नोव्हेंबर ०५, २००७

प्रसंग १: वेळ रात्री ८ च्या सुमारास.
स्थळ: मी रिक्शातून रेल्वे स्टेशन वरून घरी येतोय.
मोबाईल वाजतो. समोरून एका गॄहस्थाचा आवाज.
गृ: नमस्कार. देवदत्त का?
मी: हो.
गॄ: मी xxxx बँकेतून बोलतोय.
(फोन नं चेन्नईचा होता म्हणून मी संभाषण पुढे सरकू दिले)
आपले जे हे क्रेडिट कार्ड आहे, त्याचे स्टेटमेंट वेळेवर येते का?
मी: मागील स्टेटमेंट आले. ह्यावेळचे माहित नाही.
गॄ: ठिक आहे. बँकेने आता तक्रार निवारणाकरता फोनवर नवीन सुविधा चालू केली आहे. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता.
मी: धन्यवाद.
गॄ: तुमचा पत्ता पडताळून पाहायचाय. तुम्ही सांगू शकता का?
मी: नाही. मी अशा गोष्टी फक्त ग्राहक सेवा केंद्रालाच देतो.......
गॄ: तुम्हाला माझा विश्वास नाही आहे वाटते. मी XXXX च्या मुख्य कार्यालयातून बोलत आहे.
मी: आता नाही आहे. तुम्ही मला रात्री ८ ८:१५ ला फोन करताय. पुन्हा तुम्ही माझी माहिती विचारताय. जी मी फक्त ग्राहक सेवा केंद्रालाच देतो आणि मी फोन केल्यावरच.
(माझ्याकडून थोडेफार रागाचे आणि मग निर्वाणीचे बोलून संभाषण बंद)

प्रसंग २: वेळ सकाळी ११ च्या सुमारास.
स्थळ: कार्यालयात मी काम करण्याच्या प्रयत्नात ;)
मोबाईल वाजतो. समोरून एका गॄहस्थाचा आवाज..

गृ: नमस्कार. देवदत्त का?
मी: हो.
गॄ: मी xxxx बॆंकेतून बोलतोय. तुमचे हे XXXX कार्ड आहे. त्याबाबत बोलायचे आहे. (माझ्याकडे ते कार्ड आहे म्हणून मी संभाषण पुढे सरकू दिले)
मी: मग?
गॄ: बँकेने तुमच्याकरीता नवीन क्रेडिट कार्ड मान्य केले आहे.
मी: मला गरज नाही आहे.
गॄ: अहो, तुम्हाला काही कागदपत्रे द्यायची गरज नाही. तुम्ही फक्त स्वत:ची माहिती द्या . जन्मतारीख, पॅन नंबर, पत्ता वगैरे. तुम्हाला २२ दिवसांत क्रेडिट कार्ड मिळून जाईल.
मी: मी ती माहिती देणार नाही. तुम्हाला पाहिजे तर मला ईमेल पाठवा. मी विचार करून त्याला उत्तर देईन.
गॄ: बहुधा तुमचा माझ्यावर विश्वास नाही. तुम्ही माझे नाव व फोन नंबर घेऊन बँकेतून खात्री करू शकता.
मी: ती खात्री करायला मी केव्हाही करू शकतो. तुमचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये आलाच आहे. पण मी तुम्हाला माहिती देऊ इच्छित नाही.मी अशा गोष्टी फक्त ग्राहक सेवा केंद्रालाच देतो. आणि मी फोन केल्यावरच. तुम्हाला पाहिजे तर मला इमेल पाठवू शकता.
(माझ्याकडून निर्वाणीचे बोलून संभाषण बंद)

मी त्या बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राला फोन करून ह्याबाबत माहिती दिली. मला उत्तर मिळाले की तुम्हाला क्रेडिट कार्ड मान्य झाले आहे का ह्याबाबत आमच्यकडे माहिती नाही.
बाकी खाजगी माहिती विचारण्याबद्दल सांगण्यात आले की काही एजंट ही माहिती मागू शकतात.

असेच भरपूर संवाद झाले आहेत. मी कोणालाही स्वत:ची माहिती देत नाही. ग्राहक सेवा केंद्राला फोन लावल्यानंतर ही माहिती काही वेळा द्यावी लागते (फोनमध्ये, कोणाही माणसाला नाही). उदा. कार्ड क्रमांक, PIN क्रमांक.पण पुढेही काही वेळा सारखी सारखी माहिती मागितल्यास त्यांच्यावरही डाफरलो आहे.

माझे असे विचारणे आहे की
मी योग्य केले का?
तुम्हाला जेव्हा असे फोन येतात तेव्हा तुम्ही काय करता?
बँक जर वेळोवेळी सांगते की तुमची माहिती अनोळखी इमेल किंवा फोनवर देऊ नका तर ग्राहक सेवा केंद्रातील त्या मुलीचे म्हणणे, की काही एजंट ही माहिती मागू शकतात, बरोबर मानावे का?

सविस्तर चर्चा/लेख मनोगत येथे वाचता येईल. दि : १३ मे २००५

महाभारत, रामायण आणि इतर धार्मिक पुस्तकांमध्ये लिहिल्याप्रमाणे आणि आपण पाहिलेल्या ठिकाणांवरुन मी हे म्हणू शकेन की देव-देवतांनी पृथ्वीवर आपला वास केला होता.
गीतेमध्ये लिहिल्याप्रमाणे श्रीकृष्ण परमपुरूष आहे. पूर्ण ब्रम्हांड त्याच्या अधिपत्याखाली आहे. आपल्या सूर्यमालिकेतील बहुतेक सर्व ग्रह हे देव आहेत. आणखीही बरेच काही.....
पण मग फक्त पृथ्वीवरच(आणि बहुधा भारतातच) सर्व काही का घडले? रामायण, महाभारत इत्यादी. काही खास कारणे?
जर पृथ्वीखेरीज इतर ठिकाणी काही घडले असेल तर त्याचे काही लिखाण कोठे मिळू शकेल काय?

तळटिप : ह्या चर्चेला "दुसऱ्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का?" ह्या दिशेने नेऊ नये. :-)

नोव्हेंबर ०४, २००७

सविस्तर चर्चा/लेख: मनोगत येथे वाचता येईल. दि: २४ मे २००५

"सगळीकडे हे असेच चालते. मग आपण काय करणार?"
हे वाक्य मी जवळपास सगळीकडे ऐकतो.
लोकलमध्ये, मित्रांत बोलताना, कार्यालयात, सगळीकडे...


काय होते?
१."अरे यार, बसमधून येताना जर तिकिट मागितले नाही तर ४ ऐवजी ३ रुपयांत काम होते. १ रु. वाचविला की नाही? "
२. रस्त्यावर माझी चूक असल्याने (मी सिग्नल तोडला किंवा नो पार्किंगला गाडी लावली तर) अर्थात मला वाहतूक पोलिस पकडतील. (नाही पकडले तर सुटलो). मग काय .. दंडाचे ४०० रू. देण्यापेक्षा त्यालाच ५० रू देऊन मामला निकालात काढायचा.
३. काहीतरी विकत घेऊन खाल्ले किंवा घरातीलच काही वस्तू खाण्यासाठी नेली. खाल्ल्यानंतर कचरा काय केला? तर रस्त्यावरच टाकला. लोकलमध्ये असेल तर खिडकीतून बाहेर टाकला. महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत ना साफ करायला.

परिणाम?
१. जर मी तिकीट मागितले नाही तर माझे १/२ रु. वाचले. पण मी दिलेले ३ रुपये कुठे जातील? अर्थात
वाहकाच्या खिशात. (त्याला मिळाले तर त्याचाच फायदा आहे ना? हे मला मिळालेले उत्तर) ते पैसे सरकार कडे जातात का? नाही.
२. मी ५० रू दिले. तेही गेले. अर्थात पोलिसाच्या खिशात. माझे ३५० रू वाचले.
३. जर नाही कचरा साफ झाला, किंवा पावसाळ्यात पाणी तुंबले, तर आपण त्यांना शिव्या देऊन मोकळे.

लोकांना त्याबद्दल सांगितले तर उत्तर काय? "सगळीकडे हे असेच चालते. मग आपण काय करणार? आपण आपला फायदा बघावा"

मी काय करतो?
१. मी तर स्वतः तिकीट मागून घेतो. जाऊ दे माझा एक रुपया जास्त. शेवटी तोच दर ठरविण्यात आला आहे ना? आणि जर तिकिट तपासनीसाने तिकीट विचारले तर काय? तो वाहक येणार आहे का सांगायला?
२. मी एकदा ४०० रू दिले तर मला एक धडा मिळेल ना? पुढे मी जे ५०/५० रू. त्याला देईन ते तर वाचतील ना?
३. मी काहीही रस्त्यावर फेकत नाही. स्वतःजवळील एका पिशवीत ते जमा करतो. मग कचऱ्याची पेटी दिसली तर त्यात फेकतो किंवा घरी कचऱ्याच्या डब्यात.

अशा भरपूर गोष्टी आहेत जिथे आपण फक्त आपला फायदा बघतो.
का आपण फक्त आपला फायदा बघावा? जर तुम्ही स्वतःच्या फायद्याकरीता समाजाची चाल बिघडवीत नाहीत का?
"आपण एकटे काय करणार ?" असे म्हणणे ही पळवाट नाही का?

मला सध्या दूरदर्शन वर दाखविण्यात येणारी एक जाहीरात खूप आवडली. एका गृहसंकुलात खूप कचरा जमा झालेला असतो. शेवटी तेथील लहान मुले पुढाकार घेऊन तो कचरा साफ करतात. तिथेही एका मुलापासून सुरुवात दाखविली आहे.

हे आपण प्रत्यक्षात नाही का करू शकत?

सविस्तर लेख/चर्चा: मनोगत येथे. दि: ७ जून २००५.

चित्रपट आणि आपण
१ जूनला वर्तमानपत्रात बातमी वाचली. १ ऑगस्ट पासून चित्रपट, धारावाहिकांमध्ये धुम्रपानास बंदी.
जरा बरे वाटले, की सरकार धुम्रपानाविरुद्ध जागरुकता वाढवित आहे. पण वाटले की ह्याचा किती फायदा होईल? थोडा विचार केल्यानंतर जाणवले की चित्रपटांचा समाजावर परिणाम होतोच. तेव्हाच वाचण्यात आले मटा.
१. हर फिक्र को धुएं में...
२. धुम्रपान दृष्यबंदी निर्णयामुळे चित्रपटसृष्टी संतप्त .

बरोबरच आहे म्हणा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सिगरेट ओढण्याचे चित्रपटांमधून फारसे समर्थन कधी झाले नाही. पण तरीही त्याविरोधातही जास्त काही घडले नाही. एखाद्याला व्यसनापासून मुक्त करणारे नायक नायिका फारच क्वचित दिसतात. पण पिणारे खूप दिसतात. आपण म्हणतो की चित्रपट हे प्रथमतः मनोरंजनाकरीता बनतात. (अपवादः काही चित्रपटांपासून खुप काही शिकण्यासारखे असते) पण चित्रपटांचा काही वेळा फक्त मनोरंजन म्हणून उपयोग होत नाही. लोक(मुख्यत्वे तरूण आणि लहान मुले) त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. एकतर्फी प्रेमप्रकरणातून झालेला हिंसाचार हे बहुधा त्याचाच परिणाम असावा. आणखीही बरेच प्रकार असतील.

मी चित्रपटांच्या विरोधात हे लिहीत नाही आहे. उलट मीही खूप चित्रपट पाहतो. ते तर माझे मनोरंजनाचे एक साधन आहे. मी ही काही वेळा ते डोक्यावर घेतले आहेत. पण मला जाणीव आहे की सर्व काही प्रत्यक्षात घडत नसते.

सिनेमाला सेन्सॉर बोर्ड एक प्रमाणपत्र देतेच की. ( ते किती उपयुक्त आहे हा वेगळ्या वादाचा विषय आहेः-) )

आता काय बघावे आणि काय बघू नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आजकाल हिंदी चित्रपटाच्या नायक नायिकांना आदर्श मानले जाते. "तो सिगरेट पिताना छान दिसतो, मीही प्रयत्न करतो. त्याने मुलगी पटविली तशी मीही पटवीन." आता हे आचरणात आणावे की नाही हा विचार ज्याचा त्याने करावा. मुलगी मिळाली नाही म्हणून दारू पिणे किंवा जीव देणे हे आता सामान्य/नित्याचे झाले आहे. पण आधी सांगितल्याप्रमाणे काही अपवाद असतात. उदा. 'आनंद.' हा चित्रपट माणसाला जगण्याची एक उमेद देतो. हल्लीचाच 'क्या यही प्यार है' हाही चित्रपट सांगतो हेच सांगतो की प्रेम हेच आयुष्यात महत्वाचे नाही.

हा लेख लिहिण्याचा मूळ उद्देश हाच की चित्रपटाचा आपल्यावर होणार परिणाम हा कसा असावा? आपण ते कोणत्या प्रकारे हाताळावेत? ह्यावर आपणा सर्वांची प्रतिक्रिया मिळेल ही अपेक्षा.

आणखी, सर्व काही चित्रपटांमुळेच घडते असे नाही. त्याला आणखी काही गोष्टीही जबाबदार असतील.

दोन वर्षांपूर्वी एका ईमेल मध्ये आलेले हे विचार. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम ह्यांचे. तेव्हा मी हे इथे टाकले होते.
खूप आवडले. आचरणात आणण्याजोगे. स्वत: आणि इतरांनीही. मी तर आधीच सुरूवात केली होती. ह्या विचारांनंतर त्यास दुजोरा मिळाला.

आपल्याजवळ दहा मिनिटे आहेत का?
तुम्ही तुमच्या देशासाठी दहा मिनिटे देऊ शकता का? जर हे शक्य असेल, तर पुढील मजकूर वाचा : तुम्ही म्हणता की, आपले सरकार अकार्यक्षम आहे. तुम्ही म्हणता की, आपले कायदे फारच जुनेपुराणे, म्हणून कालबाह्य झाले आहेत. तुम्ही म्हणता की, महानगरपालिका कचऱ्याचे ढिगारे उचलण्यात दिरंगाई करते. तुम्ही म्हणता की, फोन काम करत नाहीत. रेल्वेसेवा म्हणजे मोठा विनोद आहे. विमानसेवा ही जगातील अत्यंत भिकार सेवा आहे आणि पत्र पत्त्यावर कधीही पोचत नाहीत. तुम्ही म्हणता की, आपला देश खड्ड्यात गेला आहे. तुमचे हे रडगाणे सतत चालू असते; पण याबाबत सुधारणा व्हावी, यासाठी तुम्ही स्वत: काय करता? आपले कोडकौतुक केले जावे, अशा आशेने आपण आरामात हे सारे अलिप्तपणे बघत बसतो आणि आपण काहीही न करता, सरकारने सर्व काही केले पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. सरकारने सर्वत्र स्वच्छता राखावी, अशी आपली अपेक्षा असते; पण कचरा-घाण इतस्तत: टाकण्याची एकही संधी आपण सोडत नाही किंवा वाटेत पडलेला कागदाचा एकही कपटा उचलून कचरापेटीत टाकत नाही. रेल्वेने स्वच्छ प्रसाधनगृहे पुरवावीत, अशी आपली अपेक्षा असते; पण या प्रसाधनगृहांचा योग्य प्रकारे कसा वापर करावा, हे शिकावेसे आपणाला कधीही वाटणार नाही. इंडियन एअरलाइन्स व एअर इंडियाने सवोर्त्तम जेवण व प्रसाधने पुरवावीत, असे आपल्याला वाटते; पण भुरट्या चोऱ्या करण्याची एकही संधी आपण कधी सोडत नाही. मग आपण काय सबब देतो? ही संपूर्ण व्यवस्थाच आमूलाग्र बदलायला हवी. मग या व्यवस्थेचा कायापालट करणार तरी कोण? आणि या व्यवस्थेचे घटक तरी कोणते? आपण आपल्या सोयीनुसार असे समजतो की, या व्यवस्थेत शेजारीपाजारी, अन्य कुटुंबीय, इतर शहरवासी, अन्य जातीजमाती आणि सरकार यांचा अंतर्भाव असतो. मात्र या व्यवस्थेत तुमचा व माझा काहीही संबंध नाही. या व्यवस्थेत खरोखरच काहीतरी सुधारणा, विधायक योगदान करण्याची जेव्हा पाळी येते, तेव्हा आपण आपल्याला आपल्या कुटुंबासह एका सुरक्षित कोशात कोंडून घेतो आणि दूरवरच्या अन्य देशांकडे बघत बसतो किंवा कोणी 'मिस्टर क्लीन' येईल आणि जणू जादूची कांडी फिरवून सारे कसे स्वच्छ करील, अशी वाट पाहत बसतो. प्रिय भारतीयांनो, तुमचा हा उद्वेग खूपच विचारप्रवर्तक आहे आणि तो आपणाला अंतर्मुख करायला भाग पाडणाराही आहे. तसेच तो आपल्या सदसद्विवेकबुद्धीला टोचणी लावणाराही आहे. जॉन एफ. केनेडी यांनी आपल्या देशवासीयांना उद्देशून केलेल्या भाषणाची आठवण मी तुम्हाला करून देऊ इच्छितो. ते म्हणाले होते, 'आपला देश आपल्यासाठी काय करू शकतो, हे विचारू नका, तर आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो, हे स्वत:ला विचारा.'
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

भारताच्या प्रथम नागरिकांच्या दहा मिनिटांच्या संदेशाने आम्हाला आमच्या युवा वाचकांसाठी हे जीवनचरित्र प्रकाशित करण्याची प्रेरणा दिली. आम्हाला आशा आहे की, ते आपल्या जीवनातील अत्यंत रमणीय अशा काळात डॉ. कलाम यांच्या सदाबहार, प्रेरणादायी संदेशातून प्रेरणा घेतील आणि 'स्वप्ने पाहा, स्वप्ने पाहत राहा, स्वप्ने विचारात रूपांतरित होतील आणि विचार कार्यरूपाने साकारतील.'

इंडिब्लॉगर गुण

Unordered List

Followers

वाचनसंख्या:

Blog links

Definition List

ब्लॉगअड्डा

लेखन यादी

नुकत्याच लिहिलेल्या प्रतिक्रिया

Widget by ReviewOfWeb

वर्ग

अनुभव (79) चित्रपट (28) माहिती (18) दूरदर्शन (17) मराठी (16) वाहतूक (14) हिंदी (14) आंतरजाल (13) कर (13) वैताग (13) आठवणी (12) गुंतवणूक (11) जाहिरात (9) भ्रमणध्वनी (9) क्रिकेट (8) अर्थसंकल्प (5) ब्लॉग माझा (5) सामाजिक (5) जुनी गाणी (4) भटकंती (4) महाराष्ट्र (4) विश्वचषक (4) वृत्तवाहिनी (4) आयडिया (3) विनोदी (3) संकेताक्षर (3) अमिताभ (2) त्रिमिती (2) नाटक (2) निर्बंध (2) पुस्तक (2) प्रश्नमंजुषा (2) फ्लॅट टायर (2) मालिका (2) सचिन (2) अर्थ अवर (1) एकट्याने खाल्ले तर शेण (1) कालक्षेत्र (1) कुलुप (1) केबीसी (1) कॉमनवेल्थ गेम्स (1) गणेशोत्सव (1) गीत रामायण (1) जितेंद्र (1) जेटलॅग (1) थंडी (1) दिलवाले दुल्हनिया.. (1) दिवाळी अंक (1) दुहेरी (1) पारितोषिक (1) पासपोर्ट सेवा केंद्र (1) बिग बॉस (1) बॉबी देओल (1) भाषा (1) मासा (1) राखी का इंसाफ (1) राष्ट्रकुल स्पर्धां (1) वपु (1) श्रावणी (1) सदस्य खाते (1) सिक्वेल (1)

टीवटीव

Bravenet Counter