तवाहिनीवर पाहिल्याप्रमाणे ह्या सिनेमाचे नाव 'गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये घेण्यात आले आहे. ५१ स्टँड-अप कॉमेडियन ह्यांनी एकाच सिनेमात भूमिका केल्याने ह्या सिनेमाच्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. त्या सिनेमामागील सर्व कलाकार व सहकार्‍यांचे अभिनंदन. पण एरवी कुठल्याही लहान गोष्टीला उचलून धरणार्‍या वृत्तवाहिन्यांनी ह्याकडे दुर्लक्ष केले असे दिसतेय. फक्त एक-दोन वृत्तवाहिन्यांनीच ह्याची दखल घेतली म्हणून खंत वाटली. पण बहुधा सिनेमाच्या चमूने सिनेमाची किती जाहिरात केली असेल ह्यावरही हे थोडेफार अवलंबून आहेच.

आता हा सिनेमा कधी पहावा ह्याचा विचार चालू आहे। सुनील पाल, राजू श्रीवास्तव, जॉनी लीवर ह्यांनी सादर केलेले विनोद आधी आवडायचे। त्यामुळे त्यांचा एक विनोदी सिनेमा, तसेच आता ह्या विक्रमामुळे पहावा असे वाटते। पण लाफ्टर चॅलेंज नंतर ह्या लोकांनी सादर केलेले तेच तेच, किंवा त्याच प्रकारचे विनोद, तसेच २००७ मध्ये आलेल्या ह्या कलाकारांची भूमिका असलेला 'जर्नी -बॉम्बे टू गोवा' सिनेमा (थोडासा) पाहिल्यानंतर आता हा सिनेमा आवर्जून पहायला जावे असे सध्या तरी वाटत नाही.

जानेवारी १०, २०१०

अपेक्षेप्रमाणे 'शिक्षणाच्या आयचा घो' सिनेमाच्या नावावर वाद उठला. मराठा महासंघाने त्या नावावर आक्षेप घेतला आहे. गेल्या आठवड्यात उठलेला "झेंडा" सिनेमाचा वाद आणि आता हा. जमेल ते पक्ष , संघटना आता समोर येऊन आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करत आहेत. ( मराठा महासंघाची पत्रकार परिषद सध्या चालू आहे त्यात तर त्यांचेच वाक्य आहे की सिनेमा प्रदर्शित झाला तर आम्ही आमची ताकद दाखवू.)
साध्या विचारांत तरी मला हे कळत नाही की नेमका सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधीच हे वाद का उठतात? (सिनेमाच्या पथ्यावर पाडण्यासाठीही असू शकतात हे तर भरपूर वेळा दिसतेच. पण इथे ती शक्यता आहे का?)

आता 'झेंडा' सिनेमाचे एक वेळ मानू शकतो की त्यातील दृश्यांवर किंवा त्या व्यक्तिरेखेवर त्यांचा आक्षेप आहे, ते सर्व सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळू शकतात, काही वेळा सिनेमाच्या प्रोमो मधूनही. पण सध्या तरी हा सिनेमा अजून प्रदर्शित झाला नाही आणि प्रोमोमध्ये तरी काही आक्षेपार्ह संवाद वगैरे दाखविले नाहीत. मग 'स्वाभिमान' ने सिनेमा न पाहताच त्यावर आक्षेप कसा नोंदवला?

आणि 'शिक्षणाच्या आयचा घो' ह्या सिनेमाबद्दल म्हणायचे, तर ह्या नावाचा सिनेमा येणार आहे हे ३ महिने आधीपासूनच आपल्याला माहीत होते. ते नाव वाचून मी तेव्हाच मित्रांना म्हणालो होतो की ह्यावर ही वाद उठणार. मग त्या मराठी महासंघाला ३ महिने काहीच माहीत नव्हते का? आधीच का नाही तक्रार आली?

आणि सरकारचे तर काय म्हणावे? नेहमीप्रमाणे बघ्याचीच भूमिका घेणार. कोणी कायदा हातात घेतला तर आम्ही पाहून घेऊ म्हणतात. त्याआधीच का नाही काही करत?

असो, आपण तर काय सिनेमा पहायला मिळेल त्यानंतरच ठरवू काय चांगले आणि काय वाईट ते.

मार्च २१, २००९

दोन आठवड्यांपूर्वी रेडियो मिर्ची वर किशोर कुमारचे 'पडोसन' चित्रपटातील 'मेरे सामने वाली..' हे गाणे ऐकले. पण खास गोष्ट म्हणजे ते गाणे दुख:द छटेचे आहे. सिनेमात किंवा कॅसेटमध्येही ते गाणे कधी पहायला/ऐकायला मिळाले नाही. आंतरजालावर मिळालेल्या माहितीनुसार ते गाणे प्रदर्शित झाले नव्हते. पण ते गाणे ऐकण्यास जरूर मिळाले.

मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है|
अफसोस ये है के वोह हमसे कुछ उखडा उखडा रहता है|
पहले तो हवा उन जुल्फों से खुशबू भी चुराकर लाती थी|
भूले से कभी उडती उडती आवाज भी आ जाती थी|
आवाज से भी महरूम हुए, इस बात का दुखडा रहता है|
मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का टुकडा रहता है|


हे गाणे जर सिनेमात असते तर कोणत्या प्रसंगात असते असा मी विचार करत होतो. घरातील चर्चेनुसार 'भोला' (सुनील दत्त) ला गुंडानी मारल्यावर नंतर असेल. पण मला असेही वाटले की 'बिंदू'(सायरा बानू) जेव्हा मास्टरजीसोबत (मेहमूद) लग्न करण्याचे ठरवते तेव्हा. पण गाण्याचे शब्द आणि प्रसंगांचा ताळमेळ जमला नाही.

म्हटले तुम्हाला विचारू.
तुमच्या मते हे गाणे सिनेमात कुठे असू शकले असते व ह्या गाण्याबद्दल इतर, म्हणजे ध्वनीमुद्रित झाले होते तर सिनेमात किंवा कॅसेटमध्येही का नाही आले वगैरे वगैरे, माहिती मिळू शकेल का?

सप्टेंबर ११, २००८

नुकत्याच सुरू झालेल्या ’कलर्स’ वाहिनीवर नवीन चित्रपट दाखविण्याची जाहिरात बघितली (त्यावर एक-दोन चित्रपटही पाहिले), तेव्हा खूप दिवसांपासून मनात असलेले विचार पुन्हा समोर आले. हिंदी चित्रपट दाखविल्याशिवाय कोणतीही वाहिनी बहुधा तग धरू शकत नाही. जसे आम्ही वसतीगृहात राहत असताना एक मित्र खानावळीबद्दल बोलला होता की, बटाटे नसते तर ह्या मेस वाल्यांचे काय झाले असते? ;) आपल्याला ही सवय दूरदर्शनवर (वाहिनी बरं का, आधी ती एकच वाहिनी होती) हिंदी सिनेमे दाखवत होते तेव्हापासूनची. बहुधा त्यांना काही एवढी गरज नव्हती, पण लोकांची आवड म्हणून ते दाखवायचे.

त्याच आठवणीप्रमाणे, ह्या पुढच्या लिखाणात वाहिन्यांची फक्त हिंदी चित्रपटांची गरज नाही तर वाहिन्यांनी गरजेप्रमाणे काय काय बदल केलेले मला दिसले त्याचा आढावा घ्यायचा प्रयत्न केला आहे. ह्यात कार्यक्रमांच्या दर्जाबद्दल काही विचार नाहीत. फक्त त्यांची सुरूवात काय होती व आता कसे आहेत त्याबद्दल जाणवलेले थोडेसे.

सर्वात आधी मला आठवते ते ’सब टीव्ही’. SAB अर्थात श्री अधिकारी ब्रदर्स. अधिकारी बंधूंनी आपली नवीन वाहिनी सुरू केली तेव्हा त्यावर वेगवेगळे कार्यक्रम दाखवायला सुरूवात केली होती. विनोदी, गंभीर, भावनाप्रधान. त्यांच्या स्वत:च्या एवढ्या मालिका होत्या की त्यांना वास्तविक नवीन मालिका बनवायचीच गरज नव्हती. जुन्या हिंदी मालिका पुन्हा दाखवून, मराठी मालिका हिंदीमधे अनुवाद करून आणि नवीन कार्यक्रम ही बनवून, त्यांनी ती वाहिनी सुरू ठेवली होती. नंतर त्याचा साचा बदलून सांगितले की, आम्ही फक्त विनोदी कार्यक्रमच दाखवू. ह्या एवढ्या प्रकारात चित्रपटांना त्यांनी पूर्ण वगळले होते असे नाही. हिंदी चित्रपटांतील गाणी दाखवत होते पण कधी हिंदी सिनेमा दाखविला नाही. पुढे काय झाले माहित नाही, ती वाहिनी 'सोनी'ने विकत घेतली आणि त्याचा साचा पूर्णत: बदलला. आता ती ही इतर वाहिन्यांप्रमाणेच वाटते. काही सोडून बाकी सारखेच कार्यक्रम आणि सिनेमा.

'झी स्माईल' ह्या वाहिनीच्या नावाप्रमाणेच त्यावर विनोदी कार्यक्रम असण्याची अपेक्षा होती. जेव्हा सुरू झाली तेव्हा नेमके आमच्याकडे दिसत नव्हती. मध्ये मध्ये इतर ठिकाणी पाहिली तर सुरू होते त्यावर विनोदी चित्रपट व कार्यक्रम. पण आता त्यावरही झी टीव्ही वरील आधीच दाखविलेले गैरविनोदी कार्यक्रमही दाखवतात. माझ्या माहितीप्रमाणे 'झी स्माईल' ही भारतातील पहिली २४ तास विनोदी कार्यक्रम दाखविणारी वाहिनी होती आणि बहुधा त्याच स्पर्धेत सोनीने नवीन वाहिनी न आणता आधीच चांगली चालू असलेली 'सब टीव्ही' वाहिनी आपल्याकडे वळवून घेतली. :)

'स्टार' ने आधी इंग्रजी वाहिन्याच आणल्या होत्या. पण त्यांनी जेव्हा 'स्टार प्लस' हिंदी मध्ये बदलविले तेव्हा दूरदर्शनवरील काही मालिका तिकडे वळत्या केल्या. नंतर दूरदर्शनने कांगावा केला की एकच मालिका दोन वाहिन्यांवर दाखवायची नाही. आणि म्हणून त्यांनी काही मालिका दाखविणे बंद केले. पण ते स्वत: ’सर्फ व्हील ऑफ फोर्च्य़ून ’ सोनीवर चालू असतानाही दूरदर्शनवरही दाखवत होते. ती बहुधा त्यांची गरज होती. :)

२००३ की २००४ मध्ये एका वृत्तपत्रात बातमी आली होती की ई टीव्ही चे मालक (मालकच आहेत ना ते?) श्री. रामोजी राव ह्यांनी घोषणा केली होती की ई टीव्हीच्या वाहिन्यांकरीता आम्ही कधीच शुल्क आकारणार नाही. पण फायदा दिसला म्हणून की खरंच गरज पडली म्हणून, त्यांनीही त्यांच्या वाहिन्या सशुल्क केल्या.
मी ऐकल्या/वाचल्याप्रमाणे भारतातील वाहिन्यांच्या शुल्क आकारण्याचे नियम आणि इतर काही देशांतील नियम ह्यांच्यात फरक आहे. सशुल्क वाहिनी असेल तर त्या वाहिनीवर जाहिराती दाखवता येत नाहीत. हे जर खरे असेल तर आपल्या देशात तो नियम लागू होऊ शकतो का? शकल्यास लागू व्हायला किती वर्षे वाट पहावी लागेल? ;) झाला तर खरोखरच सर्व वाहिन्यांचा चेहरामोहराच बदलून जाईल ;)

अरे हो, एक वाहिनी तर राहिलीच. ’स्टार गोल्ड’. ही चित्रपट वाहिनी सुरू केली तेव्हा त्यांची टॅगलाईन होती, "लौट आये बीते दिन". अर्थात ते जुने सिनेमे दाखविणार होते, जे त्यांनी काही काळ दाखविलेही. पण त्यांनीही शेवटी स्वत:चा साचा बदलून नवनवीन हिंदी सिनेमे दाखविणे सुरू केले.

वृत्तवाहिन्यांबद्दल काय लिहावे? बहुधा १९९७/९८ मध्ये झी टीव्ही च्या पत्रोत्तराच्या कार्यक्रमात एकाने विचारले होते की, ’तुम्ही तुमच्या वाहिनीवर बातम्या का नाही दाखवत?’ तेव्हा त्याला उत्तर देण्यात आले होते की हे शक्य नाही आहे. पण दोन वर्षांतच त्यांनी नुसते काही वेळ बातम्या दाखविणेच सुरू नाही केले तर २४ तासाची वाहिनीच सुरू केली. आणि आज आपण तर पाहतच आहोत की किती वाहिन्या आल्या आहेत. ह्या सर्व वृत्तवाहिन्यांनीही आपला साचा नेहमी बदलवत आणला आहे. कुठवर नेतील कोणास ठाऊक :)

'सोनी' वर आधी क्रिकेट सामने दाखवित होते. पण मग त्यांनी 'मॅक्स' ही वाहिनी सुरू केली तीच क्रिकेट व हिंदी सिनेमांकरीता. त्यात तरी त्यांनी अजून बदल केला नाही. हो, पण त्यांना ती वाहिनी अपुरी पडते बहुधा. म्हणूनच 'सब टीव्ही' वरही सामने दाखविले जातात.

ह्या सर्व वाहिन्यांत काहीच वाहिन्या अजूनही जशा होत्या तशाच राहिल्यात. उदा. 'दूरदर्शन', 'डिस्कवरी'. त्यांच्या कार्यक्रम दाखविण्याच्या प्रकारात जास्त काही बदल झालेला नाही. डिस्कवरीवाल्यांना मी म्हणेन, तुम्ही बदलू नका, आणि दूरदर्शनवाल्यांना सांगेन, थोडे बदला.

गेल्या महिन्यापासून पाहत आहे की HBO वर इंग्रजी सिनेमे हिंदीत अनुवाद करून दाखवत आहेत, सोबत खाली इंग्रजी सब-टायटल्स. म्हणजे, HBO ही बदलत आहे की काय?

ऑगस्ट २७, २००८

'फूंक' चित्रपट थियेटर मध्ये एकट्याने बघणार्‍याला रामगोपाल वर्माने ५ लाख रूपये देण्याचे आव्हान दिले होते असे वाचण्यात आले.

अशीच एक पैज एका इंग्रजी सिनेमाकरीता ठेवली होती असे लहानपणी ऐकले होते. तो कोणता सिनेमा त्याचे नाव आठवत नाही. त्यावेळीही सिनेमागृहाच्या बाहेर एक ऍम्बुलन्स ठेवली होती असेही सांगण्यात आले होते. आणखी एक चित्रपट, बहुधा 'The Exorcist'. ह्या सिनेमाबद्दलही असे ऐकले होते की हा सिनेमा बनवून झाल्यानंतर पाहताना ९ जण भीतीने मेलेत. त्यामुळे त्या सिनेमाच्या मूळ प्रिंट्स जाळून टाकल्या गेल्या व त्याच कथेवर नवीन सिनेमा पुन्हा त्याच नावाने बनविण्यात आला.

आमच्या लहानपणी भूताचे सिनेमे पाहताना जरी भीती वाटत नसली तरी रात्री झोपताना थोडीफार भीती वाटायचीच. तशात कधी कधी माझी बहिणही मुद्दाम घाबरवत असे. घरीच व्हीडीओ प्लेयर असल्याने सुट्ट्यांमध्ये तर सिनेमे आणून पाहणे चालूच होते. भूताचे हिंदी चित्रपटही भरपूर पाहिलेत. काही वेळा आम्ही व्हीडीओ लायब्ररीत जाऊन भूताचे इंग्रजी सिनेमे देण्याची खास मागणी करत असू. जरी स्वत:हून भूताच्या सिनेमाची कॅसेट मागितली तरी एक-दोन चित्रपट आम्ही पूर्ण न पाहताच परतही केले होते. सुरूवातीला हे सर्व सिनेमे पाहताना भीती वाटायची. पण काही सिनेमात भूताचे(की राक्षस?) रूप पाहून काही वेळा हसूही येत असे. 'तहखाना' सिनेमात तर शेवटच्या मारामारीच्या वेळी भूत कोणाला तरी पायाने मारताना दाखविले तेव्हा त्याने कॅनवासचे बूट घातले असल्याचे आम्हाला वाटले होते. :) नुकताच येउन गेलेला ’भूलभूलैय्या’ सिनेमा प्रियदर्शनचे दिग्दर्शन, अक्षय कुमार व परेश रावल ह्यांचा सहभाग असल्याने बहुधा लोकांनी त्याला सुरूवातीपासूनच विनोदी सिनेमा गृहित धरला होता.

'फूंक' सिनेमा किती थरारक आहेत हे तर सिनेमा पाहिल्यानंतरच कळेल, पण त्याकरीता सिनेमागृहात जाणे जमेल की नाही अंदाज नाही. मला वाटते की अशा प्रकारचे सिनेमे सिनेमागृहात पाहण्यातच जास्त मजा येते. मोठा पडदा, मध्येच दचकवण्याकरीता टाकलेला चढा आवाज ह्याने थोडेसे भयप्रद वातावरण तयारच असते. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की असले चित्रपट चित्रपटगृहात जाउनच पहावेत.
आता भीती वगैरे काही वाटत नाही. पण सिनेमांतील काही प्रसंग जे पाहून खरोखरच भीती वाटली होती ते म्हणजे,
'वीराना': ह्यातील कारमध्ये बसलेल्या भूताचे पाय उलटे फिरविताना दाखविले होते. तो प्रसंग नंतरही काही दिवस मला घाबरवत होता.
'गहराई': एकदा रात्री दूरदर्शनवर दाखविला होता. तेव्हा मी सिनेमा पाहता पाहताच झोपी गेलो होतो. मध्येच जाग आली तेव्हा बहुधा पद्मिनी कोल्हापुरेच्या सिनेमातील दुहेरी आवाजाच्या प्रसंगामुळे भीती वाटली होती.
'राज' ह्या सिनेमात बिपाशा बसूला भूत प्रथम जेव्हा आरशात दिसलेले दाखविले तो प्रसंग भयप्रद वाटला होता.
'भूत' सिनेमात उर्मिला रात्री पाणी प्यायला जाते. परत येताना ती जेव्हा पायर्‍या चढून परत जाते त्यावेळी अचानक समोर भूत दाखविले तेव्हा खरोखरच दचकलो होतो.
लहानपणी ड्रॅकुलाचा कुठलासा इंग्रजी सिनेमा आणला होता. त्यात थोड्या सुरूवातीनंतर ड्रॅकुला जेव्हा शवपेटीचे झाकण उघडतो, तो प्रसंग पाहून तेव्हा का कोण जाणे आम्हाला एवढी भीती वाटली होती की आम्ही तो सिनेमा तेव्हाच बंद केला होता.

तुम्हालाही असे काही सिनेमे आठवतात का ज्यात, निदान तो सिनेमा पाहताना तरी, भीती किंवा कमीत कमी दचकणे तरी अनुभवले असेल?

ऑगस्ट ०६, २००८

रात्री घरी परत येत असताना घराजवळील एका रस्त्यावर एक लहान मुलगा रस्ता पार करत मस्त लकेर घ्यावी तसा आव आणून गात होता,
"बिना दूध की चाय बना लो,
शक्कर मत डालो...
सबसे आगे होंगे हिंदुस्तानी"
पुढे आणखी काही म्हणून मी ऐकत राहिलो पण काही ऐकायला नाही आले कारण तो मुलगा रस्ता ओलांडून पलिकडे गेला होता व मी ही पुढे निघून आलो होतो.
मनात विचार आला की लहान मुले काय काय गात असतात. बहुधा ९५-९६ मध्ये माझा एक भाचा गात होता, "तू तू तू तू तारा, चलते का नऊ ते बारा"
पुढे हाच प्रकार अनु मलिक ने खरोखरच वापरला होता जुडवा मधील गाण्यात, "टन टना टन टन टारा, चलती है क्या नौ से बारा"
तेव्हा वरील प्रकारातील मुलाने गायलेली ओळ एखाद्या सिनेमातीला गाण्यातही येण्याची शक्यता नाकारता येत नाही :)
खरोखरच ते गाणे असल्यास आणखी माहिती घेण्यास इच्छुक आहे.
(ता. क. ’सबसे आगे होंगे हिंदुस्तानी’ ही ओळ तर मुकुल आनंदच्या अर्धवट राहिलेल्या ’दस’ सिनेमातील गाण्याची आहे. तेव्हा गरजूंनी पहिल्या ओळींना हात लावावा ;) )

एप्रिल ०६, २००८

ह्या आधीचे लेख इथे वाचावेत.
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये
सिनेमांतील लक्षात राहिलेली काही वाक्ये - २

खुशिया बांटने से बढती है, दुख बांटने से कम होता है.
हेराफेरी मधील हे वाक्य. परेश रावल अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी ला सांगत असतो. नेहमीच्या जीवनात उपयोगी पडेल किंवा पडत आलेले असे हे.

दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम, गोली गोली पे लिखा है मरने वाले का नाम
जलजला (की झलझला?) ह्या सिनेमातील वाक्य डॅनीच्या तोंडी आहे. हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला तेव्हापासून हे वाक्य लक्षात राहिले आहे. (खरे तर तेव्हा एकदाच पाहिला आहे हा चित्रपट. बाकी २ वर्षापूर्वी चालू होता कुठल्याशा वाहिनीवर, पण नाही पहायला मिळाला.)

मै तुम्हे भुल जाऊ यह हो नही सकता और तुम मुझे भुल जाओ यह मैं होने नही दूंगा
सुनील शेट्टी शिल्पा शेट्टीला म्हणतो, धडकन सिनेमात. ह्याच्या गाण्यांची कॅसेट ऐकताना त्यात गाण्यांच्या आधीची वाक्येही ठेवली होती. (हा प्रकार जुन्या सिनेमांच्या गाण्यांच्या कॅसेट मध्ये पहायला मिळायचा. आता मध्ये पुन्हा वापरला गेला होता.) त्यानंतर सिनेमा पहाताना कळले की ह्यात सुनील शेट्टीची ऍक्टींग एकदम तीव्र आहे.

ऐ राहुल, मुझसे दोस्ती करोगे?
कुछ कुछ होता है सिनेमात राणी मुखर्जी शाहरूख खानला म्हणते. सिनेमात तो प्रसंग दाखविला नाही आहे पण सुरूवातीला शाहरूख खानला हे वाक्य आठवते असे दाखविले आहे. तसे म्हणायला गेले तर ह्या सिनेमातील एकूण एक वाक्ये त्यावेळी पाठ होती. (अगदी पार्श्वसंगितासोबत, त्याबद्दल नंतर कधीतरी). हे वाक्य वेगळ्या कारणाने लक्षात आहे अजून.वसतीगृहात असताना एका मुलाला, राहूल नाव त्याचे, सहज विचारले, फिल्मी स्टाईल मध्ये. "ऐ राहुल, मुझसे दोस्ती करोगे?". तो बहुधा आधीच कसल्या तरी रागात होता, रागात ’नाही’ म्हणून निघून गेला. :)

"नौकरी मिली?" "नही.. आपको?"
स्टाईल सिनेमात प्रिंसिपल दाखविलेला नट, स्वत:ची नोकरी गेल्यावर चंटू बंटू कडे मदत मागायला जातो. रात्री घरी आल्यावर जेवताना तो आपल्या मुलाला विचारतो की नोकरी मिळाली का? तेव्हा त्याचा मुलगा 'नाही' म्हणतो आणि त्याला विचारतो की 'तुम्हाला मिळाली का?' पूर्ण सिनेमा विनोदी असूनही हे ह्या एका वाक्याने इथे आणखी धमाल वाटते.

गाय ने दिवार पे चढके गोबर कैसे किया?
तकदीरवाला सिनेमात असरानीने चित्रगुप्त चे काम केलेले आहे. एका घरासमोर राहून तो काहीतरी न्याहाळत असतो तेव्हा त्या घरातील मुलगी पोलिसांना बोलाविते. तेव्हा असरानी पोलिसाला (बहुधा अनुपम खेरला) हे विचारतो.

T O to, D O do तो फिर G O गू क्यू नही होता.
चुपके चुपके सिनेमात धर्मेंद्र चे ओम प्रकाशला हे विचारणे सर्वांनाच लक्षात असेल.

"काहे मारा उसको?" "आप से मिलना था." "यह कोई तरीका हुआ मिलने का?"
नाना पाटेकर च्या माणसाला मारले म्हणून तो अजय देवगणला जाब विचारतो. तेव्हा अजय देवगण सांगतो की नाना पाटेकरला भेटायचे होते. त्यावर नाना पाटेकरचा प्रश्न. ही काय पद्धत आहे का भेटण्याची? सिनेमा तसा थोडाफार गंभीर होता. त्यात हे वाक्य विनोदी मजा देउन गेले. :D सिनेमा: अपहरण

डिसेंबर ३१, २००७

आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील...

ख्वाब हो तुम या कोई हकीकत..
किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे. अर्थात किशोर कुमार सोबत इतर लोकांचाही आवाज असल्याने ते लगेच लक्षात येते. (आठवले, तीन देवियां सिनेमातील हे गाणे.)
दहावीत (बहुधा ११ वीत ) असतानाची गोष्ट. मला ताप आला होता. त्यामुळे मी झोपलो होतो. मध्येच जाग आल्यावर पाहिले तर मी खोलीत एकटाच होतो. रात्री ११च्या नंतर बेला के फूल मध्ये हे गाणे सुरू होते. ते गाणे ऐकताना एकदम ताजेतवाने वाटत होते. त्यामुळे आता कधी ही हे गाणे ऐकले की एकदम फ्रेश्श वाटते ;)
(आताही हे लिहिता लिहिता मागे गाणे ही सुरू ठेवले आहे :) )

घूंघट की आड से..
आमिर खान, जुही चावलाचे हे गाणे ऐकायला मस्तच आहे. त्यातील शब्दही छान आहेत. हे गाणे ऐकताना मला माझ्या लहानपणीचा सार्वजनिक गणपती समारंभ आठवतो. ज्यात कॉलनीतील एका मुलाने व त्याच्या घरी आलेल्या एका मुलीने ह्या गाण्यावर नाच केला होता.

ह्या सोबतच तम्मा तम्मा लोगे (थानेदार) तसेच आशिकी मधील गाणी ऐकली की तेच सर्व गणपतीचे दिवस आठवतात, ज्यात दिवसभर ही गाणी सुरू असायची. तम्मा तम्मा लोगे वर तर मनात येईल तसा नाच केला होता.

फरेब मधील ओ हमसफर हे गाणे ऐकले की महाविद्यालयातील दुसरे वर्ष आठवते. आणि बाहेर पाऊस पडत आहे असेच वाटते. ह्याचे कारण हे की ही गाणी जेव्हा चालत होती तेव्हा पावसाळा होता आणि माझ्या बाजूच्या खोलीतील मुले हीच गाणी लावून ठेवत होती.

यह जो थोडे से है पैसे, मुझसे नाराज हो तो.. पापा कहते हैं मधील ही गाणी ऐकली की परीक्षेच्या आधी दिलेल्या सुट्ट्या आठवतात. अर्थात त्या सुट्ट्या अभ्यासाकरीता होत्या पण त्यात गाणी ऐकणे, सिनेमे पाहणे हे थोडेच थांबते. :)

अश्विनी ये ना..
गंमत जंमत मधील हे गाणे ऐकले की आधी किशोर कुमारची गाण्याची पद्धत, जी दूरदर्शन वर दाखविण्यात आली होती, आठवत होती तसेच त्यातील अशोक सराफ ची जी बायको दाखविली आहे (चारूशिला साबळे) तिचे झाडू घेऊन नाचणे आठवायचे. पण कॉलेज मध्ये गेल्यावर पाहिले आमचे एक सर प्रत्येक वार्षिक समारंभाला हे गाणे गायचे, आणि त्यांच्या शाखेच्या फ्रेशर पार्टीलाही. त्यामुळे आता कधीही हे गाणे ऐकले की कॉलेजचे ते समारंभ आठवतात.

ॐकार स्वरूपा..

कॉलेज मधील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात ह्याच गाण्याने व्हायची (आताही होत असेल). त्यामुळे हे गाणे ऐकले की मग ते समारंभ आठवणे आलेच.

मैं हूं झूम झूम झूमरू..
लहानपणी गणपतीतील अंताक्षरीच्या निवडफेरीत मी हे गाणे फक्त सुरुवातीच्या संगीतावरून ओळखून म्हटले होते. त्यामुळे अंताक्षरीत मी निवडला जाण्यास फायदा झाला होता. :)
तसेच कार्यालयाच्या सेमिनार वजा सहलीत औरंगाबादला असताना अजिंठा लेण्यात जाताना बसमध्ये हे गाणे गायलो होतो.
हे दोन प्रसंग ह्या गाण्याशी निगडीत राहतील असे वाटते.

ताक धिना धिन ताक धिना धिन...

रखवाला सिनेमातील हे गाणे त्यावेळी मला खूप आवडायचे. मी नेहमी गुणगुणत असे. शाळेत मग आमच्या वर्गात एक दोन वेळा मला गायलाही सांगितले होते. एकदा तर काय झाले की, आमच्या वर्गात दुसऱ्या वर्गातील मुलगा येऊन आमच्या टीचरला म्हणाला की मला त्यांच्या वर्गात बोलावले आहे. माझ्या टिचर ने मला पाठवले. तिकडे गेल्यावर कळले की त्यांच्या वर्गात अभ्यास संपला होता. मग मनोरंजन करण्याकरीता मला गाणे गायला सांगितले. तेव्हाही मी हेच गाणे गायलो होतो. आता ती इयत्ता/साल आठवत नाही, पण हे गाणे ऐकले की तो प्रसंग नक्की आठवतो.

अरे हो,
प्यार हमें किस मोड पे ले आया
सत्ते पे सत्ता चे हे गाणे तर राहिलेच. बंगळूरच्या ऑफिसच्या सहलीत सकाळी एका ठिकाणाहून परत येताना हे गाणे गाऊन मी धमाल केली होती. त्याच दिवशी मग संध्याकाळी बंगळूरला परत येताना ३ बस पैकी कोणत्या बसमध्ये बसावे हे विचार चक्र चालू असताना मित्रासोबत बसलो होतो. तेव्हा सकाळी आम्ही फिरायला गेलेल्या गटातील एक मुलगा मला शोधत आला व त्यांच्या बसमध्ये घेऊन गेला. तिथे तर मग काय हे गाणे, आणखी भरपूर धमाल गाणी गात, खेळ खेळत आम्ही परतीचा प्रवास केला होता.

छैया छैया
कॉलेजच्या वसतीगृहात जवळपास सर्व खोल्यांत हेच गाणे वाजविले जात होते. एवढा वैताग आला होता की मी माझ्या २/३ मित्रांना तर सांगितले होते की माझ्यासमोर हे गाणे लावायचे नाही. त्यांनी तर एकदा मग गंमत केली. मी एकाच्या खोलीत गेलो असताना मुद्दाम हे गाणे लावले व दुसऱ्या मित्राला जाऊन सांगितले की मी हे गाणे लावायला सांगितले. काय रागावला होता मग तो माझ्यावर. अर्थात मग नंतर ते आम्ही निकालात काढले होते.

आणखी ही गाणी आहेत, काही सध्या आठवत नाहीत.

तुमच्या आठवणींशी निगडीत अशी काही गाणी आहेत का?

डिसेंबर १०, २००७

ह्या आधीचा लेख इथे पहा.
सिनेमातील मला लक्षात राहिलेली आणखी काही वाक्ये....
मेरे दो दो बाप...गोपी-किशन चित्रपटात दोन्ही सुनील शेट्टी एकत्र पाहिल्यावर सुनील शेट्टीचा (गोपी) मुलगा म्हणतो. त्या मुलाची हे बोलण्याची शैली एकदम वेगळी.
आमच्या संगणक कार्यक्रमात (program) काही ड्यूप्लिकेट दिसले की हे वाक्य आठवते.

क्या करू संजना, ऐसा ही हूं मैं.... मत रहो ऐसे...
पहिले वाक्य अजय देवगण चे दुसरे वाक्य काजोलचे. अजय देवगणच्या त्या वाक्यावर काजोल ज्या तऱ्हेने लगेच त्याला म्हणते "मत रहो ऐसे" ते मनाला लागून जाते. चित्रपट: प्यार तो होना ही था.

तुमने अपने गॉड को देखा है क्या? फिर भी तुम उससे प्यार करती हो ना?.
संजय कपूरला न बघताही प्रिया गिल त्याच्यावर प्रेम करत असते. तिची मैत्रीण तिला समजावण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रिया गिल चे हे वाक्य खूप काही सांगून जाते. चित्रपट: सिर्फ तुम

मुर्गी वालों अपनी मुर्गी संभालो.
तेजाब सिनेमात चंकी पांडे आणि मंडळी इतरांना फसवून आपल्या खाण्याचे पैसे भरायला लावतात.त्या संदर्भातील हे वाक्य त्या सर्वांच्या तोंडी असते. मस्त धमाल करतात ते.

दरवाजा छोटा हो और सर झुकाना पडे तो आदमी छोटा नही हो जाता.
मेकॅनिक असलेल्या ॠषी कपूरकडे नाना पाटेकर जाण्यास नकार देतो, तेव्हा त्याचा मामा (मोहन जोशी) त्याला समजावत असतो की आपले काम असले तर त्याच्याकडे जाण्यात काही गैर नाही. सिनेमा: हम दोनो.

अगर ऍक्टींग कर पाता तो सिनेमा में काम न करता?
हे वाक्य सिनेमातील नाही. परंतु एक धारावाहिक "इंडीया कॉलिंग" मधील आहे. हे इथे लिहिण्याचे कारण त्यात अयुब खान हे वाक्य म्हणतो. त्याला तसे म्हणताना पाहून आम्ही मित्र म्हणालो होतो की, त्याने हृदयावर दगड ठेवून हे वाक्य म्हटले असेल. :)

वोह जो नीचे बोला था वह वापिस बोलो.
सत्ते पे सत्ता सिनेमात हेमा मालिनी रागविल्यानंतर एक बुटका गुरखा अमिताभला दटावत असतो. तेव्हा हेमा मालिनी गेल्यावर अमिताभ त्याला कॉलरला पकडून वर उचलतो आणि म्हणतो "वोह जो नीचे बोला था वह वापिस बोलो".
पुणे-मुंबई (जुन्या) महामार्गावर मी एशियाड मधील दरवाजाजवळील खुर्चीवर बसलो होतो. तेव्हा मागून एक दुचाकीवाला नुसता हॉर्न वाजवत पुढे गेला. चालकाने त्याला बसमधील उंचीवरून त्याला ज्या तऱ्हेने पाहिले ते पाहून मला अमिताभचे हे दृष्य/वाक्य आठवले.

ह्या सिनेमातील हेमा मालिनीचा अमिताभच्या घरील संवाद म्हणजे एकदम धमाल येते पाहताना.. राहवत नाही म्हणून लिहित आहे-
"कचरा, तुम खुद एक कचरा हो. बल्की कचरा भी तुमसे अच्छा होता है. गंदे... बदबूदार.... बरसों से नहायें नही. पास से जाओ तो ऐसा लगता हैं की घोडे के अस्तबल से निकल के आया हो.
तुम्हे क्या लगता हैं तुम्हे कोई लडकी चाहेगी, तुमसे कोई प्यार करेगा? अरे.. तुम तो कोई डराने की चीज हो डराने की. किसी को जहर देकर मारने की बजाय तुम्हारी शक्ल दिखायें तो वह खुद ब खुद मर जायेगा."


यार, मैं यहा कार की बात कर रहा हू और तुम बेकार की बात किये जा रहे हो.
शान चित्रपटात शशी कपूर बिंदिया गोस्वामीला बघत असतो आणि अमिताभ तिच्या कारला. त्यानंतर हे वाक्य. ते दृष्यानंतर प्रत्येकाचा गोष्टी बघण्याची तऱ्हा आणि ह्या वाक्यातील शब्द एकदम खास वाटले.

डुकरा बोलले म्हणून काय घर सोडून जायचे का?
भुताचा भाऊ सिनेमात जॉनी लीव्हर एक तांत्रिक दाखवला आहे. त्याला आपल्या प्लॅन मध्ये सामिल करण्यासाठी वर्षा उसगांवकर नाते बनवायचा प्रयत्न करत असते. तो चित्रपट पाहताना अचानक असे वाक्य ऐकून खूप हसू आले होते.

बेइमानी मैं करता नहीं और मेरे साथ बेइमानी करने वाले को मैं बख्शता नहीं.
त्यागी सिनेमात गुलशन ग्रोव्हर आपल्या एका मित्राला सांगत असतो. का माहित नाही पण हे वाक्य अजून ही लक्षात आहे.(तेव्हा त्या चित्रपटातील एकूण एक वाक्य पाठ झाले होते.)

दीदी..मुझे वह छतवाला ज्यादा पसंद है.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मध्ये काजोल ची बहिण तिला सांगते. पहिल्यांदा (नीट न )पाहिला तेव्हा त्यातील संवाद एवढे लक्षात नाही राहिले. पण एका मैत्रिणीने हे वाक्य त्यात आहे हे जेव्हा सांगितले त्यानंतर सिनेमात त्या दोघींचा हा संवाद वेगळेच काही सांगून गेला. (काय ते विचारू नका. तसा हा चित्रपटही अजूनही काही वेगळाच वाटतो.)

तुम्हे मारने के लिये मेरा आना जरूरी नही था. पर तुम्हे मरते हुए देखने का मौका मैं गवांना नही चाहता था.
सरकार चित्रपटात अभिषेक बच्चन झाकिर हुसेन (सिनेमात रशीद) ला म्हणतो. तेव्हा चित्रपटातील खिळून राहिल्यानंतर अभिषेक चे हे वाक्य आणि ह्यापुढील काही वाक्ये (स्वामी आणि मुख्यमंत्र्याला म्हटलेली) बोलण्याची शैली मस्त वाटली. त्यामुळे लक्षात आहे.

ह्यातच दुसरे एक वाक्य दिपक शिर्के ला म्हटलेले... "मैं भी यही चाहता हूं."

अशी भरपूर वाक्ये असतील. जमल्यास पुढे कधीतरी लिहेन. हिंदी चित्रपट बनणे आणि आम्ही ते पाहणे तर काय बंद
नाही होणार.

डिसेंबर ०९, २००७

आपण भरपूर चित्रपट पाहतो. त्यातील बहुतेक संवाद हे आपल्या लक्षात राहतात. बहुतेक वेळा ते संवाद किंवा ती एक एक वाक्ये लक्षात रहावीत अशाच प्रकारे लिहिलेली असतात.
उदा. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे मधील 'राज, अगर यह तुझसे प्यार करती है तो ये पलट के जरूर देखेगी... पलट... पलट' हे वाक्य. माझ्या मते हे वाक्य नेहमी वापरात यावे, लक्षात रहावे अशाच विचाराने लिहिले असेल. पण त्याच्या सादरीकरणावरही तेवढाच जोर दिला गेला.

आता असेच वाक्य शाहरूख खानच्याच राजू बन गया जंटलमन मध्ये वापरले गेले होते. किंवा खरे तर राजू बन गया.. मधील हे वाक्य "अगर वह पलट के सिस्टर की ऑंखो में आँखें डाल के देखेगा तो फिर वह जा नही पायेगा.... पलट... पलट" पुन्हा दिलवाले दुल्हनिया मध्ये वापरले गेले. हे वाक्य ज्या प्रकारे सिनेमात वापरले गेले आणि एवढे लोकप्रिय झाले, की ते पुन्हा वापरायचा मोह आवरता आला नसेल. पण एक आहे, ते वाक्य खरोखरीच अर्थपूर्ण आहे. :)

आता आणखी थोडी सर्वांना आवडलेली वाक्ये..
तुम्हारा प्लान ही गलत है.. लगता है कच्चा खिलाडी है.पहिले वाक्य आमिर खान परेश रावल ला म्हणतो, दुसरे वाक्य सलमान खानला. सिनेमा: अंदाज अपना अपना.. ह्या सिनेमातील तर एक एक वाक्ये लक्षात राहण्याजोगी आहे,

इसको क्या घडी करके डालू क्या?
अपना प्यारा सर्कीट, ह्याबद्दल जास्त लिहिणे नको. सर्वांनाच माहित आहे.

केक के लिये हम कहीं भी जा सकते है...
सैफ अली खान, डिंपल ला म्हणतो. सिनेमा दिल चाहता है.
अशी इतर प्रसिद्ध वाक्ये लिहिण्याचा प्रयत्न नाही. तो तर सगळीकडेच चालू असेल.
इथे आहेत मला लक्षात राहिलेली काही वाक्ये... आता ती तुमच्याही लक्षात नसतील, अर्थपूर्ण नसतील, खास कोणाच्या लक्षात रहावीत म्हणून लिहिली नसतील. पण काही कारणाने माझ्या लक्षात राहिलीत.

शैतान जहाँ जहाँ राम वहाँ वहाँ
राम लखन मधील हे वाक्य. सिनेमात शेवटच्या मारामारीच्या आधी आहे. मी आणि माझ्या बहिणीने ऐकल्याबरोबर प्रतिक्रिया दिली.. क्या डायलॉग है.

खुशकिस्मती सिर्फ़ एक ही बार दरवाजा खटखटाती है, पर बदकिस्मती तब तक दरवाजा खटखटाती है जब तक तुम दरवाजा ना खोल दो.

हमारा दिल आपके पास है. तनाझ कूरीम ऐश्वर्या ला सांगत असते. त्यातील शब्दांमुळे लक्षात राहिलेय अजून.

मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया.
चायना गेट.. मुकेश तिवारीच्या तोंडी हे वाक्य आहे. मी सिनेमा अजून पूर्ण पाहिला नाही पण हे वाक्य जरूर पाहिले आहे. एक वेगळे वाक्य म्हणून लक्षात राहिले.

अंकुश दिखने में भले ही छोटा हो, पर वह हाथी को काबू कर लेता है.
सिनेमा: मि. बेचारा. अनिल कपूर च्या छापखान्यात काम करणारा मुलगा कर्जाचे पैसे मागणाऱ्या लोकांना सांगतो.

धनाजी रामचंद्र वाकडे... ध.रा.वा. आता कोणाला धरावा?
धूमधडाका: अशोक सराफ जेव्हा शरद तळवळकरांच्या घरासमोर येतो तेव्हा हे वाक्य आहे. लहानपणी बहुधा पहिल्यांदा अशा प्रकारचे वाक्य ऐकले (किंवा समजले) असेल म्हणून अजुनही लक्षात आहे.

अरे मारने से पहले यह तो जान लिया होता के जिसे मार रहे वह कोई लुच्चा हैं या अपने मालिक का बच्चा है.
बोल राधा बोल... कादर खान ऋषी कपूरला मारल्याबद्दल गावकऱ्यांना जाब विचारत असतो. नक्की माहित नाही कोणी लिहिले ते. पण मला वाटतं हे वाक्य नक्की कादर खाननेच लिहिले असणार. अशाच प्रकारची बरीच वाक्ये कादर खानने भरपूर सिनेमांत म्हटली आहेत. कादरखानच्या तोंडी तशाच प्रकारचे संवाद असलेला सिनेमा म्हणजे स्वर्ग से सूंदर.
ह्यावरून आठवले. कादर खान हा हिंदीचा प्रोफेसर आहे असे ऐकले होते. त्याच्याच तोंडी हे असले संवाद/वाक्ये मग खटकतात.

घर का दूध खत्म हो गया है.
परिणीता मध्ये विद्या बालन संजय दत्त ला सांगते. पूर्ण सिनेमात एकदम अर्थपूर्ण, मस्त आणि छान वाक्ये असताना हे वाक्य ऐकून मला, माझ्या मित्रांना हसू आले. हे वाक्य नको होते असे वाटते.

मुझे दो दस चाहिये. एक दस.. दो दस.
जान से प्यारा मध्ये मतिमंद(?) गोविंदा आपल्या आईला (की इंस्पेक्टर भावाला) २० रू मागताना म्हणतो. एक वेगळे वाक्य आणि गोविंदाच्या संवाद शैलीने ते वाक्य लक्षात आहे.

याल्लोग को तडीपार नही बोलने का.
तडीपार सिनेमात मिथून बहुतेक वेळा स्वत:ला याल्लोग (की असेच काहीतरी) म्हणत असतो.

अठासी... नवासी... अस्सी
पनाह सिनेमात नसिरुद्दीन शहा ने इतरांना शिक्षा दिलेली असते, तेव्हा तो त्या नेणार असलेल्या मुलाला आकडे मोजावयास सांगतो. त्या मुलाची अठासी.. नवासी नंतर गफलत होऊन तो पुन्हा अस्सी वर सूरू करतो.

be patient be patient.. ok doctor.. ok doctor
ऐसी भी क्या जल्दी है सिनेमात विवेक मुशरान ची वाट पाहत सर्व बसले असताना सचिन म्हणतो की विवेक ला उशीर झालाय. अशोक सराफ त्याला म्हणतो be patient be patient.. तेव्हा सचिन म्हणतो ok doctor..ok doctor... (ह्यात अशोक सराफ डॉक्टर दाखविला आहे.)

समीर.. मुझे अपनी बाहों में भर लो..
मोहोब्बतें मध्ये किम शर्मा जुगल हंसराजला म्हणते. किम शर्माच्या त्या संवाद फेकीवर आम्हाला भरपूर हसू आले होते.

एक टीव्ही है फ्रीज है.. एक भगवान भी हैं देख...
सत्या सिनेमात स्नेहल (असेच काहीतरी त्याचे नाव आहे) जेव्हा चक्रवर्ती (सत्या) ला दिलेल्या खोलीत घेऊन येतो तेव्हा म्हणतो.

चाय से ज्यादा साला केटली गरम है.
पुन्हा स्नेहल.. हेराफेरी सिनेमात बस स्टॉप वर असरानीला दलाल समजून जेव्हा एक मुलगी देण्याकरता सांगतो, त्यात शेवटचे वाक्य. एक वेगळ्या प्रकारचे वाक्य म्हणून लक्षात राहिले.
पुढील दोन वाक्ये तेरे मेरे सपने सिनेमातील.

दोस्ती में पुछने का नही.. कर डालने का.

यार पहले तो तू सिर्फ करोडपती था.. अब तो अनमोल हो गया है.अर्शद वारसी म्हणत असतो चंद्रचूड सिंग ला, आपल्या घरी नेण्याआधी.

अपने सर के बाल झडेंगे तो उसका टूथब्रश बनाके दात साफ करेगा..
ह्या सिनेमाचे नाव ओळखा पाहू.... नाना पाटेकर, परेश रावल बद्दल अतुल अग्निहोत्रीला सांगत असतो.

अधर्मी... पापी.. दुराचारी.. बोल सॉरी..
एका धमाल चित्रपटात शेवटी असलेल्या धमाल नाटकातील वाक्य. जाने भी दो यारो सिनेमातील शेवटच्या महाभारत नाटकात नसिरुद्दीन शहाचे वाक्य.
ह्या सारखी खूप वाक्ये असतील, जी आपल्याला ह्या ना त्या कारणाने लक्षात राहिली असतील. सारखी सर्व सिनेमात वापरतात म्हणून नाही.

बाकीची वाक्ये पुन्हा कधीतरी.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter