सामाजिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मार्च २९, २०१६


आज सकाळी दुचाकीने ऑफिसला जात होतो. पवईतील पिझ्झा हट् च्या सिग्नलजवळ पोहोचलो तेव्हा पाहिले ४ सेकंद बाकी होते, म्हणून गाडी न थांबवता सरळ गेलो. मी उजव्या बाजूला होतो. डाव्या बाजूला जी एकेरी मार्गिका आहे तिकडून बस नेहमीच उजवीकडच्या मार्गिकेत येत असतात. आजही एक बस तशीच आली, पण ती बस एकदम वेगात होती, सिग्नल बंद होत आला म्हणून असेल. माझ्या पुढे एका दुचाकीवर एक मुलगा, त्याच्या मागे मुलगी. त्यांच्या एकदम जवळ बस जात होती. त्या दोघांनी त्याच्याकडे हात दाखवत त्याला चूक सांगायचा प्रयत्न केला. ते पुढे निघून गेले. मागोमाग मी.

पाहिले तर तो चालक मोबाईलवर बोलत बस चालवत होता. पुढे सुवर्ण मंदिराच्या वळणावर मी आलो, तेव्हा त्या बसचालकाने त्या वळणावरही एकदम वेगात बस उजवीकडे वळविली, मी एकदम त्या बसजवळ. माझा वेग जास्त असता तर ठोकलोच असतो त्याला. मी ओरडलो तसे त्याने बस हळू केली. मी त्या बसच्या समोर बाइक उभी केली व त्याला रागावू लागलो. चालक म्हणाला 'मी बरोबर चाललोय, तूच उजवीकडे जागा सोडून इकडे आलास.' मी म्हणालो, 'मी सरळ चाललो होतो, तूच एकतर मोबाईलवर बोलत आणि वेगात हे वळण घेतलेस. मागच्या सिग्नललाही.'

ह्यात इतर बसमधील एक प्रवासी खिडकीत आला व मला दोष द्यायला लागला की मी उजवीकडे गाडी घ्यायला पाहिजे होती. मी म्हटले, 'तो मोबाइलवर बोलत, बस एवढ्या वेगात चालवतोय ते ही वळणावर आणि चूक माझी का? मग तुम्हीच भोगा पुढे काही झाले तर'


असाच एक अनुभव बँगलोरमध्ये होतो तेव्हाही आला होता. तेव्हा मी बाहेर गाडी चालवत नव्हतो तर त्याच बसमध्ये होतो आणि चालक मोबाईलवर बोलत बस चालवत होता, जोरात ब्रेक दाबणे पुन्हा वेगात नेणे वगैरे. तेव्हाही मी तक्रार केली तेव्हा लोक मलाच म्हणाले की 'तू त्याला काही बोलू नकोस.'

ह्यावरून एक नक्की.. लोकांना कोणी मोबाईलवर बोलत गाडी चालवत असल्यास काही आक्षेप नाही, उलट त्याला कोणी बोलल्यास ते ही चालत नाही. आणि स्वत:च्या जीवाचीही चिंता नाही.

मी आधीपासूनच गाडी चालवताना बसपासून दूर असायचो, आता तर बहुधा त्यालाच विचारावे लागेल, 'बाबा रे, मी तुझ्या बसच्या जवळून चूकून गेलो तर चालेल का?'

मार्च १७, २०१६


दरवर्षीप्रमाणे पुन्हा 'पृथ्वीकरिता एक तास' अर्थात 'अर्थ अवर' ची चाहूल लागली आहे. १९ मार्च रोजी रात्री ८:३० ते ९:३० दरम्यान आपण वीजेची उपकरणे बंद करून वीज वाचवावी जी पृथ्वीकरीता उपयोगी पडेल असा त्यामागील हेतू आहे.

२००९ मी ही हे पाळून त्याबद्दल येथे लिहिले होते. मधली वर्षे त्याबद्दल जास्त रस दाखविला गेला होता की नाही सध्या आठवत नाही.

आता ह्या वर्षीही त्याबद्दल बोलले जात आहे. कार्यालयातही ह्याबाबत ईमेल येत आहेत. कंपनीच्या अंतर्गत संकेतस्थळावरही त्याबद्दलची चर्चा सुरू आहे. विविध देशांतील आमची कार्यालये हे पाळतील असे म्हटले आहे. भारतातील कार्यालयातही हे पाळले जाईल. अर्थात शनिवारी कार्यालयीन सुट्टी असल्याने त्याचा एवढा प्रभाव पडेल असे वाटत नाही. पण तरीही चांगले आहे. निदान खाजगी कंपन्या, इतर काही देशांतील काही लोक ते पाळतील असा अंदाज आहे.

पण भारतात इतर ठिकाणी ह्याचा प्रभाव किती असेल? मला तरी शंका आहे. लोकांच्या एकूण हेतूबद्दल नाही. काही लोक पाळत असतील हे, जरी सर्व नाही. पण शंका येण्याचे दुसरे मोठे कारण आहे की, १९ मार्चला संध्याकाळी ७:३० वाजता टी२० विश्वचषकाचा भारत वि. पाकिस्तान सामना आहे. आता भारत-पाकिस्तान सामना म्हटला की आधीच लोकांना उत्साह आलेला असतो, त्यात विश्वचषकाचा सामना. मग घरात तर काय बाहेरही वीज बंद होणार नाही. बहुधा जास्त टीव्ही व प्रोजेक्टर वापरले जातील.

म्हणजेच ह्यावेळी भारतात तरी अर्थ अवर ला जास्त पाठिंबा मिळणार नाही असे वाटते.

एप्रिल १५, २०१३


आजकाल प्रत्येक ठिकाणी निधर्मी राज्य वगैरे शब्द भरपूर वेळा ऐकायला मिळते. खरं तर त्याचा अर्थ राजकारणी लोक आणि वृत्तमाध्यमं ह्यांनी जात-धर्म ह्यावर अवलंबून ठेवला आहे.

मी सहज मोल्सवर्थच्या मराठी-इंग्रजी शब्दकोषात अर्थ पहायचे म्हणून शोधले तर तो शब्दच त्या शब्दकोषात नाही.

काही महिन्यांपूर्वी, वपुंच्या 'टेकाडे भाऊजी' ह्या आकाशवाणीवर पूर्वी प्रसारीत झालेल्या मालिकेची MP3 सीडी दुकानात मिळाली. त्यात ह्या शब्दाचा वेगळा अर्थ ऐकायला मिळाला.

- शांततेने पार पाडू शकणार्‍या गोष्टींना वाकडं वळण लावण्याकरीता काही विध्वंसप्रेमी टपलेली आहेत हे काय कमी वेळा सिद्ध झालंय? पुढार्‍यांची आणि पक्षाची बदनामी, चार गुंडशाही लोकांचा फायदा, शहराचं नुकसान आणि निरपराधांचा गोळीबारात मृत्यू इक्वल टू कोणतंही आंदोलन.
.....
- प्रत्येकानं आपापला धर्म सोडायचा आणि जातीवरून दंगली पेटवायच्या.
- ते ही निधर्मी राज्याच्या नावाखाली.
- मी सांगते, निधर्मी राज्य हा शब्दच फसवा आहे.
- मुळीच नाही, ह्याचा विचारच कुणी आत्तापर्यंत केला नाही. ह्या शब्दाचा अर्थ फार निराळा आहे. अरे, प्रत्येकाने आपापला धर्म पाळायचा म्हणजे कर्तव्य. धर्म म्हणजे कर्तव्य. नोकराने नोकराचा धर्म. व्यापार्‍याने व्यापार्‍याचा, विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचा. प्रत्येकाने आपला धर्म पाळला की सगळ्या राष्ट्राचा धर्म एकच होतो.

निधर्मी राज्य म्हणजे काय त्याचा हा अर्थ मला तरी पटला ;)

ऑगस्ट १४, २०१२

नवी मुंबईमध्ये प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घालण्यात आल्याची बातमी काल रात्री वाचली.
चांगला उपक्रम. अर्थात त्यामागील कारणामुळे. राष्ट्रध्वजाचा अवमान टाळण्यासाठी.


पण आम्हाला एक प्रश्न पडतो आणि सुचवावेसे वाटते की असे नियम सणासुदींच्या, दिनांच्या २/३ दिवस आधीच का आणले जातात? ते आधीच का नाही कार्यान्वित करत? आता त्या झेंड्यांच्या उत्पादकांनी झेंडे वितरकांना देऊन दुकाना-दुकानातून आणि रस्त्यांवरून विकले गेलेही असतील आणि आज उद्याही विकले जातील. विक्रेता म्हणेल मी आत्ता हे झेंडे न विकून माझे नुकसान का करून घेऊ? वितरक आणि उत्पादक ही तेच म्हणतील.

अशीच गोष्ट गणेश मूर्तींबाबतही. पर्यावरणाच्या रक्षणाकरीता प्लास्टर ऑफ पॅरिस पेक्षा शाडू मातीच्या मूर्ती बनवाव्यात असे आवाहन आणि नियमही गणेशोत्सवाच्या १० दिवस आधीपासून लोकांपर्यंत येतील. पण जर अशा मूर्ती ३-३ महिने आधीपासून बनविल्या जातात तर तेव्हाच असे आवाहन का केले जात नाही? तेव्हाही विक्रेता हेच म्हणेल मी आत्ता ही मूर्ती न विकून माझे नुकसान का करून घेऊ? 

ऑगस्ट १०, २०१२

आज गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्सव.


दहीहंडी फोडणार्‍या गोविंदांवर पाणी ओतण्याची प्रथा वर्षांपासून चालत आहे. पण गेले काही वर्षे तर पाण्याचे टँकर मागवून त्यातून ह्या लोकांवर पाणी टाकणे अशी नवीन प्रथा मोठ्या लोकांनी सुरू केली. हा जरा विचित्रच प्रकार. कित्येक गावांत लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि इथे अशा प्रकारे पाणी वाया घालविले जाते हे पटतच नाही. तरी ह्यावर्षी मुंबईमधील पथके ह्याबाबत जनजागृती करत 'पाणी वाया घालवू नका' असा संदेश देत आहेत असे वाचले (दुवा येथे पहा). चांगले आहे. असेच लोकांनी सर्वत्र करावे अशी मागणी आणि आशा.

अर्थात जर पाऊस पडत असेल तर अशा प्रकारे वाया जाणारे पाणी वाचवता येईलच. पण पाऊसच जास्त पडत नाही मग लोकांना असले मार्ग सुचतात. तरी आता कार्यालयात शिरता शिरता जोरात पाऊस पडणार असल्याची लक्षणे आकाशात दिसली. ५ मिनिटे जोरात पाऊसही पडला. आजच्या दिवस तरी भरपूर पाऊस पडो अशी अपेक्षा.


इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter