गेले दोन-तीन महिने अर्थसंकल्पाविषयी बातम्या वाचत/पाहत होतो. अर्थसंकल्प सादर व्हायच्या आधी अशाप्रकारच्या बातम्या की हे व्हायला पाहिजे, गेले कित्येक वर्षे ह्याची मर्यादा हीच आहे, ती वाढविली पाहिजे आणि अर्थसंकल्पानंतरच्या बातम्या की हे झाले नाही, असे करायला पाहिजे होते.
आता अर्थमंत्र्यांनी त्यांच्या विचारांनी अर्थसंकल्प पुढे आणला. त्याने किती फायदा/नुकसान झाले असेल तो माझा विषय नाही आहे. पण त्यानिमित्ताने साधारणतः कोणकोणत्या प्रकारची गुंतवणूक आपण करतो आणि त्यामागे काय करप्रणाली आहे ह्याचा बराच मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. मित्रांसोबत, कार्यालयातील सहकार्यांसोबत गप्पांमध्ये, आणि बातम्या, इतर कार्यक्रमांतून हे ही ध्यानात आले की आपण बहुतेक लोक काही ठराविक गुंतवणूकींवरच भर देतो, आणि त्याच्या कराबाबत आपणांस जास्त माहिती नसते. मी काही अर्थतज्ञ नाही किंवा व्यावसायिक कर/गुंतवणूक सल्लागार नाही. पण असा विचार केला की स्वतः गुंतवणूक करताना हीच सगळी गोळा केलेली माहिती आपण इतरांनाही देऊया. अर्थात आंतरजालावर शोधून पाहिजे ती माहिती शोधू शकतो. पण ती एकत्रित ठेवण्याच्या विचाराने मी ही लेखमाला लिहायचा विचार केला. कोणती गुंतवणूक चांगली किंवा तुम्ही कोणती वापरावी असा सल्ला मी देणार नाही. फक्त त्यातील मुख्य मुद्दे आणि त्याची कर आकारणी कशी असेल ही फक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे.
- ह्या लेख मालिकेत असलेल्या माहितीची जमेल तेवढी पडताळणी संबंधित विषयावरील संकेतस्थळांवरून, तसेच आयकर विभागाच्या संकेतस्थळावरूनही करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही, ह्या विषयाची व्याप्ती खूप मोठी असल्याने काही त्रूटी असण्याची किंवा माहिती अपुरी असण्याची शक्यता आहे. आपणांस काही त्रुटी आढळल्यास कळवावे. ती जमेल तेवढ्या लवकर दुरूस्त करून ती माहिती अद्ययावत करण्याचा प्रयत्न करीन. पण प्रत्यक्षात कोणतीही गुंतवणूक करताना किंवा कर आकारणी मोजताना आपल्या गुंतवणूक/कर सल्लागाराशी चर्चा करून घ्यावी.
- ह्यात जमतील तेवढे मराठीतील वापरात असलेले शब्द किंवा प्रतिशब्द वापरायचा प्रयत्न ठेवला आहे. परंतु तो शब्द क्लिष्ट वाटल्यास वापरात असलेला इंग्रजी शब्द/वाक्य तसेच्या तसे वापरले आहे.
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा