एप्रिल ०७, २०१६

आज ट्वीटर वर एक बातमी पाहिली. काँग्रेस आणि भाजपच्या आसाममधील सभेचा ३६०अंशातील फोटो.  मला त्या सभांमध्ये काही रस नाही आहे, पण ३६० अंशातील फोटो म्हणून बातमी वाचायला घेतली. खरं तर फोटो पाहिले. ते वेगवेगळ्या अंशातून फिरविताना वरून पाहत असलेल्या दृश्यातून पृथ्वीसारखा गोल दिसला आणि मनात एक विचार आला की पृथ्वीवरील लोकसंख्या ज्याप्रकारे वाढत आहे त्याप्रकारे (थोडी अतिशयोक्ती करत) अवकाशातून बघितले तर असेच दिसेल ना?


असो. असे तसे विचार सोडून पृथ्वीवर परत येऊया. बातमी वाचायची असल्यास ह्या दुव्यावर मिळेल.

एप्रिल ०१, २०१६

गूगल हे नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान आणि उत्पादने आणून लोकांना चकित करत असते आणि ते लोकांच्या फायद्याचेही असते. जसे की जीमेल, गूगल मॅप्स, अँड्रॉईड, ३६० डिग्री, जीपीएस वगैरे वगैरे.

आज गूगलने नवीन गोष्ट बाजारात आणली आहे. 'स्नूपाविजन' (SnoopaVision) आज दुपारी यूट्यूबवर एक नवीन बटन दिसले. त्यावर टीचकी मारल्यावर कळले की 'स्नूपाविजन' हे यूट्यूबचे नवीन तंत्रज्ञान आहे ज्यात यूट्यूबवर असलेले सर्व व्हिडीयो ते ३६० डिग्री व्हिडीओ मध्ये रुपांतरीत करणार आहेत. (३६० डिग्री व्हिडीओ बद्दल विस्तृत माहिती लवकरच देतो येथे.)


ह्यातील मी नेहमी पाहत असलेली मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही रुपांतरीत व्हायला साल २०५१ पर्यत वाट पहावी लागेल.गंमत वाटली ना? आणखी मोठी गंमत पुढे आहे. त्यांचा स्वत:चा व्हिडीयो रुपांतरीत व्हायला साल २१६५ उजाडावे लागेल.अर्थात... काही खास नाही. हा एप्रिल फूल चा एक नमूना गूगलकडून. 
मार्च २९, २०१६


आज सकाळी दुचाकीने ऑफिसला जात होतो. पवईतील पिझ्झा हट् च्या सिग्नलजवळ पोहोचलो तेव्हा पाहिले ४ सेकंद बाकी होते, म्हणून गाडी न थांबवता सरळ गेलो. मी उजव्या बाजूला होतो. डाव्या बाजूला जी एकेरी मार्गिका आहे तिकडून बस नेहमीच उजवीकडच्या मार्गिकेत येत असतात. आजही एक बस तशीच आली, पण ती बस एकदम वेगात होती, सिग्नल बंद होत आला म्हणून असेल. माझ्या पुढे एका दुचाकीवर एक मुलगा, त्याच्या मागे मुलगी. त्यांच्या एकदम जवळ बस जात होती. त्या दोघांनी त्याच्याकडे हात दाखवत त्याला चूक सांगायचा प्रयत्न केला. ते पुढे निघून गेले. मागोमाग मी.

पाहिले तर तो चालक मोबाईलवर बोलत बस चालवत होता. पुढे सुवर्ण मंदिराच्या वळणावर मी आलो, तेव्हा त्या बसचालकाने त्या वळणावरही एकदम वेगात बस उजवीकडे वळविली, मी एकदम त्या बसजवळ. माझा वेग जास्त असता तर ठोकलोच असतो त्याला. मी ओरडलो तसे त्याने बस हळू केली. मी त्या बसच्या समोर बाइक उभी केली व त्याला रागावू लागलो. चालक म्हणाला 'मी बरोबर चाललोय, तूच उजवीकडे जागा सोडून इकडे आलास.' मी म्हणालो, 'मी सरळ चाललो होतो, तूच एकतर मोबाईलवर बोलत आणि वेगात हे वळण घेतलेस. मागच्या सिग्नललाही.'

ह्यात इतर बसमधील एक प्रवासी खिडकीत आला व मला दोष द्यायला लागला की मी उजवीकडे गाडी घ्यायला पाहिजे होती. मी म्हटले, 'तो मोबाइलवर बोलत, बस एवढ्या वेगात चालवतोय ते ही वळणावर आणि चूक माझी का? मग तुम्हीच भोगा पुढे काही झाले तर'


असाच एक अनुभव बँगलोरमध्ये होतो तेव्हाही आला होता. तेव्हा मी बाहेर गाडी चालवत नव्हतो तर त्याच बसमध्ये होतो आणि चालक मोबाईलवर बोलत बस चालवत होता, जोरात ब्रेक दाबणे पुन्हा वेगात नेणे वगैरे. तेव्हाही मी तक्रार केली तेव्हा लोक मलाच म्हणाले की 'तू त्याला काही बोलू नकोस.'

ह्यावरून एक नक्की.. लोकांना कोणी मोबाईलवर बोलत गाडी चालवत असल्यास काही आक्षेप नाही, उलट त्याला कोणी बोलल्यास ते ही चालत नाही. आणि स्वत:च्या जीवाचीही चिंता नाही.

मी आधीपासूनच गाडी चालवताना बसपासून दूर असायचो, आता तर बहुधा त्यालाच विचारावे लागेल, 'बाबा रे, मी तुझ्या बसच्या जवळून चूकून गेलो तर चालेल का?'

मार्च २५, २०१६


ईपीएफ वर कर लादण्याच्या असफल प्रयत्नानंतर कनिष्ठ व मध्यमवर्गीय लोकांना आर्थिक जाच देण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसलेली आहे असे दिसते.

फेब्रुवारीमध्ये त्यांनी पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीवरील व्याज वाढविले ते बहुधा हाच विचार मनात ठेवून की पुढे कर लावायचा आहे तर आता व्याजदर थोडा वाढवून देऊ, म्हणजे त्या आनंदात लोक करालाही मान्यता देतील. पण तसे झाले नाही आणि सरकारला कर मागे घ्यावा लागला. मग आता त्यांनी दुसरे पाऊल उचलले व त्यांनी पीपीएफ व किसान विकास पत्रावरील व्याज अनुक्रमे ०.६% व ०.९% टक्के कमी केले आहे. आणि ही कपात फक्त ह्या दोन योजनांमध्ये नाही तर इतरही योजना जसे 'ज्येष्ठ नागरिक बचत योजना', 'पोस्ट ऑफिस बचत योजनां'मध्येही ही लागू होणार आहे. तसेच पुढेही ह्यात कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आधीच हे व्याज महागाईला तोंड देऊ शकत नाही, तसेच त्यावरील उत्पन्नावर कर हा आहेच. एकूणच छोट्या गुंतवणुकदारांना आणखीन त्रास.

ह्याचे एक कारण असेही म्हणतात की रिझर्व बँकेने लागू केलेली व्याजकपात बँकांनीही लागू करण्यात ह्या छोट्या गुंतवणूकीतील व्याजदर अडसर आणत होत्या. हे एका प्रकारे मान्य आहे. पण ह्यात समानता / स्थिरता नाही. एका ठिकाणी बँकांनी कित्येक हजार कोटींची कर्जे लटकवून ठेवायची आणि काही लाखांच्या कर्जदार लोकांना व ठेवीदारांना त्रास द्यायचा. सरकार आणि रिझर्व बॅंकेचा ह्यावर काहीच अंकुश नाही आहे.

म्हणजेच सरकारने करबुडवे, कर्जबुडवे, काळा पैसाधारक ह्यांना अभय देत प्रामाणिक नागरिकांना वेठीस धरण्याचे आपले धोरण तसेच सुरू ठेवलेले दिसत आहे. 


(चित्रः आंतरजालावरून साभार)

मार्च १७, २०१६


दरवर्षीप्रमाणे पुन्हा 'पृथ्वीकरिता एक तास' अर्थात 'अर्थ अवर' ची चाहूल लागली आहे. १९ मार्च रोजी रात्री ८:३० ते ९:३० दरम्यान आपण वीजेची उपकरणे बंद करून वीज वाचवावी जी पृथ्वीकरीता उपयोगी पडेल असा त्यामागील हेतू आहे.

२००९ मी ही हे पाळून त्याबद्दल येथे लिहिले होते. मधली वर्षे त्याबद्दल जास्त रस दाखविला गेला होता की नाही सध्या आठवत नाही.

आता ह्या वर्षीही त्याबद्दल बोलले जात आहे. कार्यालयातही ह्याबाबत ईमेल येत आहेत. कंपनीच्या अंतर्गत संकेतस्थळावरही त्याबद्दलची चर्चा सुरू आहे. विविध देशांतील आमची कार्यालये हे पाळतील असे म्हटले आहे. भारतातील कार्यालयातही हे पाळले जाईल. अर्थात शनिवारी कार्यालयीन सुट्टी असल्याने त्याचा एवढा प्रभाव पडेल असे वाटत नाही. पण तरीही चांगले आहे. निदान खाजगी कंपन्या, इतर काही देशांतील काही लोक ते पाळतील असा अंदाज आहे.

पण भारतात इतर ठिकाणी ह्याचा प्रभाव किती असेल? मला तरी शंका आहे. लोकांच्या एकूण हेतूबद्दल नाही. काही लोक पाळत असतील हे, जरी सर्व नाही. पण शंका येण्याचे दुसरे मोठे कारण आहे की, १९ मार्चला संध्याकाळी ७:३० वाजता टी२० विश्वचषकाचा भारत वि. पाकिस्तान सामना आहे. आता भारत-पाकिस्तान सामना म्हटला की आधीच लोकांना उत्साह आलेला असतो, त्यात विश्वचषकाचा सामना. मग घरात तर काय बाहेरही वीज बंद होणार नाही. बहुधा जास्त टीव्ही व प्रोजेक्टर वापरले जातील.

म्हणजेच ह्यावेळी भारतात तरी अर्थ अवर ला जास्त पाठिंबा मिळणार नाही असे वाटते.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter