डिसेंबर ३१, २००७

आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील...

ख्वाब हो तुम या कोई हकीकत..
किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे. अर्थात किशोर कुमार सोबत इतर लोकांचाही आवाज असल्याने ते लगेच लक्षात येते. (आठवले, तीन देवियां सिनेमातील हे गाणे.)
दहावीत (बहुधा ११ वीत ) असतानाची गोष्ट. मला ताप आला होता. त्यामुळे मी झोपलो होतो. मध्येच जाग आल्यावर पाहिले तर मी खोलीत एकटाच होतो. रात्री ११च्या नंतर बेला के फूल मध्ये हे गाणे सुरू होते. ते गाणे ऐकताना एकदम ताजेतवाने वाटत होते. त्यामुळे आता कधी ही हे गाणे ऐकले की एकदम फ्रेश्श वाटते ;)
(आताही हे लिहिता लिहिता मागे गाणे ही सुरू ठेवले आहे :) )

घूंघट की आड से..
आमिर खान, जुही चावलाचे हे गाणे ऐकायला मस्तच आहे. त्यातील शब्दही छान आहेत. हे गाणे ऐकताना मला माझ्या लहानपणीचा सार्वजनिक गणपती समारंभ आठवतो. ज्यात कॉलनीतील एका मुलाने व त्याच्या घरी आलेल्या एका मुलीने ह्या गाण्यावर नाच केला होता.

ह्या सोबतच तम्मा तम्मा लोगे (थानेदार) तसेच आशिकी मधील गाणी ऐकली की तेच सर्व गणपतीचे दिवस आठवतात, ज्यात दिवसभर ही गाणी सुरू असायची. तम्मा तम्मा लोगे वर तर मनात येईल तसा नाच केला होता.

फरेब मधील ओ हमसफर हे गाणे ऐकले की महाविद्यालयातील दुसरे वर्ष आठवते. आणि बाहेर पाऊस पडत आहे असेच वाटते. ह्याचे कारण हे की ही गाणी जेव्हा चालत होती तेव्हा पावसाळा होता आणि माझ्या बाजूच्या खोलीतील मुले हीच गाणी लावून ठेवत होती.

यह जो थोडे से है पैसे, मुझसे नाराज हो तो.. पापा कहते हैं मधील ही गाणी ऐकली की परीक्षेच्या आधी दिलेल्या सुट्ट्या आठवतात. अर्थात त्या सुट्ट्या अभ्यासाकरीता होत्या पण त्यात गाणी ऐकणे, सिनेमे पाहणे हे थोडेच थांबते. :)

अश्विनी ये ना..
गंमत जंमत मधील हे गाणे ऐकले की आधी किशोर कुमारची गाण्याची पद्धत, जी दूरदर्शन वर दाखविण्यात आली होती, आठवत होती तसेच त्यातील अशोक सराफ ची जी बायको दाखविली आहे (चारूशिला साबळे) तिचे झाडू घेऊन नाचणे आठवायचे. पण कॉलेज मध्ये गेल्यावर पाहिले आमचे एक सर प्रत्येक वार्षिक समारंभाला हे गाणे गायचे, आणि त्यांच्या शाखेच्या फ्रेशर पार्टीलाही. त्यामुळे आता कधीही हे गाणे ऐकले की कॉलेजचे ते समारंभ आठवतात.

ॐकार स्वरूपा..

कॉलेज मधील प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात ह्याच गाण्याने व्हायची (आताही होत असेल). त्यामुळे हे गाणे ऐकले की मग ते समारंभ आठवणे आलेच.

मैं हूं झूम झूम झूमरू..
लहानपणी गणपतीतील अंताक्षरीच्या निवडफेरीत मी हे गाणे फक्त सुरुवातीच्या संगीतावरून ओळखून म्हटले होते. त्यामुळे अंताक्षरीत मी निवडला जाण्यास फायदा झाला होता. :)
तसेच कार्यालयाच्या सेमिनार वजा सहलीत औरंगाबादला असताना अजिंठा लेण्यात जाताना बसमध्ये हे गाणे गायलो होतो.
हे दोन प्रसंग ह्या गाण्याशी निगडीत राहतील असे वाटते.

ताक धिना धिन ताक धिना धिन...

रखवाला सिनेमातील हे गाणे त्यावेळी मला खूप आवडायचे. मी नेहमी गुणगुणत असे. शाळेत मग आमच्या वर्गात एक दोन वेळा मला गायलाही सांगितले होते. एकदा तर काय झाले की, आमच्या वर्गात दुसऱ्या वर्गातील मुलगा येऊन आमच्या टीचरला म्हणाला की मला त्यांच्या वर्गात बोलावले आहे. माझ्या टिचर ने मला पाठवले. तिकडे गेल्यावर कळले की त्यांच्या वर्गात अभ्यास संपला होता. मग मनोरंजन करण्याकरीता मला गाणे गायला सांगितले. तेव्हाही मी हेच गाणे गायलो होतो. आता ती इयत्ता/साल आठवत नाही, पण हे गाणे ऐकले की तो प्रसंग नक्की आठवतो.

अरे हो,
प्यार हमें किस मोड पे ले आया
सत्ते पे सत्ता चे हे गाणे तर राहिलेच. बंगळूरच्या ऑफिसच्या सहलीत सकाळी एका ठिकाणाहून परत येताना हे गाणे गाऊन मी धमाल केली होती. त्याच दिवशी मग संध्याकाळी बंगळूरला परत येताना ३ बस पैकी कोणत्या बसमध्ये बसावे हे विचार चक्र चालू असताना मित्रासोबत बसलो होतो. तेव्हा सकाळी आम्ही फिरायला गेलेल्या गटातील एक मुलगा मला शोधत आला व त्यांच्या बसमध्ये घेऊन गेला. तिथे तर मग काय हे गाणे, आणखी भरपूर धमाल गाणी गात, खेळ खेळत आम्ही परतीचा प्रवास केला होता.

छैया छैया
कॉलेजच्या वसतीगृहात जवळपास सर्व खोल्यांत हेच गाणे वाजविले जात होते. एवढा वैताग आला होता की मी माझ्या २/३ मित्रांना तर सांगितले होते की माझ्यासमोर हे गाणे लावायचे नाही. त्यांनी तर एकदा मग गंमत केली. मी एकाच्या खोलीत गेलो असताना मुद्दाम हे गाणे लावले व दुसऱ्या मित्राला जाऊन सांगितले की मी हे गाणे लावायला सांगितले. काय रागावला होता मग तो माझ्यावर. अर्थात मग नंतर ते आम्ही निकालात काढले होते.

आणखी ही गाणी आहेत, काही सध्या आठवत नाहीत.

तुमच्या आठवणींशी निगडीत अशी काही गाणी आहेत का?

डिसेंबर २९, २००७

ह्या आधीचा लेख इथे वाचावा.

जरी लहान मुलांना जवळपास सर्व वस्तू हव्या असतात तरी आपल्या वस्तू कोणाला द्याव्यात न द्याव्यात हेही त्यांना तितकेच चांगले कळते असे मला वाटते. समजा एखाद्या मुलाकडे एक खेळणे आहे, जर कोणी मोठा माणूस ते घ्यायचा प्रयत्न करेल तर तो त्याला घेऊ देईल. कारण त्याला माहीत आहे की हा काही हे घेऊन टाकणार नाही. पण तेच खेळणे जर त्याच्याच वयाच्या (किंवा थोडाफार लहानमोठ्या) मुलाने घेतले तर तो काही ते घेऊ देणार नाही. लगेच त्यांच्यात स्पर्धा सुरू होईल किंवा मग रडारड. अर्थात दोन्हीतही त्या मुलाला दुसऱ्याबद्दलची वाटणारी ओळख कशी आहे ह्यावर ही ते अवलंबून असेल. एखाद्या नवीन माणसाला ते काही देणार नाहीत किंवा मग सर्व काही उदार मनाने देतील. तेच दुसऱ्या लहान मुलाकरीताही.

खाणे.. ही गोष्ट तर लहान मुलांची आवडीची. समोर मग काहीही असो, ती वस्तू त्यांना खाल्ल्याशिवाय, चाखल्याशिवाय कळतच नाही की ती किती चांगली आहे. :D ही अतिशयोक्ती असेल पण प्रत्यक्षात काहीसे असे आहे. मी दहावीत होतो तेव्हा असेल, शेजारी राहणारा एक मुलगा. नुकताच रांगायला लागला होता. त्याला कसे माहीत पण डोंगळे (मुंगळे) खायची सवय लागली. रांगता रांगता समोर एखादा मुंगळा जाताना दिसला की लगेच तो त्याच्या तोंडात. एके दिवशी मुंगळा त्याला जिभेवर चावला तेव्हा त्याची ती सवय सुटली.

आता थोडया मोठ्या मुलांविषयी. जरी आपल्यापेक्षा लहान मुले,भावंडे ह्यांच्याशी ते खेळत/भांडत असतील तरी त्यांच्याबद्दलची जबाबदारीही कळते. हे जरी भरपूर ठिकाणी पाहिले असेल तरी त्यातील एक पाहिलेला अनुभव सांगावासा वाटतो. बहुधा २००४ मध्ये, आम्ही मित्र पुण्यात फिरत होतो. तेव्हा पाहीले की एका मोटार सायकलवर मागे बसलेली २ मुले (वय ४ आणि ५/६ वर्षे असेल). लहान मुलाला मोठ्याने एकदम नीट पकडून ठेवले होते. जाणवत होते की तो मोठा मुलगा आपल्या लहान भावाची जबाबदारी कशी घेतो आहे ते.

असो, एखादे सर्वेक्षण करून आणखी भरपूर गोष्टी लक्षात येतील. पण वरील सर्व गोष्टी मी अर्थातच अनुभवातूनच लिहिल्या आहेत. आणि अनुभव तर पुढे येत राहतीलच.

डार्विनच्या त्या सिद्धांताप्रमाणे आणि मानवाच्या, जगाच्या प्रगतीवरून ही क्षमता वाढतच राहील हेच खरे.

डिसेंबर २६, २००७

भरपूर वेळा, भरपूर ठिकाणी वृत्तपत्रांनी, वृत्तवाहिन्यांनी बातमीला मसाला लावून सांगणे, खोट्या प्रकारे एखाद्या गोष्टीला पुढे आणणे, किंवा एखाद्या गोष्टीचा त्यांच्या स्वार्थाकरीता फायदा कसा करून घेतला ह्याबाबत चर्चा होत असते. त्यांच्या वागण्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उभे असते. आता मी नेहमीच प्रसारमाध्यमांच्या विरोधात नाही. त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टींना वाचा फुटते. सामान्यांना फायदा होतोच. पण त्यांनी स्वत:ला काही मर्यादेत ठेवावे असे सर्वांचेच मत आहे.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे, परवाच्या दैनिकात वाचलेली बातमी. ती वाचून वाटले की हे लोक स्वत:च्या वृत्तपत्राला वाचक मिळावेत म्हणून एखाद्या गोष्टीला मोठ्ठी करून सांगतात.

बातमी अमिताभ बच्चन ह्यांच्या आई श्रीमती तेजी बच्चन ह्यांच्या अंत्यसंस्काराची.
दि. २३ डिसे. २००७ ला मुंबई मिरर ह्या दैनिकाच्या पहिल्या पानावर लिहून होते, Surprize Visitor at Teji's Funeral.
ह्या बातमीत आत काय लिहिले होते?
"विवेक ओबेराय ने अचानक श्रीमती तेजी बच्चन ह्यांच्या अंत्यसंस्काराला पोहोचून इतरांना आश्चर्याचा धक्का दिला. अभिषेक/ऐश्वर्या त्यांच्याशी अंतर ठेवून होते. अमिताभ, अमर सिंग आणि निखिल नंदा ह्यांचे चेहऱ्यावरील भाव चुकवू नका. वगैरे वगैरे."

त्यांच्या संकेत स्थळावर आणखीही विचित्र प्रकारे छायाचित्रांना वाक्ये जोडलेली आहेत. अभिषेक-ऐश्वर्या एकत्र बसले असताना त्याचा मथळा लिहिला "जोडी कमाल की" आणि पुढे लिहिलेले- आम्ही दोघांना विचारांत गुंग असताना छायाचित्र घेतले.

अरे, काय चाललंय काय? एखाद्याच्या अंत्यसंस्काराला कोणी माणूस पोहोचला तर त्यात तुम्हाला एवढी मोठी बातमी बनवायची गरज काय? मी तर म्हणतो हक्कच काय? आणि त्यांना दु:खाच्या प्रसंगी तरी सोडा. जर त्यांना काही नाही आवडले तर ते बघून घेतील.

पूर्ण बातमी (वाचावीशी वाटल्यास) इथे पहा.

तसेच टाईम्स ऑफ इंडीया मध्येही पहिल्या पानावर अभिषेक-ऐश्वर्याचे छायाचित्र आणि मथळा "कुछ ना कहो". अरे, फिल्मी ढंगात लिहायला ही बातमी पाहिजे का तुम्हाला? इतर ठिकाणी वाट लावताय ते पुरे नाही का?

लोक कुठल्या थरावर जाऊन काय लिहितील ह्याचा काही नेम राहिला नाही असे वाटते. निकृष्ट पत्रकारितेचा हा कहर झाला असे वाटते. तो प्रकार इतरांना कळावा म्हणून हा लेख.

डिसेंबर १७, २००७

नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणे, नेमेची येते नवीन वर्ष आणि नेमेची येतो नवीन वर्षाचा संकल्प.

१५ दिवसांनी नवीन वर्ष सुरू होणार. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासोबतच बहुतेक जण प्रश्न विचारणार," मग नवीन वर्षाचा काय संकल्प केलास?"
आता काय म्हणावे. दरवर्षीच सुरूवातीला ठरवतो की हे करणार, ते करणार. पण ते अमलात आणणे नीटसे जमत नाही. आहे, त्यात आळस हा भाग आहेच. परंतु काही वेळा वाटते, एवढे काय आपल्याला करायचे असते की जे इतके वर्ष आपण करावयाचे ठरवतो आणि मग करत नाही. सगळे नेहमीचेच.

हो, जर मी ठरविले की दररोज सकाळी लवकर उठायची सवय लावीन, तर प्रयत्न करू शकतो. पण कामावरून उशीरा आल्यावर कसले लवकर उठणे आणि कसला संकल्प. व्यायामाचेही तेच.

गेल्या (ह्याच) वर्षाचेच बघा की, कार्यालयातील कामाचा आढावा, मिटींग, पुढील कामे लिहिण्याकरीता एक प्लॅनर विकत घेतला. पण तो प्लॅनर नीट वापरणे जमलेच नाही. कारण काय तर एका कामातच एवढा गुंतलो की पुढे काय करायचे तेच ठरवता आले नाही. मग प्लॅनर मध्ये काय लिहिणार? @^%&@^@((@#%">%&@^%
बरं मग, दुसऱ्याला त्रास न देणे ठरवावे का? अरे, मी काही एवढा वाईट नाही आणि खरे तर मी कोणाला त्रास देतच नाही. तेच स्वत:च येतात त्रास करून घ्यायला. ;) जसे मागील आठवड्यात ठरवले होते की ह्या आठवड्यात शांत रहायचा प्रयत्न करीन. पण कसले काय, नेमके ह्याच सौजन्य सप्ताहात लोक असे विचित्र वागतात की ... (काय गरज होती त्या कार वाल्याला रस्त्यात गाडी पार्क करून जायची? )
एक आठवडयाचा संकल्प पाळता येत नाही, निघाला नवीन वर्षाचा संकल्प करायला.

पण काय करणार, जगाप्रमाणे वागायला पाहिजेच. मग करूया की नवीन वर्षाचा संकल्प.
काय करूया बरं?

एक करू शकतो, नवीन संकल्प न करण्याचा संकल्प किंवा मग परिस्थितीनुसार नेमके वागायचा आणि मग खंत न करायचा संकल्प.
मग, तुमचा काय आहे नवीन वर्षाचा संकल्प?

डिसेंबर १५, २००७

आज सकाळी कार्यालयात जाण्याकरीता बसमध्ये बसलो होतो. माझा भ्रमणध्वनी वाजला. पाहिले तर बहिणीचा फोन. उचलला पण काही आवाज नाही आला. थोड्या वेळाने बहिणीने संदेश पाठवला की तिने फोन नाही केला. अनिकेत फोनशी खेळत होता. अनिकेत म्हणजे माझा भाचा. वय फक्त ९ महिने. मी बहिणीला संदेश पाठवला. "बरे आहे. त्याला कळते की फोन कसा लावावा. आता तो फक्त बोलणे जमण्याची वाट बघत असेल." :)
आता ह्यात अनिकेतला खरोखर किती कळते ते माहित नाही, पण नेहमीचाच विचार मनात आला, "आज काल लहान मुलांना जास्त कळते."

बहुतेक जण म्हणत असतात की आज कालची मुले smart असतात. ह्याबाबतीत मला माझ्या बहिणीचे मत पटते. "जे सभोवताली असते, त्यातूनच मुले शिकतात ना? आपल्या पालकांनी आपल्याला फक्त चांगल्या गोष्टीच आपल्या समोर ठेवल्यात. ज्या गोष्टी नकोत त्या समोर नाही आणल्यात. त्यावरून आपण शिकलो की काय वस्तू कशाप्रकारे वापरावी. कुठे कसे वागावे. पुढे मग आपण आपल्या अनुभवातून पुन्हा त्या गोष्टींत नवीन जगाप्रमाणे भर टाकली. आता त्या गोष्टी आपण लहान मुलांसमोर ठेवणार. त्यामुळे मुळात जुन्या जगातील नको असलेल्या गोष्टी चाळून गाळूनच इतर त्यांच्यासमोर येणार."
डार्विनचाच सिद्धांत आहे ना तो? (शाळेतले आठवत नाही हो आता)
आता ह्या उदाहरणात, लहान मुलांसमोर आपण ज्याप्रमाणे भ्रमणध्वनी सारखा वापरतो, त्याप्रमाणे त्यांनाही तो हवासा वाटतो. पुढे मग आपले पाहून मग ते लहानपणीच भ्रमणध्वनी वापरायला शिकतील. चुकलो, शिकायला लागलेत.
पण खरोखरच, लहान मुलांची आकलन शक्ती हा अभ्यासाचा विषय आहे. लोकांनी त्यावर संशोधनही केले आहे आणि सुरूही आहेत. बसमध्ये, रस्त्यावर पहा ना. लहान मुले कशी सर्व गोष्टी निरखून पाहत असतात. अर्थात त्यांच्याकरीता सर्व नवीनच असते. पण प्रत्येकाचे निरिक्षण वेगवेगळ्या प्रकारे होत असेल असे मला वाटते. एखाद्या मुलाला भडक रंग जास्त आवडत असतील (बहुतेक लहान मुलांना त्याचे आकर्षण असतेच.) एखाद्याला हलणाऱ्या गोष्टींचे जास्त आकर्षण असेल.
२/३ वर्षांपुर्वी डिस्कव्हरी वर एक कार्यक्रम पाहिला होता. त्यात लहान मुले चालताना शिकतात तेव्हा बहुतेक गोष्टी त्यांना आधीपासूनच माहित असतात असे सांगितले होते, नीटसे आठवत नाही. एखादा मुलगा चालताना, जिना उतरताना आपल्याला तोल सांभाळता येतो की नाही ते नीट पाहतो मगच चालायचा प्रयत्न करतो.
त्या कार्यक्रमात दाखवल्याप्रमाणे, एका लहान मुलाला एका टेबलावर उभे ठेवले आहे. त्या टेबलजवळच दुसरा टेबल ठेवला आहे. दुसऱ्या टेबलजवळ त्याची आई त्याला बोलावते (की असेच काहीतरी). दोन्ही टेबलांच्या मध्ये, तो मुलगा फक्त एकच पाय ठेवून दुसऱ्या टेबलवर जाऊ शकेल एवढ्या रूंदीची पट्टी /फळी ठेवली आहे. त्या मुलाला आधाराकरीता हाताच्या उंचीवर एक दुसरी लाकडी पट्टी दिली आहे, जेणेकरून तो त्या पट्टीचा आधार घेउन त्या फळीवरून दुसऱ्या टेबलवर जाऊ शकेल. इथे तो मुलगा सहजपणे गेला.
पुढे त्याच प्रयोगात हाताच्या लाकडी पट्टीऐवजी एक रबरी पट्टी लावली आहे. जेव्हा त्या मुलाला पुन्हा दुसऱ्या टेबलवर बोलावले, तेव्हा त्याने त्या रबरी पट्टीला हात लावला. त्याला कळले की ही पट्टी आपल्याला आधार देऊ शकत नाही तर तो पुढे गेलाच नाही, आणि रडायला लागला.
तसेच जिना चढताना उतरतानाही लहान मुले कठड्याचा वापर करूनच उतरतात हेही दाखविण्यात आले होते.
आता तुमच्यापैकी बहुतेकांनी हे आधी पाहिले असेलच.
एका मित्राच्या मुलाचे (वय जवळपास १० महिने) तोल सांभाळणे मी पाहिले तेव्हा ते कौतुकास्पद वाटले. झाले काय की मी सोफ्यावर बसलो होतो. तो मुलगा सोफ्यासमोरील टेबलचा आधार घेऊन उभा राहीला. त्याला सोफ्यावर यायचे होते. त्याने उजव्या हाताने टेबल पकडून डाव्याने सोफ्याला हात लावायचा प्रयत्न केला. तो सोफा लांब असल्याने त्याने उजव्या हाताने माझ्या पायाचा आधार घेतला. पुढे आला. मग डाव्या हाताने माझ्या पायाचा आधार घेऊन उजव्या हाताने सोफा पकडला आणि मग सोफ्याजवळ गेला. तेव्हा मला तो डिस्कव्हरीचाच कार्यक्रम आठवला.
जवळपास १२ वर्षांपुर्वी एक ३/४ वर्षांचा मुलगा एक व्हिडीयो गेम खेळत होता. मी गमतीत त्याचे सेल काढून घेतले आणि त्याला सांगितले की हे चालत नाही. त्याने नीट पाहिले, गेमच्या मागील सेलचा कप्पा उघडला आणि म्हणाला की ’इथे सेल पाहिजेत.’ घ्या. आता त्यांना काय काय माहित आहे.
एक गंमत पहा. एखादा लहान मुलगा जर धावता धावता पडला तर तो उठतो. इकडे तिकडे बघतो. जर कोणी आसपास असेल आणि त्याला पडताना पाहिले असेल असे त्याला वाटले, तर लगेच भोकांड पसरतो. अन्यथा जर कोणी लक्ष दिले नाही तर स्वत:च उठून चालायला लागतो.
आणि भरपूर गोष्टी असतील. सध्या तरी एवढेच आठवत आहे. बाकी नंतर कधीतरी.

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter