भारतातील पहिले आणि एकमेव मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय लोणावळ्यात आहे आहे असे ऐकले होते. पुण्याला जाताना रस्त्यावरच आहे असेही कळले. रस्त्यातच (म्हणजे एकदम रस्त्यावर नव्हे... मुंबई-पुणे रस्त्यावर. पण हो रस्त्यावरच आहे. जुन्या महामार्गावरून जातानाच दिसते) खास आडवळणात जायची गरज नाही. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर त्याचे फलकही लावलेले पाहिले. पण लोणावळा आल्यावरही नेमके कुठे वळायचे ते नाही लिहिले त्यांनी फलकावर. माझ्या बायकोला ते ठिकाण माहीत असल्याने तिने सांगितले की लोणावळ्यातून जुन्या महामार्गावर वळू. म्हटले जाता जाता एक चक्कर मारू. पाहिले तर चक्कर मारण्याइतकेच ते लहान आहे :) प्रत्येकी १०० रू. चे तिकीट काढून आत गेलो.
आत गेल्यावर पहिलाच पुतळा एकदम मस्त वाटला. बालाजी तांबे ह्यांचा. दोन तीन जणांच्या मध्ये तो पुतळा म्हणजे खरोखरच कोणीतरी उभे आहे असे वाटत होते. म्हटले चला काहीतरी खरोखर चांगले आहे.
बाजूलाच महात्मा गांधींचा पुतळा. पंडित नेहरू. मग राजीव गांधी.
डावीकडे शिवाजी महाराजांच्या पुतळयाजवळ गर्दी होती म्हणून सरळ पुढे सरकलो.
आतल्या खोलीत गेल्यावर उजवीकडे कोणाचा पुतळा ओळखता आला नाही. नाव वाचले तर छगन भुजबळ. बाहेर गांधी, नेहरू ह्यांचे पुतळे पाहून ह्यांचे पुतळे असणारच म्हणून वेगळे काही वाटले नाही. पण छगन भुजबळ ह्यांचा पुतळा पाहून लगेच म्हटले, "पूर्ण काँग्रेसप्रणित संग्रहालय आहे हे".
आणि खरोखरच भरपूर नेत्यांचेच पुतळे दिसले. तेही दक्षिण भारतातील. असो बा, पण ज्यांची नावे कधी ऐकलीही नव्हती त्यांचे पुतळे पाहून राजकारण किती प्रभावशाली आहे ते दिसले. आता प्रत्येकाचे नाव सांगत बसत नाही. जे ओळखता येतात त्यांचे नाव सांगायची गरज नाही आणि जे ओळखता येत नाहीत त्यांची नावे मलाही माहित नाहीत/आठवत नाहीत. जास्त माहिती त्यांच्या संकेतस्थळावर आहे.
तुम्हीच पहा त्याची (मी काढलेली) प्रकाशचित्रे :)
लास वेगस मधील वॅक्स म्युझिअम च्या मानाने भरपूर कमी पुतळे होते. दर्जाचा मी विचार करत नाही आहे. पुतळ्याला हात लावू नये अशी सूचना आत गेल्या गेल्याच मिळाली होती. पण तिथली स्वच्छता आणि पुतळ्यांच्या आसपासची पाहून थोडासा प्रश्न पडला, की हे जास्त काळ टिकेल का?. :(
नेते लोकांचा प्रभाव पाहून थोडा हिरमुसला झालो, पण एकंदरीत पुतळे सरासरीत चांगले वाटले.
0 प्रतिक्रिया:
टिप्पणी पोस्ट करा