काही दिवसांपूर्वी मी रस्त्यावर पाहिलेल्या नगांविषयी लिहिले होते. त्यात एक होते पेट्रोलपंपासमोर फटाके लावणारे. तसाच एक प्रकार आहे भ्रमणध्वनी (मोबाईल) वापरणार्यांचा.
आजकाल लोकांना भ्रमणध्वनी वापरण्याची एवढी सवय झालीय की गाडी चालवताना संच वाजला आणि तो वापरला नाही तर आपला नंबर बंद करून टाकतील की काय अशी त्यांना भीती असावी बहुधा. एका हातात भ्रमणध्वनी ठेवून अर्धे लक्ष त्यात व अर्धे समोर ठेवून कार/दुचाकी चालविणारे, मान तिरकी करून कान आणि खांद्याच्या मध्ये संच अडकवून दुचाकी चालविणारे सगळीकडेच दिसतात. पेट्रोलपंपावर असतानाही रांगेत वाट पाहत फोन लावत राहणे चालूच असते. मग समोर पेट्रोलपंप चालकाने मोठा फलक लावला असेल तरी त्याकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले जाते.
मी तर जमेल तेव्हा भ्रमणध्वनी संच बंद करूनच पेट्रोलपंपवर जातो. किंवा नाहीच जमले तर वापरणे टाळतो. ह्यामागची ऐकलेली कारणे म्हणजे:
- भ्रमणध्वनीमध्ये वापरताना त्याच्या कळफलकांमध्ये ठिणगी पडणे बहुतेक वेळा होत असते. आणि पेट्रोलपंपवर पेट्रोल/डिझेल ची वाफ तरंगत असते. त्या ठिणगीमुळे वाफ पेटू शकते.
- मोबाईलच्या लहरींच्या उत्सर्गामुळे पेट्रोल मध्ये आग लागू शकते.
- आणि त्यांनी सांगितले आहे म्हणून ;) (त्यांनी म्हणजे भ्रमणध्वनी बनविणारे आणि पेट्रोलपंप चालक)
- इतरही कारणे आहेत.
आणि आणखी एक प्रश्न मला पडायचा, पेट्रोलपंपापासून किती अंतरापर्यंत भ्रमणध्वनी वापरायचा नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर मला गेल्या शनिवारी मिळाले, पेट्रोलपंपवरच. गाडीत हवा भरण्यासाठी पेट्रोलपंपवर गेलो होतो. तिकडे रांगेत गाडी लावून होतो. उजव्या बाजूला एक मुलगी दुचाकीवर बसून भ्रमणध्वनी वापरायचा प्रयत्न करत होती. तिला मी आठवण करून दिली की इकडे भ्रमणध्वनी वापरू नये. तिने ऐकून लगेच संच ठेवून दिला. (लगेच ऐकणारी माणसेही भेटतात हो. उगाच लोक ऐकत नाहीत असे नको म्हणायला ना? ;) )
आणखी वेळ लागणार होता. तेवढ्यात पाहिले की त्या पेट्रोलपंपाचा व्यवस्थापक (की मालक?) भ्रमणध्वनीवर बोलत उभा आहे. त्याला सांगितले, "दादा, इकडे लोकांना आपण सांगतो की पेट्रोलपंपवर मोबाईल वापरू नका आणि तुम्हीच वापरताय." तो म्हणाला," हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण म्हणूनच मी बाहेर येऊन बोलतोय." मी: " म्हणजे? कुठे बाहेर?" तेव्हा त्याने सांगितले की, "आपण पेट्रोल भरतो तिकडे वर जे छत बनविले असते त्याखाली भ्रमणध्वनी वापरणे धोक्याचे आहे. त्या भागात पेट्रोलची वाफ असते. आणि तिकडे अडचण येऊ शकते. " (त्या छताला काहीतरी नाव सांगितले ते मी विसरलो) मी म्हणालो," हो ते वाफेबद्दल माहित होते पण क्षेत्रफळाबद्दल माहित नव्हते." तो म्हणाला," तुम्ही केले ते ठीकच आहे. क्वचितच लोक असे करताना दिसतात"
माझ्या वागण्याबद्दलचे जाऊ द्या. पण ही माहिती माझ्या करीता नवीनच होती किंवा माझी आधीची माहिती बरोबर असली तरी अपूर्ण होती असेच म्हणावे लागेल. पण तरीही एक प्रश्न पडलाय, जाणकारांनी उत्तर द्यावे. पेट्रोलची (किंवा इतरही असल्याने इंधनाची) वाफ फक्त त्या क्षेत्रफळातच राहील का? ती आसपास पसरण्याची शक्यता नाही का?
2 प्रतिक्रिया:
खरं सांगायचं तर तुम्ही पेट्रोल पंपावर कितीही जवळ उभं राहून कितीही वेळ बोललात तरी स्फोट होत नाही. माझ्यावर विश्वास नका ठेऊ, पण Discovery Channel च्या Mysthbusters नावाच्या कार्यक्रमावर हे सारं खोडून काढलाय. हा video पहा हवं तर.
http://bit.ly/d1wqgo
या मध्ये जरी फक्त गप्पा दाखवल्या असल्या तरी या लोकांनी या विषयावर भरपूर चाचण्या घेतल्या होत्या आणि त्या सर्व एका तासाच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये दाखवल्या होत्या. त्यांनी काही दिवसांनी अजून काही चाचण्या केल्या होत्या ज्या सगळ्या वरून हे कळून आला कि असं होऊ शकतच नाही. या video मध्ये जो एक माणूस बोलतोय तो या विषय मधला खूप मोठा तज्ज्ञ आहे हे तो पूर्ण कार्यक्रम पहिला तर कळेल.
मला तुमची चूक नाही काढायची आहे. उलट तुम्ही जी खबरदारी घेता त्या बद्दल तुमचा अभिनंदनाच करायचा आहे. फक्त जर पेट्रोल भरताना तुमच्या बाजूच्या ने मोबिले काढला तर घाबरून जाण्यात आणि धावपळ करण्यात काही अर्थ नाही. उलट तुम्ही ज्या प्रकारे सांगितला लोकांना कि "बाबा रे फोने बंद कर" तसा सांगितला तर जास्त योग्य होईल.
-केदार
केदार, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद आणि दुव्याबद्दलही. आज किंवा उद्या नीट पाहीन ते.
मी चूक आहे की नाही तो मुद्दा नाही. असेनही. पण मी सांगितल्याप्रमाणे मला मिळालेल्या माहितीच्या आधारावर खबरदारी घेत होतो. आणि तसे नसले तरी तिसऱ्या क्रमांकाचे कारण ही आहेच. त्यांनी सांगितले आहे म्हणून :)
पण त्या दिवशी पेट्रोल पंपावर ते संभाषण घडले म्हणून मी आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होतो.
टिप्पणी पोस्ट करा