त्या अनोळखी झाडाला चैत्रपालवी फुटली होती. कुणीही आपल्याकडे पाहत नाही हे ठाऊक असूनही चैत्र आल्याची वार्ता सांगत ते झाड उभं होतं. माझ्याखेरीज त्या उभ्या आणि वाहत्या गर्दीतली एकही मान उंचावली नव्हती. तरीही हे झाड नवी पालवी दाखवत सांगत होतं, अरे, नवं वर्ष म्हणजे नवी पालवी! नवी पालवी म्हणजे नव्या आशा. नव्या वर्षाचं स्वागत म्हणजे नव्या आशांचं स्वागत. साखर स्वस्त होणार, मुलांना हव्या त्या शाळेत सक्तीच्या देणगीशिवाय प्रवेश मिळणार, आपल्या चाळीतील सगळ्या उपवर मुलींची लग्नं बिनहुंड्यात जमणार, वरळी सी फेसवर फ्लॅट देणारे चिक्कार सासरे भेटणार; अशा वैयक्तिक आशांपासून ते सत्तेवरच्या पक्षाचं राज्य कोसळून आपल्या पक्षाचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही; ह्या पराभूत पक्षांना युगानुयुगं पडणाऱ्या चिरंजीव भ्रमाचं स्वागत. आजचा दिवस हा असल्या नाना प्रकारच्या स्वप्नांच्या स्वागताचा आहे. नव्या वर्षाचं नवंपण ह्या असल्या जुन्या गळून गेलेल्या पानांच्या जागी नवी पालवी फुटणाऱ्या दृढ विश्वासात आहे. मनाच्या काचेवर गेल्या वर्षातल्या निराशांची धरलेली काजळी नव्या वर्षाच्या पाडव्याच्या दिवशी पुसून टाकली पाहिजे. दिवस दिवसांसारखेच असतात, पण एकाच स्त्रीनं आज हे नेसावं, उद्या ते नेसावं, आज ही फुलं माळावीत, उद्या ती फुलं माळावीत आणि कालच्यापेक्षा आज आपलं आपल्यालाच निराळं वाटून घ्यावं; तसंच दिवसांनाही आज पाडवा म्हणून नटवावं, उद्या दसरा म्हणून, परवा दिवाळी म्हणून. आपण आपल्या त्याच खोलीतली खाट एकदा इकडे आणि एकदा तिकडे ठेवून खोली निराळी करतो, तसं तेचतेच दिवस निराळे करणं आपल्या हातात आहे. फक्त झाडांना फुटते, तशी नवी पालवी मनाला फुटली पाहिजे.
- गाठोडं (पु. ल. देशपांडे)
सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
2 प्रतिक्रिया:
अगदी समर्पक उतारा आहे :) लक्षात ठेवून आजच्या दिवशी पोस्ट केल्याबद्दल तुला धन्यवाद. नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा !!!
:)
अगदी वेळेवर हे पुस्तक हातात आले असे म्हणता येईल. वाचतानाच ठरवले होते की हा उतारा ब्लॉग वर टाकायचा.
टिप्पणी पोस्ट करा