मार्च २३, २०१२


त्या अनोळखी झाडाला चैत्रपालवी फुटली होती. कुणीही आपल्याकडे पाहत नाही हे ठाऊक असूनही चैत्र आल्याची वार्ता सांगत ते झाड उभं होतं. माझ्याखेरीज त्या उभ्या आणि वाहत्या गर्दीतली एकही मान उंचावली नव्हती. तरीही हे झाड नवी पालवी दाखवत सांगत होतं, अरे, नवं वर्ष म्हणजे नवी पालवी! नवी पालवी म्हणजे नव्या आशा. नव्या वर्षाचं स्वागत म्हणजे नव्या आशांचं स्वागत. साखर स्वस्त होणार, मुलांना हव्या त्या शाळेत सक्तीच्या देणगीशिवाय प्रवेश मिळणार, आपल्या चाळीतील सगळ्या उपवर मुलींची लग्नं बिनहुंड्यात जमणार, वरळी सी फेसवर फ्लॅट देणारे चिक्कार सासरे भेटणार; अशा वैयक्तिक आशांपासून ते सत्तेवरच्या पक्षाचं राज्य कोसळून आपल्या पक्षाचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही; ह्या पराभूत पक्षांना युगानुयुगं पडणाऱ्या चिरंजीव भ्रमाचं स्वागत. आजचा दिवस हा असल्या नाना प्रकारच्या स्वप्नांच्या स्वागताचा आहे. नव्या वर्षाचं नवंपण ह्या असल्या जुन्या गळून गेलेल्या पानांच्या जागी नवी पालवी फुटणाऱ्या दृढ विश्वासात आहे. मनाच्या काचेवर गेल्या वर्षातल्या निराशांची धरलेली काजळी नव्या वर्षाच्या पाडव्याच्या दिवशी पुसून टाकली पाहिजे. दिवस दिवसांसारखेच असतात, पण एकाच स्त्रीनं आज हे नेसावं, उद्या ते नेसावं, आज ही फुलं माळावीत, उद्या ती फुलं माळावीत आणि कालच्यापेक्षा आज आपलं आपल्यालाच निराळं वाटून घ्यावं; तसंच दिवसांनाही आज पाडवा म्हणून नटवावं, उद्या दसरा म्हणून, परवा दिवाळी म्हणून. आपण आपल्या त्याच खोलीतली खाट एकदा इकडे आणि एकदा तिकडे ठेवून खोली निराळी करतो, तसं तेचतेच दिवस निराळे करणं आपल्या हातात आहे. फक्त झाडांना फुटते, तशी नवी पालवी  मनाला फुटली पाहिजे.
- गाठोडं (पु. ल. देशपांडे)

सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

डिसेंबर ०७, २०११



गेल्या आठवड्यात मित्रासोबत 'पिझ्झा हट्' मध्ये खाण्यास गेलो होतो. (साधारणत: चायनीज आणि पिझ्झा मध्ये एक अनुभवतो की खाताना पोट भरल्यासारखे वाटते पण एक दीड तासातच भूक लागते. :) ) असो. तर तिथे बिल मागितल्यावर पाहिले तर खालील प्रमाणे होते.



पदार्थः रू. ३२२.००
सेवा (१०%): रू. ३२.२०
कर (१२.५० %)  : रू १४.०९
कर (२०.० %) : रू. २८.९०
एकूण : रू. ३९७

ह्यात एकतर त्यांनी सेवा मूल्य, मूल्यवर्धित कर आणि नुसताच एक कर असे मिळून ३ प्रकारे जादा पैसे लावले होते. मी त्याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की सरकारकडून हे कर घेण्यास सांगितले आहे. पण त्याबाबत काही सबळ माहिती त्यांच्याकडे नव्हती. अर्थात ते कमी करणार नाहीतच, आणि माझ्याकडेही जास्त वेळ नव्हता, म्हणून तेवढे पैसे देऊन निघून आलो.

प्रथमदर्शनी ते १०+१२.५+२० = ४२.५% वाटत होते. म्हटले ४०/५० टक्के छुपा अधिभार? चला वॅट काढला, तरी ३०%. म्हणजे लूटालूटच.

आता पुन्हा नीट पाहिले असता, एकूण ४२ टक्के जास्त नाहीत. २३% होतात
तरी त्यांचे गणित मला कळले नाही. कोणी समजावून सांगेल का?

१४.०९ हे ह्यात कशाचे १२.५% होतात?
२८.९० हे ह्यात कशाचे २०% होतात?
आणि सर्वात मोठे गणित..
अशा खाद्यपदार्थांवर नेमके किती टक्के कर द्यायचा असतो आणि ह्यात काय काय ग्राह्य धरावे?
(बोर्नविटा वाले शास्त्रात आणि पिझ्झा हट् वाले गणितात गोंधळवत आहेत.)

डिसेंबर ०४, २०११




तुम्ही बोर्नविटाची नवीन जाहिरात पाहिली आहे का? दूधातून कॅल्शियम खेचण्याकरीता 'ड जीवनसत्व' लागते, जे बोर्नविटा मध्ये आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

http://www.cadburyindia.com/in/en/Brands/Pages/videoplayer.aspx?vid=1734

एक तर त्रासिक जाहिरात, तीन तीन वेळा तिचे विचारणे, "कॅल्शियम करीता काय करतेस?", हावभाव गंमतीशीर (चांगले नाही !!!)

आणि दुसरी गंमत (?) आमच्या शालेय शिक्षणातील अभ्यासाप्रमाणे जी काही माहिती आहे त्याप्रमाणे दुधात कॅल्शियम आणि  'ड जीवनसत्व' आधीपासूनच असते. मग वेगळे 'ड जीवनसत्व' कशाला?

बोर्नविटा आणि दूध कॅल्शियम करीता रस्सीखेच करायला लागले तर पिणार्‍याला ते मिळेल का? :)
हो, 'दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ' हे म्हणणे इथे लागू होऊ शकते का? ;)


ऑक्टोबर ०७, २०११

काल कोपिणेश्वर मंदिराच्या जवळ एका संस्थेचा देवी महोत्सव संपला, त्यानंतर देवीला घेऊन जाताना जे संगीत लावले होते त्याने छातीही धडकत होती. सुतळी बाँबपेक्षाही जास्त आवाज, म्हणजे किमान १३० डेसिबल्सच्यावरती आवाज असेल. ह्या कार्यक्रमाला बहुधा काही पोलिस अधिकारीही पाहुणे आले होते.  म्हणजे त्यांची उपस्थितीही त्याप्रकारची वाटली.

पुढे गोखले रोडवरही देवीची एक मिरवणूक येत होती, त्याचा आवाजही जबरदस्त. आणि गाणे कोणते लावले होते? तर शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला मधील "We are the Bhai" हे गाणे.

आणि ह्या लोकांकरीता आपण गर्दी, वाहतूक खोळंबा आणि इतर त्रास सहन करायचे.

धन्य ते नियम, धन्य ते नियम पालन आणि धन्य ती देवीभक्ती.

सप्टेंबर ०५, २०११


माजिवडा उड्डाणपूलापासून कल्याणकडे जाणारा महा(?)मार्ग. उजवीकडे वळल्यानंतर साधारण २०० मीटर अंतरापासूनच गाड्या खोळंबलेल्या दिसल्या. घरातून निघताना ठरवले होते की जास्त गर्दी असली तर अर्ध्या रस्त्यातूनच परत निघायचे. तसेच काहीतरी होईलसे वाटत होते. कार्यालयाच्या रस्त्यावर, घराच्या आसपास, आणि इतरत्र रस्त्यांची हालत तर पाहूनच आहे, त्यामुळे खोळंब्याचे कारण तर लक्षात आले होतेच. हळू हळू करत (पण किती ते हळू? १ मीटर जाऊन २ मिनिटे थांबायचे?) पुढे जात होतो. साकेत च्या समोरील पुलावर पोहोचेपर्यंत रस्ता एकदम चांगला तर नाहीच, पण त्या पुलाजवळ पोहोचल्यावर कळले की ह्याला रस्ता म्हणून घेण्याची लायकीच नाही. समुद्रामध्ये बोट कधी हेलकावे खात असते त्याच प्रकारे कार हेलकावे खात होती. साधारण अर्धा ते एक किलोमीटरचा रस्ता हा असाच. २ किमी चा रस्ता पार करायला १:४५ तास? टोलनाक्यावर कोणी टोल भरलाच नाही. पुढे कल्याण फाट्यापर्यंत तसा चांगला रस्ता. पुन्हा मग कल्याणमधील खड्ड्यांच्या समुद्रात शिरलो. परत येताना टोल भरणार नाही असे वाटले होते पण भरावा लागला.

ह्यावर्षी हे अतीच झालेय. की अजून बाकी आहे?. एकही रस्ता, मोठा रस्ता सोडा, गल्लीगल्लीसुद्धा नीट नाही आहे.

'अ' चे पालिकेत राज्य आहे तर 'ब' हा विरोधी पक्ष कधी तरी बोलतो. तेच 'ब' चे दुसरी कडे राज्य आहे तर 'अ' हा त्या विरुद्ध बोलतोय असे मध्ये वाचले होते. पण स्वत:च्या पालिका हद्दीत काही सुधारणा नाही. आता तर ती बोंबाबोंबही बंद आहे.

गणेशोत्सवात सगळीकडे गणपतीच्या स्वागताचे स्वत:च्या नावाचे पोस्टर लावून ठेवलेत ते ही त्याच खड्ड्यांच्या समोर. हे खड्डे आम्ही बनविलेत असे तर नाही सांगत ना ते?

केंद्र/राज्य सरकार मधील कॉंग्रेसला ला शिव्या घालूत असू पण महानगरपालिकेत तर शिवसेना आहे. ते ही तर काहीच नाही करत आहेत. नवनिर्माण करणारेही गायब झालेत. त्यामुळे जरी एकाच्या विरोधात गेलो तरी दुसऱ्याचा फायदा नाहीच. आणि हे सुद्धा फेब्रुवारी २०१२ च्या महानगरपालिका निवडणूका तोंडावर असताना. गंमत आहे ना?

भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत थोडे फार तथाकथित यश मिळाले असेल (हो तथाकथितच. ते नंतर कधीतरी) पण आधी खड्डा विरोधी मोहिम सुरु करून तिला यश मिळवून दिले पाहिजे असेच वाटते.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter