डिसेंबर २५, २०१३



सर्वांना नाताळ शुभेच्छा.

ख्रिसमस, नाताळ वर भरपूर चित्रपट आले असतील. काही वर्षे आधीपर्यंत विविध वाहिन्यांवर ख्रिसमस च्या निमित्ताने हे चित्रपट दाखवले जायचे. पण हे प्रमाण सध्या खूप कमी झाले आहे. अशाच चित्रपटांतील माझा आवडता एक चित्रपट आहे 'मिरॅकल ऑन थर्टीफोर्थ स्ट्रीट' (Miracle on 34th Street). साधारण १९९४/९५ मध्ये हा चित्रपट स्टार मूव्हीज वर पाहिला होता. वेगवेगळ्या मोठ्या दुकानांत सांताक्लॉज लहान मुलांना भेटून त्यांच्याशी बोलत असतात. त्यापैकी एका दुकानात सांताक्लॉज बनलेला माणूस दारू पिऊन आला असल्याने क्रिस किंगल ला सांताक्लॉज बनविले असते ह्यापासून क्रिस किंगलच खरा सांताक्लॉज आहे हे सिद्ध करण्यापर्यंतचा प्रवास मला आवडला.



२००६ मध्ये मी ह्या चित्रपटाची VCD ऑनलाईन खरेदी करून मागवली होती. पण तेव्हा मला ह्याच चित्रपटाच्या १९९४ मधील रिमेकची VCD मिळाली. आता रिमेक बनविताना त्यात थोडेफार बदल होत असतातच. ते बदल ठिक आहेत पण ह्यातील क्रिस किंगलच खरा सांताक्लॉज आहे हे सिद्ध करण्याकरीता जे कारण वापरले ते मला रिमेक मध्ये नाही आवडले पण मूळ १९४७ मधील चित्रपटातीलच आवडले. अजूनपर्यंतही निदान भारतात १९४७ च्या चित्रपटाची VCD/DVD मला मिळाली नाही. ती शोधण्याच्या प्रयत्नात आहे.

(चित्र स्त्रोतः IMDB)

जुलै २६, २०१३

आज आपण पाहूया, ईक्विटी लिन्क्ड् सेविंग स्किम अर्थात Equity Linked Savings Scheme (ELSS) बद्दल.

ELSS हा म्युच्युअल फंड मधील गुंतवणूकीचा प्रकार असून ह्यावर करसवलतही दिली जाते. ह्यात गुंतवलेली रक्कम ही त्या फंडच्या व्यवस्थापकाकडून आपल्या तर्फे शेअर मार्केट मध्ये गुंतविली जाते. त्यातील उतारचढावानुसार व्यवस्थापक  ह्या गुंतवणूकीवर लक्ष ठेवून मग त्यात बदल करत असतो. ह्यात मिळणारा नफा हा साधारणतः इतर गुंतवणूकींपेक्षा जास्त असू शकतो. पण शेअर बाजाराशी संलग्नित असल्याने ही गुंतवणूक खात्रीशीर नसते. नफा मिळूही शकतो अथवा गुंतविलेल्या रक्कमेवर नुकसानही होऊ शकते.
काही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक आणि ते बंद करणे ह्यातील मध्यम काळात लाभांश दिला जात असतो. तो लाभांशही करमुक्त असतो.

लाभांशावरून म्युच्युअल फंड आणि ELSS चे तीन प्रकार असतात.
१.  Dividend Payout (लाभांश परतावा) : ह्यात गुंतवणूकदाराला लाभांश स्वतःकडे मिळतो. ह्या प्रकारात त्या फंडची NAV त्या लाभांशाप्रमाणे घटली जाते.
२.  Dividend Reinvestment (लाभांश पुनर्गुंतवणूक) ह्यात गुंतवणूकदाराला मिळणारा लाभांश पुन्हा त्याच स्कीम मध्ये गुंतविले जातात. ह्या प्रकारातही त्या फंडची NAV त्या लाभांशाप्रमाणे घटली जाते. आणि ह्यात आणखी एक तोटा आहे की लाभांशाची ती रक्कम ELSS मध्ये गुंतविल्याने त्या तारखेपासून ३ वर्षांकरीता बांधली जाते.
३.  Growth: ह्या प्रकारात लाभांश दिला जात नाही. त्यामुळे ह्याचा NAV हा पहिल्या २ प्रकारांपेक्षा जास्त असतो.

मर्यादा: 
गुंतवणूकीस कमाल मर्यादा नाही. पण गुंतवणूकीवर करसवलत कमाल रू. १,००,०००/- पर्यंतच मिळते.

मुदतः
ह्यात पैसे गुंतवून ठेवण्यास मुदतीची मर्यादा नाही. परंतु गुंतवणुकीच्या तारखेपासून ३ वर्षे ही रक्कम बांधून ठेवली जाते. म्हणजेच ती रक्कम ३ वर्षे आपण काढू शकत नाही. ह्याला लॉक-इन पिरिअड म्हणतात. त्यानंतर केव्हाही रक्कम काढू शकतो.

गुंतवणूकीवर कर सवलत:
ELSS मध्ये गुंतविलेली रक्कम कलम 80C नुसार कमाल रू. १,००,०००/- पर्यंत करसवलतीस पात्र असते.

गुंतवणूकीवर कर सवलत मिळणार्‍या व्याज/लाभावर कर सवलतः
गुंतवणू़दाराला मिळालेला लाभांश हा करमुक्त असतो.

मुदतीनंतर मिळालेल्या रकमेवर कर सवलत :
  • इक्विटीमध्ये गुंतविलेल्या रकमेवर जो लाभ मिळतो तो १ वर्षानंतर घेतला असल्यास दीर्घकालीन भांडवल नफा असून Securities Transaction Tax (STT) भरलेला असल्यास हा नफा करमुक्त असतो.
  • १ वर्षाच्या आधीच रक्कम काढून घेतल्यास तो अल्पकालीन भांडवल असून त्यावर १५% दराने कर भरावा लागतो. ELSS मध्ये ठेवलेले पैशांवरील नफा त्यातील ३ वर्षांच्या बंधनामुळे आपोआपच दीर्घकालीन भांडवल नफा असतो आणि करमुक्त असतो.

जून २९, २०१३

मागील लेखनात भविष्य निर्वाह निधीबद्दल माहिती पाहिली. त्यातील गुंतवणूक ही प्राप्तीकर नियमाप्रमाणे करसवलतीस प्राप्त असते. पुढील काही लेखनात गुंतवणूकीचे असेच काही पर्याय पाहू ज्यात गुंतवणूकीवर अवलंबून करसवलत घेता येते.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate - NSC)
सरकारतर्फे टपालखात्याद्वारे उपलब्ध असलेल्या बचतीच्या या योजनेत पैसे गुंतविण्याचा आणखी एक पर्याय आहे. HUF आणि Trust  वगळून इतर सर्व लोक ह्यात गुंतवणूक करू शकतात.  एखादी व्यक्ती स्वतः आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या अज्ञान मुलांच्या नावे NSC मध्ये किमान रू. १०० ठेवू शकतो. तसेच गरज पडल्यास कर्ज घेताना हे प्रमाणपत्र तारण म्हणूनही वापरता येते. ह्यावर मिळणारे व्याज करपात्र असले तरी ह्यावर स्त्रोतावर कर आकारणी अर्थात TDS आकारला जात नाही. गुंतवणूक करणार्‍याची ही जबाबदारी असेल की त्याने मिळालेले व्याज स्वतः आपल्या उत्पन्नात जोडून त्यावर कर भरावा.
ह्या बचत प्रमाणपत्रांवर मिळणारे व्याज हे दरवर्षी ठरविले जाते.

मर्यादा:
गुंतवणूकीस कमाल मर्यादा नाही.

मुदतः
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राकरीता दोन मुदतीच्या योजना आहेत.
१. पाच वर्षे: २०१३-१४ ह्या आर्थिक वर्षाकरीता व्याजाचा दर ८.५०% आहे.
२. दहा वर्षे: २०१३-१४ ह्या आर्थिक वर्षाकरीता व्याजाचा दर ८.८०% आहे.

गुंतवणूकीवर कर सवलत:
ह्यात गुंतविलेली रक्कम कलम 80C नुसार कमाल रू. १,००,०००/- पर्यंत करसवलतीस पात्र.

मिळणार्‍या व्याज/लाभावर कर सवलत :
मिळालेले व्याज करपात्र असले तरी पुन्हा गुंतविल्यामुळे त्यावर्षीच्या करमोजणीत पुन्हा कलम 80C प्रमाणे कर सवलतीस पात्र असते.

मुदतीनंतर मिळालेल्या रकमेवर कर सवलत :
  • मुदतीनंतर मिळालेले एकूण व्याज कर सवलतीस पात्र नसते. ते त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात जोडले जाऊन त्यानुसार कर मोजणी केली जाते.
ह्याबाबत अधिक माहिती टपाल खात्याच्या संकेतस्थळावर येथे मिळेल.

ज्येष्ठ नागरीक बचत योजना (Senior Citizen Savings Scheme - SCSS)

ही योजना टपाल खात्यातर्फेच उपलब्ध असून सर्व ज्येष्ठ नागरीक ह्यात पैसे गुंतवू शकतात. साधारणतः ज्येष्ठ नागरीक ह्याअर्थी गुंतवणूकदाराचे वय ६० वर्षे किंवा जास्त असण्याची अट आहे.
परंतु स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या गुंतवणूकदारांकरीता वयाची मर्यादा ५५ वर्षे व वर अशी ठेवली आहे. पण ह्याकरीता निवृत्तीपासून एका महिन्यात ह्यात पैसे गुंतवावे लागतात.
मर्यादा:गुंतवणूकीस कमाल मर्यादा रू १५,००,०००/- (पंधरा लाख).

मुदतः पाच वर्षे. मुदतीनंतर पुन्हा ३ वर्षांकरीता मुदतवाढ घेता येते. २०१३-१४ ह्या आर्थिक वर्षापासून मिळणारे व्याज ९.२०% आहे.

गुंतवणूकीवर कर सवलत:
ह्यात गुंतविलेली रक्कम कलम 80C नुसार कमाल रू. १,००,०००/- पर्यंत करसवलतीस पात्र.
मिळणार्‍या व्याज/लाभावर कर सवलत :मिळालेले व्याज कर सवलतीस पात्र नसते. ते त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात जोडले जाऊन त्यानुसार कर मोजणी केली जाते. 

मुदतीनंतर मिळालेल्या रकमेवर कर सवलत :मुदतीनंतर मिळालेले एकूण व्याज कर सवलतीस पात्र नसते. ते त्या व्यक्तीच्या एकूण उत्पन्नात जोडले जाऊन त्यानुसार कर मोजणी केली जाते.
 
मिळणारे व्याज आर्थिक वर्षात १०००० पेक्षा जास्त झाल्यास त्यावर स्त्रोतावर कर आकारणी (TDS) केली जाते. 

ह्याबाबत अधिक माहिती टपाल खात्याच्या संकेतस्थळावर येथे मिळेल.

जून ०३, २०१३

काल संध्याकाळी मुंबई-ठाण्यात पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी बाजारात जाताना काळे ढग दिसले. अंदाज आला पाऊस पडणार आज. पण एवढ्या लवकर पडेल असे वाटले नव्हते.
दर पावसाळ्यात एक दृष्य नेहमी दिसते. काळे ढग, त्यासमोरून पांढरे पक्षी (बगळेच बहुधा) उडत जातात, त्यांवर सूर्यप्रकाश पडलेला असल्याने त्यांचा पांढरा रंग मस्त उठून दिसतो. हेच दृष्य कालही दिसले. कृष्णधवल :)

परत निघताना विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडत होता. घरी वीज गेलेली आहे असे कळले होते.
मला हाच मुद्दा जाणून घ्यायचा आहे. पाऊस निदान(पहिला तरी) पडल्यावर घरांतील वीज का जाते?

महाविद्यालयात असताना वसतीगृहात राहतो होतो लोणी मध्ये. तिथेही हाच प्रकार पाहिला होता. बेंगलूरू ला राहत होतो तेव्हाही हाच प्रकार पाहिला होता. तिथे तसा मी जवळजवळ शहराच्या बाहेरच राहत होतो. ऑफिस घरापासून जवळच. संध्याकाळी/रात्री घरी जाताना पाऊस पडताना दिसला की आधी फोन करून मित्राला विचारायचो की आपल्या भागात वीज आहे का? नसली तर मग आरामात निघायचे, तेवढा वेळ मग ऑफिसमध्ये काम (जास्त वेळा तर टाईमपासच) करून मग निघायचे, वीज आल्यानंतर. :)

आता कालही तेच झाले तेव्हा हे सगळे आठवले आणि मी काहीही अंदाज न लावता पुन्हा तोच प्रश्न विचारतोय, "पाऊस पडल्यावर घरांतील वीज का जाते?" :)

मे २९, २०१३

असे म्हणतात की जाहिरातीवाचून उत्पादन विकणे म्हणजे एखाद्या मुलीला अंधारात डोळे मारणे.

अर्थातच ह्याच तत्वावर अर्ध्याहून अधिक जग चालत असेल, मुलीला डोळे मारणे ह्या नाही...तर जाहिरातबाजीच्या.


लहानपणापासूनच दूरदर्शन, आकाशवाणीवर (दोन्ही ढोबळ मानाने तंत्रज्ञान आणि संच म्हणा, त्यावर वेगवेगळ्या वाहिन्या नव्हत्या तेव्हा) कार्यक्रम पाहताना, ऐकताना मधे मधे जाहिरातींची सवय होती. त्यात एक संरचना होती. ठराविक वेळानंतरच जाहिराती असणार. म्हणजे कशा, तर कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी आणि नंतर, किंवा थोडक्यात दोन कार्यक्रमांच्या मध्ये. शनिवार - रविवारी चित्रपट पाहताना एक मध्यांतर असायचे ते बातम्यांचे. तेव्हा पुन्हा त्या दोन प्रसारणांच्या मध्ये जाहिरात.

नंतर आले वारे चित्रपट चलचित्रफीतींचे (व्हिडिओ कॅसेट हो). त्या भाड्याने मिळायच्या, पण त्यातही चित्रपटाच्या सुरूवातीला, चित्रपटाच्या मध्येच जाहिराती सुरू झाल्या. भाड्याने कॅसेट घ्यायला गेलो की काही वेळा दुकानदार सांगायचा, ओरिजिनल प्रिंट आहे म्हणून. म्हणजेच चित्र/आवाजाचा दर्जा उत्तम आणि दुसरे म्हणजे त्यात जाहिराती नसणार.

त्यानंतर आले केबल टीव्ही. पण त्याकरीता उपग्रह वाहिन्या कारणीभूत होत्या. नुसते चित्रपट पाहण्याकरीता किंवा दाखवण्याकरीता कोणी एवढ्या वायरचे जाळे गुंतविले नसते. मग भाड्याने कॅसेट आणण्यापेक्षा केबलवर नवीन चित्रपट, किंवा जे लागतील ते पाहणे. ह्या सर्वांमध्ये जाहिरातींनी डोके वर काढायला सुरूवात केली होती.  त्यात कॅसेटमधील जाहिराती तर असायच्याच, पण मग स्थानिक दुकाने किंवा तत्सम जाहिराती येऊ लागल्या. जाहिरातींनी नंतर चालत्या कार्यक्रमाच्या पडद्यावर आक्रमण सुरू केले. खालची २० ते ३०% पट्टी जाहिरातींनी भरलेली, वरचीही थोडीशी पट्टी. त्यात प्रेक्षकांनी आपला चित्रपट शोधून पहायचा.
त्याच काळात, 'खुदा गवाह' चित्रपट सुरू होता केबलवर. इतर चित्रपटांत निदान एखादा प्रसंग किंवा दोन्-चार वाक्ये म्हटली पात्रांनी की जाहिरात दाखवायचे. पण ह्यांनी तर कहरच केला. एक वाक्य  तर सोडाच, मारामारीच्या दृष्यात एक मुक्का मारला की दाखव जाहिरात, एक लात मारली की दाखव जाहिरात.

उपग्रह वाहिन्यांनी कार्यक्रमात 'ब्रेक' सुरू केला. "मिलते है ब्रेक के बाद". असे म्हणणे आधी खेळ, स्पर्धा व तत्सम कार्यक्रमात आले. मग मालिका आणि चित्रपटांमध्येही. नंतर आपल्यालाही अंदाज यायला लागला की कार्यक्रमात आता केव्हा जाहिरात दाखवणार.

आता व्यावसायिकदृष्ट्या वाहिन्यांना आपला खर्च काढायचा म्हणजे जाहिरातीतून पैसा घेणार हे आलेच. पे चॅनल ची संकल्पना अशी ऐकली होती की त्यात ग्राहकांकडून पैसे घेतले असल्याने मग त्यात वाहिनीवर जाहिराती नसणार. पण एकंदरीत ती संकल्पनाचा मोडीत काढली गेली किंवा वाहिन्यांनी त्याला हरताळ फासला. इथे प्रेक्षकांकडून तर पैसे घेतातच पण वर जाहिरातींचा भडीमार.  तो भडीमार आता इतका झाला आहे की जाहिरातींचा कंटाळा येतो ते तर सोडाच, पण आजकाल जाहिरातींच्या मध्ये कार्यक्रम दाखवतात असे दिसायला लागले आहे. १५ मिनिट कार्यक्रम आणि १० मिनिटे जाहिरात. त्यात  त्यांचा प्राईम टाईम म्हणजे विचारायलाच नको. ते प्रमाण ५ मिनिट कार्यक्रम आणि १० मिनिटे जाहिरात असेही जाते. मग त्यांनी लोकांना आपल्या कार्यक्रम पाहण्याकरीता (खासकरून चित्रपट) वन ब्रेक मूव्ही, नो ब्रेक मूव्ही, ठराविक मिनिटांच्या जाहिराती म्हणजेच ब्रेक सुरू झाला की तेव्हाच सांगणार १ मिनिटांत परत. २ मिनिटांत परत. बरे, जाहिरात दाखवण्याकरीता चित्रपटातले प्रसंग कापतील पण जाहिराती कमी नाही करणार.

तसे म्हटले तर टेलिशॉपिंग अर्थात दूरदर्शनवर उत्पादन पाहून त्याची खरेदी फोनवरून करणे ह्याकरीताही आता नवीन वाहिन्या निघाल्यात, परंतु त्या जाहिराती इतर वाहिन्यांवरही दाखवल्या जातातच. ती ही एवढ्या प्रमाणात की B4U, Zee च्या काही चित्रपट वाहिन्या ह्यांवर तर ५ मिनिटे चित्रपट दाखवून एकच जाहिरात प्रत्येक ब्रेक मध्ये. जणू काही ती जाहिरात सतत पहायचा कंटाळा नको म्हणून मध्ये चित्रपट आहे.

तुम्ही म्हणाल मी एवढे पाल्हाळ का लावले आहे? तर TRAI ने काढलेला नवीन नियम. दूरदर्शन वाहिनीवर एका तासात १२ मिनिटांच्यावर जाहिराती दाखवण्यास निर्बंध घातले आहे. १० मिनिटे जाहिराती आणि २ मिनिटे कार्यक्रमांची जाहिरात. चांगला नियम अर्थात आपण प्रेक्षकांकरीता. खरे तर TRAI ने ह्या नियमाबद्दल २००७ मध्येच जाहीर केले होते. पण ते अंमलात आणायला एवढा वेळ का लागला ते कळत नाही. माझ्या आठवणीप्रमाणे जानेवारी २००७ मध्ये ह्याबद्दल ऐकले होते. त्यानंतर आता ऑक्टोबर २०१३ पर्यंत म्हणजे जवळपास पावणे सात वर्षांनी त्याचा वापर होईल असे दिसते. तरीही वाहिन्यांनी डिसेंबर २०१३ पर्यंतचा वेळ मागितला आहे. तेव्हा तरी ह्याचे पालन होते की नाही ते पाहू.

अजूनही एक गोष्ट तुम्ही अनुभवली असेलच. कार्यक्रम सुरू असताना मध्येच जाहिरात आली की तिचा आवाज खूप मोठा असतो. अचानक आवाज वाढल्याने कानांना त्रास होईल असा. आधी वाटायचे कार्यक्रमाचा आवाज कमी असतो आणि जाहिरातींचा मोठा म्हणून असे असेल. पण प्रत्येक कार्यक्रमात असे कसे असेल? ते मुद्दामच तसे ठेवतात असे कुठेतरी ऐकले/वाचले होते. पण ह्यामागचे नेमके कारण कळले नाही.
पण एक दिसले. अमेरिका आणि कॅनडामध्ये ह्याविरोधातही त्यांना नियम बनवावे लागले. 'जाहिरातींचा आवाज हा कार्यक्रमांच्या आवाजाएवढाच किंवा त्यापेक्षा कमी असावा'. हा नियम आपल्याकडेही लवकरात लवकर यावा अशी अपेक्षा. शक्यतोवर आता आलेल्या ह्या नवीन नियमावलीतच.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter