फ्लॅट टायर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
फ्लॅट टायर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सप्टेंबर १९, २०१०

ह्याआधीचे प्रसंग येथे वाचा.

काल रात्री दरवाजा बंद करून झोपलो. सकाळी उशीरापर्यंत झोपायचे होते. पण दरवाजाचे कुलूप ठीक करायला येतील म्हणून ८:३० ला उठलो. ९:४५ पर्यंत वाट पाहिली. परंतु काही हालचाल नाही. तो पर्यंत बजेटला (कार वाले)फोन  करून परिस्थिती सांगितली. त्यांनी सांगितले, "काही हरकत नाही. तुम्ही गाडी घेऊन या. कागदपत्रांची पूर्तता करा. आम्ही गाडी बदलून देऊ." म्हटले, "चला.एक काम तर सोपे झाले."

अपार्टमेंटच्या कार्यालयाला फोन केला. पण ते म्हणतात, "तुम्ही अपार्टमेंट क्रमांक आणि फोन क्रमांक देऊन ठेवा. आम्ही तुम्हाला फोन करू." थोड्या वेळाने त्यांचा फोन आला. तो म्हणाला, "तुमचे अपार्टमेंट आमच्या अखत्यारीत नाही येत. ज्यांच्याकडून भाड्याने घेतले आहे त्यांना संपर्क करा." तो क्रमांक मिळविला. आणि त्यांना फोन केला. आता तिथली बाई म्हणाली, " आज शनिवार असल्याने शक्यता कमी आहे. पुढील व्यावसायिक दिवसात आम्ही तुमचे काम करून देऊ." मी म्हटले," ही महत्त्वाची गोष्ट आहे. कॄपया प्रयत्न करा". ती म्हणाली," ठीक आहे. मी प्रयत्न करते."

आता गंमत बघा. कुलुप बंद होत नसेल तर मी घराच्या बाहेर नाही जाऊ शकत. जर बाहेर जाताना कसे तरी बंद केले तर पुन्हा आत जाण्याची खात्री नाही. अर्धा पाऊण तास वाट पाहिली तरी काही उत्तर नाही. पुन्हा फोन केला. ती म्हणाली, " आम्ही त्यांना संदेश देऊन ठेवला आहे. त्यांच्याकडून उत्तर आले नाही अजून." पुन्हा अर्ध्या तासाने फोन केला," तेव्हा ती म्हणाली, "त्यांचा माणूस दुसर्‍या एका जागी गेला आहे. तिकडचे काम संपल्यावर तो येईल. पण त्यात कमीत कमी १ २ तास जातील." आता काय करणार? वाटच पहावी लागेल.

पण १२ च्या आसपास (म्हणजे खूप लवकर) दरवाज्यावर ठकठक झाली. बाहेर एक माणूस उभा होता. "तुमच्या दरवाज्याच्या कुलुपामध्ये अडचण आहे का?", त्याने विचारले. मी म्हटले, "हो." तो आत आला. कुलुपाशी चाळे करून काय झाले ते पाहिले. स्क्रू ड्रायव्हर काढला. स्क्रू काढून पूर्ण कुलूप बाहेर काढले. म्हणाला, " मी थोड्या वेळात येतो." बाहेर गेला. थोड्या वेळात एक नवीन कुलुप घेऊन आला. त्याला विचारले, "नवीन लावणार का?" तो म्हणाला,"हो. ह्यात नवीनच लावावे लागेल." ५ मिनिटांत कुलूप लावले. एक चावी काढून घेऊन गेला. म्हणाला," आमच्या कार्यालयात एक ठेवावी लागते."

हुश्श. एक काम तर झाले. आता गाडीचे काम. दुसरे एक काम बाकी होते. ते करून मग बजेट कडे निघालो. त्याआधी चाकांचा फोटो घेऊन ठेवला :)

पुढचे चाक:


मागचे चाक:


त्यांनी सांगितल्याप्रमाणे जास्त वेग नाही म्हणून ११ मैल ३० च्या वेगाने गेलो. जिथे नेहमी ४०-४५ चा वेग असतो. हजार्ड/पार्किंग लाईट लावून गाडी नेत होतो. आता कमी वेगाने जायचे म्हणून एकदम उजव्या रांगेतून जात होतो. पण डावीकडे वळताना पूर्ण डावीकडे यावे लागेल. नेमकी आज रस्त्यावर जास्त गर्दी. पार्किंग लाईट मधून वळणाचा संकेत कळणार नाही म्हणून तात्पुरता तो बंद करायचो. परत चालू. :)

तिकडे पोहोचल्यावर जास्त काही करावे लागले नाही. कागदपत्रांची पूर्तता करून दुसरी गाडी घेतली आणि आरामात परत निघालो.

सप्टेंबर १८, २०१०

"FLAT TIRE?"
गाडीतून (इकडील ट्रक) उतरल्या उतरल्या तो मोठ्या आवाजात म्हणाला. निलेश म्हणाला, ’हो’. मी म्हणालो," आम्हाला ते ठीक करणे जमले नाही." मग त्याने कागदपत्रे काढली व माझे नाव पत्ता लिहिण्यास सुरूवात केली.

हा प्रसंग आज रात्रीचा. संध्याकाळी निलेश आणि सुंदर सोबत अक्षयच्या घरी गणेशोत्सवानिमित्त गेलो होतो. तिकडे घरासमोर रस्त्याच्या बाजूला माझी गाडी लावली व त्यांच्या घरी गेलो. तिकडे गेल्यावेळेप्रमाणेच आरती, प्रसादाचा कार्यक्रम झाला. नंतर गप्पा मारत बसलो होतो. ९:३० च्या आसपास दुसर्‍या मित्राकडे जायचे म्हणून आम्ही परत निघालो. अक्षय इतरांना सोडायला बाहेर आला होता. त्यांच्याकडून कळले की त्यांच्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता. (इकडच्या भाषेत Flat Tire)  आम्ही निरोप घेऊन निघालो.

कार मध्ये बसलो. समोरच्या दर्शकावर लिहिले होते. TIRE LOW ADD AIR. ’वा.. मजा आहे’ .निलेश ने बाहेर जाऊन पाहिले. डावीकडील मागच्या चाकातील हवा पूर्ण गेली होती. म्हटले आता काय करायचे? दुसरा मित्र ही घरी वाट पाहत होता. मग कारच्या चावीसोबत लावलेल्या माहितीपट्टीवरून बजेटचा 'रोडसाईड असिस्टंस' क्रमांकावर फोन लावला. अपघात झाला असेल तर १ दाबा, इतर मदतीकरीता २. २... फ्लॅट टायर १ दाबा, पुढे आणखी काहीतरी क्रमांक होते. माझ्या कामाचा क्रमांक लावला. समोरून एका स्त्रीने पूर्ण माहिती विचारली, अमेरिका की कॅनडा, नाव काय, कोणती गाडी, वगैरे वगैरे. माझे नाव त्यांना समजावून सांगताना नेहमीच अडचण येते. मग पत्ता विचारला. पत्त्याकरीता निलेशला फोन दिला. अर्थात पहिल्याच दिवशी गेल्याने मला तो कोणाला नीट सांगण्यासारखा माहित नव्हता. त्यांनी सांगितले की ४० मिनिटांत त्यांचा माणूस येईल. आम्ही घरी जाऊन बसलो.

तोपर्यत दुसर्‍या मित्राला सांगितले की असे असे आहे. तो म्हणाला की मग उद्या भेटुया. तिथे बोलता बोलता कळले की इथे स्टेपनी चे चाक हे इतर चाकांपेक्षा लहान असते. फक्त तात्पुरत्या सोयीकरीता बदलून मिळण्यासारखे. नवीन गोष्ट कळली. आपल्या इकडे तर सर्व चाक एकाच आकाराचे. बदलून पुन्हा प्रवासास निघा. आता तर काय टयुबलेस टायरही आलेत. जरी पंक्चर झाले तरी थोडे किमी जाऊन बदलता येतील . असो, पुन्हा आजच्या प्रसंगाकडे.

१५ मिनिटांतच कळले की बाहेर एक गाडी आली आहे. तिकडे गेलो. ट्रक मधून एक गलेलट्ठ इसम उतरला.
"FLAT TIRE?"
गाडीतून (इकडील ट्रक) उतरल्या उतरल्या तो मोठ्या आवाजात म्हणाला. निलेश म्हणाला, ’हो’. मी म्हणालो," आम्हाला ते ठीक करणे जमले नाही." मग त्याने कागदपत्रे काढली व माझे नाव पत्ता लिहिण्यास सुरूवात केली. त्यानेही नाव विचारले. शिंची कटकट. DEV पुढचा D सांगितला तर तो अडखळला. पहिला लिहिलेला की अजून एक. त्याला म्हटले, "मीच लिहून देतो." नाव लिहून दिले. पत्ता त्याने समोरील पत्रपेटीवरून पाहिला. कागद भरून झाल्यावर गाडीतून ते लहान चाक बाहेर काढले. नंतर हवा गेलेले चाक काढण्याच्या प्रयत्नास लागला. आम्ही आपल्या सवयीप्रमाणे तिकडेच उभे होतो. त्याने आम्हाला सांगितले की तुम्ही कारच्या त्या बाजूला जाऊन उभे रहा. ते चाक काढून झाल्यावर आम्ही ते चाक बघत होतो की नेमके काय झाले. अंधारात त्याच्या ट्रकचा हेडलाईट आणि भ्रमणध्वनीच्या प्रकाशात जेवढे दिसेल ते. आम्हाला शंका होती की कोणीतरी मुद्दाम आमच्या गाड्यांमधील हवा काढली आहे. तिकडून एक माणूस चालत (की जॉगिंग करत) गेला. म्हणाला ,"You got Flat Tires. That sucks." निलेश च्या निरिक्षणाप्रमाणे तो ४/५ वेळा तिकडून गेला होता. आणि आम्हाला आता वाटले की त्यानेच काहीतरी केले असणार,  त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर गाडी लावली म्हणून. पण नेमके काहीच सांगू शकत नाही. इकडे त्या टायर बदलणार्‍या माणसाने आमची आणि दुसरी हवा गेलेली कार पाहिली आणि म्हणाला होता, "तुम्ही कशावरून तरी गाडी चालवली का ज्याने टायर पंक्चर झाले? मी ही त्यावरून नेले नसेल म्हणजे बरे" :)

"Watch Out", चाक बदलून झाल्यावर त्याने सांगितले, जॅकवरून कार खाली सोडली. नंतर जॅक परत घेऊन गेला. मोठा टायर कारमध्ये त्या जागेत बसणार नाही म्हणून वरच ठेवला. नंतर गाडीचे मैल लिहून घेतले. "'५० मैल/तास' आणि '५० मैलांपेक्षा जास्त नाही', आणि त्या आधी टायर दुरूस्त करून घ्या". त्याने सूचना दिली, एका कागदावर माझी सही घेऊन निघून गेला. आम्ही सर्वांचा निरोप घेऊन निघालो. नेहमीपेक्षा हळू.  समोरच्या दर्शकावर हवेचा दाब दाखवत होते ३४, ३५ (पुढचे) आणि १, ३५ (मागचे) लहान चाकाचा हवेचा दाब नीट न मोजता आल्याने बहुधा ते १ दाखवत होते. तिथे पुन्हा बजेट चा फोन आला. काम झाले की नाही आणि कसे झाले विचारण्याकरीता. निलेश आणि सुंदरला त्यांच्या घरी सोडून मी माझ्या घराकडे परत आलो. अहाहा... काय ती वेगळी मजा. नेहमी कमीत कमी ३५/४० च्या वेगाने गाडी नेणार्‍या रस्त्यावर २०च्या वेगाने :)

घरी आलो. कुलुप उघडले. २ ३ दिवस ते उघडताना अडकत होते. कसेतरी उघडले. आत आल्यावर दरवाजा बंद केला. कुलुप लावताना अडकत होते. दरवाजा उघडून प्रयत्न केला. आता कुलूप लागले पण उघडत नव्हते. आली का पंचाईत? एका प्रसंगातून बाहेर आलो आता दुसरा. रात्रीचे ११ वाजले आणि घराचा दरवाजा बंद नाही करता येत. :) तेवढ्यात आठवले. अपार्टमेंटच्या कार्यालयात वाचले होते की कार्यालयीन वेळेनंतर महत्वाच्या कामांकरीता एक फोन क्रमांक लिहून ठेवला आहे. तो पाहण्याकरीता कार्यालयाकडे गेलो. तिथे एक सुरक्षा रक्षक दिसला. त्याला सांगितले असे असे आहे. त्याने वही आणि पेन काढला. "नाव काय?" DEV पुढच्या D ला तो ही अडखळला. पुन्हा शिंची कटकट. त्याला म्हटले, "मीच लिहून देतो. " लिहून दिल्यानंतर त्याने पुन्हा नेमके काय झाले ते विचारले. मग त्याने दुसर्‍याला फोन करून हे सांगितले. मी विचारले,"काय झाले." तर म्हणाला, "मी नुसता सुरक्षेकरीता आहे. माझ्यापेक्षा वरिष्ठ माणसाला बोलावले आहे जो व्यवस्थापनामध्ये आहे." मला पुलंच्या 'म्हैस' मधील 'आमाला पावर नाय" म्हणणारा पोलिस आठवला :)

थोड्यावेळाने तो दुसरा माणूस आला. त्याला घेऊन अपार्टमेंट पर्यंत आलो. त्याला दाखवले काय झाले ते. त्यानेही थोडया उचापती करून पाहिल्या. तो म्हणाला, " मी जेवढे करू शकेन ते करून पाहिले. आता दुरूस्त करणार्‍याला बोलावून आणतो." थोड्या वेळाने तो आला आणि म्हणाला की, " आता ११:३० झाल्याने कोणी नाही आहे. उद्या सकाळी पहिले काम हेच करू" अंदाजे वेळ विचारली  तर म्हणाला " ८ ते १०. तो पर्यंत तुम्हाला जमल्यास ते कुलूप दरवाजा बंद करता येईल असे कराव , व कुलूप लावून ठेवा. उद्या सकाळी पाहिजे तर गॅलरीत येऊन आम्हाला बोलावू शकता" म्ह्टले ठीक आहे. कसे तरी ते कुलूप दरवाजा बंद करण्याकरीता नीट केले.

आता झोप झाल्यावर उद्या सकाळी २ कामे. १. अपार्टमेंट चे कुलुप दुरुस्त करणे व २. ते हवा गेलेले चाक दुरूस्त करणे. कसे काय? ते कार भाडयाने देणार्‍या कंपनीलाच विचारेन.

ती सगळी माहिती उद्या जसे होईल तसे सांगतो :)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter