फेब्रुवारी १६, २०१६


शनिवारी मित्राच्या लग्नाला हैदराबादला गेलो होतो. काल सोमवारी सकाळी विमानाने परत आलो. रिक्षाने घरी जायचे म्हणून विमानतळावरील रिक्षा स्थानकावर विचारले तर ते म्हणाले की आमचा संप आहे. आता आली का पंचाईत? अर्थात जायला बस, टॅक्सी वगैरे इतर पर्याय होते. पण बसने जायचे तर घराजवळपर्यत जाता येणार नाही, व रिक्षांचा संप असला तर पुढे जाणे कठीण आणि टॅक्सीचालकांनीही येण्यास नकार दिला. पहिल्यांदा पाहिले असे की विमानतळावरून घरी जायला पर्याय शोधावे लागले. चालत चालत सेंटॉर हॉटेल समोरील मुख्य रस्त्यावर आलो. तिकडेही ३-४ रिक्षा उभे होते. त्यांना विचारले, 'संप कसला करताय?' तर एकजण म्हणाला. 'ओला (OLA) टॅक्सींविरोधात'.

हा अंदाज होताच की ओला व इतर काही खाजगी टॅक्सींनी कमी दरात प्रवास सुविधा देणे सुरू केले होते. त्याचा थेट परिणाम होता हा. त्या रिक्षाचालकाला म्हटले, 'ते टॅक्सीवाले नव्हते तेव्हा काय तुम्ही सुरळीत काम करत नव्हते. आधी इतर कारणांकरीता संप करत होते, आता कारण नाही तर हे नवीन कारण शोधले.'
मग त्यांची नेहमीचीच रड की 'युनियनमुळे आम्हाला करावे लागते'

इतर टॅक्सी ही मिळत नव्हती. तोपर्यंत एका मित्राने त्याच्या घरी जाण्याकरीता ओला टॅक्सी बोलविली होती. तो म्हणाला,'ह्यात जाऊ, आम्हाला सोडून हीच टॅक्सी पुढे घेऊन जा'. आता तोच पर्याय बरा वाटला. मग त्या रिक्षाचालकांना म्हटले की, 'तुम्ही ओला टॅक्सींविरोधात संप करताय ना? आता आम्ही तुमच्या समोरच त्याच टॅक्सीतून जाणार. तुम्ही उभे रहा संप करत.'

स्वतःची वागणूक न सुधारता दुसर्‍यांना अटकाव करणार्‍याविरोधात असेच काहीतरी केल्याने त्यांच्यात सुधारणा होते का पाहू.  

फेब्रुवारी ०१, २०१६

सुमारे ५ वर्षांपूर्वी मी भ्रमणध्वनीच्या पेट्रोलपंपावरील वापराबद्दल लिहिले होते. त्यानंतर प्रतिक्रियेत केदार यांनी दिलेली माहिती आणि इतर ठिकाणी वाचल्याप्रमाणे भ्रमणध्वनीचा वापर केल्याने धोका नसतो असे ऐकले/वाचले. पण म्हणून मी तेथे भ्रमणध्वनी वापरणे सुरू केले नाही.


आता ५ वर्षांत काही सुधारणाही झाल्या असतील. पण तेथील पेट्रोलची वाफ आणि ठिणगी ह्यांमुळे धोका आहेच. त्यात आता क्रेडीट/डेबिट कार्डचा जास्त वापर केला जात आहे, म्हणून त्यांची यंत्रेसुद्धा तिथेच ठेवली असतात. भ्रमणध्वनीच्या बटनांमुळे ठिणगी उत्पन्न होऊ शकते तशी ह्या मशीनच्या वापरामुळेही ठिणगी उत्पन्न होऊ शकते असा एक संशय आला होता आणि आता ते यंत्र वायर ने न जोडता जीपीआरएस ह्या तंत्रज्ञानानेही (ज्याचा 2G इंटरनेट सेवेकरीता वापर केला जातो) जोडले आहेत. त्यामुळे आधी लोकांना पेट्रोलपंपावर भ्रमणध्वनी न वापरण्याकरीता ज्या गोष्टींची भीती दाखविली जात होती, त्या आता पेट्रोलपंप चालकांकडूनच वापरल्या जात आहेत असे दिसते. म्हणजेच जे काही म्हटले जात होते ते खरोखरच भ्रम होते किंवा आता सर्व लोक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

असो. जसे मी आधी म्हटले त्याप्रमाणे, मी पेट्रोलपंपावर भ्रमणध्वनी वापरणार नाही. निदान तसा फलक लावला असेल तोपर्यंत तरी.

जानेवारी २४, २०१६

गेल्या काही वर्षांत ५० रूपयांची नोट मिळणे बंद झाले होते असे मी अनुभवले. तुम्हालाही अनुभव आला होता का?
एटीएम मध्ये तर १०० रूपयांपेक्षा कमीच्या नोटा मिळत नाहीत हे कारण असेल. पण दुकानांतूनही पैसे परत मिळाले की १०० किंवा मग २०, १० च्या नोटाच परत मिळायच्या. अर्थात रिझर्व बँकेने ह्यावर निर्बंध आणले नाहीत. पण जसे २५ पैशांच्या नाण्यांचे झाले होते तसा काहीसा प्रकार होता का अशीही मला शंका आली होती. रिझर्व बँकेने २५ पैशाची नाणी बंद केली नव्हती, पण दुकानात, बसमध्ये ही नाणी वापरणे बंद झाले होते. आता तीच गत ५० पैशांच्या नाण्याचीही होत आहे असे दिसते.




५० रुपयांची किंमत अर्थातच त्या नाण्यांप्रकारे कमी नाही. खरं तर असेही वाचले ऐकले आहे की अर्थशास्त्राप्रमाणे भारतातील चलनात कमाल ५० रुपयांचीच नोट असायला पाहीजे. पण सरकारने आपले काही मुद्दे वापरून १००, ५००, १०००च्या नोटा वापरात ठेवल्या आहेत तो भाग सध्या वगळू.

तर ५० रुपयांची नोट मिळणे बंद झाले होते. मग दोन वर्षांपूर्वी रिझर्व बँकेने २००५ च्या आधीच्या सर्व किंमतींच्या नोटा चलनातून बाद करण्याचे ठरविले व नागरिकांना विनंतीवजा सूचना केली की त्यांनी २००५च्या आधीच्या नोटा बँकामध्ये देऊन नवीन नोटा घ्याव्यात. पण लोकांनी नेहमीप्रमाणे ती सूचना गंभीरतेने घेतली नाही. रिझर्व बँकेला त्याची मुदत तर वाढवावी लागलीच, पण बहुतेक लोकांनी सर्व जुन्या नोटा बँकांना न देता त्या बाहेर वापरायला सुरूवात केली. त्यातच ह्या ५० च्या नोटा बाहेर आल्या असे दिसतेय. २००५च्या आधीच्या आणि नंतरच्याही.

आता २००५ आधीच्या नोटा तर कमी दिसत आहेत. पण निदान ५० रू च्या नोटा पुन्हा वापरायला मिळत आहेत हे चांगले झाले.

जाता जाता: तसे तर ५रूपयाच्या नोटाही फार कमी दिसत आहेत. त्याही बंद झाल्यात का? :)

(चित्र स्त्रोत: विकिपिडीया)

जानेवारी १८, २०१६


गेल्यावेळी लिहिल्याप्रमाणे जपानमध्ये रेल्वे प्रशासनाने विद्यार्थिनीच्या शिक्षणाची दखल घेत रेल्वे स्थानक सुरू ठेवण्याचे ठरवले. नेमका तसाच प्रकार तर नाही, पण इतरांची दखल घेण्याचे दुसरे उदाहरण भारतात दिसले.

आसाममध्ये एका गावातील सर्व रहिवाशांनी मिळून त्यांच्या भागातील हत्तींना सुरक्षित जागा मिळावी म्हणून त्यांचे पूर्ण गावच स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आणि ते अंमलात आणले.




शिरीष कणेकरांच्या अमेरीकावारीच्या एका लेखात वाचले होते की, अमेरिकेमध्ये एका ठिकाणी पक्षांचा थवा ठराविक काळात स्थलांतर करत असतो. त्यांची जागा हिरावली जाऊ नये म्हणून तेथील प्रशासनाने त्या भागातील नवीन विमानतळाचा विचार रद्द केला. तेव्हा वाटले होते की आपल्याकडे असे होण्याची शक्यता वाटत नाही.
पण आसाममधील गावकर्‍यांनी असे होते हे दाखवून दिले, हे कौतुकास्पद आहे.

जानेवारी १५, २०१६

गेल्या काही दिवसांपासून एक बातमी, विडीयो आंतरजालावर फिरत आहे की जापानमध्ये एक रेल्वे स्थानक बंद करण्याच्या स्थितीत आले आहे.  पण फक्त एक प्रवासी जी तिच्या शिक्षणाकरीता त्या स्थानकावरून प्रवास करते तिच्याकरीता ते स्थानक सुरू ठेवणार आहेत. मार्च २०१६ मध्ये तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते हे स्थानक बंद करतील. एका नागरीकाच्या शिक्षणाकरीता असे करणे हे खरोखरच स्पृहनिय आहे.



आपल्याकडे असे काही झालेले लक्षात नाही. कारण एकतर ते होत नाही किंवा सर्वांच्या समोर येत नाही. अर्थात आपल्याकडेही एखाद्या प्रवाशाकरीता ट्रेन थांबविणे, विमान थांबविणे हे होते, पण ते 'विशेष' नागरिकांकरीता. त्यातही बदल होत चालला आहे हे बरे.

(विडीयो स्त्रोत - यूट्यूब)

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter