डिसेंबर ०२, २००७

अर्थव्यवस्था म्हटले की समोर येते शेअर बाजार, सेन्सेक्स,विदेशी गुंतवणूक, चलनाचे दर, कर्ज, भाववाढ वगैरे वगैरे. पण ह्यात मी ह्याबद्दल काही लिहिणार नाही. इथे आहेत ते फक्त मी एक कॉलेज विद्यार्थी म्हणून माझे अनुभव. आता त्यात पैसे कमावण्याचा संबंध फारच कमी लोकांचा येतो. असतो तो फक्त खर्च. आईवडिलांनी दिलेल्या पैशांचा. कधीतरी लिहिल्याप्रमाणे, आज काल जेव्हापासून नोकरी करतोय तेव्हापासून पैसे हातात असतात. स्वत:चा/घराचा खर्च करू शकतो. अर्थात त्यामुळे उगाच उधळणे करत नाही. पण कधीही पैसे खर्च करताना कमी पडले की वसतीगृहातील अनुभव आठवतात. आजकाल ते दिवस आठवले मन भरून येते. ते होते काही वेगळे दिवस...

तेव्हा घरून आई पैसे देत होती. एखादे पुस्तक घेणे किंवा बाहेर खाणे ह्यामध्येही पैसे नीट विचार करून खर्च व्हायचे. इतरांसोबत सिनेमा बघणे, थोडाफार अवांतर खर्च तर व्हायचाच, पण तो काही उधळपट्टीत नाही येत. वसतीगृहात राहताना बहुतेकांना दर महिन्याच्या सुरूवातीला घरून पैसे यायचे. त्यामुळे बहुतेक मुले मनीऑर्डरची वाट पहायचे. त्यात ती मुले कसा, किती, कुठे खर्च करायचे ह्याबद्दल मी जास्त विचार केला नाही. त्यामुळे एखाद्याला पाहून आपण खर्च करणे किंवा त्याला वायफळ खर्चापासून अडविणे आपल्या अखत्यारित नव्हते. पण एक गोष्ट मी निरखून पाहिली आहे. (इतर मुलांनीही सांगितली होती). काही मुले जी सिगारेट प्यायची ती महिन्याच्या सुरुवातीला मस्त सिगारेटची पाकिटे विकत घ्यायचे. हळू हळु महिना सरत गेला, पैसे संपत गेले की मग त्या सिगरेट ची संख्या कमी व्हायची. पुढे मग सिगरेट संपली की उरलेली जमा करून ठेवा. एकदम गरज पडली तर ते उरलेले तुकडे पेटवून वापरणे, एकदम शेवटी तर सिगरेट ऐवजी वीडी पिणे ही होत असे. मी पाहिले नाही पण ऐकल्याप्रमाणे काही मुले तर चौकीदार/मेस वाल्यालाही विडी मागायचे. अर्थात मी त्या सर्वात (सिगरेट पिण्यात) नव्हतो. कारण ती सवय मी लावली नाही.

दुसर्‍या वर्षाच्या दुसया सत्रात मला पैसे कमी पडत होते. तेव्हा मी घरी जेव्हा फोन केला होता तेव्हा आईनेच विचारले होते की ’पैसे आहेत की पाठवू?’. ह्याआधी कधी अतिरिक्त पैसे मागावे लागले नव्हते, पण ह्यावेळी गरज होती त्यामुळे, का कोण जाणे, मला खूप हसायला आले. एवढे, की न आवरून मी फोन मित्राला दिला. तो आईला म्हणाला की "का माहित नाही, पण हा खूप हसत आहे." थोड्या वेळाने मग मी त्याला काय ते सांगितले.

त्यानंतर बहुधा मला कधी पैसे कमी पडले असे नाही झाले (शेवटच्या वर्षापर्यंत, हो.. सांगतो ते), की घरी फोन करावा नाही लागला की पैसे पाठवा. कारण, घरून येताना पैसे घेऊनच यायचो. ते तिकडील बँकेत ठेवायचे. मग १०-१५ दिवसांनी जेवढे लागतील तेवढे काढायचे. जर मित्राने काही वेळा पैसे मागितले तर ते ही मी द्यायचो. आणि काही वेळा आपण असेही करतो ना की आज मी पैसे देतो तू नंतर दे किंवा पुढच्या वेळी तू दे. किंवा कोणी घरून येत असेल तर त्याला सांगायचे हे हे घेऊन ये, मी तुला आल्यावर पैसे देतो. मग कधी कधी ते हिशोबात मोजले जायचे की तुझ्याकडे एवढे आहेत, मी तुला एवढे द्यायचे आहे.

ह्यावरून आठवले. २र्‍या की ३र्‍या वर्षी, नक्की आठवत नाही ३रे असेल, एक मित्र त्याच्या खोलीत बसून हिशोब करत होता. ह्याच्याकडून एवढे येतील, त्याच्याकडून एवढे येतील, फोटोचे ह्यांचे पैसे येणे बाकी आहेत वगैरे वगैरे. त्याचा येणार्‍या पैशांचा हिशोब झाला जवळपास ९०० ते ९५० रू. मी त्याला म्हणालो, "तू मला ८५० द्यायचे आहेस." तो म्हणाला, "साल्या, तू तर सावकारच निघालास. मी एवढे थोडे थोडे करून पैसे जमा करत आहे. आणि तू एका फटक्यात जवळपास सर्वच पैसे काढून नेतोयस." :)

आमचे कॉलेज शिर्डीपासून जवळ होते. त्यामुळे बहुतेक वेळा आम्ही शिर्डीवरूनच घरी यायचो. केव्हाही बस मिळायची. तर, तिसर्‍या वर्षी मी आणि एक मित्र शिर्डीवरून येणार होतो. बस निघण्याच्या आधी जेवण झाल्यावर विचार केला आईसक्रिम खाऊया. म्हणून एका दुकानात दरफलकावर बघत होतो कोणते परवडेल. पण एकदम कोणतेही आईसक्रिम खाण्यासारखे वाटत नव्हते. मग आम्ही विचार केला- हे असे करण्यापेक्षा थेट आइस्क्रिम ठेवतात तिकडेच पाहू कोणते पाहिजे. मग त्यानुसार आम्ही बघितले. 'ब्लॅक करंट’ खाण्यासारखे वाटले म्हणून ते घेतले. शेवटी पैसे देताना लक्षात आले की आम्ही खाल्लेले 'ब्लॅक करंट’ हेच सर्वांत महाग होते. :D

आता आपण केलेला खर्च वेगळा. पण वसतीगृहाच्या खानावळीत प्रत्येक विद्यार्थ्याचे महिन्याचे खाते ज्या माणसाकडून बघितले/सांभाळले जात, त्याने ही वेगळ्या प्रकारे आमच्या खिशाला खड्डा पाडण्याचा प्रयत्न केले होते. झाले काय, की परीक्षेच्या आधी सुट्टी असल्यावर भरपूर मुले घरी जात असत तेव्हा जर कोणी त्यावेळी वसतीगॄहात असेल व त्या खानावळीत खात असेल तर तिथे वहीत लिहावे लागत असे. महिन्याच्या शेवटी मग प्रत्येक मुलाचे किती दिवस खाणे झाले होते त्यावरून मग आधीच भरलेल्या पैशांपेक्षा जास्त झाले असेल तर मग महाविद्यालयात ते पैसे भरावयाचे असत. काही मुलांनी ती खातेवही बघण्यास मागितली तेव्हा पाहिले की काही मुलांच्या नावासमोर त्याने महिन्याचे ३२-३४ दिवस खाल्ले असे दाखविले होते. मग काय तक्रार केली त्याची.

हे सर्व झाले एखाद्या वेळी एखाद्यावर आलेला प्रसंग. पण ४थ्या वर्षी तर जणू अर्ध्या बॅचसमोरच पैशाची अडचण उभी राहीली होती. जवळपास सर्व प्रॅक्टिकल(प्रयोग) परीक्षांचे जर्नल(प्रयोगवही) तपासून तयार. सर्वजण परीक्षेचे अर्ज भरून नंतर घरी जाण्याच्या तयारीत. ह्यात मग ते पैसे वेगळे काढल्यावर बहुतेकांच्या लक्षात आले, आर्थिक आघाडीवर आपण मार खातोय. मग त्या २-३ दिवसांत मुलांचे खर्च बघण्यासारखे (की न बघण्यासारखे?) होते. आमच्या दररोजच्या जेवणावर त्याचा एवढा फरक पडला नाही, कारण डबा लावला होता. त्यामुळेही बहुधा ते आधी जाणवले नाही. पण रविवारी दुपारी फिस्ट असल्याने रात्रीचे जेवण बाहेरच करावे लागे. आता रात्री काय जेवावे? कसे तरी स्वत:च्या सर्व सामानातून धुंढाळून पैसे जमा केले व रात्री मॅगी खाल्ले. तो होता स्वस्त उपाय. तरीही मला एक दिवस आणखी काढायचा होता. पण हॉस्टेल मधील एका मित्राला आणखी काही दिवस (की परीक्षा होई पर्यंत) तिकडेच थांबायचे होते. त्याचा पैशाचा बंदोबस्त होण्यास थोडा वेळ होता. आम्ही मग जुनी पुस्तके शोधून काढली जी विकू शकतो. आता हे असे करण्यात काही गैर नव्हते. आपण पुस्तके टाकू नये म्हणतो. पण शेवटी भरपूर पुस्तके रद्दीतच देतो ना? जुनी पुस्तके ठेवण्याचे कारण असे की पुढे दुसया मुलांना ते विकू शकतो. किंवा आपल्या वापरण्याकरीताही ठेवू शकतो. पण ती विकण्यास आम्ही धजावलो. कारण वेळच तशी होती. तरीही का कोण जाणे आम्ही वेगळा विचार केला. म्हटले, पुस्तके विकून पैसे घेणे नको. इतर मुले नाहीत पण आपले मोठे लोक आहेत ना उधार मागण्यास. मग मी विचार केला, कॉलेजच्या सरांनाच मागवेत पैसे.

दुसर्‍या दिवशी सकाळी परीक्षेची फी भरल्यानंतर असेच सर्व मित्र पायर्‍यांजवळ जमा होतो गप्पा मारत. काही खाण्याचा विचार केला. पण आठवले, खिशात फक्त ३ रूपये आहेत, ज्यात चहाच मिळू शकेल. एक मित्र म्हणाला, "आहेत माझ्याकडे पैसे. मी देतो." सर्व ओरडलो,"चला". कँटीनमध्ये जाऊन मग आम्ही बर्गर खाल्ले (मॅकडोनाल्डचे नाही हो, साधे, गावठी) आणि चहा प्यायलो. आणि अर्थात त्या मित्राच्या नावाने थ्री चिअर्स करणे आलेच. पुढे थोड्या वेळाने मग त्यानेच बँकेत जाऊन थोडे पैसे काढले व आम्हाला दिले. चला, घरी जाण्याची तर व्यवस्था झाली.

हे प्रकरण होत असताना दुसरा एक मित्र म्हणाला की, "तुला मी जे RAM आणायला सांगितले होते ते तू मुंबईहून घेऊन ये. मी पैसे देतो." दुपारी त्याच्या खोलीवर गेल्यावर तो म्हणाला की त्याने पैसे त्याच्या खोलीतील मित्राच्या बॅगेत ठेवलेत आणि तो मित्र घरी गेलाय. संध्याकाळपर्यंत परत येईल. घ्या, इथे मुलांकडे पैसे नाहीत. आणि ह्या मुलाकडे, जो मला १६०० रूपये देणार होता, पैसे असूनही तो त्याला हात लावू शकत नव्हता. तरीही कसे तरी त्याने ते पैसे मिळविले (कसे ते मला आठवत नाही) व मला दिले. सकाळी मिळालेले २०० आणि हे १६०० ह्यात माझे घरी जाणे तर आरामात होणार होते, मला सरांना पैसे मागावे लागले नाहीत आणि सध्याच्या गरजेपेक्षा अतिरिक्त पैसा होता. म्हणून त्या हॉस्टेलवाल्या मित्राला विचारले की "पैसे पाहिजेत का?" तो म्हणाला, "नको.हॉस्टेलच्या मालकाकडून घेतलेत."

रात्री मी शिर्डीला पोहोचल्यानंतर बसचे तिकिट काढून मग खाण्याकरीता पळालो. खिशात भरपूर पैसे असल्याने खाण्यास स्पेशल पाव भाजी सांगताना काही तरी वेगळेच वाटत होते.
२ दिवस अंधारात राहिल्यानंतर जेव्हा आपल्याला लख्ख प्रकाश दिसल्यावर वाटते तसेच काही.

2 प्रतिक्रिया:

अनामित म्हणाले...

anudini changali aahe... vasatigruhaateel divas prakarshane aathavale... aamhee svat:chya vaadhadivasaalaa kadheech ekamekina party vagere dili naahii...varshachya shevati sagalyanchi party ekadamch karayacho... sagalyanche vaadhadivas saajare/party hee aani TTMM madhye..jaast paise hee laagayache naaheet...

Unknown म्हणाले...

गुड वन

इंडिब्लॉगर गुण

maajhianudini.blogspot.com
47/100

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

133,722

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया


On Sep 23 Anonymous commented on blog post_09
Kuf cha tras aahe... Kuf mile khokla hoto...mg to lvkr jat nahi .ky karave

On Jul 25 Anonymous commented on blog post_09
मला पण असाच त्रास होत असे मी पण खूप उपचार करून पाहिले पण थोडे दिवसच त्रास कमी होत असे नंतर मी...(more)

On May 13 Announced Marathi Images commented on blog post_25
Very nice

On Jul 23 Sachin Kinare commented on blog post
छान, खूप दिवसांनी शोधत होतो, ह्या ब्लॉग मूळे लगेच मिळाले

On Jul 02 Anonymous commented on blog post
Chhan

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter