नोव्हेंबर १९, २००७

काही वर्षांपुर्वी माझ्या बहिणीने मला एका इंग्रजी चित्रपटाची कथा सांगितली होती.
एका शहरात मंदीचे वातावरण असते. लोक जास्त काही खरेदी करीत नसतात. काय चाललंय कोणाला काही कळत नसते. एक दिवस एक माणुस कार विक्रेत्याकडे जातो आणि म्हणतो की मला ती महागडी कार खरेदी करायची आहे. मी ख्रिसमसच्या दिवशी घेऊन जाईन. हा विक्रेता विचार करतो की कित्येक दिवस आपण घरात काही चांगल्या,वेगळ्या वस्तू विकत घेतल्या नाहीत. आता जर ही कार विकली गेली तर आपल्याला भरपूर पैसे मिळतील. मग का नको आपण ही थोडा खर्च करूया. म्हणुन तो घराचे सामान विकणाऱ्याच्या दुकानात जातो आणि स्वत:च्या घराकरीता चांगले सामान घेतो. आता पुढे हा दुसरा विक्रेता स्वत:करीता काही गोष्टी खरेदी करतो. अशा प्रकारे त्या शहराच्या बाजारात एक प्रकारचे नवचैतन्य येते. प्रत्येक जण सणाकरिता काही ना काही खरेदी करतो. शहरातील मंदीचे वातावरण निवळून निघते.
काही दिवसांनी कळते की जो माणूस ती कार खरेदी करण्याकरीता गेला तो वेडा/मंद असतो. तो काही ती कार घेऊ शकत नाही.
ही गोष्ट लिहिण्याचे प्रयोजन:
मला त्या चित्रपटाचे नाव पाहिजे जेणेकरून तो मी पाहू शकेन.
बाजार कसा चालतो हे थोडेफार ह्या कथेवरून कळते. परंतु पूर्णत: माहिती मिळू शकेल का?
भरपूर ठिकाणी ओरड चालली आहे की आय टी मुळे सगळ्या गोष्टी महागत चालल्या आहेत. हो, हे मी मानतो. सुरुवातीच्या काळात आय़टी ला तुलनेने खूप जास्त पगार मिळत होता. त्यावेळी बहुधा लोकांनी जो भाव मागितला तो दिला असेल. त्यामुळे भाव वाढले. परंतु, एकट्या आयटी ने घोडे नाही मारले. परकीय गुंतवणुकीला मान्यता मिळाल्यानंतर भरपूर विदेशी कंपन्यांनी भारतात बस्तान मांडले. लोकांना विविध मार्ग मिळाले आपला पैसा वापरायला. इतर क्षेत्रांतही पगाराचा आलेख चांगला वधारला आहे. मित्रासोबत ह्या गोष्टी बोलत असताना ह्या सर्व गोष्टी पुन्हा विचारात आल्या. सर्व एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजेच, उदा. लोकांचा पगार वाढला. त्यांनी तो आपल्या राहणीमान आणि इतर गोष्टींवर वापरल्या. वेगवेगळे परदेशी कंपन्यांचे कपडे, बूट आणि इतर गोष्टी खरेदीच्या आवाक्यात आल्या (की नंतर त्यांचा भाव वाढला?). त्याने ही इतर उलाढाल बदलली.
मला आठवते आहे. नोकरी लागायच्या आधी मी एक पँट खरेदी करायला गेलो होतो. तेव्हा एका मॉल मध्ये ५०० रू.ची पँट खरेदी करणे मला जमले नाही. तेच आता मी १२००/१५०० ची पँट घेऊ शकतो. हो, पण त्यात फक्त पैशाचा मामला नाही. ते महागडे कपडे/बूट नको एवढे टिकतात. :)
असेही म्हणतात, आपण लोक पैसे घरी जमा करून ठेवतो. तो पैसा बाहेर बाजारात आल्यास इतर वेगवेगळ्य़ा ठिकाणी वापरता येतो. थोडक्यात वर लिहिलेल्या कथेप्रमाणे. म्हणून आपण पैसा बाजारात आणला पाहिजे. म्हणजे फक्त गुंतवणूकीत नव्हे. ह्यावरूनच एक लेख आठवला. तो इथे वाचता येईल. त्यात हेच म्हटले आहे. अमेरीकेतील लोक पैसा साठवत नाहीत किंवा खूप कमी साठवतात. नुसता बाहेर वापरतात. एवढे की उधार घेऊनही वापरतात(क्रेडीट कार्ड). ते आपणही केले पाहिजे. हे मला पूर्णपणे पटत नाही. पैसा थोडाफार(की भरपूर?) जमा असला पाहिजे. मगच इतर गोष्टी कराव्यात. गुंतवणूक सल्लागारही हेच सांगतात की आपल्या ६ महिन्याच्या पगाराएवढी रक्कम आपल्याकडे जमा असावी. मगच इतर पैसा वापरा.
आणखी एक कथा वाचली होती. कुठे ते आठवत नाही. श्रीकृष्णाच्या सहकाऱ्यांनी (कुंभार, सोनार, वाणी वगैरे सगळे) त्याला सांगितले की तू काही नाही करत. आम्हीच सर्व काही करतो. तेव्हा आम्ही ही काही न करू असे कर. कॄष्ण म्हणाला, ठिक आहे. तेव्हा सर्वांनी स्वत:चे काम करणे बंद केले. थोड्याच दिवसात तिथे अराजक मांडले. गोंधळ झाला. तेव्हा कृष्णाने त्यांना पटवून दिले की आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहोत.

नोव्हेंबर १७, २००७

कार्यालयात दुपारी जेवताना बोलता बोलता विषय निघाला.
माझा एक मित्र म्हणाला, 'अरे, जपान मध्ये डाटा सेव्ह करण्याकरीता काय काय केले आहे. आता ते लोक दातांमधेही माहिती साठवून ठेवू शकतात.'
दुसरा मित्र म्हणाला ' आता पेपरमध्ये बातमी यायची. एका महिलेचा दात पळवून तिची माहिती चोरली.'
प.मि.: ' किंवा महिलेचे सर्व दात पळवून लाखो रुपयांचा गंडा'.
दु.मि. : 'ती महिला म्हणेल, मी कवळी फक्त धुण्यासाठी बाहेर काढून ठेवली होती.'
मीः'किंवा असेही... महिलेला चाकूचा धाक दाखवून तिचे दात पळवून नेले.'

काय नं?.... आजकाल लोक तंत्रज्ञानात काय काय करतील व इतर लोक त्याचा किती फायदा व गैरफायदाही घेतील व चर्चा ही कशा होतील.

असो... ही फक्त गंमत म्हणून आमचे बोलणे चालले होते. पण प्रत्यक्षात भरपूर काही होऊ शकते.

नोव्हेंबर ११, २००७

शेवटी दिवाळी संपली...
नाही. दिवाळीशी माझा काही राग नाही. एक छान सण आहे. पण आजकाल कंटाळा येतो तो मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचा. नुसते आपलं ढूम.. ढाम चालू असते. कानाचे बारा वाजतात. आणि ते ही रात्री ११/१२ पर्यंत.

तरी वाटते ह्यावेळी जास्त फटाके वाजविले गेले नाहीत. निदान काल आणि आज तरी.
त्या पत्रकांचा परिणाम का? ;)
लक्ष्मीपूजनाला होता जरा आवाज. पण सहन केला. :)

असे नाही की मी कधी फटाके वाजविले नाहीत. मी ही भरपूर फटाके उडविलेत. नंतर त्यातून बाहेर आलो. झाले आता ... उम्म्म्म्म्म... १२/१३ वर्षे. पण त्याही जरा वेगळ्या आठवणी आहेत.

असू दे... आता थोडं निवांत वाटेल.

नोव्हेंबर ०५, २००७

"अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना", एक लहान मुलगा मला म्हणत होता.
दुपारी बेल वाजल्यावर मी दरवाजा उघडला. समोर दोन ८/१० वर्षांची मुले एका पिशवीतून काही कागद काढत होते. त्यातील एक मुलगा मला म्हणाला "अंकल,इसकॊ पढने के बाद ही फेंकना". मला हसू आले. त्या मुलाचे वाक्य मार्मिक होते. मी तो कागद घेण्याकरीता वाट बघत होतो. पत्रक हिंदीत होते. "क्या पटाखे फोडना जरूरी है?" ह्या संबंधी.
मला त्या मुलाच्या वाक्यावरून पत्रके (किंवा जास्त करून जाहिराती) आणि ते वाटणारे आठवले.
रस्त्यावरून जाताना, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, आज काल तर कार्यालयाच्या बाहेर ,बँक ,ए टी एम मशीन च्या बाहेर भरपूर लोक काही ना काही कागद आपल्या हातात देतात. (हमखास ठिकाण: दादर मार्केट मधील रेल्वेचा ब्रिज). अरे हो, वर्तमान पत्रे तर विसरलोच. आपण काही वेळा मूड असेल तर ते वाचतो, थोडेफार चांगले वाटल्यास घडी घालून खिशात ठेवतो, किंवा फाडून फेकून देतो. पण पुढे खरोखरच त्याचा उपयोग होतो का? होत नाही असे नाही परंतु माझ्या मते खूप कमी प्रमाणात.
त्यांचे ही किती प्रकार...
वजन वाढवा/कमी करा, १०% सूट, एखाद्या तांत्रिक बाबाचे उपाय, एखाद्या राजकीय पक्षाचे असतील तर त्यांच्याबद्दल, त्यांच्या किर्तीबद्दल. आजकाल तर प्रत्येक बँक काही ना काही छापत असतेच. दररोज संध्याकाळी घरी आल्यावर एक पत्रक दरवाजावर असतेच. हे इंटरनेट घ्या , ह्याचे क्लास त्याचे क्लास.
मला त्याबद्दल राग येत नाही की वाईट वाटत नाही. त्यांना स्वत:च्या कामाबद्दल/उत्पादन/सेवेबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवायची असते. त्याचे काम ही पत्रके छापूनही केली जातात.
आधी मी ती पत्रके घ्यायचो आणि वाचून बघायचो. हळू हळू मग कंटाळा यायला लागला. वाटायचे नाहीतरी एखादी गोष्ट मी त्यावरून ठरवतच नाही. जरी एखाद्या ठिकाणी काही मेळावा चालू असेल, सूट मिळत असेल तरी ते अशा ठिकाणी, अशा वेळी असते की जायला मिळतच नाही. आज काल तर कोणी काही देत असेल तर मी वरूनच बघतो काय आहे ते आणि मग सांगतो नको. चांगले दिसल्यास घेतो. पण पुन्हा तेच. त्याचा फायदा घेतलेला मला तरी नाही आठवत :(
आठवला, इंटरनेट घेण्याकरीता त्याच पत्रकातील फोन नंबर फिरविला होता.
फक्त एका प्रकारच्या पत्रकांचा राग येतो. एखाद्या देवाच्या नावाने लिहून, ह्याच्या १००/२०० प्रती काढून इतरांना वाटा त्याने तुमची भरभराट होईल अन्यथा काहीतरी वाईट होईल. लहानपणी मी ह्याला घाबरायचो. नंतर मी आणि माझी बहीण तर असली पत्रके नाकारायचोच. का उगाच विषाची परीक्षा घ्या. नंतर मग असली पत्रके कधी चुकून मिळाली तर सरळ फाडून केराच्या टोपलीत टाकायला लागलो. आता त्याबद्दल काही नाही वाटत.
काही वेळा वाटते ते देणाऱ्याच्या मनात काय विचार चालू असतील? त्यांना काय फक्त ती पत्रके संपवायची असतात? त्यांना त्याने किती फायदा होतो? तो फायदा मग त्या मुलाला काय मोबदला मिळाला तो असो किंवा ते पत्रक छापणाऱ्याला त्याचा किती फायदा झाला ते. त्यांचा पत्रके छापण्याचा खर्च निघतो का? जर ते त्याच्याच समोर फेकून दिले तर त्याला काय वाटत असेल?
मागील आठवड्यात एक गंमत झाली. जेवणानंतर बाहेरील दुकानात जाताना माझ्या एका मित्राच्या हातात एका मुलीने एक पत्रक दिले. कोणत्या तरी मोबाईल फोन कंपनीचे होते. त्यातील त्यांच्या स्कीम वाचल्या. एक गोष्ट कळली नव्हती. मी त्याला म्हणालो की देणाऱ्याला विचारून घे. परत येता येता मित्राने ते पत्रक त्या मुलीच्या हातात ठेवले. आम्ही पुढे गेल्यावर त्या मुलीचे वाक्य ऐकायला मिळाले "वापस?"

आतापर्यंत इतर ठिकाणी मी केलेले लेखन/चर्चा इथे चिकटवल्या. थोडक्यात म्हणजे माझ्या मनातील विचार.. ज्यात बहुधा प्रश्नच होते. ;) अनुभवकथन ही.

आता बघुया, पुढे आणखी काय सुचते?

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter